दशावतार

Submitted by अमुक on 8 November, 2025 - 00:34

दशावतार (मराठी चित्रपट २०२५)

हे परिक्षण किंवा समिक्षा नव्हे.
खरंतर हा अभिप्राय देखील नाही.
अपेक्षाभंगाने दुखावलेल्या मनाचे मनोगत म्हणता येईल फार तर!
याबद्दल मते-मतांतरे असूच शकतात पण जे जाणवले ते असे...

रात्र थोडी…

'संभवामी युगे युगे...' हा मूलमंत्र जपणारा 'दशावतार' हा कोकण संस्कृतीत आंबा-फणस आणि काजू-कोकम यांच्याइतका घट्ट रुजलेला. त्याच्या कॅनव्हॉसवर मराठी चित्रपट करण्याची कल्पना भल्या भल्यांना भुरळ घालू शकते. परंतु त्या भानगडीत न पडणाऱ्या सुप्रतिष्ठित प्रस्थापितांचा आदर्श न ठेवता सुबोध खानोलकर सारख्या नवख्या चित्रकर्त्याने अशा चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळण्याचा विचार केला हे कौतुकास्पद. त्यासाठी त्याला दिग्गज कलाकारांबरोबरच निर्मात्यांची देखील अख्खी फौज सोबत घ्यावी लागली यात नवल नाही. तथापि मोठ्या हिमतीने आणि दुर्दम्य आशावादाने उचलेलं हे शिवधनुष्य, अगदी गुरु (ठाकूर) च्या साथीनेही, त्याला पेलवलेलं दिसत नाही. त्याचाच हा लेखाजोखा...

मराठी/हिंदी चित्रपट 'तुंबाड', कानडी चित्रपट 'कांतारा’, तेलगु वेब सिरीज 'हरिकथा: संभवामी युगे युगे' या साऱ्यांशी 'दशावतार'ची नाळ जोडलेली दिसणे हे ढळढळीत चक्षुर्वै सत्यम्. त्यामुळे, 'मुळात बजेटमध्येच कित्येक पटींचा फरक असल्याने त्यांची तुलना होऊच शकत नाही...' वगैरे मखलाशी उपयोगाची नाही, तुलना होणारच कारण माध्यम एकच आहे, आशयसूत्र समानधर्मी आहे आणि अविष्कार अमानवी आहे किंवा निदान तसा भासवण्याचा प्रयत्न आहे. सुष्ट आणि दुष्ट किंवा देव आणि दैत्य या अमानवी किंवा अतिमानवी वृत्ती माणसाच्या सहज प्रवृतींमधील ‘भीती’शी निगडित असल्याने पूर्णतः मानवनिर्मित. म्हणून त्याभोवती कथांची गुंफण. तशीच या सिनेमाची गोष्ट!

दुष्ट दैत्यांचे अपराध टोकाला पोहचल्यावर दैवी शक्तीचा प्रकोप होऊन त्यानी सुष्टांत संचारून दुष्ट निर्दाळणे ही मुळात दशावताराचीच थीम असल्याने गोष्टीत तसे काहीही नावीन्य नाही. पण गोष्ट रंजक पद्धतीने सांगणे हीच तर सिनेमाची गंमत. पुढे काय घडणार याची उत्कंठा प्रेक्षकाला गोष्टीत गुंतून ठेवायला भाग पाडते. इथे मात्र पुढे काय घडणार याची उत्सुकता तर नाहीच पण ते फारच रेंगाळत घडल्याने कंटाळा तेव्हढा येतो. कथा सरधोपट, पटकथा विसविशीत, संकलन तुटक आणि दिग्दर्शन बोथट असल्याने सगळा भार अभिनय आणि तांत्रिक बाजू यावर येतो. इथे मात्र तक्रारीला जागा नाही. कोकणचे निसर्गसौंदर्य, जंगलाची रात्रीची सैर, दशावताराची रंगसंगती या साऱ्याचे चित्रीकरण काही काळ मोहवते. शिवाय काळ्या बिबट्यासाठीचा व्हीएफएक्सचा वापर मर्यादित असला तरी बटबटीत किंवा बेढब नाही, संयत आहे.

मधल्या काळातील मराठी सिनेमातील अश्राव्य पार्श्वसंगीत आणि असह्य नाच-गाणी मागे पडून मराठीतीही पुन्हा दर्जेदार, अभिजात संगीताची परंपरा सुरु झाली त्याला काळ लोटला. 'दशावतार' ही परंपरा पुढे नेतो याचे समाधान. गाणी असह्य नसली तरी आवश्यकही नाही असे वाटण्यास जागा. याला अपवाद प्रोमोसाठी प्रभावीरीत्या वापरलेल्या ‘रंगपूजा’ भैरवीचा. यातील अजयच्या सुरातले आर्जव ‘देवाक काळजी रे’ मधील आर्ततेपेक्षा तसूभरही कमी नाही. नाद-सूर-दृश्य-चित्र-भाव अशा साऱ्याच संवेदनांना उत्फुल्ल करणारी ही भैरवी हा दशावतारचा उत्कर्षबिंदू. चित्रपटाच्या प्रोमोत याचा वापर अत्यंत प्रभावी ठरला पण सिनेमागृहातील अडीच तासात प्रेक्षकाला त्या अनुभूतीचा पुनःप्रत्यय देण्यात या दशावताराचे झिलकरी कमी पडले.

दिलीप प्रभावळकर हा नटसम्राट 'बाबुली' या दशावतारी नटाच्या भूमिकेत या प्रयत्नाचे ओझे अक्षरश: एकट्याने वागवतो. केवळ इन्स्पेक्टर डीकॉस्टा ही भूमिका बाबुलीच्या समोर उभे ठाकण्याइतकी प्रभावी असल्याने महेश मांजरेकर ते पात्र त्यांच्या नैसर्गिक व्यक्तिमत्वाला साजेशा सहजतेने साकारतात. दशावतारातील इतर झिलकऱ्यांसह कुठल्याच पात्रांच्या खुलण्याला वाव देण्याइतकी कथाच सघन नसल्याने बाकीची पात्रे आपापल्या भूमिका इमाने-इतबारे निभावतात एव्हढेच. त्यातही भरत जाधव, विनोद तावडे अशा कलाकारांना हलक्या-फुलक्या विनोदी धाटणीच्या भूमिकांत जीव ओतताना बघितले असतांना त्यांना ओढूनताणून खलपुरुष रंगवण्याचा अट्टाहास कल्पनेपलीकडचा. भरत जाधवांचा निकोप, निरागस ‘मि. गलगले’ मराठी प्रेक्षकांच्या मनात इतका घट्ट बसलाय की त्यांना भ्रष्ट (आणि दुष्ट!) वनरक्षकाच्या भूमिकेत बघवत नाही.

कोकण विकास आणि निसर्ग विनाश हा मुद्दा फारच संवेदनशील आणि ज्वलंत असल्याने, कोकणच्या पार्श्वभूमीवरच्या कुठच्याही कलाकृतीत त्याचा संदर्भ येणे अपरिहार्य. परंतु इतक्या गंभीर, थेट माणसाच्या अस्तित्वाशी निगडित मुद्द्याला इतके उथळपणे वापरणे उपयोगी नाही. ‘नी’कारान्त आडनावाच्या उद्योगपतीने वाट्टेल त्या किंमतीवर कोकणात खाणकाम करणे आणि त्याला गावकऱ्यांनी विरोध करणे हे रूपक अगदीच वास्तवाला धरून असले तरी गावकऱ्यांनी त्या उद्योगपतीचा आपल्या पद्धतीने ‘न्याय’ करणे आणि या ‘न्यायदाना’चे समर्थन करता यावे म्हणून आधीच्या प्रसंगात त्या उद्योगपतीने अक्षरश: निष्कारण कथानायकाची गोळी घालून हत्या करणे हे अनाकलनीय आणि पुराणकथेइतकेच अतर्क्य!

बाबुलीची भूमिका आपल्या अभिजात अदाकारीने शब्दश: जिवंत करणाऱ्या दिलीप प्रभावळकरांना गोळी लागते म्हटल्यावर मुळातच या गोष्टीत फारसा गुंतू न शकलेला आणि इतका वेळ संयम बाळगलेला प्रेक्षक मनाने त्या गोष्टीतून बाहेर पडतो पण त्याला प्रेक्षागृहातून बाहेर पडता येत नाही कारण गावकऱ्यांनी रिंगण घालून खलनायकाचा न्याय करण्याचा प्रसंग समोर रेंगाळत असतो. हाती सोनं लागलेलं असतांना आपल्या कर्माने त्याची माती करणं म्हणजे काय याचा ढळढळीत पुरावा म्हणजे हा क्लायमॅक्स. खरंतर जो चित्रपटाचा सर्वार्थाने उत्कर्षबिंदू ठरून त्याच्या वैश्विक संदर्भाला देखील न्याय देऊ शकला असता तो केवळ सरधोपट संवाद, सुमार अभिनय आणि अत्यंत वाईट हाताळणी यामुळे खलनायकाबरोबरच प्रेक्षकाचाही अंत पाहतो.

बाकी काही असले तरी, दिलीप प्रभावळकर या नटश्रेष्ठांची कलेवरील असीम भक्ती, कोकणच्या निसर्गसौंदर्याचे मनमोहक दर्शन, ‘रंगपूजे’चे मोठ्या पडद्यावरील प्रभावी सादरीकरण या साऱ्यासाठी आणि त्याहीपेक्षा मराठी सिनेमा बनत/बहरत रहावा, अधिकाधिक समृद्ध होत रहावा म्हणून प्रत्येक मराठी प्रेक्षकाने दशावताराचा हा प्रयोग एकदा जरूर बघायलाच हवा…!

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता पाहून पुन्हा वाचला लेख. बराचसा पटला. चित्रपट यापेक्षा बराच उत्तुंग होऊ शकला असता हे पटले पण तरीही बघताना आवडला (शेवटचा सीन सोडून). मला भरत जाधव खटकला नाही. त्याला नुकताच "आता थांबायचं नाय" मधे वेगळ्या रोल मधे पाहिला होता.

पुढे काय होणार याची माहिती आधी वाचली होती. पण ती माहिती नसती तर सुरूवातीला दशावताराची प्रथा, लोकप्रियता हा एक भाग धरून अशा जुन्या प्रथा आता पुढे कशा टिकणार वगैरे विषय असतील असेही वाटले असते. पिढ्यानपिढ्या लोकांनी या प्रथा जगवल्या. पण पूर्वी अशा गावांमधे इतर संधी उपलब्ध नसाव्यात. आता त्या उपलब्ध झाल्यावर पुढची पिढी त्यांचा फायदा घेऊ लागली. ते बरोबरच आहे. पण मग या प्रथा कशा चालू राहणार - वगैरे काही यात असू शकले असते. एक उदाहरण म्हणजे डाउनटन अ‍ॅबी ही सिरीज. त्यातही गावातील "सत्ताधारी" कुटुंबाकडे तेथील अनेक स्थानिक लोक नोकर म्हणून काम करताना दाखवले आहेत. त्यांच्या पिढ्या अशीच कामे पूर्वी करत. पण पहिल्या महायुद्धानंतर व तत्कालीन जनरल नवीन तंत्रज्ञाने विकसित झाल्याने इव्हन गावातील लोकांना इतर पर्याय उपलब्ध होतात व बापाने जे केले तेच मुलाने करायचे, हा एकच पर्याय त्यानंतर राहात नाही. इथे हे एका प्रथेबद्दल आहे पण इथेही ते लागू होईल. तसे काहीतरी यात असू शकले असते. पण पुढे पिक्चर एकदम वेगळ्याच ट्रॅक वर जातो.

मग खाण, विनाश, विकास, निसर्गाचे (मानवाकरताच) संरक्षण वगैरे ट्रॅक वरही खूप वरवरचे दाखवले आहे. खनिजे प्रगतीकरता वापरायची पण त्याकरता कोणत्याही एका भागातील निसर्गाचा मर्यादेबाहेर विनाश करायचा नाही - हा बॅलन्स कसा जमणार - प्रत्येक ठिकाणी "स्थानिकां"नी आपापल्या मर्यादित आकलनाने सोडवायचा हा प्रश्न नाही. त्याकरता देशपातळीवर हे मॅक्रो लेव्हलला सोडवायची जबाबदारी असलेले लोक असतात. आता ते लोक आपले काम कितपत करतात, त्यांचे हेतू शुद्ध असतात का वगैरे मुद्दे आलेच. या कथेच्या बाबतीत गावाची श्रद्धा असलेले देवस्थान व त्याचा परिसर येथे काही करू नये हा भाग वेगळा. त्यात काही वाद नाही. पण हा बॅलन्स कसा साधायचा वगैरे फार "जड" गोष्टी आहेत. ते एखाद्या रंगतदार कथानकात बसवणे हे फार मोठे चॅलेंज आहे. तितके सगळे एखाद्या मराठी चित्रपटात होईल ही जरा जास्तच अपेक्षा होईल, पण यात दाखवले इतकेही ते बाळबोध असू नये.

हे सगळे यातील विषय व सादरीकरणाच्या सखोलतेबद्दल. पण इतका डीप विचार केला नाही तर एक पिक्चर म्हणून रंगतदार आहेच.

'मायबोली'चा नियमित वाचक आणि चाहता असलो तरी माझे इतरत्र प्रकाशित लिखाण इथे डकविण्याची परवानगी अलीकडेच मिळालेली असल्याने अजून मी इथल्या संवादशैलीला सरावलो नाही, चाचपडतो आहे. तेव्हा आपल्या प्रतिक्रियांची दखल घेऊन त्यावर प्रतिसादण्यास लागणाऱ्या विलंबाबद्दल क्षमस्व! मी सर्वांचाच आभारी आहे आणि प्रत्येक प्रतिक्रियेला स्वतंत्रपणे प्रतिसादाण्याचा प्रयत्न करीन, ते साधेल तोपर्यंत आपल्या सहकार्य आणि मार्गदर्शनाची अपेक्षा... धन्यवाद!

बाय द वे, प्रभावीरितीने मायबोली वापरण्याचा काही क्रॅश कोर्स कुणी सुचवेल का...?
'कुणी याल का, सांगाल का, सुचवाल का या पामरा?
येथे तरी लिहू नको, शिणवू नको व्यर्थ मेंदूला...?' (कवी अनिल यांची क्षमा मागून)