कथा कादंबऱ्यांचा यंत्रमानवी कारखाना

Submitted by हेमंतकुमार on 13 May, 2026 - 06:43

AI मुळे पोटार्थी लेखक आणि अन्य काही कलावंत देखील देशोधडीला लागतील की काय अशी वास्तव भीती आज घोंघावते आहे. नोव्हेंबर 2022मध्ये चॅट जीपीटी सार्वजनिक झाल्यानंतरचा AIचा झंझावात सर्वांच्या डोळ्यांसमोर आहेच. सुरुवातीस हे प्रकरण विज्ञान तंत्रज्ञानापुरते सीमित राहील अशी एक वेडी आशा सामान्य माणसाला होती. परंतु त्यानंतर या यंत्रप्रज्ञेने जीवनाच्या असंख्य क्षेत्रांत प्रवेश करून अक्षरशः धुमाकूळ घातलेला दिसतो. लेखन आणि कलाक्षेत्रही या आक्रमणापासून बचावलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर सन 1954 मधील Roald Dahl या ब्रिटिश लेखकाच्या ‘The Great Automatic Grammatizator’ या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रभावी विडंबन करणाऱ्या समर्थ कथेची प्रकर्षाने आठवण होत आहे. AI सारखे मानवनिर्मित तंत्रज्ञानच एके दिवशी आपल्या मानगुटीवर बसेल आणि त्यातून मानवी विचारक्षमता आणि सर्जनशीलतेचा अंत होण्याचा धोका आहे हे भयस्वप्न त्या कथेतून व्यक्त झालेले आहे. गेल्या 72 वर्षानंतर ती कथा आज तर अधिकच कालसुसंगत ठरल्याने सादर आहे तिचा हा अल्पपरिचय :

तंत्रकुशल नोकर असलेला त्या कथेचा नायक गणिते सोडवणारा एक भला मोठा संगणक तयार करतो. त्यानंतर शिणलेल्या अवस्थेत तो विश्रांती घेत असताना त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते की, इंग्रजी भाषेचे व्याकरण देखील गणितीय सूत्रांप्रमाणे काटेकोर बांधलेले आहे. अशाच एखाद्या अन्य संगणकात जर आपण अंकांच्या ऐवजी शब्द आणि लेखनकल्पना (plots) ठासून भरल्या तर त्यातून हव्या त्या प्रकारची आणि अगदी प्रमाणभाषेतली व्याकरणशुद्ध कथा-कादंबरी सहज तयार होऊ शकेल ! आयुष्यात आपणही कधीतरी लेखक व्हावे ही त्याची मनीषा होती पण प्रयत्नांती देखील त्याला त्यात यश आलेले नव्हते.

मग तो या कल्पनेला मूर्त स्वरूप देऊन असाच एक भला मोठा संगणक तयार करतो. त्यात कथा-कादंबरी लिहिण्यासाठी लागणारा सर्व मसाला अर्थात ‘कच्चा माल’ विविध प्रणालींद्वारे भरला जातो. प्रत्येक प्रणालीसाठी यंत्रावर एक स्वतंत्र बटन ठेवलेले असते आणि त्यानुसार यंत्रात कथानकाचे प्रकार, मध्यवर्ती संकल्पना, लेखनशैली, पात्रे, शब्दसंग्रह आणि व्याकरणाचे नियम हे सर्व काही यथास्थित भरले जाते. तसेच प्रत्येक कथेमध्ये अथवा कादंबरीच्या प्रत्येक प्रकरणात एखादा तरी लांबलचक आणि गूढ शब्द घालण्याची त्यात सोय होती. असा शब्द घालण्याने वाचकाच्या लेखी तो लेखक एकदम प्रतिभावान ठरतो असे नायकाचे म्हणणे ! याचबरोबर कथानकात मिसळण्यासाठी आनंद, दुःख, विनोद, कारुण्य, रहस्य आणि वर असोशीची फोडणी या सर्व गुणधर्मांचीही सोय करण्यात आली. एकंदरीत पाहता त्या काळी बाजारात यशस्वी ठरलेल्या अनेक पुस्तकांचा अभ्यास करून वरील सर्व मालमसाला यंत्राला पुरवण्यात आला. सरतेशेवटी, यंत्रातून लेखनाचे उत्पादन करताना त्याचा सुमार दर्जा हा निकष महत्त्वाचा ठरवण्यात आलेला होता.

मग तो त्याच्या मालकाला ही अभूतपूर्व योजना पटवून देतो आणि त्यानुसार लेखन पाडून ते दोघेही रातोरात लेखक बनतात आणि त्यावर चांगली कमाई पण करू लागतात. त्यातूनच पुढे एक मोठा साहित्यिक धंदा उभा राहतो. नंतर अनेक काल्पनिक लेखकांच्या नावांनी देखील ते साहित्य-उत्पादन वाढवू लागतात. तरी देखील खऱ्याखुऱ्या हयात प्रतिभावंत लेखकांशी आपल्याला अजूनही स्पर्धा करावी लागतेय याची त्या नायकाला खंत असते. मग तो त्याचे अखेरचे अतिसंहारक ब्रह्मास्त्र सोडायचे ठरवतो. तो अनेक प्रथितयश लेखकांना भेटतो आणि त्यांच्यापुढे एक करारनामा ठेवतो. त्यामध्ये असे म्हटलेले असते की संबंधित लेखकाने त्याचे आयुष्यभराचे जे काय मानधन असेल ते एकदाच या संगणक कंपनीकडून घ्यावे आणि इथून पुढे ती कंपनी जे साहित्य निर्माण करेल त्यावर आपले नाव वापरण्याची लेखी परवानगी देऊन टाकावी. याखेरीज त्या लेखकांनी इथून पुढच्या आयुष्यात अन्यत्र काहीही सार्वजनिक लिहायचे नाही हीदेखील जाचक अट.

नायकाच्या या प्रयत्नांना संमिश्र प्रतिसाद मिळतो. काही तरुण लेखक तर त्याला जवळपास कानाखाली काढूनच बाहेर हाकलतात. पण प्रणयकथांची राणी असलेल्या एका श्रीमंत लेखिकेला ही कल्पना खूपच रंजक वाटते आणि ती संगणक प्रत्यक्ष बघण्याची इच्छा व्यक्त करते. नायक तिची इच्छा पूर्ण करतो आणि तिलाच तिथे योग्य ती बटणे दाबायला बसवतो. त्यातून जी कादंबरी निर्माण होते ती वाचून ती लेखिका अवाक् होते कारण तिला जाणवते की तिच्या स्वतःच्या सर्जनशील लेखनापेक्षाही त्या यंत्रातून निघालेली कादंबरी अधिक चांगली आहे ! मग ती आनंदाने करारनाम्यावर सही करते.
अशा तऱ्हेने तेव्हाच्या साहित्यिक विश्वातले जवळपास 70% लेखक गुमान तो करार मंजूर करून आपले स्वत्व त्या यंत्राला विकतात. ओसरणीला लागलेले ज्येष्ठ लेखक तर या प्रस्तावाला अगदी सहज बळी पडतात.

कथेच्या अखेरीस उभरता लेखक असलेला कथानिवेदक या सर्व प्रकाराने भयंकर अस्वस्थ झालेला दाखवलाय. या यांत्रिक साहित्यिक धंद्यामुळे त्याच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे. परिणामी त्या करारनाम्यावर आपण देखील सही करावी की काय अशा द्विधा मनस्थितीत तो आहे. पण अखेरीस वैतागून तो देवाला म्हणतो,
“ही उपासमार सहन करण्याची ताकद मला दे रे, देवा !”
या उदास व खिन्न सुरावर ती कथा संपते.

कथा अप्रतिम व ओघवती आहे. तिची भाषा तर सोपी आणि मधाळ. संपूर्ण कथेत लेखकाने (विस्तृत स्पष्टीकरण या अर्थी) वापरलेला 'epexegetically' हा एक शब्द पूर्णतः अपरिचित असल्याने अवघड व बोजड वाटला. कदाचित कथेच्या आशयाला पुष्टी मिळण्यासाठीच तो वापरला गेला असावा का ? किंवा कदाचित 1954मधील ब्रिटिश इंग्लिशचा तो खास नमुना असू शकेल.
कथेत सूचित केल्याप्रमाणे कालौघात तंत्रज्ञानाच्या तुफान रेट्यात मनुष्य-लिखित साहित्याचे भवितव्य असे दारुण असेल काय, हा विचार वाचकांच्या मनात सोडण्यात कथा यशस्वी होते. हेच तिचे बलस्थान. तसेच कथनाच्या ओघात ती लेखन व प्रकाशन क्षेत्रातील विविध वृत्तीप्रवृत्तींना छानसे चिमटे देखील घेते. आज त्यातली 1954 मध्ये मांडलेली भयसंकल्पना आज वास्तवात उतरलेली पाहून आपल्यालाही भयाण अस्वस्थ वाटल्याशिवाय राहत नाही.

कथेचे दणदणीत शीर्षक तर मार्मिक आणि तिच्या आशयाला अतिशय साजेसे आहे. Great या शब्दातून तंत्रज्ञानाची घमेंड दाखवली आहे तर Grammatizator हा लंबाचौडा व तिरपागडा शब्द कॅल्क्युलेटर व जनरेटरच्या धर्तीवर खास तयार करण्यात आलेला दिसतो. मानवी भावभावना व्यक्त करणारी आतड्याची भाषा अखेर एका यंत्राची गुलाम होऊन राहते हा त्यातून व्यक्त होणारा भाव आपल्याला थरारून टाकतो. एकूण काय, तर ही कथा मुळातून वाचण्यातच खरी मजा आहे.
. . .
आता येऊ थेट 2026 मध्ये . . .
काय दिसतंय अवतीभवतीच्या लेखनविश्वात ? साहित्य असो की पत्रकारिता, शैक्षणिक पातळीवरील निबंध असोत की प्रबंध, नोकरीचे अर्ज असोत की संस्थांचे नियमित अहवाल, सर्वत्र एआय वापरून पाडलेल्या विविध प्रकारच्या सपक व निर्जीव लेखनाचा सुळसुळाट झालेला दिसतोय. त्यातला काही अधिकउणे भाग अगदी नजरेत भरण्यासारखा आहे. भाषा आणि व्याकरणशुद्धता, तर्कसंगत मांडणी आणि एकंदरीत सभ्यता व सांस्कृतिकतेचा मुलामा असलेले लेखन आता कुठल्याही सुमार लेखकाला यंत्राद्वारे आयते हाती मिळत आहे. सुमारे 25-30 वर्षांपूर्वी ‘खाऊजा’ धोरण अवतरल्यानंतर जगभर जसे सांस्कृतिक सपाटीकरण दिसून आले तद्वत आज हे लेखनातले सपाटीकरण अगदी सहज जाणवते आहे. एकदा का लेखनासाठी यंत्रमानवी मदत घ्यायचे ठरवले की मग प्रयत्नांती सुद्धा खराब लेखन करता येत नाही, हा झाला अधिकचा भाग. परंतु उण्याच्या बाजूला लेखनातील सपक यांत्रिकपणा, रुक्ष कोरडी भाषा, वाचकाच्या मनाला साद घालण्यातील असमर्थता आणि नव्या धाडसी लेखनप्रयोगांचा अभाव या उणिवा अगदी प्रथमदर्शनीच जाणवतात. भविष्यात जर बहुसंख्य लेखन याच पद्धतीचे होत राहिले तर त्यातून वाचकांची विचारक्षमता रुंदावणे तर कठीणच. चांगले लेखक जर हळूहळू संपू लागले तर चांगले वाचक तयार होणे देखील अर्थातच संपुष्टात येणार. परिणामी स्वतंत्र विचारशक्ती गमावलेला यंत्रवत समाज हे पुढच्या शतकातील चित्र असेल काय, अशी साधार भीती आज सतावते.

मानवाने आपली अफाट आणि अचाट बुद्धी वापरून हे लेखनतंत्र निर्माण करून ठेवले खरे, पण आजच्या घडीला ते त्याच्याच उरावर बसू पाहतंय. ही समस्या तर उद्भवली आहे आणि तिच्यातून मार्ग काढणे हा देखील एक मानवी गुणधर्मच. काही विचारी लेखकांनी त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न जरूर चालवलेले आहेत. आपले लेखन खरोखर नैसर्गिक (मानवी) वाटण्यासाठी लेखनात काही विशिष्ट बदल केले जात आहेत. त्यामध्ये लेखनात बोलीभाषा आणि विशिष्ट समूहांच्या भाषेचा (slangs) पुरेसा वापर, पारंपरिक लेखनशैलीची काही प्रमाणात मोडतोड, वाचकाला साद घालणारी निवेदनपद्धती, काही प्रमाणात मुद्दामून बिघडवलेली शब्द अथवा वाक्यरचना आणि काही धाडसी लेखन प्रयोगांचा समावेश, हे त्यातले काही उपाय. ही झाली लेखकांची बाजू.

man lens book.png
( सौजन्य : Vectors)
दुसऱ्या बाजूस वाचकांनीही जागरूक असणे महत्त्वाचे आहे. या संदर्भात पाश्चात्य जगात नुकतेच घडलेले एक उदाहरण पथदर्शक ठरावे. Mia Ballard या लेखिकेची Shy Girl ही भय-कादंबरी निर्मितीक्षम एआय वापरून लिहीली असल्याचे तीव्र आक्षेप अनेक वाचकांकडून आल्यानंतर संबंधित प्रकाशकांनी ती कादंबरी मागे घेतल्याचे जाहीर केलेले आहे. इंग्रजीचे जागतिक स्थान आणि महत्त्व पाहता त्या भाषेत केलेले एआय-निर्मित लेखन सध्या बहुधा सर्वाधिक असू शकेल. त्या तुलनेत सध्या तरी प्रादेशिक भाषांमधले ‘असले’ उद्योग मर्यादित असावेत. त्या भाषांमध्ये बेमालूम घुसखोरी करण्यासाठी या तंत्राला अजून बराच पल्ला गाठावा लागेल.

एकंदरीत पाहता नजीकच्या काळात साहित्यजगतात दोन प्रकारची लेखने वाचकांना उपलब्ध असतील. त्यापैकी एक असेल ते लेखकाने स्वयंप्रज्ञेने केलेले नैसर्गिक व प्रामाणिक लेखन आणि दुसरे म्हणजे अर्थातच एआयच्या कारखान्यातून घाऊक प्रमाणात बाहेर पडलेले कृत्रिम चकचकीत लेखन. बाजारातील या दोन्हींच्या स्पर्धेत आपल्या पुढ्यातील लेखनाचा नीरक्षीरविवेक करणे हे सर्वस्वी सुजाण वाचकाच्या हातात असेल.
************************************************************************************************************
टीप : हा लेख लिहिण्यासाठी आंतरजालावरील मुक्त माहितीचा वापर केलेला असला तरीही प्रत्यक्ष हे लेखन स्वतः विचार करून आणि मानवी हातांनीच लिहिलेले आहे याची खात्री बाळगावी ! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते नेहेमी प्रमाणे सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी घेऊन येतात.

तुमचा जॉब गेला म्हणजे तो मंडेन होता.
तुम्हाला टेरिफचा फटका बसला म्हणजे तुम्ही डायव्हर्सीफाय केलं नाही.
तुम्हाला रेशिअल प्रोफायलिंग करुन त्रास दिला, म्हणजे तुम्ही असिमिलेट झाला नाहीत.

अत्यंत प्रेडिक्टेबल आणि नेहेमीचं झालेलं आहे. बाकी त्यांच्या पोस्ट एआयला वाचायला दिल्या असत्या तर हा सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी पॅटर्न एआय ने आधी ओळखला असता का? कोणाकडे स्पेअर टोकन असतील तर प्रयोग करुन बघा.

माझे फक्त दोनच मुद्दे आहेत.
१ कला आणि कलाकार ह्यांची मिसळ का करतो?
२ सगळ्या विश्वात फक्त मी आणि मीच सर्व श्रेष्ठ आहे हा विचार केव्हा सोडणार?

* (आपण) कला आणि कलाकार ह्यांची मिसळ का करतो?
>>>>
एखाद्या कलेकडे 100% व्यक्तीनिरपेक्ष व निष्पक्षपणे बघता आले असते तर ते खरेच उत्तम ठरले असते परंतु वास्तवात तसे होत नाही. याचे कारण म्हणजे, कोणतीही कला ही त्या कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाचेच विस्तारित रूप असते असा समज/ पूर्वग्रह ( Psychological Bias) मानवी मनात निसर्गतःच घट्ट रुतलेला आहे. तो काढता येणे हे महाकठीण असते. सामान्य माणसाच्या बाबतीत तर ते जवळजवळ अशक्य आहे. या मूलभूत गोष्टीमध्ये आजूबाजूच्या सामाजिक गोष्टींचाही प्रभाव नकळत पडत असतो.

सध्याच्या युगात सर्वच प्रकारच्या कला समाजासमोर कायमच निनावी पद्धतीने सादर केल्या जातील हे देखील अशक्य आहे. (फक्त मोजक्या आयोजित स्पर्धामध्येच ते शक्य आहे ). त्यामुळे हा तिढा सुटणे कठीण !

हा विषय गहन असून त्यावर मानसशास्त्रीय संशोधन देखील झालेले आहे :
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC9888721/

दिलेली लिंक उघडून थोडी चाळळी. हा शोध निबंध निव्वळ संशोधकांसाठी आहे. समजेल कि नाही कुणास ठाऊक. तूर्त तुमच्या प्रतिसादावर समाधान मानतो.

बरोबर आहे. तो निबंध राहू दे. आपण दैनंदिन व्यवहारातली सामान्य उदाहरणे पाहू.
दोन जवळच्या व्यक्तींचा परस्परातील संवाद कसा असतो बघा :

“अरे, इराण युद्धावर पुस्तक आलय बरका.
“कोणी लिहिलंय ?

अरे, आज आपल्या घराच्या मागच्या मैदानात सायबर सुरक्षेवर चांगले भाषण आहे.
कोण बोलणार आहे ?

अरे, आज रंगमंदिरात सुगम संगीताचा कार्यक्रम आहे.
कोण आहे गायक?

“विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारी परीक्षा पद्धती’ या विषयावर नवा चित्रपट आलाय
कोण आहेत त्यात नायक आणि नायिका ?

.. अशी शेकडो उदाहरणे पाहता पहिली प्रतिक्षिप्त प्रक्रिया असते,
“ ती कला कोणाची आहे?”
तिचा विषय काय आहे हे बहुतांशी दुय्यम स्थानावर राहते.

या 'कोण'ला मानवी मनाने इतके महत्त्व दिलेले असल्यामुळेच त्या कलाकाराची सामाजिक पार्श्वभूमी, नैतिकता, वगैरे वगैरे. . . असंख्य गोष्टी त्वरित लोकांच्या मनात येतात व त्यानुसार(च) पुढचा निर्णय घेतला जातो.
(अपवाद सोडून देऊ)

मी काय म्हणतो आहे कि जो आदर मान तुम्ही मानवांना देता तो AI ला पण द्या. आपल्या बरोबरीची वागणूक द्या,

<< जो आदर मान तुम्ही मानवांना देता तो AI ला पण द्या. आपल्या बरोबरीची वागणूक द्या, >>
पुढील वाक्यातून धागालेखकाचा पूर्वग्रह (bias) दिसून येतो. मुळात जर एआय अगदी वाईट आहे(च) हे मत ठरले असेल तर मग समान संधीची आणि बरोबरीची अपेक्षा कशी करावी?

सुरुवातीस हे प्रकरण विज्ञान तंत्रज्ञानापुरते सीमित राहील अशी एक वेडी आशा सामान्य माणसाला होती. परंतु त्यानंतर या यंत्रप्रज्ञेने जीवनाच्या असंख्य क्षेत्रांत प्रवेश करून अक्षरशः धुमाकूळ घातलेला दिसतो. लेखन आणि कलाक्षेत्रही या आक्रमणापासून बचावलेले नाहीत.

सर्वत्र एआय वापरून पाडलेल्या विविध प्रकारच्या सपक व निर्जीव लेखनाचा सुळसुळाट झालेला दिसतोय.

आज हे लेखनातले सपाटीकरण अगदी सहज जाणवते आहे.

प्रयत्नांती सुद्धा खराब लेखन करता येत नाही, हा झाला अधिकचा भाग. परंतु उण्याच्या बाजूला लेखनातील सपक यांत्रिकपणा, रुक्ष कोरडी भाषा, वाचकाच्या मनाला साद घालण्यातील असमर्थता आणि नव्या धाडसी लेखनप्रयोगांचा अभाव या उणिवा अगदी प्रथमदर्शनीच जाणवतात.

एक वेळ अशी येणार आहे की माणसाने स्वतः काय लिहिले आहे आणि 'एआय'ने काय लिहिले आहे हे सहजासहजी ओळखता पण येणार नाही. माबो वाचक यांनी दुसऱ्याच प्रतिसादात हे असेच म्हटलेसुद्धा आहे.

* पूर्वग्रह (bias) दिसून येतो
>>>> मान्य आहे.
मानव आणि यंत्रमानव हे समकक्ष आहेत हे स्वीकारायला खूप काळ जावा लागेल. सध्यातरी बहुसंख्य लोक मानवी कला श्रेष्ठ मानताना दिसतात. अन्यथा, लेखात उल्लेख केलेली इंग्रजी कादंबरी प्रकाशकांनी मागे घ्यायचे काय कारण होते ? त्यांनी जाहीर खुलासा करायचा की, काय फरक पडतो लेखन मानवी आहे की यंत्रमानवी आहे याने ?
याचाच अर्थ त्यांनी सध्याच्या बहुसंख्य वाचकांच्या मताला किंमत दिलेली आहे.

नव्या विचाराबद्दल आदर आहे परंतु तो झटपट स्वीकारणे हे सोपे वाटत नाही.

Ability to write good content using ai is actually empowerment of ordinary people.

याचाच अर्थ त्यांनी सध्याच्या बहुसंख्य वाचकांच्या मताला किंमत दिलेली आहे. >> नाही. लेखक, प्रकाशक या मंडळींना त्यांचे दुकान तसेच चालू ठेवायचे आहे आणि त्यासाठी त्यांना 'एआय'चा अडथळा नको आहे.

एआय चा वापर करून मायबोलीवर प्रत्येक पान उलटल्यानंतर मोठा लेख स्क्रोल डाऊन करायला लागू नये अशी दुरुस्ती केली तर त्यामुळे कुणाच्या पोटावर पाय येईल का?

नसेल तर त अक्षर येणारे शब्द नीट उमटावेत आणि परिच्छेद शब्द न तोडता पडावेत ही दुरूस्ती देखील हातासरशी व्हावी.

प्रतिसादात पहिले अक्षर / शब्द खोडल्यानंतर त्याचे भूत पाठलाग करत राहतै, त्याचा एआय बंदोबस्त करत असेल तर उत्तमच.

कुणी एआयकडून मिपा वरच्या "मोकलाया " या अजरामर काव्याच्या तोडीस तोड काव्य प्रसवून घेऊ शकेल का ?
मज्जा येईल वाचायला .

>>प्लीज स्टॉप ड्रिंकिंग द कूल-एड. पीएचडी फोक्स डेफिनेटली नो हाव टू यूज ए आय.<<
डिड्यु वॉच द क्लिप? केन ग्रिफिनहि तेच म्हणतोय, इंडायरेक्टली. प्रश्न पिएच्डिना एआय वापरता येउ शकतं का, हा नसुन ते वापरतात का, हा आहे. (पिएच्डिज टेकिंग वीक्स/मंथ्स व्हेअर एआय एजंट्स कंप्लिटिंग द टास्क इन अवर्स/डेज). या सिचुएशन मधे त्या पिएच्डिजना देखील वांगची वॉर्निंग लागु आहे. बघा पटतंय का...

एक कथा. कथेच्या शेवटी प्रश्न आहे. तो सर्वांसाठी आहे.

एआयच्या सहाय्याने लिखाणाचा सुळसुळाट झालेला आहे. यावर वर्तमानपत्रातून चर्चा सुरू आहेत. अग्रलेख येत आहेत. टिव्हीवर सुद्धा चर्चा होत आहेत. याचा परिणाम म्हणून साहित्य महामंडळाने काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. त्यात एखाद्या लेखकाने कथा, कविता किंवा काहीही सृजनशील रचना केली तर ती त्यानेच केलेली आहे यासाठी त्याला पुरावे द्यावे लागणार आहेत. यासाठी त्याला साहित्य महामंडळाने अधिकृत केलेल्या निरीक्षकांच्या उपस्थितीतच कथा लिहावी लागणार आहे. किंवा सीसीटीव्ही लावून कथा पूर्ण होईपर्यंत रेकॉर्डिंग जपून ठेवावे लागणार आहे आणि ते महामंडळाला द्यावे लागणार आहे. त्यात सर्व कोनातून परीसर दिसण्याची अट घातलेली आहे.

यावर सुद्धा गदारोळ झाला आहे. लेखकांच्या स्वातंत्र्यावरच गदा येत असल्याचे लेखकांचे म्हणणे आहे. पण महामंडळाच्या या सूचनेला पाठिंवा वाढत असल्याने लेखकांचा नाईलाज होतोय. सारासारविवेकावर जनभावनेने मात केली आहे.

मात्र एका बंडखोर लेखकाला हे मान्य नाही. त्याने एक कथा ही मार्गदर्शक तत्त्वे धुडकावून लिहीलेली आहे. त्याच्यावर प्रचंड टीका होऊ लागली आहे. पण लोकांच्या विवेकावर झुंडशाहीने मात केली आहे हे मला मान्य नाही हे त्याचे म्हणणे ठाम आहे. त्याने सर्वांना चॅलेंज केले आहे कि जर कुणी ही कथा माणसाने लिहीलेली आहे कि एआयने हे अचूक ओळखले तर तो इथून पुढे जनभावनेला शरण जाईल. त्यासाठी पुरावे सादर करण्याची जबाबदारी तो घेणार आहे असेही जाहीर केले आहे.

त्याने लिहीलेली कथा साधारण अशी आहे.

मध्यरात्र होत आली आहे. तो कार मधून चालला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात रिझर्व्ह्ड फॉरेस्ट आहे. हे जंगल पूर्वी शहराला लागून होतं. पण शहर जंगलाच्या चारही बाजूंनी वाढल्याने ते मधोमध आलं आहे. जंगलामुळे आझादनगर ते माउंट शीतलादेवी हे दहा किमीचे अंतर जायला पासष्ट किमीचा वळसा घालावा लागत असल्याने शासनाने मधून एक रसता बनवला आहे.

थोडा थोडा पाऊस पडतोय. वायपर चालू असल्याने स्पष्ट दिसतंय. रस्त्याला दिवे आहेत.
जंगली जनावरांचा धोका आहे. पण कार असल्याने सुरक्षित वाटतंय.

या रस्त्याबद्दल बर्याच वदंता आहेत. पण त्याला त्याची फिकीर नाही. उशीर झालेला आहे ही एकच गोष्ट त्याच्या शिस्तीला धरून नाही. तो रॅशनल विचारांचा मनुष्य आहे.

एलईडीच्या प्रकाशाने आसमंत झळाळून टाकलेला होता. इतक्यात त्याला रस्त्याच्या कडेला कुणी तरी उभे आहे असे दिसले.
तो बारकाईने पाहू लागला. मनुष्याकृती दिसत होती.

हळूहळू ती स्त्री असल्याचे स्पष्ट दिसले.
ती हात करत होती.

पाऊस , अंधार आणि जंगल.

ही इथे काय करतेय?
हा मुलभूत प्रश्न पडला.

पण पुन्हा सनातन विचार त्याच्या मनात आला.
अशा परिस्थितीत मदत करावी कि नाही याचा.

अनेक कथा ऐकलेल्या होत्या.
नाही थांबले तर तो त्या अफवांचा विजय असणार होता. थांबावे तर स्त्री च्या मोहापायी थांबल्याचा आरोप होणार होता.
विवेकाची कसोटी होती.

कार जवळ येत होती. त्याच्याकडे निर्णय घ्यायला काहीच मिनिटं होती.
त्याने कार थांबवली.

ती अपेक्षेपेक्षाही अत्यंत सुंदर होती. जणू काही आजच्या काळात मधुबालाने पुन्हा जन्म घेतलेला असावा.
तिचा रंग पर्शियन स्त्री प्रमाणे होता. चेहर्याची ठेवण बलोच आणि पर्शियन स्त्रीच्या चेहर्याशी मिळतीजुळती होती. केस तांबूस असावेत. थोड्या अंतरावरच्या दिव्याचा प्रकाश तिच्या चेहर्यावर पडलेला होता. चेहरा बोलका होता.

तिने हात केला होता. कार थांबताच ती खिडकीपाशी आली.
"मला बस डेपोपर्यंत सोडाल का?"
चेहर्यावर किशोरकुमारच्या गॅरेजमधे आलेल्या मधुबालासारखे भाव होते.

"या जंगलात तू कशी ?"
त्याने न राहवून विचारलेच.

" सांगते सगळं. पण आधी मला कार मधे घ्या नाहीतर पूर्ण भिजून जाईन"

तो ओशाळला. कारचा दरवाजा उघडला. तिच्या केसात पाणी होतं.
त्याने मागच्या सीटवरून एक हॆंडबॅग पुढे ओढून घेतली. तिच्यात एक नॅपकीन होता. तो तिला दिला.

"थॆंक यू"
म्हणत तिने केस पुसायला सुरूवात केली.

तो गप्प राहिला.
कारच्या डॅशबोर्डवरचा हिरवा प्रकाश तिच्या गालावर हलत होता. वायपरचा ठरावीक आवाज. बाहेर पावसाने जंगल धूसर करून टाकलं होतं.

“तुम्ही फार कमी बोलता,” ती म्हणाली.

“रात्री गाडी चालवताना बोलणं कमीच करतो.”

“की अनोळखी स्त्रियांशी?”

तो हसला.
“तेही असेल.”

तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. मग नकळत पुन्हा त्याच्याकडे.
“तुमचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय.”

“खरंच?"

“नाही. खरंच. जुने हिंदी हिरो होते ना ? तसं काहीतरी.”

त्याला हसू आलं. पण आत कुठेतरी सावधपणाही जागा झाला. इतक्या पटकन एखादी स्त्री एखाद्या पुरुषाची तारीफ करते?
की आपणच जुनाट विचार करतोय?

त्याला आता ऐकलेल्या गोष्टी आठवल्या. जंगलात थांबवणाऱ्या स्त्रिया. टोळ्या. लुटमार. भुताटकी.

मग लगेच स्वतःचाच राग आला. मनुष्य प्रत्येक वेळी स्त्रीकडे संशयानेच का पाहतो? आपण रॅशनल आहोत हे त्याने स्वत:ला बजावलं.

कार पुढे जात राहिली.

बस डेपो जंगलाला लागून होता. इथे तुरळक वस्ती होती. जंगल लागून असल्याने इथे लोक फारसे नव्हतेच. जी काही बांधकामे होती ती जुनी होती आणि फॉरेस्टच्या निकालांना कोर्टात आव्हान देऊन उभी होती.

बस डेपो आला तेव्हा घड्याळात बारा चाळीस झाले होते. परिसर जवळजवळ बंद पडलेला होता. एका चहाच्या टपरीवर अर्धवट शटर होतं. दोन कुत्री पावसापासून बचावासाठी बसस्थानकात स्वत:ला स्वत:भोवती गुंडाळून झोपली होती.

“इथून पुढे माझं घर जवळच आहे,” ती म्हणाली. “पाच मिनिटं.”

तो थांबला.

“कॉफी घेऊन जाल ना? इतक्या पावसात मदत केलीत , निदान धन्यवाद तरी म्हणू दे.”

“नको. उशीर झालाय.”

“मला माहिती आहे तुम्ही काय विचार करता आहात.”

तो तिच्याकडे पाहत राहिला.

ती हलकंसं हसली.
“प्रत्येक स्त्री सापळा नसते.”

हे वाक्य त्याला लागलं.
"नाही तसं काही नाही" तो कसंनुसं हसला. स्त्रीने पुरूषाच्या मनातले विचार अचूक ओळखले येणारं खजीलपण होतं त्यात.

तो स्वतःला रॅशनल समजत होता. मग एका वाक्याने एवढं अस्वस्थ का व्हावं?

दोन मिनिटांनी तो तिच्या घरासमोर गाडी उभी करत होता.

घर छोटंसं होतं. जुन्या प्रकारचं. बाहेर पिवळसर बल्ब. लोखंडी गेटला गंज चढलेला. आत मात्र स्वच्छता होती. एखादी व्यक्ती एकटी राहत असेल असं वाटत होतं.

तिने टॉवेल आणून दिला.

“बसा ना. मी कॉफी करते.”

तो सोफ्यावर बसला.
भिंतीवर घड्याळाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. बाहेर पाऊस वाढत होता.

“ लग्न झालंय?” आतून तिचा आवाज आला.

“नाही.”

“का?”

“बस्स. झालं नाही.”

“की आवडलेली कुणी भेटली नाही?”

तो उत्तर देणार इतक्यात ती बाहेर आली. आता तिचे केस मोकळे होते. ओलेपणा कमी झाला होता. ती त्याच्याकडे पाहून काही क्षण थांबली.

“तुम्ही खूप वेगळे आहात.”

“कशावरून?”

“आजकालचे पुरुष एवढे शांत नसतात.”

त्याला हे कौतुक आहे की चाचपणी, समजत नव्हतं.

कॉफी संपेपर्यंत संभाषण हलकं राहिलं. पण वातावरणात काहीतरी बदललं होतं.
ती जास्त जवळ येऊन बसत्ली होती.
नजरा जास्त वेळ थांबत होत्या.

आणि त्याला त्याची जाणीव होत होती.

“मी कपडे बदलून येते,” ती सहज म्हणाली.

ती आत गेली.
दरवाजा पूर्ण लागला नाही.

तो उठून खिडकीपाशी गेला. बाहेर काळोख होता. पावसाच्या धारा म्हातार्या दिव्याच्या प्रकाशात तिरक्या दिसत होत्या.

“तुम्ही अजूनही सावधच आहात का?” आतून तिचा आवाज आला. पाठोपाठ खळखळून हसणं.

“सवय आहे.” ते वेडावून दाखवणं आहे असं त्याला थोडं वाटलं.

“माझी भीती वाटते?”

या प्रश्नाने इगो नाहॊ म्हटलं तरी हर्ट झाला होता. तो उत्तर देणार इतक्यात त्याची नजर नकळत त्या अर्धवट उघड्या दरवाजाकडे गेली. त्याला नको ते दिसलं.

त्याने लगेच नजर हटवली. मात्र उशीर झाला होता.
तिलाही ते जाणवलं होतं.

काही सेकंद शांतता पसरली.

मग ती मुद्दाम दरवाज्याजवळ आली. पूर्ण बाहेर नाही. पूर्ण आतही नाही.

तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता. संकोचही नव्हता.
एक विचित्र आव्हान होतं.

जणू ती म्हणत होती.
"निर्णय घे."

त्याच्या छातीत धडधड वाढली.

एक विचित्र ताण होता.

एक भाग म्हणत होता , हे स्वाभाविक आहे!

दुसरा म्हणत होता ,
काहीतरी चुकतंय.

त्याला अचानक जाणवलं , तो कशाला तरी घाबरतोय.
छे ! तिला अजिबात नाही.
मग ? स्वतःला?

एक स्त्री इतक्या उघडपणे इच्छा दाखवू शकते ही कल्पनाच त्याच्या मनाने, बुद्धीने पूर्ण स्वीकारलेली नव्हती.

त्याने पटकन नजर वळवली.

“मला निघायला हवं.”

ती काही बोलली नाही.

तो दाराकडे चालू लागला. पाठीमागून तिचा आवाज आला.

“तुम्ही गेलात तर पुन्हा भेटणार नाही आपण.”

तो थांबला नाही.

बाहेर पाऊस वेड्यासारखा कोसळत होता. तो गाडीत बसला. इंजिन सुरू केलं.

स्टीयरिंगवर हात ठेवून काही क्षण तो तसाच बसून राहिला.

मग स्वतःशीच हलकंसं हसला.

“वेळेवर निघालास.” स्वत"लाच त्याने उत्तर दिलं. तो स्वत:वर खूष होता.
****

गाडी निघून गेली.

त्या घरात मात्र शांतता उरली नव्हती.

ती बराच वेळ दारात उभी होती. मग हळूहळू आत आली. आरशात स्वतःकडे पाहिलं.

तिच्या डोक्यात राग, अपमान, अविश्वास सगळं एकत्र फिरत होतं.

त्याचं जाणं तिला दुखावून गेलं होतं.

पण त्याहून जास्त एक प्रश्न टोचत होता.

पुरुषाने इच्छा दाखवली तर ती स्वाभाविक.
स्त्रीने दाखवली तर पुरुष मागे का हटतो? कि तो थांबला असता तर त्यालाच पुढाकार घेऊ द्यायला हवा होता?

तिला उत्तर सापडलं नाही.

बाहेर वादळी पाऊस सुरू झालेला होता. तो मात्र त्या वादळापासून दूर निघून गेला होता.
तिने पुढाकार घेतला असता तर स्वत:चे झालेले ऑब्जेक्टिफिकेशन त्याला आवडले असते का? त्याला त्यात आनंद वाटला असता का हा प्रश्न त्या वादळी पावसात विरून गेला होता. दोन्हीकडे!

दोन दिवसांनी ही कथा साहित्य महामंडळाच्या पोर्टलवर अपलोड झाली.

शेवटी फक्त एकच ओळ होती.

“ही कथा एआयने लिहिली आहे की माणसाने?
हिंट कथेतच आहे.”

छान प्रश्न. माझ्या मते हे AI वापरून लिहिले आहे किंवा मनुष्याने लिहिलेले असले तरी मग AI संस्करण केले आहे असे वाटले. बरीच वाक्यरचना थोडी कृत्रिम वाटते, पण विचारले नसते तर हे AI चे लेखन आहे का? असा विचार मुद्दाम मनात आला नसता इतपत ओघवते आहे.

त्यात एखाद्या लेखकाने कथा, कविता किंवा काहीही सृजनशील रचना केली तर ती त्यानेच केलेली आहे यासाठी त्याला पुरावे द्यावे लागणार आहेत लागतील. यासाठी त्यासाठी त्याला साहित्य महामंडळाने अधिकृत केलेल्या निरीक्षकांच्या उपस्थितीतच कथा लिहावी लागणार आहे लागेल. किंवा सीसीटीव्ही लावून कथा पूर्ण होईपर्यंत रेकॉर्डिंग जपून ठेवावे लागणार आहे लागेल आणि ते महामंडळाला द्यावे लागणार आहेलागेल.

त्यात सर्व कोनातून परीसर दिसण्याची अट घातलेली आहे. - AI
...

Pages