सोशल मीडियावर एक नवीन व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. पूर्वी लोक दुधाचा, भाजीपाला किंवा कपड्यांचा व्यवसाय करायचे. आता काही जण संस्कृती विकतात. विशेषतः स्त्रियांना कसे जगावे कसे वागावे याचे धडे दिले जातात ते हि स्त्रियांकडूनच.
बाईने कमी शिकावे, कमी बोलावे, कमी हसावे, कमी फिरावे, कमी प्रश्न विचारावेत आणि जास्तीत जास्त त्याग करावा. संसार टिकवण्याची जबाबदारी तिची, नाती जपण्याची जबाबदारी तिची, संस्कृती जपण्याची जबाबदारी तिची. पुरुषांनी नेमके काय करायचे याबद्दल मात्र अवाक्षर उच्चारलेले नसते.
या व्हिडिओंमध्ये भारतीय संस्कृती इतकी महान दाखवली जाते की वाटावे आपल्या पूर्वजांनी चंद्रावर नव्हे तर थेट स्वर्गावर वसाहत स्थापन केली होती. पण संस्कृतीचे हे स्वयंघोषित रक्षक इतिहास, समाजशास्त्र किंवा वास्तव यांच्याशी फारसे देणेघेणे ठेवत नाहीत. त्यांना फक्त एक गोष्ट हवी असते व्ह्यूज. काही काळ समविचारी असे व्हिडीओज आणि कन्टेन्ट उचलून धरतात सुद्धा. कारण ते सुद्धा कदाचित सामान विचारसरणीच्या समाजाचा भाग असतात .
विशेष गंमत म्हणजे इतर स्त्रियांच्या कपड्यांवर, वागणुकीवर आणि चारित्र्यावर भाष्य करणारे अनेक क्रिएटर्स स्वतःच्या बाबतीत मात्र "माझे आयुष्य, माझी निवड" हा सिद्धांत वापरतात. आणि तो योग्यच आहे. पण मग इतर महिलांनाही तोच अधिकार असायला हवा ना? पण तो कुठेही सिद्धांत इतर स्त्रियांनी सुद्धा वापरला पाहिजे याची वाच्यता कुठेही नसते.
सोशल मीडियावर वाद निर्माण करणे ही आता कला राहिलेली नाही; ती मार्केटिंग स्ट्रॅटेजी झाली आहे. दोन वाक्ये बोला, लोक चिडतील याची खात्री करा, मग त्यावर प्रतिक्रिया येतील, त्यावर पुन्हा प्रतिक्रिया द्या आणि फॉलोअर्स वाढवा. हा उद्योग इतका यशस्वी झाला आहे की काही जणांना प्रसिद्धी आणि प्रबोधन यातला फरकच विसरायला होतो.
मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. तुम्ही स्वतःहून सार्वजनिक चौकात उभे राहून लोकांना उपदेश करणार असाल, तर लोक प्रश्नही विचारतील. टाळ्या मिळतील, पण शिट्ट्याही मिळतील. कौतुक मिळेल, पण प्रतिवादही होईल. सोशल मीडियावर प्रसिद्धीचे व्यसन हे साखरेसारखे असते गोड वाटते, पण त्याची किंमत नंतर कळते.
याचा अर्थ ट्रोलिंग योग्य आहे का? अजिबात नाही. विचारांना उत्तर विचारांनीच द्यायला हवे. पण प्रत्येक टीकेला "माझ्यावर अन्याय झाला" असे म्हणणेही तितकेच चुकीचे आहे. विशेषतः जेव्हा स्वतःची लोकप्रियता आणि "व्हायरल" होणं मिरवलं जातं, पण त्याच लोकप्रियतेतून आलेला विरोध सहन होत नाही.
शेवटी प्रश्न अनीता बिश्नोईचा नाही. उद्या दुसरे कुणी असेल. प्रश्न असा आहे की समाजाला खरोखर दिशा देणारे विचार लोकप्रिय होत आहेत का, की स्त्रियांनी कसे जगावे याचे आदेश देणारे लोकच सर्वात जास्त व्हायरल होत आहेत?
कारण सोशल मीडियावर संस्कृतीपेक्षा वाद जास्त विकला जातो. आणि काही जण संस्कृतीचे रक्षण करत असल्याचा दावा करत असतात, प्रत्यक्षात मात्र ते अल्गोरिदमचीच सेवा करत असतात.
*************************************************************************************************************
अनिता बिश्नोई कोण आहे हे
अनिता बिश्नोई कोण आहे हे माहीत नाही. त्यामुळे संदर्भ कळला नाही.
अनिता बिष्णोई नावाची एक
अनिता बिष्णोई नावाची एक राजस्थानी स्त्री आहे. तिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ टाकला होता कि कपडे हो गाये छोटे तो शरम कहा से आये.... त्यावर पब्लिक खूप भडकलं आणि काऊंटर व्हिडीओज एक लाखाच्या वर बनले. मुळात मग ती अशा पद्धतीने फेमस झाल्यावर पब्लिक ने तिचे जुने व्हिडीओ बघितले त्यात असम जाणवलं कि ती सगळी अक्कल बायकांनाच शिकवते . बायका घर तोडतात , अशिक्षित बायका घर संसार टिकवतात , शिकलेल्या बायका कोर्ट कचेरी करायला लावतात . बायका नवऱ्याला पैश्याचे मशीन समजतात वगैरे . आणि मुख्य म्हणजे काही व्हिडिओत तिचे स्वतः चे ब्लाउज चे गळे प्रचंड खोल आहेत . त्यामुळे इतरांना ज्ञान देताना आपण तरी नीट कपडे घालावे असं म्हणणं पडलं . शिवाय ती पुरुषांना काही शिकवत नाही , सगळी अक्कल बायकांना शिकवते फक्त .
त्या कपडे हो गये छोटे या व्हिडीओ नंतर तिला प्रचंड फोन आले , ट्रोल झाली . धमक्या पण आल्या म्हणे , त्यामुळे काल तिने या सगळ्या प्रकाराला कंटाळून लाईव्ह येऊन विष घेतलं, सध्या ती हॉस्पिटल मध्ये आहे .
ह्यातलं काहीच माहीत नव्हतं
ह्यातलं काहीच माहीत नव्हतं
इथे वाचून कळालं तरी नेमकं काय ते
बाप रे!
बाप रे!
गेल्या काही वर्षांत अनेक रील स्टार्स ने आत्महत्या केल्याच्या बातम्यांचे थंबनेल बघितले आहेत. काहींची हत्या झाली.
कंटेट सोडून द्या. कारण आपण जे बनवतोय ते चूक की बरोबर हे समजण्यासाठी वैचारीक घुसळण व्हावी लागते. यांच्या बाबतीत आजूबाजूला त्याच विचारांचे लोक आणि धडाधड मिळालेले फॉलोअर्स यामुळे वेगळा विचार असू शकतो हे तरी माहीत असेल का शंका आहे.
रील्स मुळे मिळालेली प्रसिद्धी, सतत डोक्यात तेच विचार आणि हे सर्व पचवण्याची ताकद नसणे आणि त्यात आपल्या समजुतीपेक्षा वेगळा विचार अचानक समोर आला आणि उत्तर देता येत नाही असे वाटले कि कमावलेली प्रतिष्ठा गेली असे कदाचित वाटत असेल.
अशी प्रसिद्धी मिळण्यापेक्षा न मिळालेली बरी.
कालच FB वर ह्या बाईचा फोटो
कालच FB वर ह्या बाईचा फोटो आणि पोस्ट पाहिली होती.
एकूणच उबग आला होता. पैशासाठी कोणी किती थरापर्यंत जायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. लॉकडाऊनपासून you tube /itar सोmiवर जगणारी जमात फोफावली आहे.
हायला , असं आहे होय! हे काही
हायला , असं आहे होय! हे काही माहीतच नव्हतं
प्रसिद्धीचा हव्यास,
प्रसिद्धीचा हव्यास,
स्रियांवर संस्कृतीची, तिच्या भ्रामक कल्पनांची जबाबदारी लादुन उपदेश आणि दूषणे,
ट्रोलिंग आणि त्यातही गाठली जाणारी नीच पातळी
असे वेगवेगळे विषय/मुद्दे आहेत.
या व्यक्तीबद्दल आणि तिने इतका टोकाचा निर्णय घेण्याइतपत नक्की काय व कसे झाले काहीच माहित नाही. म्हणजे कुणी फारच लौकर ओव्हर रिऍक्ट होतात. एवढे ट्रोलिंग झाले असेल आणि त्यातही फोनवगैरे करून तर ते निषेधार्ह आहे.
>>>>>कारण आपण जे बनवतोय ते
>>>>>कारण आपण जे बनवतोय ते चूक की बरोबर हे समजण्यासाठी वैचारीक घुसळण व्हावी लागते.
+१ निदानपक्षी विशाल मन (ओपन माईंड) असावे लागते, स्वतःची चूक मान्य करायचे धैर्य लागते.
-----------
अति बहिर्मुख असल्याचे हे तोटे आहेत. लोकांच्या मतावर आपले मूडस ठरु लागतात. मग वीष घ्यायची पाळी येते. धिस इज व्हेरी अनफॉर्च्युनेट.
निदानपक्षी विशाल मन (ओपन
निदानपक्षी विशाल मन (ओपन माईंड) असावे लागते, स्वतःची चूक मान्य करायचे धैर्य लागते. >>
बरोबर. आपण जे काही बोलतो आहे, ते समतोल बोलतोय का नाही याचा विचार करायला हवा कंटेंट करणाऱ्यानी. कोणतं तरी एक पारडं जड झालं की तोल जातो. समविचारी असा कंटेंट उचलून धरतात पण सगळेच धरतील असं नाही. त्यातून विरुद्ध विचार करणाऱ्यांना जज केलं की सोशल मीडिया वर कोणीच सोडत नाही. कारण सगळेच तोंड सोडायला बसलेले असतात.
विरोधाभास म्हणजे एका काउंटर व्हिडिओ मध्ये तिच्याच कम्युनिटी च्या लोकानी तिला विरोध केलेला आहे. कारण ही स्त्री म्हणते (अप्रत्यक्षपणे) की स्त्रियांना शिकवू नका. पण स्वत:च्या मुलींच्या डिलिव्हरी वगैरे करायला यांना लेडी डॉक्टर लागते. मग ही गणित कसे जमणार?
लॉकडाऊनपासून you tube /itar
लॉकडाऊनपासून you tube /itar सोmiवर जगणारी जमात फोफावली आहे. >> अगदी अगदी देवकी . आणि त्यातही मुख्यत्वे दोन तोकं दिसतात. एक म्हणजे अश्लील कंटेंट नाहीतर एकदम संस्कृती रक्षण, आणि रिग्रेसिव्ह विचार सरणी. (खास करून जेव्हा संस्कृती, धर्म असतो तेव्हा) बाकी पाककृती वगैरे च्या बाबतीत सुदैवाने ही मर्यादा येत नाही. किंवा फॅशन कपडे वगैरे.
>>>>>>कारण सगळेच तोंड सोडायला
.
एवढे ट्रोलिंग झाले असेल आणि
एवढे ट्रोलिंग झाले असेल आणि त्यातही फोनवगैरे करून तर ते निषेधार्ह आहे. >> दुर्दैवाने लोकांना तसं वाटत नाहीये कारण तिने जो काही कंटेंट टाकला आहे तो सगळं मेन pleasing आहे. पेटरियारकी ला पूर्ण सपोर्ट करणारा आहे. पूर्वी टाकलेल्या व्हिडिओ मध्ये सुद्धा ति आक्षेपार्ह बोललेली आहे, पण तेव्हा troll झाली नव्हती.
हायला , असं आहे होय! हे काही
हायला , असं आहे होय! हे काही माहीतच नव्हतं >> मला ही माहिती नव्हती ही बाई, अचानक फीड मध्ये एकीने काउंटर व्हिडिओ टाकलेला पहिला, मग असे काउंटर व्हीडिओज येतच गेले आणि मग मला समजलं.
राज अज्ञानी - तुमची पोस्ट पूर्ण पणे पटली.
कर्मा! या व्यक्तीबद्दल आणि
कर्मा! या व्यक्तीबद्दल आणि वरील प्रकाराबद्दल अजिबात कल्पना न्हवती.
पेराल तसे उगवेल वगैरे उगिचच आठवले. असो!
ह्या ताई म्हणजे एकंदरीत हिंदी
ह्या ताई म्हणजे एकंदरीत हिंदी पट्ट्यातील रामतीर्थकर मॅडम वाटल्या वाचून.
लहानपणापासून यांचंच
लहानपणापासून यांचंच मार्गदर्शन घेतलं.
https://www.youtube.com/watch?v=xu7a4TyfDeU
खरेच. प्रचंड वैताग आला आहे या
खरेच. प्रचंड वैताग आला आहे या कंटेंटखोरांचा.
मला ए आय कडून प्रचंड अपेक्षा आहेत. अत्यंत काहीही भंगार कंटेंट तयार करून आत्ता काही मंडळी पैसे कमावत आहेत. या लोकांचा बाजार बसायला सुरुवात झाली आहे. प्रत्येकाच्या हातात आता AI चे खेळणे येईल मग काय बेसुमार सुमार वीडियो बनवले जातील. आणि बहुतेक लोक या सगळ्याला प्रचंड कंटाळतील. पुन्हा लोक लोकल आणि हायपरलोकल होऊन या बेसुमारपणाला कंटाळून मनोरंजनाचे मार्ग शोधतील. ज्या मधे प्रत्यक्ष सहवासावर भर असेल.
लाईव्ह येऊन विष घेतलं, सध्या
लाईव्ह येऊन विष घेतलं, सध्या ती हॉस्पिटल मध्ये आहे
वाईट झालं पण हसू आलं
नशीब अजून हे प्रकरण माझ्या
नशीब अजून हे प्रकरण माझ्या फीडमध्ये आले नाही.
कारण आता हे रील आणि व्हिडिओ बघणे सोडले आहे.
त्यामुळे उगाच इथले संदर्भ घेऊन शोधायला जात नाही.
तशाही या बाई महासागरातील लोटाभर पाणी आहेत.
पण या अपर्णा रामतीर्थकर पंथाच्या आहेत इतके समजले.
लेखातील इतर सर्वसाधारण मुद्द्यांशी सहमत.
हायला , असं आहे होय! हे काही
हायला , असं आहे होय! हे काही माहीतच नव्हतं
एवढे ट्रोलिंग झाले असेल आणि
एवढे ट्रोलिंग झाले असेल आणि त्यातही फोनवगैरे करून तर ते निषेधार्ह आहे.
>> त्यांना ट्रोल करणाऱ्या किंवा संयत भाषेत या बाईंच्या reels मधील विरोधाभास दाखवणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सना यांच्या समाजाच्या पुरुषांकडून घाणेरडे फोन आणि मेसेजेस गेले. त्या क्रिएटर्सनी ते रेकॉर्डिंग/ घाणेरड्या मेसेजेसचे स्क्रीनशॉट नावगावासकट पब्लिश पण केले होते.
या बाई पण अजिबात कमी नव्हत्या. यांच्या reels वर विरोधी मते येऊ लागल्यावर या कमेंट्स ऑफ करून अजून अजून भडकाऊ आणि विरोधकांना मूर्ख/ नालायक/ असंस्कारी आहेत असं म्हणणाऱ्या अशा reels टाकू लागल्या होत्या. तो लाईव्ह विष घ्यायचा व्हिडिओ/ reel काही सापडले नाही. केला असेल तरी कदाचित सहानुभूती किंवा अजून जास्त पब्लिसिटी मिळवण्यासाठी स्टंट असावा. शिवाय दक्षिणाने लिहिलंय तसं स्वतः क्लीव्हेज वगैरे दाखवणारे बरेच reels करून आपण नक्की कोणता क्राऊड अट्रॅक्ट करतोय हे त्यांना न कळण्याइतक्या त्या भाबड्या होत्या असं अजिबात वाटत नाही. अपर्णा रामतीर्थकर बाई हेच सगळं म्हणायच्या पण निदान स्वतः अंगभर कपडे घालायच्या.
ऋ.. जाताजाता तुला धाग्यासाठी नवीन विषय घे.. "पारंपारिक कपड्यांमध्ये केलेले अंगप्रदर्शन संस्कृतीला धरून.. आणि अपारंपारिक कपड्यात कदाचित त्यापेक्षा कमी केलेलं अंगप्रदर्शन संस्कृती बुडवे कसे ठरते?"
पिंजरा चित्रपटात एक संवाद आहे
पिंजरा चित्रपटात एक संवाद आहे.
मास्तर,
समाज तमाशाने बिघडला नाही की किर्तनाने सुधारत नाही.
संस्कृती चे अवडंबर माजवू नये हे खरे आहे
तितकेच
उत्तान शरीरप्रदर्शन सुद्धा चूक आहे.
सिंधुताई सपकाळ यांचे एक वाक्य आठवते आहे!
सिनेमातील उत्तान दृश्ये पाहून वासना चाळवलेल्या पुरुषांच्या हाताला सिनेमा नट्या लागत नाहीत तर झोपडीत राहणाऱ्या गरीब मुलींवर त्यांची नजर पडते!
यात थोडे फार तरी सत्य नक्कीच आहे
दक्षिणा, धन्यवाद.
दक्षिणा, धन्यवाद.
गंमत म्हणजे ज्या संस्कृतीचे
गंमत म्हणजे ज्या संस्कृतीचे गुणगान ही बाई करते आहे, ज्या पुरुषांना पाठिंबा देते आहे, तिच्याच घरचे (दीर वगैरे) पुरुष तिला त्रास देत आहेत. तिच्या नवऱ्याने त्यांची नावे घेतली, एका रील मध्ये बघितलं. सध्या सगळीकडे अनीता अनीता च दिसते आहे.
हो पियू, मी एक रील बघितलं
हो पियू, मी एक रील बघितलं त्यात तिने नवऱ्याला विचारलं बघा किती फेम मिळते आहे ना? तुम्हाला नाही मला.. आणि फिदी फिदी हसली. आणि लुगायाना (लुगाई म्हणजे बाई) मिरची लागली म्हणे मी बोलते त्याची. याचा अर्थ त्या चूक आहेत हे त्यांना माहिती आहे.
बाकी लाईव्ह विष मॅडम नी insta वर प्यायले (की गोळ्या घेतल्या) म्हणे. मी काही शोधले नाही.
ऋन्मेष ला तू दिलेला विषय खरच भारी आहे. लिही रे तू.