पारसी भोणू

Submitted by अनिंद्य on 21 March, 2026 - 07:35

शापुरशा, रोस्तम, फाली, होमी, सायरस, जहांगीर, केकी, पीलू, नरीमन, होशंग, जमशेद हे मित्र आणि माहरोख, नवाज़, लैला, दीना, शहनाज़, डेल्ना, मेहर ह्या मैत्रिणी ही सगळी पारसी “बावा” मंडळी एकत्र जमून मोठ्ठ्या आवाजात (अर्थातच) बोलत असली तर विषय ज्वलंत,तातडीचा आणि गंभीर असणार.

हळू आवाजात चर्चेची अपेक्षा मात्र करता यायची नाही कारण पारसी मंडळी जमली आहेत आणि कुजबुजत हळू आवाजात बोलत आहेत असे फक्त दोनच प्रसंगात घडते - कुणाचा दाखमा/ अंत्यविधी चालू असेल तर किंवा मग कडाक्याचे भांडण चालू असतांना एकमेकांना “तमे किधो ने भेन्चोद, हमजो ने मारी वात' असे गालीप्रदान करतांना. बाकी वेळी फुल्ल व्हॉल्युम. पारसी बावाजीचे मुख्य लक्षण.

तर, मोठ्या आवाजातल्या पारसी स्नेहमेळाव्यात चर्चेचा विषय खालीलपैकी एक असण्याची दाट शक्यता :

- अमक्या मित्राला- नातेवाईकांना धंद्यात झालेला नफा / मिळालेले घबाड. धनप्राप्ती चांगली झाली असल्यास त्यानिमित्त पार्टी कधी, कुठे, मेन्यू वगैरे.

- तोटा, नुकसान, व्यावसायिक प्रॉब्लेम झाला असेल तर “ग़म ग़लत करवा माटे” पार्टी कधी, कुठे, मेन्यू वगैरे.

- येऊ घातलेला नवरोझ सारखा सण किंवा कुणाकुणाच्या मुलांचा 'नवज्योत' समारंभ आणि त्यानिमित्त मेजवानीचे बेत. पार्टी कधी, कुठे, मेन्यू वगैरे.

- अमक्याचं जमलेलं / बिनसलेलं प्रेम, घटस्फोट, प्रेगनेंसी किंवा त्यासाठी चालू असलेले प्रयत्न, अपत्यप्राप्ती आणि त्यानिमित्त पार्टी कधी, कुठे, मेन्यू वगैरे.

तुमच्या लक्षात आलेच असेल, प्रत्येक प्रसंगात गाडी फिरून फिरून एकाच थांब्यावर येतेय - पार्टी, पार्टीचा मेन्यू, भोणू, भोजन, जेवण, पंगत, खाणे, खादाडी.

याचा कळस गाठला जातो कुणाचे लग्न ठरले की. पारसी जोडप्याचा लग्नाचा विचार पक्का झाला आणि "पसंदे कदम" (बोमनजी- धर्मगुरु आणि पालकांसमोर वाग्दत्त वधू-वराने लग्नासाठी पसंतीची तीन दा ग्वाही देणे) ची घोषणा झाली रे झाली की घरी-दारी एकच विषय - लग्नाच्या कार्यक्रमाचे केटरिंग कुणाला द्यायचे ? आपडी शिरीन अने रोस्तम ना लगन थवाना छे. लगनमां केटरिंग नू काम शा ने आपवू ? गझदर नी डीकरी ने ? आपडी तनाझ ? के आपडू टाटा इंस्टीट्यूटनू पिकोलो ? के बीजू कोई ? के नवसारीथी मासा नवरोजभाई मोकलसे ते ? एक ना दोन. मग त्यात मेन्यू काय? पातरा नी मच्छी, धनशाक, पात्रेल / पातरेल, सल्ली मरगी, चिकन फरचा, सास नी मच्छी, सल्ली बोटी, जर्दालू माँ गोश्त, बेरी पुलाव, झिंगा ना कटलेट, सास नूं गोश, दार नी पोरी, मेवा नू अचार, लगननू कस्टर्ड अशा खास ठेवणीतल्या पारसी पदार्थांची चविष्ट चर्चा. तासन् तास, दिवस-दिवस.

“लगन नू भोणू” म्हणजे लग्नाच्या पंगतीतले जेवण हा पारसी समाजाच्या प्रचंड आस्थेचा आणि अभिमानाचा विषय. त्यात काहीही उणे रहायला नको हा समस्त पारसी बांधवांचा एकमताचा ठराव, त्यासाठी गुन्हा करावा लागला, आवडत्या केटररला ओलिस ठेवावे लागले तरी बेहत्तर असे गमतीने म्हणतात. लग्नसोहळा पार पडल्यानंतर सुद्धा अनेक महिने हे “लगन नो भोणू” आणि त्यातले पदार्थ, त्यांच्या चवी, चवीतले बारकावे - सगळेच चर्चेत असते. आपल्या अन्नावर, खाद्यपरंपरांवर अतिशय प्रेम करणारी जमात.

इराणी-पारसी नववर्षाचे निमित्त साधून (२०-२१ मार्च) या आगळ्यावेगळ्या समाजाच्या आगळ्यावेगळ्या खाद्यपरंपरा आणि खाद्यसंस्कृतीशी थोडा परिचय करून घेऊ या.

भारतातल्या अति-अल्पसंख्यक, तरी गर्भश्रीमंत असलेल्या पारसी समाजाची कहाणी सर्वांना माहितीच असेल. इराणचा शेवटचा सासानिद वंशीय शासक “यज्देगर्द”चे राज्य अरब मुस्लिमांच्या आक्रमणाला थोपवू न शकल्याने संपुष्टात आले (641 ईसवी) आणि अग्नीपूजक झोराष्ट्रियन पारसी आपला देश (फ़ारस, आजचा इराण) सोडून परागंदा झाले. आधी खोरासान पर्वतरांगा, मग हारमुज बंदर आणि मग समुद्रमार्गे वाट फुटेल तिकडे असे पलायन केलेल्यांपैकी काहींची जहाजे भारतात गुजरातच्या किनाऱ्याला लागली. दीव, संजान, नवसारी आणि उदवाडा या गावांमधे “आम्ही दुधात साखरेसारखे राहू” अशा आश्वासनावर आश्रय मिळवून राहिले आणि पुढे आपल्या कौशल्याने अपार धनोत्कर्ष साधते झाले. इराणमधून येतांना “ईरानशा” (पवित्र अग्नी) सोबत आणला होताच. त्याची पूजाअर्चा करण्यासाठी या गावांतून आतिश बेहराम आणि अग्यारी नामक प्रार्थनास्थळे स्थापण्यात आली. इराणमधून पुढे अनेक दशके झोराष्ट्रियन पारसीजन येतच गेले आणि हे इराणी- पारसी गुजरात, मुंबई आणि पुढे देशात अन्य ठिकाणी वसले. (संदर्भ = “दस्तूर बहमन कैकोबाद” कृत 'किस्सा-ए-संजान, 1599-1600 ईसवी)

मोठ्या शहरातून आपल्या मूळ गावी गेलेले लोक परततांना सोबत काय आणतात ? अमुक मसाले, तमुक वाळवण, ही-ती चटणी, ग्रामीण मेवा, वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक फळे, भाज्या, खाद्यपदार्थ. हे पदार्थ काही दिवसांत संपले की त्यांच्या आठवणी जागवतात. आपल्या सामान्यजनांची ही कथा, पारसी लोक तर शेकडो वर्षांपूर्वी घर-दार- देश सोडून आलेले. त्यांच्या अन्नस्मृती, त्यांचा food nostalgia तितकाच खोल, तीव्र असणे स्वाभाविकच. अनेकानेक वर्षे गुजरात राज्यात वास्तव्य असल्याने त्यांच्या मूळ इराणी खाण्यापिण्यावर स्थानिकांचा प्रभाव पडणे हे सुद्धा सहाजिकच. असे असूनही आपली एक ठळक वेगळी-निराळी खाद्यसंस्कृती जपण्यात पारसी समुदाय यशस्वी ठरलाय हे निर्विवाद.

e1e6d05e-fa7a-4e0d-8db6-cdba0a648307.jpeg

ऐकून माहिती असलेले, क्वचित कधी चाखलेले, काही मोजक्या इराणी-पारसी रेस्तरांमधून मिळणारे धनशाक + ब्राउन राइस, अकुरी, पातरा नी मच्छी, रुस्तमजी ब्रँडचे सोडावॉटर आणि गोडात कस्टर्ड यापलिकडे पारसी फूडबद्दल फारसे कुणाला माहिती नसते. ग्राहकांच्या तुटवड्यामुळे, त्यांच्या बदलत्या food choices मुळे, अन्य कारणांमुळे हे रेस्तरां फार टिकाव धरू शकतील अशी स्थिती नाही. Such Parsi food places have already become relics of bygone times and they may soon become fossils.

एकतर समाजाची संख्या खूप म्हणजे खूपच कमी. भारतात आजमितिला जेमतेम लाखभर पारसी असावेत. हासुद्धा कमाल आकडा. त्यात आपण बरे आपले काम बरे अशी बहुसंख्य पारश्यांची प्रवृत्ती. एकलकोंडे, पटकन न खुलणारे, लाजाळू स्वभावाचे लोकच जास्त. आपले अन्नपदार्थ, आपली ख़ासियत टिकावी यासाठी यासाठी धडपड करणारे काही आहेत हीच काय ती जमेची बाजू.

दुसरे म्हणजे पारसी फूड म्हणजे फक्त सामिष - नॉनव्हेजच असते हा ठाम समज. समाज मुख्यत्वे सर्वभक्षी आहे हे खरे आहे. पण शाकाहारी लोकांना खाऊ घालायला काहीच नाही असे कोणत्याही पारसी बावाच्या किचनमधे होत नाही. (उदाहरणार्थ, header picture म्हणून दिसणारी भरगच्च थाळी फक्त शाकाहारी पदार्थांनी नटलेली आहे)

हळद - मिरची पूड यांचा अत्यल्प वापर आणि त्यामुळे पदार्थांचे फिके रंग; मासे-नॉनव्हेज रांधण्याच्या त्यांच्या विशिष्ट पद्धती ( यथा fruits+ meat, किंवा honey+ dryfruits + meat); पारसी पदार्थांच्या नाजूक चवी आणि आपल्याकडच्या झणझणीत, मसालेदार चिकन-मटन-मासे खायला सरावलेल्या जिव्हांचा मेळ नीट बसत नाही हा मुद्दाही आहे. म्हणूनच की काय आपल्याकडे पारसी फूड फार लोकप्रिय होऊ शकलेले नाही.

तर काय असते पारश्यांच्या ताटात ? रोजचे जेवण काय, उपास, श्राद्ध, सणावाराला काय ? पार्टीत, नवज्योतच्या, नववर्षाच्या जेवणाला, लग्नाच्या पंगतीत काय काय ?

ठेवणीतले, करायला किचकट असे पदार्थ सणाला आणि सोपे- practical पदार्थ रोजच्या जेवणाला असे सर्वसाधारण धोरण. पारश्यांच्या ग्रोसरी शॉपिंगच्या थैलीत सर्वात जास्त कुठला आयटम येत असेल तर एन्डू. Egg / अंड्याला “एन्डू / एन्डा” म्हणणे ही पारसी लकब, खास पारसी लक्षण. एन्डाशिवाय पारसी किचन म्हणजे रामाशिवायची अयोध्या, विष्णुविनाचा वैकुंठ. सकाळच्या न्याहारीत, दुपारच्या जेवणात, मधल्यावेळच्या खाण्यात, केक-पेस्ट्री-कस्टर्ड - कुकीज़- भजी- भाजी- कटलेट सर्वत्र एन्डूचे साम्राज्य.

पारसी न्याहरीचा सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हणजे “अकूरी” या अकूरी आणि अंडा भुर्जीत फरक काय ? सेमच ना ? तर तसे नाही. मुख्य फरक टेक्स्चरचा. लाल रंगाच्या सुती कपड्याला लालच रंगाच्या रेशमी कपड्याचा फ़ील येतो का? काहीसे तसेच.

चीज़ ऑमलेट, पारसी बेकरीतले ताजे पाव, ब्रून, बन, बटर खारी, निरनिराळ्या कुकीज़ आणि सोबतीला चहा हे न्याहरीचे अन्य लोकप्रिय पदार्थ. पारसी घरातला चहा मात्र इराणी रेस्तरांच्या चहापेक्षा वेगळा. त्यात उन्हात वाळवलेली पुदिन्याची पाने चुरडून वापरलेली असतात.

इराणी मूळ असलेल्या समाजांचे बेकिंग स्किल्स वादातीत आहेतच, त्यात प्रचंड वैविध्यही आहे, त्याबद्दल पुढे. शहाण्या माणसाने प्रत्यय घेण्याचा चांस सोडू नये, हे निश्चित.

घरगुती लंच- डिनर ला दार-चावर-एन्डू (साध्या वरण भातावर फ्राय एग / उकडलेले अंडे) दररोज खाल्ले तरी कोणताही पारसी बावा “ह्या मेन्यूचा कंटाळा आलाय” असे म्हणायचा नाही.

711de8a6-9a87-401a-9e28-27c2012f1e72.jpeg

तुरिया पर एन्डू, वेगना पर एन्डू, सल्ली पर एन्डू, पटेटा पर एन्डू, भींडापर एन्डू अशा अंडीयुक्त भाज्या आणि भात किंवा चपाती (दोन्ही एकत्र सहसा नाही) असे रोजचे जेवण, सोबत एखादे लोणचे आणि गुजराती स्टाइल कचुंबर सलाड.

23904aac-c5fd-452e-af3c-8fc5eac78f22.jpeg

दररोज सकाळ - दुपार- संध्याकाळच्या खाण्यात एग प्रोटीनचे असे भक्त-भोक्ते अन्यत्र सापडायचे नाहीत. एक मात्र आहे, पसंती मरगीनू एन्डूलाच. कोंबडीचेच अंडे. बदक, शहामृग यांची अंडी पारसी स्वयंपाकघरात यायची नाहीत.

पारसी सामिष भोजन हे महाकाव्य मानले तर त्यात धनशाक, जर्दालू मा गोश्त, पातरा नी मच्छी, चिकन फरचा, सास नी मच्छी, सल्ली मरगी, कोलमी ना कबाब, चिकन कटलेट, सास नूं गोश्त हे प्रमुख अध्याय. वेगना मा गोश्त (भरताची वांगी + मटन), तुरिया ना झिंगा (घोसाळी + कोलंबी), सल्ली बोटी, पटेटा झिंगा ना कटलेट (बटाटा + कोलंबी) अशी उप-कथानके साथीला.

पैकी चिकन फरचा म्हणजे American southern fried chiken चा भारतीय+ पारसी मसाल्यातला भाऊबंद. मसाले थोडे वेगळे. पातरा नी मच्छी म्हणजे केळीच्या पानात (पात्रा) गुंडाळून वाफेवर शिजवलेले ताज्या हिरव्या वाटणातले पापलेट मासे (promfrets). लग्नाच्या मेजवानीत पातरा नी मच्छी मस्ट. नॉन निगोशियेबल.

जर्दालू मा गोश्त / जर्दालू मा मच्छी / जर्दालू मा मरगी या सर्वात fruit + meat ही खास इराणी जोडी आहे. हे पदार्थ शेकडो वर्षांपूर्वी इराणमधे असतांना जसे केले जात अगदी तसेच्या तसेच आजही पारसी बावा लोकांच्या किचनमधे होतात. कुठलाच स्थानिक- गुजराती - भारतीय प्रभाव न पडलेल्या पाककृती. चिकन किंवा मटनात सौम्य मसाल्याच्या ग्रेवीत गोडसर जर्दाळू हे कॉम्बो भारतीय जिभेला फार आवडण्यासारखे नाही. बावा लोक मात्र खास जातीवंत जर्दाळू (Hunza apricots) आयात करून मागवतात, जीव टाकतात त्या विशिष्ट चवीसाठी. बेरी पुलाव असाच एक fruit + meat असलेला मुंबईल्या काही रेस्तरांमधून मिळणारा प्रकार. फ्रूटी - आंबट- गोडसर चवीचा.

वर अनेकदा आलेल्या “सल्ली” शब्दावर अडखळलात ? सल्ली म्हणजे बटाट्याची शेव, आलू भुजिया आणि फ्रेंच फ़्राइज़ चा पारसी चुलतभाऊ. पदार्थांना कुरकुरीतपणा - क्रंच - टेक्स्चर प्रदान करणारा कलाकार. नुसतेच हाय प्रोटीन पौष्टिक हेल्दी खाणे होऊ नये म्हणून या तळलेल्या बटाटा आयटमची योजना असावी. What’s the point in missing all the fun of eating some fried, starchy junk food? पुलाव, चिकन, मटन, एन्डू, ऑमलेट, कटलेट, मासे अशा सर्व ग्रेवीयुक्त किंवा कोरड्या पदार्थांवर ह्या बटाट्याच्या कुरकुरीत सळ्या टाकून त्यांचे “सल्ली” वर्जन तयार करण्यात येते.

“धनशाक” मात्र पारसी भोजनाच्या ह्रदयस्थानी आहे. म्हटले तर एकप्रकारे मिक्स दाल, भाज्या / मटन घातलेले स्ट्यूच. पण एखाद्या पारश्यासमोर हे म्हणून दाखवा, बावा तुमचे दात घश्याखाली घालायला कमी करणार नाही. Bawas may get violent Happy

धनशाक आणि ब्राउन राइस/ caramelised onion rice हे निवांतपणे रांधा-वाढायचे पदार्थ. Slow cooking चा वस्तुपाठच. करतांना घाई चालत नसल्याने धनशाक हमखास रविवारचा लंच मेन्यू आणि एका घरात केला तर कुटुंबकबिला, शेजारीपाजारी सर्वांनी भरपेट खाऊन वर संध्याकाळी खायला उरेल इतक्या प्रमाणात करायचा असा नियमच आहे. त्यात प्रत्येक घराची पद्धत, वापरायच्या डाळी, वापरायचे अन्य जिन्नस, त्यांचे प्रमाण, मसाले वगैरे वेगवेगळे. त्यामुळे एकाच चवीचे धनशाक दोनदा खायला मिळणे फक्त रेस्तरां मधे किंवा त्याच बावाच्या घरी घडेल याची खातरी. धनशाक शाकाहारी आणि मांसयुक्त असे दोन्ही प्रकारे करतात. मटन खिमा वजा केला तर शाकाहारी, आणि टाकला तर बावा खुष. सांबर किंवा सिंधी कढीत असतात तश्या भरपूर भाज्या धनशाकमधेही असतात पण डोळ्यांना एकही तुकडा दिसेल तर शपथ. घोटून घोटून एकजीव केलेल्या भाज्या / मीट असल्याने आणि मंद आचेवर भरपूर वेळ घेऊन शिजवल्याने धनशाक दाटसर, स्मूद असते. त्याचे लग्न ब्राउन राइसशी आधीच लाऊन देण्यात आले आहे. Caramel water मधे हा भात शिजवतात त्यामुळे त्याला एक विशेष रंग, गंध आणि चव प्राप्त होते. शिजवायलाही भरपूर वेळ लागतो आणि भात शिजत असतांना त्यातले अधिकचे पाणी धनशाकमधे घालणे हे मस्ट (प्रेशर कुकर वापरणे अब्रह्मण्यम़्). वरून खरपूस तळलेले कांद्याचे काप पखरून त्याची चव खुलवणे हे बावा बल्लवांचे आवडते काम.

7ae5a7e0-b7d6-4aba-a17b-1f6d0cbb9a6d.jpeg

पारसी समाजात धनशाकचे फार कौतुक असले तरी नवरोज़चा सण असेल किंवा नवीन जावई जेवायला येणार असेल तर अशा मंगलप्रसंगी मात्र धनशाक रांधू नये असा संकेत आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात काही भागात जावई-सोयरे आले असता पिठलं करत-वाढत नाहीत तसेच. पारसी घरात कुणी मयत झाल्यावर तीन दिवस चूल पेटवू नये, शेजारघरातून आलेली खिचडी खावी आणि चौथ्या दिवशी शुद्धीकरणाचा - शोक समाप्तीचा संकेत म्हणून घरात धनशाक + भात रांधून सर्वांनी खावा अशी जुनी प्रथा.

d9fac93d-9688-4bca-b8f2-30394c57c10a.jpeg

स्थानिकांच्या खाद्यसंस्कृतीचा मोठा प्रभाव पडलेले प्रमुख पदार्थ म्हणजे लोणची, पापड आणि चटण्या. पारसी भोजनात यांची रेलचेल असते पण चव मात्र गुजराती / अन्य भारतीय चवीपेक्षा वेगळी. अर्थात कृती आणि घटक वेगळे असल्याने तशी चव गाठता येते. वरण-भात किंवा खिचडीसोबत पापड आणि लोणच्याच्या फोडी हे बावा घरातले आवडीचे खाणे गुजराती घरांपेक्षा वेगळे नाही. पण पारसी लोणच्यांचे वैशिष्ट्य म्हणजे व्हिनेगरचा वापर. त्याने एक शार्प- जिभेला चरचरणारी चव येते. कैरी, लिंबू, भोकरं यांची व्हिनेगरमधली लोणची तर करतातच पण मेवा नू अचार (सुक्या मेव्याचे / Dry Fruit Pickle), आलूबुखारा नू अचार, मरगी (boneless chicken) नू अचार, सुक्का बोंबलाना पाटीया (बोंबील मासे वापरून), कोलमी नू अचार (कोलंबीचे लोणचे) आंबाकलियो (shredded mango), अख्ख्या कांद्याचे, मनुका+गाजराचे, कार्नबेरी + सफरचंदाचे, कोहळ्याचे तिखट लोणचे आणि गोड मुरांबा, जर्दाळूचे लोणचे हे खासे पारसी चवीचे मानदंड.

पारसी तीर्थस्थळे असलेल्या उदवाडा-नवसारी भागातले बल्लव कमलकाकडी (Lotus stem)चे, लसूणपातीचे तसेच गोड्या पाण्यातल्या झिंग्यांचे “सून्ध” (हे फिकट निळ्या रंगाचे झिंगे तिथली खासियत) वगैरे लोणची बनवणारे एक्सपर्ट समजले जातात आणि त्यांना वर्षभर मागणी असते.

खूप पातळ लाटलेले राइस पापड, उडदाचे मिरेयुक्त पापड, मिरगुंडासारखेच पण फिके आणि लांब कापडी चिंध्यांसारखे दिसणारे पापड, लाल गहू- हातसडीचे तांदूळ एकत्र वापरून केलेले पापड, खीचा पापड असे अनेक प्रकार पारसी घरात आलटून पालटून असतात. पापड मात्र तळूनच खावे, भाजून नाही हा दंडक. लग्नाच्या भोणूसाठी ३-४ प्रकारचे पापड असतातच.

दुपारच्या चहाची वेळ म्हणजे पारसी बेकरी पदार्थांचा पर्वणीचा समय. मावा नू केक, केशर, बदाम आणि घट्ट दही वापरून केलेला 'कुमास', दार नी पोरी सारखी गोड पेस्ट्री, साधना (वाफेवरचा राईस केक सदृश्य पदार्थ) केरकरिया (kind of deep fried Biscuits), पोपलीजी (soft bun केक्स), घारी (अतिशय गरिष्ठ तूप-मेव्याची मिठाई), चिकन किंवा बटाटा भरलेले पॅटिस/ बेक्ड समोसा, मलाई ना खाजा (cream-filled phyllo), खारी, बटर बतासा, नानाविध प्रकारचे केक, रोटला नो मलीदो, कोपरा ना पॅनकेक, अनेक प्रकारचे सॅन्डविच असा साग्रसंगीत हाय टी प्रकार. नुसत्या चहाला बोलावले तर बावा घरात वरीलपैकी किमान पाच -सहा पदार्थ टेबलावर सुंदर क्रोकरीत मांडलेले असणार.

80274539-736e-43df-836d-fbc655d4d5f8.jpeg

इराणी पारसी नववर्ष (जमशेद नवरोज़ - Spring Equinox) २१ मार्चला सुरु होते. थंडीचे दिवस संपून नवीन धान्य, फळे-फुले, भाज्या मिळायला सुरूवात होण्याचा, सृष्टीच्या नवसृजनाचा सोहळा. यादिवशीच्या मेजवानीला गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेले रोज मिल्क / फालूदा प्रमुख पाहुण्याच्या भूमिकेत दिसतो.

67ac1857-66fe-4515-988b-6ca454947108_0.jpeg

नवरोजसाठी सजवलेल्या टेबलावर अनेक प्रकारचा सुकामेवा आणि “स” / “श” अक्षराने सुरुवात होणाऱ्या शुभ वस्तूंची दाटी असते. शरबत, शकर (साखर), शीर (दूध), शेम (मेणबत्ती), शराब (मद्य), सिरका (व्हिनेगर), सिक्का (नाणे) सीब (सफरचंद) सुझान (सुईदोरा), सौजी (हिरवी पालेभाजी), सोपरा (table cloth) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शीशा (आरसा). आरश्यात स्वत:ला बघून आणि सीख कबाब + नान खाऊन, आणि पसंतीप्रमाणे शीर (रोज़ मिल्क) किंवा शराब चा घोट पिऊन नववर्षाची सुरुवात करणे असा मुख्य कार्यक्रम. (काही पारसी पंचांगांप्रमाणे नवरोज ऑगस्ट महिन्यात येतो. महिना वेगळा, बाकी सर्व सोहळा सेम टू सेम.)

71899f25-228b-43ca-ae1a-369b35397136.jpeg

पतेती म्हणजे सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस. त्यादिवशी वर्षभरात झालेल्या चुकांची कबुली, क्षमाप्रार्थना आणि क्षमादान असा काहीसा reflective, sombre गंभीर माहौल असतो. खाणेपिणे साधे. पतेतीच्या आधी तीन दिवस “खिचडी डिटॉक्स” ची गमतीशीर परंपरा काही कुटुंबात पाळतात. तीन दिवस मद्य, मीठ, साखर, मांसाहारापासून दूर राहून सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त सरबरीत खिचडी खाऊन पोटाला आराम देणे, स्वच्छता- system cleaning करणे हा वार्षिक कार्यक्रम. घरात मृत्यू झाला तर असेच त्रिदिवसीय खिचडी डिटॉक्स करतात.

नवसारी, संजान, उदवाडा ही गुजरातमधील गावे झोराष्ट्रियन पारसी समाजाची पुरातन काळापासूनची तीर्थस्थळे आहेत. मुंबईतल्या / भारतातल्या एकूण एक पारसी माणसाचा एकतरी नातेवाईक मूळचा इथला असतोच. शिवाय नवसारी “धरम नी टेकडी” तर उदवाडा- संजान “इरानशाही आतष” म्हणजे इराणहून आणलेल्या मूळ पवित्र अग्नीचे स्थान म्हणून परमपवित्र स्थळे मानली जातात. आयुष्यात एकदातरी या स्थानांना भेट देण्याची परंपरा आहे. या गावातून अजून काही जुने पारसी सण - परंपरा जिवंत आहेत. त्यात “ आवा महीनो / आवा रोज” ( Birthday / Birth month of Water) अदर महीनो / अदर रोज ( Birthday / Birth month of holy Fire) असे सण साजरे करतात, त्यासाठी विशिष्ट खाद्यपदार्थ तयार करणे आणि सर्वांनी एकत्र येऊन ते खाणे हा समान धागा. पैकी “बामन महीनो” किंवा “बामन रोज” साठी खिचडी महोत्सव होतो. लहान पारसी मुले दारोदारी जाऊन भिक्षा म्हणून खिचडीसाठी लागणारे जिन्नस गोळा करतात. त्यांच्या झोळीत ते देण्याआधी पाण्याच्या घागरी मुलांवर ओतून त्यांना ओलेचिंब केले तर त्यावर्षी भरपूर पाऊस पडतो अशी श्रद्धा आहे. सर्वांकडून मिळालेला शिधा एकत्र करून खिचडी तयार करून भरपूर तूप टाकून खाणे हा सामुदायिक खिचडी महोत्सवाचा शेवट.

नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि गोडधोड नाही असे होऊच शकत नाही. मलीदो, बदाम पाक, अघारनी ना लाडवा, रावो, पर्शियन टूट, मावा केक, जर्दाळू+ बदाम केक, मकरून्स, कोपरापाक, लगन नू कस्टर्ड, मलाई ना पफ, दूध पफ, खजूर+ अक्रोड केक, दार नी पोरी, मदैरा, क्रीम शेरी, सुत्तरफेणी अशी अनेक पक्वान्ने हजर असतात.

मासोळी झोराष्ट्रीयन पारसी परंपरेत शुभलक्षण आहे. पण मत्स्याहारावरचे प्रेम दर्शवण्यासाठी अट्टल मासेखाऊ पारसी बावा लोक नववर्षाच्या मेजवानीत शुद्ध शाकाहारी मासोळी खातात, खिलवतात !!!

126eba1e-e751-4a78-9a4a-95080d41a133.jpeg

बदाम नी बोई - माश्यांचा आकार दिलेली बदाम + दुधाची मिठाई.

603508f6-7773-4ca4-9843-6269bc6203c0.jpeg

बदाम नी बोई किंवा तिचे अन्य रूप मंगल प्रसंगाच्या पंक्तीला दिसतेच.

वरील वर्णन वाचून पारसी फूड खावेसे वाटले तर :

पारसी भोणू साठी मुंबईत सर्वांत जास्त पर्याय आहेत. इराणी-पारसी मालकीच्या शंभर वर्षापेक्षाही जुन्या बेकरीज आणि रेस्तराँ अजून मुंबईत आहेत. फोर्ट भागातली याझदानी, कॅफे मिलिटरी, ब्रिटानिया, कॅफे एक्ससेल्सिअर, जिमी बॉय ही काही जुनी नावे. कयानी एन्ड कंपनी (मरिन लाईन्स), Sassanian Cafe (मरिन लाईन्स), दादरचे कॅफे कॉलनी हे आहेतच. जालावर यांच्याबद्दल चांगले-वाईट रिव्ह्यूज आणि रील्स आहेत. सावधगिरीचा इशारा म्हणजे ही सर्व इराणी-पारसी रेस्तराँ चालक -मालक मंडळी सध्या ग्राहक, दर्जा आणि आपला पारसी ठसा टिकवण्यासाठी धडपडत आहेत. मुंबईतले एकापाठोपाठ एक इराणी-पारसी रेस्तराँ बंद पडत आहेत किंवा त्यांचे वेगाने उडपीकरण-पंजाबी ढाबाकरण होत आहे.

धनिक पारसीजनांचा आर्थिक आधार लाभलेले RTI चे पारसी किचन ( Hughes Road ) आणि दादरच्या पारसी कॉलनीतले पारसी कँटीन मात्र अजूनही चांगल्या प्रतीचे आणि authentic पारसी फूड ग्राहकांना देत आहेत, त्यांच्याकडे बघायला हरकत नाही. दर्जा, सेवा, चव, उत्तम अनुभवासाठी महालक्ष्मी रेसकोर्सचे Gallops पर्सनल फेवरेट, दर चढे. प्रसिद्ध पारसी डेअरीची मरीन लाइन्स आणि मुंबईत अन्यत्र असलेली outlets “छोटी भूक” भागवण्यासाठी + मिठायांसाठी योग्य. याव्यतिरिक्त पारसी नवरोज वगैरे प्रसंगी झोराष्ट्रियन मंडळांतर्फे आयोजित केलेले फूड फेस्टिवल एक चांगला पर्याय आहे. सी फूड वगळता अन्य प्रसिद्ध पारसी पदार्थांचे शाकाहारी व्हर्जन उपलब्ध असते. अंडेसुद्धा चालत नसले तर अजून कमी पर्याय असतात, पण असतात.

6bda0521-ea5f-48f2-8e28-af91142a80d7_0.jpeg

(उपलब्ध जिन्नस वापरून आज घरी केलेले poor man’s व्हेज धनशाक + पुलाव)

नवसारी, संजान, उदवाडा वगैरेला कुणी मुद्दाम भेट देण्याची शक्यता फारच कमी, म्हणून तिथल्या Eateries बद्दल लिहिले नाही.

लेखासाठी वापरलेले संदर्भ :

1} माझा बावा मित्र होमी, त्याची शेफ बहीण लैला, त्यांची आई, मावशी शिरीन भगवागर आणि तिची 'गर्ल गॅंग' (म्हाताऱ्या कोण म्हणतंय रे तिकडं?) यांच्याशी वेळोवेळी झालेल्या दीर्घ गप्पा

2} मुंबईतल्या आणि गुजरातमधील उदवाडा, संजान, नवसारी, खरच आणि भरूच या शहरातल्या ओळखीच्या / अनोळखी-अनाम पारसी स्त्रीपुरुषांनी वेळोवेळी भरभरून दिलेली माहिती

3} रतन टाटा इन्स्टिट्यूट (RTI) मुंबई, लेडी नवाजबाई टाटा ट्रस्ट, स्त्री झरतुष्टी मंडळ द्वारा संचालित किचनचा स्टाफ आणि शेफ, मुंबईत अजून तग धरून असलेल्या काही इराणी रेस्तराँचे मितभाषी/ खडूस मालक आणि त्यांचा बोलका स्टाफ यांच्याशी वेळोवेळी झालेल्या खाद्यचर्चा

4} बाई मेहेरबाई जमशेदजी वाडिया लिखित पारसी पाककृतींचे पुस्तक 'विविध वाणी' आणि त्यावर आधारित पाककृतींचे रीटाबेन चे पुस्तक + अन्यजणांचे लेख.

5} An Invitation to Feast: A Deep Dive into India’s Culinary Treasures’ हे सोना बहादूर यांचे पुस्तक.

6} स्वतःचे आणि मित्र-कुटुंब गोतावळ्याचे प्रत्यक्ष खाद्यानुभव + गिचिडमिचिड हस्ताक्षरात लिहिलेल्या स्वतःच्या नोट्स. Actually, पदार्थांची करेक्ट नावे / उच्चार चुकल्यास दोष देण्यासाठी तयार ठेवलेली दूरदर्शी व्यवस्था)

* * *

काही महत्वाचे :

हा लेख फक्त 'मायबोली' संस्थळासाठी लिहिला आहे, अन्यत्र कुठेही पूर्वप्रसिद्ध केलेला नाही. लेख किंवा लेखातील कोणताही भाग अन्यत्र वापरण्यास मनाई. लेखातली माहिती- उतारे जालावर, छापिल पानावर अन्यत्र दिसले तर कन्टेन्ट ढापनेवाले का मूं काला.

लेखातली काही चित्रे माझी तर काही जालावरून साभार.

मानव पृथ्वीकर आणि सिमरन या मायबोलीकरांनी दिलेले प्रोत्साहन खूप दिवसांपासून अपूर्ण राहिलेला हा लेख पूर्ण करण्यासाठी कारण ठरले, त्याबद्दल दोघांचे आभार. सुमारे ३००० शब्दांचा लेख बोअर झाल्यास ते न्यून मात्र माझे समजावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ अनया, कोमी कपूर ह्यांच्या लेखाबद्दल थँक्यू. It was a nice read.

@ भारतातला सोडा वॉटर उद्योग आणि पारसी बावाजी यांचे नाते फार जुने.

याबद्दल एक उत्तम लेख 👇

https://www.bbc.com/news/world-asia-india-51942067

सध्या लेखात उल्लेखलेला “अदर महीना” सुरु आहे आणि आज त्याचा सातवा दिवस “अदर रोज” म्हणजेच अग्नीचा बड्डे आहे.

पारसीजन आज अग्यारीत जाऊन प्रार्थना, तिथल्या पवित्र अग्नीला चंदनाची लाकडे वाहणे वगैरे करतातच पण घरातला अग्नी म्हणजे स्वयंपाकघरातील चुली, शेगड्या, बर्नर्स स्वच्छ करून, त्यांना फुले वाहून वर्षभर शिजवलेले अन्न खायला मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम घराघरात पार पडतो.

# Birthday of Fire - अदर रोज
# Parsi Food Traditions

Update @ Jimmy Boy

(विशेषत: माझेमन, मोद, सावली यांनी जिम्मी बॉयची आठवण काढल्याने)

मागच्या २० जून ला (२०२५) शताब्दी साजरी होण्याच्या काही दिवस आधीच बंद पडलेले दक्षिण मुंबईतले “जिम्मी बॉय” लवकरच परत सुरु होईल असे वाटत होते. आता मात्र परत त्याच जागी रेस्तरां सुरु होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिट नंतर ती पूर्ण इमारतच मुंबई पालिकेनी “धोकादायक/ structurally unsafe” घोषित केलीय. लवकरच ती १३० वर्ष जुनी इमारत पाडण्यात येणार किंवा अन्य उपायांनी सुरक्षित करण्यात येईल. वर्षानुवर्षे १ रुपया भाडे देणारे भाडेकरू, जुनी पागडी पद्धत, नाराज मूळ मालक, हाउसिंग सोसायटी, मुंबई हेरीटेज कमेटी असे सर्व रसायन.

Meanwhile Jimmy Boy च्या मालक बावा मंडळींनी दोन कामे केलीत:

१} त्यांच्या माहिमच्या क्लाउड किचन मधून झोमेटो - स्विगी वगैरे कडून घरपोच सेवा + टेक अवे

आणि

२} नेव्हीनगर कुलाबा इथल्या Olive Green Cafe मधे आपले काही पदार्थ (mostly signature bakery products) विकण्याची सुरुवात.

इच्छुकांनी लाभ घ्यावा.

अरेरे…. पण माहिम येथून सेवा सुरू केली आहे ही दिलसदायक बाब आहे. मध्यंतरी माहिम येथील cafe Irani chai येथे जाणे झाले. खिमा पाव अप्रतिम होता. मेन्यू कार्ड मध्ये अथिती देवो भव असे म्हणून foreigners ना १०% सूट असे म्हटले होते ते वाचून मौज वाटली . मिया मोहम्मद रोड वर आहे हे.

माहिमच्या कॅफे इराणीला +१

पण ह्याचे मालक पारशी नाहीत तर शिया मुसलमान समाजाचे आहेत. कॅफे छोटेखानी पण सुंदर शिसवी लाकडाच्या (किंवा सदृश्य) पट्ट्या वापरून घडवलेले इंटिरिअर असणारा आहे.

कॅफे मध्ये शिरताच उंचीवर एका लाकडी पट्टीवर एकीकडे गांधीजी अन् दुसरीकडे पहिले आयातुल्ला ह्यांचे फोटो आहेत, भारत आणि इराणचे राष्ट्रध्वज आहेत आणि "जियो पायंदे" असे काहीसे रोमन स्क्रिप्ट मधे लिहिले आहे खाली उपलब्ध इंग्रजी भाषांतरानुसार त्याचा अर्थ "लाँग लिव्ह ईरान इंडिया फ्रेंडशिप" असा होतो.

ह्या कॅफे मध्ये सकाळी ब्रेकफास्ट टाईम मधेच रात्रभर शिजवलेली उत्तम निहारी नल्ली मिळते (हिच्यासोबत पावाच्या ऐवजी कडक ब्रुन खावे हे आमचे वैयक्तिक रेकमेंडेशन)

असाच एक कॅफे लाईट ऑफ पर्शिया नावाने आहे तो पेडर रोडवर स्थित आहे (लता मंगेशकरांच्या प्रभूकुंज इमारतीचे चौक आहे त्याच्या अलीकडे महालक्ष्मी/ हाजीअलीकडे जाणाऱ्या लेन मध्ये) कॅफे छोटाच आहे मालक शिया आहेत पण आजकाल धंदा कमी असल्यामुळे त्यांनी लंच थाळी इत्यादी सोबत कढई बडवून तयार केलेले चायनीज इत्यादी पण ठेवले आहे. जेवणाची मजा थोडी कमीच पण त्यांच्याकडे अजूनही खास ईरान मधून आयात केलेला एक गाझ (Gaz) नावाचा प्रकार मिळतो चॉकलेट/ टॉफी श्रेणीतला, त्याचे texture थोडेसे मार्शमेलो सारखे असते आणि चॉकलेट रॅपर मधे तो प्रकार विकला जातो (वीस रुपये पीस) त्याची भरलेली बरणी कायम मालकाच्या काउंटर वर असते, पर्शियन कॅलिग्राफी मध्ये पवित्र धर्मवचने सिंहाच्या आकारात लिहिलेला एक चांदीचा फलक तिथे मालकाच्या मागे लावलेला असे त्यावरून मालक मंडळी इस्माईली शिया उपपंथाची साधक असावी असा आमचा बाळबोध कयास आहे.

परवा पुण्यात कॅम्पात आणि बाणेरला इराणी कॅफे पाहिले. ठराविक डेकोर पाहून फ्रँचायझी असावेत असे वाटले. पण दोन्ही वेळेला जाऊ शकले नाही.
पुणेकर मंडळींनी जरा मनावर घ्या तिथे जायचं.
https://www.localguidesconnect.com/t/irani-cafe-where-chai-is-a-traditio...

@जेम्स वांड हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हॉटेल चे मालक मुस्लिम असावेत. बादवे तुम्ही ज्याचा उल्लेख केला आहे त्या चॉकलेट वर गुलाबाच्या (सुकलेल्या) पाकळ्यांची पाखरण असते का? असे चॉकलेट पुण्याच्या इराणी कैफ़े (कॅम्प मधल्ये- ब्लू नाईल च्या जवळचे) इथे आणि मुंबईत क्रॉफर्ड मार्केट मधल्या चॉकलेट च्या दुकानात बघितले आहे.

मोद

होय, मी दोन फ्लेवर ट्राय केले आहेत पहिला प्लेन म्हणजे त्यात बबल गम फ्लेवरिंग (बहुतांशी कृत्रिम) होते आणि दुसरे तुम्ही म्हणता तसे रोज फ्लेवर होते आणि त्यावर सुकवलेल्या देशी गुलाबाच्या पाकळ्या चिकटवल्या होत्याच शिवाय पोटात पण गुलाब पाकळ्या होत्या, ते जास्त बेटर वाटले होते मला.

ईरानी कॅफे मध्ये जवळपास २५-३० नियमांची एक सणसणीत नियमावली आहे, अगदी पुणेरी पाट्यांचा तेजोभंग व्हावा इतकी जबरदस्त, टेबलावर बसून केस विंचरू नये, बेसिन मधे गुळण्या करताना चित्रविचित्र आवाज काढू नये ह्या typical तर होत्याच त्याशिवाय सायकलिस्ट मंडळींना खास सवलत जाहीर केलेली आहे २४/३६५, भारताच्या स्वातंत्र्यदिनी खास सवलत, ईरानी इस्लामिक क्रांतिदिनी सार्वत्रिक खास डिस्काउंट, असे बरेचसे मजेशीर प्रकार पण होते तिथे.images (39).jpegcnqg9bp8_irani-cafe-menu-rules-viral_625x300_08_January_25.jpgwp-1580640124454.jpg

पहिल्या फोटोत वरती गांधीजी खोमेनी आणि भारत ईरान राष्ट्रध्वज विराजमान दिसतील.

दुसऱ्या फोटोत सगळे नकार नियम (कॅशियर सोबत flirt करू नये असाही नियम आहे ह्याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स !

आणि तिसऱ्या फोटोत डिस्काउंट आहेत

१५ ऑगस्ट - १५%
२६ जानेवारी - २६%
इस्लामिक क्रांतिदिनी - २२% (त्यांची कुठलीशी २२ तारीख पडते ती म्हणून) आणि सायकलिस्ट मंडळींना कायम १०%

असो

अनिंद्य दादांच्या ताजमहाल लेखनाला आम्ही संगमरवर लावण्याच्या ऐवजी आम्ही भलताच फाटा धरला ईराणी संस्कृतीचा.

असो, पण लेखन विषयाला प्रमाणिक राहून प्रतिसाद द्यायचा म्हणले तर चार शब्द आमच्या लाडक्या सासानियन कॅफे अँड बोलांजरी (स्थापना १९१३) बद्दल बोलणे क्रमप्राप्त असेल.

तुफान जेवण, सोबत पालोनजी कंपनीचे रासबेरी, लेमन आणि आईसक्रीम फ्लेवर (प्लेन व्हॅनिला फ्लेवर) सोडा ह्यांच्याकडे खास मिळतो. काऊंटर वर बसलेली म्हातारी आंटी (एकदा तिला आगाऊपणे विचारले होते आंटी तुम्हारा नाम परिजाद है क्या ? त्यावर मुरका मारून हसत म्हातारी ने आम्हाला चाल नी भोसडीना रोज चा कालो पिवसो अने स्वीट वातो करसो डांबिस डिकरा असा अस्सल अन् अट्टल पारशी रसिक आशीर्वाद दिला होता)

ह्या हॉटेल मधे पारशी समाजाची आपली भूमी सोडून परागंदा होण्याची व्यथा ठळकपणे दिसते. इथेच पंख्याच्या पातळीत उभ्या भिंतींवर, फायर टेम्पल ऑफ याझद, सासानियन पॅलेस, इत्यादी कैक पर्शियन चिन्हे अन् ओघळत्या आठवणी आहेत.

काही चित्रे (जालावरून साभार)

8224377_store_images_2.jpg0200212.jpgimages (43).jpeg

… जिमी बॉय परत येणारच नाही का?…

त्याच जागी त्याच रूपात येण्याची शक्यता शून्यवत आहे.

….इराणी कॅफे फ्रँचायझी असावेत असे वाटले ….

बरोबर, Irani Cafe या चकाचक चेन चे मालक झोराष्ट्रीयन पारसी नसून अन्य इराणी मंडळी आहेत. दोघांची मातृभाषा मात्र “दारी”च. खाद्यसंस्कृतीत सुद्धा overlap आहे.

@ जेम्स,

तुमच्या प्रत्यक्ष अनुभवांची सचित्र पोस्ट आवडली. 👍

मरीन लाइन्स चे सासानियन कॅफे अँड बोलांजरी आणि अमरपट्टा घेऊन आलेल्या म्हाताऱ्या मालकिणीचा किस्सा धमाल 😀

लाईट ऑफ पर्शिया आणि अन्य काही रेस्तराँबद्दल वाचक लिहितील म्हणून लेखात उल्लेख केला नव्हता. पुणेरी पाट्यांचा तेजोभंग करणारी नियमावली = 😀

Correct me if I'm wrong, पण

"पारसीजन आज अग्यारीत जाऊन प्रार्थना, तिथल्या पवित्र अग्नीला चंदनाची लाकडे वाहणे वगैरे करतातच"

मला वाटते ती लाकडे चंदनाची नसतात (ईरान मध्ये चंदन झाड आढळते का नाही मला कल्पना नाही) तर एका विशिष्ट जातीच्या बाभळीची असतात असे ऐकल्याचे स्मरते. आतश बेहरामचा पवित्र अग्नी कधीच विझू शकत नाही कारण एकतर तो पवित्र इरानशाह मधून निघालेला आहे आणि तो जर विझला तर परत तो पवित्र अग्नी तयार करणे खूप खडतर असते कारण त्यात पाच प्रकारचे विस्तव लागतात त्यातील चार तर लोहार, सोनार व कुंभाराच्या भट्टी मधील असतात, चौथा आठवत नाही अन् पाचवा सगळ्यात कठीण म्हणजे आकाशातील वीज एखाद सुक्या झाडावर कोसळून लागलेल्या आगीतला विस्तव लागतो म्हणतात.

मी असे ऐकले होते की वरील कारणामुळे ते अग्नी विझू नये म्हणून सधन धनाढ्य पारशी शेकडो एकरची फार्म हाऊस बांधतात, पण त्यातील एक कोपरा किंवा विशिष्ट प्लॉट ह्या खास बाभळीच्या लागवडीसाठी राखीव ठेवतात.

आपल्याकडे जसे गणपती मधे कॉलनी मधील एक एक घर एक एक दिवस पूजा वाटून घेते तसेच त्या बाभळीच्या लाकडांचा अविरत पुरवठा मुंबई/ भारतातील सगळ्या अग्यारी मध्ये करण्याची जबाबदारी दर वर्षी वेगवेगळ्या कुटुंबाकडे असते पक्षी ह्या वर्षी टाटा, पुढच्या वर्षी गोदरेज मग शापूरजी असे काहीसे.

माहिती ऐकीव आहे त्यामुळे विस्कळीत असू शकते किंवा चुकीचीही असू शकते हे शिस्तीत जाहीर करून टाकतो.

image_b63af4b5 (1).png

ए आय नुसार हे असे आहे , डेटा मी धरून infographic मध्ये बनवून घेतला Gemini करवी.

'आतश'वरून आठवले. हा फारसी शब्द आपल्याकडे आतिष या स्वरूपात किती सहज रुळलाय. इराणसंबंधी वाचताना असे कित्येक शब्द ठायीठायी भेटतात.

@ जेम्स,

नवीन माहितीबद्दल थँक्यू.

… बाभळीची लाकडे ….

असतील, नो आयडिया. अग्यारी मधे नॉन पारसींना प्रवेश नसतो म्हणून प्रत्यक्ष बघितले नाही कधी पण अग्यारीबाहेरच्या दुकानामध्ये चंदनाची लाकडे विकायला असतात, आपल्याकडे हार, फुले, देवीच्या ओटीचे साहित्य असते तसे. ती आत पवित्र अग्नीला अर्पण करतो असे ओळखीतल्या पारसीजनांनी सांगितले आहे.

या multi purpose दुकानांमधे मात्र आपल्याला मुक्त प्रवेश. पक्के व्यापारी. एमना बिझनेस अने धरम सेपरेट छे 😀

अनिंद्य भाऊ

बरोबर आहे, ते चंदन टाकतात पण ते सुद्धा स्वतः टाकता येत नाही, त्या पुजाऱ्याच्या हातात द्यावे लागते तो टाकतो असे पण ऐकले आहे.

चौथा विस्तव रोट्या भाजणाऱ्याच्या भट्टीतला (बेकरीच्या भट्टीतला) असे आत्ता पुसट आठवले.

.. पुजाऱ्याच्या हातात द्यावे लागते …

हे राम ! इथेही सोवळे !

… कित्येक शब्द ठायीठायी भेटतात…

+ १

होय, फारसीतून मराठीत आलेल्या शब्दांची संख्या मोठी आहे.

हे राम ! इथेही सोवळे !

पारशी समाजात हे एक विशेष feature आहे, वैयक्तिक धर्मात प्रचंड कट्टर असणार लोक.

तसे पाहता धागा अतिशय सुहृद समेवर आहे एकंदरीत पण सांगायचा मोह आवरत नाही की पारशी भरभराट मुंबईत झाली तिला पारशी समाजाची मेहनतीची शंभर टक्के मातब्बरी ! पण एकंदरीत त्याला बळ मिळाले ते त्यांच्या चीन मधील अफू व्यापारातील भागीदारीत. ते इथे थोडे वाचता येईल

असे म्हणले जाते की गारा शैलीतील एम्ब्रॉयडरी (टिपिकल पारशी साड्यांवर दिसणारी) भारतात आली तीच चीन मध्ये अफूचा व्यापार करायला जाणार पारशी व्यापाऱ्यांच्या हस्ते (पण सध्या त्याचे काही असे proof माझ्यापाशी नाही) पण गारा जरी कामाचा खालील नमुना बघितला तर अतिशय ठळकपणे त्याचे उगमस्थान लक्षात येते, पक्षी, पाने, फुले आपल्या वातावरणातील अन् माहितीतील बदलले गेले पण एकंदरीत motif pattern चिनी असल्याचे सहज म्हणले जाऊ शकते.

parsi-embroidery-services.jpg

गारा साड्या is love. ऑथेंटिक साडी कुठे (आणि बजेटमध्ये) मिळेल याच्या शोधात आहे मी. चिनी ओरिजिनची गोष्ट खरी आहे.

त्या पुजाऱ्याच्या हातात द्यावे लागते तो टाकतो असे पण ऐकले आहे....... दस्तुर्जींचे सोवळे असेल.

गारा साड्या is love. .... छान दिसतात.खूप पूर्वी हरकिसनदास हॉस्पिटल( आताचे रिलायन्स) समोरच्या दुकानात या साड्या लावलेल्या असायच्या.पुढे कामा बागेकडे जायच्या आधीच्या रस्त्यावril दुकानात ह्या साड्या आणि बॉर्डर्स पहिल्या आहेत.

केचप ते पण हॉटेल मधले म्हणजे औद्योगिक पातळीवर निर्मित लाल भोपळ्याचे गरगट असे ऐकले होते, plus त्यात सायट्रिक ऍसिड आणि/किंवा व्हिनेगर अधिक स्टेबिलायझर्स वगैरे इतके ओव्हर पॉवरिंग असते की पदार्थाची मूळ चव गडप होते, असे वाटते.

मी अ ति चिकनट चवीच्या चिकन डिशेस खाल्लेल्या आहेत. अजिब्बात आवडत नाहीत. त्यामुळे केचप हे वरदान आहे असे वाटते.

आपापली आवड मला तर उक्कड आवडते खायला, नुसते हळद मीठ लावून उकडलेले चिकन. आमच्या एका मित्राने एकदा हळद मीठ तंदुरी खाऊ घातले होते, नुसते हळद अन् मीठ लावून मॅरीनेट केलेली कोंबडी पण अद्वितीय चव, अर्थात ते ब्रॉयलर नव्हते तर फ्री रेंज चिकन होते.

Pages