ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ३२

Submitted by नितनवे on 16 July, 2026 - 05:35

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ३१

पूर्वभाग
आरवला दुष्यंतच्या पत्रातून समजतं की होलिंगरच्या पेटीत केवळ केलरविरुद्धचे पुरावे नाहीत, तर संपूर्ण Black Ember नेटवर्कचा नकाशाच दडलेला आहे. हे सत्य उघड करायचं की नाही, यावर टीममध्ये तीव्र चर्चा होते, कारण त्याचे परिणाम जगभरातील आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेला हादरवू शकतात.
दरम्यान त्यांना धमकीचा संदेश मिळतो आणि संशय निर्माण होतो की त्यांच्यातच कोणी फितूर आहे. मात्र तपासात समजतं की होलिंगरच्या पेटीत लपवलेल्या GPS ट्रॅकरमुळेच केलर त्यांचा माग काढत होता.
नव्या सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यावर पेटीतली कागदपत्रं पाहून सर्वजण हादरतात. त्यातून उघड होतं की Black Ember ने जागतिक आर्थिक संकटांसारख्या घटनांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला होता.
केलरला थांबवण्यासाठी एलेना एक धाडसी योजना मांडते पुरावे एकाच वेळी पत्रकार अ‍ॅना रिश्टर आणि आंतरराष्ट्रीय नियामक संस्थांकडे पोहोचवण्याची. होलिंगरकडे दुष्यंतची जुनी “डेड-मॅन स्विच” प्रणाली अजूनही सुरक्षित असल्याचं समोर येतं.
भागाच्या शेवटी अ‍ॅना पुरावे प्रकाशित करण्यास तयार होते, तर जिनेव्हामध्ये केलरला हा डाव समजतो आणि तो अंतिम आदेश देतो. आरवला कोणत्याही परिस्थितीत जिवंत ठेवू नका.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ३२ - अस्त

फार्महाऊस. सकाळ.
माया लॅपटॉपसमोर बसून अ‍ॅना रिश्टरला संदेश पाठवण्याची अंतिम तयारी करत होती, तेव्हाच तिच्या स्क्रीनवर एक मोठा लाल अलर्ट चमकला.
"हे काय आहे?" कबीरने तातडीने विचारलं. स्क्रीनवरचा तो लाल रंग पाहून त्याच्या पोटात एकदम गोळा आला.

मायाचा चेहरा उतरला, तिची बोटं कीबोर्डवरच थांबली. "मूव्हमेंट डिटेक्शन. आपल्या तीन किलोमीटरच्या परिघात हालचाल सुरू झालीये. दोन वेगवेगळ्या दिशांनी काही वाहने येत आहेत."

विनायकराव खिडकीजवळ धावले. त्यांनी डोळे बारीक करून बाहेर पाहिलं. दूरवर, सुकलेल्या शेतांच्या पलीकडे, धुक्यातून आणि धुळीतून दोन गाड्यांचे दिवे वेगाने चमकत येत होते.

"त्यांना आपलं ठिकाण कळलं," एलेना म्हणाली. तीचा चेहरा पांढराफटक पडला होता. "आपण त्यांचा मुख्य ट्रॅकर आधीच नष्ट केला असला, तरी या भागातल्या लोकल सेल टॉवरवरून त्यांनी आपल्या सिस्टीमचा शेवटचा सिग्नल पकडला असणार. त्याच रेंजवरून त्यांनी हा परिसर वेढायला सुरुवात केलीये."

आरवचं हृदय वेगाने धडधडू लागलं. परिस्थिती प्रत्येक सेकंदाला हाताबाहेर चालली होती. "किती वेळ आहे आपल्याकडे?" त्याने थेट विचारलं.
"दहा मिनिटं. जास्तीत जास्त," विनायकराव खिडकीबाहेर नजर ठेवूनच म्हणाले. त्यानंतर ते आपल्याला पूर्णपणे घेरतील."

मायाने पटकन लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहिलं. फाईल अपलोड होत आली होती, पण मुख्य कमांड बाकी होती. "मेसेज अजून पाठवलेला नाहीये. फायनल ट्रिगर बाकी आहे. जर आत्ता हा डेटा पाठवला नाही, तर यानंतर आपल्याला कधीच संधी मिळणार नाही. ते सगळं नष्ट करतील."

आरवने समोर उभ्या असलेल्या धोक्याकडे पाहिलं, खिशातल्या दुष्यंतच्या पत्रावर हात फिरवला आणि एक क्षणही न घालवता अंतिम निर्णय घेतला. "पाठव, माया. आत्ताच्या आत्ता."

काही सेकंदांतच पेटीतल्या दस्तऐवजांच्या स्कॅन कॉपीज, छायाचित्रांसह, अ‍ॅना रिश्टरकडे आणि एकाच वेळी तीन आंतरराष्ट्रीय आर्थिक नियामक संस्थांकडे रवाना झाल्या. होलिंगरने गार्डियन यंत्रणा जागी केली.

"झालं," माया म्हणाली, तिचा श्वास जड होता. "आता मागे फिरता येणार नाही. उलटी गिनती सुरू झालीये."

तेवढ्यात बाहेर गाड्यांचा आवाज एकदम जवळ आला. टायर घासल्याचा आणि ब्रेक्सचा कर्कश आवाज खोलीत घुमला. पाठोपाठ वाहनांची दारं उघडण्याचे आवाज आणि मग बुटांचे जड, शिस्तबद्ध आवाज फार्म हाऊसच्या दिशेने वेगाने येऊ लागले.

"मागच्या दाराने," विनायकराव ओरडले. " लवकर निघा!"

सगळे जण एकाच वेळी धावले. एलेनाने आरवचा हात घट्ट धरला, मायाने ती धातूची मुख्य पेटी उचलली. पण त्यांनी मागचं दार उघडण्याआधीच पुढच्या मुख्य दारावर जोरदार धडक बसली. लाकूड कडकडत फुटल्याचा भीषण आवाज झाला. पहिली गोळी फार्महाऊसच्या जुन्या लाकडी भिंतीत घुसली. लाकडाचे तुकडे आणि धूळ हवेत उडाली. स्वसंरक्षणासाठी सगळे जण जमिनीवर वाकले. कबीरने पटकन तिथले एक जुने, जड लाकडी कपाट संपूर्ण ताकदीने ढकलून पुढच्या दाराच्या आतल्या बाजूला आडवं टाकलं.

दारावर दुसरी धडक बसली, कपाट किंचित जागेवरून सरकलं. बाहेरून जर्मन भाषेत एकमेकांना संथ आणि शिस्तबद्ध आदेश दिले जात असल्याचे स्पष्ट आवाज ऐकू येत होते. ज्यामुळे परिस्थिती अधिकच भीतीदायक वाटत होती.

"मागच्या दाराकडे, वाकून, पटकन!" कबीर ओरडला.

मागच्या दारातून बाहेर पडताच थंड सकाळची हवा अंगावर आदळली. समोर मोकळं शेत पसरलं होतं, आणि त्या पलीकडे दिसणारी दाट जंगलाची किनार हाच या क्षणी सुरक्षेचा एकमेव मार्ग होता.

"पळा!" विनायकराव ओरडले, आणि स्वतः सगळ्यात शेवटी राहिले, मागच्या दाराकडे तोंड करून उभे ठाकले. त्यांच्या हातात स्वसंरक्षणासाठी शेतातले एक जुने लोखंडी हत्यार होते, त्यांचा निर्धार ढळला नव्हता.

"विनायकराव, चला!" मायाने धावता धावता मागे वळून हाक मारली. पेटी तिच्या हातात जड झाली होती.

"जा! मी तुमच्या मागोमाग येतो!" ते ओरडले. शत्रूचा रोख काही काळ रोखून धरून इतरांना जंगलापर्यंत पोहोचायला वेळ मिळवून देण्याचा त्यांचा हेतू होता.

आरव तिथेच थांबायला गेला, पण एलेनाने त्याचा हात पकडून त्याला जोरात पुढे ओढलं. "आत्ता नाही, आरव!" ती किंचाळली. तिच्या डोळ्यांत अश्रू आणि भीती दोन्ही एकत्र दाटून आले होते.

विनायकरावांनी दाराजवळची वाळलेली लाकडं आणि जुना कचरा पेटवून मागचा रस्ता धुराने अडवला होता, जेणेकरून शत्रूला त्यांचा माग काढणे कठीण जाईल. त्या धुराच्या आडून ते स्वतः बाजूच्या शेतातील पिकांमध्ये झोकून देऊन निसटले.

शेतातून धावताना मागे अचानक दोनदा गोळीबाराचा आवाज घुमला, आणि मग एक भयानक शांतता पसरली.

आरवने थांबून मागे वळून पाहण्याचा प्रयत्न केला, पण एलेनाने त्याला अजिबात उसंत दिली नाही. तिने त्याचा चेहरा हाताने धरून पुढे वळवला.
"जंगलापर्यंत पोहोचूया आधी," ती कुजबुजली. तिचा आवाज थरथरत होता, पण पावलांचा वेग कमी होत नव्हता.

जंगलाच्या काठावर पोहोचताच समीर आणि कबीर आधीच थांबलेले दिसले, धापा टाकत. माया काही सेकंदांनी पोहोचली, अजूनही ती पेटी छातीशी घट्ट धरून.

पण विनायकराव नव्हते.

"कुठे आहेत ते?" आरवने विचारलं, त्याचा श्वास अडकला.

कोणीच उत्तर दिलं नाही. सगळ्यांच्या नजरा फार्महाऊसच्या दिशेने वळल्या, जिथून आता फक्त धूर दिसत होता.

काही क्षणांतच, दूरवर, एक थकलेली, लंगडत चालणारी आकृती जंगलाच्या दिशेने येताना दिसली; विनायकराव, हातावर रक्त.
"विनायकराव!" माया धावली त्यांच्याकडे.

ते कोसळण्याआधी तिने त्यांना धरलं. "मी ठीक आहे, पिकांचा आडोसा मिळाला म्हणून बरं झालं" ते हळू आवाजात म्हणाले, त्यांचा श्वास जड होता. "फक्त... खांद्याला लागलंय. गोळी आरपार गेली."
************************************************************************************************************************
जिनेव्हा.

केलरच्या भव्य ऑफिसमधला प्रत्येक स्क्रीन एकदम जागा झाला होता. एकामागोमाग एक येणारे लाल अलर्ट्स संपूर्ण खोलीत एका धोकादायक प्रकाशाचं जाळं तयार करत होते.

सर," असिस्टंट थरथरत्या आवाजात म्हणाला. त्याच्या हातातील टॅबलेट सतत बदलणाऱ्या डेटाने थरथरत होता. "आपली काही मुख्य खाती संशयास्पद व्यवहारांमुळे तात्पुरती गोठवण्याची प्रक्रिया सुरू झालीये. आणि... फ्रँकफर्ट, लंडन, न्यूयॉर्क तिथल्या मोठ्या वृत्तपत्रांच्या डिजिटल टीम्सना पुराव्यांचे ईमेल मिळालेत. ते कोणत्याही क्षणी स्टोरी लाईव्ह करू शकतात. मीडियावर बातम्यांचा स्फोट होणार आहे."

केलर पूर्णपणे स्तब्ध उभा राहिला. त्याचे डोळे त्या स्क्रीन्सकडे पाहत होते, जिथे त्याच्या साम्राज्याचा एक-एक दुवा निखळत होता. पंचवीस वर्षांत पहिल्यांदाच त्याच्या त्या चेहऱ्यावरची नेहमीची शांतता गायब झाली होती आणि तिथे खरी भीती उमटली होती.
"हे कसं घडलं?" तो स्वतःशीच पुटपुटला. "आपण तर वेढा आवळला होता. त्यांना अचूक वेळेत गाठलं होतं."

"आपण त्यांना गाठलं होतं, सर," असिस्टंट म्हणाला, त्याचा स्वतःचा श्वास कोंडला होता. "पण आपण तिथं धडक मारण्याआधीच त्यांनी सगळा डेटा सिस्टीममध्ये सोडून दिला होता. गार्डियन यंत्रणा ट्रिगर झाली होती."

केलरचे हात टेबलावर टेकले. त्याच्या शरीराचं वजन जणू अचानक वाढलं होतं आणि पाय लटपटत होते. खिडकीबाहेर जिनेव्हाचं शहर नेहमीसारखं शांत, नेहमीसारखं सुंदर आणि संथ दिसत होतं, जणू त्या शहराला कल्पनाच नव्हती की आत, त्या काचेच्या उंच इमारतीत, पंचवीस वर्षांचं एक अवाढव्य साम्राज्य पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळत होतं.

टेबलावरचा फोन पुन्हा वाजला. असिस्टंटने तो उचलला, ऐकलं आणि त्याचा चेहरा अधिकच काळा पडला. "सर, हॅलाइनमधली आपली टीम... मुख्य टार्गेट्स निसटले. तिथल्या एका म्हाताऱ्याने धुराचा आडोसा घेऊन त्यांना चकवलं, बाकीचे पेटी घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले. स्थानिक पोलिसांची हालचाल वाढल्याने आपली टीम तिथून माघार घेतीये."

केलरने हळूच आपले डोळे मिटले. काही क्षण तो तसाच शांत उभा राहिला, जणू त्याच्या मनात पंचवीस वर्षांचं संपूर्ण आयुष्य एका क्षणात उलगडत होतं; दुष्यंतशी झालेली पहिली भेट, जगाला बदलण्याच्या आदर्शवादाचे ते सुरुवातीचे दिवस, आणि नंतर हळूहळू सत्तेच्या आणि पैशाच्या हव्यासापोटी झालेला तो भयानक बदल. दुष्यंतने अखेर आपला बदला पूर्ण केला होता.

सर," असिस्टंट पुन्हा म्हणाला, "इंटरपोल आपल्या कोर टीमच्या फाईल्स तपासत आहे. स्थानिक प्रशासनाने विमानतळावरच्या आपल्या खासगी विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातलीये. अधिकृत मार्ग बंद होत आहेत." केलरने डोळे उघडले. त्याच्या चेहऱ्यावर आता एका अशा माणसाचा थंड, गणिती निर्धार उमटला होता, ज्याला माहीत होतं की खेळ बदलला असला तरी तो संपलेला नाही.

"मग आपण दुसऱ्या मार्गाने निघू," तो अत्यंत शांतपणे म्हणाला, जणू काही झालंच नाही. "त्या जुन्या मार्गाने. ज्या अंडरग्राउंड मार्गाने मी दुष्यंतला कधीच सापडलो नव्हतो, आणि या सिस्टीमलाही कधी सापडणार नाही. तयारी कर."
************************************************************************************************************************
जंगल. संध्याकाळ.

त्यांनी विनायकरावांच्या जखमेवर तात्पुरती मलमपट्टी केली. एका जुन्या कापडाचा आणि एलेनाच्या बॅगेतल्या प्रथमोपचार किटचा वापर करून रक्त थांबवण्यात यश आलं होतं, पण विनायकरावांचा चेहरा रक्ताच्या कमतरतेमुळे फिकट पडला होता.

"आपल्याला तातडीने एखादा डॉक्टर हवा आहे," माया म्हणाली. तिचा आवाज काळजीने आणि धास्तीने भरलेला होता.

"आधी आपल्याला एक सुरक्षित जागा शोधायला हवी," विनायकराव अत्यंत क्षीण आवाजात कुजबुजले. अशा परिस्थितीतही त्यांनी चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला. "काळजी करू नका, मी इतक्या सहजासहजी जगाचा निरोप घेणार नाही."

आरवने खिशातून फोन बाहेर काढला. एका मोठ्या आंतरराष्ट्रीय बातम्यांच्या वेबसाईटवर ब्रेकिंग न्यूज झळकू लागली होती: "गुप्त आर्थिक साम्राज्य संकटात; 'ब्लॅक एम्बर'च्या व्यवहारांची चौकशी सुरू."

त्याने तो मथळा एलेनाकडे वळवला. स्क्रीनवरचे ते शब्द वाचून तिचे डोळे भरून आले. पण यावेळी त्या डोळ्यांत मोठे समाधान होते.

"दुष्यंत," ती हळू आवाजात म्हणाली. तिने वर आकाशाकडे पाहत एक सुस्कारा सोडला. "तुला आयुष्यात जे कधी जमलं नाही, ते आज अखेर पूर्ण झालं."

आरवने पुढे होऊन तिचा हात हातात घेतला. "अजून सगळंच संपलेलं नाही, एलेना," तो म्हणाला. "मुख्य सूत्रधार केलर अजून सापडलेला नाही. तो अजूनही गायब आहे."

विनायकरावांनी आपले डोळे किंचित किलकिले केले. "तो नक्की सापडेल," ते म्हणाले. त्यांचा आवाज हळूहळू अधिकच क्षीण होत चालला होता.
************************************************************************************************************************
मायाच्या फोनवर आता एकामागोमाग एक मेसेज येत राहिले. डेटा लीकच्या ईमेलमध्ये मायाने केवळ मुख्य यंत्रणांचे पत्ते वापरले होते, पण पूर्वी ज्या काही मोजक्या विश्वासू पत्रकारांना अलर्ट करून ठेवले होते, त्यांचे मेसेज आता येत होते.

"हे प्रकरण आता मोठ्या स्तरावर गेले आहे," समीर फोनच्या स्क्रीनकडे पाहत म्हणाला.

कबीरने मान डोलावली. "पण जोपर्यंत केलर पकडला जात नाही, तोपर्यंत हे युद्ध संपलेलं नाही."

होलिंगर हळूवार पावले टाकत आरवजवळ आला. त्याने आपला हात हलकेच आरवच्या खांद्यावर ठेवला. "तू आज जो निर्णय घेतलास," तो म्हणाला, "तो दुष्यंतला त्याच्या संपूर्ण आयुष्यात कधीच जमला नाही. त्याने पंचवीस वर्षं फक्त ते सत्य लपवण्यात घालवली. पण तू एका दिवसात ते जगासमोर आणून दाखवलेस"

"मला भीती वाटत नव्हती असं नाही, फ्रांझ," आरव म्हणाला. “पण बाबांनी केलेली चूक मला करायची नव्हती.”

कबीरने त्यांच्याजवळ येत आपला फोन पुढे केला. "एलेनाच्या एका ओळखीच्या माणसाने एका डॉक्टरची व्यवस्था केलीये. गावाबाहेरचं एक छोटं क्लिनिक आहे, जे पोलिसांत कोणतीही नोंद करणार नाही आणि प्रश्नही विचारणार नाही. आपण अर्ध्या तासात तिथे पोहोचू."

विनायकरावांनी आपले डोळे अर्धवट उघडून संमतीदर्शक मान डोलावली. "बघा," ते हळू आवाजात त्यांच्या नेहमीच्या खोडकर शैलीत हसत म्हणाले, "मी म्हातारा झालो असलो तरी इतक्या सहजासहजी हार मानत नाही." माया त्यांच्या शेजारीच बसून राहिली. तिने त्यांचा हात घट्ट धरून ठेवला होता, जणू तिला त्यांना जाणीव करून द्यायची होती की ती त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही.

आरव त्या सगळ्यांपासून थोडा दूर जाऊन उभा राहिला. तो झाडांच्या फांद्यांमधून दिसणाऱ्या अंधाऱ्या आकाशाकडे पाहत होता. त्याच्या हातात अजूनही दुष्यंतचं चुरगाळलेले पत्र होतं, पण त्याने ते जीवापाड जपून ठेवलं होतं. त्याच्या मनात एकच विचार सतत घोळत होता. आजची लढाई त्यांनी जिंकली असली, तरी मुख्य युद्ध अजून संपलेलं नव्हतं. केलर अजूनही कुठेतरी जिवंत होता आणि नव्या वाटा शोधत होता. जोपर्यंत तो पकडला जात नाही, तोपर्यंत ना एलेना सुरक्षित होती, ना तो स्वतः मुक्तपणे जगू शकत होता.
************************************************************************************************************************
तीन आठवडे निघून गेले.

बातम्या ज्या वेगाने पसरल्या, त्यामुळे कुठेतरी एक मोठी ठिणगी पडली होती. टीव्हीवर रोज नवी नावं समोर येत होती. काही बड्या सरकारी अधिकाऱ्यांनी गुपचूप राजीनामे दिले, तर काही आंतरराष्ट्रीय बँकांची चौकशी सुरू झाली. काही आठवड्यांपूर्वी ज्या 'ब्लॅक एम्बर'बद्दल मोजक्याच लोकांना माहीत होतं, ते नाव आता थेट प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकू लागलं होतं.

अ‍ॅना रिश्टरची स्टोरी फक्त एक बातमी राहिली नाही, ती या पिढीतली सर्वात मोठी शोधपत्रकारिता ठरली. तिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले, जगभरातून तिच्या मुलाखती मागितल्या गेल्या. पण तिने प्रत्येक वेळी जाहीरपणे एकच गोष्ट आवर्जून सांगितली की हा खरा लढा तिने लढला नव्हता, तो एका धाडसी मुलाने आणि त्याच्या साथीदारांनी लढला होता. ज्यांचं नाव तिने कधीच उघड केलं नाही.

पण एड्रियन केलर अजूनही सापडला नव्हता.

आरव रोज सकाळी उठला की सगळ्यात आधी बातम्या बघायचा, हे तपासण्यासाठी की आज तरी त्याचं नाव समोर आलं का. पण रोज निराशाच हाती लागायची.

इंटरपोलच्या यादीत केलरचं नाव आता सगळ्यात वर होतं, पण त्याचा ठावठिकाणा कोणालाच माहीत नव्हता. काही दिवस त्याला दक्षिण अमेरिकेत पाहिलं गेल्याच्या अफवा उठल्या, काही दिवस पूर्व युरोपमध्ये. पण प्रत्येक शोध शेवटी रिकाम्या हाताने संपला. तो एखाद्या सावलीसारखा नाहीसा झाला होता.

दरम्यान, जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांत, 'ब्लॅक एम्बर'च्या जाळ्यातले लहान-मोठे धागे उलगडत राहिले. काही देशांनी विशेष चौकशी आयोग नेमले. काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी नव्याने नियम बनवले, जेणेकरून पुन्हा असं गुप्त जाळं उभं राहू नये. आरवला कधीकधी वाटायचं की हे सगळं एका मोठ्या नदीसारखं आहे एकदा का प्रवाह मोकळा झाला, की ती स्वतःचा मार्ग स्वतःच शोधत पुढे निघून जाते. आता हा प्रवाह रोखणं केलरच्याही हातात नव्हतं.
************************************************************************************************************************
साल्झबुर्गजवळचं एक छोटं क्लिनिक.

विनायकराव खिडकीजवळच्या खुर्चीत बसले होते, हातावरची पट्टी आता लहान झाली होती. त्यांचा चेहरा आधीपेक्षा थकलेला दिसत होता, पण डोळ्यांतली ती जुनी चमक परत आली होती.
माया रोज त्यांना भेटायला यायची, कधी एकटी, कधी कबीरबरोबर. आजही ती एका खुर्चीवर बसून त्यांना एक जुनं वर्तमानपत्र वाचून दाखवत होती.

"इथे लिहिलंय," ती म्हणाली, "की तीन देशांच्या सरकारांनी संयुक्तपणे 'ब्लॅक एम्बर'च्या मालमत्तेची चौकशी सुरू केलीये. एकूण रक्कम... इतकी मोठी आहे की आकडा वाचतानाही विश्वास बसत नाही."

विनायकराव हसले. "दुष्यंतने कधी सांगितलं नव्हतं की हे इतकं मोठं असेल."

"तुम्हाला अजूनही त्याच्याबद्दल बोलताना दुःख होतं," माया हळुवारपणे म्हणाली.

विनायकराव काही क्षण गप्प राहिले. "तो माझा मित्र होता," ते म्हणाले, "आणि माझा गुरूही. त्याने मला शिकवलं की संरक्षण करणं म्हणजे नेहमी लढणं नाही; कधीकधी ते योग्य क्षणाची वाट पाहणं असतं."

"आणि तो क्षण आता आलाय?" मायाने विचारलं.

"हो," विनायकराव म्हणाले, खिडकीबाहेरच्या डोंगरांकडे पाहत. "आणि यावेळी वाट पाहणारा मी नव्हतो आरव होता."

मायाने वर्तमानपत्र बाजूला ठेवलं. "विनायकराव, एक विचारू का? तुम्ही इतकी वर्षं दुष्यंतबद्दल, त्याच्या भूतकाळाबद्दल कधीच का बोलला नाहीत? आम्ही सगळे इतकी इतके दिवस तुमच्याबरोबर काम करत होतो."

विनायकराव म्हणाले, “मी दुष्यंतला वचन दिलं होतं की जोपर्यंत गरज नाही, तोपर्यंत मी भूतकाळ उकरणार नाही."

"आणि आता गरज होती?" मायाने हळुवारपणे विचारलं.

"आता एका मुलाचं आयुष्य पणाला लागलं होतं," विनायकराव म्हणाले, त्यांचा आवाज किंचित कापला. "तेव्हा वचनापेक्षा माणुसकी मोठी ठरते."
दोघेही काही वेळ शांत बसले, खिडकीबाहेरच्या डोंगरांवर संध्याकाळचा उजेड पसरताना पाहत.
************************************************************************************************************************
आरव आणि एलेना चहा पित बसले होते.

"मला अजूनही खरं वाटत नाहीये," हातातल्या चहाच्या कपाकडे पाहत आरव म्हणाला. "तीन आठवड्यांपूर्वी मला तुझं नावही धड माहीत नव्हतं. आणि आता..."

"आता तुला तुझी मुळं माहीत आहेत," एलेनाने त्याच्याकडे पाहत हसून म्हटलं. "आणि पुढे कोणत्या वाटेने जायचं, हे आता सर्वस्वी तुझ्याच हातात आहे."

आरवने तिच्याकडे पाहत विचारलं, "तू मुंबईला येशील?"

एलेनाच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव उमटले. "खरं सांगू तर मलाच माहीत नाही," ती प्रांजळपणे म्हणाली. "पंचवीस वर्षं मी फक्त लपून-छपून दिवस काढले. एका सामान्य माणसासारखं साधं जगणं म्हणजे नक्की काय असतं, हे मला अजून शिकायचंय."

"आपल्याकडे भरपूर वेळ आहे," आरवने तिचा हात हातात घेत धीर दिला.
************************************************************************************************************************
कबीरच्या चेहऱ्यावर अजूनही शंका दिसत होती.

"तीन दिवस झाले, पण एकही मोठा व्यवहार दिसला नाही, समीर. कदाचित त्याने आधीच सगळे पैसे रोख काढून ठेवले असतील."
समीरने टायपिंग थांबवले आणि खुर्चीत मागे रेलला.

"मला तसं वाटत नाही. केलरने गेली पाच वर्षे जे साम्राज्य उभं केलं, ते पूर्णपणे डिजिटल पैशांवर चालत होतं. शेल कंपन्या, परदेशातील खाती, क्रिप्टो वॉलेट्स सगळं काही एकमेकांशी जोडलेलं होतं. असा माणूस अचानक रोख पैशांवर जगेल, यावर माझा विश्वास बसत नाही."

त्याने स्क्रीनवर एक नकाशा उघडला. गेल्या तीन दिवसांतील संशयास्पद व्यवहार त्यावर लाल ठिपक्यांनी दिसत होते.

"हे बघ," तो म्हणाला. "दुबई, सिंगापूर आणि जॉर्जियातील एका छोट्या बँकेतील हा व्यवहार. रक्कम फार मोठी नाही, पण वेळ महत्त्वाची आहे. बाकीचे सगळे मार्ग बंद झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा व्यवहार झाला आहे."

कबीर लगेच पुढे झुकला "म्हणजे तो अजूनही पैसे हलवत आहे?"

"हो," समीर शांतपणे म्हणाला. "आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तो घाबरला आहे. घाबरलेला माणूस नेहमी काही ना काही चूक करतो."

"तुला हे व्यवहार कसे सापडले?" कबीरने विचारलं.

"मला नाही सापडले. ब्लॅक एम्बर बाहेर आल्यानंतर अर्धं जग केलरचा माग काढतंय. अ‍ॅनाच्या नेटवर्कमधले दोन फायनान्शियल फॉरेन्सिक तज्ञ, लंडनमधला एक डेटा अ‍ॅनालिस्ट आणि सिंगापूरमधला एक सायबर रिसर्चर गेल्या तीन दिवसांपासून माझ्याबरोबर काम करतायत."

तो पुन्हा स्क्रीनकडे पाहू लागला.

"त्याला पैसे वापरावेच लागतील. कितीही लपण्याचा प्रयत्न केला, तरी जगण्यासाठी पैसा लागतो. आणि जेव्हा पैसा हलतो, तेव्हा त्याचा माग काढता येतो."

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केलरची अवस्था सापळ्यात अडकलेल्या उंदरासारखी झाली राव ! शेवट काय होतो ते बघणे रोचक ठरेल.