भस्मबीज - भाग ११

Submitted by नितनवे on 6 August, 2026 - 12:57

भस्मबीज - भाग १०
पूर्वभाग
अभिजितला वाड्यात सापडलेल्या अठ्ठावीस पानांच्या जुन्या बाडाची पीडीएफ करून तो नेहामार्फत तिच्या आजीकडे लिप्यंतरासाठी पाठवतो, पुढे नेहाच्या आजीकडून बखरीचे देवनागरी लिप्यंतर मिळाल्यावर इनामदार घराण्याचे मूळ विजयनगर, सन्कन्ना नाईक आणि मालोजी भोसले यांच्याशी असलेले ऐतिहासिक नाते उलगडते, तसेच सन्कन्नाच्या आयुष्याच्या अखेरीस सुरू झालेल्या गूढ घटनांचाही उल्लेख आढळतो. मात्र त्याच वेळी माळ्यावरून बाडातील आणखी एक सुटलेले पान सापडल्याने या रहस्यात अजूनही एक महत्त्वाचा धागा दडलेला असल्याची जाणीव अभिजितला होते.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग ११ - कुलदैवत
दोघेही बराच वेळ निःशब्द बसून राहिले. लॅपटॉपच्या स्क्रीनवर बखरीचं शेवटचं पान अजून उघडंच होतं, "ज्याचे प्रारब्ध असेल, त्याचे हातीच हे पडेल."

अभिजितने सोफ्याला मागे टेकून डोळे मिटले. बराच वेळ तो तसाच राहिला.

"आणि सन्कन्ना दक्षिणेला गेले," स्वाती हळूहळू, जणू स्वतःच धागे जुळवत म्हणाली. "परत आले. पण जे घेऊन गेले होते, ते परत आणलं नाही."

अभिजितने ती ओळ पुन्हा वाचली, मोठ्यांदा, "जेथून आले, तेथेंच राहिले."

तो स्वतःशीच पुटपुटला, "याचा अर्थ... ते द्रव्य अजूनही तिथेच आहे. आजही."

"पण तिथेच म्हणजे कुठे? कल्याण पट्टणा?" स्वातीने विचारले.

स्वातीने स्क्रीनवर बखरीचं पहिलं पान पुन्हा उघडलं. काही क्षण ती त्या जुन्या अक्षरांकडे बघत राहिली, मग म्हणाली, "अभिजित... मला अजून एक गोष्ट खटकतेय. ही एवढी वर्षं त्या पेटीच्या तळाशी तशीच पडून राहिली? इतक्या पिढ्यांत कुणीच उघडली नाही? कुणाच्या हातीच लागली नाही?"

"ज्याचे प्रारब्ध असेल, त्याचे हातीच हे पडेल." तो म्हणाला. "कदाचित... ही बखर सापडायची वेळ आत्ताच आली होती. माझ्याच हातीच पडायची होती."
अभिजितच्या डोळ्यांसमोर माळ्यावरची ती रात्र पुन्हा जिवंत झाली. ती पाठमोरी आकृती, राखेने भरलेला चेहरा, आणि तो कोरडा, हाडांच्या कडकडाटातून येणारा आवाज.

"बारा झाल्या... तेरावी उरली..." अभिजितच्या अंगावर सरसरून काटा आला.

तेवढ्यात स्वातीच्या प्रश्नाने तो तंद्रीतून बाहेर आला, "शेवटी ते बिजापुरासी रोखिले म्हणजे विजापूरच्या सैन्याला रोखले कि आणखीन काही ते समजत नाही. आणि त्या पुढे लिहिलंय की हे विशेष लिहून ठेवा आणि तळाशी ठेवावे म्हणजे सहज कुणाच्या हातालाही लागू नये, यामागचा उद्देश काय असेल?"

"काय माहीत? कदाचित या नंतर सापडलेल्या कागदात काही असू शकेल पण आपल्याला त्यासाठी वाट पाहावी लागेल" अभिजित म्हणाला.

"एक गोष्ट मानली पाहिजे," ती अभिजितकडे वळून म्हणाली, आवाजात खरीखुरी दाद. "आजींनी केवढं मोठं काम करून दिलं हे. इतकी जुनी, पुसट अक्षरं; शाई उडालेली, कुठे कागद फाटलेला आणि तरीही एकेक शब्द इतक्या काळजीपूर्वक उलगडून दिला त्यांनी."

अभिजितने मान हलवली. "खरंय, नेहा म्हणत होती, आजी रात्री उशिरापर्यंत जागून बसायच्या या पानांवर. एका शब्दावर अर्धा-अर्धा तास घालवायच्या, जोपर्यंत खात्री पटत नाही तोपर्यंत पुढे जायच्या नाहीत."

स्वातीने त्या पानांकडे पुन्हा एकदा बघितलं, आणि म्हणाली, "पुढच्या वेळी कुमठ्याला जाऊ, तेव्हा त्यांना मनापासून भेटायला हवं. नुसतं फोनवर आभार मानून हे फिटायचं नाही."

"हो, नक्कीच. पण आता पुढे काय?"

"आता पुढे कल्याण पट्टणा. बघूया तिथे आणि काय सापडतंय"

"कल्याण पट्टण," स्वाती पुटपुटली, आणि तिने पटकन फोन उचलला. "थांब, बघते गुगल मॅपवर."

तिने नाव टाइप केलं, कल्याण पट्टण. मग पुन्हा, स्पेलिंग बदलून. आणखी एकदा. "काहीच येत नाहीये." तिने कपाळाला आठ्या घातल्या. "असं कुठलं गावच नाही म्हणतंय."

अभिजितने फोन तिच्याकडून घेतला, मॅप बंद करून नुसतं गुगलवर शोधलं, "कल्याण पट्टण." आणि पहिल्याच दोन-तीन निकालांत उत्तर होतं.

"स्वाती, बघ." त्याच्या आवाजात एक चमक होती. "कल्याण पट्टण हे सिरसीचं जुनं नाव आहे. केळडी-सोंदा राजांच्या काळातलं."

"आणि सिरसी आणि यानामधलं अंतरही खूप कमी आहे"

दोघेही एकमेकांकडे बघत राहिले. नेमका त्याच वेळी फोन वाजला. नेहाचा नंबर.

"सर, वाचली का बखर? मला आधी देवप्पा सांगत होता त्यावर अजिबात विश्वास नव्हता पण आत काय बोलावं हे सुचत नाही"

"हो वाचली नेहा, मी आणि स्वाती आता तेच म्हणत होतो की आजीनी किती कमी वेळात आणि अचूक लिप्यंतर केलंय.

"खरंच माझी आजी म्हणजे ग्रेटच आहे. आणि सर कल्याण पट्टणबद्दल सांगायचं होतं," ती उत्साहात म्हणाली. "मी शोधून काढलंय, ते सिरसीचंच जुनं नाव आहे."

अभिजित हसला. "आम्हीही आत्ताच ते शोधलं."

"पण एक सांगते सर, एवढ्यासाठी लगेच कर्नाटकात धावायची गरज नाही." नेहाच्या आवाजात आता तोच नेहमीचा व्यवहारी शहाणपणा होता. "माझा मामा तिकडेच असतो. मी त्याला सांगते, सिरसीच्या आसपास चौकशी करायला. तो आधी थोडी माहिती काढेल, मग आपल्याला नेमकं कुठे जायचं ते कळेल."

"हे बरं राहील," अभिजित म्हणाला.

"आणि अजून एक; ते नंतर सापडलेलं सुटं पान आहे ना, त्याचं लिप्यंतर व्हायचंय अजून. मला वाटतंय त्यात आणखी काहीतरी महत्त्वाचं असेल. ते आजीचं वाचून झाल्यावरच पुढचं ठरवूया. उगीच घाईत जाऊन काही सापडलं नाही, तर वेळही जाईल."

तेवढ्यात स्वातीने हळूच त्याच्याकडे हात पुढे केला फोन मागत होती. अभिजित क्षणभर थबकला. आजपर्यंत नेहा आणि स्वाती कधी थेट बोलल्या नव्हत्या. त्याच्या मनात एक अनामिक अवघडलेपण दाटून आलं; या दोन स्त्रिया, आणि त्याच्या मनातलं ते न बोललेलं गुंतागुंतीचं सगळं... पण त्याला नकार देता येईना. त्याने फोन स्वातीच्या हातात दिला.

"हॅलो, नेहा? मी स्वाती बोलतेय."

पलीकडे क्षणभर शांतता, मग नेहाचा किंचित सावरलेला आवाज. "नमस्कार, स्वाती मॅडम."

"अगं मॅडम काय? स्वाती चालेल नुसतं. खरंच मनापासून आभार मानायचे होते तुझे." स्वातीच्या आवाजात कुठलाही औपचारिकपणा नव्हता, "तू आणि तुझ्या आजींनी खूप मदत केली.आणि या सगळ्यात तू जी अभिजितसोबत, आमच्या कुटुंबासोबत उभी राहिलीयेस... ते सोपं नाही, माहीत आहे मला."

"स्वाती, असं काही नाही..." नेहा अडखळली, तिला या थेट आपुलकीची अपेक्षा नव्हती.

"आहे. आणि मला ते जाणवतंय." स्वाती हळूच हसली. "कधीतरी वेळ काढून घरी ये, भेटूया."

"नक्की स्वाती. मलाही आवडेल." नेहाच्या आवाजातही आता तीच सहजता उतरली होती. दोघी आणखी काही क्षण बोलल्या; घर, प्रवास, आजींची तब्येत, अशा साध्या गोष्टी. पण त्या साध्या शब्दांमागे एक विचित्र, अनपेक्षित आपलेपणा तयार होत होता जणू या दोघी एकमेकींना कुठेतरी खोलवर ओळखत होत्या, आजच पहिल्यांदा बोलत असूनही.

अभिजित बाजूला बसून हे ऐकत होता, आणि त्याला काय वाटावं तेच कळत नव्हतं. एका बाजूला जीव भांड्यात पडल्यासारखं वाटत होतं, तर दुसरीकडे एक विचित्र अवघडलेपण. या दोघींमधली ही सहजता त्याला हवीहवीशी वाटत होती, आणि तरीही त्याच्या मनातल्या त्या न सुटलेल्या गुंत्यामुळे ती त्याला अस्वस्थही करत होती.

फोन ठेवल्यावर स्वाती काही क्षण शांत राहिली, मग विचारपूर्वक म्हणाली, "चांगली मुलगी आहे रे नेहा. मनाने साफ."
अभिजित काहीच बोलला नाही. फक्त मान हलवली.
************************************************************************************************************************
त्या मध्यरात्री, दोन-अडीचच्या सुमारास, अभिजितला जाग आली. कशाने, ते कळलं नाही. खोलीत काळोख होता, स्वाती शेजारी शांत झोपलेली. पण त्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. त्याला जाणवलं की खोलीत ते दोघेच नाही आहेत. अजून कुणीतरी आहे. त्याने हळूच कूस बदलली, आणि तेव्हा त्याला दिसलं. पलंगाच्या पायथ्याशी, अंधारात, कुणीतरी पाठमोरं बसलं होतं.

पहिल्यांदा त्याला वाटलं स्वाती उठून बसलीये. पण स्वातीचा उबदार हात त्याच्या दंडाला लागलेला होता, ती इथेच, शेजारीच होती.

मग पायथ्याशी बसलेलं ते कोण होतं?

अभिजितचा श्वास रोखला गेला. ती आकृती हळूहळू, अगदी संथपणे, मान न वळवता, धडासकट त्याच्या दिशेने सरकू लागली; जमिनीला स्पर्श न करता, हवेत तरंगत. जवळ. आणखी जवळ आणि मग, अंधाराला सरावलेल्या त्याच्या डोळ्यांना दिसलं...ती स्वातीच होती. हुबेहूब स्वाती. तेच केस, तोच चेहरा, तोच नाईटगाउन.

पण ती तर पलंगावर होती, त्याच्या शेजारी, झोपलेली.

दोन स्वाती?

अभिजित भीतीने गोठला. पायथ्याशी बसलेल्या "स्वाती"ने हळूच त्याच्याकडे बघून हसायला सुरुवात केली आणि ते हसू पसरत गेलं, पसरत गेलं, गालांच्या पलीकडे, कानांपर्यंत, आणि मग त्या हसणाऱ्या तोंडातून बारीक राख झरू लागली.

"तू तिला वाचवू शकणार नाहीस," ती "स्वाती" कुजबुजली, स्वातीच्याच आवाजात, पण त्यात एक खोल, दुहेरी गुरगुर मिसळलेली. "तेराव्या रात्री, ती माझी आहे. आणि तू फक्त बघत राहशील."

अभिजितने शेजारच्या खऱ्या स्वातीला गदागदा हलवायचा प्रयत्न केला पण त्याचा हात हलेना, आवाज फुटेना. जणू त्याच्या इंद्रियांवर आता त्याचा ताबा नव्हता. दोन्ही स्वातींच्या मध्ये तो अडकून पडला होता.
पायथ्याची ती आकृती आता त्याच्या चेहऱ्यासमोर आली, इतकी जवळ की तिच्या तोंडातून झरणाऱ्या राखेचे कण त्याच्या ओठांवर पडू लागले, कोरडे, कडवट.

"तिचं नाव घे," ती कुजबुजली. "तुला माहीत आहे ते. घे तिचं नाव."

आणि अभिजितच्या तोंडून, त्याच्या इच्छेविरुद्ध, त्याचा स्वतःचा आवाज नसलेला एक शब्द बाहेर पडायला लागला...नेमक्या त्याच क्षणी, खोलीत एक शुभ्र, शीतल प्रकाश उमटला.
पायथ्याची 'स्वाती' किंचाळली, एक अमानवी, कर्णकर्कश किंकाळी आणि राखेच्या लोटासारखी ती विरून गेली.
अभिजित दचकून खऱ्या अर्थाने जागा झाला, धापा टाकत, संपूर्ण अंग घामाने भिजलेलं. शेजारी स्वाती गाढ झोपलेली होती, त्याची स्वाती, तिचा श्वास संथ, नियमित.

खोलीत काळोख होता, शांतता होती. पण हवेत अजूनही राखेचा एक हलकासा वास रेंगाळत होता आणि पलंगाच्या पायथ्याशी, जमिनीवर, चांदण्याच्या प्रकाशात, राखेचा एक बारीक ढीग पडलेला दिसत होता.
उरलेली रात्र त्याने जागून काढली, दिवा तसाच सुरू ठेवून, स्वातीच्या शेजारी बसून जणू तो पहारा देत होता. पण कशाचा, आणि कुणापासून, हे त्यालाच नीट कळत नव्हतं.
************************************************************************************************************************
रविवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास अभिजितच्या मोबाईलवर नेहाचा व्हॉट्सअॅप संदेश आला.

सर, आजींनी शेवटच्या सुट्या पानाचं लिप्यंतर पूर्ण केलं आहे. हे पान वाचून आजी खूप घाबरल्यासारखी वाटतेय. मी वाचलंय आणि माझीही तशीच अवस्था झालीये.

अभिजितच्या छातीत नकळत धडधड वाढली. त्याने ताबडतोब पीडीएफ डाउनलोड केली.

"स्वाती..." तो हाक मारत म्हणाला, "लिप्यंतर आलं."

स्वाती स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिच्या हातातला चहाचा कप तिने टेबलावर ठेवला आणि दोघेही लॅपटॉपसमोर येऊन बसले. पीडीएफ उघडली. शेवटचं पान स्क्रीनवर आलं. मजकूर सुरू होण्यापूर्वीच, वर एका कोपऱ्यात आजींनी स्वतःच्या हस्ताक्षरात एक छोटीशी टीप लिहिली होती.

"मागील पानावरील एका शब्दाविषयी मला प्रथम संभ्रम होता. सुरुवातीला तो "बिजापूर" असा वाचला. परंतु आता हे पान वाचल्यावर आणि मूळ हस्तलिखित अनेकदा भिंगाखाली पाहिल्यावर खात्री झाली की तो शब्द "बिजापूर" नसून " बीजासुर" आहे."

दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. आणि मग...शेवटचं ते पान वाचायला सुरुवात केली.

श्रीगणेशाय नमः । श्रीहरिहरपुत्राय नमः ।
म्यां सन्कन्ना इनामदार, स्वहस्ते हे लेखन केले.
माझे चिरंजीवे जे उपरी लिहिले, ते असत्य नव्हे. परी संपूर्णही नव्हे.
संपूर्ण वृत्तांत म्यां न लिहिला. कारण भय मानसी होते.
आतां मृत्युकाळ समीप आला. आतां भय कोणाचे धरावे?
माझा पिता जे कार्य त्याच्या हाती आले, तेच त्याने मरणकाळी माझे हाती ठेविले.
साठी वर्षे पूर्ण जाहली, ते समयी मज बोलावणे आले. म्यां गेलो.
जे तेथें दृष्टीस पडिले, ते मनुष्य नव्हे. पशू नव्हे. पिशाच्च नव्हे.
तेथील पुरातन जन त्यास भस्मबीज नामे संबोधित करित.
पूर्वकाळी त्यास बंध केला.
त्याचा संपूर्ण नाश कोणाच्या सामर्थ्यासी नाही, हे मज तेथेंच बोधास आले.
तो पुनरपि उठील. कदा उठील, हे मज ठावे नाही.
परी उठील, हे निश्चित. याकरिता हे लेखन करीत आहे.
माझ्या वंशीं ज्याचे हाती हा लेख येईल, आणि ज्यास अद्भुत स्वप्ने आरंभ होतील, त्याने कल्याण पट्टणासी जावे.
जे वस्तु म्यां परत आणिली नाही,
कोठे आहे, हे म्यां लेखी ठेविले नाही.
कारण जे लेखी येईल, ते शत्रूच्या दृष्टीसही पडेल.
तेथें गेल्यावर पुसावे. कोणास पुसावे, हे म्यां सांगू शकत नाही.
बहू वर्षे लोटिल्यावर तेथें कोण असेल, हे मज कसे ठावे?
आणखी एक वृत्त लेखी धरितो. हे सर्वांहून महत्त्वाचे.
तो उठावयाचा समय समीप आला, आणि षण्मास अवशिष्ट राहिले,
की तो केवळ त्या स्थानी बद्ध राहत नाही.
त्याची छाया चहूकडे पसरू लागते.
प्रथम तो मनुष्याचा विवेक हरपवितो.
सारासार बुद्धी नाश पावते.
जे अधर्म मनुष्य आयुष्यभर आवरीत असतो, त्याकडेच त्याचे मन धावू लागते.
वासना प्रबळ होते. लज्जा क्षीण होते. धर्म ढळतो.
त्या षण्मासांत स्त्रियांचे शीलभंग, अत्याचार, अन्याय, अकस्मात वाढतीस लागती.
लोक म्हणती "काळ बिघडला."
परी काळ कदा बिघडत नाही. मनुष्याचे मन बिघडते.
आणि तेच त्याचे क्षेत्र.
प्रत्येक अधर्मे तो अधिक वृद्धिंगत होतो.
प्रत्येक भ्रष्ट विचार त्याचे खाद्य.
प्रत्येक हरपलेला विवेक त्याचे बळ.
याकरिता जो कोणी त्यास बंध घालावयास उभा राहील, त्याने हे चित्ती धरावे
अंतिम षण्मासांत युद्ध केवळ त्या गुहेपुरते राहत नाही.
ते ग्रामोग्रामी असते.
ते प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणी असते.
जो आपुले मन राखील, तोच प्रथम त्यास रोखील.
आणि जो अंतःकरणी हरला, तो रणांगणी उभा राहूनही जिंकणार नाही.
भय धरू नको, बाळा.
तुज एकाकी समजू नको.
हरिहरपुत्र तुज पाठीशी आहे.
सन्कन्ना इनामदार
शके १५४७

अभिजितने वाचन थांबवलं. खोलीत एक जड शांतता पसरली.

"स्वाती," तो हळू आवाजात म्हणाला, यावेळी अधिक मास अमावस्या जून २०२६ ला आहे. सहा महिने आधी म्हणजे... डिसेंबर. आणि आत्ता आपण..."

स्वातीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता.

"आत्ता डिसेंबर चालू झालाय," ती कुजबुजली. "म्हणजे...हे आता कधीही सुरु होईल."

त्याला आता त्याचे कुल आणि कुलदैवत माहित झाले होते. त्याने लगेच देवप्पाला फोन लावला. रात्रीचा तो भयंकर प्रसंग, दोन स्वाती, ती राख झरणारी आकृती, "तिचं नाव घे" ही ती कुजबुज आणि बखरीत सापडलेलं सगळं, त्याने एकामागोमाग सांगितलं.

पलीकडे देवप्पा शांतपणे ऐकत राहिला. सगळं ऐकून झाल्यावर तो म्हणाला, "अभिजित, कल्लेश्वरला आता कळून चुकलंय की तू त्याच्या मार्गातला मोठा अडथळा आहेस. आणि म्हणूनच तो आता तुझ्याकडे जे काही माहीत आहे, जे काही सापडलंय, ते सगळं तुझ्याकडून काढून घ्यायचा प्रयत्न करतोय. या स्वप्नांतून, या भासांतून, तो तुझ्या मनात शिरतोय."

"आणि हे थांबेल का?"

"नाही. उलट, जसजसा तू पुढे जाशील, तसतसं हे आणखी तीव्र होत जाईल." देवप्पाचा आवाज गंभीर झाला, पण त्यात आश्वासनही होतं. "पण घाबरू नकोस, अभिजित. एक गोष्ट लक्षात ठेव; चांगल्या कामात देव नेहमी सहाय्य करतो. जी शक्ती तुला वाचवतेय, ती तुला एकटं पडू देणार नाही. तुझी भीती हेच त्याचं हत्यार होऊ शकतं."

अभिजितने दीर्घ श्वास घेतला. "आता पुढे काय करायचं?"

तू सांगितलेल्या कुळाप्रमाणे तुझे कुलदैवत हरिहरपुत्र. शास्त. आणि ते वीर शास्ताचे रूप आहे. वीर शास्त. हरिहरपुत्राचं योद्धा-रूप. घोड्यावर स्वार, हातात शस्त्र, दुष्टसंहार करणारा."

अभिजितच्या अंगावर रोमांच उभे राहिले, हे नाव त्याने आयुष्यात कधी ऐकलं नव्हतं तरी ते ऐकताच त्याला ते ओळखीचं वाटलं."

"मला जरा नीट समजावून सांगा," अभिजित म्हणाला. "हे शास्त, ही रूपं काय आहे हे सगळं?"

"ऐक. हरिहरपुत्राची... शास्ताची आठ रूपं आहेत. त्यातली चार रूपं रक्षक-कुळं कुळदैवत म्हणून पूजतात. आधी महा शास्त, धर्म शास्त, ज्ञान शास्त, वीर शास्त आणि यातली आधी महा, धर्म आणि वीर ही तीन रूपं ज्यांचं कुळदैवत असतं, तीच कुळं भस्मबीजाला रोखण्याचं काम करतात."

"आणि ज्ञान शास्त?"

"माझं कुळ ज्ञान शास्ताचं." देवप्पा म्हणाला. "आणि आमच्या कुळाला एक वेगळीच जबाबदारी दिलेली आहे. इतर सगळ्या रक्षक-कुळांचे गुप्त मंत्र आमच्या कुळाला माहीत असतात. आम्ही त्या सगळ्या मंत्रांचे राखणदार. जेणेकरून एखादं कुळ जरी काळाच्या ओघात विसरलं गेलं जसं तुझं झालं तरी त्याचा मंत्र पूर्णपणे हरवू नये."

"आणि हे मंत्र वेगवेगळे असतात?"

"अगदी वेगवेगळे. प्रत्येक कुळाचा गुप्त मंत्र वेगळा, प्रत्येक कुळाचं कवच वेगळं. एका कुळाचा मंत्र दुसऱ्याच्या कवचाला जागं करू शकत नाही. म्हणूनच हे इतकं जपून ठेवलं जातं."

अभिजितच्या मनात हळूहळू प्रकाश पडत गेला. "म्हणजे... माझ्या वीर-शास्त कुळाचा गुप्त मंत्र तुम्हाला माहीत आहे."

"हो, पण त्याच बरोबर आपल्याला आता कवच शोधायचे आहे आणि त्याचबरोबर तुझ्या वीर-शास्त कुळाचे कुळाचार. ते इतकी वर्षं विसरले गेलेत, ते तुला पुन्हा शिकावे लागतील. सिरसीला ये. कुळाचार, मंत्र, कवच तिन्ही गोष्टींचा मार्ग तिथूनच जातो."

फोन ठेवल्यावर अभिजित बराच वेळ स्तब्ध बसून राहिला. वीर शास्त. घोड्यावर स्वार योद्धा-देव त्याचे कुळदैवत, पण त्याला पूर्णपणे अनोळखी.

त्याने स्वातीकडे बघितलं. "आता सिरसीला जावंच लागेल. नुसतं कवचासाठी नाही; माझं खरं कुळदैवत, माझे कुळाचार सगळं तिथेच आहे."

स्वातीने मान हलवली, तिच्या डोळ्यांत आता भीतीसोबत एक निर्धारही होता. "मग जाऊया. पण देवप्पा म्हणाले तसं जपून. आपण जितकं जवळ जाऊ, तितका तो अधिक चवताळेल."

अभिजित बराच वेळ खिडकीजवळ उभा राहिला. संध्याकाळ हळूहळू गडद होत चालली होती आणि शहराचा गोंगाटही आता विरळ होत होता. अचानक त्याला जाणवलं की कुणीतरी त्याच्याकडे एकटक पाहत आहे. त्याने सहज खिडकीच्या कठड्याकडे पाहिलं. तिथे एक कावळा बसला होता. मुंबईत कावळे दिसणं काही नवीन नव्हतं, पण संध्याकाळच्या त्या वेळी, खिडकीवर इतका शांत आणि स्थिर बसलेला कावळा त्याने याआधी कधीच पाहिला नव्हता. तो इकडे-तिकडे पाहत नव्हता, पिसं फडफडवत नव्हता, अगदी डोळेही मिचकावत नव्हता. त्याची नजर फक्त अभिजितवर रोखलेली होती.

अभिजितने हाताने हलकासा इशारा करून त्याला उडवण्याचा प्रयत्न केला; पण कावळा जागेवरून हललाही नाही. उलट त्याने हळूहळू मान तिरकी केली. त्या हालचालीत काहीतरी इतकं अनैसर्गिक होतं की अभिजितच्या अंगावर नकळत काटा आला. अभिजीतला त्याच्या नजरेचे भीती वाटू लागली. त्याने पटकन खिडकी सरकवून बंद केली. काच बंद होताच कावळ्याने अलगद चोच काचेवर टेकवली. 'टक्...'

तो क्षीण आवाजही अभिजितला अस्वस्थ करून गेला. काही क्षण कावळा तसाच त्याच्याकडे पाहत राहिला आणि मग त्याने शांतपणे पंख पसरले. तो अंधारात उडून गेला. काही अंतरावर गेल्यावर आणखी दोन कावळे त्याला येऊन मिळाले आणि तिन्ही पक्षी एकाच दिशेने, दक्षिणेकडे, काळोखात अदृश्य झाले.

अभिजित बराच वेळ खिडकीपाशी निश्चल उभा राहिला. मनात कोणताही ठोस विचार नव्हता, तरी एक अनामिक जाणीव सतत त्याला कुरतडत होती सिरसीला जाण्याचा त्यांचा निर्णय आता केवळ त्यांच्यापुरता मर्यादित राहिलेला नव्हता. कुणाचीतरी नजर त्यांच्यावर पडली होती.

भस्मबीज - भाग १२

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट
स्वाती चा जन्म अधिक महिन्यात असेल तर अभिजीतला ते आधीच माहित असायला हवं ना?
कदाचीत म्हणूनच तर ह्या सगळ्याची सुरुवात झाली नसेल ना ?

भारी आहात लेखक महोदय... भलतंच गुंतवल आहे ह्या कथेत तुम्ही वाचकाना

जबरदस्त झाला आहे हा भाग.
तुमची निरिक्षणशक्ती अफाट आहे.
हरीहर पुत्र म्हणजे अय्यप्पा स्वामी?
लवकर टाका पुढचा भाग..

कसले जबरदस्त धागे गुंतलेत एकमेकात... फारच भारी..
पुढचा भाग लवकर टाका प्लीज..
पुढची स्त्री नेहा किंवा स्वाती नाहीत असं वाटतंय.. कोणीतरी वेगळीच..
अभिजित ची आई ? किंवा मुलगी ?