संवाद : BMM २०२६: उत्तररंग सह-अध्यक्षा (co-chair) - श्रीमती उषा आडगावकर

Submitted by सुखदा देवधर on 17 July, 2026 - 13:30

नमस्कार मंडळी!

बीएमएम २०२६ (BMM 2026 - बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०२६) मधे ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण 'उत्तररंग' आयोजित केला आहे. त्यामध्ये उत्तम चर्चासत्र, व्याख्याने आहेतच. पण मला उत्सुकता आहे ती त्यातल्या अंताक्षरीची. या अंताक्षरीचा सगळा बेत आखलाय आपल्या उषा काकूंनी.

उषा काकू म्हणजे श्री. उषा आडगावकर या पुणे आणि मुंबईमधल्या कॉलेजमध्ये संख्याशास्त्र (Statistics) विषयाच्या प्राध्यापिका होत्या आणि विभागप्रमुख (HOD) म्हणून निवृत्त झाल्या आहेत. शिक्षण क्षेत्रात ३५ वर्ष कार्यरत होत्या. गेले काही वर्ष त्यांचा सिअॅटल महाराष्ट्र मंडळात (एसएमएम - SMM) सहभाग आहेच. त्याचबरोबर, यंदाच्या बीएमएम मधे सुध्दा त्या सक्रिय आहेत.

त्यांची मुलाखत मी घ्यायची आहे, असं ठरल्यावर खरं तर मला दडपणच आलं होतं. मला माझ्या कॉलेजमधल्या प्रेमळ आणि कडक शिस्तीच्या अश्या दोन्ही प्रकारच्या प्राध्यापिका आठवल्या. पण त्यांना भेटल्यावर जाणवलं की, उषा काकू शिस्तीच्या पण सर्वांच्या आवडत्या शिक्षिका असणार नक्कीच.
त्यांच्याबरोबर झालेल्या गप्पा संक्षिप्त स्वरूपात तुमच्यासमोर सादर करतीये.

काकू, पहिली आपण सुरुवात करूयात आपल्या एसएमएम नी. तुमचा एसएमएम बरोबरचा प्रवास कसा सुरू झाला?

मी माझ्या मुलाबरोबर अमेरिकेत आले. त्यालाही आता १८ वर्ष झाली. माझा स्वभाव असा आहे की, आपण जिथे राहतो, जिथे आपली मुलंबाळं, ते आपलं गाव. मग इथे आल्यावर लायब्ररी शोधून काढली. मुलगा सून महाराष्ट्र मंडळात कार्यरत नव्हते. मी इथे ड्रायव्हिंग करत नसल्यामुळे, मुलं मला मंडळाच्या कार्यक्रमांना वगैरे घेऊन जायचे. मी आपली नाटक, कार्यक्रम यांना जात राहिले. मग कळालं, की हे मराठी शाळा सुरू करतायत. मला शिकवायची अत्यंत आवड. माझा ३५ वर्ष याच क्षेत्रातला अनुभव आहे. त्यामुळे मी मंडळाला संपर्क केला. तेव्हा in-person असायची शाळा. पण तेव्हा काही मला जमलं नाही.

मग पुढे कळालं की ऑनलाइन शाळा सुरू करतायत. मग मी म्हणले, फारच छान, हे जमेल आपल्याला. माझी हौस होती मराठी भाषेसाठी काम करण्याची आणि इथे माझ्या अनुभवाचा उपयोग होणार होता. तिथून सिएटल महाराष्ट्र मंडळात माझ्या कामाला सुरुवात झाली. मी तिसरीला शिकवायला सुरुवात केली.
नाटिका लिहिणे, ती मुलांकडून बसवून घेणे, बक्षिसे देणे, अश्या अनेक गोष्टीत मला मनापासून सहभागी होता आले.
३ वर्ष झाली शाळेत. यंदा सिएटलला बीएमएम चा मान मिळाला आहे. त्याच्या सुध्दा मीटिंग वगैरे असतात. मग मला लागेल तसं माझा मुलगा, सून मला आणायला-पोचवायला येतात. म्हणून सध्या एसएमएम मधून थोडी विश्रांती घेतली आहे.

आणि मग बीएमएम मधल्या कामाला कशी सुरुवात झाली?

१९ वर्षापूर्वी सिएटलमधे २००७ मधे बीएमएम झालं होतं. तेव्हा आम्ही भारतातून नुकतेच आलो होती. आम्ही इथे नवीन होतो. तेव्हा गेलो होतो. खूप आवडलं होतं. तसंच एकदा न्यूजर्सीच्या बीएमएम ला पण गेलो होतो. ते पण छान होतं.
दोन वर्षापूर्वी बे-एरिया मधे बीएमएम झालं होतं. तेव्हा तिथे नातेवाईकांकडे गेलो होतो. त्यामुळे तेव्हाही आमचं बीएमएम ला जाणं झालं. तिथे समजलं की पुढच्या बीएमएम चं यजमानपद, अध्यक्षपद आपल्या सिएटल महाराष्ट्र मंडळाकडे येणार आहे.
एसएमएम मधली मंडळी म्हणाली, तुम्ही उत्तररंगच्या कार्यक्रमासाठी को-चेअर व्हा. मी म्हणाले, खूप काम असणार. होणार आहे का मला? “न धरी शस्त्र करी मी, पण गोष्टी सांगीन युक्तीच्या चार.” तर सगळे म्हणाले, आम्ही सगळी मदत करू. तुम्ही फक्त हो म्हणा. उत्तररंगचा पसारा बराच आहे. त्याबद्दल माहीत होतंच. तिथून बीएमएम मधल्या प्रवासाला सुरुवात झाली.

बीएमएम मधे ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणते कार्यक्रम ठेवावेत, हे कसं ठरवलं ?

उत्तररंग चा पसारा खूप मोठा आहे. त्यात अमेरिका, कॅनडा सगळीकडची महाराष्ट्र मंडळे सहभागी होत असतात.
आम्ही एक सॅम्पल सर्व्हे घेतला. उत्तररंग च्या सभासदांना प्रश्न पाठवले. त्यातून बघितलं की, लोकांना नक्की काय आवडेल. मग आम्हाला कळालं की, लोकांना travel tourism, medical, entertainment यात रस आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी बीएमएम मधे आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये कोणती वैशिष्ट्ये पहायला मिळतील?

ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण 'उत्तररंग' आयोजित केला आहे. यामध्ये डॉक्टर संजय उपाध्ये यांचं व्याख्यान असेल. त्यानंतर मेंटल हेल्थवर (Mental Health), तसेच सीनियर मंडळींसाठी ट्रॅव्हल अँड टुरिझमवर (Travel & Tourism) विशेष चर्चासत्रं (Panel Discussions) होणार आहेत. सक्षम मेंदू (brain health) आणि सुदृढ वृद्धत्व (graceful and healthy aging) कसं असाव, भारतात रहावं की अमेरिकेत अश्या गोष्टींवर चर्चा होतीलच. त्या महत्वाच्या आहेतच. पण माझं मत होतं की, सगळ्यांनी हसत-खेळत कार्यक्रमाची मजा घ्यावी आणि आनंदानी घरी जावं. म्हणून मराठी गाण्याच्या भेंड्यांचा बेत आखलेला आहे. जेवणानंतर सर्वांसाठी थोडी मजा.

नक्कीच, सर्व ज्येष्ठ मंडळींसाठी सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे 'अंताक्षरी'! सगळ्यांनाच या अंताक्षरीमध्ये खूप धमाल करता येईल.
या भेंड्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे?

तू म्हणलीस तसं, अंताक्षरीत सगळ्यांनी धमाल करावी, हा मुख्य हेतू असल्यामुळे काहीही किचकट नियम नाहीत, पण मजेशीर आहेत. जसं की, जर गाण्यावरोबर अभिनयसुद्धा केला तर, जास्तीचे गुण मिळतील.
जे कोण छान गातील, उस्फूर्तपणे सादर करतील त्यांना किंग किंवा क्वीन ऑफ एमराल्ड (King/Queen of Emerald) म्हणून कौतुक करणार आहोत. वीणा ट्रॅव्हल्सच्या इथल्या कार्यकर्त्या कविता नंदी आहेत आपल्याकडे, त्यांनी बक्षिसे ठेवलेली आहेत.
आपण शुद्ध अंताक्षरी खेळणार आहोत, अक्षरांची आणि शब्दांची. सामान्यज्ञानाची स्पर्धा नाही. पण बझर राऊंड आहे. मराठीबरोबर आपण संस्कृत पण ग्राह्य धरणार आहोत. कारण, “क” अक्षर आलं तर, “कराग्रे वसते लक्ष्मी” किंवा “ग” आलं तर, “गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू” असे श्लोक पण म्हणलेले चालतील. बालगीत, पोवाडा, भावगीत, अंगाईगीत, लावणी, कविता, भारूड, प्रार्थना अगदी कोणताही प्रकार चालेल.

अंताक्षरीसाठी नावनोंदणी अजूनही करता येईल का? आणि कधी पर्यंत करता येईल?

हो हो, नक्कीच.
अगदी आयत्यावेळी तुम्हाला वाटलं, भाग घ्यायचा आहे, तरीही घेता येईल.

बीएमएम मधे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाव्यतिरिक्त तुम्ही कोणत्या कार्यक्रमांची आतुरतेने वाट बघताय?

सगळेच छान आहेत खरं तर. एकांकिका स्पर्धेची नाटकं आहेत, गाण्याचे आणि नृत्याचे कार्यक्रम आहेत, आपले ढोलताशा आहेत, आर्ट गॅलरी आहे. पण आता व्हॉलेंटियरिंग करून बघू काय काय बघायला वेळ मिळतोय ते. कार्यकर्ते जास्त आले मदतीला, तर आपल्याला सगळ्यांना काही कार्यक्रम बघणं शक्य होईल.

तुमचं एसएमएम चं काम चालूच होतं. आणि आता bmm मधे पण सक्रिय आहात. एवढ्या उत्साहाचं रहस्य/गमक काय?

गमक कसल अगं… तुम्ही लोक. तुम्ही सगळी तरुण मंडळी. शिक्षक असल्यामुळे तरुण पिढीशी नेहमी संबंध आल्यामुळे.
परमेश्वराची कृपा ही एक नंबरवर आहे नक्कीच.
माझा मुलगा, सून, नातवंडं भक्कम उभी आहेत माझ्याबरोबर. माझी प्रेमानी सगळी काळजी घेतात. हवं नको ते बघतात. माझं मन सांभाळतात. चिंता नाही मला काही. उत्साह का असणार नाही मग!

बरेच पालक अमेरिकेत कायमचे वास्तव्याला नसतात. काही महिने भारतातल्या घरी आणि काही महिने अमेरिकेतल्या घरी असे येऊन जाऊन असतात. पण त्यांनासुद्धा इथल्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग देता येतो का?

हो नक्कीच भाग घेता येतो. असे आपल्याकडे खूप पालक आहेत. आपण त्यांना गेस्ट आर्टिस्ट्स म्हणू.
ते इथे येऊन-जाऊन असले, तरीही सगळे आता या व्हॉट्सअॅप च्या जमान्यात संपर्कात असतात.

तुम्ही एसएमएम आणि बीएमएम च्या निमित्तानी वय वर्ष ५ ते ९० या सगळ्या वयोगातल्या लोकांबरोबर काम करताय. तुमचा अनुभव कसा आहे? आणि पुढच्या पिढीला मोलाचा सल्ला काय द्याल?

अनुभव म्हणशील तर खूप छान आहे. लहान मूले तर छानच असतात. मोठ्यांमधे मतभेद झाले तरी सगळ्यांना आनंदानी काम करून कोणताही कार्यक्रम यशस्वी करायचा असतो. त्यामुळे मार्ग निघतातच.
पुढच्या पिढीला खूप संधी आहेत. खूप हुशार आहेत सगळे. त्याचा ते छान उपयोग पण करून घेतात. नवीन पिढीला सल्ले देण्यापेक्षा, त्यांच्याकडून पण शिकण्यासारखं खूप आहे. तरीही, उपदेश करायचाच झाला तर - पालकांनी मुलांवर छान संस्कार करा. आपल्या संस्कृतीचा, भाषेचा, घराचा, आई-वडिलांचा, नातेवाईकांचा अभिमान ठेवा. मोठ्यांबद्दल आदर ठेवा. आणि आपल्या सगळ्यांवर देवाचे आशीर्वाद आहेतच!

मुलाखतकार आणि शब्दांकन - सौ. प्राजक्ता फडके.

वेबसाईट: https://bmmseattle2026.org/
इंस्टाग्रामः https://www.instagram.com/bmm2026seattle/
फेसबूक: https://www.facebook.com/bmm2026seattle

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>उषा काकू म्हणजे श्री. उषा आडगावकर या पुणे आणि मुंबईमधल्या कॉलेजमध्ये संख्याशास्त्र (Statistics) विषयाच्या प्राध्यापिका होत्या आणि विभागप्रमुख (HOD) म्हणून निवृत्त झाल्या आहेत. शिक्षण क्षेत्रात ३५ वर्ष कार्यरत होत्या.
खूप छान. कर्तुत्ववान सह-अध्यक्षा लाभलेल्या आहेत.
फोटोही प्रसन्न आहे.