कथा कादंबऱ्यांचा यंत्रमानवी कारखाना

Submitted by हेमंतकुमार on 13 May, 2026 - 06:43

AI मुळे पोटार्थी लेखक आणि अन्य काही कलावंत देखील देशोधडीला लागतील की काय अशी वास्तव भीती आज घोंघावते आहे. नोव्हेंबर 2022मध्ये चॅट जीपीटी सार्वजनिक झाल्यानंतरचा AIचा झंझावात सर्वांच्या डोळ्यांसमोर आहेच. सुरुवातीस हे प्रकरण विज्ञान तंत्रज्ञानापुरते सीमित राहील अशी एक वेडी आशा सामान्य माणसाला होती. परंतु त्यानंतर या यंत्रप्रज्ञेने जीवनाच्या असंख्य क्षेत्रांत प्रवेश करून अक्षरशः धुमाकूळ घातलेला दिसतो. लेखन आणि कलाक्षेत्रही या आक्रमणापासून बचावलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर सन 1954 मधील Roald Dahl या ब्रिटिश लेखकाच्या ‘The Great Automatic Grammatizator’ या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रभावी विडंबन करणाऱ्या समर्थ कथेची प्रकर्षाने आठवण होत आहे. AI सारखे मानवनिर्मित तंत्रज्ञानच एके दिवशी आपल्या मानगुटीवर बसेल आणि त्यातून मानवी विचारक्षमता आणि सर्जनशीलतेचा अंत होण्याचा धोका आहे हे भयस्वप्न त्या कथेतून व्यक्त झालेले आहे. गेल्या 72 वर्षानंतर ती कथा आज तर अधिकच कालसुसंगत ठरल्याने सादर आहे तिचा हा अल्पपरिचय :

तंत्रकुशल नोकर असलेला त्या कथेचा नायक गणिते सोडवणारा एक भला मोठा संगणक तयार करतो. त्यानंतर शिणलेल्या अवस्थेत तो विश्रांती घेत असताना त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते की, इंग्रजी भाषेचे व्याकरण देखील गणितीय सूत्रांप्रमाणे काटेकोर बांधलेले आहे. अशाच एखाद्या अन्य संगणकात जर आपण अंकांच्या ऐवजी शब्द आणि लेखनकल्पना (plots) ठासून भरल्या तर त्यातून हव्या त्या प्रकारची आणि अगदी प्रमाणभाषेतली व्याकरणशुद्ध कथा-कादंबरी सहज तयार होऊ शकेल ! आयुष्यात आपणही कधीतरी लेखक व्हावे ही त्याची मनीषा होती पण प्रयत्नांती देखील त्याला त्यात यश आलेले नव्हते.

मग तो या कल्पनेला मूर्त स्वरूप देऊन असाच एक भला मोठा संगणक तयार करतो. त्यात कथा-कादंबरी लिहिण्यासाठी लागणारा सर्व मसाला अर्थात ‘कच्चा माल’ विविध प्रणालींद्वारे भरला जातो. प्रत्येक प्रणालीसाठी यंत्रावर एक स्वतंत्र बटन ठेवलेले असते आणि त्यानुसार यंत्रात कथानकाचे प्रकार, मध्यवर्ती संकल्पना, लेखनशैली, पात्रे, शब्दसंग्रह आणि व्याकरणाचे नियम हे सर्व काही यथास्थित भरले जाते. तसेच प्रत्येक कथेमध्ये अथवा कादंबरीच्या प्रत्येक प्रकरणात एखादा तरी लांबलचक आणि गूढ शब्द घालण्याची त्यात सोय होती. असा शब्द घालण्याने वाचकाच्या लेखी तो लेखक एकदम प्रतिभावान ठरतो असे नायकाचे म्हणणे ! याचबरोबर कथानकात मिसळण्यासाठी आनंद, दुःख, विनोद, कारुण्य, रहस्य आणि वर असोशीची फोडणी या सर्व गुणधर्मांचीही सोय करण्यात आली. एकंदरीत पाहता त्या काळी बाजारात यशस्वी ठरलेल्या अनेक पुस्तकांचा अभ्यास करून वरील सर्व मालमसाला यंत्राला पुरवण्यात आला. सरतेशेवटी, यंत्रातून लेखनाचे उत्पादन करताना त्याचा सुमार दर्जा हा निकष महत्त्वाचा ठरवण्यात आलेला होता.

मग तो त्याच्या मालकाला ही अभूतपूर्व योजना पटवून देतो आणि त्यानुसार लेखन पाडून ते दोघेही रातोरात लेखक बनतात आणि त्यावर चांगली कमाई पण करू लागतात. त्यातूनच पुढे एक मोठा साहित्यिक धंदा उभा राहतो. नंतर अनेक काल्पनिक लेखकांच्या नावांनी देखील ते साहित्य-उत्पादन वाढवू लागतात. तरी देखील खऱ्याखुऱ्या हयात प्रतिभावंत लेखकांशी आपल्याला अजूनही स्पर्धा करावी लागतेय याची त्या नायकाला खंत असते. मग तो त्याचे अखेरचे अतिसंहारक ब्रह्मास्त्र सोडायचे ठरवतो. तो अनेक प्रथितयश लेखकांना भेटतो आणि त्यांच्यापुढे एक करारनामा ठेवतो. त्यामध्ये असे म्हटलेले असते की संबंधित लेखकाने त्याचे आयुष्यभराचे जे काय मानधन असेल ते एकदाच या संगणक कंपनीकडून घ्यावे आणि इथून पुढे ती कंपनी जे साहित्य निर्माण करेल त्यावर आपले नाव वापरण्याची लेखी परवानगी देऊन टाकावी. याखेरीज त्या लेखकांनी इथून पुढच्या आयुष्यात अन्यत्र काहीही सार्वजनिक लिहायचे नाही हीदेखील जाचक अट.

नायकाच्या या प्रयत्नांना संमिश्र प्रतिसाद मिळतो. काही तरुण लेखक तर त्याला जवळपास कानाखाली काढूनच बाहेर हाकलतात. पण प्रणयकथांची राणी असलेल्या एका श्रीमंत लेखिकेला ही कल्पना खूपच रंजक वाटते आणि ती संगणक प्रत्यक्ष बघण्याची इच्छा व्यक्त करते. नायक तिची इच्छा पूर्ण करतो आणि तिलाच तिथे योग्य ती बटणे दाबायला बसवतो. त्यातून जी कादंबरी निर्माण होते ती वाचून ती लेखिका अवाक् होते कारण तिला जाणवते की तिच्या स्वतःच्या सर्जनशील लेखनापेक्षाही त्या यंत्रातून निघालेली कादंबरी अधिक चांगली आहे ! मग ती आनंदाने करारनाम्यावर सही करते.
अशा तऱ्हेने तेव्हाच्या साहित्यिक विश्वातले जवळपास 70% लेखक गुमान तो करार मंजूर करून आपले स्वत्व त्या यंत्राला विकतात. ओसरणीला लागलेले ज्येष्ठ लेखक तर या प्रस्तावाला अगदी सहज बळी पडतात.

कथेच्या अखेरीस उभरता लेखक असलेला कथानिवेदक या सर्व प्रकाराने भयंकर अस्वस्थ झालेला दाखवलाय. या यांत्रिक साहित्यिक धंद्यामुळे त्याच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे. परिणामी त्या करारनाम्यावर आपण देखील सही करावी की काय अशा द्विधा मनस्थितीत तो आहे. पण अखेरीस वैतागून तो देवाला म्हणतो,
“ही उपासमार सहन करण्याची ताकद मला दे रे, देवा !”
या उदास व खिन्न सुरावर ती कथा संपते.

कथा अप्रतिम व ओघवती आहे. तिची भाषा तर सोपी आणि मधाळ. संपूर्ण कथेत लेखकाने (विस्तृत स्पष्टीकरण या अर्थी) वापरलेला 'epexegetically' हा एक शब्द पूर्णतः अपरिचित असल्याने अवघड व बोजड वाटला. कदाचित कथेच्या आशयाला पुष्टी मिळण्यासाठीच तो वापरला गेला असावा का ? किंवा कदाचित 1954मधील ब्रिटिश इंग्लिशचा तो खास नमुना असू शकेल.
कथेत सूचित केल्याप्रमाणे कालौघात तंत्रज्ञानाच्या तुफान रेट्यात मनुष्य-लिखित साहित्याचे भवितव्य असे दारुण असेल काय, हा विचार वाचकांच्या मनात सोडण्यात कथा यशस्वी होते. हेच तिचे बलस्थान. तसेच कथनाच्या ओघात ती लेखन व प्रकाशन क्षेत्रातील विविध वृत्तीप्रवृत्तींना छानसे चिमटे देखील घेते. आज त्यातली 1954 मध्ये मांडलेली भयसंकल्पना आज वास्तवात उतरलेली पाहून आपल्यालाही भयाण अस्वस्थ वाटल्याशिवाय राहत नाही.

कथेचे दणदणीत शीर्षक तर मार्मिक आणि तिच्या आशयाला अतिशय साजेसे आहे. Great या शब्दातून तंत्रज्ञानाची घमेंड दाखवली आहे तर Grammatizator हा लंबाचौडा व तिरपागडा शब्द कॅल्क्युलेटर व जनरेटरच्या धर्तीवर खास तयार करण्यात आलेला दिसतो. मानवी भावभावना व्यक्त करणारी आतड्याची भाषा अखेर एका यंत्राची गुलाम होऊन राहते हा त्यातून व्यक्त होणारा भाव आपल्याला थरारून टाकतो. एकूण काय, तर ही कथा मुळातून वाचण्यातच खरी मजा आहे.
. . .
आता येऊ थेट 2026 मध्ये . . .
काय दिसतंय अवतीभवतीच्या लेखनविश्वात ? साहित्य असो की पत्रकारिता, शैक्षणिक पातळीवरील निबंध असोत की प्रबंध, नोकरीचे अर्ज असोत की संस्थांचे नियमित अहवाल, सर्वत्र एआय वापरून पाडलेल्या विविध प्रकारच्या सपक व निर्जीव लेखनाचा सुळसुळाट झालेला दिसतोय. त्यातला काही अधिकउणे भाग अगदी नजरेत भरण्यासारखा आहे. भाषा आणि व्याकरणशुद्धता, तर्कसंगत मांडणी आणि एकंदरीत सभ्यता व सांस्कृतिकतेचा मुलामा असलेले लेखन आता कुठल्याही सुमार लेखकाला यंत्राद्वारे आयते हाती मिळत आहे. सुमारे 25-30 वर्षांपूर्वी ‘खाऊजा’ धोरण अवतरल्यानंतर जगभर जसे सांस्कृतिक सपाटीकरण दिसून आले तद्वत आज हे लेखनातले सपाटीकरण अगदी सहज जाणवते आहे. एकदा का लेखनासाठी यंत्रमानवी मदत घ्यायचे ठरवले की मग प्रयत्नांती सुद्धा खराब लेखन करता येत नाही, हा झाला अधिकचा भाग. परंतु उण्याच्या बाजूला लेखनातील सपक यांत्रिकपणा, रुक्ष कोरडी भाषा, वाचकाच्या मनाला साद घालण्यातील असमर्थता आणि नव्या धाडसी लेखनप्रयोगांचा अभाव या उणिवा अगदी प्रथमदर्शनीच जाणवतात. भविष्यात जर बहुसंख्य लेखन याच पद्धतीचे होत राहिले तर त्यातून वाचकांची विचारक्षमता रुंदावणे तर कठीणच. चांगले लेखक जर हळूहळू संपू लागले तर चांगले वाचक तयार होणे देखील अर्थातच संपुष्टात येणार. परिणामी स्वतंत्र विचारशक्ती गमावलेला यंत्रवत समाज हे पुढच्या शतकातील चित्र असेल काय, अशी साधार भीती आज सतावते.

मानवाने आपली अफाट आणि अचाट बुद्धी वापरून हे लेखनतंत्र निर्माण करून ठेवले खरे, पण आजच्या घडीला ते त्याच्याच उरावर बसू पाहतंय. ही समस्या तर उद्भवली आहे आणि तिच्यातून मार्ग काढणे हा देखील एक मानवी गुणधर्मच. काही विचारी लेखकांनी त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न जरूर चालवलेले आहेत. आपले लेखन खरोखर नैसर्गिक (मानवी) वाटण्यासाठी लेखनात काही विशिष्ट बदल केले जात आहेत. त्यामध्ये लेखनात बोलीभाषा आणि विशिष्ट समूहांच्या भाषेचा (slangs) पुरेसा वापर, पारंपरिक लेखनशैलीची काही प्रमाणात मोडतोड, वाचकाला साद घालणारी निवेदनपद्धती, काही प्रमाणात मुद्दामून बिघडवलेली शब्द अथवा वाक्यरचना आणि काही धाडसी लेखन प्रयोगांचा समावेश, हे त्यातले काही उपाय. ही झाली लेखकांची बाजू.

man lens book.png
( सौजन्य : Vectors)
दुसऱ्या बाजूस वाचकांनीही जागरूक असणे महत्त्वाचे आहे. या संदर्भात पाश्चात्य जगात नुकतेच घडलेले एक उदाहरण पथदर्शक ठरावे. Mia Ballard या लेखिकेची Shy Girl ही भय-कादंबरी निर्मितीक्षम एआय वापरून लिहीली असल्याचे तीव्र आक्षेप अनेक वाचकांकडून आल्यानंतर संबंधित प्रकाशकांनी ती कादंबरी मागे घेतल्याचे जाहीर केलेले आहे. इंग्रजीचे जागतिक स्थान आणि महत्त्व पाहता त्या भाषेत केलेले एआय-निर्मित लेखन सध्या बहुधा सर्वाधिक असू शकेल. त्या तुलनेत सध्या तरी प्रादेशिक भाषांमधले ‘असले’ उद्योग मर्यादित असावेत. त्या भाषांमध्ये बेमालूम घुसखोरी करण्यासाठी या तंत्राला अजून बराच पल्ला गाठावा लागेल.

एकंदरीत पाहता नजीकच्या काळात साहित्यजगतात दोन प्रकारची लेखने वाचकांना उपलब्ध असतील. त्यापैकी एक असेल ते लेखकाने स्वयंप्रज्ञेने केलेले नैसर्गिक व प्रामाणिक लेखन आणि दुसरे म्हणजे अर्थातच एआयच्या कारखान्यातून घाऊक प्रमाणात बाहेर पडलेले कृत्रिम चकचकीत लेखन. बाजारातील या दोन्हींच्या स्पर्धेत आपल्या पुढ्यातील लेखनाचा नीरक्षीरविवेक करणे हे सर्वस्वी सुजाण वाचकाच्या हातात असेल.
************************************************************************************************************
टीप : हा लेख लिहिण्यासाठी आंतरजालावरील मुक्त माहितीचा वापर केलेला असला तरीही प्रत्यक्ष हे लेखन स्वतः विचार करून आणि मानवी हातांनीच लिहिलेले आहे याची खात्री बाळगावी ! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथेचा परिचय आवडला. चर्चाही छान सुरू आहे; वाचतो आहे.

माझ्या एआइच्या वापराबद्दलचं मुक्त चिंतन -

मागच्या काही काळापासून, एखादी माहिती हवी असेल तर त्यासाठी प्राथमिक विचार करून झाल्यानंतर मग "एआइला कोणता प्रॉम्प्ट् द्यावा, त्याचे शब्दरचना कशी ठेवावी" असा विचार मनात येतो. ही प्रगती की अधोगती की दुर्गती हे माहित नाही पण असे होत आहे हे खरे.

एआइने लिहिलेल्या साहित्याबद्दल -

एकेकाळी दुकाने आस्थापने वगैरेंच्या पाट्या चित्रकार लोक रंगवून द्यायचे. सुरेख अक्षरे काढू शकणाऱ्या चित्रकारांना मागणी असायची. त्यांचा प्रती चौरस फूट दरही जास्त असायचा. त्या पाट्या वर्षानुवर्षे तशाच वापरात असायच्या. दशकभरापूर्वीच ते सर्व प्रकार बंद झाले. डीटीपी करून फ्लेक्स प्रिंटिंग हा प्रकार इंडस्ट्री स्टॅंडर्ड झाला. "हा अमुक चौरस फुटांचा प्लॉट तमुकाच्या मालकीचा आहे" अश्या मोकळ्या भूखंडावर रोवलेल्या काळ्या-पांढऱ्या पाट्या वगळता इतरत्र सर्वत्र फ्लेक्स प्रिंटिंग च्या चार दोन दिवस ते चार सहा महिने टिकणाऱ्या पाट्या दिसतात. याची सर्वांना सवयही झालेली आहे आणि त्यात काही वावग ही दिसत नाही. अशा पाट्या रंगवणारे चित्रकार लोक काळाच्या पडद्याआड गेले आहेत. (या विवेचनात "चित्रकला" या सदरातील स्वस्त ते महागडी विकली जाणारी चित्रे यांचा अंतर्भाव नाही).

आज पर्यंत लिखित साहित्य मग ते एखादे घोषवाक्य असो की चारोळी असो की कविता असो की कथा, कादंबरी, गद्य असो, मानवी प्रतिभेने लिहिले जात आहे. ‌ उद्या ते तसे असणार नाही. ‌एआइला प्रॉम्प्ट् देऊन हवा तो मजकूर उत्पन्न करून घेणे हे इंडस्ट्री स्टॅंडर्ड होईल. त्यात कुणाला वावगे वाटणार नाही. सर्वांनाच त्याची सवय होईल. लेखक कवी लोक्स् काळाच्या पडद्याआड जातील...

कोणते लेखन यावर अबलंबुन असणार आहे ना AI ने लिहिलेले आवडेल की नाही.
माहितीपर लेख, फिक्शन-त्यातल्या प्लॉट सकट वगैरे AI जेव्हा योग्य भाषेत लिहेल तेव्हा कुणी लिहिला त्याने काय फरक पडणार नाही दर्जा महत्वाचा.
जिथे मानवी भाव व्यक्त करायचा आहे तिथे हे AI ने लिहिलेय कळले तर विरस होईल. उदा: प्रियकरासाठी/प्रेयसीसाठी लिहिलेली कविता, विरहगीत, एखादी व्यक्ती एखाद्या परिस्थितीतून जात असेल त्याचा तिच्या दृष्टीकोनातला वर्णनात्मक लेख तिने स्वतः न लिहिता AI कडुन लिहून घेतला.

... अर्थातच, "साहित्यकार" या entity ची तुलना पाट्या रंगवणाऱ्या पेंटर शी करणे हे अयोग्य वाटेल पण technology is probably the biggest leveller. त्यामुळे "लिखित साहित्य प्रसृत करणे" हे काम एखादा मानव करतोय की एखादा एआइ करतोय या फरकाला काही महत्त्व शिल्लक राहील का असा प्रश्न आहे.

जशी फ्लेक्स प्रिंटिंगने हाताने पाट्या रंगवण्याची परंपरा मागे टाकली, तशीच एआइ-निर्मित लेखन मानवी लेखक आणि कवी यांच्या पारंपरिक भूमिकेला मागे टाकेल . काळाच्या ओघात लेखक आणि कवी यांची संख्या, गरज आणि भूमिका बदलेल.

चर्चा रंगतदार होत आहे . . .
* AI ने लिहिलेय कळले तर विरस होईल. उदा: प्रियकरासाठी/प्रेयसीसाठी लिहिलेली कविता, विरहगीत,
>>>> छान मुद्दा. अगदी प्रियतम !
. .
* "लिखित साहित्य प्रसृत करणे" हे काम एखादा मानव करतोय की एखादा एआइ..
>>>> खरंय !
आता याही पुढची 50- 100 वर्षांची भरारी मारायची म्हटली, तर असाही विचार व्यक्त झालेला आहे की, अमुक तमुक प्रकारचा गॉगल किंवा एखादे उपकरण परिधान केले असता आपण फक्त 'विचार' (?) करायचा आणि संबंधित कला आपल्या डोळ्यासमोर सादर होईल किंवा नाचू लागेल, वगैरे !
म्हणजेच लेखन असो किंवा अन्य कोणतीही कला, ती अन्य कोणीतरी/ कोणीही सादर करायची तरी गरज उरेल का ?
यातील विज्ञान मला समजत नाही परंतु ही निव्वळ कल्पनेची भरारी . . .

आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे

खरंच कि! हे लक्षात आलं नाही. म्हणजे एआय सृजनशील नाही. मॅन्युप्युलेटिव्ह आहे.

Submitted by मानव पृथ्वीकर on 26 May, 2026 - 00:01 >> सहमत.

याबाबत एआय वापरण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे बनवावीत. किंवा थोडं नियमाच रूप हवं असेल तर आचारसंहिता बनवावी.

एआय चा वापर साहित्य, लेख, कविता, पटकथा, सिनेमा यात कुठपर्यंत करायला हरकत नाही हे साधकबाधक घुसळण होऊन ठरावे.

सिनेमा हे माध्यम टेकसॅव्ही असल्याने जर त्यांच्या गुणवत्तेत वृद्धी होत असेल, पैशांची आणि वैळेची बचत होत असेल तर ते वापरणारच.

आज दक्षिणेकडे 200 कोटी, 100 कोटी असं मानधन कलाकारांना द्यावं लागतं. त्याऐवजी एखाद्या कलाकाराला आयुष्यात एकदाच 500 कोटी रूपये जरी दिले आणि त्याचा वापर करून पुढे वर्षाला 10 सिनेमे बनवले तरी परवडेल ते.

मानव
जिथे मानवी भाव व्यक्त करायचा आहे तिथे हे AI ने लिहिलेय कळले तर विरस होईल. उदा: प्रियकरासाठी/प्रेयसीसाठी लिहिलेली कविता, विरहगीत, एखाद्या व्यक्ती एखाद्या परिस्थितीतून जात असेल त्याचा तिच्या दृष्टीकोनातला वर्णनात्मक लेख तिने स्वतः लिहिता AI कडुन लिहून घेतला.>>>>
जेव्हा पहिल्या पहिल्या बातम्या आल्या तेव्हा अगदी ह्याच विषयावर मी एक कथा लिहिली होती. त्याची आठवण झाली.

<<त्यामुळे "लिखित साहित्य प्रसृत करणे" हे काम एखादा मानव करतोय की एखादा एआइ करतोय या फरकाला काही महत्त्व शिल्लक राहील का असा प्रश्न आहे.>> मुद्दा कळला. आपले भाव सांगितले आणि एआय ने प्रत्यक्ष शब्दांत उतरवले तेव्हा कुणी लिहिले यातील फरकाचे महत्व कमी होईल. बरोबर ना?

एकाच घरात अथवा जवळच राहणाऱ्या जवळच्या व्यक्तीने बागेतील फूल आणुन देणे विरुद्ध ऑनलाइन पुष्पगुच्छ ऑर्डर करून कामावर गेले असता डिलिव्हरी झाल्याचा मेसेज आल्यावर फोन करणे ते आता व्हॉट्सऍपवर पुष्पांचा ऍनिमेटेड वर्षाव करणे हा बदल पहातच आहोत. यात अनेक लोक समाधानी आहेत. यातही जर एआय ऑटोमेशने ठराविक दिवशी एकच वाटु नये दर वेळेस वेगवेगळ्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आणि त्याला मानवी स्पर्शाचा म्हणजे यात मनापासून सहभागी असण्याचा फॉलोअप नसेल तर ते कसे वाटेल? सगळं ऑटोमेट करूनही त्यात मानवी सहभागाची, स्पर्शाची अपेक्षा राहील. जिथे मानवी भाव व्यक्त होण्याची अपेक्षा आहे तिथे. म्हणजे सगळं AI थ्रू होऊन शेवटी तिथे ही एक मर्यादा असेल असे आता तरी वाटते.

केकू वाचेन ती कथा.

ए आय ने हुबेहूब मानवी लेखनाची नक्कल करणे, यात काही बाबी अनसेटलिंग आहेत. धक्कादायक! जर ए आय, सहजतेने मानवी भावना व्यक्त करत असेल तर, फसवले गेल्याची भावना येते. मानवी उदात्त क्षेत्रावरती एखाद्या परग्रहावरील जीवाने अतिक्रमण करावे तसे काहीसे. कदाचित आपले (माणसाचे) भावविश्व , खूप यांत्रिकी असल्याचा साक्षात्कार होउन, स्विकारणे अवघड जाते. माणसाच्या भावना १+१ = २ अश्या समीकरणांत बसवता येतात. एका इनपुट- आउटपुट, ब्लॅक बॉक्स मध्ये घालता येतात हे खरोखर भितीदायक आहे. आतापर्यंत सगळ्याची चिरफाड करुन झालेली आहे - मन, मेंदू - काहीही गूढ उरलेले नाही खरे तर. पण ते असे 'इन युअर फेस' समोर येणे स्विकारणे अवघड आहे. सुमार लेखक भराभर ए आय वापरुन उच्च कल्पना रचू शकतील व त्यात काहीही गूढ किंवा स्पेशल रहाणार नाही - हे स्विकारणे अवघड आहे.

वरील प्रतिसादांचा धांडोळा -

राज अज्ञानी यांनी वरती लिहीलेले आहे -
>>>>माणसाची क्रिएटिव्हिटी सर्वोच्च आहे. तिची जागा एआय घेऊ शकत नाही.
ही भाबडी आशा आहे. माणसाच्या, या आशेचा तंतू हळूहळू क्षिण होणार आहे. असे मला वाटते.
----------------
>>>>मला सुद्धा ह्या AI मुळे आपण विचारशक्ती, प्रतिभाशक्ती गमावून बसू की काय असे वाटते.
ऋतुराज यांचा हा मुद्दा रास्त आहे. सगळं आयतं मिळालं तर हळू हळू ब्रेन पॉवरला 'युझ इट ऑर लुझ इट' न्यायाने घरघर लागू शकते.
-------------
>>>Although AI can generate creative texts, its writing may not “move souls” the way human writing does.
भाबडी आशा आहे. खेदाने असे म्हणावे लागते आहे की ती सीमारेषा पुसट होते आहे. माबोवरतीच काही ए आय कंटेंट दिसते आणि ते सुधरत चालले आहे असे वाटते.
------------------
केकू यांचा मुद्दा फार आवडला आणि भरपूर विज्ञान साहित्य वाचनामुळे, त्यांचा कालपनिकता स्वीकारण्याचा, 'आय क्यु' जस्त असावा असे वाटते.
---------------------
बाकी मॉरली (नैतिकदृष्ट्या) काय चूकीचे आहे ते मला कळलेले नाही.

वरील गजल तयार करताना एआयने शांता शेळके यांच्या
‘आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे’. .
या कवितेचा आधार घेतला असावा का, अशी एक शंका उगाचच मनात आली.
दोन्ही काव्यांमध्ये भरपूर ‘मुळे’ आहेत .>>> शक्य आह्रे. कारण AI ला जास्त मराठी शिकवले गेले नसावे.

हो.
माझा मुद्दा AI मानवी भावना उतरवू शकणार नाही, त्यात कमी पडेल असा नाही. अधिक प्रभावीपणे उतरवू शकेल बहुतेक.
ठराविक विषयात हे होऊनही, मानवी सहभागाची व स्पर्शाची असणारी अपेक्षा , हे AI निर्मित आहे हे कळल्यावर होणारा विरस हा आहे.

* हे होऊनही, मानवी सहभागाचा व स्पर्शाची असणारी अपेक्षा , हे AI निर्मित आहे हे कळल्यावर होणारा विरस
>>>> अ - ग - दी . अनुमोदन.

उत्तम आणि विविधांगी चर्चा !

* काळाच्या ओघात लेखक आणि कवी यांची संख्या, गरज आणि भूमिका बदलेल.
>>>> चांगला मुद्दा.
मागच्या आठवड्यात मी छापील मटामध्ये एका लेखात वाचले की, शिक्षक/ प्राध्यापक याचीही व्याख्या आता बदलावी लागणार आहे ती अशी :
"जो माणूस विद्यार्थ्याला एआयचा सुयोग्य वापर कसा करायचा हे शिकवतो, तो म्हणजे शिक्षक".

AI ला सापत्न वागणूक देणं मला एकदम फेअर वाटतं कारण माणसांवर अन्याय होणार आहे त्याच्यामुळे. सगळे कलाकार उदरनिर्वाहासाठी काय करणार ? आपण येथे हौशी लेखन करतो, याच्यावर आपलं पोटपाणी अवलंबून नाही म्हणून काहीही लिहायचं स्वातंत्र्य मिळतं, आपण कुणाच्याही अंकित नाही. Survival of the fittest, smartest माणसांमधे आपसात applicable आहे. मशीन आणि माणसांमध्ये अन्यायकारक आहे. शेवटी कालाय तस्मै नमः होऊन जे व्हायचं ते होईल पण AI च्या कळवळ्यापेक्षा जिवंत माणसं महत्त्वाची आहेत. कधीही , विश्वाच्या अंतापर्यंत!

आणि या सगळ्यामुळे बेकारी वाढली तर गुन्हेगारी आपसूकच वाढेल. नीतिमत्ता खालावेल व हळूहळू पूर्ण समाजाची अधोगती होईल. कंप्युटरचा विरोध आणि एआयचा विरोध सारखा नाही. हे कितीतरी तीव्र आणि invading आहे. कलेच्या उत्कर्षापेक्षा किंवा अवनतीपेक्षाही खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. माणसांना सापत्न वागणूक देण्यापेक्षा ए आयला देईन. आपणच तयार केलेला आणि पोसत असलेला भस्मासुर आहे.

The Velvet Sundown - Dust and Silence [Full AI Album]
Is AI the future of music? Today on Lukose Music Group we present a new album by the rising AI stars, The Velvet Sundown. This is a boy band fully powered by AI. What do you think?
https://www.youtube.com/watch?v=DKhfVISCK_Y
ह्या विषयाशी संबंधी बातमी इथे आहे, Must Read.
https://www.bbc.com/news/articles/cp8mjnn7eqno

दुर्दैवाने परिणाम प्रेडीक्शन ना आपण करू शकतो ना एआय.
ते परिणाम दिसल्यावरच कोर्स करेक्शन करावे लागणार आहे. एआय नकोच असं कोणीच म्हणू शकत नाही, कारण ही बस चुकवून चालायचे नाही. ते लिमिट मध्ये हवं, हे ही कठिणच? काय लिमिट, कसलं लिमिट, ते कोण ठरवणार, दुसर्‍या देशांनी लिमिट वरचढ ठरवलं आणि आपण मागे राहिलो तर? रॅटरेस मध्ये उडी मारल्याशिवाय आणि आकंठ बुडल्याशिवाय त्यातुन बाहेर यायचा मार्ग नाही. तसा आहे असा दावा ही कोणी करू नये. को-लॅटरल डॅमेज होणारच आहे. ते कमी कसं करता येईल ते ही झाल्यावरच समजेल.
सध्या एआयचा पुरेपूर आनंद घ्यावा, उपयोग आणि उपभोग करावा, शिकावे.. पुढच पुढे.
पूर्वी चर्मकार पादत्राणे हाती बनवत. मग ते मिडल क्लास होऊन मशीन फॅक्टरी मधली पादत्राणे फॅशन मध्ये आली, आता सगळेच मशिनची वापरुन लागल्यावर परत हाती बनवलेली एकदम इलिट झाली. असंच कारखान्यातील कथा, माणसाने लिहिलेल्या कथा हे ही चक्रच बनेल.
अ‍ॅज अ कन्झ्युमर वेगळं काही दिसलं की मजा येते.

सगळे कलाकार उदरनिर्वाहासाठी काय करणार ? >>
दुकानाच्या पाट्या आणि सिनेमाची पोस्टर रंगवणारे, सर्कशीतले कलाकार, बूट दुरुस्त करणारे चांभार, रेडिओ/टीव्ही/घड्याळे दुरुस्त करणारे, भांड्यांना कल्हई करणारे, लिफ्ट ऑपरेटर, बुक बाईंडर, टायपिस्ट, स्टेनोग्राफर, PCO चालवणारे, PBX ऑपरेटर, कापूस पिंजारी, सुऱ्याना धार लावणारे, सायकल रिक्षा/घोडागाडी चालवणारे लोक आता काय करतात? तसेच काहीतरी.
पूर्वी फोटोग्राफी हा एक वेगळा व्यवसाय होता, आता कुणीही सोम्यागोम्या या कलाकाराइतकाच, किंबहुना अधिक चांगला फोटोग्राफर होऊ शकतो.

हे इतकं ट्रिव्हिअलाईज करता येण्यासारखं नाही.
पुढच्या १२ ते १८ महिन्यांत १००% व्हाईट कॉलर जॉब एआय करू शकेल. १००% पिरिएड!
इंडस्ट्रिलायझेशन, संगणकीकरण हे बदल ज्या वेगात झाले त्याच्या १००० पट वेगात प्रकार घडत आहेत. अ‍ॅज अ कन्झ्युमर चांगलंच आहे, पण अ‍ॅज अ पॉलिसीमेकर यु कॅन जस्ट नॉट से की हा वर्क फोर्स गरजेचा नाही. दिग्गज कंपन्यांच्या सीईओजनी उगाच नाही यावर १ वर्ष ब्रेक लावा दीड वर्षांपूर्वी सांगितलेलं. Wink समस्येवर वाळूत डोकं खुपसू नका पण ट्रिविअलाईज ही करू नका.

हे इतकं ट्रिव्हिअलाईज करता येण्यासारखं नाही. >> +१
माझी काळजी फक्त कला या विषयापुरती मर्यादित नाही. एआयमुळे जागतिक मंदी येण्याची भीती आहे, असं मला वाटतंय. (एआयमुळे नोकऱ्या नाहीत व एआय चा बुडबुडा फुटून स्टॉक मार्केट कोसळले, या दोन्ही शक्यता वाटत आहेत.)

>>शक्य आह्रे. कारण AI ला जास्त मराठी शिकवले गेले नसावे.<< +१
मी तर पुढे जाउन असं म्हणेन कि शांताबाईंच्या त्या चित्रपटगीताशी जोडलेला संबंध हा निव्वळ योगायोग आहे..

मूळात (नो पन इंटेंडेड) एआय बाय इटसेल्फ, डझंट इंडल्ज इन प्लेजरिझ्म. एआयचा वापर अनेकांनी सारख्याच उद्देशा करता केला तर (युसेज लेवलवर) प्लेजरिझ्मची शक्यता टाळु शकत नाहि...

>>एआयमुळे जागतिक मंदी येण्याची भीती आहे, असं मला वाटतंय. <<
७०-८०च्या दशकात, भारतात कंप्युटरायझेशन्च्या बाबतीत कहिशी अशीच सरकार/जनतेची धोरणं/धारणा होती. त्यानंतर इंटरेनेट, मोबाय्ल टेक्नालजीने क्रांती घडवली - द वे वी डु बिझनेस. त्यानंतर्च्या काळांत बर्‍याचदा मंदी आली पण तिला कारणीभूत टेक्नालजी कधीच नव्हती. इन फॅक्ट, कुठल्याहि मंदीला टेक्नालजी इनोवेशन कारणीभूत असुच शकत नाहि, इफ यु गियर अप टु राइड दॅट वेव. .

वी आर अबौट टु वॉच द सेम मुवि अगेन.

एआय डेफिनेटली मंडेन जॉब्स आब्सोलिट करेल, पण त्याच बरोबर अनेक स्पेशलाय्ज्ड जॉब्स निर्माण करेल. याबाबतीत, जेन्सन वांग काय म्हणतो ते लक्षात घेण्याजोगं आहे - यु आर नॉट लुझिंग योर जॉब टु एआय, बट टु समवन हु युजेस इट बेटर...

बूम बस्ट ह्या सायक्लिक असतात. ह्यावर बरेच संशोधन झाले आहे. कदाचित टेक्नोलोजीचा दुरून दम्बंध असावा. पण मूलतः माणसाचा लोभीपणा कारणी भूत असावा.

माहितीपूर्ण चर्चा. वाचतोय.
सध्या लेखक या जमातीपुरते बोलायचे झाल्यास दोन गोष्टी दिसतात :
१. लेखनावर पोट असणाऱ्या लेखकांना इच्छा असो वा नसो, सध्याच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जे इतर लेखक करत आहेत ते सर्व काही कमीअधिक प्रमाणात करावे(च) लागेल.

२. या उलट हौशी लेखक पूर्णपणे स्वतंत्र आहेत आणि जोपर्यंत तुमच्या नैसर्गिक मानवी लेखनाचा वाचक आणि चाहता वर्ग दिसून येतो आहे तोपर्यंत त्यांना त्यांच्या आवडीनुसार पारंपरिक पद्धतीनेच लेखन करता येईल. त्या नैसर्गिक लेखनाचा आनंद (निर्मिती/ वाचन) असे लेखक आणि त्यांचे वाचक या दोघांनीही घेत राहावा.

आजच्या पुणे छापील मटामध्ये संपादकीय पानावर 'प्रतिभांचे द्वंद्व' हे छान स्फुट आहे. त्यात आपण वर चर्चा केलेल्या आंतरराष्ट्रीय साहित्य क्षेत्रातील दोन घटनांचा उल्लेख आहेच.

<< एआय डेफिनेटली मंडेन जॉब्स आब्सोलिट करेल ...
- यु आर नॉट लुझिंग योर जॉब टु एआय, बट टु समवन हु युजेस इट बेटर... >>

प्लीज स्टॉप ड्रिंकिंग द कूल-एड. पीएचडी फोक्स डेफिनेटली नो हाव टू यूज ए आय.
https://youtu.be/DukwwhRPqF4?si=EjD1ycblwCUxCiz6

यु आर नॉट लुझिंग योर जॉब टु एआय, बट टु समवन हु युजेस इट बेटर... >> हे विधान बरोबर आहे, पण माझ्या मते हे बिझनेसना जास्त लागू आहे. जो बिझनेस एआय चांगला वापरेल तो तरेल. पण individuals मात्र या लढाईत हरायची शक्यता जास्त. या सगळ्या रामायणाचा अर्थ एकच. जो जिंकतो तो राम, जो हरतो तो रावण आणि मरतात ती माकडे. सामान्य माणूस हा फक्त माकड ठरणार, जो जिंकतही नाही, हरतही नाही, तो फक्त मरतो. (रामायणाचा किस्सा श्री. दीपक घैसास यांच्याकडून ऐकला आहे, इथे योग्य वाटला म्हणून वापरला. श्रेय त्यांचे.)

Pages