बदलावेसे वाटणारे पाश्चात्य एटीकेट्स नियम!

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 October, 2025 - 15:56

एकूणच सोशल मीडियावर आणि मायबोलीवर सध्या रेस्टॉरंटमध्ये कुठे बसावे, कसे वागावे, काय घालावे याची घमासान चर्चा चालू आहे.

दूर कुठेतरी दिल्लीत एक शर्मा आडनावाची हिंदीभाषिक महिला आपली मराठमोळी कोल्हापुरी चप्पल घालते याचा अभिमान बाळगायचा सोडून...
आणि जेव्हा ती खुर्चीवर मांडी घालून बसते तेव्हा "दिल्लीचेही तख्त (पक्षी– खुर्ची) राखते कोल्हापुरी चप्पल माझी" असे गर्वाने म्हणायचे सोडून..
आपली मराठी माणसे इंडियन पीनल सेक्शन कोड घेऊन तिलाच नियम शिकवत आहेत.
त्याचवेळी परंपरा बचावपक्षाचे वकील सुद्धा एआय वापरून नवनवीन कायद्याची कलमे हुडकून आणत आहेत.

अश्यात कोणीतरी म्हणतेय की तुम्ही इथे भांडत आहात आणि तिथे त्या बाईने मूव्ह ऑन सुद्धा केले असेल (कसे करतात लोकं देव जाणे, इथे पाचवीतले पहिले प्रेम विसरले जात नाहीये)

आणि अजून कोणीतरी म्हणतेय की धागाकर्ता मोघम लिहून धागा काढतो, लोकांना चर्चेला लावतो.. (आता यात काय वाईट आहे समजत नाही, उगाच ते "धंद्याला लावतो" अश्या टोनमध्ये का लोकं लिहितात खरेच कळत नाही) ..
आणि स्वतः मात्र मजा बघतो. खरेच त्याला काही पडली असेल तर त्याने कंझ्युमर कोर्ट किंवा तत्सम अथॉरिटिकडे तक्रार करावी..

पण जिथे माझ्या स्वतःच्या घरचे लाईट बिल, मेंटेनन्स, माझ्या मोबाईलचे बिल, अगदी माझा इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा जिथे माझी बायको भरते तिथे दुसऱ्या बाईला त्रासात बघून मी तक्रार करायला धावलो तर घरी किती मार पडेल विचार करा..

म्हणून म्हटले ते करूया जे मला जमते.
आपण धागा काढुया आणि भारतातील मॉल, रेस्टॉरंट, पब, बार, डान्सबार, डिस्को, अम्युजमेंट पार्क, थिएटर, मल्टीप्लेक्स सारख्या पब्लिकप्लेस मध्ये असलेल्या खाजगी जागातील जाचक नियमांचे संकलन करूया.... आणि मग बघूया सर्वानुमते किंवा बहुमते पुढे काय करता येईल ते.

सुरुवातीचे चार आणे मी टाकतो.
पहिले गाऱ्हाणे माझे मांडतो.

१) इंग्लिश विंग्लिश

मला आजकालच्या या उच्चभ्रू पंचतारांकित, फाईन डाईन रेस्टॉरंट आणि मॉल अश्या सर्वच जागी एक मोठा प्रॉब्लेम जाणवतो. तो म्हणजे तिथले वेटर, मॅनेजर, सेल्समन, सेल्सगर्ल, टेलिफोन ऑपरेटर, सर्विस प्रोव्हायडर, रिसेप्शनिस्ट, डोअरकिपर, सिक्युरिटी गार्ड म्हणजे तिथला कुठल्याही श्रेणीचा कर्मचारी गरज नसताना इंग्लिश फाडायला सुरुवात करतो. आणि मग माझ्यासारखे ज्यांना चांगले इंग्लिश जमत नाही त्यांचा प्रॉब्लेम होतो.

खरे तर आपण पैसे मोजत असतो. म्हणून आपण त्यांच्यापेक्षा स्मार्ट दिसणे अपेक्षित असते. पण त्यांना तितक्याच उत्स्फूर्तपणे इंग्लिशमध्ये उत्तर देता आले नाही तर आपण बावळट ठरतो. म्हणजे मी तरी ठरतो. या कारणामुळे मी बरेचदा बायकोला पुढे ढकलतो. आणि ती सुद्धा या संधीचा फायदा उचलत दुप्पट पैसे खर्च करून मोकळी होते.

बरे आपण चेहऱ्याने काही गोरेचिट्टे फॉरेनर दिसतो अशातला भाग नाही. हे लोकं बस्स कपडे बघून एखाद्याशी इंग्लिशच बोलायचे हा अंदाज लावतात. म्हणजे पारंपरिक कपडे घातले तर यांचे ड्रेस कोडचे संकेत तुटणार, आधुनिक घातले तर हे इंग्लिश झाडणार.
थोडक्यात इकडे अपमान तर तिकडे घोर अपमान. माझ्यासारख्याने करावे तरी काय?

२) माय जेवण माय स्टाईल!

हा मुद्दा समजून घ्यायला जरा भूतकाळात फेरी मारून वर्तमानात येऊया.

पिझ्झा मी कॉलेजला असताना पहिल्यांदा खाल्ला. तेव्हा भारतात नव्यानेच आला होता. म्हणजे आमच्या मध्यमवर्गीय घरात तरी इतका पोहोचला नव्हता. पिझ्झा म्हणजे चीझ लावलेली भाकरी असले विनोद सुद्धा मार्केटमध्ये आले नव्हते तेव्हाचा तो काळ. आम्ही चार मित्र वर्गणी काढून एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा खायला गेलो होतो.

कशाची चव काय असेल याची सुतराम कल्पना नसल्याने आणि आम्ही मेनूकार्ड चारदा वाचूनही त्यात ओळखीचे काही न दिसल्याने आम्ही चार प्रकारचे चार पिझ्झे मागवून प्रत्येकाची एकेक फोड खायचे ठरवले. हो, नवीन नवीन असताना आम्ही पेरूची फोड सारखे पिझ्याची फोडच म्हणायचो. इतके ते नवखे प्रकरण होते. पण इथे ते महत्वाचे नाही. तर जिथे आमची पटापट नावे वाचायची बोंब होती. तिथे वेटरने फाडफाड इंग्लिश झाडत आमची ऑर्डर सर्व्ह केली. आणि सोबत काटासुरी ठेवले.

झाली का पंचाईत! मेडिकलला गेले की चाकूने बेडके कापावी लागतात जे आवडत नसल्याने आम्ही इंजीनियरिंगला आलो असे लोकांना फुशारक्या मारून सांगणारी हुशार पोरे आम्ही.. या लौकिकाला बट्टा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. काटा कुठल्या हातात धरायचा, आणि सुरी कुठल्या दिशेने चालवायची इथपासून सुरुवात होती. पण सुदैवाने आमच्यात एक अमोल पालेकर निघाला त्यामुळे आम्हा बाकी तिघांचा असरानी होता होता वाचला.

त्या दिवशी कष्टाने आम्ही तो पिझ्झा संपवला खरा, पण खाण्यातली मजा काही आली नाही. कष्ट करून कमवा आणि त्या पैश्याचे खातानाही पुन्हा कष्टच करा. रोज इतके कष्ट करावे लागले तर एक दिवस आपणच नष्ट होऊ असे वाटले.

पण ॲम्बियन्स बॉस ॲम्बियन्स!
यासाठीच तर खर्च केला जातो हे लक्षात आले. तसे अगदी युरेका युरेका झाले. त्यानंतर ज्या कोणी रेखा सुरेखा माझ्या आयुष्यात आल्या त्यांना घेऊन एकदातरी मी तिथे जायचोच. ऍक्च्युली एकदाच जायचो. तेवढेच बजेट असायचे. गर्लफ्रेंडच्या सहवासाचा आनंद पुरेपूर लुटायचो पण खाण्यातली मजा शून्य व्हायची. अन्नावरची वासना उडून जाणे हा शब्दप्रयोग कुठून आला असावा हे तेव्हा मला उमगले. कारण एक वासना पूर्ण व्हायची तर दुसरी उडून जायची.

मग कधीतरी कॉलेज संपल्यावर जॉब लागला. आठवड्याला पिझ्झा खाणे परवडायच्या वयात पोहोचलो. पण काटासुरी मेहनतीची भीती कायम असल्याने खायचो मात्र नाही. अश्यात आईने तिच्या मैत्रिणीसोबत रेस्टॉरंटमध्ये भेटीचा प्लान बनवला. सोबत मैत्रिणीची मुलगी सुद्धा होती. जिला माझी मैत्रीण बनवायचा या दोन मैत्रिणींचा प्लान होता. ती मुलगी अमेरिकेत शिक्षण घेऊन आलेली होती. त्यामुळे त्यांनी भेटीचे रेस्टॉरंट तिच्या शिक्षणाला साजेसेच ठरवले होते.

अरे हो, उगाच निराशावादी सस्पेन्स ताणायला नको म्हणून आधीच क्लिअर करतो, आमचे काही जमले नाही. आणि जमणार नाही हे दोघांनाही तेव्हाच समजले जेव्हा मी मेनूकार्ड वाचायलाच पंधरा मिनिटे घेतली. (ती मुलगी सुंदरही कमालीची होती ते ही एक कारण होते म्हणा)

पण पंधरा मिनिटे खर्चून मी तेच केले जे मी दर दुसऱ्या उडुपी हॉटेलमध्ये पूर्ण मेनूकार्ड नजरेखालून घातल्यावर करतो. म्हणजे तिथे मसाला डोसा मागवतो. इथे पिझ्झा मागवला. इंग्लिश का येत नसेना, पोरगी का पटत नसेना, पण सन्मान वाचवणे सुद्धा गरजेचे असते. म्हणूनच मालिका २-० ने हरल्यावर देखील आपला रोहीत शर्मा व्हाईटवॉश वाचवत शतक मारतो तेव्हा आनंद होतो.

आपल्याला काटासुरीने पिझ्झा खाता येतो हे दाखवून द्यायची हीच ती वेळ होती. पण मी काटासुरी साफसूफ करून, व्यवस्थित पोजिशन घेत, पहिलाच घास तोडायला घेणार, इतक्यात समोर पाहिले तर दोन्ही मायलेकी तोंडाचा मोठा आ वासून हातानेच वदनी कवळ घेऊन सुरू झाल्या होत्या. माझ्या हातात असलेली सुरी उंचावून तशीच स्वतःच्या छातीत खुपसून घ्यावीशी वाटली. ती अमेरिका रिटर्न मुलगी मस्त आपल्या आईसोबत हातानेच मचमच करत पिझ्झा खात होती. आणि मी मात्र दिखाव्याच्या आधुनिक संस्कारात गुरफटलो होतो.
ज्याला पूर्ण इंजिनिअरिंगमध्ये कधी एकही एटीकेटी लागली नव्हती त्याला त्या दिवशी एटीकेट्सचा घोडा लागला होता.

एक तो दिवस आणि एक आजचा दिवस. जगात ज्या ज्या गोष्टी हाताने खाणे शक्य आहेत त्या त्या मी आता हातानेच खातो.

पुढे मग कधीतरी कुठेतरी वाचले. की आपण अन्नग्रहण करताना आपल्या जास्तीत जास्त इंद्रियांना अन्नाचे सुख मिळायला हवे तरच खाण्याची मजा वाढते. जसे डोळ्यांनी आपण खाद्यपदार्थांच्या सजावटीचा आनंद लुटतो, नाकाने त्याचा छान वास घेतो, कानाने तळलेल्या पदार्थाचा चरचर आवाज ऐकतो, तोंडाने अर्थातच चव घेतो. राहता राहिले पाचवे इंद्रिय म्हणजेच स्पर्श! पण हाताने खायचे टाळून आपण त्या आनंदाला मुकतो.

स्पेशली गरमागरम वरणभात हाताने खाणाऱ्यांची तर किव करावी तितके कमी. असे मी आता इथे लिहिताच निम्म्याहून अधिक जणांना ते पटेल. पण आमच्या ऑफिसमध्ये एक मी वगळता मला अपवादाने सुद्धा कोणी असा दिसला नाही जो लंचला राईसप्लेट मधील डाळभात हाताने खातो. माझ्यासोबत जेवायला बसणाऱ्यांना सुद्धा हा मोह कधी होत नाही याचे आश्चर्य वाटते. चपाती भाजी हाताने संपवतात, पण नंतर डाळभातासोबत चमच्याने सुरू होतात. त्यांना खरेच हाताने डाळभात खाण्यातला आनंद कळत नाही की ऑफिसमध्ये कुठेही लिखित स्वरूपात नसलेले अदृश्य नियम ते पाळत असतात कल्पना नाही. पण नशीब माझ्या हाताने डाळभात खाण्यावर कोणी ऑब्जेक्शन घेत नाही. ज्या दिवशी घेतील त्या दिवशीच मी रिजाईन करून नवीन जॉब शोधायला घेईन.

पण बाहेर एखाद्या पंचतारांकित फाईन डाईनमध्ये मात्र तो आक्षेप घेतला जाणार नाही याची मला खात्री नाही. एखाद्याला माझ्या हाताने खाण्याची किळस वाटली तर त्याचा अधिकार कदाचित आधी जपला जाईल. डाळभात हा आपला भारतीय पदार्थ आहे आणि वर्षानुवर्षे तो आपण हातानेच खात आलोय हे विसरले जाईल. कारण आपण स्वतःला उच्चभ्रू म्हणवून घेण्यासाठी आता पाश्चात्य एटीकेट्स स्वीकारले आहेत.

ज्या गोष्टी आपल्याकडे एखाद्या झुडुपामागे किंवा बागेतील बंद पडलेल्या लाईटीखालील बाकड्यावर बसून छत्रीच्या आडोश्यात केल्या जातात त्या पाश्चात्य देशात चारचौघात कोणाची भीड न बाळगता होतात. तेव्हा ज्या लोकांना असे बिनधास्त तोंडात तोंड जाताना पाहून ते मॉडर्न आणि क्यूट वाटते त्यांनाच एखाद्याचा हात जेवताना तोंडात जाताना बघणे ऑकवर्ड वाटत असेल तर ते एटीकेट्स म्हणून स्वीकारावे लागते.

क्रिकेट हा मूळ गोऱ्यांचा, ब्रिटिशांचा खेळ आहे. जिथे चेंडूची लकाकी कायम राहावी म्हणून संघातले सारे जण आळीपाळीने त्याला थुंकी लाऊन चोळतात. पण ते म्हणे हायजिन पाळतात आणि आपल्या भारतीयांना त्याची काही पडली नसते...

अच्छा ऐका ना,
थांबू का इथेच..
झोप आली आहे
पुढचे प्रतिसादात लिहितो ना...
शुभ रात्री !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बियर ग्लासात ओततात तेव्हा फेस होतो
नवख्याने ओतली तर बियर कमी आणि फेस जास्त असे जुने जाणते म्हणतात

Btw
ह्या विषयात घुसळण्याजोगे काही शिल्लक आहे का?

झकास, हल्ली बघितलेल्या टिकटॉक नुसार अशी फेसाळतीच बियर ओतायची असते. आपण ग्लास तिरका वगैरे करुन बियर ओततो आणि फेस कमी येईल बघतो ते तितकसं बरोबर नाही.

कशीही ओता
पण नियम बनवू नका म्हणजे झालं

ह्या विषयात घुसळण्याजोगे काही शिल्लक आहे का? >> असं कसं ? असं हलक्यात घेतात होय ?
टाटा ग्रुप मधे पडलेल्या फुटीनंतर ताज ज्या गटाकडे आहे त्याच्या विरोधी गटाने त्या बाईला हाताशी धरून कारस्थान घडवलं वगैरे येऊ शकतं.
थोडं थांबा.

नियम नाही पण संकेत तर असतातच.
एखाद्याने स्कॉच ऑन द रॉक्स मागवली व बार टेंडर ने वाईन च्या ग्लासात दिले तर नोकरी जाईल त्याची.

हा धागा वाचून चितळेंनी धोतर बंडी आणि खडावा या पोषाखात आलात तरच दुकानाची पायरी चढावी असा बोर्ड लावायचं ठरवलंय.

fair enough !
चितळेंनी तसा बोर्ड लावला तर मला तरी वावगे वाटत नाही.
ग्राहकांची संख्या रोडावली तर बदलतील ते नियम. किवा मग ताज्या श्रीखंड व बाकरवाडी साठी हे सव्यापसव्य करणारे पुरेसे लोक असतील तर चालेल ते दुकान. एखादा influencer शॉर्ट्स व टी शर्ट घालून गेला व मग 'माझ्यावर अन्याय झाला हो' असे म्हणाला तर ते चुकिचे असेल.

एखाद्याने स्कॉच ऑन द रॉक्स मागवली व बार टेंडर ने वाईन च्या ग्लासात दिले तर नोकरी जाईल त्याची.
>>>>>>>>

मी हॉटेलमध्ये जाऊन लस्सी मागवली आणि ती मला कोणी चहासारखी कपबशीत आणून दिली तर माझेही डोके चक्रावून जाईल. हे संकेत सगळीकडेच असतात.

पण इतक्या क्षुल्लक कारणासाठी नोकरी जाईल हे फक्त बार मध्येच घडू शकते.
कारण दारू माणसाला अविचारी बनवते लस्सी पिऊन कोणी तसे वागत नाही.

असो,
इथे मुद्दा आहे की बारवाले तुम्हाला अमुक प्रकारेच प्यायचे आणि तमुक प्रकारेच बसायचे अशी सक्ती करत असतील तर तुम्हाला चालेल का? कारण बारमध्ये मी जास्त झाल्यावर लोकांना तिथेच आडवे होताना सुद्धा पाहिले आहे. मोठमोठ्याने बरळताना पाहिले आहे. तिथे इतर गिऱ्हाईकाने तक्रार करायचे म्हटले तर सगळ्यांचेच जिणे अवघड होऊन जाईल.

एखादा influencer शॉर्ट्स व टी शर्ट घालून गेला व मग 'माझ्यावर अन्याय झाला हो' असे म्हणाला तर ते चुकिचे असेल.
>>>>>>>

हे चुकीचे ठरवण्यासाठी influencer ही कंडिशन टाकावी लागली Happy
याच कारणासाठी त्या बाईला सुद्धा स्टंटबाज ठरवायचा मागे सगळे लागले आहेत Happy

Submitted by vijaykulkarni on 29 October, 2025 - 20:01 >>> हम छोडेगा नही ऐकू येतंय कानात Lol

ताजवाल्यांनी दालनाचे दोन भाग करावेत. एकात मांडी घालून बसणारे, एकात पाय लटकते सोडून जेवणारे. काही टेबलं बॉर्डरवर ठेवावीत. एकाच गृपातले दोन्ही प्रकारचे लोक त्यावर जेवतील - आपापल्या आवडीनुसार टेबलाची साईड पकडून. Inclusivity ही साधली जाईल. एकमेकांच्या सवयी निरखल्यावर कदाचित आपली मूळ पद्धत सोडून दुसरी पद्धत अंगिकाराविशी वाटू शकेल.

एकमेकांच्या सवयी निरखल्यावर कदाचित आपली मूळ पद्धत सोडून दुसरी पद्धत अंगिकाराविशी वाटू शकेल >>> लव्हेरियाच्या जंतूंचा प्रादुर्भाव वाढला असेल.

जंतूंचं काय? काहीपण बोलुन राहिला मामी तुम्ही! रात्री गेस्ट लोकं गेल्यावर खुर्च्या टेबलवर कुशन अप करुन खाली झाडलोट करतात तशी ताज मध्ये ही करतच असतील ना. खाली रोंबा फिरेल फारतर. तर त्या कुशनवरुन जंतू बाहेर पडतील आणि टेबलावर बागडतील ना! बाकी उद्या कुशनच्या खुर्च्यांची अदलाबदल झाली तर? मी काय म्हणतो, काळ्या आणि पांढर्‍या कुशन करा. मळखाऊ असल्या की घाण ही दिसायची नाही. सगळं करायचं तर पद्धतशीर करा.

मला आठवतं की अनेक दशकांपूर्वी पुण्यातील ब्लु डायमंड या एकमेव पंचतारांकित हॉटेलात, पाटावर पंगत वाढायचे!!! सहज आठवलं म्हणून!!!

पाटावर पंगत वाढायचे!!! >> पाटावर वाढायचे म्हणजे खाणारे पाटावर बसायचे की खाद्यपदार्थ पाटावर वाढायचे?

पाटावर वाढायचे म्हणजे खाणारे पाटावर बसायचे की खाद्यपदार्थ पाटावर वाढायचे? >>>खाणारे खुर्चीवर मांडी घालून आणि खाद्यपदार्थ पाटावर Rofl

Conclude करा कुणी तरी आता.
हायजीन हा मुद्दा अगदी बरोबर आहे.
1. ग्राहकांना वेगवेगळ्या कक्षात नेऊन नखं, दात हात तपासणी करण्यात यावी.
2. हॉटेलमध्ये प्रवेश करताना decontamination chamber मधून प्रवेश करावा लागेल. तिथे शॉवर घेऊन मग बीन मधे असलेले स्वच्छ व नियमानुसार असलेले कपडे घालावे लागतील.
3. पादत्राणे काढून हॉटेलचे दिलेले हायजिनिक फूटवेअर घालावे लागतील.
4. प्रत्येक कस्टमरला स्वच्छ खुर्ची देण्यात येईल. जुनी खुर्ची decontamination साठी नेण्यात येईल..
5.. गेस्टला पायरिया नाही याची तपासणी करण्यात येईल. असल्यास त्यांना डॉक्टर कडे पाठवले जाईल. त्यांनी नकार दिला तर प्रवेश नाकारला जाईल.
6. काटे चमचे प्रत्येक वेळी लॅब मधे चेक केले जातील. किंवा प्रत्येक गेस्टला नवीन सेट दिला जाईल. वापरलेला फेकून दिला जाईल.
या सर्व चेक्सचे सर्टिफिकेट गेस्ट ला दिले जाईल.

पायरिया व्यतिरिक्त आणखी तपासण्या आवश्यक असतील तर नक्की केल्या जाव्यात.

काही लोकांना germaphobia असतो. नात्यातल्याच एकाला आहे. त्यांना जीवाणू व विषाणूंची भयंकर भिती असते. अनेकांना काउंसेलिंग वा मानसोपचार करावे लागतात. माझा नातेवाईक लग्नात वगैरे जेवतच नाही. कितीही आग्रह केला तरी. आपल्यापुरती स्वच्छ धुतलेली फळे, प्रोटीन बार, ड्राय फ्रूट्स आणतो व खातो. कुणाशी हस्तांदोलनही करत नाही.

अशा लोकांसाठी कुणी वर वर्णन केले हॉटेल उघडले तर काय चूक आहे ? माझा तर पूर्ण पाठिंबा असेल. ज्यांना हे आवडेल ते जातील.

दुसर्‍या एका हॉटेल ने सर्व कपडे काढून दिगंबरावस्थेतच जेवायचे असा नियम केला तर त्यालाही माझा पाठिंबा असेल. ज्यांना आवडते असे लोक जातील.

अस्सं नाही हं करायचं हायजिन चा मुद्दा आहे की नाही? वेगळं हॉटेल कशाला?

ममता कुलकर्णीचा व्हिडीओ आला. नवीन धागा येऊ शकतो एव्हढा वादग्रस्त आहे. हा कन्क्लुड करा.

दुसर्‍या एका हॉटेल ने सर्व कपडे काढून दिगंबरावस्थेतच जेवायचे असा नियम केला तर त्यालाही माझा पाठिंबा असेल. ज्यांना आवडते असे लोक जातील.
>>>>>

कायद्यात बसेल का असा नियम लावून एखादे हॉटेल काढणे. सेन्सॉर नाही का येणार यात?

सेन्सॉर येणार नाही कदाचित , पण असे हॉटेल उघडलेच तर गिर्‍हाइकाअभावी बंद पडेल. चाललेच तर पोलिस व इतरांचे हप्ते, 'समाजसेवकांचे' हप्ते, रिकामटेकड्या लोकांनी केलेल एफ आय आर यामुळे लवकरच बंद पडेल.

माझी मते
१ 'ताज' सारख्या ठिकाणी असणारे लिखित /अलिखित नियम सर्वांनीच पाळावेत.
२ एखादा नियम रिझनेबल आहे की नाही हे ठरवणे सर्वस्वी मॅनेजमेंट च्या अधीन असावे.
३ एखादा नियम जाचक वाटत असेल तर तिथे जाऊ नये.
४ आपण hard earned पैसे घेऊन गेलेलो असतो हे खरे असले तरी इतर लोकही पैसेच देऊन आलेले असतात, चिंचोके नव्हे.
५ त्या मुलीने रबरी स्लिप्पर्स, कानपुरी चप्पल घालून हे केले असते तरी हेच झाले असते. 'कोल्हापुरी चपलेचा अपमान झाला, चला ताज मध्ये राडा करूयात' वगैरे नको.

Pages