भस्मबीज – भाग ९
पूर्वभाग
अभिजितला आरशात पुन्हा गूढ सावली आणि डोळे दिसतात. देवप्पा याला गंभीर इशारा मानत त्याला तातडीने आपल्या कुलदैवताचा आणि घराण्याच्या इतिहासाचा शोध घेण्यास सांगतो. त्यानुसार अभिजित कुटुंबासह सुप्याला जातो, जिथे वाड्यातील माळ्यावर त्यांना मोडी लिपीतील काही कागद सापडतात आणि वडिलांकडून त्यांच्या पूर्वजांचा मालोजीराजे भोसले यांच्याशी संबंध असल्याची जुनी आख्यायिका समजते
************************************************************************************************************************
भस्मबीज – भाग १० - महत्वाचा धागा
रात्री जेवण झाल्यावर, मुलं झोपायला गेल्यावर, अभिजितने वाड्याच्या बाहेरच्या पडवीत एक चादर पसरली, त्यावर ते बाड उघडून ठेवले, आणि फोनच्या फ्लॅशसह प्रत्येक पानाचा स्वतंत्र, स्पष्ट फोटो काढायला सुरुवात केली काळजीपूर्वक, पान न् पान, कुठलंही अक्षर सुटू नये म्हणून दोनदा-तीनदा तपासत जवळजवळ तासभर हे काम चाललं. एकूण अठ्ठावीस पानं होती.
सगळे फोटो काढून झाल्यावर तो लॅपटॉपसमोर बसला. फोटो लॅपटॉपमध्ये उतरवून त्याने योग्य क्रमाने मांडले. प्रत्येक पान पुन्हा एकदा पाहिलं. मग त्या सर्व छायाचित्रांची एकच पीडीएफ प्रत तयार केली. स्वाती आणि बाबा त्याच्या शेजारी बसून हे सगळं बघत होते.
पीडीएफ तयार झाल्यावर त्याने नेहाला व्हॉट्सअपवर पाठवली, सोबत एक सविस्तर मेसेज,
"नेहा, हे एक बाड सापडलंय, त्याची संपूर्ण pdf फाईल पाठवलीय, अठ्ठावीस पानं. आजींना विनंती करा; घाई नाही, पण जेव्हा त्यांना सवड मिळेल, तेव्हा शक्य असल्यास संपूर्ण लिप्यंतर करून द्यायला सांगा."
काही मिनिटांतच उत्तर आलं, "नक्की सर. आजीला आवडेल हे काम, तिला अशा जुन्या कागदपत्रांची खूप आवड आहे. जरा वेळ लागेल कदाचित, अठ्ठावीस पानं म्हणजे बरंच काम आहे. पण नीट, पूर्ण करून देईल ती."
अभिजितने फोन बाजूला ठेवला, आणि बाबांना म्हणाला, “बाबा, एक विचारायचं होतं."
"इचार की रं."
"आपलं कुळदैवत काय आहे?"
वडिलांनी क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं. "पालीचा खंडोबा, आन तुळजापूरची भवानी. लहानपनापासनं बगत आलायस की. तुझं आजोबा दरसाल सोमवती अमुशेला पालीला जायाचे, नेमानं. आता आपल्याला कुठं जमतंय तेवढं."
"आणि त्याच्या आधी? म्हणजे आणखी कुठलं दैवत, आणखी कुठली परंपरा कधी ऐकलंय का तुम्ही?"
वडिलांनी भुवया आक्रसल्या. "न्हाई बा?"
नंतर स्वातीशी एकांतात बोलताना अभिजितने मनातली शंका बोलून दाखवली, "देवप्पा म्हणाले होते, आपलं खरं कुळदैवत वेगळंच असणार, आणि ते आपल्यालाच शोधून काढावं लागेल. पण बाबांना तर खंडोबा-तुळजाभवानीच माहीत आहेत."
स्वातीने विचार करत म्हटलं, "म्हणजे कदाचित मूळ देवता कधीतरी विसरली गेली असेल, आणि तिची जागा या नेहमीच्या, महाराष्ट्रात सर्वमान्य देवतांनी घेतली असेल? हळूहळू, पिढ्यानपिढ्या?"
अभिजितला हे तर्कशुद्ध वाटलं.
रात्री वाड्यात सगळे नेहमीपेक्षा लवकर झोपले. बाड सापडल्याच्या उत्साहात वेळ कसा निघून गेला, हे कोणालाच कळले नव्हते. अभिजितने ते बाड अत्यंत काळजीपूर्वक फडक्यात गुंडाळले आणि उशाशी ठेवून तो झोपला.
************************************************************************************************************************
रात्री साधारण दीडच्या सुमारास त्याला अचानक जाग आली. त्याला जाग आली ती एका विचित्र आवाजाने. आवाज माळ्यावरून येत होता, कुणीतरी जुने कागद उलटत होते.
एक. मग दुसरा. मग तिसरा. संथ. नियमित. जणू कुणीतरी शांतपणे, निवांतपणे, काहीतरी शोधत होतं.
अभिजित झटकन उठून बसला. त्याने आजूबाजूला पाहिले. शेजारी स्वाती गाढ झोपली होती. तिच्या श्वासाचा नियमित आवाज सोडला तर खोलीत पूर्ण शांतता होती. तो सावधपणे उठला. मोबाईलची टॉर्च सुरू केली आणि मागच्या ओसरीकडे गेला. माळ्यावर जाणारी जुनी लाकडी शिडी त्याच्या समोर उभी होती.
आवाज अजूनही येत होता. सर्रऽ...सर्रऽ...
त्याने हळू आवाजात हाक मारली, "बाबा...?"
आवाज थांबला. काही सेकंद पूर्ण शांतता. आणि मग तो पुन्हा सुरू झाला. पण आता वेगात. सर्र-सर्र-सर्र-सर्र-सर्र इतक्या वेगाने एखादा माणूस कागद उलटूच शकत नव्हता.
अभिजितने धीर करून शिडीवर पाऊल ठेवले.
पहिली पायरी. दुसरी. तिसऱ्या पायरीवर पोहोचताच त्याच्या नाकात एक ओळखीचा वास शिरला. जळलेल्या राखेचा.
चौथ्या पायरीवर पाऊल ठेवताच त्याच्या अंगावर काटा आला. हवेत अनैसर्गिक थंडी पसरली होती. त्याच्या तोंडातून श्वासाबरोबर वाफ बाहेर पडू लागली.
त्याने हळूच डोके वर काढले आणि टॉर्चचा झोत माळ्यावर फिरवला.
जुनी लाकडी पेटी उघडी होती आणि तिच्यासमोर कुणीतरी गुडघ्यावर बसले होते. पाठमोरे. अंगावर धोतर. उघडी पाठ. पांढरे विरळ केस. क्षणभर त्याला वाटले, ते त्याचे आजोबाच आहेत. का कोण जाणे, त्याच्या डोळ्यांत नकळत पाणी तरळले.
त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, "आजोबा...?"
ती आकृती पूर्ण स्थिर झाली. हातातला कागद तिने अलगद खाली ठेवला.
आणि मग...तिने मान वळवायला सुरुवात केली.
खांदे हलले नाहीत. पाठ तशीच राहिली. मान अशक्य वाटेल इतकी मागे वळत गेली. पूर्ण मागे.
आणि चेहरा अभिजितच्या दिशेने आला. पण...तिथे चेहराच नव्हता. संपूर्ण चेहऱ्याच्या जागी फक्त राख होती.
नाक, डोळे , तोंड...त्यांच्या जागी खोल, काळे खड्डे होते आणि त्या खड्ड्यांतून बारीक, कोरडी राख सतत खाली झरत खालच्या लाकडी फळीवर पडत होती.
अभिजित भीतीने मागे सरकला. त्याचा पाय शिडीवर घसरला. तो कसाबसा स्वतःला सावरू शकला.
तेवढ्यात त्या आकृतीने हळूहळू हात वर केला. तिने बोट खाली त्याच्या पायांकडे केले. अभिजितने खाली पाहिले.
आणि त्याच्या छातीत धस्स झाले. शिडीच्या प्रत्येक पायरीवर त्याच्या पावलांच्या मागोमाग राखेचे स्पष्ट ठसे उमटले होते.
तो एकटाच वर चढला नव्हता. कुणीतरी त्याच्या मागोमाग आलं होतं.
तो गर्रकन मागे वळला. खाली ओसरीच्या अंधारात एक आकृती उभी होती. तिच्या मागे दुसरी. मग तिसरी. मग चौथी. अख्खी ओसरी पाठमोऱ्या राखेच्या आकृत्यांनी भरली होती. सगळ्या स्थिर एकाच रांगेत उभ्या.
आणि मग त्या सगळ्या एकाच वेळी, अगदी एकाच क्षणी, हळूहळू त्याच्याकडे वळू लागल्या.
अभिजितने किंचाळण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या घशातून आवाजच बाहेर पडला नाही. छातीवर प्रचंड दाब जाणवू लागला. जणू आतून कुणीतरी त्याचे हृदय मुठीत पकडून दाबत होते.
तेवढ्यात वरच्या त्या राखेच्या चेहऱ्यातून एक आवाज आला. मानेच्या हाडांच्या कडकडाटातून, त्या काळ्या खड्ड्यांतून, "बाराSSS"
अभिजित गोठल्यासारखा तिच्याकडे पाहत राहिला. आवाज पुन्हा आला. "बारा झाल्या. तेरावी उरली."
आणि मग, अगदी हळू, जवळजवळ मायेने, "तिचं नाव तुला माहीत आहे."
अभिजितचा तोल गेला. तो शिडीवरून खाली कोसळला.
"अभिजित!... अभिजित!"
त्याने डोळे उघडले. स्वाती घाबरलेल्या चेहऱ्याने त्याच्यावर वाकली होती. मागे वडील हातात कंदील घेऊन उभे होते. आई हातात पाण्याचा पेला घेऊन उभी होती.
तो ओसरीच्या जमिनीवर पडला होता.
वडिलांनी घाईघाईने विचारले, "काय झालं? हिथं आनी एवढ्या रातचं काय करत व्हता?"
अभिजितचा घसा कोरडा पडला होता. तो काही बोलू शकत नव्हता. त्याने थरथरत्या हाताने फक्त माळ्याकडे बोट दाखवले. आईने पाण्याचा पेला पुढे केला. वडील लगेच शिडीवर चढले. त्यांनी टॉर्चचा झोत माळ्यावर फिरवला.
काही क्षणांनी ते खाली उतरले आणि म्हणाले, "आरं, हिथं काईच न्हाई."
अभिजित थरथरत उठून बसला. तो अजूनही श्वास सावरत होता. तोवर आईने देवघरातील अंगारा आणून अभिजितच्या कपाळाला लावला.
"बाबा, मला वर माळ्यावर आजोबांसारखं काही दिसलं."
बाबा मायेने म्हणाले, "आरं खुळ्या, तू म्हंजी लहानपनापासनं यककल्ली हाईस बघ. यखादी गोष्ट डोसक्यात घितली की तिच्याशीवाय कायबी दुसरं सुचत न्हाई तुला. ती बाड उशाशी घिऊन झोपलाय. त्याच्यामुळंच आसल."
सगळे परत झोपायला गेले, पण अभिजितला झोप लागत नव्हती, 'तिचं नाव तुला माहीत आहे' हे वाक्य सारखं त्याच्या डोक्यात घुमत होतं.
आणि अचानक एका विचित्र अनामिक हूरहूर आणि भीतीने त्याच्या मनाला घेरले, जणू त्याच्या जवळच्या व्यक्तीला धोका आहे...खूप खूप जवळच्या. त्या भीतीतच कधीतरी त्याला झोप लागली.
रविवारी दुपारी परतीची तयारी सुरू झाली. स्वातीने बॅगा भरल्या, अभिजितने ते बाड पुन्हा एकदा फडक्यात नीट गुंडाळून, स्वतःच्या बॅगेत सर्वांत खाली, काळजीपूर्वक ठेवलं.
अंगणात आजी-आजोबांची नातवंडांना निरोप द्यायची लगबग चालली होती. आजीने अथर्वला जवळ घेत त्याच्या हातात लाडवाचा डबा कोंबला, "गाडीत खा रे बाळा, भूक लागंल." अनन्याच्या गालावरून हात फिरवत म्हणाली, "बारीक झालीस, नीट जेवत जा."
आजोबा नेहमीच्या घोगऱ्या पण मायाळू आवाजात म्हणाले, "आरं, आता माह्य पूणवंला परत या जत्रंला, दुसऱ्या दिशी दोन बोकडं ठीऊ पाव्हण्या रावळ्यास्नी. आन ह्या पोरानलाबी रीतीभाती कळत्याल."
अथर्वने आजोबांना घट्ट मिठी मारली. अनन्यानेही, नेहमीचा तिचा तुटकपणा बाजूला ठेवून, आजीच्या कुशीत क्षणभर विसावली.
सोमवारी ऑफिसमध्ये, दुपारच्या निवांत वेळी, अभिजितने नेहाला केबिनमध्ये बोलावलं आणि दार लोटून घेतलं.
"सर? काय झालं, इतके गंभीर दिसताय?"
त्याने तिला सगळं सांगितलं ती माळ्यावरची रात्र, ती राखेची आकृती, तो आवाज.
अभिजित क्षणभर थांबला. तिला ते नेमकं वाक्य सांगावं की नाही, हा पेच त्याच्यासमोर उभा राहिला. पण त्याने ठरवलं; तिच्यापासून लपवण्यात अर्थ नव्हता.
"आणि ते म्हणालं, 'तेरावी उरली. तिचं नाव तुला माहीत आहे.'"
नेहाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. ती हळू आवाजात, जवळजवळ स्वतःशीच म्हणाली, "आणि तुम्हाला वाटतंय... ती मी आहे."
अभिजित काहीच बोलू शकला नाही, आणि त्याचं ते मौनच तिला उत्तर देऊन गेलं.
पण आश्चर्य म्हणजे ती घाबरली नाही. उलट, तिच्या डोळ्यांत एक विचित्र स्थिरता आली. "जर तेच असेल, सर, तर मग मी यातून पळून जाऊन काहीच उपयोग नाही. बघू नशिबात जे असेल ते."
नंतर ती अचानक उत्साहात सांगू लागली, "सर, ती पीडीएफ फाईल मी अजून आजीला पाठवलेली नाही. आजीला मोबाईलवर वाचायला जमणार नाही, आणि इतकी जुनी अक्षरं छोट्या स्क्रीनवर तर अजिबातच नाही. पण आज रात्रीच्या गाडीने मामा कुमठ्याला चाललाय; मी या सगळ्या पानांची A3 प्रिंटआउट काढते आणि मामाकडे देते. उद्या सकाळपर्यंत आजीच्या हातात पोहोचेल."
"हो, हे ठीक राहील," अभिजित म्हणाला. "मोठ्या कागदावर तिला नीट वाचता येईल.”
नेहाने सांगितल्याप्रमाणे तिच्या आजींनी बखरीचं लिप्यंतर करण्याचं काम सुरू केलं होतं; पण त्यानंतर त्यांच्याकडून काहीच संदेश आला नव्हता.
अखेर शनिवारी सकाळी, साडेनऊच्या सुमारास, अभिजितच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपची सूचना आली.
"सर, आजींचं काम पूर्ण झालं. त्यांनी सगळी बखर देवनागरीत उतरवली आहे." त्याखाली अठ्ठावीस स्कॅन केलेल्या पानांची एक मोठी पीडीएफ फाईल होती.
अभिजितने ती फाईल लॅपटॉपवर उघडली. स्वाती त्याच्या शेजारी येऊन बसली. आणि दोघांनी वाचायला सुरुवात केली.
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे वृत्त मौजे सुपे येथील सन्कन्ना इनामदार यांचे. ते त्यांचे चिरंजीव बापूजी यांनी सांगितले, ते लेखी धरिले.
सन्कन्ना यांचे पिता तिम्मन्ना नाईक. ते विजयनगरचे राजाचे सेवेस होते.
शके १४८७ तालिकोटचे युद्ध जाहले. त्या युद्धी तिम्मन्ना नाईक पडिले. देह कोणास प्राप्त झाला नाही.
फक्त त्यांची तरवार घरी आली.
त्या समयी सन्कन्ना वय तेरा वर्षांचे.
मग त्यांची माता चिरंजीवास घेऊन कल्याण पट्टणा प्रांती गेली.
तेथे अप्पण्णा नामे जुना शिपाई होता. तयाजपाशी सन्कन्ना राहिले.
तेथे घोडेस्वारी, तरवार, धनुष्य, भाला व युद्धविद्या बारा वर्षे अभ्यासिली.
वय पंचवीस जाहलियावर सन्कन्ना दख्खनेस आले.
निजामशहाचे सेवेस लागले.
तेथे मालोजी भोसले व विठोजी भोसले यांची भेट जाहली.
पुढे बहुत सख्य झाले.
स्वाऱ्या, मोहिमा व युद्धे बहुत केली.
एके स्वारीत सन्कन्नांचा घोडा अडखळला.
ते भूमीवर पडिले.
शत्रू चौघे धावून आले.
त्या समयी मालोजी मध्यें घुसले.
दोघे तेथेच मारिले. उरलेले पळाले.
सन्कन्ना सुटले.
त्या रात्री सन्कन्ना म्हणाले,
"हा उपकार माथां घेतला. समय पडेल तेव्हा फेडीन."
मालोजी म्हणाले, "समय येईल."
काळ बहुत गेला.
यावरी शहाजी यांचे विवाहाची गोष्ट निघाली.
लखुजी जाधवराव यांची कन्या जिजाई.
ती शहाजी यांसी द्यावी, ऐसे शिमग्याचे सभेमध्ये बोलणे जाहले.
पुढे लखुजी जाधवराव फिरले.
मालोजी यांजकडून पुन्हा बोलणे गेले.
परी लखुजी जाधवराव म्हणाले,
"ते बोलणे विनोदामध्ये जाहले. कन्या देणे होणार नाही. भोसले आमचे समागमे नव्हेत."
ते वर्तमान मालोजी यांजपाशी आले.
मग मालोजी, विठोजी व सन्कन्ना एकांती बसले.
बहुत विचार केला.
यावरी मालोजी म्हणाले,
"दिलेला शब्द फिरला. याचा न्याय पातशहाकडे मागावा."
मग सन्कन्ना काही विश्वासू माणसे संगती घेतली.
रानडुकरे मारिली.
तयांचे गळ्यासी चिठ्या बांधिल्या.
त्या चिठ्यांत निजामशहा पातशहास अर्ज लिहिला.
"लखुजी जाधवराव देशमुख पाटील यांनी आपली कन्या जिजाई आमचे पुत्र शहाजी यांसी देऊ केली. शिमग्याचे सभेमध्ये ते वचन जाहले. आतां ते फिरले. याउपरी पातशहा आमची दाद घेऊन सोयरीक आम्हास देववितील तर उत्तम. नाहीतर जेथवर पातशाईमध्ये तुमच्या मशिदी असतील तितक्यात डुकरे मारुनी टाकितो."
मग रातोरात दौलताबादेनजीक यवनांचे स्थळी गेले.
मशिदीमध्ये ती डुकरे टाकिली.
पहाटे नमाजास लोक आले.
डुकरे पाहून बहुत गहजब जाहला.
तयांचे गळ्यांतील चिठ्या काढून पाहिल्या.
त्या हुजूर मजलसीस गेल्या.
ते वर्तमान निजामशहा पातशहाचे कानी गेले.
मग लखुजी जाधवराव देशमुख व मालोजी यांसी हुजूर मजलसीस बोलाविले.
दोघांचे म्हणणे घेतले.
मालोजी म्हणाले,
"शिमग्याचे सभेमध्ये बहुतांचे समक्ष वचन जाहले."
लखुजी जाधवराव म्हणाले,
"ऐसे वचन आम्ही दिले नाही."
यावरी सभेमधील बहुत मानकरी यांजकडून वर्तमान विचारिले.
तयांनी सांगितले,
"बोलणे जाहले होते."
मग निजामशहा पातशहा म्हणाला,
"सरदाराचे वचन एकदा जाहले म्हणजे ते फिरवू नये. जिजाई शहाजीसी द्यावी."
यावरी लखुजी जाधवराव यांसी कबूल करणे पडिले.
शुभ दिवस धरिला.
शहाजीराजे व जिजाई यांचा विवाह बहुत थाटे जाहला.
बहुत मान, वस्त्रे, अलंकार व नजराणा झाला.
मालोजी यांचा मानसिद्धी जाहली.
यावरी त्यांनी सन्कन्ना नाईक यांसी बोलावून म्हणाले,
"समयी सेवा केली. तिचे स्मरण राहील."
मग मौजे सुपे येथील जमीन इनाम करून दिली.
सनद करून दिली.
सन्कन्ना नाईक यांसी इनामदार ऐसे नाव जाहले.
तयांनी सुपे येथे वाडा बांधिला.
घराणे तेथून वृद्धिंगत जाहले.
पुत्र, पौत्र, धन, मान बहुत झाला.
वय साठ जाहलियावर विलक्षण उपसर्ग आरंभले.
रात्री स्वप्ने पडत.
जागेपणी भस्माचा गंध येई.
तो गंध अन्य कोणास येईना.
वैद्य आणिले. औषधे झाली.
देवतांस नवस केले.
परी गुण पडला नाही.
एके रात्री सन्कन्ना अकस्मात उठून बसले.
मातेस म्हणाले, "मज परत जावे लागेल."
कोठे, ते सांगितले नाही.
दुसरे दिवशी पहाटे घोड्यावर बसले.
दक्षिण दिशेस गेले.
संगे कोणी नव्हते.
वडिलांची तरवार घेतली.
एक द्रव्य वस्त्रामध्ये बांधिले.
ते काय, हे कोणास ठावे नव्हते.
सात मास गेले.
सन्कन्ना आले नाहीत.
घरची मंडळी वाट पाहू लागली.
मातेस नवस धरिला.
आठवे मासी सन्कन्ना परत आले.
परी पूर्वीप्रमाणे नव्हते.
बहुत बोलत नसत.
वडिलांची तरवार चिरंजीव बापूजी यांसी दिली.
जे द्रव्य संगती नेले होते, ते परत आणिले नाही.
विचारिता म्हणत,
"जेथून आले, तेथेंच राहिले."
पुढे दश वर्षे होती.
कोणासी बोलणे नाही.
अमावास्येस उपवास.
रात्रौ एकांती बसणे.मंत्रजप करणे.
तो मंत्र कोणासी कळला नाही.
पुढे काल समीप आला.
तेव्हा बापूजी यांसी जवळ बोलाविले.
म्हणाले, "बिजापुरासी रोखिलें, हे वृत्त लेखी धरावे. तळाशी ठेवावे. कोणास दाखवू नये."
बापूजी म्हणाले,
"ऐसे का?"
सन्कन्ना म्हणाले, "ज्याचे प्रारब्ध असेल, त्याचे हातीच हे पडेल."
इतके बोलोन कालधर्म पावले.
************************************************************************************************************************
"बाबांची गोष्ट खरी होती," स्वाती हळू आवाजात म्हणाली.
"म्हणजे आपले मूळ आडनाव नाईक आणि मूळ गाव कल्याण पट्टणा" अभिजितला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण झालं होतं. त्याला आता फक्त त्याचं कुलदैवत शोधून काढायचं होतं.
इतक्यात त्याचा फोन वाजला. बाबांचा नंबर.
"हां बाबा, बोला."
पलीकडून बाबांचा काहीसा गोंधळलेला आवाज आला. "आरं अभ्या, आज सकाळी माळ्याव साफसफाई करत व्हतो, तर तिथं एक जुना कागुद गावला. त्या पेटीच्या फटीत आडकला व्हता बहुतेक. तुज्या त्या बाडातलाच वाटतुय बग, तसलंच जुनं आक्षर हाय त्याच्यावर."
अभिजित जागच्या जागी थांबला, हृदय धडधडू लागलं. बाडाची पानं सुटी होती, क्रमांक नव्हते, म्हणजे एखादं पान मागे राहिलं असण्याची शक्यता त्याच्या मनात आधीच होती.
"बाबा, त्याचा एक स्पष्ट फोटो काढून मला लगेच पाठवा, प्लीज."
"बरं बरं, पाठावतु थांब."
बाबांनी पाठवलेला तो सुट्या पानाचा फोटोही अभिजितने लगेच नेहाला पाठवला.
"नेहा, हे अजून एक पान बाबांना माळ्यावर सापडलं, बाडातलंच वाटतंय. आजीला शक्य तितक्या लवकर लिप्यंतर करून द्यायची विनंती करा."
आता या सुट्या पानावर आणखीन वेगळं काय असणार आहे याची उत्सुकता दोघांना वाटू लागली आणि त्या सुट्या पानाच्या लिप्यंतराची वाट बघण्याखेरीज आता त्यांना काहीच करता येणार नव्हतं.
टीप : या भागात शहाजी राजे भोसले आणि जिजाऊ यांच्या विवाहासंबंधीचा काही घटनासंदर्भ "मराठा साम्राज्याची छोटी बखर" या ऐतिहासिक बखरीतील उल्लेखांवर आधारित असून, तो कादंबरीच्या कथानकाच्या अनुषंगाने वापरण्यात आला आहे. या संदर्भाचा उद्देश केवळ साहित्यिक आहे. लेखकाचा कोणत्याही धर्म, पंथ, समाज किंवा व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अथवा कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही. ही कादंबरी काल्पनिक स्वरूपाची असून, इतिहास आणि कल्पित यांचा साहित्यिक मिलाफ म्हणून वाचावी.
जबरदस्त वातावरण निर्मिती...
जबरदस्त वातावरण निर्मिती...
आता त्या एका कागदावर काय असणार याची उत्सुकता.
लवकर टाका हो पुढचा भाग..
हा भाग सुद्धा मस्तच. बाबांची
हा भाग सुद्धा मस्तच. बाबांची ग्रामीण भाषा, कागदपत्रांची जुनी मराठी भाषा छान जमली आहे. ऐतिहासिक घटनांचा मिलाफही उत्तम. मस्त जमलाय हा भाग.
खूपच भारी सुरू आहे कथा..
खूपच भारी सुरू आहे कथा..
ते अमानवीय जे काही आहे ते अभिजितच्या वाड्यात आले आहे हे वर्णन खूप परिणामकारक भीतीदायक आहे
आजोबांचं connection आहे
आजोबांचं connection आहे म्हणजे
मस्त सुरुये कथा
एकदम डेंजर . मला वाटतंय कि
एकदम डेंजर . मला वाटतंय कि स्वाती चा जन्म पण अधिक महिन्यातील असणार , नेहा चा नसेल
वाचतोय Twist येणार असे वाटतंय
वाचतोय
Twist येणार असे वाटतंय
विषयाचा अभ्यास करून लिहिता
विषयाचा अभ्यास करून लिहिता तुम्ही.
लाल रेषा वाचतानाही कळलं होत.
ह्या कथेत याना गुहे च वर्णन तुम्ही केलं होत तसेच फोटो Google वर सापडतात
ह्या भागात पण एवढा जुना ऐतिहासिक उल्लेख पण तुम्ही व्यवस्थित वापरतात.
बखरीचा अनुवाद अगदी योग्य भाषेत केला आहे.
कथा प्रत्येक भागानुसार उत्कंठा वाढवतेय
उत्कंठावर्धक!
उत्कंठावर्धक!
माझी लिंक तुटलीये. आता परत
माझी लिंक तुटलीये. आता परत एकदा नीट पहील्यापासून वाचेन.
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार!