पूर्वभाग
पुलाजवळील चकमकीत पोलिसांचा उलटा सापळा यशस्वी ठरला, पण नक्षल कमांडर आझाद पुन्हा निसटला. परिसर तपासत असताना माधव नावाचा तरुण नक्षली शरण आला आणि त्याने रेश्माबद्दल बोलण्याची विनंती केली. कॅम्पमध्ये रेश्मा व माधवची भावनिक भेट झाली, जिथे कोमलच्या मृत्यूची सत्यकथा समोर आली. माधवने सांगितले की आझाद मोठ्या हल्ल्याची तयारी करत असून आंध्र व ओडिशातील कमांडर गुप्त बैठकीसाठी आले आहेत. थेट हल्ला आत्मघातकी ठरेल, असे सांगून त्याने स्वतः पुन्हा नक्षल कॅम्पमध्ये जाऊन माहिती आणण्याची योजना मांडली. मोठा धोका असूनही अधिकाऱ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवत त्याच्या बेड्या काढल्या. माधव जंगलात परत गेला.
*********************************************************************************************************
लाल रेषा - भाग १४ - रणनीती: 'ऑपरेशन ऑल आऊट'
कॅम्पमध्ये सर्व दिवे बंद होते. प्रत्येक बंकरमध्ये जवान जागे होते. बंदुका भरलेल्या होत्या. वायरलेस सेट्स मंद आवाजात आपलं अस्तित्व दाखवत होते. कोणी बोलत नव्हतं, पण प्रत्येक जण वाट पाहत होता.
आकाश ढगांनी गच्च भरलं होतं. चंद्र दिसत नव्हता. झाडांच्या टोकांवरून वाहणारा वारा सुद्धा आज काहीसा सावध वाटत होता. जंगल जणू स्वतः श्वास रोखून उभं होतं.
मी ऑफिसच्या बाहेर उभा राहून अंधाराकडे पाहत होतो.
पवार काही वेळापूर्वीच त्याच्या निवडक साथीदारांसह निघाला होता. खऱ्या ताफ्याला सुरक्षित मार्गाने कॅम्पपर्यंत आणण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. मुख्य रस्ता वापरण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे त्यांनी जंगलातून वळसा घेतला होता. अंदाजानुसार ताफा मध्यरात्री बारा ते साडेबारा दरम्यान पोहोचायला हवा होता.
पण त्या ताफ्याइतकाच महत्त्वाचा एक दुसरा माणूस होता...माधव.
तो परत आला, तर आम्हाला शत्रूच्या पुढच्या डावाची माहिती मिळणार होती. तो आला नाही, तर आम्ही अंधारात लढणार होतो.
शिर्के आणि सावंतची टीम जंगलाच्या वेशीवर वेगवेगळ्या ठिकाणी दबा धरून बसली होती. त्यांच्या नजरा प्रत्येक पायवाटेवर होत्या. कोणतीही हालचाल दिसली, तर क्षणात संदेश येणार होता.
घड्याळाने अकरा वाजल्याची वेळ दाखवली. तासामागून तास गेल्यासारखं वाटत होतं. शांतता जितकी वाढत होती, तितकंच मनातलं दडपणही वाढत होतं.
वायरलेसवर किरकिर झाली. सावंतचा दबका आवाज आला. “सर… अकरा वाजले. माधव परत येईल असं वाटत नाही.”
त्याच्या आवाजात शंका होती, पण त्यामागे एक कटू वास्तवही होतं. नक्षली कॅम्पमधून परत येणं म्हणजे मृत्यूच्या जबड्यातून सुटून येणं होतं.
मी काही क्षण उत्तर दिलं नाही. मग शांतपणे म्हणालो, “आणखी थोडा वेळ थांबूया.”
मी स्वतःलाच सांगत होतो की अजून आशा संपलेली नाही.
कॅम्पच्या मागच्या बाजूच्या झाडीत पानं सळसळली. क्षणात दोन जवानांनी त्या दिशेला बंदुका रोखल्या. बंकरमधले डोळे अंधार भेदू लागले. मी स्वतः पुढे सरकलो.
पानांची सळसळ आता जवळ येत होती. मग काळोखातून एक आकृती बाहेर पडली.
तो माणूस कोण आहे, हे पहिल्या क्षणी कळेना. तो धापा टाकत धावत होता. अंगभर चिखल. कपडे फाटलेले. केस विस्कटलेले. तोल सावरत तो कॅम्पच्या दिशेने येत होता.
जवानांनी ट्रिगरवर बोट घट्ट केलं. मी हात वर करून त्यांना थांबवलं.
ती आकृती प्रकाशाच्या सीमारेषेत आली… आणि आम्ही सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
तो माधव होता.
तो माझ्यापर्यंत पोहोचला आणि आणखी एक पाऊल टाकण्याआधीच गुडघे दुमडले. पुढच्या क्षणी तो सरळ जमिनीवर कोसळला. दोन जवान धावत पुढे गेले, पण मी स्वतः खाली बसून त्याला खांद्याने आधार दिला.
त्याचा श्वास तुटत होता. छाती धडधडत होती. अंगभर चिखल साचला होता. डाव्या हातावर खोल ओरखडे होते. तो नुसता धावत आलेला नव्हता तो मृत्यूला चुकवत इथवर पोहोचला होता.
“पाणी!” मी ओरडलो.
एका जवानाने बाटली पुढे केली. माधवने दोन घोट घेतले, पण हात इतके थरथरत होते की अर्धं पाणी चेहऱ्यावरच सांडलं.
मी त्याच्या डोळ्यांत पाहिलं. “बोल, माधव.”
त्याने कसाबसा श्वास सावरला. “साहेब…” तो धापा टाकत म्हणाला, “त्यांचा प्लॅन समजला…”
आसपास उभे असलेले जवान आणखी जवळ सरकले. वायरलेस हातात धरलेला पाटील थिजल्यासारखा उभा होता. सावंतच्या चेहऱ्यावरचा ताण वाढला.
माधवने पुढे बोलायला सुरुवात केली. “आज रात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत अजून गट येणार आहेत… वेगवेगळ्या जंगल पट्ट्यांतून… छोट्या तुकड्यांनी… लक्ष वेधू न देता…”
त्याचा आवाज पुन्हा अडखळला. मी त्याला आधार दिला. “सगळे मिळून… शंभरच्या वर होतील.”
त्या एका वाक्याने वातावरण बदललं. शंभराहून अधिक सशस्त्र नक्षली म्हणजे साधा हल्ला नव्हता, तो संघटित युद्धाचा प्रयत्न होता.
माधवने दात घट्ट आवळले आणि पुढे म्हणाला, “उद्या रात्री ते कॅम्पवर तुटून पडणार आहेत.”
“का?” पाटीलच्या तोंडून नकळत निघालं.
माधवने त्याच्याकडे पाहिलं. “कारण तुम्ही आधी पकडलेला त्यांचा एक कमांडर… आणि सहा जण… त्यांना सोडवायचं आहे. आझाद म्हणतो जर आपण आपल्या लोकांना बाहेर काढलं नाही, तर संघटनेची भीती कमी होईल.”
मी विचारलं, “फक्त कैद्यांसाठी?”
माधवने नकारार्थी मान हलवली. “नाही साहेब… तो फक्त पहिला टप्पा आहे. कॅम्पवर हल्ला करून जरब बसवायची. त्यानंतर लगेच वेगवेगळे गट फुटणार आहेत.”
तो एकेक शब्द तोलून बोलत होता. “सरकारी शाळा… जिथे निवडणुकीच्या वेळी बूथ उभे राहतात.”
“या भागातील मुख्य राजकीय पक्षांची कार्यालयं…”
“तहसील आणि इतर सरकारी कार्यालयं…”
“पोलीस स्टेशन…”
खोलीबाहेर उभे जवानही आता आत डोकावत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर गंभीरता उतरली होती.
माधव पुढे म्हणाला, “एका रात्रीत जितका विध्वंस करता येईल तितका करायचा आहे. आग, स्फोट, भीती… लोकांना दाखवायचं की इथं अजूनही त्यांचंच राज्य आहे.”
तो थोडा थांबला. श्वास घेतला.
“आणि उजाडण्यापूर्वी मुख्य गट सीमा ओलांडून परराज्यात लपणार आहे. काही दिवस शांत बसतील… मग पुन्हा परत येतील.”
त्या क्षणी माझ्या मनात चित्र स्पष्ट झालं. हा केवळ कॅम्पवरील हल्ला नव्हता. ही संपूर्ण सरकारी व्यवस्थेला गुडघ्यावर आणण्याची मोहीम होती.
ते फक्त बदला घेत नव्हते, ते पुन्हा भीतीचं साम्राज्य उभं करण्यासाठी निघाला होते.
मी हळूहळू उभा राहिलो. माझ्या आजूबाजूला उभे जवान माझ्याकडे पाहत होते.
माधवचं बोलणं संपेपर्यंत खोलीत असा निःशब्द ताण पसरला होता की कुणाचाही श्वास ऐकू येत नव्हता. भिंतीवर लटकलेल्या घड्याळाची टिकटिकही त्या शांततेत अधिक मोठी वाटत होती. बाहेर रात्र नेहमीसारखी गूढ वाटत होती, पण खरी गूढता आता आमच्या समोर टेबलावर पसरलेल्या नकाशावर उतरली होती.
मी हळूहळू त्या नकाशाकडे पाहिलं. जंगलाचे हिरवे पट्टे, नाले, दऱ्या, गावांची छोटी नावं, कॅम्पचा चौकोनी ठिपका आणि त्या सगळ्यावर आता मृत्यूच्या शक्यता फिरत होत्या.
शंभराहून अधिक सशस्त्र नक्षली, आझाद स्वतः, आंध्रकडचा स्फोटतज्ज्ञ कमांडर, ओडिशाकडचा जंगल कारवायांचा प्रमुख. पहाटेपर्यंत हे सगळे वेगवेगळ्या मार्गांनी एकत्र येणार होते. त्यांच्या बैठकीत ठरणार होतं पुढच्या रात्रीचं रक्तरंजित वेळापत्रक.
पहिला आघात आमच्या कॅम्पवर.
दुसरा सरकारी कार्यालयांवर.
तिसरा शाळांवर.
चौथा पोलीस ठाण्यांवर.
मग भीती, आग आणि गोंधळ मागे ठेवून परराज्यात पसार.
मी डोकं वर केलं. पाटीलचे हात नकळत मुठीत वळले होते. सावंतच्या डोळ्यांत राग धगधगत होता. शिर्के शांत उभा होता, पण त्याची नजर खिडकीबाहेरच्या अंधारात खिळली होती जणू तो आधीच नेम धरत होता.
माधव थकून खाली बसला होता. त्याने जे सांगितलं, ते सांगताना तो पुन्हा एकदा मृत्यूच्या अनुभवातून फिरून आला होता.
ही फक्त दहशत माजवण्याची योजना नव्हती. ही युद्धघोषणा होती.
आजवर आपण सापळे मोडत होतो, गस्त घालत होतो, प्रत्युत्तर देत होतो. पण आता शत्रूने उघडपणे रणशिंग फुंकलं होतं.
मी क्षणभर डोळे मिटले. डोक्यात एकामागून एक पर्याय फिरले.
कॅम्प मजबूत करून वाट पाहायची?
मुख्यालयाकडून मदत मागायची?
पहाटेपर्यंत बसून राहायचं?
की शत्रू सगळे एकत्र जमण्याआधीच त्यांच्यावर तुटून पडायचं?
प्रत्येक पर्यायात धोका होता.
प्रत्येक विलंबात अधिक रक्तपात होता.
मी डोळे उघडले. निर्णय घ्यायची वेळ आली होती. मी झटकन वायरलेस ऑपरेटरकडे वळलो. “मुख्यालयाशी सुरक्षित लाईन जोडा. आत्ताच.”
ऑपरेटरच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसत होता. कपाळावर घाम चमकत होता, पण हात मात्र वेगाने काम करत होते. त्याने सेटची फ्रिक्वेन्सी बदलली, कोड पॅड उघडलं, दोनदा सिग्नल तपासला आणि जोडणी सुरू केली. खोलीत फक्त यंत्राच्या किरकिरणाऱ्या आवाजाशिवाय काहीच ऐकू येत नव्हतं.
पाटील, सावंत, शिर्के आणि बाकीचे जवान नि:शब्द उभे होते.
काही क्षणांनी ऑपरेटरने माझ्याकडे पाहिलं. “सर… लाईन मिळाली.”
मी रिसीव्हर हातात घेतला. “कंट्रोल, थिस इज फ्रॉम फॉरवर्ड कॅम्प. तातडीचा संदेश.”
समोरून ओळखीचा पण निर्विकार आवाज आला. “कंट्रोल रिसीव्हिंग. बोला.”
मी वेळ न दवडता थेट मुद्द्यावर आलो. “विश्वसनीय गुप्त माहिती मिळाली आहे. उद्या पहाटेपर्यंत शंभर प्लस नक्षली एका ठिकाणी एकत्र येणार आहेत. उच्चस्तरीय कमांडर्स उपस्थित असतील. क्षेत्रीय पातळीवरील मोठी कारवाई नियोजित आहे. आम्हाला तातडीने पाच अतिरिक्त तुकड्या हव्यात. पहाटेपूर्वी.”
खोलीत सगळ्यांच्या नजरा माझ्यावर खिळल्या होत्या.
समोर काही क्षण शांतता होती. मग उत्तर आलं, “पुरावा?”
त्या एका शब्दाने माझ्या डोक्यात सणक गेली. मी दात घट्ट आवळले. “स्रोत विश्वसनीय आहे. अंतर्गत स्तरावरून माहिती आली आहे. शत्रूच्या गटातून.”
“ओळख पटलेला स्रोत?”
“हो. पण नाव उघड करता येणार नाही.”
“लेखी पुष्टी आहे का?”
“नाही.”
“तांत्रिक इंटरसेप्ट?”
“नाही.”
“फोटो? व्हिडिओ? ड्रोन निरीक्षण?”
“नाही. त्याला वेळ नाही.”
पुन्हा काही सेकंद शांतता पसरली. ती काही सेकंदं जणू अपमानासारखी वाटत होती.
मग समोरून थंड, नियमबद्ध आवाज आला, “पाच तुकड्या पाठवण्यासाठी स्पष्ट आणि पडताळता येईल असा पुरावा आवश्यक आहे. सध्या उपलब्ध संसाधनं मर्यादित आहेत.विनंती सध्या नाकारण्यात येते.”
खोलीतला प्रत्येक माणूस ताठ झाला. पाटीलच्या हातातील मुठ आवळली गेली. सावंतच्या नाकपुड्या फुलल्या. ऑपरेटरने नकळत नजर खाली घातली.
माझ्या अंगातून रक्त उसळल्यासारखं झालं.
पण मी आवाजावर नियंत्रण ठेवलं. “उद्या रात्री या भागात आग लागली… सरकारी इमारती उडाल्या… जवान मेले… आणि निरपराध लोक मारले गेले… तर त्याची जबाबदारी नोंदवून ठेवा.”
समोरून उत्तर आलं, “अधिक पुरावा मिळाल्यास पुनर्विचार केला जाईल.”
क्षणभर स्थिर शांतता.
मग लाइन कट झाली. रिसीव्हरमध्ये फक्त मृत बीप आवाज उरला.
मी वायरलेस टेबलावर आपटला नाही. आवाज चढवला नाही. रागाने कुणावर ओरडलोही नाही. पण आतून संताप धगधगत होता. मुख्यालयाच्या थंड उत्तराने फक्त मदत नाकारली नव्हती, त्यांनी वेळही हिरावून घेतला होता.
मी काही क्षण स्थिर उभा राहिलो. टेबलावर पसरलेल्या नकाशाकडे नजर रोखून. त्या कागदावरच्या रेषा, टेकड्या, नाले, पायवाटा आता जिवंत वाटत होत्या. प्रत्येक मार्गावर धोका होता. प्रत्येक विलंबित क्षणाचा अर्थ मृत्यू होता.
पाटील हळूच माझ्याजवळ आला. त्याने आवाज कमी ठेवला.
“सर…”
मी त्याच्याकडे न पाहताच विचारलं, “आपली एकूण संख्या किती असेल?”
तो तत्काळ सरळ उभा राहिला. अशा वेळी भावनांना जागा नसते, फक्त आकड्यांना असते.
“कॅम्पमध्ये लढाऊ स्थितीत साधारण पंचवीस.”
तो मोजत पुढे म्हणाला, त्यात जाधव अजून पूर्ण तंदुरुस्त नाही. चालतोय, पण मोठ्या कारवाईसाठी योग्य नाही. शिंदे नुकताच सावरतोय. तो उभा राहील, पण पूर्ण क्षमतेने नाही. दोन जखमी जवान आहेत. हलकी कामं, दारुगोळा, संचार, वैद्यकीय मदत… एवढ्यापुरते उपयोगी.”
मी शांतपणे मान हलवली.
प्रत्येक शब्द म्हणजे उपलब्ध मनुष्यबळातून अजून थोडी कपात.
“पवार?”
पाटीलने तत्काळ उत्तर दिलं. “खरा ताफा घेऊन येतोय. त्याच्यासोबत अठरा ते वीस जण आहेत. रस्ता सुरक्षित असेल तर एक ते दोन तासांत पोहोचतील.”
मी नकाशावर बोट फिरवत वेगाने हिशेब मांडला. कॅम्पमधले पंचवीस. पवारचे जास्तीत जास्त वीस.
त्यातून जखमी, थकलेले, चालक, सहाय्यक, संचार कर्मचारी वजा.
तरीही…
“म्हणजे जास्तीत जास्त पंचेचाळीस.” पाटीलने होकारार्थी मान हलवली.
खोलीत पुन्हा शांतता पसरली. पंचेचाळीस विरुद्ध शंभराहून अधिक. तेही त्यांच्या ओळखीच्या जंगलात. त्यांच्या निवडलेल्या वेळेत. त्यांच्या आखलेल्या मार्गांनी. त्यांच्याकडे प्रदेशाचा फायदा, हालचालीचा वेग, स्थानिक पायवाटा आणि अंधाराचा आधार होता.
सावंतने हळू आवाजात विचारलं, “सर… थेट बचावावर जाऊ?”
मी उत्तर दिलं नाही. कारण हा साधा बचावाचा प्रश्न नव्हता. जर ते शंभर जण एकत्र जमले, तर ते कॅम्पवर हल्ला करतीलच. आम्ही रोखू शकू… कदाचित. पण त्यानंतर ते फुटून गावोगाव पसरणार होते.
म्हणजे लढाई कॅम्पच्या भिंतीबाहेर जाणार होती.
मी हळूहळू डोकं वर केलं. “आपण फक्त पंचेचाळीसजण नाही आहोत.”
सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. मी नकाशावर बोट रोवत ठामपणे म्हणालो, “आपण योग्य ठिकाणी, योग्य वेळी उभे असलेले पंचेचाळीस जवान आहोत.”
त्या क्षणी खोलीतला भार थोडा बदलला.
पाटील थोडा पुढे सरकला आणि नकाशाच्या कडेला हात ठेवत म्हणाला, “ताफ्यासोबत उपग्रह फोन आहे. लाँग रेंज वायरलेस सेट आहेत. अतिरिक्त दारुगोळा आहे. नाईट व्हिजन युनिट्स आहेत. दोन हलक्या ड्रोन किट्स आहेत. मेडिक किट्सही भरपूर आहेत. पुरवठ्याच्या दृष्टीने आपण उभं राहू शकतो…”
तो क्षणभर थांबला. मग जड आवाजात पुढे म्हणाला, “पण मनुष्यबळ कमी आहे.”
खोलीत पुन्हा शांतता उतरली. मी त्याच्याकडे पाहिलं. तो केवळ माहिती देत नव्हता, तो रणांगणाचं खरं चित्र माझ्यासमोर ठेवत होता.
आमच्या कडे ताफा आल्यानंतर संपर्कासाठी साधनं, लढण्यासाठी दारुगोळा, अंधारात पाहण्यासाठी नाईट व्हिजन गॉगल्स, जखमी वाचवण्यासाठी औषधं, आकाशातून पाहण्यासाठी ड्रोन हि सगळी व्यवस्था असणार होती.
पण बंदूक चालवण्यासाठी बोटं कमी होती. पोजिशन धरून ठेवण्यासाठी खांदे कमी होते. एका बाजूला हल्ला परतवून दुसऱ्या बाजूला धावून जाण्यासाठी पाय कमी होते. आणि सर्वात महत्त्वाचं, एकाच वेळी अनेक ठिकाणी उभं राहण्यासाठी माणसं कमी होती.
मी नकाशावर नजर रोखली. शत्रू शंभराहून अधिक. वेगवेगळ्या गटांत विभागला, तर अनेक दिशांनी येऊ शकतो. काहीजण थेट कॅम्पवर. काहीजण मागच्या झाडीतून. काहीजण पुरवठा रेषा तोडायला. काहीजण गावांत दहशत पसरवायला. त्यांच्याकडे संख्याबळ होते.
आणि आमच्याकडे क्षमता होती. हा संघर्ष बंदुकांचा कमी आणि ताळमेळाचा जास्त होता.
मी हळू आवाजात म्हणालो, “साधनं युद्ध जिंकत नाहीत, पाटील.”
तो माझ्याकडे पाहत राहिला.
मी पुढे म्हणालो, “ती फक्त संधी देतात. युद्ध जिंकतात माणसं… आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय.”
पाटीलच्या चेहऱ्यावरचा ताण किंचित बदलला. त्याला समजलं होतं. आपण संख्याबळ वाढवू शकत नव्हतो. म्हणून आता शत्रूचे संख्याबळ निरुपयोगी करायचे होते.
मी खिडकीबाहेरच्या काळोखाकडे पाहिलं. दूर झाडांच्या रांगांवर रात्र जडपणे टेकून बसली होती. वाऱ्याने हलणाऱ्या फांद्या सावल्यांसारख्या हालत होत्या. त्या अंधारात किती पायवाटा लपल्या होत्या, किती बंदुका दबा धरून बसल्या होत्या आणि किती जीवांचा निर्णय होणार होता याचा अंदाजही येत नव्हता.
माझ्या डोक्यात मात्र चित्र हळूहळू स्पष्ट होत होतं. अशा पातळीचे कमांडर उगाच एका जागी जमत नाहीत. आझाद, आंध्रकडचा स्फोटतज्ज्ञ, ओडिशाकडचा जंगल कारवायांचा प्रमुख, स्थानिक भरतीचं जाळं सांभाळणारे लोक आणि त्यांच्या संरक्षणासाठी जमणारे शंभराहून अधिक सशस्त्र गट. हे सगळे वेगवेगळे धागे होते. अनेक वर्षं या जंगलात भीती, रक्त आणि गोंधळ विणणारे धागे.
आणि आज पहिल्यांदाच ते एकत्र येत होते.
जर हे सगळे खरोखर एका ठिकाणी जमले असतील…तर ही फक्त गोळीबाराची संधी नव्हती. ही एखादा हल्ला परतवण्याची संधी नव्हती. ही अनेक वर्षं डोक्यावर बसलेल्या दहशतीचं मुळ पकडण्याची संधी होती, एकाच फटक्यात त्यांची योजना मोडण्याची, त्यांच्या साखळीला तडा देण्याची, गावकऱ्यांच्या डोळ्यांत पहिल्यांदा भीतीऐवजी आशा निर्माण करण्याची.
मी मुठ हळूच आवळली. अशा संधी वारंवार मिळत नाहीत. थांबलो, तर ते फुटून पसरतील.
उद्या पुन्हा एखादा पूल उडेल. एखादी शाळा जळेल. एखादं गाव भीतीने गप्प बसेल. एखादं मूल अनाथ होईल.
आणि आम्ही पुन्हा त्यांचे सावट पकडत फिरत राहू.
नाही. यावेळी नाही.
मी खिडकीपासून मागे सरकलो. निर्णय माझ्या मनात पक्का झाला होता. ही संधी हातची जाऊ द्यायची नव्हती. कुठल्याही किंमतीत नाही.
मी आणि पाटील नकाश्यापाशी उभे राहिलो. बाकीचे जवान माझ्या खुणेनंतर शांतपणे बाहेर गेले. दरवाजा अलगद बंद झाला आणि खोलीत फक्त आम्ही दोघं, टेबलावर पसरलेला नकाशा आणि मंद दिव्याचा पिवळसर उजेड उरला.
बाहेर रात्र अजून गडद होती. आत मात्र वेळ धावत होती.
मी नकाश्यावर बोट फिरवत नाल्याजवळच्या त्या भागावर थांबलो. “जर आपण पहाटेपूर्वी तिथे पोहोचलो, तर?”
पाटीलने क्षणाचाही विलंब न लावता पुढे झुकून नाल्याच्या वळणाकडे बोट ठेवलं.
“ते रात्री जागे असतील,” तो शांतपणे म्हणाला. “बैठक चालू असेल. पहारेकरी सतर्क असतील. बाहेरचे कमांडर आले असतील, तर सुरक्षा अजून कडक असेल.”
तो पुढे म्हणाला, “पण पहाटे चारनंतर चित्र बदलतं. बैठक संपत आलेली असेल. काही जण दमून झोपलेले असतील. काहींची ड्युटी बदलत असेल. रात्रभर जागलेल्या माणसाचा पहारा सगळ्यात कमकुवत असतो.”
मी त्याच्याकडे पाहिलं. तो बरोबर बोलत होता.
मी पुढचा प्रश्न विचारला, “पळवाटा?”
पाटीलने तीन ठिकाणी बोटं ठेवली. “मुख्य वाट-जिथून पुरवठा येतो.”
“दक्षिण उतार-कठीण आहे, पण सराईत लोक निसटू शकतात.”
“आणि हा कोरड्या ओढ्याचा मार्ग-सर्वात धोकादायक. वरून दिसत नाही, पण आतून सरळ बाहेर काढतो.”
मी काही क्षण विचारात पडलो. नकाश्यावर त्या तीन रेषा जणू शत्रूचे श्वास वाटत होत्या.
मी सरळ म्हणालो, “मग आपण हल्ला करणार नाही.”
पाटीलने मान वर केली. त्याच्या डोळ्यांत प्रश्न चमकला.
“मग?”
मी नकाश्यावर तीन्ही ठिकाणी बोटं रोवली.
“घेराव.”
पाटील काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला “म्हणजे…”. मग त्याच्या चेहऱ्यावर समजल्याची चमक उमटली.
मी पुढे म्हणालो, “आपला उद्देश त्यांना मारणं नाही.”
तो क्षणभर दचकून माझ्याकडे पाहू लागला.
मी ठाम, निर्विकार आवाजात वाक्य पूर्ण केलं, “आपला खरा उद्देश त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर पडू न देणं आहे.”
खोलीत पुन्हा शांतता पसरली.
मी नकाश्यावर हात फिरवत योजना स्पष्ट करू लागलो. “पहाटेच्या त्या धूसर प्रकाशात आपण तिथे पोहोचू. तेव्हा त्यांची सावधगिरी सर्वात कमी असेल. काहीजण झोपेत असतील, काहींनी शस्त्रं बाजूला ठेवलेली असतील, तर काही पहारा बदलत असतील.”
“आपण आधी तिन्ही पळवाटा बंद करू.”
“मुख्य वाट-सावंत.”
“दक्षिण उतार-शिर्के.”
“ओढ्याची पायवाट-पवार पोहोचला की त्याची टीम.”
पाटील मधेच म्हणाला, “आणि आपण?”
“आपण मध्यभागी दबाव टाकू.”
मी त्याच्याकडे पाहत पुढे म्हणालो, “गोळीबार शेवटचा पर्याय. आधी त्यांना वाटलं पाहिजे की आपण मोठ्या संख्येने आलोय.”
तो हलकंसं हसला. “पंचेचाळीस माणसं शंभरावर भारी पडतील?”
मी निर्विकार चेहऱ्याने उत्तर दिलं, “जर ते तयार असतील… तर नाही.”
मी थोडा थांबलो. “पण जर ते बेसावध असतील… गोंधळलेले असतील… आणि त्यांना चारही बाजूंनी वेढा पडल्याचा भास झाला…”
मी नकाशावर वर्तुळ काढलं. “तर शंभर माणसंही त्या वेढ्याच्या विचाराने हरतील.”
पाटील आता पूर्णपणे तयार झाला होता.
“स्मोक कॅनिस्टर्स?”
“हो.”
“लाईट्स?”
“हो.”
“लाऊडहेलर?”
“हो.”
“ड्रोन?”
मी पहिल्यांदाच हलकंसं हसलो.
“वरून आवाज घुमेल… खाली सावल्या हलतील… आणि प्रत्यक्षात जितकं आहे त्यापेक्षा कितीतरी मोठं सैन्य आल्याची त्यांना खात्री पटेल.” पाटीलने मान हलवली.
मी वाक्य पूर्ण केलं, “आपण पुन्हा एकदा त्यांच्या मनावर हल्ला करायचा.”
बाहेर कुठेतरी पहाटेपूर्वीचा थंड वारा वाहू लागला होता. रात्र अजून संपली नव्हती. पण तिचा शेवट आता आम्ही ठरवणार होतो.
मी सरळ उभा राहिलो. निर्णय आता विचारांचा नव्हता कृतीचा होता. खोलीत उभे असलेले सगळे माझ्याकडे पाहत होते. प्रत्येकाला समजलं होतं की पुढची काही तासं या संपूर्ण भागाचं भवितव्य ठरवणार होती.
मी आदेश द्यायला सुरुवात केली. “ताफा पोहोचताच कुणालाही विश्रांती नाही.”
पाटीलने तत्काळ वही उघडली.
“रस्ता पार करून आत आले की लगेच सर्वांना ब्रीफ करा. परिस्थिती, लक्ष्य, वेळापत्रक, संपर्क संकेत सगळं स्पष्ट हवं.”
“हो, सर.”
मी पुढचा आदेश दिला. “सॅटेलाईट फोनने पुन्हा मुख्यालयाला अपडेट पाठवा.”
सावंत पुढे सरकला. “मजकूर?”
“आम्ही हालचाल करतोय. शत्रूची एकत्रित उपस्थितीची पुष्टी झाली आहे. अतिरिक्त मदत अजूनही आवश्यक आहे. पहाटेपूर्वी reinforcement मिळालं, तर ऑपरेशनचा परिणाम बदलू शकतो हे स्पष्ट लिहा.”
मी थोडा थांबलो. “आणि नोंद ठेवा की आपण मदत मागितली होती.”
पाटीलने माझ्याकडे पाहिलं. त्याला त्या वाक्याचा अर्थ समजला होता.
मी तिसरा आदेश दिला. “दोन ड्रोन तयार ठेवा.”
शिर्केने तत्काळ उत्तर दिलं. “बॅटऱ्या चार्ज आहेत. थर्मल मोड तपासतो.”
“एक ड्रोन उंचावरून प्राथमिक पाहणीसाठी वापरायचा. दुसरा राखीव ठेवायचा. दाट झाडीत आत शिरवण्यासाठी छोटा, शांत आणि कमी उंचीवर उडणारा नॅनो ड्रोन तयार ठेवा. पहिला पाडला गेला, सिग्नल हरवला किंवा झाडीत अडकला, तर दुसरा तात्काळ हवेत गेला पाहिजे.”
“समजलं.”
मी टेबलावरची पेन्सिल उचलली आणि नकाशावर कॅम्पचा आतील भाग दाखवला.
“जखमींना लगेच हलवा. आत्ताच.” मी पुढे म्हणालो, “त्यांना मेडिकल शेडमध्ये ठेवायचं नाही. आतल्या मजबूत संरक्षित भागात ठेवा. कॅम्पवर अचानक हल्ला झाला, तर ते उघड्यावर अडकता कामा नयेत.”
मेडिक जवानाने मान डोलावली. “हो, सर.”
मी पुढे म्हणालो ,“जाधव आणि शिंदे.”
दोघांची नावं घेताच खोलीत क्षणभर शांतता पसरली.
“ते पूर्ण लढाईत सहभागी होणार नाहीत. त्यांना स्थिर संरक्षणात ठेवा. बंकर सेक्टर-२. कॅम्पच्या आतल्या रिंगचं नेतृत्व त्यांच्याकडे राहील.”
पाटीलने मान हलवली.
मी शेवटचा आदेश दिला. “उरलेले सगळे दोन तासांत हालचालीस तयार.”
त्या शब्दांनी खोलीत जणू विजेचा प्रवाह गेला.
“पूर्ण युद्धसज्जता हवी. सामान हलकं ठेवा. अतिरिक्त दारुगोळा घ्या. हालचाल पूर्ण शांततेत होईल. चेहऱ्यावर रंग लावा. प्रत्येक गटाकडे स्वतंत्र वैद्यकीय पाउच असू द्या. आणि तीस मिनिटांत सर्व रेडिओ तपासणी पूर्ण झाली पाहिजे.”
मी एकेकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. थकवा होता. भीतीही होती. पण आता त्याहून मोठं काही होतं - उद्देश.
मी शांत पण ठाम आवाजात म्हणालो, “आज आपण फक्त बचावासाठी उभे राहत नाही.” मी एकेकाच्या डोळ्यांत पाहत पुढे म्हणालो,“आज आपण शिकारीला निघतोय.”
बाहेर अजून रात्र होती. पाटील काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी स्थिरता होती, पण डोळ्यांत प्रश्न स्पष्ट दिसत होता. तो अनेक कारवायांत माझ्यासोबत उभा राहिला होता. गोळीबार, सापळे, मृत्यू, विश्वासघात सगळं पाहिलं होतं. पण आजची रात्र वेगळी होती. आज आपण शत्रूला रोखण्यासाठी नव्हे, तर त्याच्या मुळावर घाव घालण्यासाठी निघालो होतो.
त्याने अखेर हळू आवाजात विचारलं, “सर… हे जमलं नाही तर?”
खोलीत उपस्थित सगळे स्थिर झाले. कुणी हाललं नाही. कुणी श्वासही मोठ्याने घेतला नाही.
कारण हा प्रश्न फक्त पाटीलचा नव्हता. तो प्रत्येकाच्या मनात होता.
मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती - वास्तव होतं.
मी शांतपणे उत्तर दिलं, “मग उद्या रात्री ते आपल्यावर हल्ला करतील.”
मी मुद्दाम थांबलो.
“फक्त कॅम्पवर नाही.” माझी नजर एकेकाच्या चेहऱ्यावर फिरली.
“गावांवर. शाळांवर. पोलीस ठाण्यांवर. जे हाताशी लागेल त्यावर.”
मी पुन्हा नकाश्याकडे वळलो. बोट नाल्याजवळच्या त्या हिरव्या ठिपक्यावर स्थिर झालं.
“आणि जर जमलं…” माझा आवाज आता ठाम होता. “तर उद्याची रात्र त्यांना कधीच दिसणार नाही.”
त्या वाक्यानंतर खोलीत विचित्र शांतता पसरली. भीती अजून होती, पण तिची जागा आता एका हेतूने घेतली होती.
तेवढ्यात, बाहेर दूरवरून एक मंद घरघर ऐकू आली. सुरुवातीला अस्पष्ट. मग हळूहळू वाढणारी. इंजिनाचा आवाज.
मी आणि पाटील एकाच वेळी खिडकीकडे वळलो. दूरच्या काळोखातून दोन फिकट दिवे हलताना दिसू लागले. मग तिसरा. मग मागून आणखी एक.
पवारचा ताफा. रात्रीचा काळोख चिरत आमच्याकडे येत होता.
कॅम्पमधले जवान तत्काळ हालचालीला लागले. गेटकडे सिग्नल दिवे लागले. बंकरवरचे पहारेकरी सज्ज झाले. शिर्केने वायरलेसवर ओळख पटवली. सावंतने उतरण्याची जागा क्लियर करण्याचा आदेश दिला.
मी काही क्षण त्या दिव्यांकडे पाहत राहिलो. त्या ट्रकमध्ये फक्त दारुगोळा नव्हता. फक्त माणसं नव्हती.फक्त उपकरणं नव्हती.
त्याच्यासोबत येत होतं आमच्या शेवटच्या संधीचं फिरणारं चाक.
भारी!
भारी!
भारी… यांना यश मिळो हीच
भारी… यांना यश मिळो हीच प्रार्थना!!
आपण तर बुवा फॅन झालो या
आपण तर बुवा फॅन झालो या ऑफिसरचे...
जबरदस्त प्लान..
लेखकाचे खूप आभार की अशी तगडी कथा इथे लिहित आहेत.
बाप रे, जबरदस्त सुरुये कथा.
बाप रे, जबरदस्त सुरुये कथा. अगदी डोळ्यासमोर उभा राहतंय सगळं.
बापरे, पुढचा भाग जोरदार असणार
बापरे, पुढचा भाग जोरदार असणार.... त्यांना यश मिळू दे.... जर यावर चित्रपट किंवा मालिका निघाली तर वर्णन वाचून ऑफिसरचा रोल कोण करेल असा विचार करते आहे.
भारी… यांना यश मिळो हीच
भारी… यांना यश मिळो हीच प्रार्थना!! खरच.
हो गोष्ट वाचताना माझ्या डोळ्यासमोर कायम सॅम बहादूर मधला विकी कौशल उभा रहातोय
हो..
हो..
किंवा गाझी अटॅक मधला राणा दुग्गुबती
धन्यवाद आबा, साधना, धनवन्ती,
धन्यवाद आबा, साधना, धनवन्ती, urmilas, अश्विनी११ आणि सामी!
ऑफिसरचा रोल कोण करेल असा
ऑफिसरचा रोल कोण करेल असा विचार करते आहे.
Submitted by अश्विनी११ on 21 April, 2026 - 17:26
मोहित रैना?