ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ३२
पूर्वभाग
फार्महाऊसवर केलरच्या माणसांचा हल्ला होण्याआधीच आरव अंतिम निर्णय घेतो आणि Black Ember चे सर्व पुरावे अॅना रिश्टर तसेच आंतरराष्ट्रीय नियामक संस्थांकडे पाठवले जातात. विनायकराव स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वांना सुरक्षित पळून जाण्यास वेळ मिळवून देतात आणि जखमी अवस्थेत परत येतात.
पुरावे सार्वजनिक होताच जगभरात Black Ember विरोधात चौकशा, खाती गोठवणे आणि मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू होते, तर केलरचे साम्राज्य कोसळू लागते. मात्र केलर गुप्त मार्गाने पळून जाण्यात यशस्वी होतो आणि संघर्ष संपलेला नसल्याचे स्पष्ट होते.
तीन आठवड्यांनंतर अॅना रिश्टरची शोधपत्रकारिता जगभर गाजते, अनेक देशांत चौकशा सुरू होतात आणि Black Ember चे जाळे उलगडू लागते. आरव आणि एलेना नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा प्रयत्न करतात.
दरम्यान समीर आणि कबीर केलरच्या आर्थिक हालचालींचा माग काढत राहतात आणि त्याला अजूनही गुप्तपणे पैसा हलवावा लागत असल्याचे शोधून काढतात. त्यामुळे केलर जिवंत असून त्याचा शोध संपलेला नाही, याची खात्री पटते.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ३३ - सापळा
तीन आठवडे उलटले होते.
आता Black Ember हे प्रकरण एका देशापुरतं किंवा एका तपासापुरतं मर्यादित राहिलेलं नव्हतं. त्याचे पडसाद जगभर उमटत होते. रोज नवी नावं समोर येत होती, नवे खुलासे होत होते. चौकशा, अटकसत्रं, मालमत्ता गोठवण्याच्या कारवाया, राजकीय दबाव आणि आर्थिक धक्के-सगळीकडे एक अनियंत्रित साखळी सुरू झाली होती. एकदा गती घेतलेलं ते चक्र आता थांबवणं कोणाच्याच हातात उरलं नव्हतं.
वृत्तवाहिन्यांवर दररोज नव्या नकाशांसह बातम्या झळकत होत्या. जगाच्या कोणत्या कोपऱ्यात कोणतं बँक खातं गोठवलं गेलं, कोणत्या कंपनीवर छापे पडले, कोणत्या सरकारने नव्या चौकशीची घोषणा केली; प्रत्येक दिवस नवे धक्के घेऊन येत होता. आरव कधी कधी त्या सगळ्याकडे पाहत राहायचा. त्याला जाणवायचं, त्याने पेटवलेली ठिणगी आता एका प्रचंड वणव्यात रूपांतरित झाली होती. ती त्याच्याहून कितीतरी मोठी झाली होती आणि आता स्वतःच्याच वेगाने, स्वतःच्याच दिशेने पुढे सरकत होती.
आरव आणि त्याची टीम आता या पाठलागाचा भाग नव्हती. त्यांची भूमिका संपली होती. त्यांनी सत्य जगासमोर आणलं होतं. त्यानंतरचं काम आता आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांचं, न्यायव्यवस्थेचं आणि सरकारांचं होतं.
पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरित होता.
एड्रियन केलर अजूनही बेपत्ता होता. आणि जोपर्यंत तो सापडत नव्हता, तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा एक अदृश्य धागा अजूनही तसाच ताणलेला होता.
सकाळी साडेसातच्या सुमारास समीरच्या लॅपटॉपवर इंटरपोलकडून आलेला एक एन्क्रिप्टेड संदेश चमकला. संदेश छोटा होता, पण त्यातली माहिती संपूर्ण तपासाला नवं वळण देणारी होती.
जॉर्जियामध्ये काही आठवड्यांपूर्वी अटक झालेल्या एका जुन्या शस्त्र आणि तस्करीच्या नेटवर्कशी संबंधित व्यक्तीच्या चौकशीत एक अनपेक्षित धागा समोर आला होता. अनेक दिवसांच्या चौकशीनंतर, सतत बदलणाऱ्या जबाबांमधून अखेर त्याने एक गोष्ट कबूल केली होती; कॉकेशस पर्वतरांगांच्या खोल भागातून जाणारा एक जुना, अधिकृत नकाशांवर जवळजवळ नाहीसा झालेला मार्ग. तपास अधिकाऱ्यांचं लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे त्या मार्गाचा संबंध Black Emberच्या सुरुवातीच्या काळातील हालचालींशी जुळत होता.
त्यानंतर सुरू झाली प्रत्येक तपशीलाची काटेकोर पडताळणी. दशकांपूर्वीच्या सीमा नोंदी, जुन्या सोविएत काळातील लष्करी नकाशे, गुप्तचर अहवालांमधले विखुरलेले संदर्भ आणि त्या तस्कराच्या जबानीतील तुटक तुकडे सगळं एकमेकांशी जुळवण्याचं काम सुरू झालं.
सलग दोन दिवस कोणीही फारसं झोपलं नाही. सॅटेलाईट इमेजरीवरून बर्फाखाली दडलेले जुने मार्ग शोधले गेले. विविध काळात टिपलेल्या प्रतिमांची तुलना करण्यात आली. प्रत्येक नवीन माहितीबरोबर चित्र थोडं थोडं स्पष्ट होत गेलं. अखेर अनेक स्वतंत्र स्रोत एकाच ठिकाणी येऊन थांबले; एका विशिष्ट पर्वतरांगेवर, एका विशिष्ट उंचीवर... आणि एका विस्मरणात गेलेल्या जुन्या मठावर.
तिसऱ्या दिवशी इंटरपोलचा समन्वय अधिकारी सुरक्षित व्हिडिओ कॉलवर दिसला.
"आम्ही अजूनही शंभर टक्के खात्री देऊ शकत नाही," तो म्हणाला. "पण उपलब्ध पुराव्यांनुसार, जर एड्रियन केलर जिवंत असेल... आणि अजूनही लपून राहत असेल... तर तो याच दिशेने गेला असण्याची शक्यता सर्वाधिक आहे."
कबीरने लगेच प्रश्न विचारला.
"तो तस्कर खोटं बोलत नसेल कशावरून? दबावाखाली माणसं स्वतःची सुटका व्हावी म्हणून काहीही सांगतात."
"आम्ही ती शक्यता आधीच गृहित धरली होती. म्हणूनच त्याने दिलेला प्रत्येक तपशील स्वतंत्ररीत्या पडताळला. दोन वेगवेगळ्या सॅटेलाईट पासमधून त्याने सांगितलेला मार्ग जुळतो. शिवाय त्या भागातील काही नैसर्गिक खुणाही त्याच्या वर्णनाशी तंतोतंत मिळतात. त्या माहितीपर्यंत त्याचा प्रवेश असण्याचं एकच कारण असू शकतं, तो स्वतः कधीतरी त्या मार्गावरून गेला आहे."
समीरने आपल्या स्क्रीनवरील सर्व डेटा पुन्हा एकदा तपासला. प्रत्येक निर्देशांक, टाइमस्टॅम्प, संदर्भ. मग त्याने हळूच मान हलवली.
"सगळे धागे एकाच ठिकाणी येऊन मिळतायत," तो शांतपणे म्हणाला. "हे बनावट वाटत नाही."
त्याच क्षणी मुख्य स्क्रीनवर एक हाय-रिझोल्यूशन सॅटेलाईट प्रतिमा उघडली. बर्फाने पूर्ण झाकलेली कॉकेशस पर्वतरांग. त्या शुभ्र विस्ताराच्या मध्यभागी, एका भग्न, अर्धवट कोसळलेल्या प्राचीन मठाभोवती लाल रंगाचं एक वर्तुळ आखलेलं होतं.
************************************************************************************************************************
तिबिलिसी.
Black Emberचा तपास अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांच्या हाती गेला होता. संपूर्ण कारवाईचं नेतृत्व इंटरपोल, जॉर्जियन सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक विशेष पोलीस दलाकडे होतं.
आरव, एलेना आणि होलिंगर यांना तिबिलिसीतील एका तात्पुरत्या नियंत्रण कक्षात ठेवण्यात आलं होतं.
ऑपरेशनचा प्रमुख अधिकारी त्यांच्या समोर उभा राहिला.
"तुम्ही इथेच थांबा, या तपासाला इथपर्यंत आणण्यात तुमचा वाटा अमूल्य आहे. पुढेही तुमच्या माहितीची गरज पडेल. पण प्रत्यक्ष कारवाई आमच्या टीम्स करतील. हा टप्पा आता आमच्या जबाबदारीचा आहे."
आरवने काही उत्तर दिलं नाही. त्याची नजर समोरच्या डिजिटल नकाशावर स्थिरावली होती. आश्चर्य म्हणजे त्याच्या मनात दोन परस्परविरोधी भावना एकाच वेळी दाटून आल्या होत्या.
एकीकडे दिलासा कारण आता ही जबाबदारी प्रशिक्षित विशेष दलाच्या हातात होती.
आणि दुसरीकडे अस्वस्थता कारण आयुष्य बदलून टाकणाऱ्या या शेवटच्या लढाईत तो स्वतः उपस्थित राहणार नव्हता.
************************************************************************************************************************
रात्र हळूहळू कॉकेशसच्या पर्वतरांगांवर उतरू लागली होती.
तिबिलिसीच्या तात्पुरत्या नियंत्रण कक्षात मात्र वेळ जणू वेगळ्याच गतीने वाहत होती. मोठ्या स्क्रीनवर एकामागून एक थेट प्रक्षेपण दिसत होते. ड्रोनचे कॅमेरे बर्फाच्छादित उतारांवरून सावकाश फिरत होते. कधी एखादी उघडी कडा नजरेस पडत होती, कधी वाऱ्याने हलणारी झुडपं, तर कधी काळोखात विरघळून गेलेल्या त्या भग्न मठाची अस्पष्ट रूपरेषा.
दिवसा तो मठ एखाद्या विस्मृतीत गेलेल्या पुरातन वास्तूसारखा वाटला असता. पण रात्रीच्या अंधारात त्याचं रूप बदललं होतं. तो जणू पर्वतांच्या कुशीत लपलेलं एखादं गूढ रहस्य भासत होता.
शेजारच्या स्क्रीनवर उष्णतामापक कॅमेऱ्यांचे फीड्स सतत बदलत होते. काळ्या-निळ्या पार्श्वभूमीवर लाल आणि नारिंगी रंगांचे ठिपके क्षणाक्षणाला उमटत होते. एखादा ससा, एखादा कोल्हा, एखादा शिकारी पक्षी. प्रत्येक हालचालीकडे तितक्याच गांभीर्याने पाहिलं जात होतं. कारण एका क्षणाचं दुर्लक्षही संपूर्ण मोहिमेला महागात पडू शकत होतं.
काही तासांपूर्वीच डोंगराच्या दोन्ही बाजूंनी जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. स्थानिक पोलिसांनी आसपासच्या गावांमध्ये अत्यंत शांतपणे हालचाली सुरू केल्या होत्या. संपूर्ण परिसर हळूहळू एका अदृश्य जाळ्यात अडकत होता.
पर्वतरांगांमधून बाहेर पडण्याचे प्रत्येक संभाव्य मार्ग आधीच नकाशावर चिन्हांकित करण्यात आले होते. प्रत्येक पायवाट, ओढा, जुना तस्करीचा मार्ग सगळीकडे कुणीतरी तैनात होतं.
रेडिओवरून अधूनमधून एखादा आदेश ऐकू यायचा आणि पुन्हा शांतता पसरायची. त्या शांततेत संपूर्ण पर्वतरांग जणू श्वास रोखून उभी आहे, असंच वाटत होतं.
नियंत्रण कक्षाच्या भिंतीवरचं मोठं घड्याळ सुरुवातीला कुणाच्याच लक्षात आलं नव्हतं. पण जसजशी रात्र सरकत गेली, तसतसा त्याच्या टिकटिकण्याचा आवाज अधिक स्पष्ट ऐकू येऊ लागला. वेळ पुढे सरकत होती, पण परिस्थितीत कोणताही बदल होत नव्हता. अधूनमधून रेडिओवरून अहवाल येत होते.
"सेक्टर तीन क्लिअर."
"सेक्टर पाच क्लिअर."
"पूर्वेकडील मार्गावर कोणतीही हालचाल नाही."
त्या काही शब्दांच्या मागे किती ताण दडलेला आहे, याची जाणीव नियंत्रण कक्षात उपस्थित प्रत्येकाला होती. आरवसाठी ही प्रतीक्षा आता असह्य होऊ लागली होती. इतके महिने तो सतत धावत होता कधी माहितीच्या मागे, कधी पुराव्यांच्या शोधात, तर कधी एखाद्या नव्या धाग्याच्या मागे. पण आज त्याच्या हातात फक्त वाट पाहणं होतं. नकळत त्याच्या बोटांनी खुर्चीचा हात घट्ट पकडला होता. त्याने स्वतःला सैल करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्याच्या मनात एकामागून एक प्रश्न डोकं वर काढत होते.
जर केलर तिथेच नसेल तर? जर हा आणखी एक खोटा धागा ठरला तर?
जर तो महिन्यांपूर्वीच दुसऱ्या देशात निसटला असेल तर? आणि जर पंचवीस वर्षांचा हा पाठलाग पुन्हा शून्यावर येऊन थांबला तर?
त्याला स्वतःच्याच विचारांचा राग येत होता, पण त्यांना थांबवणं त्याच्या हातात नव्हतं.
साडेतीनच्या सुमारास अचानक एका तंत्रज्ञाने स्क्रीनकडे झुकत मोठ्याने म्हटलं, "थांबा!"
क्षणात संपूर्ण नियंत्रण कक्ष सावध झाला. उष्णतामापक फीडवर एक लहानसा लाल ठिपका हळूहळू सरकत होता. तंत्रज्ञाने प्रतिमा मोठी केली. आणखी झूम केलं. सगळ्यांच्या नजरा त्या स्क्रीनवर खिळल्या.
दहा सेकंद...पंधरा...वीस...
शेवटी तंत्रज्ञ खुर्चीत मागे रेलला आणि दीर्घ सुस्कारा सोडत म्हणाला, "खोटा अलार्म."
"काय होतं?" ऑपरेशन प्रमुखाने विचारलं.
"बर्फाळ बकरी."
खोलीत सगळे हसू लागले आणि काही क्षणांसाठी तणाव हलका झाल्यासारखं वाटलं.
पहाटेचे साडेचार वाजले. खिडकीबाहेरचा काळोख हळूहळू विरघळू लागला. रात्रीचा गडद निळा रंग करड्या छटांमध्ये मिसळत होता. दूरवरच्या डोंगररांगांच्या टोकांवर प्रकाशाची एक फिकट रेषा उमटू लागली होती. नवा दिवस उगवत होता.
नियंत्रण कक्षात उपस्थित बहुतेक अधिकारी आणि तंत्रज्ञ अनेक तासांपासून जागे होते. थकवा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता, तरीही कुणाचंही लक्ष समोरच्या स्क्रीनवरून हटत नव्हतं.
तेवढ्यात थर्मल फीडवर एक हलकीशी हालचाल दिसली. काळ्या-निळ्या पार्श्वभूमीवर एक छोटासा नारिंगी ठिपका हळूहळू सरकत होता.
सुरुवातीला तो इतका अस्पष्ट होता की, आणखी एक खोटा अलार्म असावा असंच वाटलं. पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. नियंत्रण कक्षातल्या एका तंत्रज्ञाने क्षणार्धात स्क्रीनकडे झुकत कीबोर्डवर बोटं वेगाने फिरवली.
"काय दिसतंय?" ऑपरेशन प्रमुखाने विचारलं.
तंत्रज्ञाने प्रतिमा मोठी करत उत्तर दिलं, "हालचाल... मठाखालच्या जुन्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ."
क्षणात खोलीत नीरव शांतता पसरली. आरव नकळत खुर्चीत ताठ बसला. सगळ्यांच्या नजरा स्क्रीनवर खिळल्या होत्या.
बर्फाच्या थंड पार्श्वभूमीवर ती उष्ण सावली सावकाश पुढे सरकत होती. तिच्या हालचालींमध्ये घाई नव्हती, पण बेफिकिरीही नव्हती. काही पावलं चालल्यानंतर ती थांबत होती, आजूबाजूचा अंदाज घेत होती आणि मग पुन्हा पुढे सरकत होती.
जणू अंधारात कुठेतरी धोका दबा धरून बसला आहे, याची तिला जाणीव होती किंवा...जाळं आधीच आवळलं गेलं आहे, हे तिने ओळखलं होतं.
"एकच व्यक्ती आहे," दुसऱ्या तंत्रज्ञाने विविध सेन्सर्सवरील माहिती पडताळत सांगितलं. "उंची जुळतेय... शरीरयष्टीही. चालण्याची पद्धतसुद्धा फाइलमधल्या नमुन्याशी मिळतीजुळती आहे."
ऑपरेशन प्रमुख एक पाऊल पुढे आला. स्क्रीनवरून नजर न हटवता त्याने रेडिओचं बटण दाबलं.
"सर्वानी सतर्क राहा," तो शांत, नियंत्रित आवाजात म्हणाला. "लक्ष्य नजरेत आलं आहे. अंतिम पुष्टी मिळेपर्यंत कोणतीही कारवाई करू नका. कोणतीही हालचाल नाही."
क्षणात रेडिओवरून उत्तरं आली. "अल्फा, कॉपी." "ब्राव्हो, कॉपी." "चार्ली, कॉपी."
स्क्रीनवरची आकृती आता अधिक स्पष्ट दिसू लागली होती. ती बोगद्याच्या दिशेने संथपणे पुढे सरकत होती. आरवच्या श्वासाची गती नकळत मंदावली. त्याने खुर्चीच्या हातावरील पकड आणखी घट्ट केली.
एलेना शांतपणे उठली. ती त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली आणि एक शब्दही न बोलता त्याच्या हातावर आपला हात ठेवला. दोघांच्याही नजरा स्क्रीनवर खिळल्या होत्या.
ती सावली आता बोगद्याच्या अगदी प्रवेशद्वाराशी येऊन थांबली.
एक सेकंद...दोन...पाच...काहीच हालचाल नाही. जणू त्या व्यक्तीने शेवट आता अटळ आहे, हे शांतपणे स्वीकारलं होतं.
नियंत्रण कक्षात इतकी शांतता होती की संगणकांच्या कुलिंग फॅन्सचा मंद आवाज आणि रेडिओवरचा किरकिरणारा स्टॅटिकही स्पष्ट ऐकू येत होता.
तंत्रज्ञाने प्रतिमा आणखी मोठी केली. चेहऱ्याची रचना, शरीरयष्टी, उंची, हालचालींचा नमुना सगळ्याची जुन्या फाइल्समधल्या माहितीशी संगणकीय तुलना सुरू झाली. मग त्याने हेडसेट अलगद बाजूला ठेवला. त्याचा आवाज संपूर्ण नियंत्रण कक्षात घुमला.
"लक्ष्याची ओळख निश्चित झाली आहे."
तंत्रज्ञाने स्क्रीनकडे पाहत पुढचे शब्द उच्चारले.
"एड्रियन केलर."
स्क्रीनवर एड्रियन केलरची उष्ण सावली अजूनही बोगद्याच्या प्रवेशद्वाराशी स्थिर उभी होती. पहाटेच्या धूसर प्रकाशात, बर्फ आणि काळ्या खडकांच्या मधोमध ती एकटीच दिसत होती. नियंत्रण कक्षात अशी शांतता पसरली होती की आरवला स्वतःच्या हृदयाचे ठोकेही स्पष्ट ऐकू येत असल्याचा भास होत होता.
ऑपरेशन प्रमुखाची नजर स्क्रीनवर खिळली होती. तंत्रज्ञांचे हात कीबोर्डवर स्थिर होते. कोणीही बोलत नव्हतं.
आणि तेवढ्यात...ती सावली अचानक हलली. एका झटक्यात ती वळली आणि बोगद्याच्या दिशेने धावू लागली. स्क्रीनवरची आकृती आता वेगाने पुढे सरकत होती. बर्फावरून घसरत, अडखळत, पण न थांबता. अनेक वर्षं इतरांसाठी सापळे रचणारा तो माणूस आता स्वतःभोवती आवळलेलं जाळं फोडण्याचा शेवटचा प्रयत्न करत होता.
ऑपरेशन प्रमुखाने रेडिओ उचलला.
"अल्फा टीम, पश्चिमेकडील मार्ग बंद करा."
"कॉपी."
"ब्राव्हो, लक्ष्य बोगद्याकडे सरकत आहे. सध्याचं स्थान कायम ठेवा."
"कॉपी."
"चार्ली, दक्षिणेकडील बाहेर पडण्याचा मार्ग सुरक्षित करा."
"कॉपी."
रेडिओवरून फक्त आवश्यक तेवढेच शब्द ऐकू येत होते. त्यात उत्साह नव्हता, भीती नव्हती फक्त शिस्त आणि अचूकता होती. थर्मल स्क्रीनवर केलरची नारिंगी सावली बर्फाच्या थंड निळ्या पार्श्वभूमीवर ठळकपणे उठून दिसत होती.
"अंतर पन्नास मीटर."
शेजारच्या कन्सोलवरून तात्काळ पुष्टी आली.
आरवच्या पोटात नकळत गोळा आला. पंचवीस वर्षांचा पाठलाग आता काही सेकंदांच्या अंतरावर येऊन ठेपला होता.
"चाळीस मीटर."
धावताना केलरचा पाय बर्फावर घसरला. तो एका क्षणासाठी अडखळला, पण लगेच स्वतःला सावरत पुन्हा वेगाने पुढे धावू लागला.
"तीस मीटर."
त्याच वेळी स्क्रीनच्या दोन्ही कडांना इतर उष्ण सावल्या दिसू लागल्या. विशेष कमांडो तुकड्या. त्या शांतपणे अचूक अंतर राखत पुढे सरकत होत्या.
केलरला कदाचित त्या दिसतही नसतील. पण त्याच्या सुटकेचे सर्व मार्ग आधीच बंद झाले होते.
"पंचवीस मीटर."
"लक्ष्य बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ."
"कॉपी."
एलेनाने नकळत आरवचा हात अधिक घट्ट पकडला.
"वीस मीटर."
अचानक स्क्रीनवर केलरचा वेग मंदावला.
"लक्ष्याचा वेग कमी झालाय," तंत्रज्ञ शांतपणे म्हणाला.
नियंत्रण कक्षात पुन्हा श्वास रोखले गेले.
"पंधरा मीटर..."
क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, "लक्ष्य थांबलं आहे."
स्क्रीनवर केलरची सावली जागच्या जागी उभी होती. समोर अंधारात हरवलेला बोगदा. मागे उघडं बर्फाच्छादित उतार आणि भोवती अदृश्य वर्तुळासारखा आवळत चाललेला सुरक्षा दलाचा गराडा. त्याच्याकडे आता पळून जाण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता.
पुढची काही सेकंदं नियंत्रण कक्षातल्या प्रत्येकासाठी अनंतकाळासारखी भासत होती.
मग रेडिओवरून आवाज आला. "दृश्य संपर्क."
"लक्ष्य नियंत्रणात आणत आहोत."
"कॉपी."
त्यानंतर रेडिओवर काही क्षण फक्त बर्फावर धावणाऱ्या बुटांचे अस्पष्ट आवाज आणि स्टॅटिक ऐकू येत राहिला.
आणि मग...पुन्हा अस्वस्थ करणारी शांतता.
नियंत्रण कक्षात उपस्थित प्रत्येकाची नजर स्क्रीनवरच खिळलेली होती.
थर्मल प्रतिमेत आता दोन-तीन उष्ण सावल्या एकमेकांजवळ दिसत होत्या. काही क्षणांत आणखी काही आकृत्या तिथे पोहोचल्या. मग हालचाल थांबली. त्यांपैकी एक आकृती जमिनीवर होती. बाकीच्या तिच्याभोवती स्थिर उभ्या होत्या.
सगळं काही अवघ्या काही क्षणांत, पूर्ण शांततेत संपलं होतं. रेडिओ पुन्हा निःशब्द झाला.
ती शांतता नियंत्रण कक्षात उपस्थित प्रत्येकाच्या मनावर दडपण आणत होती. ऑपरेशन प्रमुखाची नजर रेडिओवर खिळली होती.
आरवला प्रत्येक सेकंद एखाद्या तासासारखा लांबलेला वाटत होता.
तेवढ्यात रेडिओवर अचानक स्टॅटिकचा किरकिरणारा आवाज उमटला. क्षणात संपूर्ण नियंत्रण कक्ष सावध झाला. ऑपरेशन प्रमुखाने रिसीव्हर कानाशी नेला.
पलीकडून एक शांत, स्थिर आवाज उमटला. "Target secured."
ऑपरेशन प्रमुखाने हळूच रिसीव्हर खाली ठेवला. प्रत्येकजण त्या दोन शब्दांचा अर्थ आपल्या मनात पुन्हा एकदा उमजून घेत होता.
एका अधिकाऱ्याने शेजारी उभ्या सहकाऱ्याच्या खांद्यावर हलकी थाप मारली. "गुड वर्क."
समोरून तितकंच मोजकं उत्तर आलं. "थँक यू."
ऑपरेशन संपलं होतं.
आता पुढे ओळख पडताळणी, पंचनामा, वैद्यकीय तपासणी, हस्तांतरण, चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया कायद्याचं चक्र नेहमीप्रमाणे पुढे फिरणार होतं.
आरव मात्र काही क्षण तसाच बसून राहिला. त्याची नजर अजूनही त्या स्क्रीनवर होती, जिथे काही वेळापूर्वी एड्रियन केलरची सावली दिसत होती. आता तिथे फक्त बर्फ, खडक... आणि शांतपणे उभ्या असलेल्या सुरक्षा तुकड्या दिसत होत्या.
पंचवीस वर्षं चाललेला पाठलाग...हजारो किलोमीटरचा प्रवास...शेकडो खोटे सुगावे...असंख्य उद्ध्वस्त आयुष्यं...या सगळ्याचा आता शेवट झाला होता.
************************************************************************************************************************
काही आठवड्यांनी...
एड्रियन केलर आता हाय सेक्युरिटी तुरुंगात होता. त्याच्याविरुद्धच्या खटल्याची तयारी सुरू झाली होती. Black Emberशी संबंधित चौकशा मात्र अजूनही जगभर सुरू होत्या. आर्थिक व्यवहार, बनावट कंपन्या, गुप्त नेटवर्क, राजकीय संबंध प्रत्येक धागा पद्धतशीरपणे उलगडला जात होता. त्या तपासाला खूप महिने कदाचित वर्षे लागणार, याची सगळ्यांनाच जाणीव होती.
अॅना रिश्टरचा या संपूर्ण प्रकरणावरील अंतिम लेख प्रसिद्ध झाला. तो कोणत्याही सनसनाटी मथळ्यांनी भरलेला नव्हता. त्यात संपूर्ण कटकारस्थानाचा मागोवा होता, त्याची रचना होती, त्याचे परिणाम होते; पण ज्यांनी पडद्यामागे राहून ही लढाई लढली, त्यांची खरी नावं तिने जाणीवपूर्वक गुप्त ठेवली होती. काही लोकांना प्रसिद्धीपेक्षा शांत आयुष्य जास्त महत्त्वाचं असतं, हे तिला माहीत होतं.
एलेनासाठी मात्र सर्वात कठीण मोहिम अजून बाकी होती. सामान्य आयुष्यात परतणं.
पंचवीस वर्षं तिच्या आयुष्यात प्रत्येक दिवस संशय, भीती आणि पळापळीने भरलेला होता. त्यामुळे साधेपणा हा तिच्यासाठी जवळजवळ अनोळखी शब्द होता.
मुंबईतल्या घरात ती आणि आरव हळूहळू नव्या आयुष्याची सवय लावू लागले.
सकाळचा चहा. सोसायटीच्या आवारातला निवांत फेरफटका. संध्याकाळचं शांत जेवण.
साध्या माणसांसाठी अगदी सामान्य असलेल्या या छोट्या गोष्टी...एलेनाला पंचवीस वर्षांत कधीच जगता आल्या नव्हत्या.
************************************************************************************************************************
खिडकीबाहेर पहाट उगवत होती. शहरावर प्रकाशाची फिकट चादर अलगद पसरत होती.
पंचवीस वर्षांचं युद्ध अखेर संपलं होतं. केलरची सावली आता त्याच्या आयुष्यावर उरली नव्हती.
आरव उठला.
एलेना दुसऱ्या खोलीत शांत झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर शांत सुरक्षित भाव होते. तो तिच्या दाराशी काही क्षण शांत उभा राहिला.
तिच्याकडे पाहिलं आणि हलकेच दार लोटून घेतलं.
त्या रात्री आरवने दुष्यंतचं पत्र शेवटच्या वेळेस उघडलं. त्या अक्षरांशी तो इतका परिचित झाला होता की प्रत्येक ओळ त्याला मुखोद्गत होती. तरीही...प्रत्येक वेळी त्या पत्रातून काहीतरी नवीन अर्थ सापडायचा.
त्याने पत्र काळजीपूर्वक दुमडलं.मग कपाटातून एक जुनी लाकडी पेटी बाहेर काढली. त्या पेटीत त्याच्या आयुष्यातल्या त्या प्रदीर्घ प्रवासाच्या काही मोजक्या आठवणी जपलेल्या होत्या.
होलिंगरच्या घड्याळात सापडलेलं ते छोटंसं चिन्ह.एलेनाचा जुना, फिकट झालेला फोटो. आणि आता...दुष्यंतचं पत्र. त्याने तेही त्या पेटीत अलगद ठेवलं आणि मग झाकण बंद केलं.
***समाप्त***
@नितनवे
@नितनवे
प्रचंड तुफान झाली ही मालिका ! हे फक्त वाचन नव्हते, हा एक पूर्ण प्रवास होता. निव्वळ अप्रतिम ! तुमच्या लेखणीत एक रॉबर्ट लडलम लपलेला आहे त्याला मोठे करा उदंड लिहा आणि आम्हाला अशाच वाचन पर्वणी देत चला.
ह्या मालिकेचे पुस्तक करण्याबाबत सिरीयसली विचार करा, किंबहुना एखाद प्रोडक्शन हाऊसला संपर्क करून पहा !
ह्यावर एक फर्मास चित्रपट किंवा वेब सीरिज होऊ शकते १००%
पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा !
झकास. खूप आवडली.
झकास. खूप आवडली.
कथा अभावानेच वाचतो, या कथेचा विषय वेगळा, बाज वेगळाय हे पहिल्या दोन भागातच लक्षात आले होते, पुढेही तुम्ही अजीबात निराश केले नाही. मराठीत असे विषय कमीच वाचायला मिळतात.
Actually कथेचा जीव तसा मोजकाच - “market manipulation करून नफा कमावणे” हे तर सदासर्वदा सर्वत्र होतच असते. पण ज्या कौशल्याने तुम्ही ही कथा रंगवली, डीटेलिंग केले ते फारच छान होते, एकदम चित्रदर्शी ! Interesting way of telling a Story.
तुम्ही ऑलरेडी पटकथा लिहित नसाल तर लिहाल लवकरच 👍
पुलेशु.
अंतिम भाग आला , आता पूर्ण
अंतिम भाग आला , आता पूर्ण वाचते.
डोक्याला त्रास देणारी ही कादंबरी आहे कारण बरेच टेक्निकल डिटेल्स माहित नाहीत. शेअर बाजारात पडद्याआड इतके खेळ चालत असतील याची झलक पाहायला मिळाली.
नियमितपणे मोठे भाग टाकत लिखाण पूर्ण करण्यासाठी धन्यवाद..
झकास! जबरदस्त झाली आहे ही
झकास! जबरदस्त झाली आहे ही कादंबरी!!!
उत्तम झालीं आहे. पण एक शंका.
उत्तम झालीं आहे. पण एक शंका. जर दुष्यंत आणि आरव मुंबईला एकत्र राहत होते तर तो त्याचा मुलगा आहे हे केलर ला इतक्या उशीरा कसं कळलं. याआधीच त्याने आरवला बाजूला का नाही केलं?
पहिले दोन वाचले होते भाग
पहिले दोन वाचले होते भाग
आता पूर्ण करते
कथा वेळेत पूर्ण केल्याबद्दल आभार
मोठा आवाका होता कादंबरिकेचा!
मोठा आवाका होता कादंबरिकेचा! विषयाचं वेगळेपण होतं. सीआयएला शोभेल असं तंत्रज्ञान होतं.
सुरवातीची घट्ट पकड शेवटापर्यंत येता येता थोडी ढिली पडली हेमावैम. पण रोज नवीन भागाची उत्कंठा असायची!
पुलेशु!!
अप्रतिम!! जबरदस्त रंगवलेय कथा
अप्रतिम!! जबरदस्त रंगवलेय कथा!!!
वाचून झाले पूर्ण
वाचून झाले पूर्ण
अफाट आहे
सध्या इतकेच लिहितोय
सविस्तर प्रतिसाद लिहिणार आहेच
सर्व प्रतिसादकांचे आभार.
सर्व प्रतिसादकांचे आभार.
जर दुष्यंत आणि आरव मुंबईला एकत्र राहत होते तर तो त्याचा मुलगा आहे हे केलर ला इतक्या उशीरा कसं कळलं. याआधीच त्याने आरवला बाजूला का नाही केलं?>>> अगदी योग्य निरीक्षण. खरं तर याची पार्श्वभूमी माझ्या मनात होती आणि भाग २ मध्ये त्याचे काही संदर्भही दिले आहेत. कदाचित, ती बाब पुरेशी ठळकपणे मांडली गेली नाही.
दुष्यंतने त्याचं वैयक्तिक आयुष्य आणि Black Ember मधलं काम पूर्णपणे वेगळं ठेवलं होतं. आरवला त्याने जाणीवपूर्वक या सगळ्यापासून दूर ठेवलं आणि त्यामुळे केलरलाही अनेक वर्षं आरव हा दुष्यंतचा मुलगा आहे, हे समजलं नव्हतं.
खूपच अफाट झाली आहे कथा, मी
खूपच अफाट झाली आहे कथा, मी आधीही म्हणाले होते की ह्यावर एखादी सिरीज येऊ शकेल... मस्तच..
खरंच तुम्ही ह्याचं पुस्तक कराच..
अप्रतिम कथा... शेवटचा
अप्रतिम कथा... शेवटचा बर्फातला क्लायमॅक्स तर फारच भारी.
यावर एखादी मस्त वेब सीरीज बनु शकेल...
आरव च्या भुमिकेत वैभव तत्ववादी ला बघायला मजा येईल
खूप छान आणि वेगवान कथानक,
खूप छान आणि वेगवान कथानक, तुमचे डिटेलिंग पण आवडले.
सगळे म्हणतात त्याप्रमाणे यावर खूप मस्त वेब सिरीज बनू शकते .
पुढील कथेसाठी शुभेच्छा .
कथादाता सुखी भव:
खुपच सुन्दर
खुपच सुन्दर
कथा खरोखर खुपच सुन्दर होति
डिटेलिंग छान होते.
डिटेलिंग छान होते.
कथानक वेगवान आणि थरारक होते.
3रेग्युलर भाग येत असल्याने उत्कंठा टिकून राहिली, वाट बघून बघून कंटाळा येउन वाचन सोडले नाही.
काही टेक्निकल गोष्टी कळत नव्हत्या.
जसे की नेटवर्क मधून ट्रॅक करणे वै. पण त्या सोडून दिल्या मी.
आरव च्या भुमिकेत वैभव
आरव च्या भुमिकेत वैभव तत्ववादी ला बघायला मजा येईल Happy
+१०,०००
दुष्यंत देशमुखच्या भूमिकेत अतुल कुलकर्णी आणि विनायकरावांच्या भूमिकेत उदय सबनीस !.
केलरच्या भूमिकेत घालायला एडवर्ड सोनेनब्लीक सोडून दुसरा ऑप्शन नाही राव बॉलिवूडकडे.
धन्यवाद TI, स्मिता श्रीपाद,
धन्यवाद TI, स्मिता श्रीपाद, सामी, ekujadhav, झकासराव आणि जेम्स वांड!
<<<आरव च्या भुमिकेत वैभव तत्ववादी ला बघायला मजा येईल Happy
दुष्यंत देशमुखच्या भूमिकेत अतुल कुलकर्णी आणि विनायकरावांच्या भूमिकेत उदय सबनीस !.
केलरच्या भूमिकेत घालायला एडवर्ड सोनेनब्लीक सोडून दुसरा ऑप्शन नाही राव बॉलिवूडकडे.>>>
अरे वा! आता फक्त एखाद्या निर्मात्याच्या नजरेत ऑपरेशन ब्लॅक एम्बर पडायला हवं! 
मनापासून धन्यवाद. अशी स्वप्नं वाचकांनीच दाखवायची असतात!