प्रवास (२/४)

Submitted by आर्त on 29 July, 2026 - 06:55

“…हताश होऊ नकोस. जीवन एक प्रवास आहे बघ”, असं म्हणायचं, चहाचा शेवटचा घोट घ्यायचा, पीडिताच्या पाठीवर थाप द्यायची आणि निघून जायचं. संभाषणाला स्वल्पविरामकडून तडकाफडकी पूर्णविरामाकडे नेण्यासाठी हे वाक्य अगदी सहज वापरले जाते - ‘जीवन एक प्रवास आहे’. पण जितक्या सहजपणे हे वापरले जाते, तितके हे समजायला सोपे आहे का?

जीवनाचा प्रवास म्हटलं की मला आठवण होते ती ‘बृहदारण्यक उपनिषदा’तील प्रसिद्ध प्रार्थनेची

ॐ असतो मा सद्गमय ।
तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्मा अमृतं गमय ॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

या छोट्या प्रार्थनेबद्दल व्याख्यान देता येईल, इतकी अर्थपूर्ण ती आहे. पण थोडक्यात भाषांतर करायचं झालं तर त्याचा असा काही अर्थ होतो

मला असत्याकडून (खोट्याकडून) सत्याकडे घेऊन जा.
मला अंधाराकडून (अज्ञानाकडून) प्रकाशाकडे (ज्ञानाकडे) घेऊन जा.
मला मृत्यूकडून अमरत्वाकडे (मोक्षाकडे) घेऊन जा.

जरी या प्रार्थनेचा कल आध्यात्मिक किंवा मानसिक प्रवासाकडे असला, तरी त्याची अनुभूती मला मी केलेल्या असंख्य प्रवासांमधून झाली. जर्मनीला स्थलांतरित झाल्यापासून मला तीसहून अधिक देशांना भेट देता आली. मी एकाचवेळेला जगण्यापासून पळत होतो आणि जगणं शिकतही होतो. पूर्वेला जपानपासून पश्चिमेला मेक्सिकोपर्यंत मी भिन्न संस्कृतींचा अनुभव घेतला. जसजशी माझी अनुभवाची तिजोरी जड होत गेली, तसतसे माझे मन हलके होत गेले.

माझ्या जीवनाच्या प्रवासात अजून एक प्रभावी घटक म्हणजे मला भेटलेली माणसे. मी सहसा एकटाच प्रवास करत असल्यामुळे, परक्या लोकांशी संपर्क येणं खूप सोपं होतं. थोड्यांबरोबर मी काही तास गप्पा मारत घालवले तर थोड्यांबरोबर बऱ्याच दिवसांचा प्रवास मिळून केला. कित्येकांशी माझा अजूनही चांगला संपर्क राहिला आहे आणि जगाच्या कुठल्या न कुठल्या कोपऱ्यात भेट होत राहते. अशा सगळ्या मित्र-मैत्रिणींपैकी मला पुन्हा पुन्हा आठवण होते ती रोजमारीची.

मोरोक्कोची सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मारकेशहून मी दिवसभर प्रवास करून म्हमिद अल गजल, या गावी पोहोचलो. सहारा वाळवंटाच्या तोंडाशी असलेले हे गाव, मोरोक्कोच्या दक्षिणेला आहे. पुढच्या दिवशी इथून आमचा सात दिवसांचा वाळवंटातील प्रवास सुरू झाला. आमचा अकरा प्रवासी, चार मार्गदर्शक आणि चार उंट असा काफला होता. रोज आम्ही बारा ते पंधरा किलोमीटर पायी चालायचो. सात दिवस मोबाईल नाही, घर नाही, अंघोळ नाही आणि मनाला व्याकूळ करणारा मळ नाही. सकाळी निळ्या आकाशाखाली फिरायचो आणि रात्री लखलखत्या आकाशगंगेच्या कुशीत निजायचो. रात्र होत असली तरी भोवती अंधार कधीच नव्हता.

आमच्या तांड्यातील एक सहप्रवासी म्हणजे रोजमारी. ती स्वित्झर्लंडची होती. मला जर्मन बोलता येत असल्यामुळे प्रवासादरम्यान आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या. एका दुपारी विश्रांती घेत असताना, तिने तिच्या बॅगेतून सुई दोरा काढला. माझ्या सामानात झोपायचे कपडे, एक जोडी कपडे, मोजे आणि आतल्या चड्ड्या सोडून काही नव्हतं. अशात ही सुई दोरा घेऊन आलेली. तिने पायातून आपला फाटलेला मोजा काढला आणि सुई दोऱ्याने शिवू लागली. एवढी छोटीशी गोष्ट, पण मला तिची कमाल वाटली. फास्ट फॅशनच्या अनंत उकिरड्यात, थोडा रंग गेला तरी कपडे फेकून दिले जातात. अशात ती त्या उजाड वाळवंटात आपल्या मोज्याची डागडुजी करत होती. माझ्याकडे बघून ती म्हणाली, “टाकून देणं सोपं असतं. दुरुस्त करायला धीर लागतो”

रोजमारी आमच्याइतकंच चालायची. तिच्यात त्राण कमी आहे हे दिसून येत होतं. रेतीचे मोठमोठे डोंगर चढताना माझ्या पायांची क्षमता तपासली गेली. पण त्यांच्याहूनही मोठी रोजमारीची जिद्द होती. जेवायला बसताना सगळ्यांच्यामध्ये भाजी, ब्रेड, फळं यांची ताटं ठेवली जायची. बसल्या बसल्या त्या ताटांपर्यंत पोहोचायला अवघड होतं. तरीही ती ते स्वतः करायची. माझ्या वयाचे कितीतरी तरुण आहेत जे आई किंवा बायको ताटात वाढेपर्यंत वाट बघत बसतात. आणि इथेही आपले थरथरते हात ताणून, गुडघ्यावर बसून स्वतःचं जेवण घेत होती. ती मुळातच प्रचंड स्वावलंबी होती. किंबहुना परिस्थितीने तिला तसं घडवलं होतं.

तिच्या मुली लहान असताना, तिच्या नवऱ्याने सर्व काही विकून संपूर्ण कुटुंबासहित कॅनडाला स्थलांतरित व्हायचा निर्णय घेतला. त्याच्यावर एक धार्मिक पंथाचा प्रभाव होता आणि त्या पंथासोबत राहायची त्याची इच्छा होती. तिथे गेल्यावर रोजमारीला कळले की या पंथाचा भयानक उद्देश होता. कुठल्यातरी एका दिवशी ते सारे स्वतःला भस्म करून घेणार होते. रोजमारीने तिच्या नवऱ्याची समजूत घालायचा प्रयत्न केला. पण ती अपयशी ठरता, तिने आपल्या मुलींसोबत पळ काढली आणि कसेतरी पैसे जमवून पुन्हा स्वित्झर्लंडला परतली. एकीकडे या घटनेचा धक्का पचवायचा, दुसरीकडे मुलींची काळजी घ्यायची आणि समजूत घालायची, आणि तिसरीकडे या कुटुंबाचे पालनपोषण करायचे. कुणालाही इच्छित नसलेली नवी पहाट रोजमारीच्या क्षितिजावर उजळली होती. तिने जे दुःख आयुष्यात सोसले होते, त्यासमोर मी अनुभवलेल्या वेदना किरकोळ होत्या.

पाच महिन्यांनंतर वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी रोजमारीचे अचानक निधन झाले. सगळ्यांना प्रचंड धक्का बसला. रोमांचक प्रवास करण्यात, आणि आपल्या मुलींच्या आणि नातवंडांच्या सान्निध्यात तिने तिचे जीवन खूप आनंदात घालवलेले. तिची आणि माझी पुन्हा कधी भेट नाही होऊ शकली. त्या आठवड्याभरात तिने माझ्या जीवनवस्त्रातील अगणित छिद्रांची डागडुजी केली. मला अंधाराकडून प्रकाशाकडे नेता नेता, रोजमारीने अमरत्व गाठले, असे मी मानतो.

-----------------------------
टीप: एकूण चार लेखांची ही मालिका असणार आहे. हे लेख पूर्णतः माझ्या अनुभवांवर आधारित असून काल्पनिक नाहीत. तुमचे विचार, मत आणि सुधारणा जाणून घ्यायला मी खूप उत्सुक आहे. धन्यवाद.

(१/४) प्रदोष https://www.maayboli.com/node/88535

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर लिहिलंय. काही माणसं आयुष्यात फार कमी काळ भेटतात, पण त्यांच्याकडून मिळालेला जीवनाचा धडा मात्र कायम सोबत राहतो.

किती सहज सुंदर लिहिलंय.. वाचतच रहावं असं वाटतं.. ३० देशात फिरलाय असं म्हणताय आणि हि लेखमाला ४ भागात कशी काय संपेल Happy
लिहित रहा...