एटीकेट्स vs कम्फर्ट – ताज हॉटेलमध्ये मांडी घालून बसण्यास मनाई.

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 October, 2025 - 15:39

सोशल मीडियावर गेले दोन दिवस या चर्चेने जोर धरला आहे.
एक महिला सलवार कमीज आणि कोल्हापुरी चप्पल या पेहरावात ताज हॉटेलमध्ये जेवायला गेली. तिथे एका खुर्चीत माय लाईफ माय कम्फर्ट म्हणत मांडी घालून जेवायला बसली. ते पाहून ताजच्या मॅनेजरने तिला हटकले. इतर ग्राहकांना याचा त्रास होत आहे सांगून तिला तसे बसण्यास मनाई केली. तिच्या कोल्हापुरी चप्पलवर सुद्धा कॉमेंट केली.

तिने या सगळ्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला आणि त्यावर दोन्ही बाजूने घमासान चर्चा होत आहे.

सविस्तर बातमी ललनटॉप वर इथे बघू शकता.
https://youtu.be/h-Cme3L3aTw?si=ScpSSvBxSLRJSE5O

त्या महिलेचा ओरिजनल व्हिडिओ इथे बघू शकता.
https://youtube.com/shorts/oBOjfrM6xsk?si=NkbdeQnDi9RiAH-8

वादाला दोन बाजू आहेत.

पहिली बाजू –

जर एखादा ग्राहक पादत्राणे काढून मांडी घालून खुर्चीत जेवायला बसत असेल, जेवतानाची ती पोजिशन त्याला कंफर्टेबल वाटत असेल तर त्यात गैर काय आहे? त्याला तो हक्क मिळायला नको का?

काहींची उंची कमी असल्याने पाय खाली टेकत नाहीत किंवा ताणले जातात आणि पोजिशन अजून अनकंफर्टेबल होते त्यांना मांडी घालून बसायचा पर्याय एखादे फाईव्ह स्टार हॉटेल देऊ शकत नसेल तर काय फायदा पैसे खर्च करायचा?

काहींच्या मते पादत्राणे काढले तरी पाय बसायच्या सीटवर ठेवणे चूकच. पण मांडी घालून बसतो तेव्हा पायाचे तळवे आडवे होतात आणि ते सीटवर टेकवले जात नाहीत असे एक निरीक्षण.

आणखी एक भावनेला हात घालणारा मुद्दा म्हणजे मांडी घालून जेवायला बसणे ही भारतीय बैठक आहे. भारतीय परंपरा आहे. आज यालाच भारताच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये हे एटीकेट्समध्ये बसत नसल्याचा शिक्का मारला जातोय हे दुर्दैवी आहे.

जर ती महिला बडे बाप की बेटी किंवा एखाद्या मोठ्या राजकीय घराण्यातील असती तर...

दुसरी बाजू -

तुम्ही ज्या जागी जाता तिथले नियम तुम्हाला पाळावे लागतात. ते पाळू शकत नसाल तर तिथे जाऊच नये.

अर्थात असे नियम तिथे लिखित स्वरूपात आहेत की नाही याची कल्पना नाही. तसेच त्या नियमांची ग्राहकांना आधीच कल्पना देण्यात येते का याचीही मला कल्पना नाही.

पण एखादी खाजगी जागा आपले शिष्टाचाराचे नियम लाऊ शकते हा मुद्दा काही अंशी पटतो.

मी काही अंशी म्हटले आहे कारण मनाने मला पहिलीच बाजू जास्त जवळची वाटते.

सार्वजनिक जागी तारतम्य बाळगावे हे माझेही मत आहे. पण मांडी घालून बसणे हे तारतम्य सोडून वागणे मला वाटत नाही. अर्थात याबाबतीत काय चूक आणि काय बरोबर हे आपण ज्या वातावरणात वाढलो, आणि ज्या निकषांची फुटपट्टी लाऊन जगलो त्यावर बरेचदा अवलंबून असते. त्यामुळे कित्येकांना हे मॅनर्सलेस वाटू शकेल. पण तटस्थ दृष्टीने पाहता जी आपली मूळ परंपरा आहे तीच आधुनिक एटीकेटच्या निकषावर चुकीची ठरते याचा खेद हा वाटतोच.

असो, काहीना हा एकूणच त्या महिलेचा स्टंट वाटत आहे. तिने जाणून बुझून वाद होईल हे बघितले असेही काही म्हणत आहेत.
असेलही.
हल्ली काहीही शक्य आहे. पण ताज मॅनेजमेंटने घेतलेला आक्षेप तर खरा होता.
जर तो तुमच्या बाबतीत घेतला गेला असता तर तुम्हाला तो खटकला असता का?
तुम्ही ताजमध्ये जेवायला गेले असताना तुमच्या शेजारच्या टेबलवर कोणी खुर्चीत मांडी घालून जेवायला बसले असते तर तुम्ही स्वतः त्यावर आक्षेप घेतला असता का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतक्या मोठ्या हॉटेलच्या डायनिंग हॉल मध्ये एक व्यक्ती आपल्या टेबल खाली ६०-७० टक्के दडलेल्या खुर्चीवर पाय मुडपून बसली असेल, आणि गपगुमान जेवत असेल तर मुद्दाम वेटींग स्टाफ 'ओ पाय खाली करा ' सांगतील, ते तेवढेच लक्ष ठेवून असतील असं वाटतं का?
चपला आहेत तर प्रवेश बंदी ही आता शिरतानाच करतील. टेबलवर जेवण दिलं आणि मग काही कारणाने लक्षात आलं तर ग्राहकाला कोण कानकोंडं करेल?
आता ग्राहकाने लक्ष वेधून घ्यायला काय केलं असेल ते बाहेर येणार नाही. हॉटेल मॅनेजमेंट लवकरात लवकर प्रकरण बातमीतून गायब कसं होईल ते बघेल. आपला मुद्दा बरोबर असला तरीही.

जेन्युएन केस मध्ये दोन्ही पार्टी कडून सामोपचाराने काय ते झालं असतं वाटलं.

आता पबमधे चालतील असे कपडे घालून फ्युनरला गेलात तर आमच्या गावातही पब्लिक नावच ठेवेल.
>>>>

पब आणि फुनरल अशी टोकाची उदाहरणे चर्चेत घ्यायला नको.

लग्नाची रिसेप्शन पार्टी आहे समजा त्यात काहींनी वेस्टर्न आणि तोकडा पेहराव केला आहे. जे पार्टीत हजर असलेल्या ज्येष्ठ सभासदांना आवडले नाही.
आता सांगा कोण चूक आणि कोण बरोबर.
आमच्या घरात मी असे सीन बघितले आहेत.

रानभूली,
मी स्पष्टच लिहीले आहे की ग्राहक म्हणून तक्रार करता येतेच. आता तुमचा प्रश्न >>नक्की म्हणायचेय काय ? >> तर दोन्ही प्रकारांसाठी वेगवेगळे प्रोटोकॉलही आहेत. 'अ' पर्याय निवडला तर त्या सोबत जे संकेत असणार ते पाळावे लागतात आणि 'ब' पर्याय निवडाल तर त्या सोबतही काही संकेत असणारच आहेत. जपानमधेही खाली बसायची व्यवस्था वेगळे नियम, वर बसायची व्यवस्था वेगळे नियम असतात.
खरोखर देहाच्या मर्यादा म्हणून सूट हवी असल्यास तसे नीट सांगितले तर सामावून घेतले जातेच. मात्र ते वेगळे आणि उगाच कोल्हापुरी चप्पल, मांडी घालून जेवणे वगैरे कळीचे शब्द वापरुन ड्रामा वेगळा.

टेबलवर जेवण दिलं आणि मग काही कारणाने लक्षात आलं तर ग्राहकाला कोण कानकोंडं करेल?
>>>>>

आयडियली करायला नाही पाहिजे म्हणून केलेच नसेल असे नाही ना?

आणि तुम्ही काही कारणाने म्हटले तसे जर इतर ग्राहकांनी नंतर तक्रार केली असेल तर हे नंतर घडण्याची शक्यता आहेच.

कोल्हापुरी चप्पल, मांडी घालून हे कळीचे शब्द... +१ Lol आपण ही दोन घटका करमणूक करावी.

कोल्हापुरी साज, नाही बांगडीची लाज
आता तुम्हीच हौस ही पुरावा!!! पुरावा!! पुरावा!
मांडीवरी ... अहो मांडीवरी ... मटण पुरी मला खिलवा!

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 October, 2025 - 07:17>>
मी वर तेच तर लिहिलेय ना की भारतात स्वतःच्या अशा वेगवेगळ्या परंपरा + वेस्टर्न-आधुनिक समज-गैरसमज यातून बरेच काही घडते.
आता भारतीय लग्नाचे रिसेप्शन तर तिथे साड्या नेसलेल्या स्त्रीया म्हटल्या तरी केवळ पदर घेण्याची पद्धत आणि ब्लाऊजची फॅशन यातच किती वैविध्य असते. थोडक्यात ऑफेंड व्हायचेच ठरवले तर ब्लाऊज किती छोटासा आणि कसा पदर घेतला यावरुनही होवू शकतेच.
डोळ्यांना सवय नाही, मनात पूर्वग्रह आहे तर ड्रेस तोकडा नसला तरी इतर कारणांनी खटकेल. ए लाईनचा लांब हाताचा ड्रेस पण पाठ खोल/उघडी म्हणून खटकेल, असेच वी नेक - गळा खोल, पायघोळ -एका बाजूला स्लीट -मांडी उघडी , ऑफ शोल्डर- खांदे उघडे म्हणून. यात कोण चूक कोण बरोबर ?
माझे म्हणणे घरच्या कार्यक्रमात एक संध्याकाळ तोकडे कपडे घातले म्हणून आपल्याच लेकीबाळींवर नाराज होवू नका. तुम्हाला हे काहीच सवयीचे नाही, खटकले ठीक आहे मात्र संवाद थांबवू नका. त्यांच्याशी बोला, तुम्हाला वाटलेली काळजी व्यक्त करा, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. त्यांच्या जगात काय सुरु आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. घरातून बाहेर पडताना तुमच्या मर्जीचे अंगभर कपडे आणि मग बाहेर कुठेतरी स्वतःच्या मर्जीचे तोकडे कपडे घालून वावर असे असुरक्षित दुहेरी जगणे जगायला त्यांना भाग पाडू नका.

मांडीवरी ... मटण पुरी मला खिलवा ..

😂

झक्कास हाय की

या बंद्या रुपयाचं, या बाजिंद्याचं म्हननं काय हाय ?

मांडीवर I mean मांडी घालून ताजमधी पंगत… झालीच्च पायजेल 😜

इथे बरेच जण त्यांची जागा, त्यांचे नियम वगैरे म्हणताहेत... पण वर रानभुलींनी म्हटलंय तसं ते नियम बेसिक चार्टर राईट्सचे उल्लंघन करत असतील तर कायद्यापुढे टिकणार नाहीत. आणि महत्त्वाचं, ते काही आयसोलेशन मध्ये तिथे रहात नाही आहेत. स्थानिक सोयी सुविधांचा वापर करुन, करसवलती काय असतील त्या घेऊन त्यांचा धंदा करीत आहेत. जर त्यांचे नियम बहुसंख्यांना बदलून हवे असतील तर लोकल सरकारवर दबाव आणून त्यांना हॉटेल/ उपहारगृह चालवण्याचे परवाने न देऊ देणे, पाणी, वीज, रस्ते, मलनि:सारण इ. ज्या कम्युनिटी सुविधा आहेत त्या नाकारणे, लोकांनी बहिष्कार घालणे इ. करुन ते नियम बदलणे/ गळी उतरवणे करता येतेच.
पैसे मिळवण्याचा मार्ग आक्रसत नेला की सगळे बदलतात. बळी तो कानपिळी!
या पोस्टचा या केसशी काहीही संबंध नाही.

या पोस्टचा या केसशी काहीही संबंध नाही. >> Lol
अशा धाग्यावर इश्यू बेस्ड ऐवजी ऑब्जेक्टिव्ह मतं वाचायला आवडतात. ते पुढच्या अनेक धाग्यांना लागू होईल. Happy

धूळ पायाला लागते तर कपड्यांना सुद्धा लागूच शकते. >> पण मनाला धूळ लागू नये म्हणून जप हो श्याम!

#सानेगुरुजीफुलटॉस

समाजापुढच्या ज्वलंत प्रश्नावर छान मंथन होत आहे. मंथनातून काहीतरी चांगले घडतेच.

- समुद्रमंथनातून देवांना अमृत मिळाले, ते सर्व अमर झाले.

- South African रेल्वेतून non-white म्हणून बाहेर लोटण्यात आलेले मोहनदास पुढे “महात्मा गांधी” झाले.

- टाटांना विंग्रजांनी हॉटेलमधे येवू दिले नाही तर त्यांनी मुंबईला ताजमहाल हॉटेल बांधून दिले.

तस्मात् या मांडी घालून जेवणाऱ्या ताईंमुळे माजोरड्या पंचतारांकित संस्कृतीला चाप बसून ताजमहाल हॉटेलमधे लोक नीट जमीनीवर (मांडी घालून) बसून ताट-पाट मांडून, आवडीप्रमाणे वदनी कवळ घेता वगैरे म्हणून उदबत्त्यांच्या घमघमाटात जेवणाच्या पंगती उठवतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या भारतीय परंपरा आणि संस्कृतीला साजेसे.

पुढच्या स्टेपमधे टाटांच्याच एयर इंडियाच्या विमानातल्या खुर्च्या काढून लोड-तक्क्यांची बैठक करता येईल, नीट मांडी घालून बसता येईल. विमानात जेवतांना उदबत्त्या मात्र नाही लावता येणार, आग लागू शकते.

खूप महत्वाच्या प्रश्नावर जनजागृती होते आहे. लवकरच गल्लोगल्ली या पंचतारांकित हॉटेलवाल्यांचे थोबाड फोडण्याचे आंदोलन पेटेल आणि सर्वांना ताजमधे “मांडी घालून” जेवायचा सुदिन उजाडेल. वो दिन दूर नहीं.

मांडीताईंना आपला फुल्ल सपोर्ट. 👍

खाजवून खरूज काढण्यातला प्रकार आहे हा.

मला ताज चे बरोबरच वाटते. मी स्वतः जर ताज मध्ये भरपूर पैसे देऊन जेवायला गेलो तर समोरचा 'ताटात हात धुणे', 'चूळ भरणे', 'टेबल क्लॉथ ला हात पुसणे' वगैरे करत असेल तर मलाही आवडणार नाही.
बाकी या मुलीने मांडी घालून बसण्याच्या कृतीला 'पद्मासन' असे नाव दिले त्यावरून टार्गेट ऑडियन्स काय आहे हे कळते. ( भारतीय संस्कृतीच्या नावाने गळे काढणरे WA अंकल्स)

पुढच्या स्टेपमधे टाटांच्याच एयर इंडियाच्या विमानातल्या खुर्च्या काढून लोड-तक्क्यांची बैठक करता येईल > ते भारतीय पद्धतीच्या संडास चं तेवढं राहिलं. ( किंवा authentic असेल तर मुंबई न्यू यॉर्क फ्लाईट च्यापाण्याला पॅरिस मध्ये थांबताच होल वावर इस आवर ! )

एक मुद्दा कोणीही लक्षात घेतला नाही...पायांना येणारा वास..रस्त्यावरून येताना कितीही नको असले तरी धुळ वगैरे ऊडतेच पायावर.
कित्येक जणांच्या अंगाला सुधा नकोसा वास येतो. याच कारणांमुळे कदाचित पाय खाली सोडून बसायला सांगितले असेल

जेव्हढे भगवे कडवे आहेत तेव्हढेच त्यांच्या विरोधातले सुद्धा कट्टरच आहेत. कोणतीही घटना असू द्या, त्यांच्या ठराविक चष्म्यातूनच पाहिली पाहीजे हा आग्रह दोन्हीही कडे असतो. फक्त एका बाजूला भाषा उग्र असते, दुसरीकडे खिल्ली उडवल्यासारखी.

ती ताई हिंदुत्ववादी असेल किंवा नसेल, किंवा सेक्युलर असेल. मुद्दा कुणी काय "चप्पल" घालावी हा आहे. मला वाटलंच होतं कि टोकाचे मुद्दे येतील. त्यामुळे आधीच सांगितलेलं कि तारतम्य सोडून वितंडवादी येतील.

हपा उद्या पंचतारांकित हॉटेलमधे सीटबेल्ट पण लावणार का ? कानात बोळे पण घालायचेत का ? दारं घट्ट बंद करून ऑक्सीजन पण भरायचाय का ? Lol तसं असेल तर तुमचं म्हणणं मान्यच.

उद्या हाच वितंडा घालायचा म्हटला तर कमी कपड्यावरून जेव्हां त्या त्या व्यक्तीच्या वागण्याचे आपण समर्थन करू तेव्हां जग वस्त्रहीन होणार आहे अशा प्रकारची खिल्ली विरोधी पार्टी करणार. याला अंत नाही. सोशल मीडिया याच चर्चांनी भरलेला आहे. त्यातल्या त्यात अस्थानी सारकॅजम वाले मुद्दा सोडून भरकटण्यात अग्रेसर.

> पंचतारांकित हॉटेलमधे सीटबेल्ट पण लावणार का ? कानात बोळे पण घालायचेत का ? दारं घट्ट बंद करून ऑक्सीजन पण भरायचाय का ?
हो !
एखाद्या हॉटेल ने असे नियम केले तर ते योग्यच असेल. ज्यांना ते पाळायचे नासतील त्यांनी तिथे जाऊ नये. एखाद्या हॉटेल ने पुरुषांनी धोतर व टॉपलेस असावे व स्त्रीयांनी फक्त नऊ किंवा सहावारी साडीच नेसावी असा नियम केला तर तोही योग्यच आहे.

>>एखाद्या हॉटेल ने असे नियम केले तर ते योग्यच असेल. ज्यांना ते पाळायचे नासतील त्यांनी तिथे जाऊ नये. एखाद्या हॉटेल ने पुरुषांनी धोतर व टॉपलेस असावे व स्त्रीयांनी फक्त नऊ किंवा सहावारी साडीच नेसावी असा नियम केला तर तोही योग्यच आहे.<< +१
करेक्ट! व्हेन इन रोम..

मी अजुन गेलेलो नाहि, पण ऐकिवात आहे कि दक्षिणेतल्या काहि देवळात हाफपँट घातलेली असेल तर लुंगी लावल्याशिवाय प्रवेश देत नाहित. ते लोण इथल्या स्वामीनारायण टेंपल्समधे पण आलेलं आहे. त्यावर हुज्जत घालण्यात काहिहि अर्थ नाहि, शहाणे असाल तर...

स्वाती,
यात कोण चूक कोण बरोबर ? यावर आपण उत्तर दिलेच नाही. ज्येष्ठांना ते कपडे पटले नाहीत तर त्यांनी काय करावे हे इतकेच सांगितले.

लग्न समारंभाचे उदाहरण घेतले म्हणून पारंपारिक कपडे असलेल्यांना वेस्टर्न कपडे खटकले तर काय असा विचार आपण केला. तिथे वेस्टर्न कपडेवाल्यांना पारंपारिक खटकतील का नाही हा विचारच नाही केला.

फाईन डाईन हॉटेल मध्ये मात्र नेमका उलटा विचार करत आहोत. तिथे वेस्टर्न कपडे घालणारे ठरवणार आहेत की कोल्हापुरी चप्पल आपल्यात घ्यायची का नाही.

थोडक्यात यात काय चूक काय बरोबर ठरवताना जो तो आपापल्या फुटपट्टी लावून याकडे बघणार. नेमके एक उत्तर देणे अवघड.
त्यामुळे शक्य होईल तितके गोष्टी नियमात बांधू नये असे मला वाटते

अरे हो, तुमची वरची पोस्ट आता पुन्हा वाचून मला आता एक आठवले.
<<<< पबमधे चालतील असे कपडे घालून फ्युनरला गेलात तर आमच्या गावातही पब्लिक नावच ठेवेल.>>>>>

पण एकदा मी प्रेतयात्रेत सुद्धा सिक्स पॉकेट आणि फॅन्सी टीशर्ट घालून गेलो होतो. मुद्दाम नाही तर शुक्रवारी थेट ऑफिसमधून बातमी कानावर आली तसे जावे लागले. पण मला नाही वाटत कोणाला माझ्या कपड्यांनी काही त्रास झाला असावा. किंवा झाला असला तरी त्याची पर्वा मी करावी.
थोडक्यात इथेही फिक्स असा नियम नाही जो पाळावाच लागतो.

एक मुद्दा कोणीही लक्षात घेतला नाही...पायांना येणारा वास..रस्त्यावरून येताना कितीही नको असले तरी धुळ वगैरे ऊडतेच पायावर.>> हा मुद्दा पटण्यासारखा आहे. कित्येकदा खुर्ची पुढे /मागे खेळण्याच्या प्रयत्नात खुर्चीच्या गादीला नकळत हात लागतोच जर आपल्या आधी कुणीतरी त्याचे चपलेत घामाटलेले पाय त्या खुर्चीच्या गादीवर घेऊन मांडी घालून बसून गेला असेल तर काय? याचा विचार करवत नाही....जस टेबल पुसलं जातं तशी खुर्ची पुसली जात नाही किंवा बदलली जात नही... बाकी त्या मुलीला बोलायचेच होते तर स्वतंत्र भारताचा नागरीक म्हणून कायद्याने दिलेल्या आचरण स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या अनुषंगाने बोलायला हवे होते., पण घटनेत माझ्या माहितीप्रमाणे 'भारतीय बैठक' अशा प्रकारची कोणतीही बैठक उल्लेखलेली नाही. त्यामुळे उद्या एखादा मुसलमान रोजे सोडण्याच्या बैठकीप्रमाणे, फाईव्ह स्टारमधे खुर्चीत गुडघ्यावर उकिडवा बसला आणि त्याने हाच वाद घातला तर त्यालाही तोच न्याय लागू असेल का? हे ही या निमित्ताने ठरवायला हवे.

फाईन डाईन हॉटेल मध्ये मात्र नेमका उलटा विचार करत आहोत. तिथे वेस्टर्न कपडे घालणारे ठरवणार आहेत की कोल्हापुरी चप्पल आपल्यात घ्यायची का नाही.
हा कांगावा आहे. आक्षेप कोल्हापुरी चपलेला नसून ते हायजिनिक नसण्याला आहे

दुसर्‍या एखाद्या फाईन डायनिंग हॉटेल ने चप्पलच (बूट नव्हे) घालून या अस नियम केला व लोकांनी स्वखुषीने पाळला तर तेही योग्य आहे.

. एखाद्या हॉटेल मध्ये पाटावर बसूनच जेवायची सोय असेल., (मी कराड ला शिकत असताना घरगुती खाणावळीत पाटावरच बसत असत) तर बूट मी घालूनच पाटावर बसलो तर? इथे न्यू जर्सीत देवळात जाताना चप्पल काढून जावे लागते, गुरुद्वारात डोके झाकूनच जावे लागते, चर्च मध्ये मात्र बूट ठेवूनच जावे लागते. मी चर्च मध्ये गेलो व चप्पल बाहेर ठेवून अनवाणी पायाने गेलो तर ते इतराना यक्कच वाटेल. देवळात बूट घालून जाणे व चर्च मध्ये चप्पल काढून जाणे दोन्हीही वेडेपणाचे आहे.

प्रार्थनास्थळांची उदाहरणे इथे घेऊ नये असे वाटते. त्यात श्रद्धेनुसार कोणीही आपले काहीही नियम घालू शकतो. ते नसतील मानायचे तर सोडून देता येतो तो धर्म. कोणाचे काही अडत नाही. पण हॉटेलबाबत मनमानी नको. त्यात फ्लेक्सिबिलीटी हवी.

आक्षेप कोल्हापुरी चपलेला नसून ते हायजिनिक नसण्याला आहे
>>>>
ते कसे? म्हणजे इतरांना कसा त्याचा त्रास?

आक्षेप कोल्हापुरी चपलेला नसून ते हायजिनिक नसण्याला आहे >> Rofl नियम आहे बास. वर त्याचं रॅशनेल आलं की सगळंच हास्यास्पद होत जातं.

बरीच माहिती मिळाली. ही माहिती सहजासहजी मिळू शकली नसती.
चप्पल घातल्यावर पायाला धूळ लागते. चप्पल घालणारी व्यक्ती ही धुळीतून येते मग ती सीईओ का असेना. शूज घातल्याने शूजला धूळ लागत नाही. ते जन्मतःच हायजेनिक असतात. विमान आणि फाईव्हस्टार यांचा पर्पज एकच असून विमानात सुद्धा लोक मांडी घालून बसायचा आग्रह करू शकतात. हॉटेल ही विकत घ्यायची सेवा नसून त्यांच्यात आणि प्रार्थनास्थळात काहीही फरक नाही. दोन्हीही मोफत किंवा विकत असू शकतात.

विमानात लोक जेवण्यासाठी जातात तर फाईव्ह स्टार हॉटेलमधे लोक सीट बेल्ट आडव्या आणि उभ्या रांगेत बांधून बसतात, इथे त्यांना हॉटेल सुंदरी जेवण सर्व करते. त्याचे टेबल पुढच्या सीट मधे असते. त्यामुळे दोन समान गोष्टीत तुलना अगदीच नैसर्गिक आहे.

हॉटेलने आक्षेप चपलेला लागलेल्या धुळीवर आहे असा खुलासा केल्याचे या चर्चेत समजले. बातम्यात काहीही खोटं सांगत होते कि अन्य ग्राह़कांना आक्षेप आहे.

खरंच या माहितीबद्दल किती आभार मानावेत समजत नाही. यात उपरोध नाही. अगदी मनापासून आभार सर्वांचे !
मायबोलीवर काही कायदे आउटडेटेड असल्याने बदलावेत अशा अर्थाच्या चर्चा वाचल्याचे आठवते. पण एव्हढी बहुमूल्य माहिती मिळाल्यावर आपले ज्ञान कुठे सांडावे ?

स्मशान भूमी आणि हॉटेल यातही काहीही फरक नाही, दोन्हीकडे माणूस विकतच्या सेवा घ्यायला जात असतो ही जी माहिती मिळाली ती खरोखर अभिनव होती.

स्वाती२ च्या पोस्टी पटल्या. अमितवची पहिली पोस्टही.

चारचौघात सभ्यतेचे संकेत पाळावे व या बाबतीत If you want to err, it’s better be on conservative side हेमावैम.

त्यातून काही संकेत आपल्याला पटले नाही तर काही तरी क्रिएटीव्ह करून निषेध करावा. उदा. टाटांनी प्रवेश मिळाला नाही तर पंचतारांकित हॉटेल काढले. कधी काळी त्यांना प्रवेश नाकारणाऱ्यांचे वंशज झक्कत त्या हॉटेलात राहतात.

मिडीयावर गळे काढून वास्तव बदलता येत नाही.

बाकी मटणासोबत पुरी खाऊ घालणाऱ्यांचा निषेध. मटण वडे/श्रीखंड पुरी झिंदाबाद.

प्रश्न स्पेसिफिकली कोल्हापुरी चप्पलचा नव्हता, स्लीपर्स, फ्लीप फ्लॉप्स किंवा Crocs चे सँडल्स घातले असते तरी हाच आक्षेप घेतला असता.
त्यामुळे भारतीय वगैरे पेक्षा प्रकार काय आहे चपलांचा/शूजचा तिथे घातलेला चालणारा हा मुद्दा आहे

रेड सिनेमात अजय देवगणच्या पायात चप्पल असते म्हणून हॉटेल का क्लब मध्ये प्रवेश नाकारल्याचे दाखवले आहे ना?

मुळात घरी जेवायला बसल्यासारखं खुर्चीवर मांडी घालून बसायचं असेल तर (ताज पार्सल देत असल्यास) घरी मागवून जेवावं. लोक काय फक्त जेवायलाच जातात का? एक विशिष्ट ॲंबियन्स पण एन्जॉय करतात ना? तो त्यांनी क्रिएट करायचा आहे सर्वांसाठी तर तो मेंटेन करणं ही तुमची पण जबाबदारी आहे. नाही तर मग ताज आणि गल्लीतला उडुपी यांत काय फरक आहे?

व्यवसायाचे स्वातंत्र्य - हॉटेलमधे कोणते पदार्थ ठेवायचे, स्टाफ कुठला ठेवणार, त्यांचा युनिफॉर्म काय असावा हे सर्व स्वातंत्र्य व्यवस्थापनाला आहे. आत इंटेरीअर काय असेल, टेबल्सची रचना कशी असावी , व्हेज कि नॉन व्हेज, काँटेनेन्टल डिशेस कोणत्या असतील, देशी कोणत्या हे सर्व हॉटेल ठरवणार हे स्वातंत्र्य त्यांना आहे.

ग्राहक पाहून मोफत सेवा ऑफर करणे किंवा पैसे आकारणे हे ही स्वातंत्र्य त्यांना आहे. कारण नुकसान ते सहन करणार आहेत. पैसे देऊन मिळणार्‍या सेवा सर्वांना सारख्याच मिळतील, त्यापेक्षा जास्त सेवा या विकत कि मोफत हे पूर्णपणे व्यवस्थापनावर अवलंबून असेल. अँबिअयन्स कसा असेल, कल्चरल प्र्रोग्राम कोणते असतील हे व्यवस्थापनच ठरवेल. कदाचित ग्राहकांच्या डिमांडप्रमाणे ते बदल करतील सुद्धा. पण तसे बंधन नाही.

माझ्या मते कायद्याने हे अभिप्रेत आहे. खुर्चीवर मांडी घालून बसू नका आणि चप्पल घालून येऊ नका हे पैसे देऊन सेवा घेणार्‍या ग्राहकाला सांगणे कायद्याला धरून नाही. बाकी पुन्हा पुन्हा लिहीण्यात अर्थ नाही. ग्राहक निवडायचा अधिकार सुद्धा मर्यादीत आहे. उद्या एखाड्या हॉटेलने विशिष्ट रंगाच्या ग्राहकांनाच प्रवेश मिळेल असा नियम केला तरी समर्थन करावे लागेल त्याचे.

>>Submitted by ऋन्मेऽऽष on 25 October, 2025 - 11:47>>
मी लिहिलयं की - चूक बरोबर कसे ठरवणार म्हणून कारण तुमचे कपडे हे वेस्टर्न आउटफिट म्हणून योग्य वाटले तरी पारंपारीक देशी डोळ्याला खटकू शकतेच.
देशात लग्न हिंदू पद्धतीने मात्र आम्ही किती आधुनिक हे दाखवायला म्हणून जेवायला पुरणपोळी पासून पास्ता पर्यंत सर्व काही ठेवतात तसेच कपड्यांचेही चालते. वर एकही वेस्टर्न पद्धतीचे लग्न-रिसेप्शन अटेंड न करता अमुक एक म्हणजे आधुनिक आणि योग्य असे पब्लीक स्वतःच ठरवूनही टाकते.
इथे असा काही प्रश्न येत नाही आमंत्रणासोबत ड्रेस कोड असतो. वधू पेक्षा वरचढ नको हा संकेत आहे. तुम्ही वेस्टर्न लग्नाला पैठणी नेसुन गेलात तर सगळा फोकस तुमच्यावर म्हणजे संकेतभंग झाला ना!
इथे हिंदू लग्नाला अमेरीकन लोकं बोलावले तर ते विचारतात की काय घातले तर योग्य होईल? आजकाल इथे ऑनलाईन मिळते तर बरेचजण देशी कपडे ऑर्डर करायची तयारी दाखवतात, त्याबद्दल सल्ले घेतात. त्यांना आम्ही कसे भारी वगैरे दाखवायचे नसते तर केवळ कुठे अजाणतेपणी संकेत भंग होणार नाही ना एवढीच काळजी असते.
आपल्याकडे देशात नियम पाळावे वगैरे नसतेच तिथे संकेत पालन वगैरे दुरची बात. आम्ही आधुनिक म्हणून दिखावा महत्वाचा मग आतुन कितीही प्रतिगामी विचार असले तरी चालते.
असो.

Pages