तेलुगु पाककृती: चित्रान्नम् (फोडणीचा आंबट भात)

Submitted by वामन राव on 9 February, 2026 - 07:55
चित्रान्नम् (फोडणीचा आंबट भात)
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तेलुगु भाषेत या भाताला चित्रान्नम्, पुलिहोरा, लेमन राइस, किंवा टॅमरिंड् राइस असे म्हणतात. मराठीत त्याला साधारणपणे फोडणीचा भात किंवा आंबट भात असं म्हणता येईल.

पुलिहोरा हा सर्वसामान्य शब्दप्रयोग आहे. तेलुगु भाषेत पुलि म्हणजे वाघ 🐯, म्हणून काही जण त्याला गमतीनं टाइगर राइस असंही म्हणतात! पुलिहोरा एखाद्या धार्मिक कार्यप्रसंगी केला तर त्याला पारंपारिकपणे चित्रान्नम् असं म्हटलं जातं.

चित्रान्नम् या नावातच किती सौंदर्य आहे पहा. भाताच्या पिवळ्या पार्श्वभूमीवर उठून दिसणाऱ्या हिरव्या मिरच्या, मध्येच डोकावणारी हिरवी कढीपत्त्याची पाने, खमंग तळलेले चणाडाळ-उडीदडाळीचे दाणे, तडतडलेल्या फोडणीतील मोहरी, जिरे, लाल मिरच्या यांच्या एकत्रित असण्यामुळे ते अन्न खरंच चित्रासारखं भासतं. त्यामुळे चित्रान्नम् हे नाव अगदी समर्पक वाटतं.

चित्रान्नम् हा पदार्थ देव-देवतांना नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. अनेक देवळांमध्ये याचा प्रसाद दिला जातो. तिरुपती बालाजी मंदिरातील चित्रान्नम् तर विशेष प्रसिद्ध आहे. तेलंगणात व आंध्रप्रदेशात घरोघरीही चार-आठ दिवसांत एकदा तरी चित्रान्नम् केले जाते.

चित्रान्नम् किंवा पुलिहोरा प्रामुख्याने दोन प्रकारे केले जाते - चिंचेचे आणि लिंबाचे. तेलुगु भाषेत चिंचेच्या प्रकाराला चिंतपंडु पुलिहोरा, तर लिंबाच्या प्रकाराला निमकाया पुलिहोरा असे म्हणतात. इथे आपण चिंचेचे चित्रान्नम् पाहणार आहोत.

चला तर मग, सुरु करूया.

साहित्य:

चिंचेच्या अर्कासाठी:

  • चिंच: एका मोठ्या लिंबाएवढी
  • गूळ: भिजवून फुगलेल्या एका काबुली चण्याएवढा 😜
  • तेल: एक चमचा
  • मीठ: अर्धा चमचा / चवीनुसार
  • हळद: पाव चमचा

भातासाठी:

  • तांदूळ दोन वाट्या (सुमारे २०० ग्राम)
  • तेल: एक चमचा
  • मीठ: अर्धा-एक चमचा / चवीनुसार
  • हळद: पाव चमचा

फोडणीसाठी:

  • तेल: दोन चमचे
  • मोहरी: अर्धा चमचा
  • जिरे: अर्धा चमचा
  • आलं: अर्धा-एक इंच बारीक ठेचून
  • चणाडाळ: एक चमचा
  • उडीदडाळ: एक चमचा
  • काजू: दहा-बारा / आवडीनुसार, दोन भागांत तुकडे करून
  • शेंगदाणे: दोन चमचे / आवडीनुसार
  • दाळवं: दोन चमचे / आवडीनुसार
  • वाळलेल्या लाल मिरच्या: चार-पाच, तुकडे करून
  • हिरव्या मिरच्या: चार-पाच, लांब चिरून
  • कढीपत्ता: एक-दोन काड्या
  • हिंग: पाव चमचा
  • मीठ: अर्धा चमचा / चवीनुसार
  • हळद: अर्धा चमचा
  • (ऐच्छिक) कोथिंबीर: थोडीशी, बारीक चिरून

चित्रान्नम् साहित्य

क्रमवार पाककृती: 

भाग एक:
मोठ्या लिंबाएवढी चिंच एक वाटी गरम पाण्यात दहा मिनिटे भिजू घाला. कढईत एक चमचा तेल घाला. तेल गरम होईपर्यंत चाळणीवर घासून चिंचेचा अर्क काढून घ्या. गरम तेलात हा चिंचेचा अर्क, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद व थोडासा गूळ घालून मंद गॅसवर परता. तेल सुटू लागले की गॅस बंद करून थंड होऊ द्या.

भाग दोन:
तांदूळ दोन-तीनदा स्वच्छ धुवून घ्या. त्यात चार वाट्या पाणी, पाव चमचा हळद, पाव चमचा मीठ, पाव चमचा तेल घालून शिजवून घ्या. भात शिजून मोकळा व्हायला हवा. अस्सट होऊ नये. शिजून थोडासा थंड झाल्यानंतर मोकळा करून घ्या. हवे तर एका मोठ्या ताटात काढून पसरून ठेवा.

भाग तीन:
कढईत दीड-दोन चमचे तेल घाला. गरम झाल्यावर शेंगदाणे, चणाडाळ, उडीदडाळ व आवडत असल्यास चमचाभर दाळवं घालून परता. अर्धा चमचा मोहरी घालून थोडे परता. बारीक ठेचलेलं आलं, लांब चिरलेल्या पाच-सहा हिरव्या मिरच्या, तुकडे केलेल्या दोन-तीन लाल मिरच्या, कढीपत्ता, दहा-बारा काजू घालून परता. सर्व खमंग परतल्यानंतर पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हिंग घालून नीट कालवून गॅस बंद करा.

आधी केलेला चिंचेचा अर्क, थंड झालेली फोडणी, बारीक चिरलेली हिरवी ताजी कोथिंबीर भातात घालून हळुवार हाताने सर्व व्यवस्थित एकत्र करा व झाकून ठेवा.

केळीच्या पानावर सुबक सजावट करून वाढा. तोंडीलावणी म्हणून अंबाडीचा ठेचा वाढा.

चित्रान्नम्

पाकृ आवडली तर नक्की करून पहा व इथे फोटो टाका. काही सूचना, सल्ला, प्रश्न असतील तर प्रतिसादांत अवश्य लिहा.

अधिक टिपा: 
  • भाग एक मधील चिंचेचा अर्क आदल्या दिवशी किंवा आठवडाभर आधीपर्यंतही करून फ्रिजमध्ये ठेवता येईल. सकाळचा वेळ वाचेल.
  • पाकृच्या तिन्ही भागांत मिठाचा वापर केलेला आहे. त्यानुसार मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवावे.
  • भातात शिजवताना हळद घालणे ऐच्छिक आहे पण घातली तर तिने चांगला रंग येतो.
  • चिंचेचा अर्क, फोडणीतील घटक व शिजवलेला भात हे नीट एकजीव व्हावेत म्हणून सर्व कालविल्यानंतर तासभर झाकून ठेवावे.
  • या पाकृ व्यतिरिक्त, चित्रान्नम् करण्याच्या आंध्र-तेलंगाणा-रायलसीमा भागांत वेगवेगळ्या पद्धती आहेत.
  • याच चित्रान्नात चिंचेऐवजी एका लिंबाचा रस घालून थोड्याफार वेगळ्या पद्धतीने लेमन राइस करता येईल.

चित्रान्नम् ३
.

चित्रान्नम् ३

या खालच्या, पूर्वी एकदा काढलेल्या फोटोत डावीकडे लिंबूभात व उजवीकडे चिंचभात वाढला आहे.

चित्रान्नम् १

माहितीचा स्रोत: 
निरीक्षण, चर्चा, अनुभव
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राव गारू,

कैरी, टोमेटो, आंबटचुका, लिंबूरस असे आंबट जिन्नस टाकून केलेले भाताचे प्रकार एकीकडे आणि हा चटपटीत स्पायसी टॅमरिंड राइस एकीकडे ठेवला तरी टॅमरिंड रैस ईज अ विनर.

चिंच ती चिंचच 🤤

कोवळा चिंचपाला शहरात कुठे मिळायचा>> हल्ली आमच्या इथे देशी वाणसामानाच्या दुकानात फ्रोझन पाकीटे मिळायला लागली आहेत. तुम्हाला सुद्धा डी मार्ट / बिग बझार सारख्या ठिकाणी मिळेल कदाचित.
सासरची मंडळी त्यांच्या घरच्या झाडांचा चिगूर सुकवून परदेशस्थ मुला बाळांना पाठवत असतात अधून मधून. तो ही मस्त लागतो.

है शाब्बास !

चिंचेचा पाला खाणार त्याला देव देणार ! 😀

दोन दोन पर्याय - सरस छे

कैरी, टोमेटो, आंबटचुका, लिंबूरस असे आंबट जिन्नस टाकून केलेले भाताचे प्रकार एकीकडे आणि हा चटपटीत स्पायसी टॅमरिंड राइस एकीकडे ठेवला तरी टॅमरिंड रैस ईज अ विनर.

>>>
हं. लिंबूभाताच्या तुलनेत चिंच भाताला करायला थोडा जास्त वेळ लागतो, पण चवही पोटभर खाण्यासारखी होते हे खरे आहे; अर्थात हे काहीसे सब्जेक्टिव्ह आहे हे मान्य आहे.

चुका व चिंचेचे झाड

१. (आंबट?)चुक्यावरून माझे जिवलग नागपूरकर स्नेही यांच्याशी माझा नेहमी (मनमोकळा!) वाद होतो. मी चुका म्हणतो, ते आंबटचुका म्हणतात.

आंबटचुका म्हणणे म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्यासारखं नाही का? चुका हा आंबटच असतो, नाही का? की अनांबटचुका (पालकासारखी?) अशी काही वेगळी पालेभाजी असते?

२. "हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी" हे गाणं आठवलं की मनात येणारे विचार -

तो तरुण जे काही गात आहे त्याचा अर्थ असा आहे -

"सध्या मी प्रेमाच्या भरात असल्यामुळे हे पुढे दिसणारे चिंचेचे झाड मला अगदी चिनार वृक्षासारखे भासत आहे पण प्रत्यक्षात मात्र ते काही फार आकर्षक वगैरे नसते. त्याचप्रमाणे (सध्या मी प्रेमाच्या भरात असल्यामुळे) तू मला काश्मिरी नवतरुणी भासत आहेस पण प्रत्यक्षात मात्र तू ...?"

तुलना करण्यासाठी हा टेबल पहा -
+--------+------------------+------------------+
| क्रमांक | भासमान दृश्य | वास्तविक स्थिती |
+--------+------------------+------------------+
| | आकर्षक चिनार वृक्ष | अनाकर्षक चिंचेचे झाड |
| | आकर्षक काश्मिरी नवतरुणी | अनाकर्षक स्त्री |
+--------+------------------+------------------+

असे काही त्या (सध्या प्रेमाच्या भरात असलेल्या तरीही वस्तुस्थितीची जाणीव असलेल्या) तरुणाला म्हणायचे आहे का?

Pages