सावल्यांच्या जाळ्यात - भाग ११

Submitted by नितनवे on 10 March, 2026 - 12:46

सावल्यांच्या जाळ्यात - भाग १०

पूर्वभाग

रिया मोईत्राच्या खुनाच्या तपासामुळे खार पोलीस स्टेशनबाहेर प्रचंड मीडिया गोंधळ माजलेला असतो. पत्रकार सतत ब्रेकिंग न्यूज देत असतात आणि पोलिसांवर सत्य बाहेर काढण्याचा दबाव वाढत चाललेला असतो.
इन्स्पेक्टर देशमुखांना फॉरेन्सिक अहवालातून खात्री पटते की जंगलात सापडलेले अवशेष रियाचेच आहेत आणि तिचा मृत्यू डोक्यावर झालेल्या जोरदार प्रहारामुळे झाला आहे. याचदरम्यान सायबर सेलला रियाच्या लॅपटॉपमधून महत्त्वाचा डेटा मिळतो. त्यातून समजते की रिया मोईत्रा कुटुंबाच्या भूतकाळाशी आणि मालमत्तेशी संबंधित काही गुपित शोधत होती.
मीडिया आणि वरिष्ठांचा वाढता दबाव पाहता देशमुख इरावर कडक चौकशी करण्याचा निर्णय घेतात. इरा काहीही कबूल करत नाही, पण तिची भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसू लागते. तिचं मौनच पोलिसांना खात्री देतं की तपास योग्य दिशेने चालला आहे आणि लपलेलं सत्य आता उघड होण्याच्या उंबरठ्यावर आहे.
*************************************************************************************************************************

भाग ११ — खरा हेतू

इन्स्पेक्टर देशमुख आपल्या केबिनमध्ये निश्चलपणे बसले होते. संध्याकाळचा काळोख हळूहळू शहरावर उतरू लागला होता आणि त्यांच्या केबिनच्या मोठ्या खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या रस्त्यांवर दिव्यांची रांग एकामागोमाग उजळत होती. सुरुवातीला काही मोजके दिवे पेटले, मग संपूर्ण रस्ता जणू सोनेरी रेषांनी झळाळून उठला. गाड्यांच्या हेडलाईट्स आणि टेललाईट्सची सततची वाहतूक त्या रस्त्यांवर लाल-पांढऱ्या रेषा काढत होती.

बाहेरच्या ट्रॅफिकचा गोंगाट दूरवरून येणाऱ्या एखाद्या लाटेसारखा वाटत होता—कधी स्पष्ट, कधी मंद. हॉर्नचा आवाज, बसच्या ब्रेक्सचा किरकिराट, आणि मधूनच एखाद्या मोटारसायकलीचा कर्कश गडगडाट…

पण त्या सगळ्या आवाजांपासून देशमुख जणू पूर्णपणे वेगळे झाले होते.

त्यांच्या केबिनमध्ये एक वेगळीच शांतता पसरलेली होती.

टेबलावर फाईल्सचा ढीग होता. काही फाईल्स उघड्या होत्या, काहींच्या कडांवर लाल रंगाचे मार्कर चिकटवलेले होते. एका कोपऱ्यात कॉफीचा कप ठेवलेला होता—कॉफी बऱ्याच वेळापूर्वी थंड झाली होती, पण देशमुखांना त्याची जाणीवही नव्हती.

त्यांच्या समोर उघडी पडलेली एक फाईल मात्र त्यांच्या पूर्ण लक्षाचा केंद्रबिंदू होती.

त्या फाईलच्या पहिल्या पानावर एक फोटो होता.

रिया मोईत्रा.

फोटोत ती हसत होती. तिच्या डोळ्यांत एक उत्साही चमक होती—जणू तिच्या आयुष्यात अजून कितीतरी स्वप्नं बाकी होती. त्या हसऱ्या चेहऱ्याकडे देशमुख काही क्षण स्थिर नजरेने पाहत राहिले.

त्या फोटोमधील आनंद आणि तपासात उघड होत चाललेलं भीषण सत्य—या दोन गोष्टींच्या तफावतीने त्यांना अस्वस्थ केलं.

देशमुखांनी हळूहळू एक दीर्घ श्वास घेतला.

त्यांच्या डोळ्यांसमोर मागच्या काही दिवसांतील घटना एकामागोमाग फिरू लागल्या.

जंगलात सापडलेले जळालेले अवशेष…
फॉरेन्सिक रिपोर्ट…
सायबर सेलने रिकव्हर होत असलेला डेटा…
रियाच्या लॅपटॉपमधील त्या संशयास्पद फाईल्स…
आणि इंटरोगेशन रूममध्ये बसलेली इरा मोईत्रा—जिच्या चेहऱ्यावर शांततेचा मुखवटा होता, पण डोळ्यांत भीतीची हलकीशी छटा दडलेली होती.

देशमुख खुर्चीत थोडे मागे रेलले. छताकडे पाहत ते काही क्षण विचारात हरवून गेले.

त्यांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. त्यांच्या बोटांनी फाईलच्या कडेला हलकेच स्पर्श केला आणि त्यांनी ती हळूवारपणे बंद केली.

जणू त्या क्षणी ते स्वतःलाच थोडा वेळ देत होते.

तेवढ्यात—

टक... टक...

दारावर हलकासा आवाज झाला.

देशमुखांनी मान वर केली. त्यांच्या डोळ्यांत पुन्हा नेहमीची ती कठोर चमक परत आली.

"या," त्यांनी ठाम आवाजात म्हटलं.

दार अलगद उघडलं आणि कदम आत आला. त्याच्या हातात काही प्रिंटआऊट्स होते. त्याच्या चेहऱ्यावर थोडी उत्सुकता स्पष्ट दिसत होती.

"सर..." तो थोडा थांबला. "सायबर सेलकडून अपडेट आला आहे."

देशमुख लगेच सावध झाले. त्यांनी हात पुढे केला.

"काय म्हणतोय रिपोर्ट?"

कदमने हातातील कागद टेबलावर ठेवले आणि एक पान पुढे सरकवलं.

"रियाच्या लॅपटॉपमध्ये काही एन्क्रिप्टेड फाईल्स होत्या. सुरुवातीला त्या उघडता येत नव्हत्या. पण सायबर टीमने त्या शेवटी डिकोड केल्या आहेत."

देशमुख थोडे पुढे झुकले.

"त्यात काय आहे?"

कदमने कागदांकडे पाहत उत्तर दिलं.

"बऱ्याच जुन्या नोंदी आहेत सर. काही कौटुंबिक कागदपत्रं, काही आर्थिक व्यवहार… आणि काही मालमत्तेशी संबंधित दस्तावेज."

देशमुखांच्या कपाळावर हलकी आठी उमटली.

"मालमत्ता?" "कदम, काल आपलं बोलणं झालं या बाबतीत. परत परत काय सांगताय?"

त्यांनी खुर्चीत सरळ बसत म्हंटलं.

कदम काही क्षण शांत राहिला. मग त्याने एक विशिष्ट पान काढून देशमुखांसमोर ठेवलं.

"सर… हे बघा."

देशमुखांनी पानाकडे पाहिलं.

त्या पानाच्या वरच्या बाजूला एक शीर्षक होतं—

मोईत्रा फॅमिली ट्रस्ट

देशमुख आता पूर्णपणे सावध झाले होते.

"ट्रस्ट?" त्यांनी हळू आवाजात विचारलं.

"हो सर," कदम म्हणाला.

देशमुखांनी खुर्चीतून थोडं पुढे झुकत पुन्हा विचारलं—

"म्हणजे… किती मोठा खेळ आहे हा?"

कदमने उत्तर देण्याआधी एक खोल श्वास घेतला.

"कमीतकमी… तीनशे कोटी."

"काय… तीनशे कोटी?" क्षणभर—देशमुखांचे पंचप्राण जणू त्या उत्तराने व्यापले .

बाहेरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज, समोर पसरलेल्या फायलींचा ढीग आणि मनात चाललेले विचारांचे मोहोळ सर्व काही जणू अचानक हवेत विरून गेले.

देशमुख काही क्षण काहीच बोलले नाहीत.

काही वेळाने भानावर आल्यावर मग ते हळूवारपणे खुर्चीत मागे रेलले आणि मंद आवाजात पुटपुटले—"तर हा सारा खेळ… पैशाचा आहे."

कदमने हलकंसं उत्तर दिलं. "कदाचित सर."

देशमुखांनी ताबडतोब मान हलवली. "नाही कदम."

त्यांचा आवाज आता अधिक ठाम झाला होता. "हा फक्त पैशाचा खेळ नाही."

"जेव्हा पैसा… प्रतिष्ठा… आणि रक्ताची नाती एकाच जागी येतात… तेव्हा माणूस फक्त लोभी राहत नाही."

ते थोडं थांबले. "तो धोकादायक बनतो."

कदम काही बोलला नाही.

देशमुखांनी पुन्हा फाईल उघडली आणि पानं चाळायला सुरुवात केली.

एकामागून एक दस्तावेज त्यांच्या नजरेसमोरून सरकत होते—जुने प्रॉपर्टी रेकॉर्ड्स…कौटुंबिक करार…ट्रस्टचे आर्थिक अहवाल…

अचानक—त्यांचे हात थांबले.

त्यांची नजर एका विशिष्ट ओळीवर स्थिर झाली.

देशमुखांच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला.

"कदम," त्यांनी हळू आवाजात म्हटलं.

"हो सर?"

"ही तारीख बघ… आणि हे नाव वाच."

कदम लगेच पुढे झुकला.

त्याने कागदावरची ओळ वाचली.

आणि पुढच्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं.

"सर…!"

तो थक्क झाला.

"या ट्रस्टचा पुढचा उत्तराधिकारी…"

त्याने पुन्हा वाचलं.

रिया मोईत्रा.

देशमुख शांतपणे मान हलवत म्हणाले—

"हो."

त्यांचा आवाज आता मंद पण धारदार होता.

"रिया जर जिवंत असती…"

ते हळूवार बोलत राहिले—

"तर या संपूर्ण तीनशे कोटींच्या साम्राज्याची अधिकृत वारसदार तीच असती."

कदम काही क्षण निःशब्द राहिला.

गुन्ह्याचा गुंता जणू हळूहळू स्पष्ट होऊ लागला होता.

देशमुखांच्या डोळ्यांत आता वेगळीच चमक होती—शिकाऱ्याला शिकार दिसल्यावर जशी असते तशी.

"कदम," ते म्हणाले.

"आता चित्र स्पष्ट होतंय."

कदमने त्यांच्याकडे पाहिलं.

देशमुख पुढे म्हणाले—"रिया फक्त तिचा भूतकाळ शोधत नव्हती."

त्यांनी खिडकीबाहेर पसरलेल्या अंधाराकडे पाहिलं.

"ती तिचं हिरावून घेतलेलं आयुष्य… तिचा हक्क… परत मिळवण्याच्या तयारीत होती."

केबिनमध्ये पुन्हा काही क्षण शांतता पसरली.

मग देशमुखांनी जड आवाजात शेवटचं वाक्य उच्चारलं—"आणि कदाचित…" "म्हणूनच… तिला मरावं लागलं."

देशमुखांनी हळूहळू हात पुढे केला आणि फाईलमधून एक पिवळसर पडलेला कागद अलगद बाहेर काढला.

त्या कागदाच्या कडांना हलकीशी झीज होती. जणू काळानेच त्यावर आपली सही करून ठेवली होती.

देशमुख काही क्षण तो कागद हातात धरूनच बसले. त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच शंका आणि विचारांची चमक दिसत होती.

मग त्यांनी मान वर केली.

“कदम,” ते शांत पण गंभीर आवाजात म्हणाले, “हा ट्रस्ट नेमका कधी स्थापन झालाय, याची तारीख नीट बघ.”

कदम लगेच पुढे सरकला. तो टेबलावर वाकला आणि कागदावर छापलेली ती लहानशी तारीख वाचू लागला.

काही क्षण तो काहीच बोलला नाही.

पण पुढच्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले.

“सर…” तो म्हणाला,
“पंधरा वर्षांपूर्वी?”

तो पुन्हा तारीख पाहू लागला.

“म्हणजे… रिया जेव्हा खूप लहान होती तेव्हा?”

देशमुखांच्या ओठांवर हलकंसं, किंचित उपरोधिक हास्य उमटलं.

“अगदी बरोबर,” ते म्हणाले.

ते खुर्चीत थोडे मागे रेलले आणि शांतपणे पुढे बोलू लागले.

“पंधरा वर्षांपूर्वी मोईत्रा कुटुंबाने हे आर्थिक जाळं विणायला सुरुवात केली होती. वरवर पाहता हा एक साधा फॅमिली ट्रस्ट वाटतो… पण प्रत्यक्षात हा संपूर्ण साम्राज्याचा पाया आहे.”

ते टेबलावर पडलेल्या कागदांकडे बोट दाखवत म्हणाले—

“या ट्रस्टची रचना अगदी योजनाबद्ध पद्धतीने केली गेली होती. मोईत्रा कुटुंबाच्या अफाट मालमत्तेचा—जमिनी, शेअर्स, गुंतवणूक, बँक खाते, कंपन्या—सगळ्याचा अंतिम आणि एकमेव अधिकार एका व्यक्तीला मिळणार होता.”

कदमने सहज विचारलं—“कोणाला?”

देशमुखांनी त्याच्याकडे सरळ पाहिलं.

“रिया मोईत्राला.”

कदम काही क्षण निःशब्द राहिला.

देशमुख पुढे बोलू लागले—“या ट्रस्टच्या दस्तावेजांनुसार, मोईत्रा कुटुंबाची संपूर्ण संपत्ती एकाच नावावर जाणार होती. आणि ती व्यक्ती म्हणजे रिया.”

ते थोडा वेळ थांबले.

जणू पुढचं वाक्य किती भयंकर आहे, याचा अंदाज घेत होते.

“पण…”

त्यांनी शब्द जरा सावकाश उच्चारला.

“त्यात एक मेख होती.”

कदम लगेच सावध झाला.

“कसली मेख होती, सर?”

देशमुखांनी त्या पिवळसर कागदावर बोट ठेवलं आणि एक ओळ वाचून दाखवली.

“इथे बघ. स्पष्ट लिहिलं आहे — रिया मोईत्रा सज्ञान होईपर्यंत ट्रस्टमधील कोणतीही मालमत्ता तिच्या ताब्यात येणार नाही.”

ते पुढे म्हणाले—“जोपर्यंत ती अठरा वर्षांची होत नाही, तोपर्यंत संपूर्ण संपत्ती ट्रस्टच्या नियंत्रणाखाली राहणार होती. पण ज्या क्षणी ती अठरा वर्षांची झाली असती…”

त्यांनी कदमकडे पाहिलं.

“त्या क्षणी ती या संपूर्ण साम्राज्याची कायदेशीर सर्वेसर्वा बनली असती.”

केबिनमध्ये अचानक ताण निर्माण झाला.

कदमच्या डोक्यात आता विचारांची चक्रं जोरात फिरू लागली.

तो हळू आवाजात म्हणाला—“म्हणजे… रिया अठरा वर्षांची झाल्यावर—”

देशमुखांनी त्याचं वाक्य पूर्ण केलं.

“—ती संपूर्ण संपत्तीची एकमेव कायदेशीर वारसदार ठरणार होती.”

कदम काही क्षण स्तब्ध उभा राहिला.

मग त्याच्या मनातला एक महत्त्वाचा प्रश्न बाहेर पडला.

“पण सर… यात इराचं काय?”

त्याने हळू आवाजात विचारलं.

“तिला काय मिळणार होतं?”

देशमुखांनी तो कागद फाईलमध्ये ठेवला आणि फाईल थोड्या जोरात बंद केली.

त्या आवाजाने खोलीतला ताण अधिकच स्पष्ट झाला.

देशमुखांचा आवाज आता जरा जड झाला होता.

“काहीच नाही.”

कदमच्या चेहऱ्यावर अविश्वास स्पष्ट दिसत होता.

“काहीच नाही?”

तो जवळजवळ कुजबुजला.

“म्हणजे… या शेकडो कोटींच्या ट्रस्टमध्ये इराचं नाव कुठेच नाही?”

देशमुख शांतपणे म्हणाले—“एकदाही नाही.”

ते पुढे म्हणाले—“पूर्ण फाईल चाळली आहे मी. एकही दस्तावेज असा नाही ज्यात इरा मोईत्रा हिला वारसदार म्हणून नमूद केलं आहे.”

ते टेबलावर बोटांनी हळूहळू ठेका धरत म्हणाले—“आता कल्पना कर कदम…”

त्यांचा आवाज मंद झाला.

“जर रिया आज जिवंत असती… तर मोईत्रांच्या आलिशान बंगल्यापासून ते बँकांमधल्या कोट्यवधी रुपयांपर्यंत… सगळं काही तिच्या नावावर असतं.”

कदमच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले—“आणि इराच्या हातात… काहीच उरलं नसतं.”

देशमुखांनी मान हलवली.

“नेमकं तेच.”

ते पुढे म्हणाले—“इरा मोईत्रा… जी आज या संपूर्ण साम्राज्याची राणी म्हणून जगतेय…”

त्यांचा आवाज धारदार झाला.

“ती एका रात्रीत सर्वस्व गमावलेली स्त्री बनली असती.”

कदमला आता चित्र स्पष्ट दिसू लागलं होतं.

पण अजून एक प्रश्न त्याला सतावत होता.

“पण सर…”

तो म्हणाला.

“इरा इतकी वर्षं शांत कशी राहिली? तिला हे सगळं माहिती नव्हतं का?”

देशमुख काही क्षण विचारात पडले.

मग ते हळूहळू म्हणाले—

“तिला माहिती होतं.”

कदमने भुवया उंचावल्या.

“पण…”

देशमुख पुढे म्हणाले—

“रिया अंधारात होती.”

ते फाईलकडे पाहत म्हणाले—“जोपर्यंत रियाला या ट्रस्टबद्दल काहीच माहिती नव्हती, तोपर्यंत इरा पूर्णपणे सुरक्षित होती.”

त्यांचा आवाज आता अधिक गंभीर झाला.

“पण ज्या दिवशी रियाला या सत्याचा सुगावा लागला…”

कदमच्या डोळ्यांत अचानक चमक आली.

“त्या दिवशी कारमध्ये झालेलं ते भांडण!”

तो जवळजवळ उद्गारला.

“ते फक्त बहिणींमधलं भावनिक भांडण नव्हतं.”

देशमुखांनी हलकंसं हसत मान हलवली.

“मुळीच नाही.”

ते पुढे म्हणाले—“ते अस्तित्वाचं युद्ध होतं.”

ते टेबलावर हात ठेवत म्हणाले—“ती लढाई तीनशे कोटींच्या साम्राज्यासाठी होती.”

कदम सुन्न झाला.

त्याच्या तोंडून हळू आवाजात शब्द बाहेर पडले—“सर… जर रिया त्या रात्री जिवंत राहिली असती…”

तो पुढे बोलू शकला नाही.

देशमुखांनी वाक्य पूर्ण केलं—“तर इराचं संपूर्ण वैभव एका क्षणात धुळीस मिळालं असतं.”

देशमुख खुर्चीतून उठले.

ते हळूहळू खिडकीपाशी चालत गेले.

बाहेर मुंबईची रात्र उजळली होती. असंख्य दिवे चमकत होते, गाड्यांच्या लाईट्स रस्त्यांवरून वाहणाऱ्या नदीसारख्या दिसत होत्या.

पण त्या प्रकाशाखाली कितीतरी काळी गुपितं दडलेली होती.

देशमुख खिडकीतून बाहेर पाहत सावकाश म्हणाले—“कधी कधी खून एका क्षणाच्या रागात होत नाही.”

त्यांनी बाहेरच्या अंधाराकडे पाहिलं.

“तो अनेक वर्षं मनात साठत राहतो. मत्सर… भीती… लोभ… आणि अस्तित्व टिकवण्याची धडपड यांच्या रूपात.”

ते पुढे म्हणाले—“त्या रात्री कारमध्ये जे घडलं…”

त्यांनी वाक्य पूर्ण केलं—“तो फक्त शेवटचा धक्का होता.”

केबिनमध्ये पुन्हा शांतता पसरली.

कदम अजूनही टेबलावर पसरलेल्या त्या कागदांकडे एकटक पाहत उभा होता. त्याच्या नजरा वारंवार त्या पिवळसर कागदांवर, प्रिंटआऊट्सवर आणि ट्रस्टच्या दस्तावेजांवर फिरत होत्या. जणू प्रत्येक ओळीतून तो काहीतरी जोडण्याचा प्रयत्न करत होता. केबिनमध्ये पसरलेल्या शांततेत घड्याळाची मंद टिक-टिक अधिक स्पष्ट ऐकू येत होती.

काही क्षण तो काही बोललाच नाही.

मग अचानक त्याने मान वर केली.

“सर…” त्याने हळू आवाजात म्हटलं.

देशमुख खिडकीकडून वळून त्याच्याकडे पाहू लागले.

“जर हा ट्रस्ट खरोखरच इतका अवाढव्य असेल… आणि रियाला या सगळ्याचा सुगावा लागला असेल… तर ती गप्प बसणारी मुलगी नव्हती.”

कदमचे शब्द आता अधिक ठाम होत होते.

“ती शांत बसून हे सगळं पाहत राहिली असती, असं मला वाटत नाही.”

देशमुखांच्या ओठांवर हलकंसं, पण अर्थपूर्ण हास्य उमटलं. ते हास्य एखाद्या अनुभवी तपास अधिकाऱ्याचं होतं—ज्याला आधीच उत्तर माहित असतं, पण दुसऱ्याने ते स्वतः शोधावं अशी अपेक्षा असते.

“नाही कदम,” ते शांतपणे म्हणाले.

“ती शांत बसली नाही.”

ते दोन पावलं पुढे आले.

“आणि खरं सांगायचं तर… तिने शांत राहण्याचा विचारही केला नव्हता.”

कदमच्या भुवया उंचावल्या.

“म्हणजे?”

देशमुख टेबलाजवळ आले. त्यांनी फाईलची काही पानं उलटली आणि त्यातून एक प्रिंट काढलेला ईमेल बाहेर काढला.

“रियाच्या लॅपटॉपमध्ये हा ड्राफ्ट सापडला,” देशमुख म्हणाले.

ते पुढे म्हणाले—“हा मेल तिने एका नामांकित वकिलाला पाठवला होता.”

कदमने तो कागद सावधपणे हातात घेतला. त्याने हळूहळू वाचायला सुरुवात केली.

पहिल्या काही ओळी सामान्य वाटत होत्या—ओळख, संदर्भ, काही औपचारिक शब्द.

पण जसजसा तो पुढे वाचत गेला, तसतसं त्याच्या कपाळावर आठ्या उमटू लागल्या.

त्याने पुन्हा एकदा वरच्या ओळी वाचल्या.

“सर…” तो म्हणाला.

“ही तर सरळ चौकशी आहे. ती ट्रस्टच्या कायदेशीर बाबींविषयी विचारत होती. आणि… आणि तिच्या स्वतःच्या अधिकारांबद्दलही.”

देशमुख थोडे पुढे झुकले.

त्यांचा आवाज आता जरा गंभीर झाला.

“साध्या भाषेत सांगायचं तर… ती इराला या सत्तेतून पूर्णपणे बेदखल करणार होती.”

केबिनमध्ये पुन्हा एकदा जड शांतता पसरली.

कदमच्या मनात त्या रात्रीचं चित्र हळूहळू आकार घेऊ लागलं.

त्याने सावकाश विचारलं—“म्हणजे… त्या दिवशी कारमध्ये झालेलं ते भांडण…”

तो थोडा थांबला.

“ते केवळ रागाच्या भरात झालेलं नव्हतं?”

देशमुख हळूवारपणे खुर्चीत बसले.

त्यांनी दीर्घ श्वास घेतला.

“मुळीच नाही.”

ते शांतपणे म्हणाले.

“ते अस्तित्वाच्या नियंत्रणासाठी पुकारलेलं युद्ध होतं.”

ते पुढे म्हणाले—“एका बाजूला वारसा होता… आणि दुसऱ्या बाजूला पंधरा वर्षं उपभोगलेली सत्ता.”

देशमुख पुढे म्हणाले—“त्या क्षणी इरासमोर फक्त दोनच मार्ग उरले होते.”

ते थोडे थांबले.

केबिनमध्ये फक्त घड्याळाचा आवाज ऐकू येत होता.

“एक—”

देशमुख म्हणाले,

“आपलं वैभव… सत्ता… आणि प्रतिष्ठा एका क्षणात गमावणं.”

ते पुढे म्हणाले—

“आणि दुसरा…”

ते शांत झाले.

कदमने हळू आवाजात वाक्य पूर्ण केलं—

“...रियाला कायमचं शांत करणं.”

त्याचा आवाज किंचित थरथरत होता.

कदमने पुढे विचारलं—“पण सर… मग हा खून पूर्वनियोजित होता का?”

देशमुख उठले.

ते पुन्हा खिडकीपाशी जाऊन उभे राहिले.

बाहेर अंधार आता अधिक गडद झाला होता. शहराचे दिवे दूरवर चमकत होते, पण त्या प्रकाशामागे अनेक काळी रहस्यं दडली होती.

देशमुख शांतपणे म्हणाले—“कधी कधी गुन्हा एका क्षणात घडत नाही, कदम.”

ते पुढे म्हणाले—

“तो आधी मनात जन्म घेतो—भीतीतून.”

“आणि योग्य क्षण मिळाल्यावर वास्तवात उतरतो.”

ते हळूहळू वळले.

“त्या रात्री कारमध्ये झालेला अपघात कदाचित अनपेक्षित असू शकतो…”

ते म्हणाले.

“पण त्यानंतर घेतलेला निर्णय मात्र पूर्णपणे जाणीवपूर्वक होता.”

देशमुख परत टेबलाजवळ आले.

त्यांनी ‘रिया मोईत्रा’ असं नाव असलेली फाईल करकरीत आवाजात बंद केली.

तो आवाज केबिनमध्ये घुमला.

देशमुख शांत पण ठाम आवाजात म्हणाले—

“खरा हेतू आता आरशासारखा स्पष्ट आहे.”

ते पुढे म्हणाले—“या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी फक्त तीन गोष्टी होत्या—”

ते प्रत्येक शब्द जरा जास्त स्पष्टपणे उच्चारत म्हणाले—

“अफाट संपत्ती…”

“टोकाचा अहंकार…”

“आणि सर्वस्व गमावण्याची भीती.”

आता—या केसचा खरा हेतू स्पष्ट होऊ लागला होता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतोय
भरपूर वेगवान
चांगलं डिटेलिंग केलं आहे तुम्ही