एक साहित्यिक मराठी कोडे!

Submitted by चीकू on 11 June, 2026 - 09:53

मोरोपंतांनी त्यांच्या कर्णपर्व काव्यात भीम आणि दु:शासन यांच्या द्वंद्वयुद्धाच्या प्रसंगी वर्णन करताना खालील आर्या लिहिली आहे.

धावति अन्योन्यावरि ते दोघे आठवूनी अपकार
जाणो ते मदमत्त क्रोधोद्धत दंपतीच अपकार

याचा अर्थ पुढीलप्रमाणे- मदाने मातलेले आणि रागाने उद्धट झालेले हत्ती जसे एकमेकांवर धावून जातात, तसे ते दोघे (भीम आणि दुःशासन) परस्परांनी केलेले अपकार आठवून एकमेकांवर चढाईने धावून जाऊ लागले.

आता प्रश्न असा की वरील अर्थात हत्ती हा शब्द कसा येऊ शकतो ते तुम्हाला सांगता येईल का?

कवितेतील काही शब्दांचे अर्थ:
अन्योन्यावरि = परस्परांवर
मदमत्त = मदाने मस्त
क्रोधोद्धत = रागाने उद्धट वर्तन करू लागलेले
दंपती = जोडपे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसऱ्या ओळीतील अपकार हा शब्द हत्तीसाठी वापरला असावा असे वाटते. अपकार चा एक अर्थ हानी , नुकसान असा आहे. हत्ती नासधूस करतात म्हणून त्यांसाठी तो शब्द वापरला आहे का?

दंपतीच यामधील दंपती हा हत्तीच्या जोडप्यासाठी वापरला जातो. ते दोघे पुरुष होते म्हणून दोन हत्ती असा शब्दप्रयोग आला.

मदमत्त हे विशेषण (फक्त) हत्तीसाठी वापरतात ना?

नीट लक्षात नाही, पण मद हा शब्द हत्तीच्या संदर्भात वापरतात याचं एक कारण आहे. त्याच्या गंडस्थळातून उन्मत्त झाल्यावर रस पाझरतो अशी एक गोष्ट पण होती. बहुतेक त्यामुळंच असेल.
दंपती च्या ऐवजी दंती असतं तर मग हत्ती कन्फर्म झालं असतं. दंतीच्या ऐवजी दंपती शब्द वापरण्याची पद्धत होती का?

उत्तराच्या प्रतिक्षेत.

राअ: दंपती अ पकार म्हणजे प नसलेला दपंती शब्द - दंती
यावरून हत्ती होऊ शकेल.>>>

बरोबर!!
मोरोपंत काहीशा विचित्र शब्दरचना करत असत.
दंपती अपकार म्हणजे 'प' वगळून दंपती, म्हणजे दंती म्हणजे हत्ती Happy