महाराष्ट्र सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य केली आहे. १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) पासून मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांचे परवाने (License/Permit) रद्द केले जातील, अशी घोषणा परिवहन विभागाकडून करण्यात आली आहे.
हा नियम प्रामुख्याने मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमधील रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आहे.
नियमाची योग्य अंमलबजावणी करायला चालकांना मराठी वाचता, लिहिता आणि बोलता येते का, याची कसून चौकशी केली जाईल.
मराठी न बोलता येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द (License Cancellation) केले जातील आणि बनावट कागदपत्रे आढळल्यास दंडात्मक कारवाईही केली जाईल.
स्थानिक भाषेत संवाद न साधता येणे आणि बनावट रहिवासी दाखल्यांवर परवाने मिळवल्याच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
हा नियम १ मे २०२६ पासून लागू होणार आहे, ज्याअंतर्गत परवान्यांची फेरपडताळणी केली जाईल.
---------
हा नियम तूर्तास रिक्षा टॅक्सी चालकांसाठीच आहे असे प्रथमदर्शनी वाटत आहे. इतर परप्रांतीय व्यावसायिकांना मराठी भाषा सक्तीतून सूट मिळणार की सगळ्यांवरच कुऱ्हाड पडणार हे येत्या काळात समजेल.
--------
सरकारने हे जे पाऊल उचलले आहे त्यामागे खरेच मराठीचा कळवळा आहे की केवळ मतांचे राजकारण याची एक सामान्य नागरिक म्हणून कल्पना नाही.
पण माझ्यासारखे काही मराठीप्रेमी लोक जे आधीपासूनच रिक्षावाल्यांशी आवर्जून मराठीत संवाद साधायचे त्यांना याचा आनंद झाला आहे.
मी सुद्धा हे आता नवी मुंबईत आल्यापासून सुरू केले आहे अन्यथा मुंबईत बरेचसे टॅक्सी चालक उत्तर भारतीयच असायचे आणि त्यांच्याशी लहानपणापासून हिंदीतच बोलायची सवय होती. अर्थात तेव्हा मराठी भाषा धोक्यात आहे किंवा येणार आहे असेही काही डोक्यात नव्हते.
----------
एकूणच मुंबई सारख्या शहरात इतके परप्रांतीय असतील की ते इतक्या शॉर्ट नोटीसवर मराठी शिकतील याची शक्यता कमीच वाटत आहे. यासाठी मुदत द्यायला हवी होती. त्या काळात मराठीची एखादी बेसिक परीक्षा / तोंडी परीक्षा पास करणे गरजेचे असा काहीतरी नियम असायला हवा होता. जेणेकरून काही समान निकष राहतील. अन्यथा गोंधळाचा कारभार होईल. अर्थात असे काही निकष आणि मुदत असल्यास कल्पना नाही. माझ्या वाचनात तरी आले नाहीयेत.
-------
रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांनी या विरोधात ४ मे पासून संप पुकारला आहे.
कदाचित संपापूर्वीच्या वाटाघाटीत काही गोष्टी ठरवल्या जातील.
--------
प्रकरण न्यायालयात गेले आहे का याची कल्पना नाही. न्यायव्यवस्था यात हस्तक्षेप करू शकते की नाही याचीही कल्पना नाही. पण कायद्याची अंमलबजावणी कडक होणार असेल आणि काहींचा रोजगार जाणार असेल तर ही मोठी गोष्ट आहे. त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागायचा हक्क असावा असे वाटते.
---------
मराठीची ही सक्ती केवळ रिक्षा टॅक्सी चालकांनाच का? हा प्रश्न देखील मला पडला आहे.
मला रेल्वेमध्ये देखील बरेच मराठी बोलता न येणारे परप्रांतीय कर्मचारी दिसतात. ज्यांच्या भाषिक उर्मटपणाचे जास्त वाईट अनुभव आहेत.
-------------
मराठीचा आग्रह कायम राहावा पण कुठलेही वितुष्ट न येता हे प्रकरण मार्गी लागावे अशी इच्छा.
या विषयावर एकूणच आपले मत तसेच अनुभव मांडायला आणि या संदर्भातील घडामोडींचा आढावा घ्यायला हा धागा.
मराठी यायला हवी असा नियम
मराठी यायला हवी असा नियम वर्षानुवर्षे आधीच असून, त्या नियमान्वये परवाने घेऊनसुद्धा मराठी बोलणार नाही ही मुजोरी चालवून घेतली जाते. कायद्याचं राज्य नाही ह्याची इतकी निर्लज्ज कबुली दिली जाते. तुम्ही मराठी शिकत नाही, तर तुमच्यासाठी महाराष्ट्रातल्या ग्राहकांनी हिंदी का शिकायची, असं कुणीही विचारात नाही. सरनाईकांनी आता माघार घेतली आहे. महाराष्ट्रात लोकांना आपली दैनंदिन कामे मराठीत करता यावीत इतकी साधी अपेक्षा सुद्धा पूर्ण होत नाही. मुळात लोकांची आता अशी अपेक्षाच नाही. मराठी समाज आपल्या भाषेविषयी कमालीचा उदासीन आहे. सरकार तर झाडाच्या मुळाशी विष घालून झाड मारावं तशी मराठी भाषा मारून महाराष्ट्राचं हिंदीकरण करू पाहत आहे. आपण डोळे मिटेपर्यंत कानावर थोडीफार मराठी पडेल असं वाटतंय. त्यापुढच्या पिढ्या हिंदी बोलतील. त्यात त्यांना आनंद असेल. उद्या महाराष्ट्रातच राहणारे भोसले, जोशी, कांबळे शिंदे वगैरे "यह हमारे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज की प्रतिमा है. इन्होने हिंदवी स्वराज की स्थापना की थी. इनकी भाषा मराठी थी." अशी भाषणं करतील.
कुणाला वाईट वाटायचं कारण नाही.
<<<< तेव्हा तुझ्याच पुढच्या
<<<< तेव्हा तुझ्याच पुढच्या पोस्टीत तुझ्याच आधीच्या पोस्टीचे उत्तर आहे हे जाणवले नाही का?
>>>>
कुठले उत्तर? नाही समजले
दोन्ही वेगळे मुद्दे आहेत.
१) मुंबईतून परप्रांतीय हाकला हा स्टँड मला चुकीचा वाटतो. मेट्रो सिटी आहे. सर्व जाती धर्म प्रांताची लोकं इथे भरपूर असणारच हे स्वाभाविक आहे.
२) पण त्यांचा टक्का वाढल्याने आणि ते लोकं मराठी बोलत नसल्याने आपलीच लोकं जर त्यांच्याशी संवाद साधायला हिंदी भाषेत बोलत असतील आणि त्यामुळे यात मराठी भाषा मरत असेल तर तिला जगवायला आपण जास्तीत जास्त परप्रांतीयांनी मराठीत संवाद साधावा यासाठी प्रयत्न करायला हवा.
३) पण म्हणून जो मराठी बोलणार नाही त्याच्यावर बहिष्कार टाकायचा, त्याच्याकडून काही घ्यायचे नाही हा स्टँड सुद्धा पटत नाही. त्यांना प्रोत्साहन द्या, कायदा असा बनवा की त्यांना मराठी बोलल्यास काही बेनिफिट मिळतील, अन्यथा फटका बसेल. यात काही समान निकष राहतील.
पण लोकांनी स्वतः बहिष्कार टाकणं ही झुंडशाही झाली. यात जो तो आपल्या मनाचे निकष लावेल. अन्याय होईल. द्वेष वाढीस लागेल.
रिक्षावाले मराठी हवेत अशी
रिक्षावाले मराठी हवेत अशी मागणी नसून त्यांना मराठी बोलता यायला हवे अशी मागणी आहे.
हे तुझे वाक्य आहे. हेच तुझ्या आधीच्या पोस्टीचे उत्तर आहे. ते परभाषिक आहेत म्हणून फरक करायचा नाहीये. ते मराठी बोलावेत म्हणून करायचा आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी एक दोन वर्षांपेक्षा जास्त राहात असाल, जनरल पब्लिकशी संपर्क येणारा व्यवसाय करत असाल, आणि तरीही तुम्हाला तुमच्या कामापुरतीही स्थानिक भाषा येत नसेल तर तुम्हाला खूप लाडावून ठेवले गेले आहे. ते बंद व्हायला हवे. आणि रिक्षावाल्याला कर्तरी कर्मणी प्रयोग सांगाची परीक्षा द्यायची नाहीये. फक्त कामापुरते बोलता आले तरी बास आहे. जे शिकायला आठवडा खूप झाला. इव्हन तोडकेमोडके का होईना पण मराठीत बोलायचा प्रयत्न केला तरी लोकांचे समाधान होते. विरोध उद्दामपणे शिकणारच नाही म्हणण्याला आहे.
कोणी कसा "आहे" म्हणून त्यांच्याशी व्यवसाय न करणे वेगळे आणि तुम्ही कोणीही असा, इथे मराठी बोललात तर आम्ही तुमच्याकडून सेवा घेऊ म्हणणे वेगळे.
फा चा हा प्रतिसाद हेडर मध्ये
फा चा हा प्रतिसाद हेडर मध्ये घालून ठेवण्यासारखा आहे.
पूर्णपणे सहमत!
"मूळ समस्या इतर भाषिकांना
"मूळ समस्या इतर भाषिकांना मराठी येत नाही हा नसून, स्थानिकांना बऱ्यापैकी हिंदी येते हा आहे">>> फाविद, अगदी बरोबर. मराठी माणूसच हिंदीत बोलतो तर अमराठी लोक मराठीत का बोलतील? आधी मराठी लोकांची स्थिती होती "फक्त मराठी". गेल्या पिढीतल्या लोकांची "मराठी+थोडी हिंदी". सध्याच्या पिढीत "मराठी+हिंदी". सध्याच्या शाळकरी पिढीत "हिंदी+थोडी मराठी". त्याच्या पुढच्या पिढीत "फक्त हिंदी".
"त्यांचा उद्दामपणा मार्केट फोर्सेस वापरून मोडायला हवा" >> फारएंड हे बरोबर आहे. पण मराठी लोकांना हिंदी येते म्हणून मराठीसाठी मार्केट फोर्सच निर्माण होत नाही. आणि केवळ मार्केट फोर्स नाही. भाषावार प्रांतरचनेनुसार हे मराठी भाषक राज्य झाले आहे. मराठी भाषेचे संवर्धन हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. राज्याचे व्यवहार मराठीत चालण्यात समस्या येऊ नये ह्यासाठी नियम करणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळेच परवाना मिळण्यासाठी मराठी येणे आवश्यक असण्याचा नियम आहे.
अंबानी अडाणी ह्यांचा मुद्दा निरर्थक आहे. पर्सनली कुणाला मराठी बोलण्याची बळजबरी करता येणार नाही. त्यांनी जर वाहतूक कंपनी काढली तर मात्र त्या कंपनीला मराठीत सेवा देणे बंधनकारक करता येऊ शकेल.
"जो मराठी बोलणार नाही त्याच्यावर बहिष्कार टाकायचा, त्याच्याकडून काही घ्यायचे नाही हा स्टँड सुद्धा पटत नाही">> का नाही? एक ग्राहक म्हणून मला माझ्या भाषेत सेवा हवी आहे. जो ती देईल त्याच्याकडूनच मी घेईन. जो नाही देणार त्याच्याकडून घेणार नाही. ह्यात काहीही चुकीचं नाही. मुळात मराठी भाषा येणे आवश्यक असणे , आणि १५ वर्षे महाराष्ट्रात राहत असल्याचा दाखला असणे ह्या अटींची पूर्तता करूनच परवाना मिळतो. म्हणजे जे रिक्षावाले मराठी येत नाही म्हणतात त्यांनी फ्रॉड करून परवाना घेतला आहे. नाहीतर मराठी येत असून उद्दामपणे बोलत नाहीत. मग त्यांच्याकडून सेवा घेतली नाही तर का चूक?
"कायदा असा बनवा की त्यांना मराठी बोलल्यास काही बेनिफिट मिळतील, अन्यथा फटका बसेल">>असाच कायदा आहे. मराठी बोलल्यास बेनिफिट म्हणजे परवाना मिळेल. अन्यथा परवाना मिळणार नाही असा फटका बसेल (बसायला हवा).
"म्हणूनच मराठी वाचुन अडवा. मराठी येत असेल त्यालाच सेवा/ संधी द्या. त्याने अडवणूक केली की दुसर्याकडे जा." >> अमितव , सहमत. इतकी वर्षं मराठी लोकांनी हे केलं नाही म्हणूनच त्याच्यावर हिंदी लादली गेलीय.
वाहतुकीचे नियम आधीच असताना
वाहतुकीचे नियम आधीच असताना आंदोलन कश्याला?
>>>> मालक वाहतुकीचे नियम आहेत हो पण त्याचे पालन करावे असा नियम नाहीये सध्या. त्यात रिक्षा चालक अग्रेसर आहेत. पामर टाईप जनता चालताना आणि गाडीत जीव मुठीत धरूनच जाते. तिला जावे लागू नये ही माफक अपेक्षा आहे. तसही सध्या मोरीला बोळा आणि दरवाजा उघडा अशी पूर्ण देशाचीच अवस्था आहे. दरवाजातून हंडा पळवणारे पहिले मोरीला बोळा लावा ओरडत आहेत. बोळे विकणारे आणि भोळे भाबडे जिजीरे जी करत आहेत.
<<<<< कोणी कसा "आहे" म्हणून
<<<<< कोणी कसा "आहे" म्हणून त्यांच्याशी व्यवसाय न करणे वेगळे आणि तुम्ही कोणीही असा, इथे मराठी बोललात तर आम्ही तुमच्याकडून सेवा घेऊ म्हणणे वेगळे.>>>>>
Exactly! इथवर आपण दोघे एका लाईनवर आहोत. फक्त असा मोर्चा लोकांनी किंवा कुठल्या संघटनांनी उघडणे अयोग्य ठरेल असे मी म्हटले होते. हे प्रयत्न सरकारी पातळीवर व्हायला हवेत. मग लोकांनी त्याची अंमलबजावणी होण्यास सहकार्य दिले पाहिजे.
फा चा हा प्रतिसाद हेडर मध्ये
फा चा हा प्रतिसाद हेडर मध्ये घालून ठेवण्यासारखा आहे.
पूर्णपणे सहमत!.... + कितीतरी.
"मूळ समस्या इतर भाषिकांना
"मूळ समस्या इतर भाषिकांना मराठी येत नाही हा नसून, स्थानिकांना बऱ्यापैकी हिंदी येते हा आहे">>>+१
"म्हणूनच मराठी वाचुन अडवा. मराठी येत असेल त्यालाच सेवा/ संधी द्या. त्याने अडवणूक केली की दुसर्याकडे जा." >+१
लॉन्ग टर्मसाठी दुसर्या राज्यात राहणार्या प्रत्येकाने ती भाषा शिकलीच पाहिजे..
मग ते रिक्षावाले असो की मन्नत पासून जन्नत पर्यत उभ करणारे आणी आपण दिल्लीचे आहोत, हा माज दाखविणारे सेलेब्रिटी, फिल्म अॅक्टर असो... अमिताभ, शाखा,केजो,चोप्रा गॅन्ग,सलिम जावेद्,सल्मान याना मी एकदाही मराठी बोलताना एकल नाही.
आपल्याकडे फिल्म अॅक्टर्स ची क्रेझ भयानक आहे, ते घालतात ते कपड्याचे ब्रॅन्ड, फॅशन, हेअरस्ताइल सगळ फॉलो होत, त्याच्या वाढदिवशी लोक त्याच्या घरोसमोर गर्दी करतात, त्याच्यावर सोमिवर तावातावाने बोलतात रविवार देवाच दर्शन घ्याव तस अमिताभला बघायला लोक उभे असतात आणी त्याच वेळेस जया बच्चन म्हणते हम युपि वाले है हम तो हिन्दी मे ही बात करेन्गे...शाखा तुमच्या नाकावर टिच्चुन हम दिल्लीवाले थोडे ऐसेही नकचढे होते है म्हणतो..
मग ह्या नाय्क महानायकानी इथे या मुबैतल्या मातित त्याच सर्वस्व कमावल तेच जर मराठि बोलत नसतिल तर त्याना आदर्श मानणार्या, त्याची स्ताइल उचलणार्या, त्याची गाणी आपल्या रिक्षात वाजवणार्या सामान्य लोकाकडुन कशि अपेक्षा करणार? ते कुठुन बोलणार आहेत? रजनिकान्त ने साउथ मधे जावुन ती भाषा शिकली आणी तो तिथलाच झाला तस हे नायक महानायक झालेत का?
मुबैतच निवडून आलेल्या "कैसे हराया" गर्लने मराठी बोलायला चक्क नकार दिला.
प्राजक्ता इंटरेस्टिंग!
प्राजक्ता इंटरेस्टिंग!
मुंबईत राहणाऱ्या बॉलीवूड सेलिब्रेटींनी मराठी बोलायला नकार दिल्यास त्यांचे चित्रपट बघणे कोणी सोडेल असे वाटत नाही.
अर्थात ज्या व्यावसायिकांना थेट जनतेशी संवाद साधायची गरज नसते त्यांच्या मराठी बोलण्या न बोलण्याने काही अडत देखील नाही हे ही तितकेच खरे.
मराठी घरातल्या तरुण
मराठी घरातल्या तरुण मुलामुलींना मराठी बोलता येतं का ते बघा आधी.
मराठी घरातल्या तरुण
मराठी घरातल्या तरुण मुलामुलींना मराठी बोलता येतं का ते बघा आधी.
>>>>>
घरात मराठी बोलले जात नाही अशी मराठी माणसांची कुटुंबे १ टक्का सुद्धा नसावीत. महाराष्ट्राचा विचार करता १ टक्का सुद्धा फारच मोठा आकडा झाला.
अगदी बरोबर. मर्यादीत वर्तुळ
अगदी बरोबर. मर्यादीत वर्तुळ म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही.
पुढे दुसर्या विषयात मराठी मुलांना इंग्रजी येत नाही असेही म्हणतील.
मराठी भाषिक आहात,
मराठी भाषिक आहात, महाराष्ट्रात रहाता तर कुठेही गेलात तरी मराठीतच संवाद साधा, मग ते रिक्षावाले, किराणावाले दुकानदार असो, बँक असो की मॉलमधले ब्रँडेड कपड्याचे दुकान किंवा एखादे चांगल्या दर्जाचे हॉटेल. अगदी मुंबईच्या एअरपोर्ट वर किंवा तिथून सुटणार्या विमानातही मराठी बोलावे. माझा असा अनुभव आहे की लोकांना मराठी नीट बोलता आले नाही तरी मराठी व्यवस्थित कळते, आपण ग्राहक आहोत, आपली बाईंग पॉवर आहे हे लक्षात आले की नीट सेवा मिळते. जिथे कमिशन बेस असते तिथे निवड करायला/मदत करायला मराठी बोलणारी व्यक्ती मिळाली तर बरे होईल असे सांगितले तर ते मराठी बोलणारा सेल्स पर्सन देतात. मराठी माणसालाच आपल्या भाषेत बोलायला कमीपणा वाटतो. दोन उच्च शिक्षित मराठी व्यक्ती आपण किती विद्वान दाखवायला इंग्रजीत बोलतात. आता ५५-६० वयोगटात असलेल्यांनी 'आमच्या आईचे हिंदी म्हणजे....' म्हणत केलेले जोक्स आठवावेत. तुम्हीच मराठीचा हात सोडून हिंदीत संवाद सुरु केलात ना मग आता ...
आमचा अनुभव - या विमान प्रवासात मराठी, इंग्रजी, हिंदी बोलणारा स्टाफ आहे अशी घोषणा केल्यावरही मराठी लोकं मराठीत बोलायला चक्क लाजतात, तुम्ही मराठीत बोलता तेव्हा कुठून कुठून लोकं येतात असे तुमच्याकडे बघतात, आपल्या २-३ वर्षाच्या मुलांशी ४ शब्द मराठी आणि चार शब्द इंग्रजी अशा वाक्यात बोलतात. तुम्ही मराठीत बोलणे टाळणारच असाल तर मग ते मराठी बोलणारा स्टाफ का ठेवतील? शेवटी मागणी तसा पुरवठा.
मी माझ्या देशातील नातेवाईंकांशी विडीओ कॉल करते तेव्हा अनुभवते ते -
मराठी घरात लग्न केलेली तरुणाई पुढील पिढीला माझी बाग दाखवताना भाज्यांसाठी इंग्रजी शब्द वापरते तेच गुजराथी घरात लग्न करुन गेलेली मुलगी नव्या पिढीला त्याच भाज्या दाखवताना गुजराथी शब्द वापरते. दोन्ही कुटुंब उच्च शिक्षित आहेत, लहान मुले इंग्रजी माध्यमात शिकतात. एका घरात मुलाच्या कानावर भेसळ असलेली मराठी पडते आणि दुसर्या घरात गुजराथी. काही वर्षांपूर्वीच्या भारतभेटीत याच गुजराथी घरातील जेना माझ्याशी आवर्जून मराठीत बोलले होते. शिक्षण विजेटिआय मधे आणि एकेकाळी क्लायंट बेस पश्चीम महाराष्ट्रातील साखर कारखाने असल्याने माझे मराठी चांगले आहे, तुझ्या जावयाचे मराठी मात्र 'कामचलावू' आहे म्हणून चेष्टाही केली होती.
मुंबईत राहणाऱ्या बॉलीवूड
मुंबईत राहणाऱ्या बॉलीवूड सेलिब्रेटींनी मराठी बोलायला नकार दिल्यास त्यांचे चित्रपट बघणे कोणी सोडेल असे वाटत नाही.>>> पॉइन्ट तो नाहिचे आहे, तुम्ही ज्या राज्यात जाता त्याची भाषा बोला मग तुम्ही कुणीही असा सेलेब कि रिक्षाचालक..वरचा नियम सगळ्यासाठीच करायला हवा.
स्वाती ताई चान्गली पोस्ट
स्वाती ताई चान्गली पोस्ट
अजुन एक निरिक्षण म्हणजे बहुतेक हिन्दी भाषिक आणी काही प्रमाणात मराठी लोकान्चा सुद्धा एक मोठ्ठा गैरसमज म्हणजे हिन्दी ही आपली राष्ट्रभाषा आहे मग सगळ्यानाच ती यायला हवी...त्याना करेक्ट केल्यावर मोस्टली लोक विश्वास ठेवत नाहित त्याना ते पटत नाही.
सहज सांगावस वाटलं म्हणुनच
सहज सांगावस वाटलं म्हणुन-
माझ्या मुलाचं लग्न गुजरात मध्ये झालं. निमंत्रितांमधे दीड दोन हजार गुजराथी तर जेमतेम दिड दोनशे मराठी लोकं होते.
जेवणाच्या टेबल वर मराठी लोकांकरता सगळे मराठी बोलणारे मदतनीस होते.
रितेश देशमुखच्या शिवाजी
रितेश देशमुखच्या शिवाजी महाराजांवरच्या चित्रपटाचा प्रचार करायला त्यातला अभिनेता अभिषेक बच्चन मराठी बिग बॉसमध्ये आला होता. तिथे तो हिंदीतच बोलला. याचा जन्म मुंबईतला. अख्खं आयुष्य मुंबईत गेलं. तरी त्याला मराठी शिकावंसं वाटलं नाही? हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांत आहे, तरीही नाही? का?
बड्या घरांत जन्मलेल्या या स्टार लोकांना खरं तर स्वतःच्या मनाने चार वाक्य हिंदीतही बोलता यायची नाहीत. यांच्या अवॉर्ड सेरिमनीज इंग्रजीत असतात आणि चुकून हिंदीत बोललेच , तर हिंदीची टर उडवतात. म्हणजे ज्या भाषेवर यांची रोजीरोटी चालते, त्या भाषेबद्दल सुद्धा अनास्था.
गुजरातमधे व्यवसाय म्हणून
गुजरातमधे व्यवसाय म्हणून बाहेरच्या मराठी ग्राहकांसाठी ते मराठी मदतनीस नेमतात, पण महाराष्ट्रात मराठी ग्राहकांसाठी मराठी कर्मचारी नेमत नाहीत. व्यवसायात जास्त लवचिकता दाखवावी लागते. ही गोष्ट अपील होते.
पण मराठी माणूस मराठी बोलत नाही याचा विचार आपण करत नाही. जर कुणाचे अडणार नसेल तर का तो मराठीत बोलेल? महाराष्ट्रात हिंदी बोलतात कारण आपल्याकडे मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा भाषा शाळेत शिकवतात. सीबीएससी आणि आयसीएससी च्या शाळात आता इंग्रजी सोबत हिंदी किंवा मराठी असते. हिंदीच असते जास्त करून. महाराष्ट्र शासनाने या शाळांना दणका देऊन मराठी सक्तीचा विषय केला पाहीजे.
पूर्वी परराज्यातली मुलं या शाळेत शिकायची तेव्हां मराठी सक्तीचा विचार केला नाही. आता मराठी मुलं या शाळेत जातात. मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत.
याचा अर्थार्जनाशीही संबंध आहे. काही काळापूर्वी मराठी मुलांना उत्तम इंग्रजी येत नाही असा प्रचार होत होता. त्यामुळे ज्यांना इंग्रजी येत नव्हतं त्यांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना इंग्रजी शाळेत घातलं. म्हणजेच फक्त मराठी शाळेत शिकलं तर आपल्या मुलांना चांगलं भविष्य मिळणार नाही ही भीती आहे आणि ती सार्थ आहे. मुळावर इलाज न करता नुसतं भडकवाभडकवीचं राजकारण चालू आहे. आधी शिवसेनेनं केलं आता भाजप त्या मार्गाने चालली आहे.
जेवणाच्या टेबल वर मराठी
जेवणाच्या टेबल वर मराठी लोकांकरता सगळे मराठी बोलणारे मदतनीस होते.>>> अप्रतिम, इच्छा असेल तर काय अशक्य आहे?
आणि अमेरीकेतील महाराष्ट्रीयन
आणि अमेरीकेतील महाराष्ट्रीयन घरात किती पालक मराठी बोलतात व शिकवतात?
“मराठी घरात” लिहितात तेव्हाच समजतं त्यांना कितपत मराठी येतं?
भाषा “मराठी” आहे, महाराष्ट्रीयन असं पाहिजे.
मी मराठीतच बोलते. आजकाल तर
मी मराठीतच बोलते. आजकाल तर मुद्दाम विचारते कुठल्या राज्यातुन आलात , किती वर्ष? आणि अजुन का मराठी येत नाही मग विचारते. माझा नवरा उगाचच, अगं जावु दे ना , कशाला त्यांना असं विचारते?
नवरा बेंगाली असून शिकला मराठी आणि मी बंगाली.
आज मी पुण्याहून मुंबईत आले, मुद्दामच विचारले, मराठी येतं का उबरला विचारले.
तो अगदी मुजोरपणे, हम तो पांडे है युपी से.
मग म्हटलं , ईथे रहातोस ना?
ले,म्हणाला समजती है थोडी थोडी.
ह्यांची मुजोरी कमी केलीच पाहिजे.
मी मराठीतच बोलते. आजकाल तर
….. …. …
माझ्या समजुतीप्रमाणे
माझ्या समजुतीप्रमाणे महाराष्ट्रात राहणारा तो महाराष्ट्रीय. महाराष्ट्रीयन हा इंग्रजी शब्द आहे. जसा Indian. मराठीत महाराष्ट्रीय - जसा भारतीय.
मराठी बोलणारे कुटुंब ते मराठी कुटुंब.
अमेरिकेत राहणारा महाराष्ट्रीय म्हणण्यापेक्षा मराठी असे म्हणता येईल.
परवा इथल्या किती मराठी लोकांनी महाराष्ट्रगीत म्हटलं किंवा ऐकलं?
>>अमेरीकेतील महाराष्ट्रीयन
>>अमेरीकेतील महाराष्ट्रीयन घरात>>
लेक स्वतःला हुजिअर मराठी समजतो. त्याचे पालक महाराष्ट्रातले तो नाही.
>>भाषा “मराठी” आहे, महाराष्ट्रीयन असं पाहिजे.>> आमच्यासाठी महाराष्ट्रात रहाणारा तो महाराष्टीयन. आमच्या ओळखीत, नात्यात बरेच जण २-३ पिढ्यांपासून महाराष्ट्रात रहातात. डोमिसाईल महाराष्ट्र पण त्याचे घर मराठी नाही ते सिंधी, कन्नड, गुजराथी, पंजाबी आहे. ते मराठी बोलत असले तरीही संस्कार-वावर-विचार मराठी नाहीत.
माझ्या लेकाचा अनुभव तर फारच मजेशीर. युनिमधे फॅकल्टी-स्टुडंट ऑफिसर्स असे डिनर होते. याच्या टेबलला एक अमराठी एचओडी आणि एक मराठी एचओडी. मराठी एचओडी ताठ्यात, याच्याशी तुटकपणे इंग्रजीत अॅक्सेंट मारत बोलले. अमराठी एचओडीनी त्याच्याशी मराठीत संवाद साधत चौकशी, चेष्टा मस्करी केली. त्यांचे शिक्षण मुंबईच्या आयआयटीतून झाले होते. स्वतःच्या क्षेत्रात चांगले नाव कमावलेले, अमेरीकेत ४० वर्ष राहीलेले पण चार वर्षं पवईला काढल्यावर मराठी येणारच ना म्हणाले. नंतरही लेक वर्कशॉपमधले काम उरकून उशीरा निघाला तर बरेचदा त्यांच्याशी हॉलवेत - लॉबीत गाठ पडे . दर वेळी ते मराठीत बोलत.
लेक नोकरीनिमित्त दुसर्या राज्यात गेला. तिथे रहायला गेल्या गेल्या लगेच गणेश उत्सव तर हा मुद्दाम माहिती काढून स्थानिक मराठी मंडळात गेला. तो एबीसीडी आहे कळल्यावर लगेच पब्लीकचे वागणेच बदलले. म्हणजे वाईट वागले नाहीत पण नॉर्मलही वागले नाहीत. लेकाने मेंबरशिप घेण्याचा विचार रद्द केला, परत कधीच गेला नाही. मी समजावण्याचा प्रयत्न केला की जात रहा हळू हळू त्यांना वाटणारी नॉवेल्टी ओसरेल तर तो म्हणाला गरज नाही, फेलोशिपसाठी माझा कॅथलिक युथ ग्रुप आहे आणि बाप्पासाठी जायचे तर तो माझ्या घरीही आहे.
लेकला पुन्हा पुन्हा येणारा अजुन एक अनुभव - तो त्याच्या कंपनीचा रिक्रुटर म्हणून दर वर्षी युनीच्या इंडस्ट्री विकला येतो. नेम टॅग असतो त्यामुळे मराठी घरातला हे कळू शकते. सीवी देणारी स्टुडंट विसा वाली बहुसंख्य मराठी मुले तो मराठीत बोलला तरी इंग्रजी -हिंदी झाडत रहातात. लेक त्यांना हिंदी येत नाही सांगतो. इंग्रजीत कोरडा संवाद होतो. तेच पुणे-नाशिक-कोल्हापूर वगैरे भागातली अगरवाल , माहेश्वरी वगैरे मुलं तो मराठीत बोलू शकतोय हे लक्षात घेवून मराठीत बोलतात, मग आत्या पुण्याला रहाते, नाशिकला फॅमिली फ्रेंड्चे घर आहे वगैरे वर सुरु होवून इकडच्या तिकडच्या गप्पा होतात. लेक त्यांना नेटवर्क साठी त्याच्या बाबासकट कुणाकुणाचे कॉन्टॅक्ट देतो, माझा रेफरन्स द्या सांगतो. एका गटाने जोडायची संधी गमावलेली असते तर दुसर्या गटाने कमावलेली असते.
माझा मुद्दा हा होता जेव्हा
माझा मुद्दा हा होता जेव्हा कोणीही असं म्हणतो, तु मराठी आहेस ना?
तर “मराठी हि भाषा ओळख , समाज ओळख नाही आहे आणि ती भाषा महाराष्ट्र राज्यात बोलली जाते.
मराठी भाषिक समाज म्हणून शकतो.
——
जर भाषेची चर्चा चाललीच आहे तर आजकाल जे भेसळ मराठी बोलले जाते; ते जरी अगदी प्रमाण नसले तरी उगीच केलेली भेसळ कानाला खटकतेच.
बोली भाषा आणि त्याचा ढब वेगळाच असतो पण हे असे मराठीत वाक्य एकले की हास्यास्पदच वाटते.
उदाहरण , “आम्ही स्कूल नसले की बाहेर प्ले करतो.”
अगदीच अचाट बोलणारे लोकं.
लोकं अगदीच फाटे फोडतील ह्या मुद्द्यावर पण “छाण” असे काहीही नसते. “वस्तु भेटली” असेही काही नसते. अगदी बोली भाषेत “गावली” सुद्धा “मिळाली” ह्याच अर्थाने बोलतात.
काही लोकांना मुलं ईग्लिश मध्ये बोलतात कारण ती अमेरीकेत जन्मला / जन्मली याचेच कौतुक असते.
पालकांनी शिकवले तर व्यवस्थित बोलतात मराठी. माझी मुलं अमेरीकेतच जन्मली तरी उत्तम मराठी आणि बंगाली ( वडिलांची भाषा) बोलतात.
तर मुद्दा हा आहे, तुम्हाला जर खरच गरज भाषा जतन करायची तर अशक्य असं काही नाही.
अमेरिकेचं जाऊ दे. उलट तिकडे
अमेरिकेचं जाऊ दे. उलट तिकडे मराठी भाषेचे वर्ग चालतात.
आपला पाल्य इंग्रजी माधमाच्या शाळेत जातो, त्याला स्कूलमध्ये स्टडी डिफिकल्ट होऊ नये म्हणून इथले पालक त्याच्याशी इंग्लिशमध्येच कॉन्व्हर्स करतात. आणि हेच चित्र इथल्या दक्षिण भारतीय भाषकांत दिसतं. इथलं एक मूळचं कन्नड कुटुंब आता इंग्रजीतच बोलतं. मुलगी दादाला अप्पा तेवढं म्हणते.
मराठी भाषा टिकली तर ती वस्तू भेटली असं बोलणार्यांमुळेच टिकेल. वस्तू मिळाली असं म्हणणार्यांच्या पुढच्या पिढीपेक्षा भेटली असं म्हणणार्यांची पुढची पिढी अधिक मराठी बोलत असेल.
मराठी अभ्यास केंद्राने मराठी भाषा आणि मराठीपण टिकवण्यासाठी मराठी पुस्तक विकत घ्या, मराठी वर्तमानपत्र विकत घेऊन वाचा, चित्रपट / नाट्यगृहात जाऊन चित्रपट / नाटक पहा. व्यावहारिक संभाषण मराठीत करा अशा काही गोष्टी सांगितल्यात.
आमच्या महर्षी कर्वे चौकात
आमच्या महर्षी कर्वे चौकात इकडे रोज संध्याकाळी साधारणपणे सहा वाजता महाराष्ट्र गीत वाजायला लागते.
बहुतेक पुणे महापालिकेने अशी व्यवस्था केली असावी.
मी एकदा इथेच "भेटणे " ह्या शब्द प्रयोगाबद्दल लिहिले होते. हे मी प्रथम अकोला साईडला ऐकले. त्यावर उत्तर म्हणून एकाने लिहिले होते कि "आम्ही इथे मुंबईला" सर्रास असेच बोलतो.
हेही मी अकोल्यालाच ऐकले. " अरे त्याची बायको काल जळाली." ऐकून मी तर हादरलोच!
भाषा अशी दर १० मैलाला थोडी थोडी बदलत असते.
भरत अगदीच! सहमत.
भरत अगदीच! सहमत.
मला हल्ली शुद्धलेखनाचा फार बागुलबुवा करू नये, चुकीचे आता वापरात असेल तर ते ही बरोबर म्हणावे, प्रताधिकार वगैरे ठीक आहे पण.. असं वाटू लागलं आहे. थोडक्यात ऍक्सेप्ट करण्याची, स्वीकारण्याची प्रवृत्ती वाढवावी, सिनिकल/ निंदा करणे, तिरकस बोलणे याने नुकसानच जास्त होते.
मुलांना शिकवणे, त्यांनी बोलणे, आणि ते सातत्याने करणे, करत रहाणे ही तारेवरची कसरत आहे. मीच हल्ली मुलांशी बोलताना पूर्ण इंग्रजीवर घसरतो हे हल्लीच प्रकर्षाने जाणवले आहे. स्वतःलाच आठवण करत राहून मराठीत जाच न वाटता मुलांना बोलते करण्याचा उद्योग सुरू केला आहे. तो टिकला पाहिजे.
मुंबईच्या उपनगरांत मराठीतून संवाद साधणारे माझ्या वर्तुळात तरी दिसले आहेत. पण ते अगदीच मर्यादित आणि पांढरपेशी ममव बहुल वस्तीतील आहे याची जाणीव आहे.
वस्तू मिळाली आणि भेटली.
वस्तू मिळाली आणि भेटली.
भेटली हा शब्दप्रयोग आजचा नाही. हा ग्रामीण भागात सर्रास आहे. मुळात ग्रामीण बाजाचं मराठी ही स्वतंत्र प्राकृतित्पन्न भाषा आहे. तिच्यावर संस्कृतोत्पन्न मराठी लादली आणि संस्कृतोत्पन्न मराठी बोलता येत नाही म्हणून ती अशुद्ध हाच भेसळ्युक्त क्रायटेरिया आहे.
अभिजात साठी याच प्राकृतोत्पन्न मराठीतले शब्द घ्यावे लागलेत. मूळ क्लासिक संस्कृत ही आठव्या शतकानंतर उदयास आलेली भाषा आहे. त्या आधी ती रानटी लोकांचे संस्कृत या फॉर्ममधे होती. तिसर्या शतकापासून तिचे व्याकरण बनवण्याचे उद्योग झाले आहेत. ग्रामीण मराठी, खडी बोली, अवधी, मगधी, पाली, तेलगू, तमिळ या भारतातल्या प्राचीन भाषा आहेत. शुद्धतेच्या कसोट्या डेंजरच.
Pages