A Different Man - Netflix - 2024

Posted
3 आठवडे ago
शेवटचा प्रतिसाद
3 आठवडे ago

चित्रपट वरकरणी एका माणसाच्या चेहऱ्यावरील विकृती आणि त्यावरच्या उपचारांबद्दल वाटतो, पण प्रत्यक्षात तो ओळख (identity), सामाजिक मान्यता, मत्सर यावर आडून आडून जोरदार आवाजात भाष्य करतो.
एडवर्ड (सेबॅस्टियन स्टॅन) हा न्यूरोफायब्रोमॅटोसिसमुळे चेहऱ्यावरील विकृती घेऊन जगत असतो. तो प्रचंड एकटा, लाजाळू आणि आत्मविश्वास शून्य माणूस असतो. त्याची शेजारीण "इनग्रिड" जी नाटके किंवा छोटी नाटके लिहीत असते ती त्याच्या आयुष्यात येते . ती त्याच्याशी नैसर्गिकपणेच चांगली वागत असते पण एडवर्ड ला वाटते कि आपल्या विकृती मुळे सहानुभूती पायी ती आपल्याशी चांगली वागते आहे, आणि आपला असा वेडावाकडा आणि विद्रुप चेहरा हेच आपल्या दु:खाचे मुख्य कारण आहे.

दरम्यान नवीन उपचार पद्धतीच्या प्रयोगाचा उपयोग एड्वर्डला होतॊ आणि त्याचा चेहरा पूर्णपणे बदलून जातो. तो स्वतःचा मृत्यू झाल्याचे भासवून नवीन चेहऱ्यासह नवीन नाव (Guy) घेऊन जगू लागतो. आता आपला चेहरा बदलला आहे , आपल्या सुखातला मोठा अडसर आता दूर झाला आहे, आता आपण आनंदी आयुष्य जगू अशी खातरी एडवर्ड ला असते. आणि त्याची सगळ्यात मोठी आशा म्हणजे माझा चेहरा बदलल्यावर इन्ग्रिड माझ्यावर प्रेम करेल. कारण ती त्याच्या आयुष्यात आलेली आणि त्याच्याशी चांगलं वागलेली एकमेव स्त्री आहे.

कालांतराने त्याला समजते कि इन्ग्रिड ने त्याच्या गत आयुष्यावर/ विकृतीवर आधारित एक नाटक लिहिले आहे. गंमत म्हणजे एडवर्ड स्वत:च ती भूमिका नवा चेहरा घेऊन साकारत असतो. म्हणजे ज्या चेहऱ्यापासून त्याने सुटका करून घेतली तोच चेहरा घेऊन तो पुन्हा जगू पहात असतो. याचाच अर्थ तो स्वतः पासून पळून जाऊन सुद्धा पुन्हा स्वतःपर्यंतच येऊन पोहोचतो.

एकदा नाटकाची रिहर्सल सुरु असताना ऑस्वाल्ड नावाचा एक आगंतुक येतो. ज्याला एडवर्ड सारखीच विकृती (face deformation) आहे. पण तो अत्यंत आनंदी, आत्मविश्वासपूर्ण, लोकप्रिय आणि लोकांमध्ये मिसळणारा असतो. इंग्रिडसह सगळे लोक त्याच्याकडे आकर्षित होतात.

एडवर्डला आयुष्यभर वाटत असते की त्याचे दु:ख फक्त चेहऱ्यामुळे आहे. पण ऑस्वाल्ड आपल्या सहज वागणुकीतून दाखवून देतो कि समस्या केवळ चेहऱ्यामुळे नव्हती; एडवर्डच्या आतल्या असुरक्षिततेची, स्वतःला कमी लेखण्याची आणि इतरांकडून स्वीकार मिळवण्याच्या धडपडीची होती.

मग एडवर्ड ऑस्वाल्डचा मत्सर करू लागतो. त्याला वाटते की "हा माणूस माझे आयुष्य जगत आहे." हळूहळू तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होत जातो. शेवटी तो ऑस्वाल्डला दूर करण्याचा प्रयत्न करतो, पण त्यामुळे त्याचेच आयुष्य आणखी विस्कळीत होते.

चित्रपटाच्या शेवटी एडवर्ड पुन्हा एकटा दिसतो. त्याचा चेहरा बदलला आहे, पण आतून तो फारसा बदललेला नाही. आपल्याला अचानक खोलीतल्या दिव्याचे बटण लावून खोली उजळून निघावी तसा साक्षात्कार होतो कि बाहेरचे रूप कितीही बदलले तरीही माणूस आतून बदलत नाही. स्वतःबद्दलची भावना, आत्मविश्वास आणि स्वतःचा स्वीकार यांचा प्रश्न अधिक खोल आणि महत्वाचा आहे.

त्यामुळेच सिनेमाचे नाव थोडे उपरोधिक आहे "अ डिफ्रण्ट मॅन' कारण एडवर्ड ला वाटते कि आता तो वेगळा माणूस झाला आहे, पण प्रत्यक्षात फक्त त्याचा चेहरा बदलला आहे, आतून मात्र तो पूर्वीसारखाच उदास, लाजाळू आणि आत्मविश्वाशून्य माणूस आहे . या उलट ऑस्वाल्ड, ज्याचा चेहरा बदललेला नाही, तो मात्र आतून खऱ्या अर्थाने अधिक मुक्त, आनंदी आणि समाधानी माणूस आहे.

ऑस्वाल्ड आणि एडवर्ड दोघेही एकाच नाण्याच्या दोन विरुद्ध बाजू आहेत. दोघांनाही चेहऱ्यावर सारखीच विकृती आहे. पण एडवर्डला ती त्याच्या आयुष्याची शोकांतिका वाटते, तर ऑस्वाल्ड ती स्वीकारून आनंदाने जगतो.
एडवर्डच्या सुंदर चेहऱ्याकडे तात्पुरती आकर्षित झालेली इन्ग्रिड नंतर ऑस्वाल्डकडे अधिक आकर्षित होते. कारण ऑस्वाल्डमध्ये एक सहजता आणि आत्मविश्वास आहे. एडवर्डला वाटते की सुंदर चेहरा मिळाला की प्रेम आणि यश आपोआप मिळेल. पण इन्ग्रिड ऑस्वाल्ड कडे झुकलेली बघून 'चेहरा सुंदर असेल तर स्त्री आपोआप प्रेमात पडते' या एड्वर्डच्या समजुतीला धक्का बसतो .

एडवर्ड चेहरा बदलतो, नाव बदलतो पण आपला न्यूनगंड मात्र बदलत नाही.

गाभ्याच्या दोन ओळी म्हणजे जेव्हा ऑस्वाल्ड त्याच्या जुन्या ओळखीशी संबंधित जागा व्यापू लागतो, तेव्हा एडवर्डला असे वाटू लागते की हा माणूस त्याच्याकडून त्याचे "खरे आयुष्य" हिसकावून घेत आहे. त्याचा मत्सर आणि राग वाढत जातो.

म्हणूनच हा चित्रपट विकृती किंवा प्लास्टिक सर्जरीबद्दल नसून, स्वतःच्या प्रतिमेबद्दल (self-image), मत्सर आणि आत्मस्वीकाराबद्दल आहे. चित्रपटाचा शेवट सांगतो कि काहीही झालं तरी तुम्ही स्वत:पासून पळून जाऊ शकत नाही .
************************************************************************************************************

A Different Man.jpg

विषय: 
प्रकार: 

छान लेख. छान विचार.
पोस्टरमध्ये दाखवले आहे तेवढा वाईट दाखवला आहे का चेहरा?
कारण खूपच कुरूप असेल तर तो न्यूनगंड दूर ठेवणे तितके सोपे नाही. आपल्याकडे नजर जाता समोरच्याच्या चेहऱ्यावरील बदललेले भाव टिपत रोजचे आयुष्य जगणे काय स्ट्रगल असेल हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.

पण अश्या टोकाच्या केस सोडल्या तर हा विचार पटला. कारण आपल्यातील छोट्या मोठ्या व्यंगाचे किंवा कमतरतेचे सुद्धा न्यूनगंड वाटून घेणारे बरेच जण असतात. जे पॉझिटिव्ह विचार करून त्यातून सहज बाहेर येऊ शकतात.

हो ऋन्मेष , पोस्टर मध्ये आहे तितका विकृत चेहरा दाखवला आहे . शिवाय या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे ऑस्वाल्ड ची भूमिका केलेला कलाकार Adam Pearson त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यात तसाच आहे. इतकंच नव्हे तर तो एक जागतिक दर्जाचा TV show host आहे..

बाकी तू म्हणतोस ते खरं आहे . न्यूनगंडावर मात करणं अजिबात सोपं नाही त्यासाठी खूप आत्मबल लागते .

फार मस्त परिचय.
.
स्वतःला स्वीकारणे हे फार ममहत्वाचेआहे. आपल्यातही उणीवा, तृटी असतात आणि लहानपणी आपली जी स्वतःबद्दलची इमेज असते ती कधीकधी मोठेपणी पार बदलून जा ते किंवा डिस्टॉर्ट होते आणि तरीही स्वतःला वार्‍यावर सोडून द्यायचे नसते (Never abandaon yourself).