जर तुमच्या बाबतीत असे घडले तर ?

Submitted by एक लेखक on 16 February, 2026 - 12:23

एक नवीन खेळ खेळूयात. एक सिच्युएशन असेल आणि त्या सिच्युएशन मधे तुम्ही काय कराल किंवा तुमची प्रतिक्रिया काय असेल ? असा प्रश्न विचारायचा. त्याच्या वर उत्तरे येऊ द्यायची. जेव्हां तो प्रश्न जुना होईल तेव्हां कुणीही तसाच प्रश्न विचारायचा. असा खेळ चालू ठेवायचा.

पहिला प्रश्न : समजा तुम्ही जंगलात फसला आहात , तुमचा ड्रायव्हर तुम्हाला सोडून गेला आहे. तुम्ही काही मदत मिळते का म्हणून गाडी पासून लांब आला आहात. अशा वेळी जर तुमच्या समोर एक बिबळ्या , एक चित्ता, एक गेंडा, एक वाघ , एक सिंह आणि एक अजगर आला तर..

अ) तुम्हाला जास्त भीती कुणाची वाटेल ?
ब) तुम्ही काय कराल ?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समजा तुमचा मुलगा / मुलगी दहावीला आहे व बोर्डाच्या परीक्षा चालू आहेत. पाल्याने चांगला अभ्यास केला आहे व त्याला इच्छित कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल असे वाटते. अचानक बातमी येते कि एक पेपर (प्रश्नपत्रिका) फुटलेला आहे व जवळपास सर्वांना मिळाला आहे. तुमच्या पाल्याला सुद्धा तो मिळाला आहे. तुमचा पाल्य तुम्हाला विचारतो कि, ती प्रश्नपत्रिका पाहू का? आता जर तुमच्या पाल्याने ती पाहिली नाही, तर अशी दाट शक्यता आहे कि, इतरांच्या तुलनेने त्याला कमी गुण मिळून त्याला इच्छित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्याचा परिणाम त्याच्या करिअर वरती होईल.
तुम्ही काय कराल? व का?

पेपर फुटल्याची रीतसर तक्रार करायची, गवगवा करायचा.
म्हणजे तो पेपर रद्द होईल. मग इतरांना फुटलेल्या पेपरमुळे जास्त मार्क्स, आपल्या पाल्याला कमी असे होणार नाही.

पेपर फुटत आहेत तेव्हा सर्वच पेपर बाबत चौकशी होण्याची शक्यता आहे, अथवा तशी मागणी करावी. म्हणजे इतर पेपर फुटला होता आणि आपल्या पाल्याला माहीतच नव्हते असेही होणार नाही, अन्यथा त्याच तर्काने त्याला इच्छित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही.

<< त्याला इच्छित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही >>
तुमचा पाल्य हुशार असेल तर चांगलेच मार्क्स मिळतील, मग पेपर फुटो अथवा न फुटो. प्रश्न असा आहे की पेपर फुटीमुळे इतरांना जास्त मार्क्स मिळाले तर काय? मग मिळेल त्या दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा. बारावीची परीक्षा सर्वात जास्त महत्त्वाची आहे. चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश याव्यतिरिक्त दहावीला फार काही महत्त्व नाही. तसेही आयुष्यात हवे ते सर्व मिळत नाही.

It is not the most intellectual of the species that survives; it is not the strongest that survives; but the species that survives is the one that is able best to adapt and adjust to the changing environment in which it finds itself. - चार्ल्स डार्विन

मा न व व उपाशी बोका, छान प्रतिसाद. तुम्ही पाल्याला ती प्रश्नपत्रिका पाहू देणार नाही असा मला लागलेला अर्थ आहे. छान.
आता जर या काल्पनिक उदाहरणात थोडे बदल केले तर आपला निर्णय तोच असेल काय?
म्हणजे पेपर रद्द होणार किंवा नाही. चौकशी होईल किंवा नाही हे नक्की सांगता येत नाही. म्हणजे असे काही होणार नाही हे गृहीत धरावे.
अजून, हि दहावी ऐवजी बारावीची परीक्षा आहे.

या सिच्यूएशनचं उत्तर देण्यासाठी दुसरी सिच्युएशन देऊन उत्तर देईन.

समजा एका शहरात कुणीही सिग्नल पाळत नाही. लाल सिग्नल पडला तरीही सगळेच वेगाने निघून जातात. अशा वेळी जर अपवाद म्हणून कुणी सिग्नलला उभा राहत असेल तर मागच्या वाहनाकडून धडक बसण्याची शक्यता आहे. किंवा मागचे वाहन जोरात हॉर्न देईल, प्रसंगी मारहाण होईल. तसेच हिरवा सिग्नल झाल्यानंतर जायचा प्रयत्न केला तर ज्यांच्याकडे लाल सिग्नल आहे ते भरधाव वेगात असल्याने ते या एकांड्या नियमपाळूवर वैतागतील. गंभीर अपघात होईल.

तर या सिच्युएशन मधे तुम्ही लाल सिग्नल लागल्यावर काय कराल ?

Lol
तुम्ही पहिले असे आहात ज्यांनी माझा आयडी बरोब्बर ओळखला. बाकी सगळ्यांना असे वाटते की मला खायला मिळत नाही म्हणून मी उपाशी आहे. Wink

वरचे दोन्ही 'इंटेग्रिटी'चे प्रश्न आहेत. कोणाची इंटेग्रिटी (प्रोबिटी असाही एक शब्द आहे, सुक्ष्म फरक आहे) किती रुपयांची हा प्रश्न. खरं तर आयुष्यातलं सारं काही स्टेकला लागलेलं असतानाही जे किंवा जो बदलत नाही, ती केस म्हणजे इंटेग्रिटी.

जाँ पॉल सार्त्रने मात्र हे सारं वेगळंच मांदलं आहे. साध्य मंगल, पवित्र, कुणाला तरी फायदेशीर किंवा नितीमान असेल तर साधन कितीही घाणेरडं असू देत, की फर्क पैंदा- अशासारखं. जगभरातल्या डॉन लोकांनी सार्त्रचंच ऐकलेलं दिसतं..

हे फारच शॉर्टमंदी झालं. ''तुम्ही काय कराल' हे बरोबरे आणि तेच खरं. सार्वजनिक अ‍ॅप्लिकेबल अशी अनुमानं काढता येणार नाहीत खरं. स्वप्नांच्या इंटरप्रेटेशन्स सारखं झालं थोडं

"look, that fact has already been established. Now I am just negotiating the price" अशी धक्कातंत्र कलाटणी देऊन आशय सांगणारी एक बोधकथा आहे. Indecent proposal सारखी. ती आठवली. साजीराची पोस्ट वाचुन, इंटेग्रीटीबद्दल.

look, that fact has already been established. Now I am just negotiating the price
>>
राईट. हेच सार्त्र म्हणतो जवळजवळ. त्याची 'डर्टी हँड्स' नावाची प्रसिद्ध कन्सेप्ट आहे तीत

शरद पवार आणि अजित पवार यांचं प्रसिद्ध कोट आहे. काम होण्यासाठी कधी कधी नियम वाकवावे लागतात.
डर्टी हॅण्डस म्हणजे माझ्या मते चांगल्या कामासाठी कधी कधी चांगले वाईट याची पर्वा न करणं. पण त्या चुकीची आणि परिणामांची जाणीव असणं असं असायला हवं. वरच्या दोन्ही उदाहरणात उदात्त सामाजिक हेतू नाही. नैतिक द्वंद्व नाही ( मॉरल डिलिमा). इथे सगळेच चुकीचे वागत असताना एकटाच नियम पाळत असेल आणि त्याचे नुकसान होत असेल तर काय असा प्रश्न आहे.

सार्त्र आणि ती बोधकथा याबद्दल माहिती नाही. वाचायला आवडेल.

व्हॅलिड प्रश्न.

इंटेग्रिटी ही जरा पर्सनल कम्सेप्ट म्हणायला पाहिजे. असं म्हणा- की कुणीतरी बघत असताना किंवा नसतानाही- दोन्ही केसेसमध्ये मी चोरी करणार नाही. (चोरी केल्याबद्दल मला काहीही शिक्षा होणार नाही, हे माहिती असूनही).

'प्रोबिटी' मात्र प्रोफेशनल एथिक्सबद्दल बोलते. प्रोफेशनल किंवा इंस्टिट्युशनल कोड काय म्हणतो, त्यावर तुमचं वागणं ठरायला हवं. आय मीन त्याला धरून किंवा विरुद्ध. आता इथंं पुन्हा इथं इंटेग्रिटीशी काँफ्लिक्ट होऊ शकतो आणि होतोच.

सगळेच जिथं चुकीचे वागतात, आणि काहीही इंस्टिट्युशनल सिस्टम नसते किंवा असूनही कार्यरत नसते- तिथं हा कॉन्फ्लिक्ट पुन्हा येतो.

आणि मग आपण पुन्हा सार्त्रच्या भोपळे चौकात येतो.

खूप छान प्रतिसाद येत आहेत आणि चांगली चर्चा चालू आहे. सार्त्र वगैरे बद्दल कुतूहल वाटत आहे. जमले तर वाचायचा प्रयत्न करिन.

थोडक्यात अशी सिच्युएशन की एखाद्या सिस्टीममध्ये बहुतांश भ्रष्टाचारी आहेत. जिथे तुम्ही भ्रष्टाचार केला नाही तर तुम्ही वेगळे पडाल, मागे पडाल.

इथे याचे उगाच आदर्शवादी उत्तर देत नाही.
पण याचे खरे उत्तर असे राहील की जर आपण आपल्या तत्त्वामुळे मागे पडलो आहोत हे सतत जाणवणे तुम्हाला त्रास देत असेल, तुम्ही तुमचा प्रामाणिकपणा दाखवून कधीच समाधानी होत नसाल तर त्याला अर्थ नाही. त्या केसमध्ये तुम्ही खरोखरचे प्रामाणिक आणि तत्ववादी नाही आहात हे स्वीकारा.

जेव्हा खरोखर तसे असता तेव्हा तुम्हाला त्याची खंत वाटत नाही. उलट समाधानच मिळते. आपण मागे पडलो आहोत असे वाटतच नाही. कारण मागे पडणे म्हणजे तरी काय? पैसा आणि प्रसिद्धी कमावणे? हा निकष सुद्धा त्या भ्रष्टाचारी जगानेच ठरवला आहे. पण आपल्याला मात्र आपण आपली तत्त्वे राखली याचा अभिमानच वाटतो आणि त्यामुळे इतरांच्या मागे आहोत असे वाटतच नाही. आपण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असेच वाटते.

वरच्या परीक्षेच्या केस मध्ये मुलगा बारावीचा असेल तर त्याचा निर्णय त्याला घेऊ द्या. त्याची जगण्याची तत्वे त्याला ठरवू द्या. जो निर्णय त्याला आयुष्यात प्रामाणिकपणे स्वीकारता येईल तो त्याला घेऊ द्या.

आता पुढचा प्रश्न माझ्याकडून, मानवाने सृष्टीचा चालवलेला ऱ्हास पाहता तुमचे हृदयपरिवर्तन होऊन तुम्ही त्यादृष्टीने एकांड्या शिलेदाराप्रमाणे का होईना प्रयत्न करायला लागता, आज ना उद्या आपल्या सारखेच इतर आणखी तयार होतील,आपल्या सारख्याच इतरांना आपण हुडकून काढू आणि पुढील ५०-१०० वर्षांत का होईना एके दिवशी आपण आपल्या या सुंदर ग्रहाला विनाशाच्या अरिष्टातून बाहेर काढू. तुम्ही प्लास्टिक चा वापर कमी करता, तुम्ही पाणी जपून वापरता, स्वतःचे कार्बन फूटप्रिंट्स कमी करायचा आटोकाट प्रयत्न करता, या ग्रहासाठी आजुबाजूला चाललेली अय्याशी पहातही अगदी मन मारून, टाचा घासून जगताय आणि दर काही महिन्यांनी ट्रम्प तात्या जगाला विनाशकारी ३ ऱ्या महायुद्धाच्या ( जे की पाहिले आण्विक महायुद्ध होऊ शकेल ) दिशेने थोडा थोडा ढकलतोय...अशा वेळी तुमची मानसिकता बदलेल की तशीच ठाम राहील?

जर कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती जाणुन बुजून त्रास देत असेल. पण तरी व्यक्ती शी कधी ना कधी तरी तर डील करावेच लागत असते. अशा वेळी राजिनाम्या शिवाय इतर काय कराल (मनशांती ढळू न देता)
विसु: माझा पर्सनल प्रश्न नाही

अशा वेळी तुमची मानसिकता बदलेल की तशीच ठाम राहील>>> ठाम राहील. जगलो वाचलो तर पुढल्या पिढी ला जग सुंदर दिसायला मिळायला हवे Happy

ट्र्म्प चा काटा कुणितरी युथ काढेल & त्याची सुपारी दिली जाईल असे वाटत आहे..

जर कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती जाणुन बुजून त्रास देत असेल. पण तरी व्यक्ती शी कधी ना कधी तरी तर डील करावेच लागत असते. अशा वेळी राजिनाम्या शिवाय इतर काय कराल (मनशांती ढळू न देता)>>>> जर तुम्ही त्याचं आवडतं टार्गेट आहात, Then it's an easy bait!!, compel him/her to commit clear & obvious error/mistake/offence, then he & his career will be all at your mercy.

सार्त्र बद्दल माहिती घेतली. फ्रेंच नाटककार आहे. साजिरा कसलं दांडगं वाचन आहे. आम्ही मराठी नाटकं पण वाचत नाही. तुम्ही फ्रेंच नाटकं सुद्धा सोडत नाही. अफाट आहे बुवा.
डर्टी हॅंडस कल्पना 15 व्या शतकातील आहे. सोळाव्या पण असेल. इटालियन कादंबरीकार आणि तत्वज्ञ मॅकिवेल्ली (इटालियन उच्चार) याने ती मांडली होती. तिचा विस्तार 1970 च्या दशकात झाला. ते नाव आठवत नाही.

सार्त्र चं नाटक पॉलिटिकल ड्रामा आहे. ते लोकप्रिय झाल्याने डर्टी हॅड की वर्ड लोकप्रिय झाला.

जेव्हा खरोखर तसे असता तेव्हा तुम्हाला त्याची खंत वाटत नाही. उलट समाधानच मिळते. आपण मागे पडलो आहोत असे वाटतच नाही. कारण मागे पडणे म्हणजे तरी काय? पैसा आणि प्रसिद्धी कमावणे? हा निकष सुद्धा त्या भ्रष्टाचारी जगानेच ठरवला आहे. पण आपल्याला मात्र आपण आपली तत्त्वे राखली याचा अभिमानच वाटतो आणि त्यामुळे इतरांच्या मागे आहोत असे वाटतच नाही. आपण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असेच वाटते.>>> correct, It's only possible when you have a different scale altogether.

अशा वेळी तुमची मानसिकता बदलेल की तशीच ठाम राहील? >>>> नक्कीच बदलेल. किंबहुना पर्यावरणासाठी काहीतरी करणे यासारख्या गोष्टी या सिस्टीम ने करावयाच्या आहेत असे मी मानतो. जर ते व्यक्तींवर सोडून दिले तर चांगल्या माणसांना नुकसान सहन करावे लागते. हा मुद्दा Tragedy of the commons सारखाच आहे.

इंट्रेस्टिंग.

बघा, पुन्हा एकदा इंटेग्रिटी आणि प्रोबिटीमध्ये कॉन्फ्लिक्टसदृश स्थिती.

..अशा वेळी तुमची मानसिकता बदलेल की तशीच ठाम राहील? >> तुम्हाला आनंद कशात मिळतो आहे त्याप्रमाणे फरक पडेल. तुम्ही आचरणात आणलेली मिनिमलिस्ट जीवनशैली मारुन-मुटकुन पृथ्वीचं/ निसर्गाचं/ पुढच्या पिढीचं भलं वगैरे व्हायला केली असेल, थोडक्यात तुम्ही 'लार्जर दॅन लाईफ' काही करत असाल आणि ती जीवनशैली अंगिकारुन तुम्ही काही तडजोड करत असाल, त्यामुळे तुम्हाला/ तुमच्या मनाला, वरवर दाखवला नाहीत तरी खोलवर आत काही त्रास होत असेल तर तुम्ही बदलाल. पण तुम्ही सस्टेनेबल (प्रदीर्घकाळ सहज आचरणात आणता येतील असे) बदल तुमच्या जीवनशैलीत करत असाल तर ट्रंप काय करतोय आणि तुमच्या गावची महानगरपालिका काय करते आहे यावर तुमचे निर्णय बदलणार नाहीत. तुम्हाला तुमच्या आनंद गवसला आहे त्यानुसार तुम्ही आचरण कराल.
मला भटकायला आवडतं. मी किती प्रदुषण करतंय याचा विचार न करता भरपूर गाडी चालवतो. माझ्या आनंदापेक्षा पृथ्वीचा विनाश वरचढ नाही. मी आनंदी नसेन तर पृथ्वी टिकली काय आणि न टिकली काय! मला काहीही फरक पडत नाही.
पण इतर काही गोष्टींची नासाडी मनापासून आवडत नाही. त्यावर युद्ध, महागाई, जीवनाची क्षणभंगुरता कशानेही फरक पडणार नाही.

अनुमोदन अमित. वरती "''तुम्ही काय कराल' हे बरोबरे आणि तेच खरं. " असं मी म्हणलं ते याच अर्थाने. प्रश्नकर्त्याचाही प्रश्न तसा सच्चाच आहे. 'तुम्ही' काय कराल असं विचारताहेत ते.

ओ लेखक, काही दांडगं वाचन-बिचन नाही, नि अभ्यासही नाही. गंमत म्हणून फिलॉसॉफी बघायला ऐकायला वाचायला सुरूवात केली तर त्यात अनेक गंमतीदार आणि मनोरंजक गंमती सापडल्या इतकंच. गंमतीदार आणि मनोरंजक यात अजिबात function at() { [native code] }इशयोक्ती नाही. करून बघा, लय मज्जा येते.

ते सुप्रसिद्ध श्रोडिंगरचे आणि शिवाय शेक्सपियरचे टू बी ऑर नॉट टू बी वाले प्रश्न अजून कसे आले नाहीत? (मला तर बरेचदा हे दोघे एकमेकांचे डुआयडी वाटतात).

श्रोडिंगरचे आणि शिवाय शेक्सपियरचे टू बी ऑर नॉट टू बी वाले प्रश्न अजून कसे आले नाहीत? (मला तर बरेचदा हे दोघे एकमेकांचे डुआयडी वाटतात). >>> Lol

श्रोडिंगरची मांजर चावट आहे कि ढालगस हे कळेनासे झाले आहे. क्या आप कब्ज से परेशान है ? पासून ते मधुचंद्राच्या रात्रीपर्यंतच्या कोणत्याही विषयात ती मायबोलीवर धुडगूस घालू शकते. श्रोडिंगरने हे पाहिलं असतं तर तिला जंगलात सोडून आला असता.

Pages