पारसी भोणू

Submitted by अनिंद्य on 21 March, 2026 - 07:35

शापुरशा, रोस्तम, फाली, होमी, सायरस, जहांगीर, केकी, पीलू, नरीमन, होशंग, जमशेद हे मित्र आणि माहरोख, नवाज़, लैला, दीना, शहनाज़, डेल्ना, मेहर ह्या मैत्रिणी ही सगळी पारसी “बावा” मंडळी एकत्र जमून मोठ्ठ्या आवाजात (अर्थातच) बोलत असली तर विषय ज्वलंत,तातडीचा आणि गंभीर असणार.

हळू आवाजात चर्चेची अपेक्षा मात्र करता यायची नाही कारण पारसी मंडळी जमली आहेत आणि कुजबुजत हळू आवाजात बोलत आहेत असे फक्त दोनच प्रसंगात घडते - कुणाचा दाखमा/ अंत्यविधी चालू असेल तर किंवा मग कडाक्याचे भांडण चालू असतांना एकमेकांना “तमे किधो ने भेन्चोद, हमजो ने मारी वात' असे गालीप्रदान करतांना. बाकी वेळी फुल्ल व्हॉल्युम. पारसी बावाजीचे मुख्य लक्षण.

तर, मोठ्या आवाजातल्या पारसी स्नेहमेळाव्यात चर्चेचा विषय खालीलपैकी एक असण्याची दाट शक्यता :

- अमक्या मित्राला- नातेवाईकांना धंद्यात झालेला नफा / मिळालेले घबाड. धनप्राप्ती चांगली झाली असल्यास त्यानिमित्त पार्टी कधी, कुठे, मेन्यू वगैरे.

- तोटा, नुकसान, व्यावसायिक प्रॉब्लेम झाला असेल तर “ग़म ग़लत करवा माटे” पार्टी कधी, कुठे, मेन्यू वगैरे.

- येऊ घातलेला नवरोझ सारखा सण किंवा कुणाकुणाच्या मुलांचा 'नवज्योत' समारंभ आणि त्यानिमित्त मेजवानीचे बेत. पार्टी कधी, कुठे, मेन्यू वगैरे.

- अमक्याचं जमलेलं / बिनसलेलं प्रेम, घटस्फोट, प्रेगनेंसी किंवा त्यासाठी चालू असलेले प्रयत्न, अपत्यप्राप्ती आणि त्यानिमित्त पार्टी कधी, कुठे, मेन्यू वगैरे.

तुमच्या लक्षात आलेच असेल, प्रत्येक प्रसंगात गाडी फिरून फिरून एकाच थांब्यावर येतेय - पार्टी, पार्टीचा मेन्यू, भोणू, भोजन, जेवण, पंगत, खाणे, खादाडी.

याचा कळस गाठला जातो कुणाचे लग्न ठरले की. पारसी जोडप्याचा लग्नाचा विचार पक्का झाला आणि "पसंदे कदम" (बोमनजी- धर्मगुरु आणि पालकांसमोर वाग्दत्त वधू-वराने लग्नासाठी पसंतीची तीन दा ग्वाही देणे) ची घोषणा झाली रे झाली की घरी-दारी एकच विषय - लग्नाच्या कार्यक्रमाचे केटरिंग कुणाला द्यायचे ? आपडी शिरीन अने रोस्तम ना लगन थवाना छे. लगनमां केटरिंग नू काम शा ने आपवू ? गझदर नी डीकरी ने ? आपडी तनाझ ? के आपडू टाटा इंस्टीट्यूटनू पिकोलो ? के बीजू कोई ? के नवसारीथी मासा नवरोजभाई मोकलसे ते ? एक ना दोन. मग त्यात मेन्यू काय? पातरा नी मच्छी, धनशाक, पात्रेल / पातरेल, सल्ली मरगी, चिकन फरचा, सास नी मच्छी, सल्ली बोटी, जर्दालू माँ गोश्त, बेरी पुलाव, झिंगा ना कटलेट, सास नूं गोश, दार नी पोरी, मेवा नू अचार, लगननू कस्टर्ड अशा खास ठेवणीतल्या पारसी पदार्थांची चविष्ट चर्चा. तासन् तास, दिवस-दिवस.

“लगन नू भोणू” म्हणजे लग्नाच्या पंगतीतले जेवण हा पारसी समाजाच्या प्रचंड आस्थेचा आणि अभिमानाचा विषय. त्यात काहीही उणे रहायला नको हा समस्त पारसी बांधवांचा एकमताचा ठराव, त्यासाठी गुन्हा करावा लागला, आवडत्या केटररला ओलिस ठेवावे लागले तरी बेहत्तर असे गमतीने म्हणतात. लग्नसोहळा पार पडल्यानंतर सुद्धा अनेक महिने हे “लगन नो भोणू” आणि त्यातले पदार्थ, त्यांच्या चवी, चवीतले बारकावे - सगळेच चर्चेत असते. आपल्या अन्नावर, खाद्यपरंपरांवर अतिशय प्रेम करणारी जमात.

इराणी-पारसी नववर्षाचे निमित्त साधून (२०-२१ मार्च) या आगळ्यावेगळ्या समाजाच्या आगळ्यावेगळ्या खाद्यपरंपरा आणि खाद्यसंस्कृतीशी थोडा परिचय करून घेऊ या.

भारतातल्या अति-अल्पसंख्यक, तरी गर्भश्रीमंत असलेल्या पारसी समाजाची कहाणी सर्वांना माहितीच असेल. इराणचा शेवटचा सासानिद वंशीय शासक “यज्देगर्द”चे राज्य अरब मुस्लिमांच्या आक्रमणाला थोपवू न शकल्याने संपुष्टात आले (641 ईसवी) आणि अग्नीपूजक झोराष्ट्रियन पारसी आपला देश (फ़ारस, आजचा इराण) सोडून परागंदा झाले. आधी खोरासान पर्वतरांगा, मग हारमुज बंदर आणि मग समुद्रमार्गे वाट फुटेल तिकडे असे पलायन केलेल्यांपैकी काहींची जहाजे भारतात गुजरातच्या किनाऱ्याला लागली. दीव, संजान, नवसारी आणि उदवाडा या गावांमधे “आम्ही दुधात साखरेसारखे राहू” अशा आश्वासनावर आश्रय मिळवून राहिले आणि पुढे आपल्या कौशल्याने अपार धनोत्कर्ष साधते झाले. इराणमधून येतांना “ईरानशा” (पवित्र अग्नी) सोबत आणला होताच. त्याची पूजाअर्चा करण्यासाठी या गावांतून आतिश बेहराम आणि अग्यारी नामक प्रार्थनास्थळे स्थापण्यात आली. इराणमधून पुढे अनेक दशके झोराष्ट्रियन पारसीजन येतच गेले आणि हे इराणी- पारसी गुजरात, मुंबई आणि पुढे देशात अन्य ठिकाणी वसले. (संदर्भ = “दस्तूर बहमन कैकोबाद” कृत 'किस्सा-ए-संजान, 1599-1600 ईसवी)

मोठ्या शहरातून आपल्या मूळ गावी गेलेले लोक परततांना सोबत काय आणतात ? अमुक मसाले, तमुक वाळवण, ही-ती चटणी, ग्रामीण मेवा, वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक फळे, भाज्या, खाद्यपदार्थ. हे पदार्थ काही दिवसांत संपले की त्यांच्या आठवणी जागवतात. आपल्या सामान्यजनांची ही कथा, पारसी लोक तर शेकडो वर्षांपूर्वी घर-दार- देश सोडून आलेले. त्यांच्या अन्नस्मृती, त्यांचा food nostalgia तितकाच खोल, तीव्र असणे स्वाभाविकच. अनेकानेक वर्षे गुजरात राज्यात वास्तव्य असल्याने त्यांच्या मूळ इराणी खाण्यापिण्यावर स्थानिकांचा प्रभाव पडणे हे सुद्धा सहाजिकच. असे असूनही आपली एक ठळक वेगळी-निराळी खाद्यसंस्कृती जपण्यात पारसी समुदाय यशस्वी ठरलाय हे निर्विवाद.

e1e6d05e-fa7a-4e0d-8db6-cdba0a648307.jpeg

ऐकून माहिती असलेले, क्वचित कधी चाखलेले, काही मोजक्या इराणी-पारसी रेस्तरांमधून मिळणारे धनशाक + ब्राउन राइस, अकुरी, पातरा नी मच्छी, रुस्तमजी ब्रँडचे सोडावॉटर आणि गोडात कस्टर्ड यापलिकडे पारसी फूडबद्दल फारसे कुणाला माहिती नसते. ग्राहकांच्या तुटवड्यामुळे, त्यांच्या बदलत्या food choices मुळे, अन्य कारणांमुळे हे रेस्तरां फार टिकाव धरू शकतील अशी स्थिती नाही. Such Parsi food places have already become relics of bygone times and they may soon become fossils.

एकतर समाजाची संख्या खूप म्हणजे खूपच कमी. भारतात आजमितिला जेमतेम लाखभर पारसी असावेत. हासुद्धा कमाल आकडा. त्यात आपण बरे आपले काम बरे अशी बहुसंख्य पारश्यांची प्रवृत्ती. एकलकोंडे, पटकन न खुलणारे, लाजाळू स्वभावाचे लोकच जास्त. आपले अन्नपदार्थ, आपली ख़ासियत टिकावी यासाठी यासाठी धडपड करणारे काही आहेत हीच काय ती जमेची बाजू.

दुसरे म्हणजे पारसी फूड म्हणजे फक्त सामिष - नॉनव्हेजच असते हा ठाम समज. समाज मुख्यत्वे सर्वभक्षी आहे हे खरे आहे. पण शाकाहारी लोकांना खाऊ घालायला काहीच नाही असे कोणत्याही पारसी बावाच्या किचनमधे होत नाही. (उदाहरणार्थ, header picture म्हणून दिसणारी भरगच्च थाळी फक्त शाकाहारी पदार्थांनी नटलेली आहे)

हळद - मिरची पूड यांचा अत्यल्प वापर आणि त्यामुळे पदार्थांचे फिके रंग; मासे-नॉनव्हेज रांधण्याच्या त्यांच्या विशिष्ट पद्धती ( यथा fruits+ meat, किंवा honey+ dryfruits + meat); पारसी पदार्थांच्या नाजूक चवी आणि आपल्याकडच्या झणझणीत, मसालेदार चिकन-मटन-मासे खायला सरावलेल्या जिव्हांचा मेळ नीट बसत नाही हा मुद्दाही आहे. म्हणूनच की काय आपल्याकडे पारसी फूड फार लोकप्रिय होऊ शकलेले नाही.

तर काय असते पारश्यांच्या ताटात ? रोजचे जेवण काय, उपास, श्राद्ध, सणावाराला काय ? पार्टीत, नवज्योतच्या, नववर्षाच्या जेवणाला, लग्नाच्या पंगतीत काय काय ?

ठेवणीतले, करायला किचकट असे पदार्थ सणाला आणि सोपे- practical पदार्थ रोजच्या जेवणाला असे सर्वसाधारण धोरण. पारश्यांच्या ग्रोसरी शॉपिंगच्या थैलीत सर्वात जास्त कुठला आयटम येत असेल तर एन्डू. Egg / अंड्याला “एन्डू / एन्डा” म्हणणे ही पारसी लकब, खास पारसी लक्षण. एन्डाशिवाय पारसी किचन म्हणजे रामाशिवायची अयोध्या, विष्णुविनाचा वैकुंठ. सकाळच्या न्याहारीत, दुपारच्या जेवणात, मधल्यावेळच्या खाण्यात, केक-पेस्ट्री-कस्टर्ड - कुकीज़- भजी- भाजी- कटलेट सर्वत्र एन्डूचे साम्राज्य.

पारसी न्याहरीचा सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हणजे “अकूरी” या अकूरी आणि अंडा भुर्जीत फरक काय ? सेमच ना ? तर तसे नाही. मुख्य फरक टेक्स्चरचा. लाल रंगाच्या सुती कपड्याला लालच रंगाच्या रेशमी कपड्याचा फ़ील येतो का? काहीसे तसेच.

चीज़ ऑमलेट, पारसी बेकरीतले ताजे पाव, ब्रून, बन, बटर खारी, निरनिराळ्या कुकीज़ आणि सोबतीला चहा हे न्याहरीचे अन्य लोकप्रिय पदार्थ. पारसी घरातला चहा मात्र इराणी रेस्तरांच्या चहापेक्षा वेगळा. त्यात उन्हात वाळवलेली पुदिन्याची पाने चुरडून वापरलेली असतात.

इराणी मूळ असलेल्या समाजांचे बेकिंग स्किल्स वादातीत आहेतच, त्यात प्रचंड वैविध्यही आहे, त्याबद्दल पुढे. शहाण्या माणसाने प्रत्यय घेण्याचा चांस सोडू नये, हे निश्चित.

घरगुती लंच- डिनर ला दार-चावर-एन्डू (साध्या वरण भातावर फ्राय एग / उकडलेले अंडे) दररोज खाल्ले तरी कोणताही पारसी बावा “ह्या मेन्यूचा कंटाळा आलाय” असे म्हणायचा नाही.

711de8a6-9a87-401a-9e28-27c2012f1e72.jpeg

तुरिया पर एन्डू, वेगना पर एन्डू, सल्ली पर एन्डू, पटेटा पर एन्डू, भींडापर एन्डू अशा अंडीयुक्त भाज्या आणि भात किंवा चपाती (दोन्ही एकत्र सहसा नाही) असे रोजचे जेवण, सोबत एखादे लोणचे आणि गुजराती स्टाइल कचुंबर सलाड.

23904aac-c5fd-452e-af3c-8fc5eac78f22.jpeg

दररोज सकाळ - दुपार- संध्याकाळच्या खाण्यात एग प्रोटीनचे असे भक्त-भोक्ते अन्यत्र सापडायचे नाहीत. एक मात्र आहे, पसंती मरगीनू एन्डूलाच. कोंबडीचेच अंडे. बदक, शहामृग यांची अंडी पारसी स्वयंपाकघरात यायची नाहीत.

पारसी सामिष भोजन हे महाकाव्य मानले तर त्यात धनशाक, जर्दालू मा गोश्त, पातरा नी मच्छी, चिकन फरचा, सास नी मच्छी, सल्ली मरगी, कोलमी ना कबाब, चिकन कटलेट, सास नूं गोश्त हे प्रमुख अध्याय. वेगना मा गोश्त (भरताची वांगी + मटन), तुरिया ना झिंगा (घोसाळी + कोलंबी), सल्ली बोटी, पटेटा झिंगा ना कटलेट (बटाटा + कोलंबी) अशी उप-कथानके साथीला.

पैकी चिकन फरचा म्हणजे American southern fried chiken चा भारतीय+ पारसी मसाल्यातला भाऊबंद. मसाले थोडे वेगळे. पातरा नी मच्छी म्हणजे केळीच्या पानात (पात्रा) गुंडाळून वाफेवर शिजवलेले ताज्या हिरव्या वाटणातले पापलेट मासे (promfrets). लग्नाच्या मेजवानीत पातरा नी मच्छी मस्ट. नॉन निगोशियेबल.

जर्दालू मा गोश्त / जर्दालू मा मच्छी / जर्दालू मा मरगी या सर्वात fruit + meat ही खास इराणी जोडी आहे. हे पदार्थ शेकडो वर्षांपूर्वी इराणमधे असतांना जसे केले जात अगदी तसेच्या तसेच आजही पारसी बावा लोकांच्या किचनमधे होतात. कुठलाच स्थानिक- गुजराती - भारतीय प्रभाव न पडलेल्या पाककृती. चिकन किंवा मटनात सौम्य मसाल्याच्या ग्रेवीत गोडसर जर्दाळू हे कॉम्बो भारतीय जिभेला फार आवडण्यासारखे नाही. बावा लोक मात्र खास जातीवंत जर्दाळू (Hunza apricots) आयात करून मागवतात, जीव टाकतात त्या विशिष्ट चवीसाठी. बेरी पुलाव असाच एक fruit + meat असलेला मुंबईल्या काही रेस्तरांमधून मिळणारा प्रकार. फ्रूटी - आंबट- गोडसर चवीचा.

वर अनेकदा आलेल्या “सल्ली” शब्दावर अडखळलात ? सल्ली म्हणजे बटाट्याची शेव, आलू भुजिया आणि फ्रेंच फ़्राइज़ चा पारसी चुलतभाऊ. पदार्थांना कुरकुरीतपणा - क्रंच - टेक्स्चर प्रदान करणारा कलाकार. नुसतेच हाय प्रोटीन पौष्टिक हेल्दी खाणे होऊ नये म्हणून या तळलेल्या बटाटा आयटमची योजना असावी. What’s the point in missing all the fun of eating some fried, starchy junk food? पुलाव, चिकन, मटन, एन्डू, ऑमलेट, कटलेट, मासे अशा सर्व ग्रेवीयुक्त किंवा कोरड्या पदार्थांवर ह्या बटाट्याच्या कुरकुरीत सळ्या टाकून त्यांचे “सल्ली” वर्जन तयार करण्यात येते.

“धनशाक” मात्र पारसी भोजनाच्या ह्रदयस्थानी आहे. म्हटले तर एकप्रकारे मिक्स दाल, भाज्या / मटन घातलेले स्ट्यूच. पण एखाद्या पारश्यासमोर हे म्हणून दाखवा, बावा तुमचे दात घश्याखाली घालायला कमी करणार नाही. Bawas may get violent Happy

धनशाक आणि ब्राउन राइस/ caramelised onion rice हे निवांतपणे रांधा-वाढायचे पदार्थ. Slow cooking चा वस्तुपाठच. करतांना घाई चालत नसल्याने धनशाक हमखास रविवारचा लंच मेन्यू आणि एका घरात केला तर कुटुंबकबिला, शेजारीपाजारी सर्वांनी भरपेट खाऊन वर संध्याकाळी खायला उरेल इतक्या प्रमाणात करायचा असा नियमच आहे. त्यात प्रत्येक घराची पद्धत, वापरायच्या डाळी, वापरायचे अन्य जिन्नस, त्यांचे प्रमाण, मसाले वगैरे वेगवेगळे. त्यामुळे एकाच चवीचे धनशाक दोनदा खायला मिळणे फक्त रेस्तरां मधे किंवा त्याच बावाच्या घरी घडेल याची खातरी. धनशाक शाकाहारी आणि मांसयुक्त असे दोन्ही प्रकारे करतात. मटन खिमा वजा केला तर शाकाहारी, आणि टाकला तर बावा खुष. सांबर किंवा सिंधी कढीत असतात तश्या भरपूर भाज्या धनशाकमधेही असतात पण डोळ्यांना एकही तुकडा दिसेल तर शपथ. घोटून घोटून एकजीव केलेल्या भाज्या / मीट असल्याने आणि मंद आचेवर भरपूर वेळ घेऊन शिजवल्याने धनशाक दाटसर, स्मूद असते. त्याचे लग्न ब्राउन राइसशी आधीच लाऊन देण्यात आले आहे. Caramel water मधे हा भात शिजवतात त्यामुळे त्याला एक विशेष रंग, गंध आणि चव प्राप्त होते. शिजवायलाही भरपूर वेळ लागतो आणि भात शिजत असतांना त्यातले अधिकचे पाणी धनशाकमधे घालणे हे मस्ट (प्रेशर कुकर वापरणे अब्रह्मण्यम़्). वरून खरपूस तळलेले कांद्याचे काप पखरून त्याची चव खुलवणे हे बावा बल्लवांचे आवडते काम.

7ae5a7e0-b7d6-4aba-a17b-1f6d0cbb9a6d.jpeg

पारसी समाजात धनशाकचे फार कौतुक असले तरी नवरोज़चा सण असेल किंवा नवीन जावई जेवायला येणार असेल तर अशा मंगलप्रसंगी मात्र धनशाक रांधू नये असा संकेत आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात काही भागात जावई-सोयरे आले असता पिठलं करत-वाढत नाहीत तसेच. पारसी घरात कुणी मयत झाल्यावर तीन दिवस चूल पेटवू नये, शेजारघरातून आलेली खिचडी खावी आणि चौथ्या दिवशी शुद्धीकरणाचा - शोक समाप्तीचा संकेत म्हणून घरात धनशाक + भात रांधून सर्वांनी खावा अशी जुनी प्रथा.

d9fac93d-9688-4bca-b8f2-30394c57c10a.jpeg

स्थानिकांच्या खाद्यसंस्कृतीचा मोठा प्रभाव पडलेले प्रमुख पदार्थ म्हणजे लोणची, पापड आणि चटण्या. पारसी भोजनात यांची रेलचेल असते पण चव मात्र गुजराती / अन्य भारतीय चवीपेक्षा वेगळी. अर्थात कृती आणि घटक वेगळे असल्याने तशी चव गाठता येते. वरण-भात किंवा खिचडीसोबत पापड आणि लोणच्याच्या फोडी हे बावा घरातले आवडीचे खाणे गुजराती घरांपेक्षा वेगळे नाही. पण पारसी लोणच्यांचे वैशिष्ट्य म्हणजे व्हिनेगरचा वापर. त्याने एक शार्प- जिभेला चरचरणारी चव येते. कैरी, लिंबू, भोकरं यांची व्हिनेगरमधली लोणची तर करतातच पण मेवा नू अचार (सुक्या मेव्याचे / Dry Fruit Pickle), आलूबुखारा नू अचार, मरगी (boneless chicken) नू अचार, सुक्का बोंबलाना पाटीया (बोंबील मासे वापरून), कोलमी नू अचार (कोलंबीचे लोणचे) आंबाकलियो (shredded mango), अख्ख्या कांद्याचे, मनुका+गाजराचे, कार्नबेरी + सफरचंदाचे, कोहळ्याचे तिखट लोणचे आणि गोड मुरांबा, जर्दाळूचे लोणचे हे खासे पारसी चवीचे मानदंड.

पारसी तीर्थस्थळे असलेल्या उदवाडा-नवसारी भागातले बल्लव कमलकाकडी (Lotus stem)चे, लसूणपातीचे तसेच गोड्या पाण्यातल्या झिंग्यांचे “सून्ध” (हे फिकट निळ्या रंगाचे झिंगे तिथली खासियत) वगैरे लोणची बनवणारे एक्सपर्ट समजले जातात आणि त्यांना वर्षभर मागणी असते.

खूप पातळ लाटलेले राइस पापड, उडदाचे मिरेयुक्त पापड, मिरगुंडासारखेच पण फिके आणि लांब कापडी चिंध्यांसारखे दिसणारे पापड, लाल गहू- हातसडीचे तांदूळ एकत्र वापरून केलेले पापड, खीचा पापड असे अनेक प्रकार पारसी घरात आलटून पालटून असतात. पापड मात्र तळूनच खावे, भाजून नाही हा दंडक. लग्नाच्या भोणूसाठी ३-४ प्रकारचे पापड असतातच.

दुपारच्या चहाची वेळ म्हणजे पारसी बेकरी पदार्थांचा पर्वणीचा समय. मावा नू केक, केशर, बदाम आणि घट्ट दही वापरून केलेला 'कुमास', दार नी पोरी सारखी गोड पेस्ट्री, साधना (वाफेवरचा राईस केक सदृश्य पदार्थ) केरकरिया (kind of deep fried Biscuits), पोपलीजी (soft bun केक्स), घारी (अतिशय गरिष्ठ तूप-मेव्याची मिठाई), चिकन किंवा बटाटा भरलेले पॅटिस/ बेक्ड समोसा, मलाई ना खाजा (cream-filled phyllo), खारी, बटर बतासा, नानाविध प्रकारचे केक, रोटला नो मलीदो, कोपरा ना पॅनकेक, अनेक प्रकारचे सॅन्डविच असा साग्रसंगीत हाय टी प्रकार. नुसत्या चहाला बोलावले तर बावा घरात वरीलपैकी किमान पाच -सहा पदार्थ टेबलावर सुंदर क्रोकरीत मांडलेले असणार.

80274539-736e-43df-836d-fbc655d4d5f8.jpeg

इराणी पारसी नववर्ष (जमशेद नवरोज़ - Spring Equinox) २१ मार्चला सुरु होते. थंडीचे दिवस संपून नवीन धान्य, फळे-फुले, भाज्या मिळायला सुरूवात होण्याचा, सृष्टीच्या नवसृजनाचा सोहळा. यादिवशीच्या मेजवानीला गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेले रोज मिल्क / फालूदा प्रमुख पाहुण्याच्या भूमिकेत दिसतो.

67ac1857-66fe-4515-988b-6ca454947108_0.jpeg

नवरोजसाठी सजवलेल्या टेबलावर अनेक प्रकारचा सुकामेवा आणि “स” / “श” अक्षराने सुरुवात होणाऱ्या शुभ वस्तूंची दाटी असते. शरबत, शकर (साखर), शीर (दूध), शेम (मेणबत्ती), शराब (मद्य), सिरका (व्हिनेगर), सिक्का (नाणे) सीब (सफरचंद) सुझान (सुईदोरा), सौजी (हिरवी पालेभाजी), सोपरा (table cloth) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शीशा (आरसा). आरश्यात स्वत:ला बघून आणि सीख कबाब + नान खाऊन, आणि पसंतीप्रमाणे शीर (रोज़ मिल्क) किंवा शराब चा घोट पिऊन नववर्षाची सुरुवात करणे असा मुख्य कार्यक्रम. (काही पारसी पंचांगांप्रमाणे नवरोज ऑगस्ट महिन्यात येतो. महिना वेगळा, बाकी सर्व सोहळा सेम टू सेम.)

71899f25-228b-43ca-ae1a-369b35397136.jpeg

पतेती म्हणजे सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस. त्यादिवशी वर्षभरात झालेल्या चुकांची कबुली, क्षमाप्रार्थना आणि क्षमादान असा काहीसा reflective, sombre गंभीर माहौल असतो. खाणेपिणे साधे. पतेतीच्या आधी तीन दिवस “खिचडी डिटॉक्स” ची गमतीशीर परंपरा काही कुटुंबात पाळतात. तीन दिवस मद्य, मीठ, साखर, मांसाहारापासून दूर राहून सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त सरबरीत खिचडी खाऊन पोटाला आराम देणे, स्वच्छता- system cleaning करणे हा वार्षिक कार्यक्रम. घरात मृत्यू झाला तर असेच त्रिदिवसीय खिचडी डिटॉक्स करतात.

नवसारी, संजान, उदवाडा ही गुजरातमधील गावे झोराष्ट्रियन पारसी समाजाची पुरातन काळापासूनची तीर्थस्थळे आहेत. मुंबईतल्या / भारतातल्या एकूण एक पारसी माणसाचा एकतरी नातेवाईक मूळचा इथला असतोच. शिवाय नवसारी “धरम नी टेकडी” तर उदवाडा- संजान “इरानशाही आतष” म्हणजे इराणहून आणलेल्या मूळ पवित्र अग्नीचे स्थान म्हणून परमपवित्र स्थळे मानली जातात. आयुष्यात एकदातरी या स्थानांना भेट देण्याची परंपरा आहे. या गावातून अजून काही जुने पारसी सण - परंपरा जिवंत आहेत. त्यात “ आवा महीनो / आवा रोज” ( Birthday / Birth month of Water) अदर महीनो / अदर रोज ( Birthday / Birth month of holy Fire) असे सण साजरे करतात, त्यासाठी विशिष्ट खाद्यपदार्थ तयार करणे आणि सर्वांनी एकत्र येऊन ते खाणे हा समान धागा. पैकी “बामन महीनो” किंवा “बामन रोज” साठी खिचडी महोत्सव होतो. लहान पारसी मुले दारोदारी जाऊन भिक्षा म्हणून खिचडीसाठी लागणारे जिन्नस गोळा करतात. त्यांच्या झोळीत ते देण्याआधी पाण्याच्या घागरी मुलांवर ओतून त्यांना ओलेचिंब केले तर त्यावर्षी भरपूर पाऊस पडतो अशी श्रद्धा आहे. सर्वांकडून मिळालेला शिधा एकत्र करून खिचडी तयार करून भरपूर तूप टाकून खाणे हा सामुदायिक खिचडी महोत्सवाचा शेवट.

नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि गोडधोड नाही असे होऊच शकत नाही. मलीदो, बदाम पाक, अघारनी ना लाडवा, रावो, पर्शियन टूट, मावा केक, जर्दाळू+ बदाम केक, मकरून्स, कोपरापाक, लगन नू कस्टर्ड, मलाई ना पफ, दूध पफ, खजूर+ अक्रोड केक, दार नी पोरी, मदैरा, क्रीम शेरी, सुत्तरफेणी अशी अनेक पक्वान्ने हजर असतात.

मासोळी झोराष्ट्रीयन पारसी परंपरेत शुभलक्षण आहे. पण मत्स्याहारावरचे प्रेम दर्शवण्यासाठी अट्टल मासेखाऊ पारसी बावा लोक नववर्षाच्या मेजवानीत शुद्ध शाकाहारी मासोळी खातात, खिलवतात !!!

126eba1e-e751-4a78-9a4a-95080d41a133.jpeg

बदाम नी बोई - माश्यांचा आकार दिलेली बदाम + दुधाची मिठाई.

603508f6-7773-4ca4-9843-6269bc6203c0.jpeg

बदाम नी बोई किंवा तिचे अन्य रूप मंगल प्रसंगाच्या पंक्तीला दिसतेच.

वरील वर्णन वाचून पारसी फूड खावेसे वाटले तर :

पारसी भोणू साठी मुंबईत सर्वांत जास्त पर्याय आहेत. इराणी-पारसी मालकीच्या शंभर वर्षापेक्षाही जुन्या बेकरीज आणि रेस्तराँ अजून मुंबईत आहेत. फोर्ट भागातली याझदानी, कॅफे मिलिटरी, ब्रिटानिया, कॅफे एक्ससेल्सिअर, जिमी बॉय ही काही जुनी नावे. कयानी एन्ड कंपनी (मरिन लाईन्स), Sassanian Cafe (मरिन लाईन्स), दादरचे कॅफे कॉलनी हे आहेतच. जालावर यांच्याबद्दल चांगले-वाईट रिव्ह्यूज आणि रील्स आहेत. सावधगिरीचा इशारा म्हणजे ही सर्व इराणी-पारसी रेस्तराँ चालक -मालक मंडळी सध्या ग्राहक, दर्जा आणि आपला पारसी ठसा टिकवण्यासाठी धडपडत आहेत. मुंबईतले एकापाठोपाठ एक इराणी-पारसी रेस्तराँ बंद पडत आहेत किंवा त्यांचे वेगाने उडपीकरण-पंजाबी ढाबाकरण होत आहे.

धनिक पारसीजनांचा आर्थिक आधार लाभलेले RTI चे पारसी किचन ( Hughes Road ) आणि दादरच्या पारसी कॉलनीतले पारसी कँटीन मात्र अजूनही चांगल्या प्रतीचे आणि authentic पारसी फूड ग्राहकांना देत आहेत, त्यांच्याकडे बघायला हरकत नाही. दर्जा, सेवा, चव, उत्तम अनुभवासाठी महालक्ष्मी रेसकोर्सचे Gallops पर्सनल फेवरेट, दर चढे. प्रसिद्ध पारसी डेअरीची मरीन लाइन्स आणि मुंबईत अन्यत्र असलेली outlets “छोटी भूक” भागवण्यासाठी + मिठायांसाठी योग्य. याव्यतिरिक्त पारसी नवरोज वगैरे प्रसंगी झोराष्ट्रियन मंडळांतर्फे आयोजित केलेले फूड फेस्टिवल एक चांगला पर्याय आहे. सी फूड वगळता अन्य प्रसिद्ध पारसी पदार्थांचे शाकाहारी व्हर्जन उपलब्ध असते. अंडेसुद्धा चालत नसले तर अजून कमी पर्याय असतात, पण असतात.

6bda0521-ea5f-48f2-8e28-af91142a80d7_0.jpeg

(उपलब्ध जिन्नस वापरून आज घरी केलेले poor man’s व्हेज धनशाक + पुलाव)

नवसारी, संजान, उदवाडा वगैरेला कुणी मुद्दाम भेट देण्याची शक्यता फारच कमी, म्हणून तिथल्या Eateries बद्दल लिहिले नाही.

लेखासाठी वापरलेले संदर्भ :

1} माझा बावा मित्र होमी, त्याची शेफ बहीण लैला, त्यांची आई, मावशी शिरीन भगवागर आणि तिची 'गर्ल गॅंग' (म्हाताऱ्या कोण म्हणतंय रे तिकडं?) यांच्याशी वेळोवेळी झालेल्या दीर्घ गप्पा

2} मुंबईतल्या आणि गुजरातमधील उदवाडा, संजान, नवसारी, खरच आणि भरूच या शहरातल्या ओळखीच्या / अनोळखी-अनाम पारसी स्त्रीपुरुषांनी वेळोवेळी भरभरून दिलेली माहिती

3} रतन टाटा इन्स्टिट्यूट (RTI) मुंबई, लेडी नवाजबाई टाटा ट्रस्ट, स्त्री झरतुष्टी मंडळ द्वारा संचालित किचनचा स्टाफ आणि शेफ, मुंबईत अजून तग धरून असलेल्या काही इराणी रेस्तराँचे मितभाषी/ खडूस मालक आणि त्यांचा बोलका स्टाफ यांच्याशी वेळोवेळी झालेल्या खाद्यचर्चा

4} बाई मेहेरबाई जमशेदजी वाडिया लिखित पारसी पाककृतींचे पुस्तक 'विविध वाणी' आणि त्यावर आधारित पाककृतींचे रीटाबेन चे पुस्तक + अन्यजणांचे लेख.

5} An Invitation to Feast: A Deep Dive into India’s Culinary Treasures’ हे सोना बहादूर यांचे पुस्तक.

6} स्वतःचे आणि मित्र-कुटुंब गोतावळ्याचे प्रत्यक्ष खाद्यानुभव + गिचिडमिचिड हस्ताक्षरात लिहिलेल्या स्वतःच्या नोट्स. Actually, पदार्थांची करेक्ट नावे / उच्चार चुकल्यास दोष देण्यासाठी तयार ठेवलेली दूरदर्शी व्यवस्था)

* * *

काही महत्वाचे :

हा लेख फक्त 'मायबोली' संस्थळासाठी लिहिला आहे, अन्यत्र कुठेही पूर्वप्रसिद्ध केलेला नाही. लेख किंवा लेखातील कोणताही भाग अन्यत्र वापरण्यास मनाई. लेखातली माहिती- उतारे जालावर, छापिल पानावर अन्यत्र दिसले तर कन्टेन्ट ढापनेवाले का मूं काला.

लेखातली काही चित्रे माझी तर काही जालावरून साभार.

मानव पृथ्वीकर आणि सिमरन या मायबोलीकरांनी दिलेले प्रोत्साहन खूप दिवसांपासून अपूर्ण राहिलेला हा लेख पूर्ण करण्यासाठी कारण ठरले, त्याबद्दल दोघांचे आभार. सुमारे ३००० शब्दांचा लेख बोअर झाल्यास ते न्यून मात्र माझे समजावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार सुंदर लेख लिहिलाय! पारशी खाद्यसंस्कृती आणि त्या अनुषंगाने एकूणच चालीरिती यांचं सुंदर संकलन आहे हा लेख म्हणजे. आणि फोटोंनी तर बहार आणली आहे एकदम!

"साराभाई..." मालिकेत माया साराभाई भारत मॅच जिंकला तर जो मेन्यू करायचा म्हणते त्यात धानसाक-ब्राऊनराईस असा उल्लेख आहे इतकाच माझा आतापर्यंत पारशी खाण्याशी आलेला संबंध. पण मला दोराबजी आवडतं.

शर्मिला, माझं नाव प्रज्ञा आहे, पण मला आई प्रेमाने "सोनू" म्हणते असं सांगून मला पण तिथे यायला आवडेल Lol

खास अनिंद्य शैलीतील उत्कृष्ट लिखाण! रुचकर लेखातील तितक्याच रुचकर फोटोंना श्रीखंडातील काजू-बदाम म्हणावे की दालचातील दुधी म्हणावे असा प्रश्न पडतो! लिखाण आवडले वगैरे म्हणणे केवळ औपचारिकता आहे.

वंगखाद्य लेखाची आठवण झाली.

---

सिंधी खाद्यसंस्कृतीवरही लेख यावा ही अपेक्षा. त्याचप्रमाणे पारसी व सिंधी सारखे इतरही स्थलांतरित व्हावे लागलेले लोकसमूह असतील ज्यांनी आपापली खाद्यसंस्कृती जपून-टिकवून ठेवलेली असेल त्यांवर ही लेख यावेत ही extended अपेक्षा.

---

अनिंद्य माबोचा बार इतका वरती सेट केलात तर, इतरांनी काय लिहायचं. +१

Happy Navroz عيد نوروز مبارك (Eid-e-Navroz Mubarak)! +१

पाहुणे म्हणून " श' ह्या अक्षराने नाव असणाऱ्या व्यक्तींना बोलावलं तर कधीतरी "सं"धी मिळण्याची " श"क्यता आहे.

आमच्या अहोपण सरळ, सुंदर, सालस, समंजस, सद्गुणी, सदाचारी, सद्विचारी, सात्त्विक, सद्वर्तनी, सच्छील, सोज्वळ, सत्वशील,सत्यप्रिय, स्वयंभू, साहू, सजग, सभ्य, संभावित, सज्जन अशा "श" आहेत म्हटलं; त्या आम्हाला सोबत घेऊन जाणारच ना! Wink

सर्व नवीन प्रतिसादांचे स्वागत, नीट वाचतो पुन्हा.

माझेमन, श्रद्धा- सचित्र प्रतिसादांबद्दल विशेष आभार. हौशी आहात.

२१ मार्च चा मुहूर्त गाठण्याची थोडी घाई झाल्याने आणि जालगती मंद असल्याने लेखात काही चुका राहिल्या आहेत. त्यातल्या थोड्या दुरुस्त केल्या, उरलेल्या नंतर करतो.

नेहमीप्रमाणे काही शब्दांना मराठी पर्याय पटकन सुचले नाहीत 🙈

ते सुचले तर ठीक, नाहीतर चालवून घ्या.

दुसरे म्हणजे “धनशाक” + ब्राउन राइस असे मी लिहिले आहे खरे पण ते फक्त सोयीसाठी. हे म्हणजे “पिवळा पीतांबर” झाले. कारण धन/धान = Rice आणि शाक = भाजी/ कालवण असे एकत्रित - एकच शब्द आहे.

रेस्तरां मेन्यूत सुद्धा “धनशाक” + ब्राउन राइस असेच असते, समजायला सोयीचे म्हणून.

अनिंद्य,
काय बोलू आणि काय लिहू.
जबरदस्त झाला आहे तुमचा लेख.
तुमच्या खास शैलीतील आणखी एक उत्कृष्ट लिखाण!
फोटो सुद्धा अप्रतिम.
वंगखाद्य लेखाची आठवण झाली.+१
अनिंद्य माबोचा बार इतका वरती सेट केलात तर, इतरांनी काय लिहायचं. +१
तुमच्या लेखांचे लवकरच एक सुंदर पुस्तक येवो ही कामना >>> +१ मी त्याचा पहिला ग्राहक असेन.
हा लेख फक्त 'मायबोली' संस्थळासाठी लिहिला आहे>>>> :बदाम:
हा नुसता पारसी खानपान लेख नसून त्याच्या संस्कृतीचे सुद्धा बारकावे तुम्ही अचूक टिपले आहेत. त्याबद्दल तुम्हाला विशेष दाद द्यावी वाटते कारण यासाठी सूक्ष्म निरिक्षण आणि दांडगा अभ्यास असावा लागतो.
कॉलेजमध्ये एक पर्सी नावाचा मित्र काही पदार्थ आणायचा त्याची आठवण झाली.
लगन नु कस्टर्ड, हिरव्या चटणीतील 'पात्रा नी मच्छी', आकुरी, धनशाक असे बरेच पदार्थ चाखले आहेत. त्यांचे एक विशिष्ट कोलंबीचे लोणचे असते. आता नाव विसरलो.

@ किल्ली,

श्रद्धा यांनी लीड दिल्या आहेतच. पुण्यात पारसी मालकीच्या बेकरीज आहेत चांगल्या. कँप भागात. King’s Persian Bristo हे एक रेस्तरां आहे. त्यांचाकडे नवरोज़ वगैरे सणाला elaborate Parsi feast असते असे समजते. व्हेज पर्याय असतात.

1878 पासून चालू असलेले “दोराबजी एन्ड सन्स” कँप एरियात आहे ते पण आता बहुदा फक्त लंचसाठी उघडे असते. दोन्ही ठिकाणांचा प्रत्यक्ष अनुभव नाही.

पुणे सालाना पारसी फूड फेस्टिवल बद्दल सूचना मी खाऊगल्लीत डकवली होती.

https://www.maayboli.com/node/87558?page=8

पुन्हा बहुदा १५ ऑगस्ट २०२६ च्या आसपास होईल.

वाह वा! खासच आहे लेख. आमच्या ऑफिसमध्ये सायरस नावाचा पारसी कलिग होता. रिटायर्ड झाला. मला पारशांविषयी ममत्व आहे. मैत्रिणी पण होत्या पारसी. पण कधी पारसी पदार्थ फारसे खाल्ले नाहीत. नाही म्हणायला चर्चगेट ची पारसी डेअरी रुस्तमजीच ना? तिथलं ते बिस्कीट मधलं आइस्क्रीम खातो आम्ही बरेचदा.

@ धनुडी,

ते K. Rustom & Co. Ice Cream Parlour. त्यांचे आईसक्रीम सँडविच बेस्टाय, अगणित वेळा खाल्ले आहे. त्यांच्याकडे कधीही जा, गर्दी असणारच.

“पारसी डेरी” मरीन लाइन्स ला - अग्यारीच्या समोर. तिकडे दूध ना पफ आणि बरला पेढा खायला जायचो.

आता पारसी डेरीने उपनगरांतही काही चकाचक आउटलेट्स उघडली आहेत + झोमेटो आणि स्विग्गीची घरपोच सेवा.

@ एस

“इराणी कॅंटिन” / इरानी चाय cafe एकाधिक जागी आहेत, नवेकोरे चकाचक डेकोर आणि picturesque प्रॉप्स. मुंबई- पुणे दोन्हीकडे एक-दोन अनुभव घेतले ; जेवढे श्रम डेकोर वर घेतलेत त्याच्या निम्मे जरी किचन वर घेतले असते तर … असे फीलिंग आले. Or maybe it was just a bad day.

Insta / reel obsessed “foodies” ची गर्दी मात्र यांच्याकडे भरपूर.

एके काळी मुंबईत पारशी लग्न/ मुंज (नवज्योत) असेल तर त्याच्या साठी "मिसेस गोडीवाला" चेच केटरिंग असे.

माझ्या पारशी मित्राच्या (खुरशेद भरुचा) दोन्ही मुलांचे नवज्योत गिरगावात ऑब्लेस बाग येथे झाले होते तेंव्हा याच मिसेस गोडीवाला चेच केटरिंग होते आणि तेंव्हा पात्रांनी मच्छी इ पारशी डिशेस खाल्ल्याचे आठवते.

माझा मेहुणा पारशी आहे आणि त्याने साळुंके विहाराच्या रस्त्यावर (पुणे) परवरा नावाचे पारशी रेस्टॉरंट काढले होते.

तो स्वतः दादरच्या केटरिंग कॉलेज मधून शिकलेला शेफ आहे.

परंतु नंतर कर्मचाऱ्यांच्या सततच्या कटकटीला कंटाळून त्याने ते रेस्टॉरंट बंद केले. दर शनिवारी/ रविवारी कर्मचारी दांडी मारून दुप्पट पैशाच्या मोहाने कोणत्यातरी कंत्राटदाराकडे लग्नात काम करायला जात. यामुळे बरोबर सर्वात महत्त्वाच्या वेळेस ग्राहकांना सेवा पुरवणे फार त्रासदायक होत असे.
याशिवाय लोक दर्जाकडे तेवढ्या चौकसपणे न पाहता दराकडे जास्त पाहतात असे आढळून आले.

रेस्टॉरंट च्या सोडून इतर वेळात ( दिवसा) त्याने रिअल इस्टेट एजंट चा व्यवसाय चालू केला तो प्रामाणिकपणे चालवल्यामुळे भरभराटीस आल्यावर त्याने वरील सर्व कटकटींना कंटाळून रेस्टॉरंट बंद करून टाकले.

त्या रेस्टाऊरन्टमध्ये मी असंख्य उत्तमोत्तम पारशी पदार्थ चाखले आहेत.

आपल्या सुंदर लेखामुळे त्याला उजाळा मिळाला.

धन्यवाद

@ सुबोध खरे,

असे first hand अनुभव प्रतिसादात वाचले की खूप आनंद होतो. योग्य कामगार न मिळाल्याने वा न टिकल्याने रेस्तराँ चालवणे खरंच अवघड आहे. Can understand the plight.

.. लोक दर्जाकडे तेवढ्या चौकसपणे न पाहता दराकडे जास्त पाहतात…

हे सुद्धा आहेच. उत्तम प्रतिचे घटक वापरायचे तर किंमत वाढतेच उदा. पारसी डेरी चे म्हशीच्या दुधाचे तूप १७०० रु किलो आणि वर आलेले बरला पेढे ११४० रु किलो असतात. ते बाजारातल्या अन्य पर्यायांपेक्षा खूप महाग वाटतात - आहेत.

.. माझा मेहुणा पारशी आहे…

या लेखाची लिंक त्यांना अवश्य पाठवा आणि जमल्यास त्यांचे मत- reaction - comments कळवा प्लीज. It will be a great delight to know.

@ माधव, धनवन्ती,

भानुतेजापुढे काय खद्योत… असे फीलिंग आले तुमची कॉमेंट वाचून.

चिनूक्स हे व्यासंगी व्यक्तिमत्व. मी त्यांच्या लेखनाचा आधीपासून चाहता आहे.

@ देवकी, अस्मिता,

… लिखाणात मार्दव आहे….. लेखनशैली प्रसन्न आहे असे प्रतिसाद वाचून आनंद होणारच.

पण हे मार्दव, ही प्रसन्नता जपण्यासाठी सध्या करावे लागणारे प्रयत्न दमछाक करणारे आहेत 🙈

बहु सर्रस लेख.

सुबोध खरे, ते मिसेस गोदीवाला असावं.

मिसेस गोदीवाला

बहुधा तेच असावं पण सगळे पारशी त्यांच्या शैलीत "गोडीवाला" म्हणताना आढळले.

उदा. मित्राची आई सुद्धा, जिच्या दोन्ही नातवांचे नवज्योत होते. (त्यांची नावे झरक्सेस आणि फरहाद)

@ माझेमन,

तुम्हाला जिमी बॉय आवडले असेल तर महालक्ष्मीचे Gallops जास्त आवडेल. घोडे, रेसकोर्स व्ह्यू, ट्रॉफ़ीज्, खोगीर, लेदर डेकोर असा माझा आवडता माहौल आणि props आहेत. मेन्यूत मोजकेच पारसी पदार्थ असूनही जे आहेत ते छान आहेत. Unhurried, निवांत, a rarity in Mumbai. Bit expensive but recommended.

BTW, महालक्ष्मी रेसकोर्सची आता रया गेली (किंवा माझं वय झालं Happy ) Horse races, त्याचा थाट-थरार, त्यावरचे बेटिंग हे पहिल्यांदा तिथेच प्रत्यक्ष अनुभवले. शेजारीच तो सुखद स्मृतींचा ठेवा, म्हणून Gallops ला जास्त मार्क्स.

Sassanian सुद्धा अजून ठीक आहे असा खात्रीशीर feedback आहे. तुम्ही गेलात तर इथे अपडेट जरूर लिहा.

*

तुमच्या झरेश्क बेरीज, लिमु उमानी पोस्टवरून लक्षात येते की “आंबट” चवी भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भूभागात आवडीच्या आहेत. स्पेन-पोर्तुगाल, coastal Italy ‘s love for tomatoes, California’s love for oranges, southern India’s love for tamarind, Thai love for raw mangoes … सर्वत्र आंबटशौकाचा हा common thread असे माझे निरीक्षण.

ते चाय नीम-बसरा होते ना एक ? … इरान से मंगाई हुई सूखे नींबू के छिलकों की चाय - हे सत्यजीत रॉय कथांवरच्या Roy सिरिजमधे होते बहुतेक. मनोज वाजपेयी ग़ज़ल गायक असतो तो Kleptomania वाला एपिसोड Happy

Gallop's is my favourite....
I love that ambiance....and view.
तिथले चिकन दोरी कबाब माझे आवडते.
आता जायला लागतंय....

महालक्ष्मीचे Gallops जास्त आवडेल >> एकदाच गेलेय पण खूप आवडलं आहे. अँबियन्स मस्त आहे आणि तुम्ही म्हणता तसा निवांत. मुंबईत अश्या जागा फार फार कमी आहेत. उगीच इतरांच्या उच्चभ्रुपणाचा दबाव वगैरे नाही येत तिथे. आम्ही तिथे पारशी डिशेस नाही ट्राय केल्या. पुन्हा गेलो की करेन ट्राय. सस्सानियनला का याझदानीला गेले होते ते आठवत नाही पण जिथे गेले होते तेही मस्तच होते.
ही सगळी नाव ऐकून इराण विशेषतः इस्पहान, शिराझ वगैरे पाहायची खूप इच्छा होती.

ऋतुराज >>> Gallops गटग करूया का? पण आपला गोंधळ ऐकून ते हाकवून लावतील.

“आंबट” चवी भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भूभागात आवडीच्या आहेत. >>> चांगलं ऑबझर्वेशन. दक्षिणेतही बघा पुलीओगरै लेमन/टोमॅटो राईस/रस्सम/चित्रान्न/दहीभात वगैरे अगदी नेहमीचे पदार्थ आहेत.

इरान से मंगाई हुई सूखे नींबू के छिलकों की चाय >>> हे नव्हतं माहीत. पण रॉय आणि मनोज वाजपेयी कॉम्बो असेल तर बघितलं पाहिजे.

… इस्पहान, शिराझ वगैरे पाहायची खूप इच्छा..

+ १

व्हिसाचा जुगाड पण केला होता, तेव्हां जमले नाही.

आता तर तो बेत बोंबललाच समजा

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि (तरीही) रसाळ लेख! Happy
फोटोही नेत्रसुखद.

लहानपणी वडिलांच्या बावाजी मित्राकडचं एक लग्न अटेन्ड केलं होतं. तोवर मुख्य जेवणासंगे पाण्याशिवाय काहीही प्यायची माहिती नव्हती.
तिथली सरबतांची असॉर्टमेन्ट पाहून मज्जा वाटली होती.
नंतर माझ्याही मित्रमंडळात काही नमुने होते. मंडळी फार लाऊड आणि फार प्रेमळ!
त्यामुळे
>>> बावा तुमचे दात घश्याखाली घालायला कमी करणार नाही
हे बघायला तरी धनशाकचं कूळ उद्धरून बघायला हवं!

आमचं मुंबईतलं ग्रॅन्ट रोडचं 'मेरवान' बंद झाल्याचं कळलं इतक्यातच. आता मावा केक कुठे खायचे! (घरी करा हे उत्तर नाही. तसा मावा केक कुठल्याही घरातल्या अव्हनमध्ये बेक होत नाही म्हणजे नाही!)

बाय द वे, सोशलमधल्या पारसी डिशेस पण चांगल्या असतात. पण मोजक्याच आहेत.
अलीकडेच बोरीवलीत फरदून नावाचं टेकअवे पाहिलं. लगेच लगन नुं कस्टर्ड मागवलं. त्यांच्याकडे पारसी फ्युजन आहे म्हणजे सल्ली बोटी पाव वगैरे. हळू हळू सगळं ट्राय करणार आहे.

… Gallop's is my favourite…

Clearly a case of great minds thinking alike 😀

… हळू हळू सगळं ट्राय करणार आहे….

वाह ! तुमचे सचित्र रिव्यूज् या धाग्यावर टंका प्लीज़. जनहितार्थ. सब का फायदा. 👍

.. धनशाकचं कूळ उद्धरून बघायला हवं!….

At your own risk हां, जरा जपून 😀

बेकरी आयटम्स बद्दल तीव्र सहमती. आजच्या जगात त्यांच्यासारखे old world methods नी, लार्ड वगैरे न वापरता स्वर्गीय चवीचे क्वॉलिटी बेकरी products तयार करणे फार फार कठीण काम.

….मंडळी फार लाऊड आणि फार प्रेमळ….

हे मात्र अगदी खरं. समाजात मिळूनमिसळून रहातांना स्वत:चे रूट्स, सण, परंपरा वगैरे जपण्याची धडपड करतात, मनापासून.

पारसी प्रथा परंपरांमधे Birthday of Fire, Birthday of Water हे कंसेप्टस् मला फारच आवडले. Humanising and Celebrating the elements of Nature ❤️

नववर्षाला आरसा बघण्याची आयडिया सुद्धा आवडली फार. “कुणाचं तोंड बघितलं होतं काय माहित” म्हणून पुढे चिडायला चान्सच नाही 😄 (अस्मिता, याकडे लक्ष गेलं नाही का ? )

मावानी केक सोडून बाकी पारसी पदार्थ खाऊन बघायची संधी कधी आली नाही. पण मुंबईत असताना बर्‍याच बावा लोकांशी संपर्क होता, ते सगळे ह्या निमित्ताने आठवले. मी आर्किटेक्चर कॉलेजमधे होते, तेव्हा वर्गात यझदी, होशनेर, करांजिया नावाचे बावा होते. शिक्षकांमधे खंबाटा, जाल आर्या होते. वडील व्होल्टासमधे नोकरी करायचे, त्यांचा टॉप बॉस पारसी होता.
मामा डहाणूला राहायचा. तिथे मामाकडे काही काम घेऊन येणारे पारसी बरेच होते. आईला ओळखायचे. आम्ही लहान असतानाच मामाने त्यांना 'साहेबजी' म्हणायला शिकवलं होतं. त्यामुळे बावा मंडळी खूष होऊन हातात काहीतरी गोळी - चॉकलेट ठेवायची. पुढे मामाचं अकाली निधन झाल्यावर ह्या सगळ्या मंडळींनी मामीला, तिच्या अपत्यांना खूप मदत केली होती. मुंबई - डहाणूच्या आठवणीत पारसी लोकांचं महत्त्वाचं स्थान आहे.

लेख आवडला! सुदैवाने नातेवाईकांइतकेच जवळचे असे पारशी सुहृद आहेत पण शाकाहारी असल्याने त्यांच्या घरी जेव्हा जेवले आहे तेव्हा बहुतेक वेळा गुजराती पद्धतीने रांधलेले पदार्थ खाल्ले आहेत.
फार प्रेमळ आणि जीव लावणारी माणसं सगळीच! आता त्यातले ज्येना हयात नाहीत पण माझ्या लहानपणी या फ्रॉक घालणाऱ्या आज्यांकडून भरपूर लाड करून घेतले आहेत! तुमचा लेख वाचून त्यांची खूप आठवण आली!

अरे वा… चविष्ट आणि रोचक लेख. पारश्याने कूक केलेल्या कुसिनशी कधीच संबध आला नाही त्यामुळे सगळी माहिती नवीनच. नाही म्हणायला आयकर शिकत असतांना “बाई शिरीनबाई कूका” या एकमेव पारशी पात्राशी संबंध आला पण तोंडाला चव आणण्यापेक्षा तोंडचे पाणी पळवण्याचे काम या पारशी बाईने केले असेल. पात्रानी मछली, धनसाक वगैरे फक्त ऐकून माहिती आहेत. अजूनही तग धरून असलेली पारशी रेस्टॉरंट्स एक्सप्लोर करावी लागतील.

@ अनया, जिज्ञासा,

तुमचे प्रत्यक्ष अनुभव = very touching, valuable. ❤

तुमच्या संपर्कात असलेल्या पारसी मित्रपरिवाराला हा लेख (भाषा समजू शकण्याची शक्यता असल्यास) जरूर शेयर करा.

डहाणू पालघर भागात इराणी - पारसी मालकीच्या चिकूच्या आणि आंब्याच्या बागा खूप होत्या. अजूनही आहेत. डहाणूचे “चिकू चिप्स” पारसीजनांत फार आवडीचे.

आधी कोळश्यावर चालणारा औष्णिक वीजप्रकल्प आणि आता बुलेट ट्रेनचे बांधकाम यामुळे होत असलेले प्रदूषण फळांचा उतारा आणि त्यांची प्रत दोन्ही उतरणीवर असण्याचे कारण ठरले आहे. 👎

@ किल्लेदार,

जरूर ट्राय करा, तुमचे अनुभव इथे शेयर करायला विसरू नका.

चव बदलण्यासाठी दुसरे लोक पारसी फूड खातात आणि पारसी बावा crumbled Linen shirts घालून आपआपल्या झगेवाल्या बायडीसंगे pure veg गुजराती थाली रेस्तरां गाठतात.

मस्त लेख! इतका सुरेख लेख पुरवुन पुरवुनच वाचणारे.

आम्ही ठाण्याला आमची बिल्डिंग बांधत असताना एका पारसी कुटुंबाच्या भाड्याच्या घरात रहात होतो. भेसानिया. ती डेंटीस्ट होती. एक नंबर खडूस्स पण प्रेमळपण, मजेदात Proud मजेदार होती. कधी खाण्याचा वगैरे प्रसंग आला नाही. पण एकुण अनुभव सुखद होता.
घर तर टॉप फ्लोरला आणि तीन ही बाजुंनी क्षितिजा पर्यंत काहीही नजरेच्या टप्प्यात इतकं उंच बांधकाम नसलेले तरी स्टेशन पासून अगदी जवळ असं सगळं होतं. त्याघरात जे कोणी येई ते हमखास हेच घर घेऊन टाका ची गळ घालीत असे ते सगळं आठवलं. Happy

ती डेंटीस्ट होती. एक नंबर खडूस्स पण प्रेमळपण, मजेदात होती
<<<< डेंटिस्ट असल्याने मजे'दात' होती का? Proud

My Bombay Kitchen by Niloufer Ichaporia King is wonderful book that has documented Parsi recipes. Meeting Niloufer and hearing her stories during book tour was an amazing experience.
पारसी मैत्रिणीकडून शिकलेला धनसाक आणि निलोफर ची रेसिपी यात थोडा फरक आहे पण दोन्ही तितक्याच आवडतात.
कार्डमॉम केक, पटेटा per Ida, खजूर नी घारी यासारखे पदार्थ अप्रतीम असतात.

एक मेहुणा पारसी आहे पण त्याच्याबरोबर खाणे खूप वेळा झाले नाही... ते सुधारायला हवे आहे ...

Pages