पूर्वभाग
कॅम्पमध्ये सतत माहिती फुटत असल्याने अधिकाऱ्यांना आपल्या गटात फितूर असल्याचा संशय आला. त्याला पकडण्यासाठी खोट्या ताफ्याची आणि गुप्त हालचालीची बातमी मुद्दाम पसरवण्यात आली. रात्री शिपाई विनायक टॉर्चने नक्षलवाद्यांना सिग्नल देताना रंगेहात पकडला गेला. चौकशीत त्याने पुलाजवळ स्फोटकांचा आणि मोठ्या सापळ्याचा कट उघड केला. लगेच जवानांनी आपली योजना बदलून डमी ताफा पुढे पाठवला. पहाटे नक्षलवादी हल्ल्यासाठी बाहेर येताच जवानांनी टेकड्यांवरून आणि मागच्या बाजूने जोरदार कारवाई केली. या चकमकीत नक्षलांचा डाव फसला, अनेक जण ठार झाले आणि आझाद जखमी होऊन पळाला.
************************************************************************************************************************
लाल रेषा - भाग १३ - जुगार
आमचा उलटा सापळा अचूक बसला होता. पुलाजवळ त्यांनी आखलेला घात आम्ही त्यांच्याच अंगावर उलटवला होता. काही क्षणांपूर्वी गोळीबार, धूर, स्फोट आणि आरोळ्यांनी दणाणलेला तो परिसर आता हळूहळू शांत होत होता.
रस्त्यावर अजूनही जळक्या डिझेलचा उग्र वास पसरला होता. उध्वस्त झालेल्या ट्रकच्या पुढच्या भागातून धूर निघत होता. पुलाच्या बाजूच्या मातीवर बारुद, रक्त आणि पावसाचं पाणी एकत्र मिसळलं होतं. काही जखमी विव्हळत पडले होते. काहीं नक्षलीना आमचे जवान जिवंत पकडत होते. तर काही मृतदेह झाडाझुडपांच्या आड उलटेपालटे पडले होते.
पण त्या सगळ्या दृश्यात एकच गोष्ट खटकत होती, आझाद निसटला होता.
सावंत धापा टाकत टेकडीच्या उतारावरून माझ्याजवळ आला. चेहऱ्यावर माती, हातावर किरकोळ जखमा, पण डोळ्यांत अजूनही आझाद त्यांच्या बाजूने निसटला या अपमानाची आग होती.
“सर!” तो घाईघाईने म्हणाला, “आझाद टेकडीच्या मागच्या बाजूने नाल्याकडे निसटला आहे. अजून फार पुढे गेला नसेल. पाठलाग करूया?”
मी उत्तर देण्याआधी काही क्षण समोरच्या धुक्याकडे पाहत राहिलो. धुक्याच्या पांढऱ्या पडद्याआड झाडांचे काळे आकार हलल्यासारखे वाटत होते. खाली नाल्याकडे जाणारी वाट दाट झुडपांनी झाकलेली होती.
मी शांतपणे म्हणालो, “नाही.”
सावंत क्षणभर थबकला.
“सर...”
"तिथे 'सेकंडरी आयईडी' असू शकतात किंवा मागे हटताना त्यांनी वाटेत सापळे टाकले असण्याची शक्यता आहे. वरच्या रांगेत अजून स्नायपर्स दबा धरून बसले असतील. धुक्यात पाठलाग म्हणजे आत्मघात ठरेल."
तो काही बोलला नाही.
मी पुढे म्हणालो, “आधी आपला ताफा तपासा. जखमी बाहेर काढा. पकडलेल्यांना सुरक्षित करा. हा भाग आपण ताब्यात घेतलाय… पण अजून पूर्ण सुरक्षित केलेला नाही.”
सावंतने दात घट्ट आवळले, मग मान हलवली. “हो, सर.” तो वळून गेला.
जवानांनी परिसर क्लियर करण्याचं काम सुरू केलं. पवारची टीम झाडीतून शस्त्रं आणि पिशव्या गोळा करत होती. दोन जण जखमी चालकाला स्ट्रेचरवर टाकत होते. शिर्के अजूनही टेकडीवर बसून दुर्बीणीतून परिसर तपासत होता.
मी पुलाच्या कडेला उभा राहून खाली पाहत होतो. नाल्याच्या दिशेने उतरत जाणारी ती काळी हिरवी दरी पुन्हा शांत दिसत होती. जणू काही घडलंच नव्हतं.
तेवढ्यात उजव्या बाजूच्या दाट झाडीत हलकी हालचाल झाली. पानं थरथरली.
शिर्केने क्षणार्धात रायफल रोखली. “बाहेर ये!” तो गरजला. “हात वर करून बाहेर ये!”
क्षणात आसपासचे जवानही त्या दिशेने वळले. दोन बंदुका झाडीत रोखल्या गेल्या. पाटीलने बाजूची जागा कव्हर केली.
काही सेकंद ताणलेले गेले. मग झुडपं अलगद बाजूला झाली. एक तरुण मुलगा बाहेर आला. वय फारतर बावीस-तेवीस. अंगावर फाटलेले ऑलिव्ह रंगाचे कपडे. चेहऱ्यावर चिखल, कपाळावर सुकलेलं रक्त. हात पूर्ण वर उचललेले होते, आणि तेही थरथरत. त्याच्या हातात शस्त्र नव्हतं. तो शरण येत होता.
दोन जवानांनी धावत जाऊन त्याला पकडलं. एकाने त्याला गुडघ्यावर बसवलं. दुसऱ्याने कमरेला हात घालून तपासलं, कुठे लपवलेलं पिस्तूल, सुरी किंवा ग्रेनेड आहे का ते पाहिलं. काहीच सापडलं नाही.
तो धापा टाकत होता. पण त्याचे डोळे इतर कुणाकडे नव्हते. ते सरळ माझ्याकडे रोखलेले होते. जणू तो इथवर फक्त माझ्याशी बोलण्यासाठीच आला होता. मी पुढे गेलो.
पाटील कुजबुजला, “सर, जपून.”
मी मान हलवली. त्या तरुणाजवळ थांबलो.
तो थरथरत्या आवाजात बोलू लागला. “साहेब…” घसा कोरडा पडल्यासारखा त्याचा आवाज तुटत होता.
“मला मारलंत तरी चालेल…”त्याने कसाबसा श्वास घेतला. “पण आधी माझं ऐका.”
मी काही बोललो नाही.
तो पुढे म्हणाला, “मला… रेश्माबद्दल बोलायचं आहे.”
त्या एका नावाने हवेतला ताणच बदलला. पाटीलने माझ्याकडे पाहिलं. शिर्केने रायफल खाली केली नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचा कडकपणा ढळला. माझ्या मनात अनेक प्रश्न एकदम उठले. रेश्मा? हा कोण? आणि शत्रूच्या रक्ताळलेल्या गणवेशातला हा मुलगा तिचं नाव का घेत होता?
मी शांतपणे म्हणालो, "हात बांधा. आणि कॅम्पला घेऊन चला.”
आम्ही जेव्हा कॅम्पमध्ये परतलो, तेव्हा तिथले वातावरण विजयाच्या उन्मादाने आणि एका अनामिक सुटकेच्या श्वासाने भरून गेले होते. आझादने जखमी होऊन रणांगणातून पळ काढला, ही बातमी जवानांमध्ये वणव्यासारखी पसरली आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक विजयी तेज झळकले. काहींच्या डोळ्यांत श्रमाचे आणि आनंदाचे संमिश्र अश्रू तरळले.
विनायकच्या फितुरीमुळे कॅम्पवर पसरलेली संशयाची काळी सावली आज धुवून निघाली होती; मेसमध्ये चहाचे वाफाळलेले कप आणि जवानांच्या हसण्याचे आवाज येवू लागले होते, जणू अनेक दिवसांच्या काळोखानंतर या दुर्गम जंगलात खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होत होती.
दुसऱ्या बाजूला माधवच्या शरणागतीने संपूर्ण कॅम्पमध्ये एकच खळबळ उडाली होती. काही वेळापूर्वीच पुलाजवळच्या चकमकीत त्याच्यासारखे अनेक जण आमच्यावर गोळ्या झाडत होते, आणि आता त्यांच्याच तुकडीतील एक जण हात वर करून कॅम्पमध्ये बसला होता. जवानांच्या चेहऱ्यावर स्पष्ट अविश्वास होता. विनायकच्या फितुरीनंतर प्रत्येकजण आतून पेटला होता. एकदा विश्वास तुटला की माणूस शत्रूपेक्षा सावलीवर जास्त संशय घ्यायला लागतो.
म्हणूनच माधवला साधा कैदी म्हणून नव्हे, तर संभाव्य सापळा मानून हाताळलं जात होतं. त्याचे हात साखळदंडाने जखडले होते. चौकशी कक्षाच्या कोपऱ्यात तो बसवला होता. दाराबाहेर दोन सशस्त्र जवान तैनात होते. खिडकीच्या जाळीतून येणारा सकाळचा फिका उजेड त्याच्या चेहऱ्यावर पडत होता. कपाळावर सुकलेलं रक्त होतं.
मी बाहेर उभ्या असलेल्या शिपायाला खुणावलं. थोड्याच वेळात रेश्मा तिथे आली. दरवाजा अलगद उघडला आणि तिची नजर समोर साखळदंडाने बांधून बसलेल्या माधववर पडली. त्या एका क्षणी जणू काळच थांबला. खोलीतील हवा जड झाली. दिव्याचा पिवळसर उजेड त्यांच्या चेहऱ्यांवर पडत होता, पण दोघांच्याही डोळ्यांत भूतकाळाचे सावट उतरले होते.
“माधव?...”
रेश्माच्या ओठांतून कसाबसा आवाज बाहेर पडला. तिचे पाय लटलट कापू लागले. हात आपोआप दाराच्या चौकटीला टेकले. तिने जणू स्वतःच्या डोळ्यांवरच विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला.
माधवने हळूवार मान वर केली. रेश्मा दिसताच त्याच्या डोळ्यांत दाटून आलेले अश्रू क्षणार्धात वाहू लागले. दाबून ठेवलेलं दुःख, अपराधीपणा आणि विरह त्या अश्रूंमधून बाहेर पडत होता.
“रेश्मा…” त्याचा आवाज तुटला. “मी कोमलला वाचवू शकलो नाही…या नराधमांनी आम्हाला वेगळं केलं…”
तो हुंदके देत बोलत राहिला. “शेवटच्या वेळी तिने माझा हात धरून सांगितलं होतं, ‘माधव… जर मला काही झालं, तर रेश्माला या नरकातून बाहेर काढ. तिला सांग… तिची ताई तिला सोडून गेलेली नाही. ती तिच्यातच जिवंत आहे.’”
ते शब्द ऐकताच रेश्माचा बांध फुटला. ती धावत त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत मोठ्याने रडू लागली. तिच्या रडण्यात दाबलेली वेदना होती, ताई हरवल्याची, घर उद्ध्वस्त झाल्याची, आणि एकटी उरल्याची.
माधवचे हात साखळदंडाने बांधलेले होते, तरी त्याने शक्य तितक्या अलगदपणे ते हात तिच्या डोक्यावर ठेवले. त्या स्पर्शात आपलेपणा होता, सांत्वन होतं आणि कोमलच्या आठवणींची सावली होती.
खोलीत उपस्थित जवान निःशब्द उभे होते. कुणी नजर वळवली, कुणी मुठ घट्ट आवळली. काही क्षणांपूर्वी ज्याच्याकडे संशयाने पाहिलं जात होतं, तोच आता एका तुटलेल्या घराचा शेवटचा दुवा ठरत होता.
माधवने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी रेश्माकडे पाहिलं. “तुझी ताई गेली गं, रेश्मा… पण ती हरली नाही. तिने तुला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव दिला. आता तिचं उरलेलं वचन मला पूर्ण करायचं आहे. आझादचा अंत केल्याशिवाय कोमलच्या आत्म्याला शांती मिळणार नाही.”
रेश्मा आणि माधवची ती भेट केवळ दोन व्यक्तींची नव्हती. ती अनेक वर्षांपूर्वी तुटलेल्या, उध्वस्त झालेल्या एका घराची पुन्हा उमटलेली वेदना होती. त्या भेटीत विरह होता, रक्ताच्या नात्यांची राख होती, आणि त्या राखेतून उठणारी सूडाची पहिली ठिणगीही होती.
रेश्माला शांत करण्यासाठी बाहेर नेण्यात आलं. दरवाजा अलगद बंद झाला आणि खोलीत पुन्हा एकदा जड शांतता पसरली. काही क्षणांपूर्वी अश्रूंनी भरलेला माधव आता वेगळाच दिसत होता. त्याच्या डोळ्यांतली भीती नाहीशी झाली होती. तिथे आता फक्त धगधगता संताप होता. चेहऱ्यावरचा मवाळपणा विरघळून गेला होता आणि त्याजागी एक जळजळीत निर्धार उतरला होता.
विनायककडून आम्हाला बरीच माहिती मिळाली होती, पण त्यात स्वार्थ, फितुरी आणि स्वतःचा बचाव मिसळलेला होता. तो जे बोलत होता, त्यात सत्य किती आणि फसवणूक किती, हे तोलावं लागत होतं. माधव वेगळा होता. तो स्वतःच्या जीवावर उदार झाला होता. त्याच्या आवाजात बनावटपणा नव्हता कारण त्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच उरलं नव्हतं.
तो हळूहळू बोलू लागला. “साहेब… मी आणि कोमल एकाच दलात होतो.”
त्याने ‘दल’ हा शब्द उच्चारताना तिरस्काराने ओठ वाकवले. “आम्हाला स्वेच्छेने कोणी घेतलं नव्हतं. गावांवर दबाव टाकून, धमक्या देऊन, घरं उद्ध्वस्त करून आम्हाला या हिंसेच्या दलदलीत ओढलं गेलं. सुरुवातीला विचार सांगतात… मग बंदूक हातात देतात… आणि शेवटी माणूसपण काढून घेतात.”
खोलीत बसलेले जवान निःशब्द ऐकत होते.
माधव पुढे म्हणाला, “कॅम्पमध्ये आमच्या भेटी उघडपणे व्हायच्या नाहीत. लपून-छपून, रात्रीच्या अंधारात, पहारेकऱ्यांच्या नजरेतून बचाव करून आम्ही दोन शब्द बोलायचो. त्या काही क्षणांत आम्हाला वाटायचं की आपण अजूनही माणसं आहोत.”
त्याचा आवाज कापला. “कोमलला सुरुवातीपासूनच माहित होतं की हा रस्ता मृत्यूकडे जातोय. ती नेहमी म्हणायची, ‘आपण जगलो नाही तरी चालेल… पण रेश्मा या नरकात अडकता कामा नये.’”
मी शांतपणे विचारलं, “तिने तुझ्यावर विश्वास का ठेवला?”
माधवने थेट माझ्याकडे पाहिलं, "कारण तिला वाटत होतं कि आजूबाजूच्या विखारी विचारांत माझ्यातलं माणूसपण अजून शिल्लक आहे."
तो पुढे म्हणाला, “शेवटच्या भेटीत तिने माझा हात धरून सांगितलं होतं, ‘जर माझ्या जिवाचं काही बरं-वाईट झालं, तर तू रेश्माची काळजी घे. तिला इथून दूर ठेव. तिचं आयुष्य वाचव.’”
त्याने मुठ घट्ट आवळली. “त्या रात्रीनंतर मला कोमल पुन्हा जिवंत दिसली नाही.”
पाटीलने दबक्या आवाजात विचारलं, “मग तू लगेच पळून का नाही गेलास?”
माधव कडवट हसला. “नक्षली कॅम्प सोडणं म्हणजे फक्त पळणं नसतं, साहेब. तिथून निघालात की तुमचा शोध घेतला जातो. तुमच्यासोबत बोलणाऱ्यांनाही मारलं जातं. मी योग्य वेळ बघत होतो.”
तो पुढे झुकला.“पण जेव्हा कळलं की रेश्मा तुमच्याकडे सुरक्षित आहे… तेव्हा मला पहिल्यांदा वाटलं की कोमलचं शेवटचं वचन अजून पूर्ण होऊ शकतं.”
त्याच्या डोळ्यांत आता पाणी नव्हतं. फक्त आग होती. “म्हणून मी हा नरक सोडण्याचा निर्णय घेतला.”
मी विचारलं, “आणि आझाद?”
माधवचा चेहरा एका क्षणात कठोर झाला. “आझाद फक्त कमांडर नाही, साहेब. तो भीतीवर जगतो. माणसांना मोडून त्यातून सैनिक बनवतो. कोमलसारख्या कितीतरी जिवांचा तो मारेकरी आहे.”
त्याने पुढे झुकून स्पष्ट शब्दांत म्हटलं,“तुम्हाला जर त्याचा अंत करायचा असेल… तर मी तुम्हाला मदत करीन.”
“साहेब…” माधव माझ्या जवळ सरकत कुजबुजला. "आझाद सरळ नाल्याजवळच्या त्यांच्या गुप्त तळावर पोहोचला असेल.”
मी काही न बोलता त्याच्याकडे पाहत राहिलो.
तो पुढे म्हणाला, “आज रात्री तिथे मोठी बैठक आहे. साधी बैठक नाही. आंध्रकडचा स्फोटतज्ज्ञ कमांडर येणार आहे… आणि ओडिशाकडचा जंगल कारवायांचा प्रमुखही. हे दोघे विनाकारण हलत नाहीत, साहेब. ते जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यानंतर काहीतरी मोठं घडतं.”
खोलीत बसलेले जवान अधिक सावध झाले. पाटीलने नकळत नकाश्याकडे नजर टाकली. सावंतच्या चेहऱ्यावरचा ताण वाढला.
माधवने आवाज आणखी खाली घेतला.
“उद्या पहाटे ते काहीतरी करणार आहेत… मोठं. इतकं मोठं की या भागात पुन्हा भीतीचं राज्य बसवायचं त्यांचं ठरलंय. नेमकं काय, हे मला माहीत नाही… पण हालचाली तशाच सुरू आहेत.”
मी टेबलावर पसरलेल्या नकाशावर बोट ठेवलं. नाल्याजवळचा तो हिरवा, दाट भाग नजरेसमोर आला.
“आत्ता आपण तिथे हल्ला केला तर?”
माधवने क्षणाचाही विलंब न लावता मान हलवली. “नाही साहेब.” त्याचा आवाज आता ठाम होता. “तो आत्मघात ठरेल.”
मी शांतपणे विचारलं, “का?”
तो पुढे झुकला. "त्यांच्याकडे आता 'लेयर सिक्युरिटी' असेल. बाहेर पहारा, मग हालचाल पाहणारे माणसं, आत दिशाभूल करणाऱ्या वाटा, आणि शेवटी खऱ्या बैठकीची जागा. तुम्ही पहिल्या वर्तुळात शिरलात की आतल्या लोकांना बातमी पोहोचेल. तुम्ही दुसऱ्या वर्तुळात पोहोचायच्या आत ते सावलीसारखे निसटतील.”
त्याने नकाशावर दोन-तीन ठिकाणी बोट ठेवलं. “या सगळ्या वाटा सरळ दिसतात, पण तशा नाहीत. कुठे सापळे, कुठे उंच जागेवर नेमबाज, कुठे पळवाट. त्यांना परिसर पाठ आहे.”
मी त्याच्याकडे रोखून पाहिलं. “मग उपाय?”
माधवने दीर्घ श्वास घेतला. “माझ्याकडे एक योजना आहे.”
खोलीत पुन्हा शांतता पसरली. “नक्षलींना अजून हे माहीत नाही की मी तुम्हाला शरण आलोय. त्यांना वाटतं मी चकमकीत भरकटलोय, कदाचित जखमी होऊन कुठेतरी लपलोय. जर तुम्ही मला आत्ता सोडलंत… तर मी परत त्यांच्या कॅम्पवर जाईन.”
पाटील तडक बोलला. “वेडेपणा आहे हा!”
सावंतनेही त्याच्याकडे संशयाने पाहिलं. “परत गेला आणि सरळ त्यांच्यात मिसळला तर?”
माधवने त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं. त्याची नजर फक्त माझ्यावर होती. “मी आत जाईन. बैठकीत काय ठरतंय त्याची माहिती काढेन. रात्री उशिरा संधी मिळाली की तिथून निसटेन… आणि थेट तुमच्याकडे येईन.”
मी विचारलं, “आणि जर पकडला गेलास तर?”
त्याच्या ओठांवर कडवट हास्य उमटलं. “तर माझा मृत्यू ठरलेलाच आहे.”
क्षणभर तो थांबला. मग मंद पण ठाम आवाजात म्हणाला, “माझ्याकडे तुमच्या रूपाने संधी चालून आली आहे आणि कोमलसाठी… आणि रेश्मासाठी… मला हा धोका पत्करावाच लागेल.”
हा निर्णय साधा नव्हता. तो एक मोठा जुगार होता असा जुगार ज्यात पैज म्हणून माणसांचे जीव लागणार होते.
माधव परत नक्षलींकडे जाऊन आपल्याला फसवू शकला असता. तो सरळ आझादपाशी जाऊन कॅम्पची माहिती देऊ शकला असता. आणि जर त्याचा हेतू खराच असला, तरी आझादसारख्या संशयी माणसाने त्याच्यावर किंचित जरी शंका घेतली असती, तर त्याचा मृत्यू निश्चित होता. तिथे चौकशी नव्हती, माफी नव्हती फक्त शिक्षा होती.
पण दुसरी बाजूही तितकीच स्पष्ट होती. आझाद काहीतरी मोठं आखत होता. आंध्र आणि ओडिशातून आलेले कमांडर उगाच जंगल चिरत या भागात येत नव्हते. त्यामागे मोठा डाव होता. आणि त्या डावाची खबर मिळवण्यासाठी आमच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. सरळ हल्ला म्हणजे अंधारात धावणं. गुप्तहेर पाठवणं अशक्य. स्थानिक गावकरी आधीच भीतीने गप्प.
म्हणून शेवटी पर्याय एकच उरला...माधव.
मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिलो. चेहऱ्यावर थकवा होता, डोळ्यांत दुःख होतं, पण त्यामागे जिद्दही दिसत होती. तो खोटं बोलतोय की खरं, याचा निकाल आता काळच देणार होता.
मी पुढे होऊन स्वतः त्याच्या हातातील बेड्या उघडल्या. लोखंडी कडी सुटताना किरकिरली. खोलीत उभ्या जवानांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता उमटली. कुणी हे मान्य करत नव्हतं, पण कोणी विरोधही करत नव्हतं.
मी ठाम आवाजात म्हणालो, “माधव, लक्षात ठेव. तुझा एक चुकीचा निर्णय फक्त तुझा जीव घेणार नाही… तो रेश्माचाही जीव घेऊ शकतो.”
माधवने हळूहळू हात मोकळे केले. मनगटांवर बेड्यांच्या खुणा लालसर उमटल्या होत्या. त्याने त्या खुणांकडे पाहिलं नाही. तो सरळ माझ्या डोळ्यांत पाहत राहिला.
“साहेब,” तो शांतपणे म्हणाला, “कोमलने माझ्यावर विश्वास ठेवला होता…” त्याचा आवाज किंचित थरथरला. “आता तुम्ही ठेवा.”
त्या एका वाक्यानंतर खोलीत काही क्षण कोणीच बोललं नाही.
मी पाटीलकडे वळलो. “मागच्या बाजूचा मार्ग साफ ठेवा. कोणी पाहता कामा नये.”
कॅम्पच्या समोरच्या पोस्टवर नेहमीची हालचाल सुरू ठेवली गेली, मागच्या कुंपणाजवळ दोन विश्वासू जवान सावलीसारखे उभे होते.
माधव निघायला तयार झाला. रेश्मा दूर उभी होती. तिच्या डोळ्यांत पुन्हा एकदा हरवण्याची भीती होती. ती काही बोलली नाही. माधवही तिच्याजवळ गेला नाही. फक्त क्षणभर मागे वळून तिने उभं असलेलं ठिकाण पाहिलं.
मग तो कुंपणातील अरुंद फटीतून बाहेर सरकला. काही पावलं पुढे गेला. जंगलाच्या कडेला थांबला. एकदा मागे वळून कॅम्पकडे पाहिलं. आणि पुढच्या क्षणी तो जंगलात विरघळला.
जवानांच्या मनात संशय अजून जिवंत होता. कुणाला वाटत होतं आपण चूक केली. कुणाला वाटत होतं हा परत येणारच नाही.
पण माझ्या मनात वेगळीच धाकधूक होती. मी एक शत्रू सोडला नव्हता...मी एकमेव आशा जंगलात पाठवली होती.
पटपट भाग येत आहेत.
पटपट भाग येत आहेत.
खूप उत्कंठा वाढली आहे.
वळणं खूप कथेत तरीही
वळणं खूप कथेत तरीही उत्कंठावर्धक आहे
त्याला ट्रॅकर लावायला हवा होता काय?
किंवा इतकी सोय नसेल तिथे.
आयडिया झकास आहे...
आयडिया झकास आहे...
धन्यवाद धनवन्ती, झकासराव!
धन्यवाद धनवन्ती, झकासराव!
<<त्याला ट्रॅकर लावायला हवा होता काय?>> येथे लोकेशन ट्रॅकिंग हा उद्देश नाही, तर नक्षलींच्या गोटातुन आतली माहिती काढणे आणि ती कॅम्पवर पोहोचवणे हा मुख्य उद्देश होता .
पटपट भाग येत आहेत.
पटपट भाग येत आहेत.
खूप उत्कंठा वाढली आहे..>>> +१
धन्यवाद आबा!
धन्यवाद आबा!