क्षणावली - कथांचा डिजिटल प्रवास

Submitted by Rucha Londhe on 24 November, 2025 - 08:42

"खरंच एकत्र एखादं प्रॉजेक्ट केलं पाहिजे रे. 35 वर्षांपूर्वी लिटिल थिएटर मध्ये एकत्र काम केल्यानंतर आपण परत कधी एकत्र काम केलंच नाही. काय करूया?" सिंगापूर मध्ये स्थायिक माझा मित्र योगेश तडवळकर ह्याच्याशी फोनवर झालेला संवाद. साल होतं 2021. कोविड च्या धक्क्यातून नुकतंच कुठे जग सावरत होतं . एकमेकांपासून मैलोन मैल लांब राहून देखील संगणक आणि झूम च्या द्वारे एकत्र येण्याची हळू हळू जगाला सवय होत होती. ह्याच तंत्रज्ञानाचा सृजनशील वापर करून काहीतरी घडवून आणूया असं मी आणि योगेशनं पक्क ठरवलं.

योगेश आणि मी सुधा करमरकर ह्यांच्या 'लिटिल थिएटर' (बालरंगभूमी) शिबिरात प्रथम भेटलो. छोट्यांच्या काही नाटकात एकत्र कामं केली. योगेशची शाळा बालमोहन आणि माझी आय. ई. एस. त्यामुळे शाळेमध्ये नाटकात एकत्र काम करायची संधी मिळाली नाही - त्यातून बालमोहन आणि आमच्या शाळेमधली स्पर्धा तर अगदी जगजाहीर! पण पुढे रुपारेल कॉलेजला आम्ही पुन्हा एकत्र आलो. ९० च्या दशकात रुपारेल कॉलेज प्रत्येक आंतर-महाविद्यालयीन नाटक स्पर्धा गाजवत होतं. रुपारेलमध्ये माझ्या पेक्षा योगेशचा नाटक वर्तुळात जास्त सहभाग होता. मी भरतनाट्यम, जर्मन भाषा, आणि शैक्षणिक अभ्यासक्रम ह्यात स्वतःला अधिक झोकून दिलं होतं. पुढे PhD च्या अभ्रासक्रमासाठी मी अमेरिकेला आले. बॉस्टन मध्ये स्थायिक झाल्यावर अभ्यासाबरोबर पुन्हा नाटकाकडे वळले. गेल्या वीस वर्षात मराठी, हिंदी, आणि इंग्रजी भाषांमध्ये २५ हून अधिक एकांकिका, नाटक, आणि इतर नाट्य प्रकार अमेरिकेभर सादर केले. ह्या काळात CA झालेला आणि ॲडव्हर्टांझिंग, कॉपीरायटिंग, वेब युजेबालिटी, अर्गोनॉमिक्स आणि इतर बरेच काही (उपद्व्याप) करणारा योगेश सिंगापूरला स्थायिक झाला. गेल्या १२-१५ वर्षात फेसबुक सारख्या माध्यमातून आम्ही एकमेकांच्या नाटक प्रवासाची दखल घेत राहिलो (Thank you social media!!)

आणि मग २०२० मार्च मध्ये कोविड मुळे सगळेच नाट्य उपक्रम बंद पडले. नाटक हे माध्यम आपल्याला परत कधी उपलब्ध होईल हे कळेनासं झालं. आणि त्याच दिवसात कधीतरी माझा आणि योगेशचा हा संवाद झाला. सिंगापूर आणि बॉस्टन हे अंतर आपण नाटक बसवण्यासाठी कधी पार करू शकू इतकं कमी नाही हे आम्हाला दोघांना माहिती होतंच. परत दोघांना नोकरी, धंदा, संसार, जोडीदार, मुलं ह्या सगळ्या जवाबदाऱ्या होत्याच. म्हणून मग कोविडने निर्माण केलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन आपण झूम वरूनच काहीतरी प्रोजेक्ट करायचं असं आम्ही दोघांनी ठरवलं. झूम वरून एकांकिका, अभिवाचन ह्याचे काही कार्यक्रम मी कोविड सुरु झाल्यापासून पहिले होते. मी स्वतः कॅलिफोर्नियाच्या 'कला' संस्थेबरोबर झूमवरून दोन एकांकिका सादर केल्या होत्या. बॉस्टनच्या कम्युनिटी थिएटरतर्फे ऑनलाईन एक इंग्रजी नाटक सुद्धा केलं होतं.

पण योगेशला आणि मला काहीतरी निराळं करायचं होतं. आणि तेव्हा "क्षणावली" ची आयडिया सुचली. हल्ली रेडिओ नाटक किंवा रेडिओ श्रुतिका हा प्रकार फारसा ऐकण्यात येत नाही. तो कलाप्रकार ताकदीने सादर करायला निराळं कौशल्य लागतं, अधिक मेहनत घ्यावी लागते. केवळ वाचिक अभिनयाच्या जोरावर श्रोत्यांच्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं करणं सोपं नसतं. आणि म्हणूनच ते आव्हान आम्ही स्वीकारायचं ठरवलं. श्रुतिका करायचं ठरल्यावर कथा कोणत्या निवडायच्या ह्या बद्दल निर्णय घ्यायला मात्र अजिबात वेळ लागला नाही. माझ्या बाबांच्या, म्हणजे लक्ष्मण लोंढे ह्यांच्याच, कथांवर आधारित श्रुतिका सादर करायच्या हा निर्णय सोपा होता. इंग्रजीत म्हणतात तसं - it was a no brainer. 80 च्या दशकामध्ये 'सोबत' या मासिकामध्ये बाबांनी "झरोका" नावाचं एक कथांचं सदर लिहिलं होतं. आयुष्यातील छोट्या छोट्या प्रसंगांवर किंवा लहानशा घटनांवर आधारित अक्षरशः दोन पानांच्या ह्या कथा - काही नर्म विनोदी तर काही अतिशय तरल, काही इरसाल व्यक्तिरेखा असलेल्या तर काही अनपेक्षित पेचप्रसंग चित्रित करणार्‍या. वैविध्य, मनोरंजन, आणि नावीन्य असलेल्या ह्या कथाच नाटक म्हणून बसवायच्या हे नक्की झालं.

नंतरची स्टेप म्हणजे नक्की कोणत्या पाच कथा सादर करायच्या ते ठरवणं. ह्या निवडीसाठी दोन निकष गरजेचे होते - दोनच पात्र आणि श्राव्य माध्यमाद्वारे परिणामकारकतेने सादर करता येईल असे कथानक. फक्त संवादांवर अवलंबून न राहता गद्यातून कथानक फुलवणं ह्यात बाबांची हातोटी होती. क्षणावली मधल्या पाच भागांपैकी फक्त एकच - "खलनायक" - ही कथा संवाद स्वरूपात लिहिलेली आहे. बाकी सगळ्या कथांमध्ये अतिशय सुंदर गद्य आहे. परंतु श्रुतिकांमध्ये गद्य घेतलं तर ते नाट्य न होता कथावाचन झालं असतं. त्यामुळे क्षणावली साठी निवडलेल्या कथांतील गद्याचं सौंदर्य अबाधित ठेवत त्यांचं नाट्यरूपांतर करणं ही पुढची स्टेप ठरली. हे करताना कथांमधला काळ तोच ठेवायचा की बदलायचा, संवाद नैसर्गिक संभाषणासारखे होत असताना त्यातून आशय कसा पोचवायचा, सर्व भागात योगेश आणि मी हेच दोन कलाकार असलो तर प्रत्येक कथेतील व्यक्तिरेखा वेगळ्या कशा घडवायच्या अशा अनेक बाबींवर आम्ही उहापोह केला. प्रत्यक्ष प्रयोगाइतकीच ही प्रक्रियाही आम्हाला भरपूर आनंद देऊन गेली.

मीडियाच्या काही वेगवेगळे पर्यायांची चाचणी करून पाहिल्यावर मायक्रोसॉफ्ट टीम्स वापरून रेकॉर्डिंग करायचं निश्चित झालं. इथपर्यंतचा प्रवास तसा सहज झाला होता. आता खरी कसरत होती ती म्हणजे सिंगापूर आणि बॉस्टन मधलं वेळेचं अंतर सांभाळून तालमी करणं आणि मग रेकॉर्डिंग करणं. प्रत्येक भागासाठी आम्ही साधारण ६-७ तालिमींची सेशन केली. पहिल्या काही तालमींत कथेचा गाभा, कथेतील पात्रं, त्यांची पार्श्वभूमी, त्यांचं एकमेकांशी नातं ह्याबद्दल चर्चा केल्या. कधी मतभेद आणि वैचारिक वादही झाले. दोघांचा सहभाग संपूर्ण आणि मनमोकळा व्हावा म्हणून मुद्दामहूनच आम्ही हा दिग्दर्शक आणि तो नट अशी कामाची मर्यादित व्याख्या ठेवली नव्हती. त्याचा खूप फायदा झाला.

मग ३/४ सेशन तालमी करून आम्ही रेकॉर्डिंग्स केली. दोघांच्या बाकी व्यापातून वेळ काढून आम्ही आठवड्यात साधारण एक सेशन करू शकलो. प्रत्येक भागाचं रेकॉर्डिंग्स सुद्धा आम्ही ४/५ वेळा केलं. पोस्ट-रेकॉर्डिंग मिक्सिन्ग वगरे सोयी उपलब्ध नसल्याने एक सिंगल रेकॉर्डिंग दोघांना आवडल्यावरच आम्ही थांबायचो.

रेडिओ श्रुतिके मध्ये अजून एक महत्वाची बाब असते ती म्हणजे संगीत. जेव्हा श्रोत्याला केवळ श्राव्य अनुभव मिळत असतो तेव्हा संगीत हे नाटकातलं जणू एक अतिरिक्त पात्र बनतं. उत्तम पार्श्वसंगीत आणि ध्वनी प्रभावांच्या (foley effects) जोरावर केवळ संवादांमधून एक सुंदर चित्र उभा करता येऊ शकतं. क्षणावलीच्या ओपनिंग आणि पहिल्या भागाला उत्तम संगीत देऊन योगेशचा गुणी सह-रंगकर्मी अक्षय अवधानी ह्याने दमदार सुरुवात करून दिली. आणि मग भाग २ ते भाग ५ ह्या चार भागांची संगीताची जबाबदारी उचलली साकेत जोशी ह्याने. प्रत्येक कथानकाची नस साकेतने अगदी अचूक पकडली आणि त्या भावनांना, संवादांना, आणि आशयाला पूरक असं संगीत बांधलं. अर्थात संगीता बरोअबर अंतिम रेकॉर्डिंग तयार करण्यात प्रत्येक भागासाठी अजून २/३ आठवडे गेले. त्यामुळे प्रत्येक भाग तयार व्हायला जवळ जवळ ३/४ महिने लागले. आणि अख्खी मालिका व्हायला २ हून अधिक वर्षं!

दरम्यानच्या काळात कोविड चे निर्बंध उठले - जगातले व्यवहार पूर्ववत सुरु झाले - नाटकं परत सुरु झाली. योगेश आणि मी सुद्धा कोविड पूर्वी अर्धवट सोडलेल्या आपापल्या उपक्रमांकडे परत वळलो. क्षणावली साठी वेळ देता येणं कठीण झालं. पण ५ भागांची मालिका काहीही झालं तरी नक्की पुरी करायची हा दोघांचा निश्चय मात्र ठाम होता आणि तो आम्ही पुरा केलाच!

ऑगस्ट ६, २०२५ ला बाबांची दहावी पुण्यतिथी होती. त्या दिवशी ही मालिका त्यांना अर्पण केली - Baba this one is for you!
मराठी साहित्यातील एक ख्यातनाम आणि धुरंधर लेखक लक्ष्मण लोंढे ह्यांना एका निराळ्या पद्धतीने अभिवादन करायचा आमचा प्रयत्न youtube च्या माध्यमातून पुढील लिंक वर उपलब्ध आहे:
https://youtube.com/playlist?list=PLJhuwqwbV1Cj5NXiVvNcvQ_Y2Jbaei6dA
जगभरातील रसिकांना तो आवडेल अशी आशा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा !अतिशय उत्तम उपक्रम
लक्ष्मण लोंढे
>>> माझे अत्यंत आवडते लेखक !
त्यांचे लक्ष्मणझुला हे पुस्तक माझ्या संग्रही असून ते अनेकदा वाचत असतो.

त्यांच्या वैज्ञानिक विचारसरणीचा माझ्यावर बऱ्यापैकी प्रभाव पडला त्याबद्दल कृतज्ञता

दोन भाग ऐकले ,
अगदी रेडीओ श्रुतिकांचा जमाना आठवला. फक्त संवादातून भोवतालही सुंदर जाणवला. शब्दांमधून भावभावना, संवाद, भवताल प्रकट करण्याची क्षमता निष्णात कलावंतात असते ती तुम्हा दोघांनी श्रोत्यांपर्यंत समर्थपणे पोहचवलीत. धन्यवाद. मायबोलीवर यायला उशीर झाला. उर्वरित भागही ऐकतो.
तुमच्या बाबांचे लिखाणही अप्रतिमच.

>> @ कुमार१ - लक्ष्मणझुला सदर  मलाही खूप आवडायचं . तुम्ही ते अनेकदा वाचता ऐकून खूप छान वाटलं . 

>>  @ स्वाती _आंबोळे - धन्यवाद. श्रुतिका ऐकल्यात की अभिप्राय नक्की कळवा. 

>> @जाई - म. टा. मधे  खूपच अर्धवट बातमी आली आहे. ना लिंक आहे ना QR कोड. मायबोली वरून जास्ती जास्त लोकांपर्येन्त पोचावं  हा मानस आहे. 

>> @ दत्तात्रय साळुंके तुम्ही केलेल्या कौतुका साठी खूप आभार. 

>> @असामी आणि @ रानभुली - श्रुतिका ऐकल्यात की अभिप्राय नक्की कळवा. 

छान उपक्रम.
मी सुद्धा २-३ दिवसांपूर्वी पेपरमध्ये याबद्दल वाचलं होतं.
लिंक बघते. (ऐकते.)

(अवांतर - तुम्ही बोस्टनला असता, त्यावरून - नुकतंच बोस्टनमध्ये एक माबो गटग झालं. तुम्हाला भेटता आलं असतं तर आवडलं असतं.)

आज उर्वरित भाग ऐकले. सुंदर लेखन आणि तितकंच सुंदर सादरीकरण.
हा उत्तम कलानंद आमच्या पर्यंत पोचविण्यासाठी खूप धन्यवाद .
खूप खूप शुभेच्छा भविष्यातील कला सेवेसाठी.

>> @ ललिता-प्रीति - जरूर ऐका आणि अभिप्राय कळवा. तुम्ही पण बॉस्टनला असता का?

>> @ दत्तात्रय साळुंके धन्यवाद. आपल्या मित्र परिवारामध्ये जरूर फॉरवर्ड करा!