Submitted by 'स्वच्छंदी on 22 June, 2026 - 11:43
रस्त्यावरती भिरभरणारा पाचोळा समजून मला
किती खुबीने दिलेस तू ही वाऱ्यावर सोडून मला
नकार देउन निघून गेली दूर नभाच्या पलीकडे
द्यायचाच धोका होता तर द्यायचास जवळून मला
पसंत नव्हते मला स्वतःचे अत्तरण्यासाठी सुकणे
म्हणुन बहर ओसरण्याआधी मीच दिले उधळून मला
प्रेमामधली कटू आठवण चितारलेला कागद मी
फाडा,फेका,जाळा अथवा टाका चुरगाळून मला
मरून जातिल माझ्यासोबत राहिलीच जर ....जीवनभर
अमर करा माझ्या स्वप्नांना कुणीतरी मारुन मला
जन्म थांबला एका जागी ह्याच विचारामध्ये की
जायचेच केवळ आहे हा रस्ता ओलांडून मला
प्रमेय, समीकरणांची गणिते...गृहीतके समजू आली
कळला नाही केवळ 'माणुस' पुस्तकात वाचून मला
: महेश मोरे (स्वच्छंदी), सातारा
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
उत्कृष्ट गझल, एका whats app
उत्कृष्ट गझल, एका whats app समूहावर वाचून प्रतिसाद दिला आहेच. कल्पक खयाल, वेगवान ओघवती शब्दरचना!
(काही टायपो असावेत बहुधा, एकदा बघून घ्या)
मनःपूर्वक धन्यवाद... बेफिकीर
मनःपूर्वक धन्यवाद... बेफिकीर जी
टायपो क्लिअर केलेत..
सूचनांचं स्वागत असेल नेहमीच...