ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ११
पूर्वभाग
आरव देशमुख, डॅनियल क्रॉस, समीर नायर आणि विनायक राऊत यांना NAMES.enc मधून Black Ember च्या जागतिक जाळ्याचा खरा विस्तार समजतो.
“EMBER CHAIN” मध्ये शिपिंग, विमा, ऊर्जा बाजार आणि सरकारी सिस्टीमशी जोडलेली शेकडो नावं दिसतात, तर “Visual panic event” हा शब्द पाहून refinery आग मुद्दाम घडवली गेल्याचं स्पष्ट होतं.
जर्मनीत एलिना व्होल्कोव्हा आणि रहस्यमय Director यांच्यातील संभाषणातून Black Ember फक्त नेटवर्क नाही, तर सतत विस्तारत राहणारं आर्थिक युद्ध असल्याचं उघड होतं.
मुंबईत परिस्थिती बिघडत असताना “RECOVERY PROTOCOL - STAGE 3” सक्रिय झाल्यामुळे पुरावे मिटवणे आणि माहिती असलेल्या लोकांना हटवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं डॅनियल सांगतो.
शेवटी त्यांच्या लपण्याच्या ठिकाणाचा माग काढला जातो, कॉरिडॉरमध्ये सशस्त्र लोक पोहोचतात, आणि डॅनियल आरवला Dock 14 ची चावी देत स्वतः मागे थांबण्याचा निर्णय घेतो.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग १२ - डॉक १४
दाराचे लाकूड कडकड कडकडले ...आणि त्या अरुंद स्टॅअरवेलच्या गडद काळोखात, समीर आणि विनायकरावांच्या मागे आरव देशमुख अत्यंत वेगाने पायऱ्या खाली उतरायला लागला.
“जिना खाली उतरल्यावर समोर डावीकडे एक कॉरिडॉर येईल. त्याच्या अगदी शेवटी कार्गो लिफ्टचा शाफ्ट आहे. तिथून खाली उतरायचं. मुख्य एक्झिट चुकूनही वापरायचा नाही.” डॅनियलने ओरडून सांगितले. त्याच्या डोळ्यांत दुष्यंत देशमुखचा संपूर्ण भूतकाळ जणू एका क्षणात जिवंत झाला. नेमका त्याच वेळी बाहेरून अजून एक धक्का दारावर आदळला. या वेळी ते कॅबिनेट आणखी मागे सरकले आणि दाराची वरची कडी निसटून जमिनीवर पडली.
डॅनियलने त्याच्या जॅकेटच्या आतल्या खिशातून एक छोटंसं, काळ्या रंगाचं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बाहेर काढलं. त्याने पुढच्याच सेकंदाला ते डिव्हाइस दाराच्या अगदी बाजूला असलेल्या मुख्य इलेक्ट्रिकल पॅनेलला नेऊन घट्ट चिकटवले. तिथून एक लहान निळी लाईट ब्लिंक करू लागली. मग तो दोन पावले मागे सरकला.
“बरोबर तीस सेकंदांनंतर या संपूर्ण मजल्याचे लाईट्स आणि अलार्म्स ट्रिप होतील,” डॅनियल स्वतःशीच पुटपुटला.
तेवढ्यात दाराबाहेरून धातूवर काहीतरी घासल्याचा आवाज आला. बाहेर उभ्या असलेल्या रिकव्हरी टीमने आता दार तोडण्यासाठी 'ब्रीच टूल' वापरायला सुरुवात केली होती.
दाराच्या अगदी पलीकडून एका कोरड्या आणि हिंस्त्र आवाजात अंतिम आदेश घुमला, “Move!”
त्याच क्षणी डॅनियलने स्टॅअरवेलचं दार उघडलं.
इकडे मुख्य दार फुटलं. लाकडाचे तुकडे हवेत उडाले. फ्लॅशलाईट्सचा तीक्ष्ण पांढरा प्रकाश अंधार चिरत आत घुसला. पण नेमक्या त्याच वेळी डॅनियलचं ते काळं डिव्हाइस अॅक्टिव्हेट झालं. संपूर्ण फ्लोअर अचानक दाट काळोखात बुडाला. मुख्य इलेक्ट्रिकल सिस्टीम पूर्णपणे कोलमडली.
आणि मग धाऽऽड!
सीलिंगमधून हाय-प्रेशर फायर सप्रेशन सिस्टीम एकाच वेळी फुटली. प्रचंड दाबाने पाण्याचे फवारे चहुबाजूंनी आदळायला लागले. कॉरिडॉरमध्ये अचानक गोंधळ उडाला. बंदुका हातांत घेतलेल्या त्या रिकव्हरी टीमच्या फ्लॅशलाईट्स पाण्यात वेड्यासारख्या इकडेतिकडे हलायला लागल्या. पाण्याचा वेग आणि अंधार यामुळे त्यांचे अत्याधुनिक गॉगल्स निकामी झाले.
अंधारात कोणीतरी इंग्रजीत ओरडलं, “Thermals down!
डॅनियल क्षणात स्टॅअरवेलमध्ये मागे सरकला. त्याने ते जड लोखंडी दार आतून ओढून घेत जागच्या जागी लॉक केलं.
दार बंद होताच वरून पुन्हा धडका बसायला लागल्या. पण डॅनियलने तिथे एक सेकंदही वाया घालवला नाही. तो वेगात जिने उतरला आणि त्याने खाली गेलेल्या त्या तिघांना गाठलं.
आता ते चौघंही त्या अरुंद, ओलसर जिन्यातून झपाट्याने खाली उतरायला लागले होते. लोखंडी पायऱ्यांवर वरून गळणारे पाण्याचे मोठे थेंब टपटप पडत होते.
खाली कुठेतरी समुद्राच्या खाऱ्या आणि थंड वाऱ्याचा घुमणारा आवाज येत होता. आरवचा श्वास वेगाने चालला होता, त्याचे कपडे आधीच घामाने आणि पाण्याच्या थेंबांनी ओले झाले होते. वरून अजूनही लोखंडी दारावर बसणाऱ्या धडकांचे प्रतिध्वनी जिन्यात गुंजत होते.
तेवढ्यात... अचानक वरच्या मजल्यावर कुठेतरी मुख्य इमर्जन्सी अलार्म सुरू झाला. संपूर्ण बिल्डिंग आता एका लयीत ब्लिंक होणाऱ्या लाल इमर्जन्सी लाईट्सच्या विळख्यात बुडाली. त्या लाल प्रकाशात प्रत्येकाचा चेहरा अधिकच गंभीर आणि सावध दिसत होता.
डॅनियल वेगाने खाली उतरता उतरता म्हणाला, “अलार्म ट्रिप झालाय. ते आता या बिल्डिंगचे सगळे एक्झिट्स सील करतील.”
समीरने हातातलं शस्त्र घट्ट पकडत मागे वळून विचारलं, “मग आपण बाहेर कसे जाणार?”
डॅनियलने त्याला थेट उत्तर दिले नाही. त्याचे डोळे खाली येणाऱ्या कॉरिडॉरवर होते.
ते जिने संपवून शेवटी खाली एका अरुंद सर्व्हिस कॉरिडॉरमध्ये आले. तिथे चहुबाजूंच्या भिंतींवर जुने, गंजलेले 'शिपिंग साईन्स' होते. हवा प्रचंड ओलसर होती आणि हवेत गंजलेल्या लोखंडाचा एक तीव्र वास पसरला होता. आता तिथून दूरवरून समुद्रातल्या जहाजांचे हॉर्न्स अत्यंत स्पष्ट ऐकू येत होते. ते बंदराच्या अगदी जवळ पोहोचले होते.
विनायकराव अंधारात चाचपडत कुजबुजले, “ही जागा अजून ऑपरेशनल आहे?”
“Officially नाही,” डॅनियल न थांबता पुढे चालत म्हणाला. “Unofficially…” तो क्षणभर थांबला, “...मुंबईत कोणतीच गोष्ट कधीच पूर्ण बंद होत नाही, विनायकराव.”
ते त्या अरुंद कॉरिडॉरच्या अगदी शेवटच्या टोकावर पोहोचले. समोर एक प्रचंड, अवाढव्य कार्गो लिफ्टचा शाफ्ट उघडा पडला होता. तिथे लिफ्ट नव्हती, फक्त एक पोकळ काळोख खाली गेला होता. खूप खाली... कुठेतरी खोल विहिरीच्या तळासारखं पाण्याचे एक पुसटसं, फिकट रिफ्लेक्शन चमकत होतं. समुद्राचं पाणी भरतीच्या वेळी या जमिनीखालच्या वाहिन्यांमध्ये शिरत होतं.
ते पाहून समीरचा चेहरा एका क्षणात बदलला. “Are you serious?
डॅनियलने त्या शाफ्टच्या काठाला लटकणारी, गंजलेली जुनी लोखंडी शिडी आपल्या हाताने ओढून घट्ट पकडली. “डॉक लेन अगदी याच्या खाली आहे. हाच एक मार्ग आहे.”
आरवने त्या काळोखात खाली वाकून पाहिलं. त्याला त्या खोलीचा अंतच दिसत नव्हता.
तेवढ्यात... त्यांच्या अगदी वरच्या मजल्यावरून एक धातू आपटल्याचा मोठा आवाज जिन्यात घुमला. आपण खाली सर्व्हिस कॉरिडॉरमध्ये आलो आहोत, हे आता त्या रिकव्हरी टीमला अचूक समजलं होतं. पुढच्याच सेकंदाला, ते उभे असलेल्या कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकावरून फ्लॅशलाईट्सच्या तीक्ष्ण बीम्स अंधार चिरत चमकायला लागल्या.
“शिट!” समीरने एक तीव्र शिवी दिली आणि तो क्षणाचाही विचार न करता त्या गंजलेल्या लोखंडी शिडीवरून खाली उतरायला लागला. विनायकराव आपले वय विसरून अत्यंत वेगाने त्याच्या मागे खाली उतरू लागले. आरव शिडीवर पाय ठेवण्यापूर्वी शेवटचं वर वळला.
त्या लांबच लांब कॉरिडॉरच्या अंधाऱ्या आणि लाल इमर्जन्सी लाईटमध्ये आता काही आकृत्या स्पष्ट दिसायला लागल्या होत्या. हातात अत्याधुनिक हत्यारं असलेल्या.
डॅनियल क्रॉस अजूनही वरच उभा होता. त्याने आपल्या जॅकेटच्या आतून एक छोटासा, जुना रिव्हॉल्व्हर बाहेर काढला.
“तुमच्याकडे... तुमच्याकडे गन आहे?” - आरव
डॅनियलने एक अत्यंत सूक्ष्म आणि थंड हास्य करत हलकी मान डोलावली. “जुनी सवय आहे, आरव. दुष्यंतसोबत काम करताना ही कधीच माझ्यापासून ठेवावी लागली नाही”
त्याच वेळी समोरून येणाऱ्या त्या काळ्या आकृत्या एकाएकी तिथेच थांबल्या. जणू काही त्या अंधाऱ्या, बंद पडलेल्या कॉरिडॉरमध्ये दोन्ही बाजूंना अचूक माहिती होतं की पुढच्या काही सेकंदांत इथे नक्की काय होणार आहे. बाहेर पडणाऱ्या मुसळधार पावसाचा आवाज दूरवरून त्या बंदरावर हिंस्त्रपणे आदळत होता. संपूर्ण दक्षिण मुंबईत आता पोलिसांचे आणि अॅम्ब्युलन्सचे इमर्जन्सी सायरन्स घुमत होते.
डॅनियलने अत्यंत वात्सल्य आणि आदरानं आरवच्या डोळ्यांत पाहिलं. आणि अतिशय शांत, स्थिर आवाजात म्हणाला, “आरव... डॉक १४ वर पोहोचल्यावर LAST_TIDE शोध.”
आरवचा श्वास तिथल्या तिथे अडकला. “काय आहे ते?”
डॅनियलच्या चेहऱ्यावर त्या अंधाऱ्या, लाल प्रकाशात पहिल्यांदाच एक थकलेलं दुःख उमटलं.
“तुझ्या वडिलांनी मागे काय ठेवलंय...” तो शांतपणे म्हणाला, “...ते समजण्यासाठी.”
त्याच क्षणी, समोरच्या कॉरिडॉरच्या काळोखात एक तीक्ष्ण 'मझल फ्लॅश' चमकली. शत्रूची गोळी त्या अरुंद जागेतील लोखंडी भिंतीवर आदळून ठिणग्या उडवत प्रचंड आवाजासह मागे फिरली.
डॅनियलने एका सेकंदाचाही विलंब न करता आरवच्या खांद्याला पकडून त्याला जोरात शिडीवरून खाली ढकललं. “GO!”
लोखंडी शिडी आता खाली काळोखात वेगाने उतरू लागली होती. आरवचे हात गंजलेल्या लोखंडाला घट्ट पकडत होते, डोळे पाण्याने आणि भीतीने भरले होते.
आणि वर... डॅनियल क्रॉस त्या संपूर्ण इमारतीला गिळू पाहणाऱ्या लाल इमर्जन्सी लाईट्सच्या अंधाऱ्या प्रकाशात, एका हातात जुनी रिव्हॉल्व्हर धरून, एकटाच उभा राहिला.
लोखंडी शिडी पावसाने आणि वरून गळणाऱ्या पाण्याने पूर्णपणे ओलसर झाली होती.
आरव देशमुख खाली उतरता उतरता अचानक घसरला, त्याचे पाय लोखंडी पायरीवरून सुटले. पण खाली असलेल्या समीरने एका हाताने शिडी पकडून दुसऱ्या हाताने आरवचा हात वेळेत घट्ट पकडला आणि त्याला सावरले.
त्याच सेकंदाला वरून गोळीबाराचा भयानक आवाज पुन्हा घुमला.लोखंडी शाफ्टच्या बंदिस्त रचनेमुळे त्या गोळीचा कानठळ्या बसवणारा आवाज आतल्या आत शेकडो वेळा प्रतिध्वनित होऊन घुमत राहिला.
आरवचा श्वास अत्यंत वेगाने चालला होता. भीती आणि काळजीने तो ओरडला, “डॅनियल!”
त्याने मान वर करून पाहण्याचा प्रयत्न केला, पण खालून समीरने त्याला ताकदीने खाली खेचलं. “वर बघू नकोस आरव! मूव्ह!”
त्या अंधाऱ्या विहिरीसारख्या शाफ्टमध्ये आता खाली उतरायला खूपच कमी अंतर उरले होते. समुद्राच्या खाऱ्या आणि जड वाऱ्याचा वास आता कमालीचा तीव्र झाला होता. ते बंदराच्या अगदी जवळ, पाण्याच्या पातळीच्या समांतर पोहोचल्याची जाणीव त्यांना होत होती.
तेवढ्यात, वरून शत्रूच्या टीममधला कोणीतरी कोरड्या आवाजात ओरडलं, “Lower level! Cut them off!”
ते ऐकताच विनायकराव खाली उतरताना एकाएकी थबकले. त्यांच्या शांत आणि अनुभवी आवाजात पहिल्यांदाच भीती स्पष्ट जाणवत होती.
“त्यांना डॉक अॅक्सेस माहिती आहे”
समीरचा चेहरा कठोर झाला. “मग आपल्याकडे आता अजिबात वेळ नाही,” तो म्हणाला.
ते शेवटी त्या प्रचंड शाफ्टच्या तळाशी पोहोचले. त्यांचे पाय खाली साचलेल्या खाऱ्या पाण्यात वाजले. समोर एक अत्यंत अरुंद, जुना मेंटेनन्स टनेल पुढे गेला होता. छतावरून समुद्राचं ओलसर पाणी सतत टप-टप टिपकत होतं. दोन्ही बाजूंच्या गंजलेल्या सिमेंटच्या भिंतींवर एखाद्या जुन्या, बंद पडलेल्या शिपिंग कंपनीचे फिकट झालेले मार्किंग्ज दिसत होते.
टनेलच्या पलीकडच्या टोकावरून दूरवर उभ्या असलेल्या हार्बर क्रेन्सच्या पिवळ्या आणि लाल लाईट्स अंधारात चमकताना दिसत होत्या. टनेलच्या अगदी शेवटी समुद्राच्या लाटांचा खडकांवर आदळण्याचा आवाज आता प्रचंड स्पष्ट ऐकू येत होता.
समीरने आपल्या हातातील शस्त्र समोर रोखत पुढे पाऊल टाकले. “या बाजूने, लवकर!”
ते तिघेही त्या अंधाऱ्या, दमट टनेलमधून पुढे धावू लागले. विनायकरावांचा श्वास लागला होता, तरीही ते आरवचा हात पकडून धावत होते.
धावताना आजूबाजूचा कोणताही आवाज आरवच्या कानांपर्यंत पोहोचत नव्हता. त्याच्या डोक्यात, त्याच्या काळजाच्या ठोक्यांसोबत डॅनियलचे ते शेवटचे शब्द वेड्यासारखे घुमत होते LAST_TIDE.
त्याचा नक्की अर्थ काय? बाबांनी मागे असं काय ठेवलंय, जे समजून घेण्यासाठी डॅनियलने स्वतःचा जीव धोक्यात टाकला होता? आणि या शब्दाचा थेट संबंध त्या 'स्टेज ३' क्लिनअप प्रोटोकॉलशी होता का? आरवच्या मुठीत ती पितळी चावी आता अधिकच घट्ट आवळली गेली.
तेवढ्यात... त्यांच्या अगदी वर असलेल्या व्हेंटमधून फ्लॅशलाईटची एक तीक्ष्ण पांढरी बीम खाली चमकली. वरच्या डॉक लेव्हलवर रिकव्हरी टीमचा एक हिस्सा त्यांचा माग काढत वेगाने पुढे सरकत होता.
समीरने वर न पाहता बंदूक घट्ट पकडली आणि तो कुजबुजला, “ते विलग झालेत. एक टीम वर आहे, दुसरी खाली येतेय.”
तो अरुंद मेंटेनन्स टनेल संपताच ते एका झटक्यात बाहेर पडले. आणि पुढच्याच सेकंदाला, समोर दक्षिण मुंबईचा तो विस्तीर्ण बंदराचा परिसर रात्रीच्या मुसळधार पावसात उभा असलेला दिसला. चहुबाजूला पसरलेल्या अवाढव्य क्रेन्स, एखाद्या पर्वतासारखे रचलेले शिपिंग कंटेनर्सचे ढीग, हवेत पसरलेला डिझेलचा जड धूर आणि बंदराच्या काळ्या पाण्यात रिफ्लेक्ट होणाऱ्या लाल वॉर्निंग लाईट्स... दूर समुद्रात उभ्या असलेल्या एका प्रचंड कार्गो जहाजाचा हॉर्न रात्रीच्या शांततेत घुमला. पावसाचे जाड थेंब बंदराच्या त्या काळ्या, पाण्यावर आदळत होते.
विनायकराव तिथे पाऊल ठेवताच काही सेकंद स्तब्ध उभे राहिले. त्यांच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, देवा...”
त्यांच्या आवाजात भीती किंवा आश्चर्य नव्हते... तर एक जुनी, अत्यंत गडद आठवण होती. वर्षांपूर्वी दुष्यंत देशमुखसोबत याच जागेवरून सुरू झालेल्या एका प्रवासाची ती आठवण होती.
समीरने पावसात डोळे बारीक करून चहुबाजूला नजर फिरवली, “विनायकराव, यातलं डॉक १४ नक्की कुठे आहे?”
नेमक्या त्याच क्षणी... हार्बरच्या दुसऱ्या टोकाला पोलिसांसारखा एक मोठा इमर्जन्सी सायरन वाजला. आणि बंदराच्या मुख्य टॉवरवरील प्रचंड फ्लडलाईट्स अचानक फिरत फिरत एका विशिष्ट कंटेनर लेनवर येऊन स्थिर झाल्या. शत्रूने शोधमोहीम तीव्र केली होती.
आरवचा घसा कोरडा पडला, त्याने पावसाचे पाणी चेहऱ्यावरून पुसत विचारले, “ते... त्यांना आपण दिसलो का?”
“अजून नाही,” समीर आजूबाजूच्या हालचाली टिपत म्हणाला, “पण ते पेरिमिटर क्लोज करतायत. त्यांनी संपूर्ण परिसराला वेढा घालायला सुरुवात केलीये.”
ते तिघेही स्वतःला वाचवत त्या अवाढव्य कंटेनर स्टॅक्सच्या आडून, अंधाराचा फायदा घेत पुढे सरकायला लागले. पावसामुळे जमिनीवर साचलेल्या ऑईल आणि डिझेलच्या तेलकट पाण्यावर बंदराच्या लाल-पिवळ्या लाईट्स विचित्रपणे चमकत होत्या. कुठेतरी लांब एक फोर्कलिफ्ट चालू झाल्याचा जड आवाज रात्रीच्या हवेत घुमला.
आणि मग... अचानक विनायकरावांची पावले थांबली. त्यांची नजर अंधारात एका खांबावर लावलेल्या जुन्या, गंजलेल्या साईनबोर्डवर स्थिर झाली होती:
DOCK 14
AUTHORIZED TRANSIT ONLY
समीरने लगेचच त्या बोर्डच्या दिशेने पाहिले. ते अख्खे डॉक जवळजवळ बंद पडलेले, ओसाड दिसत होते. तिथे समोर एक जुने, पत्रे उडालेले वेअरहाऊस होते, अर्धवट गंजलेली आणि तुटलेली लोडिंग क्रेन होती... आणि थेट समुद्राच्या काळ्या पाण्याच्या पोटात घुसलेला एक अरुंद, जुना काँक्रीटचा धक्का होता. तिथे कोणतीही मोठी बोट किंवा जहाज नव्हते.
आरवच्या छातीतली धडधड आता मर्यादेबाहेर वाढली होती. त्याने आपल्या मुठीत असलेल्या त्या छोट्या पितळी चावीकडे पाहिले आणि विचारले, “ते 'LAST_TIDE' नक्की कुठे असेल?”
त्याच क्षणी मुसळधार पावसाच्या पडणाऱ्या आवाजाला चिरत एका गाडीच्या इंजिनचा मंद, जड आवाज ऐकू आला.
ते तिघेही जागेवरच स्तब्ध झाले. समोरच्या अवाढव्य कंटेनर स्टॅक्सच्या मागून एक काळ्या रंगाची एसयूव्ही अत्यंत संथ गतीने पुढे आली. ही हुबेहूब तशीच गाडी होती... जशी काही वेळापूर्वी त्या दक्षिण मुंबईच्या जुन्या बिल्डिंगबाहेर उभी होती. गाडीचे हेडलाईट्स पूर्णपणे बंद होते.
समीरने दातओठ खात एक शिवी पुटपुटली.
ती काळी एसयूव्ही डॉक १४ च्या काही अंतरावर येऊन थांबली. पुढच्याच क्षणी तिचा पुढचा दरवाजा उघडला आणि आतून दोन माणसे अत्यंत शांतपणे बाहेर उतरली. अंगावर ब्लॅक रेन जॅकेट्स, हातांमध्ये काळे हातमोजे , चेहऱ्यावर कोणताही ताण नाही. कमालीचे संयमी. ते तिथे उभे राहून संथ नजरेने संपूर्ण हार्बर स्कॅन करत होते. जणू काही त्यांना पक्की माहिती होती की, बिल्डिंगमधून निसटलेले ते चौघे अजून फार दूर गेलेले नाहीत; ते याच परिघात कुठेतरी अडकलेत.
विनायकराव अंधारात डोळे फाडून पाहत अत्यंत धीम्या आवाजात कुजबुजले, “रिकव्हरी ऑब्झर्व्हर्स... ते थेट मुख्यालयाच्या संपर्कात आहेत.”
आरवचा श्वास छातीतच अडकला. समीरने एका झटक्यात आरवचा खांदा पकडला आणि त्याला मागच्या कंटेनर स्टॅकच्या आडोशाला ओढले, “खाली बस, आरव! अगदी जमिनीला लागून राहा.”
पावसाचे तेलकट, थंड पाणी त्यांच्या चेहऱ्यावरून, कपाळावरून वाहत होते. आरवची नजर त्या दोन माणसांवर खिळली होती.
एसयूव्हीजवळ उभा असलेला एक माणूस अचानक थांबला. त्याने त्याची मान वळवली. त्याची तीक्ष्ण नजर आता थेट 'डॉक १४' च्या त्या पडक्या वेअरहाऊसच्या दिशेने गेली. त्याने काही सेकंद त्या ओसाड वास्तूचे निरीक्षण केले आणि मग आपल्या जॅकेटच्या कॉलरला लावलेल्या रेडिओमध्ये हलक्या आवाजात काहीतरी संदेश दिला.
ते पाहताच समीरचा चेहरा पूर्णपणे बदलला. “त्यांना आपलं नेमकं लोकेशन माहिती आहे, विनायकराव... ते वेअरहाऊसकडेच बघतायत.”
आरव थरथरत्या आवाजात कुजबुजला, “समीर... मग आपण इथे पूर्णपणे ट्रॅप्ड झालो आहोत?”
समीर त्यावर काही बोलणार, त्याच्या तोंडून एखादा शब्द बाहेर पडणार... इतक्यात,
धाऽऽड!
दूर, बंदराच्या अगदी दुसऱ्या टोकाला एकाएकी एक प्रचंड, कानठळ्या बसवणारा आवाज झाला. तिथल्या एका कंटेनर स्टॅकजवळ एखाद्या बॉम्बस्फोटासारखा तीक्ष्ण, पिवळा प्रकाश चमकला. पाठोपाठ बंदराचे सगळे इमर्जन्सी सायरन्स एकदम सर्वोच्च पातळीवर ओरडायला लागले. टॉवरवरच्या अजस्त्र फ्लडलाईट्स फिरल्या आणि त्या स्फोटाच्या दिशेने रोखल्या गेल्या. संपूर्ण बंदराचे लक्ष एका सेकंदात विचलित झाले.
एसयूव्हीजवळ उभे असलेले ते दोन्ही रिकव्हरी ऑब्झर्व्हर्स क्षणाचाही विचार न करता त्या स्फोटाच्या दिशेने वळले आणि त्यांनी वेगाने आपल्या गाडीत बसून त्या बाजूला गाडी पळवली.
समीर पूर्णपणे स्थिर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर त्या पिवळ्या प्रकाशात अविश्वास स्पष्ट दिसत होता. कारण त्याला आणि विनायकरावांना एका क्षणात अचूक समजले होते, हा कोणताही अपघात नव्हता. हा अत्यंत अचूक वेळेला केलेला एक मास्टर डायव्हर्शन प्लॅन होता.
आणि त्या बंदराच्या मुसळधार पावसातल्या दाट अंधारात... कुठेतरी डॅनियल क्रॉस अजूनही जिवंत होता. तो अजूनही लढत होता.
डॅनियलने मिळवून दिलेल्या या अंतिम संधीचा फायदा उठवणे आता भाग होते. शत्रूची गाडी दूर जाताच समीरने आरवच्या पाठीवर हात टाकला, “आरव, विनायकराव... डॅनियलने आपल्याला शेवटची संधी दिलीये. पळा!”
ते तिघेही अंधाराचा फायदा घेत डॉक १४ च्या त्या जुन्या, गंजलेल्या वेअरहाऊसच्या तुटलेल्या दरवाजाच्या दिशेने पूर्ण ताकदीने धावू लागले. आता त्यांच्यासमोर फक्त तो काळा समुद्र आणि वेअरहाऊसच्या आत दडलेले ते रहस्य होते.
ते तिघेही पावसात पूर्णपणे वाकून, त्या महाकाय कंटेनर स्टॅक्सच्या आडोशाने वेगाने पुढे सरकू लागले. पावसाचं तेलकट, खारं पाणी त्यांच्या डोळ्यांत जात होतं, पण कोणाचेही पाय थांबत नव्हते.
ते वेअरहाऊसच्या अगदी जवळ आले आणि तिथली रचना जवळून पाहताच आरवच्या एकाएकी लक्षात आलं, ती जागा पूर्णपणे ओसाड नव्हती. तिथल्या त्या अवाढव्य, गंजलेल्या लोखंडी शटरवर अगदी नवीन असलेले scratches उमटलेले दिसत होते; जणू काही दिवसांपूर्वीच ते प्रचंड ताकदीने वर-खाली करण्यात आलं होतं. आणि शटरच्या खालच्या एका कोपऱ्यात, काळ्या ऑईल-पेंटने लिहिलेलं आणि आता अर्धवट पुसलेलं एक शिपिंग कोड आरवच्या तीक्ष्ण नजरेला अचूक दिसलं - TW-14.
आरवचा श्वास एका क्षणासाठी अगदी मंद झाला. त्याने त्या अक्षरांवरून हात फिरवला, “TW...”
विनायकराव मागे उभे राहून अत्यंत गंभीर आवाजात कुजबुजले, “टाईड विंडो.”
समीरने आजूबाजूच्या अंधारात नजर फिरवली. “विनायकराव, आरव, जे काही करायचंय ते लवकर करा. आपल्याकडे फक्त काही मिनिटं आहेत.”
समीरने पूर्ण ताकदीने शटरचा एक सैल झालेला भाग बाजूला सरकवला. आत पूर्ण काळोख होता. फक्त छतावरच्या तुटक्या स्कायलाईटमधून पावसाचं पाणी एका लयीत खाली पडत होतं आणि त्याचा आवाज वेअरहाऊसमध्ये घुमत होता.
त्या विस्तीर्ण वेअरहाऊसच्या आत जुनी, कुजलेली कार्गो नेट्स छतावरून खाली लोंबकळत होती, गंजलेले ऑईल ड्रम्स एका कोपऱ्यात अस्ताव्यस्त पडले होते, तुटलेले लाकडी पॅलेट्स जमिनीवर विखुरलेले होते आणि बंदिस्त जागेमुळे समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याचा आणि डिझेलचा वास तिथे प्रचंड तीव्रतेने पसरला होता.
आरव आत शिरला तो सावधपणे पुढे सरकला आणि त्याची नजर अचानक समोरच्या जुन्या काँक्रीटच्या भिंतीवर स्थिर झाली.
भिंतीवर पांढऱ्या खडूने घाईघाईत एक बाण काढलेला होता. आणि त्या बाणाच्या खाली हाताने लिहिलं होतं LOW TIDE ONLY
ते हस्ताक्षर पाहताच समीरच्या तोंडून हलकी कुजबुज बाहेर पडली, “दुष्यंत...” ते दुष्यंत देशमुखचेच हस्ताक्षर होते.
तो बाण वेअरहाऊसच्या अगदी मागच्या, अंधाऱ्या कोपऱ्याच्या दिशेने जात होता. ते तिघेही कसलाही विचार न करता त्या दिशेने गेले. तिथे गेल्यावर त्यांना दिसले की, मागे अंधारात एक अरुंद, गंजलेला लोखंडी जिना थेट खाली उतरत होता. जमिनीच्या खालून समुद्राच्या लाटा काँक्रीटवर आदळण्याचा आवाज आता खूप स्पष्ट आणि मोठा येत होता.
विनायकराव तिथे पायऱ्यांच्या सुरुवातीला काही सेकंद थांबले. “ही जागा...” त्यांचा आवाज आठवणींनी मंद झाला, “...पूर्वी स्मगलिंग ट्रान्झिट म्हणून वापरली जायची. नव्वदच्या दशकात कस्टम्सच्या नजरेतून वाचून माल उतरवण्यासाठी दुष्यंतने हे भुयार शोधून काढलं होतं.”
समीरने आपल्या फ्लॅशलाईटची बीम खालच्या दिशेने टाकली. त्या जिन्याच्या शेवटी, पाण्याच्या पातळीच्या अगदी जवळ एक छोटासा काँक्रीटचा चेंबर दिसत होता.
आणि त्या चेंबरच्या अगदी मधोमध... एका जुन्या लोखंडी टेबलवर ठेवलेलं होतं - एक जुनं, अवजड वॉटरप्रूफ लॉकर.
वेगाने सुरू आहे, कथा आणि
वेगाने सुरू आहे, कथा आणि कथानक..
फारच प्रभावी वाटली मात्र कथा
फारच प्रभावी वाटली मात्र कथा अशी असेल असे वाटले नव्हते .
भारीच!
भारीच!
धन्यवाद धनवन्ती, sumukh आणि
धन्यवाद धनवन्ती, sumukh आणि आबा.