मुंबईत महाराष्ट्रात रिक्षा/टॅक्सी चालवायची असल्यास मराठी बोलता यायलाच हवी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 April, 2026 - 04:47

महाराष्ट्र सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य केली आहे. १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) पासून मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांचे परवाने (License/Permit) रद्द केले जातील, अशी घोषणा परिवहन विभागाकडून करण्यात आली आहे.

हा नियम प्रामुख्याने मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमधील रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आहे.
नियमाची योग्य अंमलबजावणी करायला चालकांना मराठी वाचता, लिहिता आणि बोलता येते का, याची कसून चौकशी केली जाईल.
मराठी न बोलता येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द (License Cancellation) केले जातील आणि बनावट कागदपत्रे आढळल्यास दंडात्मक कारवाईही केली जाईल.
स्थानिक भाषेत संवाद न साधता येणे आणि बनावट रहिवासी दाखल्यांवर परवाने मिळवल्याच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
हा नियम १ मे २०२६ पासून लागू होणार आहे, ज्याअंतर्गत परवान्यांची फेरपडताळणी केली जाईल.

---------

हा नियम तूर्तास रिक्षा टॅक्सी चालकांसाठीच आहे असे प्रथमदर्शनी वाटत आहे. इतर परप्रांतीय व्यावसायिकांना मराठी भाषा सक्तीतून सूट मिळणार की सगळ्यांवरच कुऱ्हाड पडणार हे येत्या काळात समजेल.

--------

सरकारने हे जे पाऊल उचलले आहे त्यामागे खरेच मराठीचा कळवळा आहे की केवळ मतांचे राजकारण याची एक सामान्य नागरिक म्हणून कल्पना नाही.

पण माझ्यासारखे काही मराठीप्रेमी लोक जे आधीपासूनच रिक्षावाल्यांशी आवर्जून मराठीत संवाद साधायचे त्यांना याचा आनंद झाला आहे.

मी सुद्धा हे आता नवी मुंबईत आल्यापासून सुरू केले आहे अन्यथा मुंबईत बरेचसे टॅक्सी चालक उत्तर भारतीयच असायचे आणि त्यांच्याशी लहानपणापासून हिंदीतच बोलायची सवय होती. अर्थात तेव्हा मराठी भाषा धोक्यात आहे किंवा येणार आहे असेही काही डोक्यात नव्हते.

----------

एकूणच मुंबई सारख्या शहरात इतके परप्रांतीय असतील की ते इतक्या शॉर्ट नोटीसवर मराठी शिकतील याची शक्यता कमीच वाटत आहे. यासाठी मुदत द्यायला हवी होती. त्या काळात मराठीची एखादी बेसिक परीक्षा / तोंडी परीक्षा पास करणे गरजेचे असा काहीतरी नियम असायला हवा होता. जेणेकरून काही समान निकष राहतील. अन्यथा गोंधळाचा कारभार होईल. अर्थात असे काही निकष आणि मुदत असल्यास कल्पना नाही. माझ्या वाचनात तरी आले नाहीयेत.
-------

रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांनी या विरोधात ४ मे पासून संप पुकारला आहे.

कदाचित संपापूर्वीच्या वाटाघाटीत काही गोष्टी ठरवल्या जातील.
--------

प्रकरण न्यायालयात गेले आहे का याची कल्पना नाही. न्यायव्यवस्था यात हस्तक्षेप करू शकते की नाही याचीही कल्पना नाही. पण कायद्याची अंमलबजावणी कडक होणार असेल आणि काहींचा रोजगार जाणार असेल तर ही मोठी गोष्ट आहे. त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागायचा हक्क असावा असे वाटते.

---------

मराठीची ही सक्ती केवळ रिक्षा टॅक्सी चालकांनाच का? हा प्रश्न देखील मला पडला आहे.
मला रेल्वेमध्ये देखील बरेच मराठी बोलता न येणारे परप्रांतीय कर्मचारी दिसतात. ज्यांच्या भाषिक उर्मटपणाचे जास्त वाईट अनुभव आहेत.

-------------

मराठीचा आग्रह कायम राहावा पण कुठलेही वितुष्ट न येता हे प्रकरण मार्गी लागावे अशी इच्छा.

या विषयावर एकूणच आपले मत तसेच अनुभव मांडायला आणि या संदर्भातील घडामोडींचा आढावा घ्यायला हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईत मराठीभाषक हे फार नाहीत, फक्त आजच नाही, तर पूर्वीपासूनच मुंबई तशीच आहे, हे अनेकांना माहीत असेलच. मग तिथे बहुसंख्यांना जी भाषा कळते तीच आपोआप वापरली जाणार हा मार्केटचा नियम आहे. आता तिथे मराठी सक्ती ही ३०% किंवा कमी ग्राहकांनाच उपयोगी आहे. अनेक रिक्षावाल्यांचे तर बहुसंख्य ग्राहक अमराठीच असणार. तसे नसते तर त्यांना कानावर मोठ्या प्रमाणात मराठी ऐकू आली आसती आणि ते गरजेपुरतं तरी शिकले असते. हा प्रकार इतर मराठीबहुल शहरांत झालेला बघायला मिळतो. मुंबईत ते सहजासहजी होणं अवघड आहे. मराठीभाषक राज्याची राजधानी अमराठी कशी म्हणून आपल्याला भावनिकदृष्ट्या ही बाब पचायला अवघड आहे, पण त्याने वस्तुस्थिती कशी बदलणार?

अनेकजण दाक्षिणात्य शहरांची उदाहरणं देतात. पण तिथे मुळात त्यांचा भाषिक टक्का हा प्रभाव पाडावा इतका आहे हे कुणी लक्षात घेत नाही. बंगळूरु हे थोडंफार खिचडी शहर म्हणता येईल. इथे तमिळ लोकांची संख्या खूप आहे. वर्षानुवर्ष तिथे राहूनही बर्‍याच तमिळींना कन्नडा येत नाही. फक्त त्यांची संख्या इतकीही नाही की शहरची भाषा तमिळ होईल. तिथल्या अनेक कन्नडिगांना तमिळ समजते. आपल्या मुंबईच्या मराठीजनांना जशी गुजराथी समजते त्यातलाच हा प्रकार.

दक्षिणेच्या कोणत्या राज्यात तिसरी भाषा म्हणून हिंदी / हिंदी संस्कृत शिकवतात?
यातल्या कोणत्या राज्यात हिंदी चित्रपट सर्वत्र चालतात?

कुठे जायचं?, स्टेशन जवळ येणार नाही, सुट्टे द्या, पुढल्या चौकात उजवीकडे वळा, पुढे थांबा, हाफ रिटर्न घेणार, मीटर बंद आहे, .. याहून जास्त काय बोलणे किंवा समजणे अपेक्षित असते? तितकं ही लोकांशी प्रत्यक्ष संबंध असणाऱ्या व्यक्तीला येऊ नये?

हिंदी येणे हे वाईट, कुठली भाषा 'येणे ' ही समस्या कशी काय असेल? मराठी न वापरणे, त्या बद्दल आस्था नसणे ही समस्या आहे.

तेच तर. तिथे मूळ भाषा बोलणारेच बहुसंख्य आहेत त्यामुळे त्यांना हिंदीची गरज पडत नाही. शाळा आणि चित्रपट म्हणाल तर कर्नाटकात तरी अनेकांना शाळेत हिंदी विषय असतो आणि त्या राज्यात हिंदी सिनेमेही बघितले जातात. इतर राज्यांची मला माहिती नाही.

काहीतरी चुकतंय... इथे उबर चालक मी भारतीय आहे हे समजल्यावर त्याला/ तिला येत असेल तर आवर्जून दोन चार हिंदी शब्द बोलतो, भारतात गेला/ गेली असेल तर त्यावर काही बोलतो, भारतीय जेवण आवडत असेल तर गावातील कुठे जेवण चांगलं आहे त्यावर बोलतो, शेजारी, ओळखीचे भारतीय आहेत, मुंबईचे आहेत, बॉलिवूड .... काहीतरी प्रकारे कनेक्शन प्रस्थापित झालं तर बघतो. मी ही अनोळखी कोणी असेल तर त्याच्याशी काही ह्युमन कनेक्शन तयार झालं तर बघतो. ती पंधरा मिनिटांची राईड सुसह्य बनते. असे सगळेच बघत असतील.
मग आपले रिक्षा/ टॅक्सी वालेच असे असतात का?

अगदीच रच्याकने, इथे अफगाणी उबर चालक बरेच आहेत. ते बहुतेक वेळा त्याचंच संगीत लावतात. ते पुष्टु संगीत फार गोड आपल्या स्वरांशी मिळते जुळते वाटते.

संस्कृत ही नंतरची भाषा आहे हे अलिकडच्या काळात प्रा. राजेंद्रप्रसाद सिंह हे भाषातज्ञ वारंवार मांडत असतात. त्यांनी या संदर्भात पुस्तकेही लिहीलेली आहेत. यात त्यांनी मेनस्ट्रीम प्रवाहामधल्या चुका दाखवून दिलेल्या आहेत. मी ती वाचलेली नाहीत. पण प्रा. राजेंद्रप्रसाद सिंह यांना फॉलो करतो. त्यांचे लेख, युट्यूब व्हिडीओज, फेसबुक लाईव अनेकदा पाहिलेले आहे. इथे मी माझ्या मर्यादेत संदर्भ देऊ शकेन. हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे आणि त्यासाठी बरेच संदर्भ तपासावे लागतील. कुणाला उत्सुकता असेल तर राजेंद्रसिंह यांचे संशोधन, अ तुल भोसेकर यांचे संशोधन हे अभ्यासू शकता.

संस्कृत प्राचीन आहे असा समज ज्या युरोपिअन अभ्यासकांचा आहे त्यांच्याही लिखाणात विरोधाभास आहे.

Sheldon Pollock – The Language of the Gods in the World of Men (2006, University of California Press)
PDF लिंक: https://sheldonpollock.org/archive/pollock_language_2006.pdf
मुख्य मुद्दा (Page 51-52): "Sanskrit first appears in inscriptions later than its own descendants (such as Prakrit)."

शेल्डन पोलॉक हे मेनस्ट्रीम अनुकूल संशोधक आहेत. पण ते ही पहिल्या शतकाआधीचा संस्कृत मधे असलेला शिलालेख देऊ शकत नाहीत.
उलट ते स्पष्ट सांगतात की अशोकाच्या काळात संस्कृत शिलालेख नव्हते, प्राकृत होती. संस्कृत ही "high prestige" भाषा नंतर विकसित झाली. अशोकाच्या काळात जी लिपी होती त्या लिपीचे नाव त्याच शिलालेखात धम्मलिपी असे नोंदवलेले असताना तिला जाणीवपूर्वक बाह्मीलिपी असे नाव असल्याचा प्रचार केला गेला. असे कुठलेच नाव शिलालेखात आढळत नाही.

संस्कृतमधे पहिला शिलालेख पहिल्या शतकात गुजरातमधे सापडला.

रोमिला थापत Early India: From the Origins to AD 1300 (2002)
PDF लिंक : https://www.academia.edu/33715262/Early_India_from_the_Origin_to_AD_1300...
Page 248-250:
अशोकाचे शिलालेख प्राकृतमध्ये आहेत, संस्कृत नंतरची भाषा.

जॉर्ज कार्दोना Sanskrit and Prakrit: Sociolinguistic Issues (1998, Motilal Banarsidass)
मुख्य मुद्दा: प्राकृत ही Middle Indo-Aryan भाषा आहे, जी वैदिक संस्कृतनंतरची आहे. पण याबद्दलचे अधिक पुरावे ते देत नाहीत असे प्रा राजेंद्रप्रसाद सिंह म्हणतात.

आता गुजरात मधल्या पहिल्या शिलालेखाकडे वळूयात. रूद्रदामनाचा जुनागढ शिलालेख (इ.स. १५०)
संदर्भ:
D.C. Sircar, "Select Inscriptions" Vol. I (1965), Page 167-176.
Sheldon Pollock, "The Language of the Gods in the World of Men" (University of California Press, 2006), Page 51-52.

हा हो रूद्रसामन राजा आहे हा शक राजा आहे. शकांनी भारतावर आक्रमण केले. त्यांनी संस्कृत भाषेचा वापर राज्यकारभारासाठी केला. यावरून काही शंका उत्पन्न होतात.

मेनस्ट्रीम संशोधनातल्या उणिवांसाठी काही पुस्तके मागवलेली आहेत. यावर कधीतरी बोलूच.

ग्राहक असोत वा नसोत, तसा नियम आहे.
A metal badge shall be issued to every person who has been granted an authorisation to drive a public service vehicle except motor cab, subject to the condition that he satisfies the authority about his topographical
knowledge of the area of operation and working knowledge of Marathi and any one of the languages commonly spoken there.

रिक्षा टॅक्सी चालकांची याबाबत तक्रार असेल , ( मी एकाच हिंदीभाषक रिक्षावाल्याशी यावर बोललो, अगदी उतरता ना पैसे देता देता. तो म्हणाला हा नियम १५ वर्षांपासून आहे. मला काही अडचण नाही . त्यावरून जनरलायझेशन करता येणार नाही, हे मान्य) त्यापेक्षा जास्त राजकारण संजय निरुपम आणि शशांक राव यांसारखा तथाकथित नेते करीत आहेत. याबाबत बोटचेपेपणा करणारे सर्वपक्षीय नेतेही तितकेच जबाबदार आहेत.

मला काही अडचण नाही >> असेच सर्वसाधारण मत असेल असा अंदाज आहे. त्यांनाही इथे राहून व्यवसाय करायचा आहे. कामचलाऊ मराठी बोलण्याला कुणाला अडचण असेल असं वाटत नाही.

असे वाद स्क्रीप्टेड असतात आणि त्यातून काही जणांना चमकोगिरीची संधी असते हे आजवरच्या अनुभवातून समजलेले नसेल तर कठीण आहे.

माझे 2 अनुभव,
1.अपनबाजारच्या दारात मराठीत 1 जरा मोठी नोटीस लावली होती. एक बाई त्या सुरक्षारक्षकाला म्हणाली की काय लिहिले आहे ते सांग. हिंदीत म्हणाला मला मराठी येत नाही,तर तिच्या नवऱ्याने अरे तू महाराष्ट्रात राहतोस ना मग मराठी यायला पाहिजे वगैरे वगैरे बोलायला सुरुवात केली. तर काही फरक पडत नाही असा बोलला. म्हटले तर साधे वाक्य.पण ज्या स्वरात तो बोलला ते डोक्यात गेले. म्हटलं अक्षरं तर देवनागरी आहेत ना! तर ऐकून n ऐकल्यासारखे kele.

2. विजय सेल्स मध्ये जाता जाता आम्ही चुकून कोहिनूर सेल्स मध्ये गेलो. तिकडे एक विशी बाविशीचा सेल्समन आम्हाला एकमेकात मराठी बोलताना ऐकून आमच्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करत होता. म्हटलं तुला कंफर्टेबल वाटेल तसं बोल. तर म्हणे नको मलाही मराठी आली पाहिजे. छान वाटले ऐकून. ही प्रवृत्ती प्रत्येकाने ठेवली तर काहीच हरकत नाही.

माझ्या लहानपणी वाणी वगैरे लोक गुजूमराठीत बोलत असत.घरी दूधवाला भय्या यायचा.आजी कोकणीत चहा घे बस रे अशा काही अर्थाचे बोलत असे.दोघांचेही काही अडत नसे.धूसर आठवणी आहेत.उंचापुरा,तब्येतीने दणकट आणि मोठ्या मिशा.

अख्खं आयुष्य मुंबईत गेलं. तरी त्याला मराठी शिकावंसं वाटलं नाही? हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांत आहे, तरीही नाही? का?...... कपिला शर्मा शो मध्ये सोनाली कुलकर्णीने कपिलला हसत हसत सुनावले होते,अरे तू इतकी वर्षे मुंबईत आहेस. मराठीत बोलावसं कसं वाटत नाही वगैरे. तेही मस्त होते.

मीही रिक्षावाल्यांशी आवर्जून मराठी बोलते. तेही हिंदी cum मराठी छान बोलतात.

नवी मुंबई में आप का स्वागत है | कृपया संभाषण एवं सरकारी कामकाज में हिंदी का प्रयोग करें |
अधिक जानकारी के लिए साथ में दिया व्हिडियो देखें जो अंग्रेजी में है
https://x.com/NMMConline/status/2051181253492392304
इस बात की ओर ध्यान देने के लिए आप का धन्यवाद|
Thank you for your attention to this matter.

जय महाराष्ट्र

त्यांनाही इथे राहून व्यवसाय करायचा आहे. कामचलाऊ मराठी बोलण्याला कुणाला अडचण असेल असं वाटत नाही.>>>
अमितव, असंच आपल्यासारख्या कुणालाही वाटणं साहजिक आहे. परंतु माझ्या अनुभवाप्रमाणे असे वाटणारे अमराठी (त्यातही उत्तर भारतीय) खूपच कमी प्रमाणात आहेत. बहुसंख्य म्हणजे "काय नसती मराठीची कटकट आहे!" किंवा "नही बोलेंगे मराठी. जो चाहे उखाड लो" ह्या कॅटेगरीतले आहेत. कित्येकांना तर असं वाटतं की भारतात सगळ्यांना हिंदी आलीच पाहिजे, त्यामुळे सगळ्यांनी त्यांच्याशी हिंदीतच बोललं पाहिजे. कितीतरी तर मराठी म्हणजे जाहिल, गावठी अशा मताचे आहेत.
आणि हा हिंदी वर्चस्ववाद /मराठी विरोध खालपासून वरपर्यंत आहे. साधा दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याचा नियम (जो वर्षानुवर्षे आधीच आहे) त्याच्या अंमलबजावणीविरोधात सुद्धा दुकानदार संघटना पार सुप्रीम कोर्टापर्यंत गेली होती. व्यापाऱ्यांना (ह्यात छोट्यांपासून कॉर्पोरेटपर्यंत सर्व आले) मराठी मारूनच टाकायची आहे. महाराष्ट्रात सर्वांना हिंदी आली की त्यांचा किती खर्च वाचतो - जाहिराती मराठीत डब करायची गरज नाही . कस्टमर सर्व्हिस साठी मराठी option द्यायची गरज नाही, दुकानांत काम करायला, वेटर वगैरे सगळे गायपट्ट्यातले स्वस्त मजूर आणले की झालं वगैरे वगैरे.
त्यामुळे कामचलाऊ मराठी बोलायला त्यांना अडचण नसावी असे तुम्हाला वाटत असून सुद्धा अजूनही हे का झाले नाही ह्याचे कारण असे वाटणारे मुळात अल्पसंख्य, बहुतेकांचा हिंदी वर्चस्ववाद, आणि त्यात मराठी माणूस स्वतःच हिंदीत बोलतो असं आहे.
त्यामुळे तुम्ही आधी म्हटल्याप्रमाणे मराठीवाचून अडवणूक झाल्याशिवाय ते काही मराठी बोलणार नाहीत.
ही अडवणूक सरकारने परवाने देताना, आणि मराठी माणसाने रोजच्या व्यवहारात करायला हवी. पण आपण मराठीवाचून अडवून धरलं तर खोळंबा होईल म्हणून पटकन हिंदी बोलून काम चालवून पुढे जातो.

>> माझ्या समजुतीप्रमाणे महाराष्ट्रात राहणारा तो महाराष्ट्रीय. महाराष्ट्रीयन हा इंग्रजी शब्द आहे. जसा Indian. मराठीत महाराष्ट्रीय - जसा भारतीय.
मराठी बोलणारे कुटुंब ते मराठी कुटुंब.
अमेरिकेत राहणारा महाराष्ट्रीय म्हणण्यापेक्षा मराठी असे म्हणता येईल>>
भरत, बरोबर. आम्ही मराठी घरातून आलेलेच म्हणतो. ‘काही’ लोकांना तितकं कळेल असं नाही. Wink

यावरून इंदौर मध्ये राहणाऱ्या मराठी भाषकांची प्रतिक्रिया ऐकली होती, त्यांना महाराष्ट्रीय लोक तिथे गेले की मराठी बोलताना पाहुन तुम्ही महाराष्र्टीयन का? असे विचारतात. ते म्हणतात नाही आम्ही इकडलेच, पण बोलतो मराठी.

थोडक्यात इंग्लिश बोलणारी प्रत्येक व्यक्ती ब्रिटिश नसते तसे मराठी बोलणारी प्रत्येक व्यक्ती महाराष्ट्रीय नसते.

इंदौर मध्ये राहणाऱ्या मराठी भाषकांची प्रतिक्रिया ऐकली होती, त्यांना महाराष्ट्रीय लोक तिथे गेले की मराठी बोलताना पाहुन तुम्ही महाराष्र्टीयन का? असे विचारतात. ते म्हणतात नाही आम्ही इकडलेच, पण बोलतो मराठी. >> माझा एक शीख मित्र आहे. शीख असल्यामुळे सगळे गृहित धरतात की तो पंजाबी असेल. पण नाही, तो राजस्थानी आहे. धर्माने शीख आहे, पण म्हणजे काही पंजाबीच असायला पाहिजे असा नियम नाही ना!

>>>>धर्माने शीख आहे, पण म्हणजे काही पंजाबीच असायला पाहिजे असा नियम नाही ना!
ओह हे माहीत नव्हते.
माझी तर समजूत होती की पंजाबी घरातला मोठा मुलगा शीख बनतो.
.
हास्यास्पद असेल पण अशीच समजूत होती Sad

अरे बरोबरे की - The traditional Punjabi practice of dedicating the eldest son to the Sikh faith is known as Gurdino ("giving to the Gurus"), where Hindu families—particularly in Punjab—raised their firstborn as a baptized Keshadhari Sikh to serve the community, often acting as protectors of the family.

कारण असेच शाळेत शिकविले होते.

माझी तर समजूत होती की पंजाबी घरातला मोठा मुलगा शीख बनतो.>>> माझी पण.

पण शीख अजून कट्टर असतात. सर्व पंजाबी शीख्/सरदार नाही बनत.
राज कपूर कुठे टर्बन बांधायचा?

पंजाबातील काही हिंदू कुटुंबांत मोठा मुलगा शीख परंपरेत वाढवण्याची प्रथा काही काळ अस्तित्वात होती; पण ती सर्व पंजाबी समाजाची सार्वत्रिक प्रथा नव्हती.

कपूर घराणं मूळचं पेशावरचं. ते खत्री आहेत. त्यांचा शीख धर्माशी संबंध नाही. अठराव्या शतकात हिंदूंमध्ये मोठा मुलगा शीख बनवणे प्रतिष्ठेचे समजले जाई. पण ते कंपल्सरी नव्हते. अठराव्या शतकात कपूर पेशावर मधे होते. तिथे ही प्रथा होती का हे सांगणे कठीण आहे.

पुन्हा सर्व खत्री लोकांचे मूळ वेगवेगळे आहे. शक, हूण, कुशाण, पर्शियन इ.

महाराष्ट्राची संस्कृती भैया लोकांना माहीत व्हावी त्यांना मराठीचा लळा लागावा म्हणून आज आमच्या इथे सगळ्या भैय्या लोकांना माहेरची साडी पिक्चर दाखवणार आहेत पडद्यावर.

भैय्या लोकांना पिक्चर दाखवला. भैय्या लोकं खूपच इमोशनल झाले. नेसली माहेरची साडी हे शब्द एखाद्या बाणासारखे आले आणि भैय्या लोकांचं काळीज चिरत आरपार गेले त्यांना पाझर फुटला आणि भैय्ये ओक्साबोक्शी रडू लागले. काहींनी जाऊन पडद्याला मिठ्या मारल्या, काही रेल्वेने लगेच बिहारला जायला निघाले, जे जास्तच इमोशनल झाले ते थेट रिक्षा चालवत बिहारला निघाले.

कायच्या काय लॉजिक आहे काहिंचे.
हे असलं अचाट वाद करूनच काहीजण इथे गोंधळ घालतात.
मग मराठी नाही आले तर काही फरकच नाही पडत अमराठी/इतरांना.

महराष्ट्रात रहाणारा महाराष्ट्रीय तोच असेल जर तो महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी बोलतो आणि ते बोलणारे’च’ महाराष्ट्रीय.

त्या अचाट हिशोबाने मग चेन्नाईत राहिलेला “मराठी” माणसाला चेन्नाईकर समजतील का? चेन्नाइला तुम्हाला उभं नाही करणार तामिळ नाही आलं तर, समजायची तर दूर बात. :लोल:
त्यामुळे जर महाराष्ट्रात रहायचे तर राज्यभाषा शिका, नुसते इथे राहिले कि महाराष्ट्रीय असले लॉजिक नका सांगु, असा नियम पाहिजे.

Pages