
(पूर्वप्रसिद्धी - 'क्रिक कथा' दिवाळी अंक -२०२४)
इसवीसनाच्या साधारण आठव्या शतकात इस्लामिक धार्मिक छळाला कंटाळून पारशी (झोराष्ट्रीयन) समाज आपल्या मूळ पर्शिया (आत्ताचा ईराण) या प्रांतातून भारतात आश्रयाला आला. गुजरात मधील संजाण येथे पहिल्यांदा भारतभूमीवर पाय ठेवल्यावर हा समाज प्रामुख्याने गुजरात व मुंबई प्रांतात स्थिरावला. नुसताच स्थिरावला नाही तर दुधात साखर मिसळावी तसा येथील समाजात विरघळून गेला. कालांतराने गुजराती हीच त्यांची मातृभाषा बनली. उद्यमशीलता, शिकण्याची वृत्ती, दानशूरपणा, कला-क्रीडांची आवड, प्रेमळ पण काहीसा तऱ्हेवाईक, फटकळ स्वभाव ही पारशी लोकांची काही स्वभाववैशिष्ट्ये. भारतात ब्रिटिशांनी बस्तान बसवल्यावर पारश्यांनी त्यांच्याशीही जुळवून घेतले आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवत राज्यकारभारात व उद्योगधंद्यात आपला ठसा उमटवला. त्याबरोबरच इंग्रजांनी भारतात रुजवलेल्या क्रिकेट खेळालाही आपलेसे केले.
पारशी समाजाने १९ व २० व्या शतकात मुंबईला देशाची आर्थिक आणि व्यापारी राजधानी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतानाच, क्रिकेटलाही देशातील सर्वात लोकप्रिय खेळ बनवण्यात मोलाचा वाटा उचलला. १८४० च्या दशकात इंग्रज ‘बॉम्बे जिमखान्या’त वेळ घालवण्यासाठी क्रिकेट खेळत असताना, पारशी लोकांनी त्यात रस घ्यायला सुरवात केली आणि लवकरच त्यात प्राविण्य मिळवले. काही क्रिकेटप्रेमी पारशी तरुणांनी १८४८ मध्ये मुंबईत ‘ओरिएंट क्रिकेट क्लब’ची स्थापना केली. लवकरच ‘पारसी क्रिकेट क्लब’ आणि ‘पारसी जिमखाना’ यांची स्थापना झाली. काही इंग्लिश क्लबना भारतात पराभूत केल्यावर पारसी क्रिकेट क्लबने १८८६ मध्ये इंग्लंडचा दौरा केला आणि तिथेही विजयाची चव चाखली. पुढे चौरंगी आणि पंचरंगी स्पर्धा सुरू झाल्यावर पारश्यांचा संघ इंग्रज, हिंदू, मुस्लिमांच्या संघाला लढत देऊ लागला.
कालांतराने १९३२ साली भारत इंग्लंडविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळला, त्यातही दोन पारशी खेळाडूंचा समावेश होता. असे असले तरी काही कारणांनी पारशी समुदायाची संख्या कायम कमी राहिली असून आजघडीला भारतात फक्त ५८,००० च्या आसपास पारशी लोकसंख्या आहे. त्यामुळेच बहुधा आतापर्यंत केवळ ११ पुरुष आणि २ महिला क्रिकेटपटूंनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. या खेळाडूंवर एक नजर टाकाणे नक्कीच रंजक ठरेल.
१. फिरोज एडल्जी पालिया :- ५ सप्टेंबर १९१० रोजी मुंबईत जन्मलेले ‘फिरोज पालिया’ डावखुरे फलंदाज आणि फिरकी गोलंदाज होते. १९३२ सालच्या भारताच्या पहिल्याच कसोटीत खेळण्याचा मान त्यांना मिळाला. पुढे १९३६ च्या इंग्लंड दौऱ्यातही त्यांना एक कसोटी मिळाली. असे एकूण दोनच सामने ते भारतासाठी खेळले, ज्यात जेमतेम २९ धावा केल्या आणि एकही बळी मिळवला नाही.
२. सोराबजी होर्मसजी मुन्चेरशा कोला :- भारताच्या पहिल्या कसोटीत खेळलेले दुसरे पारशी क्रिकेटपटू म्हणजे ‘सोराबजी कोला’. मुंबईत २२ सप्टेंबर १९०२ ला जन्मलेले कोला उजव्या हाताचे फलंदाज होते. १९३३ साली भारतात (मुंबई) प्रथमच खेळल्या गेलेल्या कसोटीतही त्यांना संधी मिळाली. या दोन कसोटीत मिळून त्यांनी ६९ धावा केल्या.
३. रुस्तमजी जमशेदजी :- १८ नोव्हेंबर १८९२ साली मुंबईत जन्मलेल्या ‘रूस्तमजी’ यांनी ४१ व्या वर्षी १९३३ साली भारतासाठी इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला, जो आजही कसोटी पदार्पण करणाऱ्या सर्वात वयस्कर खेळाडूसाठीचा भारतीय विक्रम आहे. या सामन्यात त्यांनी ३ बळी मिळवले परंतु या डावखु-या फिरकी गोलंदाजासाठी हा एकमेव कसोटी सामना ठरला.
४. खेर्शेद रुस्तमजी मेहऱ्होमजी :- मुंबईतील ९ ऑगस्ट १९११ चा जन्म असलेले ‘खेर्शेद’ यष्टीरक्षक होते. १९३६ च्या इंग्लंड दौऱ्यावर त्यांना आपला एकमेव कसोटी सामना खेळता आला. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर मेहऱ्होमजी यांनी मुंबईत क्रीडा साहित्याचे दुकान आणि स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय यांत जम बसवला.
५. रुस्तोमजी शेरियार मोदी :- मधल्या फळीतील फलंदाज ‘रुसी मोदी’ यांचा जन्म मुंबईत ११ नोव्हेंबर १९२४ रोजी झाला. रुसीनी १० कसोटी खेळताना ४६ च्या सरासरीने ७३६ धावा केल्या. १९४६ साली इंग्लंडविरुद्ध लॉर्डस् येथे विजय हजारे आणि विनू मंकड यांच्या साथीने त्यांनी कसोटी पदार्पण केले. तत्पूर्वी १९४४-४५ सालच्या रणजी स्पर्धेच्या हंगामात १००० धावा करण्याचा तसेच सलग ५ सामन्यांत शतक ठोकण्याचा विक्रम त्यांनी केला. १९५२ साली पाकिस्तानविरुद्ध मोदी आपला शेवटचा कसोटी सामना खेळले. आंतरमहाविद्यालयीन टेनिस आणि बॅडमिंटन स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या मोदींनी टेबल टेनिसमध्ये आंतरराज्य सामन्यांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. क्रिकेटमधील निवृत्तीनंतर ACC कंपनीमध्ये उच्चपदस्थ अधिकारी म्हणून त्यांनी काम केले.
६. जमशेद खोदादाद इराणी :- कराची येथे १८ ऑगस्ट १९२३ साली जन्मलेले ‘जेनी इराणी’ हे यष्टीरक्षक होते. भारतासाठी १९४७ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ते दोन कसोटी सामने खेळले. पण कालांतराने ते पाकिस्तानला स्थलांतरित झाले. तेथेच कराची येथील आपल्या मूळ गावी १९८२ साली निवर्तले.
७. केकी खुर्शेदजी तारापोर :- डावखुरा फिरकी गोलंदाज असलेले ‘केकी तारापोर’ मुंबईत १७ डिसेंबर १९१० ला जन्मले. एल्फिन्स्टन कॉलेजचे पदवीधर असलेल्या केकींच्या नशिबी १९४८ साली वेस्ट इंडिज विरुद्धचा एकमेव कसोटी सामना होता. १९५४ सालानंतर ते क्रिकेट प्रशासनात शिरले ज्यामध्ये १९८२ पर्यन्त ते व्यस्त राहिले.

८. पहलान रतनजी उम्रीगर :- महाराष्ट्राच्या सोलापूरमध्ये २८ मार्च १९२६ ला जन्म झालेले ‘पॉली उम्रीगर’ भारतीय क्रिकेटमधील टोलेजंग व्यक्तिमत्व राहिले आहे. १९४८ ते १९६२ दरम्यान उजव्या हाताने खेळणाऱ्या अष्टपैलू पॉलीनी ५९ कसोटीत खेळताना १२ शतकांसह ४२ च्या सरासरीने ३६३१ धावा केल्या. बरोबरच आपल्या मध्यमगती व ऑफ ब्रेक गोलंदाजीने ३५ बळी घेतले. त्याशिवाय आठ कसोटीत त्यांनी भारताचे नेतृत्वही केले. सुनील गावसकरच्या उदयापर्यंत फलंदाजीतले अनेक भारतीय विक्रम त्यांच्या नावावर होते. कसोटी द्विशतक करणारे ते पहिले भारतीय फलंदाज होते. १९६२ साली वेस्ट इंडिजविरुद्ध एकाच कसोटीत शतक व डावात ५ बळी असा दुर्मिळ विक्रम त्यांनी केला. निवृत्तीनंतर निवड समिती अध्यक्ष, संघ व्यवस्थापक, क्रिकेट संघटना सचिव, पिच क्युरेटर अश्या विविध रूपांत ते खेळाशी संलग्न राहिले.

९. नरिमन जमशेदजी कॉन्ट्रॅक्टर :- क्रिकेटच्या इतिहासात एका जगप्रसिद्ध जीवघेण्या चेंडूला सामोरे गेलेले खेळाडू म्हणजे ‘नरी कॉन्ट्रॅक्टर’. १९३४ सालच्या ७ मार्चला गुजरातमधील गोध्रा येथे जन्मलेले नरी डावखुरे सलामी फलंदाज होते. आपल्या पदार्पणाच्या प्रथमश्रेणी सामन्यात दोन्ही डावांत शतक करणारे ते जगातले केवळ दुसरे फलंदाज होते. १९५५ साली न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलेले नरी १९६२ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारताचे कर्णधार होते. याच दौऱ्यावर बार्बाडोसविरुद्धच्या सराव सामन्यात वेगवान गोलंदाज ग्रिफिथचा बीमर थेट त्यांच्या डोक्यावर आदळला. नरी जबर जखमी होऊन त्यांच्या नाका-कानातून रक्त येऊ लागले व थोड्याच वेळात ते बेशुद्ध झाले. वेस्ट इंडिजमध्ये त्यांच्यावर तात्पुरती शस्त्रक्रिया झाली. यावेळी खूप रक्तस्त्राव झाल्याने त्यांना चंदू बोर्डे, बापू नाडकर्णी, पॉली उम्रीगर या सहकारऱ्यांबरोबरच प्रतिस्पर्धी कर्णधार फ्रँक वॉरेल आणि क्रीडा पत्रकार के.एन.प्रभू यांनी रक्तदान करून त्यांचे प्राण वाचवले. काही दिवसांनी भारतात परतल्यावर वेल्लोर येथे परत त्यांच्या डोक्यावर गुंतागुंतीची मुख्य शस्त्रक्रिया झाली आणि खऱ्या अर्थाने ते मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप बाहेर पडले. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेवेळी त्यांच्या डोक्यात घालण्यात आलेली टायटॅनियमची प्लेट या घटनेनंतर ६० वर्षांनी २०२२ मध्ये जंतुसंसर्ग टाळण्यासाठी वैद्यकीय सल्यानुसार काढण्यात आली. हा जिगरबाज खेळाडू भारतासाठी ३१ कसोटी खेळला ज्यात १२ मध्ये त्याने नेतृत्व केले. १९७१ सालापर्यंत प्रथम दर्जाचे क्रिकेट खेळलेले नरी वरील अपघातानंतर एकही कसोटी खेळू शकले नाहीत.
१०. रुसी फ्रामरोज सुर्ती :- अस्सल अष्टपैलू खेळाडू असणारे ‘रुसी सुर्ती' मधल्या फळीतील डावखुरे फलंदाज, डावरे मध्यमगती गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होते. गुजरात मधील सुरत येथे २५ मे १९३६ रोजी जन्मलेल्या रुसी यांनी १९६० ते १९६९ या काळात २६ कसोटी खेळताना १२६३ धावा केल्या आणि ४२ बळी मिळवले. ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक ‘शेफील्ड शिल्ड’ स्पर्धेत खेळणारे ते पहिले भारतीय क्रिकेटपटू ठरले, जिथे त्यांनी ‘क्विन्सलँड’चे प्रतिनिधित्व केले. निवृत्तीनंतर ते ऑस्ट्रेलियातच स्थायिक झाले आणि क्रिकेट प्रशिक्षक म्हणून बरीच वर्षे योगदान दिले.

११. फारुख मानेकशा इंजिनियर :- आजघटकेपर्यन्त भारतासाठी खेळलेला शेवटचा पारशी पुरुष क्रिकेटपटू म्हणजे ‘फारूख इंजिनियर’. २५ फेब्रुवारी १९३८ ला मुंबईत जन्म झालेल्या फारूख यांचे शिक्षण माटुंगा येथील ‘डॉन बॉस्को’ शाळा आणि ‘पोद्दार' महाविद्यालय येथे झाले. लक्ष्यवेधी यष्टीरक्षक आणि कुठच्याही क्रमांकावर खेळणारा धडाकेबाज फलंदाज अशी ख्याती असणारे फारूख भारतासाठी ४६ कसोटी खेळले, ज्यात त्यांनी २६११ धावा करताना यष्टीमागे ८२ बळी टिपले. शिवाय १९७५ च्या पहिल्या वन-डे विश्वचषकात सहभागी होत एकूण ५ एकदिवसीय सामने खेळले. आकर्षक, दिमाखदार व्यक्तिमत्वाचे फारूख ‘ब्रिलक्रीम’साठी मॉडेलिंग करणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू होते. निवृत्तीनंतर इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले फारूख आजही भारताच्या इंग्लंडमधील अनेक सामन्यांचा रसिकपणे आस्वाद घेताना प्रेक्षागारात दिसतात.
१२. डायना एडल्जी :- भारताच्या सर्वात यशस्वी महिला क्रिकेटपटूंपैकी एक ‘डायना एडल्जी’ यांचा जन्म २६ जानेवारी १९५६ रोजी मुंबईत झाला. डावखुरी फिरकी गोलंदाज असणाऱ्या डायना यांचा भारताच्या १९७६ मध्ये झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्यावहिल्या कसोटीत समावेश होता. त्यांनी भारतासाठी १९७६ ते १९९३ दरम्यान २० कसोटी आणि ३४ एकदिवसीय सामने खेळले. त्यातील ४ कसोटी आणि १८ वन-डे सामन्यांत त्यांना नेतृत्वाची संधी मिळाली. त्यांच्या नावे कसोटीत ६३ तर वन-डे मध्ये ४६ बळी आहेत. महिला क्रिकेटमधील सर्वाधिक कसोटी बळींचा भारतीय विक्रम तसेच कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक चेंडू (५०९८) टाकण्याचा जागतिक विक्रम, अजूनही त्यांच्या नावे अबाधित आहे. अर्जुन व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डायना यांचा २०२३ मध्ये “आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम”मध्ये समावेश करण्यात आला.
१३. बेहरोझ एडल्जी :- डायना एडल्जी यांची मोठी बहीण असलेल्या ‘बेहरोझ एडल्जी’ यांनी भारतासाठी १९७६ साली एकमेव कसोटी खेळली, जो भारताचा पहिलाच कसोटी सामना होता. १३ एप्रिल १९५० चा मुंबईतील जन्म असलेल्या बेहरोझ या डावखुऱ्या मध्यमगती गोलंदाज होत्या. त्यांना या कसोटीत एकही बळी मिळाला नाही.
वरील क्रिकेटपटूंशिवाय इंग्लंडचा माजी अष्टपैलू ‘रॉनी ईराणी’ हा भारतीय-पारशी वंशाचा आहे. त्याचे वडील जिमी इराणी हे मुंबईत जन्मलेले पारसी गृहस्थ तर आई ब्रिटिश आहे. लॅंकेशायरमध्ये जन्मलेला रॉनी इंग्लंडसाठी १९९६ ते २००३ दरम्यान ३ कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळला.
अलिकडच्या काळात स्थानिक भारतीय क्रिकेट वर्तुळात दिसलेला पारशी खेळाडू म्हणजे गुजरातकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणारा ‘अर्झान नागवासवाला’. डावखुऱ्या वेगवान गोलंदाज अर्झानची २०२१ च्या ‘कसोटी अजिंक्यपदाच्या’ अंतिम सामन्यासाठी तसेच नंतरच्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या राखीव खेळाडूत निवड झाली होती.
क्रिकेटचे माहेरघर असलेल्या मुंबईसाठी खेळलेला शेवटचा पारशी खेळाडू म्हणजे ‘झुबिन भरुचा’. १९९२-१९९६ दरम्यान मुंबईसाठी खेळलेल्या झुबिनने रणजी पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकत झोकात सुरवात केली होती. सध्या झुबिन मुंबईत क्रिकेट अकादमी चालवतो आणि ‘आयपीएल’ मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी मार्गदर्शनाचे काम करतो.
चार पारशी क्रिकेटपटू भारतासाठी एकत्र एका कसोटीत खेळण्याची घटना केवळ दोन वेळा घडली आहे. १९६२ साली वेस्ट इंडिज दौऱ्यावर पहिल्या दोन कसोटीत उम्रीगर, कॉन्ट्रॅक्टर, सुर्ती व इंजिनियर हे चौघे एकत्र खेळले.
या क्रिकेटप्रेमी पारशी समाजाने १८८६ च्या इंग्लंड दौऱ्याद्वारे स्पर्धात्मक क्रिकेटमधील त्यांच्या पदार्पणाची शताब्दी साजरी करण्यासाठी १९८६ मध्ये सिडनीत क्रिकेटसंबंधीत ४० मिनिटांचे एक नाटक सादर केले. गुजराती आणि इंग्रजी अश्या मिश्र-भाषेत हे नाटक सादर झाले, ज्यात चक्क रंगमंचावर क्रिकेट खेळले गेले.
अश्या या क्रिकेटप्रेमी भारतीय पारशी समाजाबाबत एकच सदिच्छा व्यक्त करावीशी वाटते की त्यांचा अस्तंगत होत चाललेला क्रिकेटचा वारसा टिकवणारा एखादा तारा लवकरच भारतासाठी खेळताना पहायला मिळो. कारण लोकप्रिय पारशी खाद्यव्यंजन ‘धनसाक’प्रमाणे या पारशी खेळाडूंनी ईतर अनेक क्षेत्रांबरोबरच भारतीय क्रिकेटलाही आपला असा खास चटपटीत स्वाद दिला आहे.
- गुरुप्रसाद दि पणदूरकर (मुंबई)
guru.pandurkar@gmail.com