असे म्हणतात कि जर तिसरे महायुद्ध झाले तर ते शेवटचे असेल.
कारण त्यानंतर जो काही विध्वंस होईल तो महाविनाशकारी असेल. या युद्धात सहभागी असलेल्या आणि नसलेल्याही देशांचे एव्हढे नुकसान होईल कि पुढची दोन तीनशे वर्षे युद्धाचा विचारही मनात येणार नाही. या महायुद्धापासून "तटस्थ" राहणे ही कल्पना भाबडी असेल. कारण त्या महायुद्धात कोणतेही नियम पाळले जाणार नाहीत.
डबघाईला आलेली संयुक्त राष्ट्रसंघ ही संस्था कायमची मोडीत निघेल. पाच महाशक्ती, व्हेटो पावर हे सर्व इतिहासजमा होईल. नैसर्गिक साधनसंपत्तीचा एव्हढा विनाश झालेला असेल कि पृथ्वी पुन्हा जगण्यालायक करण्याकरता अनेक वर्षे नेटाने काम करावे लागेल. तेलाचे साठे उद्ध्वस्त होतील. त्यामुळे पर्यावरणाचा गंभीर प्रश्न उभा राहील. धरणे उद्ध्वस्त होतील. यामुळे शेतीवर परिणाम होईल. पाण्याचा प्रश्न उभा राहील.
एकदा युद्ध सुरू झाले कि मग विवेक संपतो. खरे तर विवेक संपतो तेव्हांच युद्धाला सुरूवात होते. दोन महायुद्धातून देखील जर युद्धखोर देशांना काहीच अक्कल आलेली नसेल तर मग या युद्धात त्यांना रोखणारे कोण असणार ?
आजवर जी महायुद्धे झाली आहेत ती सर्व गोर्या लोकांच्या देशांनी केली आहेत. या देशांचा डीएनएच युद्धखोर, आक्रमणकारी आणि वर्चस्ववादी आहे. आज ही मंडळी जगाच्या शहाणपणाचे ठेकेदार बनून वावरत असली तरी ते विनाशातून आलेले शहाणपण आहे. यांचा डीएनए कधी वळवळेल हे सांगता येत नाही. हा डीएनए न वळवण्यामागे दुसर्या महायुद्धानंतर रशिया आणि अमेरिका या महासत्तांचा एकमेकांना असलेला चेक हे महत्वाचे कारण आहे.
पण जेव्हांपासून सोविएत युनियन ढासळले तेव्हांपासून जग एकध्रुवीय झाल्यासारखे वाटते आहे. तेव्हांपासून अमेरिकन युद्धखोरपणा वाढीस लागला आहे. आपणच जागतिक पोलीस आहोत हे एकवेळ क्षम्य पण कोणत्याही देशात घुसून त्या देशाचा विध्वंस करून त्या देशाचे नेते फासावर लटकवण्याइतकी मुजोरी निश्चितच अमेरिकेकडे आली आहे. अमेरिकेचे पिच्छलागू देश हे ही या पापात सहभागी आहेत.
इराक वर १९९१ आणि १९९९ साली केलेल्या हल्ल्यांमागे जे कारण दिले होते ते फुसके होते हे आज सर्वांना माहीत आहे. इराक मधे कोणतीही न्युक वेपन्स सापडली नाहीत. ना जैविक हत्यारे सापडली. केमिकल्स प्रत्येक देशाकडे असतात. त्यांना हत्यारे म्हणायचे का हे बलाढ्य देशाचा उद्दामपणा किंवा विवेक ठरवतो. सद्दाम हुकूमशहा असेल. पण त्याच्या देशाला सजा देणे हा अमेरिकेचा अक्षम्य अपराध होता. भारतात त्या काळात उजव्या विचारसरणीचे लोक अमेरिकेची बाजू घेत आणि अमेरिकाविरोधी असलेल्यांना सरसरकट डावे किंवा देशद्रोही लेबल लावत. अमेरिका मुस्लिमविरोधी मोहीम चालवत आहे यासाठी अमेरिका आणि इस्त्राएल हे त्यांचे हिरो होते.
पण असंगाशी संग केव्हांही सत्संग ठरत नाही. त्याचा फटका बसतोच. तसा फटका आता उजव्यांच्या गळ्यातले ताईत सत्तेत असताना बसला आहे. अचानक विश्वगुरू हे एकदम हतबलच नाही तर लाचार श्वान वाटू लागले आहेत असा तडाखा अमेरिकेने दिला आहे. अमेरिका ही कुणाचीही नाही. तिला फक्त स्वार्थ समजतो.
इराकवरच्या हल्ल्यांमागे बुश पितापुत्रांचे आणि ब्रिटनचे तेलसाठ्यातले वर्चस्व होते ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. इराकने तेलाचे राष्ट्रीयीकरण केले तेव्हांच त्या देशात बुश पितापुत्रांच्या तेल उत्खनन करणार्या कंपन्या बेरोजगार झाल्या. तसेच दुसरा मोठा वाटा असलेल्या ब्रिटीश कंपन्याही अधांतरी झाल्या. यावर सद्दामला धमकावले देखील गेले असेल. पण सद्दामचा निर्णय ठाम होता. स्वतःच्या देशाचे हित पाहणे हा त्याचा अधिकारच अमेरिकेने काढून घेतला तो बोगस आरोपांद्वारे. त्याला पाश्चिमात्य मीडीयाने जोरदार मोहीम चालवून साथ दिली. पाश्चात्य मीडीयाच्या मोहीमेमुळे जगापुढे सद्दामला जगापुढे युद्धखोर गुन्हेगार म्हणून प्रोजेक्ट करता आले. यामुळे हल्ला करणे सोपे झाले.
आपल्याकडे हिंदी भाषेत म्हण आहे "कुत्ते को अगर गोली मारनी है तो उसे पागल करार दो"
हेच आता व्हेनेझुएलाच्या बाबतीत घडत आहे. व्हेनेझुएलाने तेलाचे राष्ट्रीयीकरण केले आणि अमेरिकन कंपन्यांना हाकलून दिले. असे बोलले जातेकि यातल्या कंपन्यात ट्रंपचीही गुंतवणूक आहे. खरे खोटे अलाहिदा. मात्र अमेरिकेने आता जे आरोप ठेवले आहेत त्याचे जस्टीफिकेशन करण्याचीही तसदी घेतलेली नाही. यावेळी अमेरिकेच्या बाजून नाईलाजाने ब्रिटन उभा आहे. फ्रान्सने सावध भूमिका घेतली आहे. जर्मनी शांत आहे. तरी सुद्धा अमेरिकेचा उद्दामपणा वाढला आहे.
कारण रशिया युद्धात गुंतलेला आहे आणि त्याची अर्थव्यवस्था निर्बंधांमुळे डळमळीत झालेली आहे. चीन हा बेरकी देश आहे. तो युद्ध करून हात पोळून घेणार नाही.
चीनने अमेरिकेचे खरे सामर्थ ओळखले आहे. ते लष्करी नसून आर्थिक आहे. रशियाने ही चूक केली. एके काळी रशियन लष्करी शक्ती ही अमेरिकेपेक्षा जास्त असल्याचे बोलले जात होते. मात्र अमेरिकेच्या गुप्तहेर खात्याने पोलादी पडद्याआडची आर्थिक स्थिती जाणली होती. स्टार वॉर नावाच्या फेक कार्यक्रमाला शह देण्यासाठी रशियाने लोकांचे हित सोडून सगळा पैसा त्याला शह देण्यासाठी वापरला जी डेड इन्व्हेस्टमेंट झाली. यातून लोकांच्या जीवनावश्यक गरजा भागवणे सोविएत युनियनला अशक्य झाले. अमेरिकेच्या गुप्त कारवायांनी या असंतोषाला हवा दिल्याने सोविएतचे विघटन झाले. यामुळे चीन संघर्ष टाळून अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या मागे आहे.
हे सर्व बघणे गरजेचे आहे. कारण या शिवाय जगातल्या प्रमुख देशांची संभाव्य महायुद्धातली पोझिशन समजणार नाही. कारण या महायुद्धात तीनच देश सर्वात प्रभावी असतील ते म्हणजे रशिया, चीन आणि अमेरिका. ते काय भूमिका घेतील यासाठी या घडामोडींकडे बघावे लागते.
आताच्या लेटेस्ट घडामोडींमधे अमेरिकेने एक जहाज पकडले. ते व्हेनेझुएलातून तेल भरून नेण्यासाठी आले होते. या जहाजाची तेल वाहून नेण्याची प्रचंड क्षमता होती. इतकी कि रशियासारख्या विशालकाय देशाची दीड वर्षाची गरज त्यातून भागली असती. या जहाजाचे नाव बेला १ आहे. पण त्याचे दुसरेही नाव समोर आले. ते म्हणजे मेरीनेरा. जेव्हां याचे नाव बेला १ असे सांगितले जाते तेव्हां अमेरिका म्हणते कि ते व्हेनेझुएलाचे आहे. पण रशियाच्या नजरेत ते मेरिनेरा आहे आणि ते रशियन जहाज आहे.

जगभरातल्या मीडीयाने अमेरिकेने रशियाचे जहाज पकडले अशा बातम्या दिल्या. यामुळे रशियाची बदनामी झाली. जिओपॉलिटिक्स मधे रशियाने अमेरिकेचे वर्चस्व मान्य केले का हा प्रश्न विचारला जाऊ लागला. रशिया आणि आता चीन आता सुपरपावर्स राहिले नाहीत अशा गप्पा सुरू झाल्या. पण जागतिक नेते असा विचार करू शकत नाहीत.
अमेरिकेने ही रिस्क घेतली आहे ती कॅल्क्युलेटेड आहे. रशियाच्या प्रतिक्रियेचा अदमास घेऊन केली आहे. रशियाकडे युद्ध करण्यासाठी किती पैसा शिल्लक आहे याचे आडाखे त्यांच्याकडे असणारच. शिवाय रशिया आजघडीला कुणाशीही व्यापार करू शकत नाही. रशियाचे तेल घ्यायलाही मनाई केली आहे . भारतावर त्यामुळेच टेरिफ लावले आहेत. ही अमेरिकन मनमानी आहेच. पण रशियाला अन्नासाठी भीक मागायला लावण्याचा कार्यक्रम आहे.
अर्थात रशिया तरी सुद्धा तीन वर्षांहून अधिक काळ युद्ध करू शकला. त्यामुळे रशियाला साथ देणार्या व्हेनेझुएलावर सुद्धा निर्बंध घातले आहेत.
वादग्रस्त बेला १ हे जहाज इराणच्या आखातात उभे होते तेव्हांपासून अमेरिकेची त्यावर नजर होती. हे जहाज आखातातून वळसा घालून सुएझ कडे आले. सुएझ मधे आल्यावर ते अमेरिकेच्या रडारवर येते. सुएजमधून बाहेर पडुन त्याने दक्षिण अमेरिकेच्या दिशेने वळण घेतले. इराणमधून ते निघाले नोव्हेंबरच्या अखेरीस. तेव्हां सबकुछ नॉर्मल होते. पण जेव्हां ते सव्वा महीन्यांनी व्हेनेझुएलाच्या जवळ पोहोचले तेव्हां परिस्थिती बदलली होती. अमेरिकेने व्हेनेझुएलाला वेढा घातला होता आणि मधे बॅरीअर्स उभारले होते. सर्व जहाजांना सूचना दिल्या जात होत्या.

अशात हे बेला १ जहाज व्हेनेझुएलाच्या जवळ आल्यानंतर त्याने अमेरिकन युद्धपोती पाहिल्या आणि ते रशियाकडे जाण्यासाठी वळाले. ते ब्रिटनच्या दिशेने निघाले. पण त्याने ट्रान्सपाँडर्स बंद केले. त्यामुळे ते अदृश्य झाले. त्याला ट्रॅक करणे अवघड झाले. यामुळे अमेरिकेने ब्रिटनला विनंती केली कि या जहाजाचा ट्रॅक करण्यात यावे.
कारण अमेरिकेचा कयास होता कि हे याच मार्गाने रशियाकडे जाईल. कारण अमेरिकेला सुद्धा माहीत आहे कि हे जहाज रशियाचेच आहे. काय आहे ही भानगड ?

पुढच्या भागात पाहूयात.
उद्या कदाचित उत्तरार्ध पूर्ण
उद्या कदाचित उत्तरार्ध पूर्ण होईल.
छान माहितीपूर्ण लेख..!
छान माहितीपूर्ण लेख..!
पुढच्या भागाची प्रतिक्षा..!
थोडं अवांतर : मायकेल हेस्टिंग्ज ह्या अमेरिकन पत्रकार आणि लेखकाचं ' आय लॉस्ट माय लव्ह इन बगदाद' हे अनुवादित पुस्तक सध्या वाचत्येयं. त्याची वैयक्तिक कहाणी तसेच प्रेमकहाणी असली तरी अमेरिकेने इराकवर हल्ला केल्यानंतर तिथली परिस्थिती कशी बदलत गेली त्याचं वर्णन आहे पुस्तकात.. ! त्या युद्धाचा फटका त्याला स्वतःला बसला . त्याची पत्रकार प्रेयसी एका कार बॉम्बस्फोटात मृत पावली.