*अकल्पित*
“दोन मिनिट फोन करू का? वेळ आहे का बोलायला?” माझ्या whatsappवर मेसेज आलेला मला दिसला. मेसेज सुश्याचा होता. सुशील- माझ्या मित्रांच्या भल्या मोठ्या गोतावळ्यातला एक मित्र. कितीही महत्वाचं काम असलं, तरी आधी मेसेज करून विचारून नंतर फोन करायचा त्याचा स्वभाव आम्हा सर्व मित्रांना आता अनुभवाने माहीत झाला होता.
मला वेळ होता. मीच लगेच त्याला फोन लावला.
“बोल, काय रे?” मी त्याला विचारलं. त्यापूर्वी त्याचा मेसेज वाचताना मला त्याचा नुकताच बदललेला dp दिसला होता. त्याचा आणि त्याच्या वडिलांचा, एकत्र असा तो फोटो होता. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच होती.
“अरे, बाबा गेलेत. अगदी अचानक. चार दिवसांपूर्वीच गावाहून माझ्याकडे आले होते. तशी तब्येतीची वगैरे काही तक्रार नव्हती. मी कामासाठी कर्जतला आलो आहे आणि फोन आला घरून. घराजवळ असलेल्या आपल्या मित्रांत तूच सर्वात जवळ आहेस. तू आणि राहुल्या जरा जाता का लगेच घरी? राहुल्याशी आत्ताच बोलणं झालं आहे. तो तुझ्याकडेच निघाला आहे. मी निघालोच आहे; तरी तासाभरात पोचेन.”
“अरे ठीक आहे. आम्ही जातो लगेच,” असं म्हणून मी फोन ठेवणार इतक्यात दारावरची बेल वाजली. अपेक्षेप्रमाणे राहुल्या आला होता. मी पायात चपला सरकवल्या आणि आम्ही पाचच मिनिटात सुश्याच्या घरात पोहोचलो.
घरात बाहेरचा हॉल सर्व बायकांनी भरलेला होता. सुश्याची आई, बहीण, बायको आणि आजूबाजूला राहणाऱ्या परिचित स्त्रिया तेथे जमा झालेल्या दिसत होत्या. सुश्याच्या बायकोने मला ओळखून, नजरेनंच मला आतल्या खोलीत जाण्यास सांगितलं. पुरुष मंडळी आत बसलेली असावीत. सुश्याच्या वडिलांचा मृतदेहही आत असावा.
आम्ही दोघेही आतल्या खोलीत शिरलो. आतल्या त्या खोलीत कुणीच नव्हतं. फक्त सुश्याच्या वडिलांचा मृतदेह बिछान्यावर दिसत होता. खोलीच्या दोन्ही बाजूच्या खिडक्यांच्या बाहेर दाट झाडी असल्याने खोलीत तसा उजेडही फार मर्यादित होता. बिछान्याच्या आजूबाजूला बसायला जागा भरपूर होती. मी आणि राहुल्या त्या बिछान्याच्या शक्य तितक्या दूर असलेल्या एकेका खुर्चीवर स्थानापन्न झालो. एका मृतदेहाबरोबर त्या खोलीत फक्त आपण असल्याच्या विचाराने तसं घाबरायला झालं होतंच, फक्त आम्हा दोघांना एकमेकांची सोबत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मिळत होता.
बघायचं नाही, असं ठरवूनदेखील अधूनमधून आमची नजर सुश्याच्या वडिलांच्या बॉडीकडे जात होतीच. काही मिनिटे गेली, आणि अचानक तिथे काही हालचाल जाणवली, आणि आम्ही थोडं दचकून तिथे पाहू लागलो. मोठ्या कष्टानं सुश्याचे वडील हळूहळू एकदम उठूनच बसले. ते दृश्य पाहून आम्ही गर्भगळीतच झालो. आम्ही काही रीअॅक्ट होणार इतक्यात, अचानक आमच्याकडे पाहून सुश्याचे वडील बोलूही लागले. आपल्या डोळ्यातून अश्रू गाळत ते आम्हाला म्हणाले, “अहो चार दिवसांपूर्वी आम्ही इथे आलो तेव्हा काडीचंही दुखणं नव्हतं. अचानक छातीत कळ आली आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.”
भूत, भुताटकी या गोष्टीवर माझा आत्तापर्यंत अजिबात विश्वास नव्हता. पण हे सारं प्रत्यक्ष पाहून माझी, म्हणजे खरं तर आमची दोघांची भीतीनं गाळणच उडाली, अगदी बोबडीच वळली. सुश्याच्या घरी मी इतर मित्रांच्या बरोबर एक-दोनदा गेलो होतो. खोलीच्या दुसऱ्या दरवाजातून स्वयंपाकघरात शिरून मागील दरवाजाने बाहेर पडता येतं, हे मला माहीत होतं. मी ताडकन उभा राहिलो. मला उभं राहिलेलं पाहून, माझ्याइतकाच घाबरलेला राहुलही उभा राहिला, आणि मी सुश्याच्या वडिलांकडे अजिबात न पाहता ज्या वेगाने स्वयंपाकघरात शिरलो, त्याच वेगाने राहुल्याही माझ्या मागोमाग आत शिरला, आणि आम्ही मागून थेट घराबाहेरच पडलो.
मला गरगरायलाच लागलं होतं. एरवीही अशा काही प्रसंगी मी अस्वस्थ असतो. आज तर फार विचित्र काहीतरी घडलं होतं, फार थरारक असं काही आम्ही पाहिलं होतं. बाहेर पडून घरासमोरच्या एका झाडाच्या पायथ्याशी, पॅन्ट वगैरे खराब होईल, वगैरे काही विचार न करता आम्ही सरळ बसून गेलो. एकमेकांशीही काहीही बोलण्याची आमची मन:स्थिती नव्हतीच. जे पाहिलं होतं, ते थरकाप उडवणारंच होतं. फक्त भूता-खेतांच्या गोष्टींत वाचलेलं आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं होतं.
काही वेळ गेला, आणि आम्हाला सुश्याची गाडी दुरून येताना दिसली. आमच्यात उठण्याचं त्राण नव्हतंच. आम्ही तसेच बसून राहिलो.
सुश्यानं गाडी दारासमोर पार्क केली, आणि आम्हाला असं घामाघूम होऊन खाली बसलेलं पाहून तो आमच्याकडेच आला. वडिलांच्या मृत्यूची बातमी अचानक ऐकायला लागल्यामुळे तो हादरलेला स्पष्ट दिसत होता.
“अरेs बाबांची घरीच death झाल्याने, पोस्ट mortemसाठी बॉडी न्यावी लागली आहे, असं मला नंतर कळलं. आता काही तास तरी थांबावंच लागेल. पण तुम्ही असे बाहेर का बसला आहात?” तो आम्हाला म्हणाला.
“अरेs आम्ही आत गेलो होतो. पण...” मी काही बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण इतक्यात सुश्यानंच आम्हाला विचारलं,
“आणि अरे, आत काकांना भेटलात की नाही? तेही आलेत बाबांबरोबर गावाहून. काका म्हणजे माझ्या बाबांचे सख्खे जुळे भाऊ. त्यांचीच खरं तर तब्येत थोडी बरी नाहीये. पण अचानक बाबांनीच या जगाचा निरोप घेतला... काकांनाही खूप धक्का बसला आहे याचा... ही म्हणत होती फोनवर...”
सुश्या काय म्हणतो आहे, हे आमच्या काही क्षणांनंतर लक्षात आलं, आणि एकदम आमच्या मनावरचा ताण नाहीसा होऊन आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर एकदम हसूच उमटलं आणि वडिलांच्या अचानक मृत्यूनं अतिशय दु:खी मन:स्थितीत असलेला, हादरलेला सुश्या विचित्र नजरेने आमच्याकडे पाहत होता...
**
जमलीय कथा.
जमलीय कथा.
कथा जमली पण इतक्या जवळच्या
कथा जमली पण इतक्या जवळच्या मित्राच्या वडिलांना जुळा भाऊ आहे हे माहित नसावे हे जरा पटले नाही.
धन्यवाद धनवन्ती!
धन्यवाद धनवन्ती!
धन्यवाद नरेन.
मस्त
मस्त
मस्त!
मस्तच!! कथा आवडली.
मस्तच!! कथा आवडली.
धन्यवाद किल्ली, वावे, साधना!
धन्यवाद किल्ली, वावे, साधना!
भारी
भारी
मजेशीर कथा आहे.
मजेशीर कथा आहे.
ऋन्मेऽऽष - बरोबर आहे.
ऋन्मेऽऽष - बरोबर आहे. माझ्याही हे लक्षात आलं नाही. माझा प्रतिसाद मी एडिट करतो. नरेन यांनाही योग्य वाटल्यास जरूर एडिट करावा ही विनंती.
आवडली कथा.
आवडली कथा.
मस्त
मस्त
(No subject)
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!
मस्त