ज्योतिषांनी सुचवलेल्या उपायांचा उपयोग होतो का?

Submitted by केअशु on 24 June, 2026 - 07:58

जातकांच्या समस्येवर काही ज्योतिषी उपाय सुचवतात. जसे की शांती , काही होमहवन , विशिष्ट रंगाचे कपडे घाला किंवा विशिष्ट रत्न वापरा , पूजा घाला तमुक तीर्थक्षेत्री जाऊन या. या उपायांना खरंच काही अर्थ आहे का? हे असे उपाय केल्याने खरोखरच समस्या दूर होते का? होत असेल तर मग हे उपाय कसे काम करतात? म्हणजे समजा एखाद्या समस्येवर काही होम करायला सांगितला तो होम केला तर त्या यज्ञातून जो काही धूर बाहेर पडतो किंवा जे काही वायू बाहेर पडतात ते बाहेर पडलेले वायू ज्या ग्रहामुळे जातकाला ती समस्या निर्माण झालेली आहे किंवा ज्या नक्षत्रामुळे जातकाला ती समस्या निर्माण झालेली आहे त्या ग्रह किंवा नक्षत्रापर्यंत ते पोहोचून काही रासायनिक अभिक्रिया वगैरे होते का ?आणि त्या विशिष्ट जातकापुरता तो दुषप्रभाव तो ग्रह किंवा ते नक्षत्र तो दुष्प्रभाव थांबवतो असं काही होतं का? नक्की काय होतं? किंवा एखादं रत्न घातलं तर त्या जातकाची समस्या कशी काय दूर होते किंवा सौम्य होते? किंवा काही विशिष्ट रंगाचे कपडे घातल्यानंतर त्या विशिष्ट ग्रहाचा प्रभाव कसा वाढतो?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

त्यांच्याच शास्त्रानुसार ग्रहमानाप्रमाणे काही गोष्टी घडणार किंवा नाही घडणार हे नक्की तर उतारे आणि तोडगे कसे काय प्रभावी ठरणार?
ज्या गोष्टी विलंबाने घडणार आहेत तिथे उपाय करत राहिल्याने ती गोष्ट घडली असा जातकाचा ( कुंडली दाखवून ज्योतिष विचारणारा) विश्वास बसू शकतो की यामुळेच झालं.
काही महाराजांच्या बाबतीत लोकांचा विश्वास असतो की हे सांगतात उपाय अंतरज्ञानाने.

ज्योतिष हे बचकभर मिठासोबत घ्यावे, ज्योतिष सल्ले दोन तीन प्रकारचे असतात

१. नामस्मरण करा, अमुक तत्वाची देवतेची साधना वाढवा (शनिवारी तेल घाला हनुमंताला किंवा सोमवारी महादेवाला बेल वाहून या इत्यादी)

२. अमुक रंगाचे कपडे घाला, अमुक वारी अमुक दिशेने तोंड करून तमुक मंत्र म्हणा इत्यादी

३. कुत्र्याला चपाती घाला, कोंबडीला कढईत घाला इत्यादी इत्यादी.

तिन्ही मध्ये समान धागा आहे मानसिक समाधान ! फायदे/ तोटे/ फरक इत्यादी दिसतील न दिसतील (सहसा असे काही नसतात फायदे हे माझे वैयक्तिक मत) पण एकंदरीत हे आपले मानसिक समाधान आणि एक सुरक्षिततेची भावना शोधण्याचे धंदे आहेत, चालवणारा आपल्या टॅलेंट वर चालवतो.

ज्योतिषी त्याचे पोट भरत असला तर भरू दे बापडा मला हरकत नाही पण सल्ले घेऊन फायदे इत्यादी होत नसतात फक्त मानसिक समाधान मिळत असते.

बाकी काही नाही तर मानसिक आधार

बाकी काही नाही तर मानसिक आधार मिळत असावा.

अमुक एखादे रिच्यूअल करताना तेवढा वेळ तरी भरकटणाऱ्या मनाला शिस्त लागत असेल, कॉन्सन्ट्रेशन होत असेल. जेव्हा काहीच उपाय उरला नाही तरीही एखाद्या गोष्टीसाठी मी काहीतरी प्रयत्न करतोय हे समाधान मिळत असेल. अदृश्य ताण कमी होत असेल. अगदीच काही नाही तर काही वेळ स्वतःसाठी वेगळा काढता येत असेल. आपल्याला जाणवत नाही पण काही घरांत माणसांना स्वतःचा असा वेळ काढणे कठीण असते. त्यानिमित्ताने एखाद्या देवळात, मठात गेले तर समविचारी/समदुःखी माणसांची गाठभेट होत असेल.

सगळीकडून हरलेल्या माणसाच्या मनाला उभारी मिळाली तर तोच समस्येचे उत्तर शोधू शकतो.

ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणार्‍या एका कलिगला मी हा प्रश्न विचारला होता. अमुक एक होणारच असेल तर उपाय करुन उपयोग कसा काय होणार? तो म्हणाला की तुमच्या नशिबात तलवारीवर पाय पडुन जखम व्हायचे/दुखायचे लिहिले असेल आणि तुम्ही ते होऊ नये म्हणुन उपाय केले तर तुमचा पाय सुरीवर पडेल किंवा टाचणीवर पडुन ती पायाला टोचेल. पायाला जखम व्हायची ती होणारच पण त्याची तीव्रता उपाय करुन कमी करता येते.

बघा बुवा पटते का… अचुक ज्योतिष सांगतील असे अभ्यासु ज्योतिषी आता अस्तित्वात असावेत असे मला वाटत नाही. जे आहेत ते पैश्याच्या लोभाने उपाय सांगतात हेमावैम.

फार पूर्वी मी एक मराठी नाटक पाहिले होते. मला आता त्याचे नाव आठवत नाही. कथा अशी. एक होरारात्न. त्यांनी सांगितलेले भविष्य कशीही चुकत नाही. अशी त्यांची ख्याती असते.
होरारत्नाच्या मुलाला त्याच्या प्रेयसी शी लग्न करायचे असते. वडिलांच्या भविष्या प्रमाणे मुलाची पहिली पत्नी लग्न झाल्यावर सहा महिन्यात मृत्युमुखी पडणार असे असते. मुलगा आणि त्याची प्रेयसी त्यातून मार्ग काढतात. ते एका गरीब भोळ्या मुलीशी मुलाचे लग्न लावून देतात.
पुढे काय होते ते मी सांगायला पाहिजे का?

@साधना
तो म्हणाला की तुमच्या नशिबात तलवारीवर पाय पडुन जखम व्हायचे/दुखायचे लिहिले असेल आणि तुम्ही ते होऊ नये म्हणुन उपाय केले तर तुमचा पाय सुरीवर पडेल किंवा टाचणीवर पडुन ती पायाला टोचेल. पायाला जखम व्हायची ती होणारच पण त्याची तीव्रता उपाय करुन कमी करता येते.

हे सगळं कसं घडतं हे त्यांना विचारा. प्रक्रिया कशी घडते? मग मान्य करता येईल. शिवाय जे काही उपाय आहेत ते हजारो लोकांवर किंवा लाखो लोकांवर वापरून पाहून मग त्यातून काहीतरी मतितार्थ काढता येईल.

एक वेगळा विचार मांडतो. समजा जर तुमचा लॉ ऑफ अट्रॅक्शन वर विश्वास असेल तर तुम्ही मंत्र/तंत्र किंवा धार्मिक उपाय यावरही विश्वास ठेवायला हवा.
याचं कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी खूप आसुसलेले असता. ती गोष्ट होणारच या सकारात्मक विचारांनी भारलेले असता. मग ज्योतिषांनी सांगितलेले धार्मिक उपाय जे आहेत ते तरी काय वेगळे आहेत? सेमच प्रक्रिया आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनवाले म्हणतात की हे सगळे जग फ्रिक्वेन्सीनी भरलेलं आहे. तुम्हाला जी वस्तू हवी आहे किंवा ज्या व्यक्तीला भेटायचं आहे ती भेटण्यासाठी आवश्यक अशी फ्रिक्वेन्सी तुम्ही आधी मनात पकडून ठेवता. आणि वेळ काळ आल्यानंतर ती फ्रिक्वेन्सी , ती व्यक्ती किंवा ती वस्तू तुमच्या जवळपास आल्यानंतर मॅच होते आणि तुम्हाला ती वस्तू मिळते किंवा ती व्यक्ती भेटते.
मग धार्मिक उपाय सर्वांनाच का बर लाभत नसावेत? काही जणांनाच का लाभत असावेत हा प्रश्न सुद्धा काही जणांच्या मनात उभा राहील. तर याचं कारण कदाचित असं असावं की ज्यांना हे उपाय लाभत नाहीत त्यांच्या बाबतीत हे मंत्र , तंत्र किंवा धार्मिक उपाय , साधना यांची पॉवर थोडीशी कमी पडत असावी. तर याउलट लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये ती कमालीची जास्त असावी. असे मला वैयक्तिक वाटते. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनवाल्यांचा पहिला नियम आहे की एखादी गोष्ट घडणारच यावर तुमचा शंभर टक्के विश्वास असायलाच हवा. म्हणजे अगदी लहान मुलं जसे परी असते , तिला पंख असतात यावर विश्वास ठेवतात तशाच प्रकारे उपायांचा परिणाम घडण्यासाठी तितका विश्वास असायला हवा.
इथे आपण धार्मिक पूजा किंवा अध्याय वाचन किंवा होमहवन जे काही सांगितलं असेल ते गुरुजींनी सांगितलं म्हणून करून बघूया या प्रकारचा विचार असेल तर हा १००% विश्वास नव्हेच. कदाचित त्यामुळे काही जणांना उपाय लाभत नसावेत असं तर नसेल?

तुम्हाला काय वाटतं याबद्दल?

तुमचा लॉ ऑफ अट्रॅक्शन वर विश्वास असेल तर >> याबाबत काही माहिती नाही. तुम्ही सांगताय तसे असेल तर अजिबात विश्वास नाही.

Law of attraction वर कुणीतरी विश्वास ठेवतंय म्हणून ज्योतिष पण रिलेवंट कस होतं?

एखाद्याला मासे आवडतात तर त्याला पोर्क आवडलेच पाहिजे का?

Law of attraction म्हणजे कुठला Law म्हणायचा? त्याचा आणि ज्योतिषाचा काय सबंध हे काही समजले नाही.

म्हणजे ते द सिक्रेट पुस्तकात आहे ते ना? माझा त्यावर विश्वास नाही, पण प्लासिबो इफेक्ट हा अनेक ठिकाणी काम करतो व त्यामुळे हा लॉ ऑफ अ‍ॅट्ट्रॅक्शन किंवा ज्योतिष, मंत्र तंत्र इत्यादी सगळ्यातच काही ना काही फायदा अप्रत्यक्षपणे होऊन जणू चमत्कार झाला असं वाटू शकेल. प्लासिबो इफेक्ट्लाही मर्यादा आहेत. ते असो. पण अमुक प्रकारच्या वैद्यकीय उपचारावर विश्वास हाच मुळात प्लासिबोला जन्म देण्यास कारणीभूत होत असल्याने मी उगीच लोकांच्या श्रद्धा दुखवायला जात नाही. न जाणो त्यांना प्लासिबोचा फायदा होतोय तो उगीच कमी व्हायचा.

आयुष्यात किती वेळा प्लासिबो इफेक्ट चा फायदा होत असेल.? जेव्हा ह्याचा उलट परिणाम दिसत असेल तेव्हा मनाचे सांत्वन कसे करायचे. जर प्लासिबो इफेक्ट होत असेल तर खऱ्या औषधा ऐवजी प्लासिबोच घ्यावा कि. ठीक आहे. पण जेव्हा सुशिक्षित उच्ग्च्गपदस्थ व्यक्ती ज्योतिषाच्या भरवशावर विसंबून रहातात तेव्हा काय करायचे?

प्लासीबो सारखा नोसिबो इफेक्ट पण आहे.
अमुक औषधाचे अमुक तोटे किंवा अमुक साईड इफेक्ट्स सांगितले तर ते औषध नसलेल्या शुगर पिल्स देऊनही काहींना जाणवतात.
बहुतेक पॉवर ऑफ सजेशनला सेन्सिटिव्ह लोकांना होत असेल.

Law of attraction ने प्लासीबो इफेक्ट युनिव्हर्सल करून टाकला, सजीव, निर्जीव आणि आंतर-सजीव आंतर-सजीव-निर्जीव कशालाही लागु.

प्लासीबो इफेक्ट सुद्धा स्वतःहुन ठरवून करू शकतो म्हणुन जो डिस्पेन्झा नामक किरो प्रॅक्टिशनर ने 'यू आर द प्लासीबो' नावाचे पुस्तक लिहिले. पण त्यात पुढे त्याने आपण समोर बघत असु (आरसा, कॅमेरा ट्रिक नाही) तरी मागचे पाहू शकतो, त्याच्या कुठल्या एका कलीगला हा मागुन हात करतो ती पण पाठमोरीच असताना लगेच हात हलवते वगैरे दावे केले.

हे सगळं कसं घडतं हे त्यांना विचारा. प्रक्रिया कशी घडते? मग मान्य करता येईल. शिवाय जे काही उपाय आहेत ते हजारो लोकांवर किंवा लाखो लोकांवर वापरून पाहून मग त्यातून काहीतरी मतितार्थ काढता येईल.>>>>>

मला सांगणार्‍या कलिगने कंपनी सोडुन दहा वर्षे तरी झाली असावीत, मीही आता रिटायर झालेय. त्यामुळे पुढे काहीही माहिती काढु शकणार नाही. तुमचा प्रश्न पाहुन आठवले ते लिहिले. तुम्ही विश्वास ठेवा किंवा मान्य करा हा आग्रह नाही किंवा ईच्छाही नाही. म्हणुन तर ‘पाहा बुवा पटते का‘ असे लिहिले.

उपाय तर तुम्ही स्वतःच मुळ धाग्यात लिहिले आहेत. तुम्हाला ज्यांनी सांगितले त्यांनाच विचारा आणि रिसर्च सुरु करा. माझ्याकडुन शुभेच्छा!! निष्कर्ष इथे लिहयला विसरु नका.