५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने अवघ्या दहा दिवसांत देशभरात ३५० कोटी रुपयांहून अधिक कमाई करत अनेक विक्रम मोडले. चित्रपटगृहांतील वातावरण पाहता हा चित्रपट आणखीही अनेक विक्रम मोडेल, याचा अंदाज बांधणे कठीण नाही. मात्र या कमाईपेक्षाही अधिक महत्त्वाची कमाई म्हणजे प्रेक्षकांच्या प्रतिसादाच्या रूपाने या चित्रपटाला मिळत असलेली दाद. लोक प्रचंड उत्साही आहेत आणि या चित्रपटाला पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करणारा चित्रपट म्हणून संबोधत आहेत. या आनंदात हे समाधानही सामावले आहे की चित्रपटात भारतीय गुप्तचर संस्थांकडून पाठवलेली एक व्यक्ती पाकिस्तानच्या माफिया आणि गुप्तचर यंत्रणेत शिरकाव करते आणि भारताला सतत माहिती पुरवत राहते.
स्पष्टच आहे की ‘धुरंधर’ हा एक अजेंडा
आधारित चित्रपट आहे. मात्र त्यात काहीही गैर नाही. प्रत्येक चित्रपटाचा एक उद्देश असतो, एक अजेंडा असतो. त्या अजेंड्याशी प्रामाणिक राहणे हे त्याचे कर्तव्य असते. कोणताही उद्देश किंवा अजेंडा नसलेला चित्रपट निरर्थक ठरतो. अजेंडाविहीनताही एक प्रकारचा अजेंडाच असतो. खरी अडचण तेव्हा निर्माण होते, जेव्हा एखादा ठरावीक अजेंडा किंवा हेतू घेऊन चित्रपट केला जातो, पण तो चित्रपटात पूर्णत्वास जात नाही.
धुरंधर बाबतही असेच आहे.त्याचा अजेंडा पूर्ण झालेला दिसत नाही. आणि जर कोणताच अजेंडा नसेल, तर इतक्या लांबलचक चित्रपटाचे काहीही औचित्य उरत नाही. कारण ही लांबी केवळ कथेमुळे आलेली नाही, तर विनाकारण ताणलेल्या हिंसक दृश्यांमुळे आणि अविश्वसनीय मारामाऱ्यांमुळे निर्माण झाली आहे.
चित्रपटाच्या सुरुवातीला तो माहितीपटासारखा वास्तव दाखवत असल्याचा भास निर्माण करतो. डिसेंबर १९९९ मधील कंधार विमान अपहरणाच्या प्रसंगाने चित्रपटाची सुरुवात होते. सुरुवातीला दिसणाऱ्या दोन व्यक्तींपैकी एक पात्र राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावर आधारित आहे आणि दुसरे तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग यांच्यावर—हे ओळखणे अवघड नाही.
हळूहळू चित्रपट दाखवतो की पाकिस्तानने भारतावर कसे वारंवार हल्ले केले—संसदेवरील हल्ला आणि मुंबईवरील हल्ल्यांचा उल्लेख येतो. त्यानंतर भारतीय गुप्तचर संस्था ठरवतात की पाकिस्तानमध्ये असा एक माणूस हवा, जो आतल्या घडामोडींची माहिती देईल आणि तिथल्या सुरक्षा व गुप्तचर यंत्रणेत शिरकाव करेल.
इथूनच खरा सिनेमा सुरू होतो—राष्ट्रवादाच्या रंगात रंगलेला, पाकिस्तानची पोलखोल करणारा. इथपर्यंत काहीही आक्षेपार्ह नाही. पण पुढे लक्षात येते की भारतातून पाठवलेला हा व्यक्ती तिथल्या माफिया टोळ्यांच्या संघर्षाचा भाग बनतो. कराचीच्या ल्यारी भागावर ताबा मिळवण्यासाठी बाहुबली आणि राजकारणी यांच्यातील संघर्ष—जो भारतातही पाहायला मिळतो, म्हणजे निवडणुकांत गुंड किंवा माफिया गटांचा वापर—तोच प्रकार इथे दाखवला आहे. फरक इतकाच की हे पाकिस्तानात घडत आहे; कदाचित त्यामुळेच प्रेक्षक अधिक आनंदित होत असावेत.
अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये जे ठरावीक स्टीरियोटाइप्स असतात, ते सारे इथे वापरले गेले आहेत. उदाहरणार्थ, अधिकारी नेहमी प्रामाणिक आणि नेते नेहमी भ्रष्ट असतात, हा साचा. येथे दाखवले आहे की एका नेत्याने भारतीय चलन छापण्याच्या प्लेट्स पाकिस्तानला विकल्या, ज्यामुळे पाकिस्तान बनावट नोटा छापत आहे. पण वास्तव काय आहे? गेल्या दोन दशकांच्या काळात—ज्या काळावर हा चित्रपट आधारित आहे—नेत्यांच्या चुका आणि अपयश होत्या, पण कोणावरही हेरगिरीचा आरोप झाला नाही. उलट, याच काळात काही नामांकित अधिकाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांवर दहशतवाद्यांना मदत केल्याचे किंवा हेरगिरीचे आरोप झाले आणि त्यांना बाहेर काढण्यात आले. म्हणजे अधिकारी ही भ्रष्ट आहेत किंवा असतात.
दुसरा स्टीरियोटाइप म्हणजे आपल्या देशात सगळे चांगले आणि दुसऱ्या देशात सगळे वाईट. पाकिस्तानला खलनायक ठरवून भारतीय मानसिकतेचे समाधान केले जाते. येथेही हाच प्रयोग करण्यात आला आहे. पण पाकिस्तानने भारतात दहशतवाद निर्यात करण्याचा जो खेळ खेळला आहे, तो इतका सोपा नाही, जितका या चित्रपटात दाखवला आहे. तसेच त्यात बलुचांची काहीही भूमिका नाही. मात्र चित्रपटानुसार, एक बलुच माफिया—जो पुढे नेता बनतो—तो बलुचांकडून शस्त्रे खरेदी करून मुंबईवरील हल्लेखोरांना पुरवतो. (बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला हे कदाचीत आवडणार नाही). याहून धक्कादायक बाब म्हणजे, भारतातून पाठवलेल्या या हेराला स्वतः आठवते की त्यानेच कसाबच्या हातात ती बंदूक दिली होती, ज्यातून इतक्या लोकांचे रक्त सांडले गेले.
एकूणच पाहता, भारतावर झालेल्या हल्ल्यांबद्दल दु:ख व्यक्त करण्यापलीकडे पाकिस्तानात गेलेला हा भारतीय हेर नेमके काय करतो, हे समजत नाही. त्याच्या उपस्थितीतही कट रचले जातात, हल्ले होतात. तो या हल्लेखोरांवर योग्य तो बदला देखील घेत नाही. तो पाकिस्तानातील एका भ्रष्ट नेत्याच्या भोळ्या-भाबड्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिच्याकडून तिच्याच वडिलांवर हेरगिरी करवून घेतो. नंतर त्या भ्रष्ट नेत्याला मदत करण्यासाठी तो स्वतःच्या बलुच नेत्यालाच ठार मारतो. तो त्या मुलीला आपली खरी ओळख सांगतही नाही. आणि शेवटी या हेराबाबत जे उघड होते, ते आणखीच चकित करणारे आहे. एकूणच, चित्रपटाचा उत्तरार्ध पूर्णपणे भरकटलेला आहे. सुरुवातीला प्रकरणांमध्ये विभागलेली रचना पाहून कथेत एकसूत्रता आणि तथ्यात्मकता असल्याचा भास होतो, पण प्रत्यक्षात सारे तथ्य विखुरलेले दिसतात.
जगभरात हेरगिरीवर आधारित अनेक चित्रपट आणि पुस्तके आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये इतर देशांतील ‘डीप असेट्स’ असणे ही सामान्य बाब आहे. फार पूर्वी नाही, ‘राजी’ हा चित्रपट आला होता. त्यातही एक भारतीय हेर पाकिस्तानात पाठवला जातो—फरक इतकाच की ती एक स्त्री आहे. आलिया भट्टने ही भूमिका साकारली आहे. तिचे लग्न पाकिस्तानच्या एका लष्करी अधिकाऱ्याशी होते. धुरंधरचा नायक अनोळखी लोकांना ठार मारणारी यंत्रणा बनतो, तर आलिया भट्ट आपल्या घरातील लोकांनाच ठार मारते. जे लोक तिच्यावर प्रेम करतात, तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात, त्यांनाच देशहिताच्या नावाखाली मारले जाते. चित्रपटाच्या शेवटी आलिया भट्टची दीर्घ आणि वेदनादायी किंकाळी या राष्ट्रवादाच्या निरर्थकतेवर आणि अमानुषतेवर भाष्य करते. तिची ती किंकाळी धुरंधर सारख्या व्यावसायिक चित्रपटांचा पोकळपणा अधिक ठळकपणे उघड करते.
६०च्या दशकात इस्रायलच्या बदनाम गुप्तचर संस्थेचा—मोसादचा—हेर इली कोहेन सीरियाच्या राजकारणात अगदी शिखरापर्यंत पोहोचला होता. त्याने पाठवलेल्या माहितीतून इस्रायलने सीरियाविरुद्धचे युद्ध अवघ्या पाच दिवसांत जिंकले. मात्र एका किरकोळ चुकांमुळे तो पकडला गेला आणि जगभरातून विरोध होऊनही दमास्कसच्या चौकात त्याला सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली. या सत्यकथेवर आधारित ‘द स्पाय’ ही दूरचित्रवाणी मालिका प्रभावाच्या दृष्टीने धुरंधर पेक्षा खूपच सरस आहे.
याहूनही वेगळी आहे स्टीवन स्पीलबर्ग यांची ‘म्युनिख’ ही फिल्म. ११ इस्रायली खेळाडूंच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नियुक्त केलेला मोसादचा हेर दीर्घ आणि यशस्वी मोहिमेनंतरही निराश होऊन परततो—जणू त्याचा देशच शेवटी त्याला नाकारतो. तो स्वतःला नायक मानण्यास नकार देतो.
अशा चित्रपटांच्या तुलनेत धुरंधरचा राष्ट्रवाद कुठेही टिकत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की भारतीय राष्ट्र-राज्याची जागतिक प्रतिष्ठा आणि गरिमा काय आहे, हे या चित्रपटाच्या निर्मात्यांना समजलेलेच नाही. म्हणूनच चित्रपटात भारतीय गुप्तचर संस्था पाकिस्तानात ‘फक्त हत्या करणारी यंत्रणा’ पाठवण्याची भाषा करतात. खरा धोका आणि प्रश्न हाच आहे की—आपल्यालाही आता अशाच प्रकारचा राष्ट्रवाद आवडू लागला आहे का, जिथे हत्या करणाऱ्या यंत्रणा पक्ष बदलत प्रेते पाडत फिरतात.( ...our job is not to count body bags).
धुरंधरच्या सुरुवातीला एक दृश्य आहे…कंदहारची भूमी, अपहरण केलेले विमान, चारही बाजूंनी दारूगोळ्याचा वास आणि दहशतीची छाया.
डोभाल साहेब आत प्रवेश करतात आणि भयभीत प्रवाशांना म्हणतात, ‘भारत माता की जय’ म्हणा.
केबिनमध्ये स्मशान शांतता पसरलेली असते. एकही आवाज उठत नाही. एकही जयघोष घुमत नाही. तेवढ्यात एक दहशतवादी छद्मी हसतो म्हणतो—"; हिंदू कौम डरपोक होती है।"
दृश्य हादरवून टाकणारे असते, पण आत्मा ते स्वीकारत नाही.
पहिली गोष्ट—ज्या विमानात रक्त सांडलेले आहे, जिथे एका निरपराधाचा गळा चिरलेला आहे, जिथे लोक दोन दिवसांपासून एकाच जागेला जखडलेले आहेत, ना प्रकाश, ना पाणी, ना अन्न; आणि छातीवर बंदुकीच्या नळ्या रोखलेल्या आहेत—अशा क्षणी घोषणा न करणे हे भ्याडपण नाही, ती मानवी विवशता आहे.
हा धर्माचा प्रश्न नाही, हा हिंदुस्थानाचा अपमान नाही; मृत्यूच्या सावलीत उभ्या असलेल्या माणसाचे ते मौन आहे.
दुसरी गोष्ट—हिंदू कौम भित्रा नाही. असता तर हजार वर्षांचे युद्ध जिवंत कसे राहिले असते? असती तर आपली श्रद्धा, संस्कृती आणि ओळख इतकी शतके कशी जपली गेली असती?
भित्रे असते तर आज दिवाळी दिव्यांत नाही, आठवणींत धगधगत असती. होळी रंगांत नाही, इतिहासाच्या पुस्तकांत दडलेली असती.काल सिडनीत झालेल्या इस्लामी दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्सने ख्रिसमसशी संबंधित उत्सवांवर बंदी घातली. कारण दिले—कुठे एखाद्या जहाल धार्मिक दहशत वाद्याने गोळ्या झाडू नयेतहिंदुस्थानने कधी भीतीपोटी दिवाळी थांबवली आहे का? कधी होळी पुढे ढकलली आहे का? जेव्हा धार्मिक विविधता फ्रान्स आणि संपूर्ण युरोपपेक्षा कितीतरी अधिक याच भूमीवर श्वास घेत आहे.
मग भित्रा कोण? डरपोक कौम कोण?
याच ठिकाणी हा चित्रपट खटकतो.इथेच ही कसक उरते. हिंदू भित्रा नाही. भित्रा असता तर हजार वर्षे इतकी दीर्घ लढाई लढला नसता. युद्ध आजही सुरू आहे—रूप बदलले आहे, रणभूमी बदलली आहे; पण योद्धा तोच आहे. भित्रे इतका काळ लढत नाहीत.
एकूणच, चित्रपटाचा एकमेव संदेश असा वाटतो की सध्याचे भारतीय नेते चोर आहेत आणि उद्या एखादा प्रामाणिक नेता आला तर चित्र बदलून जाईल. चित्रपट ज्या काळावर आधारित आहे, तो लक्षात घेतल्यास हा संकेत समजणे अवघड नाही. पण हेही चित्रपट ठामपणे मांडू शकत नाही.
भारत–पाकिस्तान संघर्षावर अनेक चित्रपट बनले आहेत—साहजिकच त्यात भारतीय राष्ट्रवादाचे गौरवीकरण आहे. पण त्या चित्रपटांमध्ये व्यावसायिक तडजोडी असूनही ते काम नीट पार पाडतात. सनी देओलचे ‘गदर’ आणि ‘गदर–२’ लगेच आठवतात. या सगळ्यांच्या तुलनेत ‘धुरंधर’ फक्त सत्याचा भास निर्माण करतो. साडेतीन तासांची लांबी असूनही शेवटी या नायकाचे काय झाले आणि त्याला पाकिस्तानसाठी कसे तयार करण्यात आले, हे स्पष्ट होत नाही. कदाचित त्याचा सिक्वेल पाहिल्यावरच पूर्ण कथा समजेल. या अर्थाने पाहता, केवळ निर्माता-दिग्दर्शकच खरे ‘धुरंधर’ ठरतात—जे अर्धवट राष्ट्रवाद दुहेरी किमतीत विकण्यात यशस्वी झालेले आहेत.
...
छान लेख
छान लेख
बरेच मुद्दे पटले
ते हिंदू डरपोक धर्म आहे वगैरे डायलॉग माझ्या सुद्धा डोक्यात गेले.. आणि आता हा पिक्चर पुढे काय घेऊन येणार याची भीती सुद्धा वाटली. पण नंतर मात्र मनोरंजक मसालापट असल्याने आवडला.
ज्याच्याकडे लियारी त्याच्याकडे कराची आणि त्याच्याकडेच पाकिस्तान वगैरे मलाही कथेच्या सोयीसाठी किंवा तिथे घडणाऱ्या घडामोडी कशा भारी आहेत हे दाखवण्यासाठी केले असे वाटले.
जसे ते आपले मोहब्बते मधील गुरुकुल मधून ज्याला एकदा बाहेर काढला तर त्याला कुठेच घेत नाही टाईप.
धुरंधर चांगला असेल तर त्याचा
धुरंधर चांगला असेल तर त्याचा आनंद घेता यावा. अजेण्डा असेल तरी प्रेक्षक ढ नाही. अजेण्डा उडवून देऊन करमणूक होते का हे महत्वाचे आहे.
पण सध्या अशा सिनेम्यांसोबत सोशल मीडीयात सिनेमा पाहणारे आणि न पाहणारे यांच्याबद्दल जो विखारी प्रचार चालतो तो नको वाटतो.
देशभक्ती म्हणून धुरंधर बघणार्यांनी १२० बहादूर का फ्लॉप केला ? कारण त्यात पाकिस्तान भारत थ्रिल मिळत नसेल. तिथे चीन होता आणि धार्मिक इश्यू नाही.
काल्पनिक असला तरी काही हरकत नाही. खर्या घटनांवर असेल तरी हरकत नाही. एकादा सिनेमा शोले प्रमाणे पुन्हा इतिहास घडवत असेल तर त्या सोहळ्याचा भाग घ्यायला नक्की आवडेल.
१२० बहादूर का फ्लॉप केला >>>
१२० बहादूर का फ्लॉप केला >>>
देशभक्ती म्हणून धुरंदर नाही पाहिला. पण रेझान्ग ला च्या कहाण्या वाचून १२० बहादूर पाहिला होता. १२० बहादूरची भट्टी जमलेली नाही. त्यात धार्मिक इश्यू किंवा चीनचा संबंध नाही.
पुस्तकांतून वाचलेल्या कहाण्या जास्त इन्स्पायरिंग आहेत. त्यामुळे तो फ्लॉप झाला यात नवल नाही.
लेख १०० % पटला.
लेख १०० % पटला.
अशा 'देशभक्तीपर' सिनेमात थोडासा मीठ मसाला जास्तीचा घातला तर फारसे आक्षेपार्ह नाही, पण शंभर च्या खर्या नोटात काही खोट्या नोटा मिसळून खपवण्याचा जो डाव आहे तो आक्षेपार्ह आहे. एकाच राजकिय पक्षाचा व एकाच NSA चा उदो उदो, माजी अर्थमंत्र्यांवर बेफाम आरोप, एखादे सरकार पुरेसे 'राष्ट्रहितैषी' आहे का हे अधिकार्यांनी परस्पर ठरवणे, असे अनेक tropes आहेत.
हिंदू डरपोक धर्म च वाक्य दहशत
हिंदू डरपोक धर्म च वाक्य दहशत वाद्यांच्या तोंडी आहे. हे काही चित्रपट बघून आलेलं conclusion नाही.
भारतातल्या गुंड माफिया आणि त्यांचा निवडणूकी साठी वापर ह्यावरपण कित्येक चित्रपट बनलेत आणि चाललेत ही. पाकिस्तानात हिंसा घडतेय म्हणूनच प्रेक्षक खुश आहेत असं नाही.
मुंबई हल्ल्याच्या वेळी त्या हेराने भारताला सिग्नल दिले होते असं काहीस दाखवलेले आहे.
अत्ता तो हेर किती फायदेशीर आहे हे भाग दोन बघूनच समजेल.
केवळ गाणी चांगली म्हणून किंवा एखाद्या हिरो मुळे हा चित्रपट चालतोय असं नाही. तर जे दाखवलंय ते लोकांना आवडतंय आणि त्यामुळे एवढा पैसा चित्रपट जमवतोय.
मी पिक्चर पिक्चर सारखा बघितला
मी पिक्चर पिक्चर सारखा बघितला आणि मला जाम आवडला.
देशभक्ती वगैरे माझ्या मनात नाही तर पिक्चर बघुन पोहोर्यात कुठे येणार. पण यंटरटेनमेंट जबरा झाली. मारामार्या, खून, गोर दृष्यांची सवय आहे आहे आणि आवड ही आहे. त्याचं ही काही नाही. मजा आली.
आता या वीकेंडला अवतारचा पुढचा भाग.
छान लेख.
छान लेख.