जानव्याची पॉवर

Submitted by प्रकाश घाटपांडे on 10 December, 2025 - 03:13

नुकताच बनारसला गेलो होतो तेव्हा घाटांवरुन फिरत असताना अनेक ठिकाणी श्राध्द विधी व धार्मिक कार्ये चालू होते. ते पहाताना माझे मन माझ्या भूतकाळात गावी गेले. एके ठिकाणी थबकलो. तिथे सव्य अपसव्य चालू होते. जानवे सव्य (डाव्या खांद्यावर) आणि अपसव्य (उजव्या खांद्यावर) हे (यज्ञोपवीत) घालण्याच्या दोन पद्धती आहेत, ज्या धार्मिक विधींनुसार बदलतात; 'सव्य' म्हणजे देवकार्यासाठी डाव्या खांद्यावर, तर 'अपसव्य' म्हणजे पितृकार्यासाठी उजव्या खांद्यावर जानवे घेणे
मुंज अथवा व्रतबंध या सोहळ्यात लहानपणी ब्राह्मण कुटुंबात बटूला म्हणजे ज्याची मुंज करावयाची आहे ती उत्सवमूर्ती ला जानवे तथा यज्ञोपवित हा अलंकार प्रदान केला जातो. जानवे म्हणजे काही धाग्यांचा समूह असलेला वर्तुळाकार समुच्चय. जो डाव्या खांद्यावरुन कमरेपर्यंत अडकवायचा असतो. मुंज विधी झाल्यावर त्याचा दुसरा जन्म होतो. म्हणून त्याला ब्राह्मणाला द्विज असेही म्हणतात. एका आयुष्यात दोनदा जन्म या अर्थाने. मला मुंजीची फार भीती वाटायची कारण गुरुजी म्हणे मुंजीत तुमच्या मांडीत बेडूक भरतात. तेव्हा बेडकाचा साईज व मांडी कापून तो भरायला किती कट मारायला लागेल ? मग रक्त आले तर काय करतात? असे प्रश्न डोक्यात येत. दयाळू गुरुजी छोटासाच कट मारुन तिथे बेडकाचे छोटे पिल्लू भरत असतील अशी समजूत मी करुन घेत असे. तरी एकदा मी मांडीवर छोटासा कट मारुन हळद लावली होती. त्याची खपली पडून खूण दिसायला लागली. आता मुंजीच्या वेळी बेडुक भरायच्या विधीच्या वेळी गुरुजींना सांगायचे अलरेडी माझ्या मांडीत बेडूक भरलाय आता परत भरण्याची आवश्यकता नाही असे ठामपणे सांगायचे. पुरावा म्हणून ही खूणही दाखवायची असे ठरवले. प्रत्यक्ष मुंजीच्या वेळी गुरुजींनी मला तसे काही विचारले नाही व मी सुटकेचा निश्वास टाकला. आजही ती खूण माझ्या उजव्या मांडीवर आहे.
मुंजी मधे जानवे घालतात का तर म्हणे त्या पॉवर असते. तुमचे जन्मभर संरक्षण करते. भूत पिशाच्च हडळ वगैरे मंडळी या जानव्याला घाबरतात व जवळ फिरकत नाही. सोबत तुम्हाला रामरक्षा पाठ असेल तर पॉवर अजूनच वाढते. ब्रह्मसमंध आला तरी डबल पॉवर मुळे त्याला माघारी जावे लागते. जानव्या मधे जर पॉवर असते तर ते जानवे पुण्याला दुकानात विकत कसे काय मिळते? श्रावणी मध्ये जानवं बदलण्याचा सोहळा माझ्या गावी आमच्या रामाच्या देवळात सामुदायिकरित्या करावे लागत असे. तेव्हा असे कळाले की विकत घेतलेल्या जानव्यात पॉवर नसते, श्रावणी विधी करताना जे मंत्रोच्चार करतात तेव्हा त्यात पॉवर निर्माण होते. पहिल्या जानव्यात मुंजीच्या वेळी पॉवर तयार होत असते.
श्रावणी विधी मधे गोमुत्र व पंचगव्य प्राशन करावे लागे. त्यांची मला धास्तीच बसली होती. पण करता काय सुटका नाही. डोळे मिटून तोंड वेडेवाकडे करत गोमूत्र प्राशन करावेच लागे. हा पंचगव्य पदार्थ म्हणजे गायीचे शेण, दूध, दही, तूप व गोमूत्र यांचे मिश्रण असलेला पदार्थ. मग अलरेडी गोमूत्र जर या पंचगव्यात आलेले आहे तर पुन्हा स्वतंत्रपणे गोमूत्र पिण्याची सक्ती का? असा प्रश्न मला त्यावेळीही पडत असे. एकदा शंका म्हणून तपस्वी गुरुजींना विचारलेही होते. त्यांनी सांगितले की गोमूत्रामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे इतरवेळीही गोमूत्र प्राशन केले पाहिजे.
या जानव्याच्या साईजचे मला काही भानगड उकलली नाही. जानवं सिंगल कराव तर लांब व्ह्यायचं, कंबरेच्या खाली जायचे आणि डबल कराव तर् आखूड व्हायचं ,बरगडी पाशीच थांबायचे. मग त्यातल्या त्यात बरा वाटणार जोड उलगडला जायचा व मला जानवे दिले जायचे. बाकी काही असो,पण किल्ली ठेवायला व पाठ खाजवायला मात्र जानव्याच उपयोग व्हायचा. माझ्या ग्रंथपेटिकेला उगीचच छोटे कुलुप लावून त्याची चावी जानव्याला लावल्यावर् मला मोठे झाल्यासारखे वाटे. घरातील तिजोरीची व कपाटाची चावी माझ्या आजोबांच्या जानव्याला असे. ते गावचे पाटील व सावकार होते. ते जानवे सदर्‍याच्या बाहेर काढून त्यातील किल्लीने तिजोरी उघडून गहाण दागिने आत ठेवीत व पैसे काढून गावकर्‍याला देत असत. वहीवर त्याचा आंगठा घेत असत. दागिने म्हणजे काय तर सात किंवा आठ पुतळी एक पान, नथ,तोडे,आंगठी वगैरे. त्याला चिठ्ठी लावली जात असे. जेव्हा तो परत दागिने घ्यायला येई त्यावेळी उलट प्रक्रिया होत असे. मुख्य मुद्दा काय तर जानव्याच्या किल्लीने कधी तिजोरी तर कधी भिंतीतले कपाट उघडण्याची लकब मला अतिशय आकर्षित करायची.
लघुशंका करताना जानवे कानावर का अडकवायचे हे मला कधी समजले नाही. आमच्या एका मित्राला त्या जानव्याचा व मूत्रविसर्जनाच्या अवयवाचा संबंध हा एसटीतील कंडक्टर लांबलचक दोरी असलेली ड्रायव्हरच्या केबीन मधील बेल जागेवरुन वाजवतो तसा काही असला पाहिजे असे प्रामाणिक पणे वाटत असे. उगीच आर्किमिडिज म्हणला नव्हता की मला पुरेशा लांबीची तरफ द्या मी पृथ्वी उलथवून दाखवीन.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जानवे पुराणात ब्रह्मगाठीबद्दल काही कसे नाही आले?

ऑल्सो मुंजीसोबत लग्नाआधी करण्याची 'सोडमुंज' प्रकरण सांगितले तर अजून मजा येईल.

काही दिवसांपूर्वी जातीप्रथा आणि त्याअनुषंगानी हिंदू समाजात होणारी धार्मिक कर्मकांडे, त्यांचे नियम यावर बरेच वाचन घडले होते. काही notes काढल्या होत्या. लेखविषयाशी संबंधित काही नोंदी इथे डकवत आहे :

या जानव्याने पौराणिक कथा-कहाण्यातही भरपूर धुमाकूळ घातलेला दिसतो. Broadly त्रिवर्णिकांना (ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य) उपनयनाचा- मौजिबंधनाचा आणि by extension वेदाध्ययन/ धार्मिक शिक्षणाचा अधिकार होता. अन्य सर्व समाजघटकांना “शूद्र” म्हणून जानवे+ शिक्षण निषिद्ध.

पैकी ब्राह्मण आणि राज्यकर्ते क्षत्रिय आग्रहाने, थाटामाटाने मुली-मुलांची मुंज करत. होय, मुलींचीही. पुढे-पुढे मुलींची मुंज बंद पडली.

बरे, या त्रिवर्णात जन्म घेतला म्हणून in principle उपनयनाचा अधिकार मिळत असे पण सरसकट नाही. त्यासाठी अश्वालायन स्मृतिमधे विस्तृत नियमावली आहे.

खालील प्रकारच्या संततीला उपनयन संस्कार नाकारला जात असे :

१} कुंड संतती

ब्राह्मण स्त्रीच्या पुनर्विवाहातून झालेल्या अपत्याला. तिच्या पतीचे marital status महत्वाचे नसे.

२} गोलक पुत्र

विधवेशी केलेल्या विवाहातून जन्मलेल्या अपत्याला. आई-बाप कोणत्याही जाती-वर्णाचे असोत.

३} पार्शव संतती

परधर्मीय/ परवंशीय स्त्रीच्या (legitimately married or otherwise) पोटी जन्मलेला पुत्र, भले त्याचा जन्मदाता पिता ब्राह्मण/ राजा का असेना.

अर्जुनच्या उलूकी या नागकन्येपासून झालेल्या आणि भीमाच्या हिडिंबेपासून झालेल्या पुत्रांना जानवे नाकारण्यात आले होते. त्या प्रसिद्ध मत्स्यकन्येचा पुत्र मात्र जानवेधारी ! अलीकडची मस्तानीपुत्राची स्टोरी तर सर्वांनाच माहित आहे.

४} गूढज पुत्र

मोठ्या जॉइंट कुटुंबात घरात जन्मला आहे पण त्याचा पिता घरातला नक्की कोणता पुरुष हे माहित नाही असा पुत्र. याला संपत्तीत वाटा मिळायचा पण मुंज करायची परमिशन नव्हती.

५} क्षेत्रज पुत्र

त्रिवर्णातल्या क्षेत्रज/ नियोगातून जन्मलेल्या पुत्राला मात्र मौंजीबंधन अलाऊड होते. धृतराष्ट्र, पंडुराज + पाचही पांडवांची मुंज झाली होती. विदुर दासीपुत्र असला तरी महर्षि व्यासाचा नियोगपुत्र म्हणून त्याची मुंज त्याच्या लग्नाआधी त्याच्या सासुरवाडीत म्हणजे देवकराजाच्या महालात करण्यात आली, मग देवकपुत्रीशी- राजकन्येशी लग्न.

६} क्रीत/ क्रयपुत्र

सरळसरळ पैसे देऊन विकत घेतलेला पुत्र.

दत्तक घेतांना मुलाच्या biological माता-पित्याला धन, जमीन किंवा कोणत्याही प्रकारे लाच दिली असेल तर त्या मुलाला मुंज allowed नव्हती.

मोबदला न देता आणि तीर्थ-देव-अग्नि-द्विज सन्निधौ असतांना आपल्याच कुलगोत्रातला मुलगा दत्तक घेतला असेल तर त्याला मात्र उपनयन संस्कार, जानवे वगैरे allowed होते. लग्नविधी प्रमाणेच दत्तक पुत्र मांडीवर घेतांना गंगाजल, अग्नी, देव आणि द्विज/ ब्राह्मणाची साक्ष must असे.

७} सगोढ पुत्र

लग्नविधी होत असतांना आधीच गर्भार असलेल्या स्त्रीचा पुत्र, बाप कुणीही असो. जानवे Not allowed.

८} कानिन पुत्र

अविवाहित कुमारिकेला पितृगृहीच झालेला पुत्र. (महाभारतात कर्णाचे उदाहरण प्रसिद्ध आहे)

९} पुनर्भव पुत्र

हे जरा complicated प्रकरण. लग्न झालेल्या स्त्रीला पतिपासून हिसकावून दुसऱ्या पुरुषानी गर्भवती करून, पुन्हा त्याच पतीस परत केलेल्या स्त्रीचा पुत्र. याला जानवेच काय तर मृत पित्याच्या उत्तरकर्माचाही अधिकार नव्हता.

१०} चांडाल पुत्र

ब्राह्मण स्त्रीला अवर्ण पुरुषापासून झालेला पुत्र, her marital status not withstanding अपत्यांना यज्ञोपवीताचा अधिकार नाही, सरसकट बंदी.

(जुन्या लेखन नोंदीतून)

Pages