आठवणींची पन्नाशी : सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय

Submitted by कुमार१ on 10 September, 2025 - 02:53

यंदा म्हणजेच २०२५मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही ठळक घटनांना पन्नास वर्षे पूर्ण झाली. कालाचे अर्धशतक हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याने अनेक माध्यमांतून त्यांच्या आठवणी जागवल्या गेल्या. अशा त्या सन १९७५च्या काही निवडक घटनांच्या रोचक तर काहींच्या दुःखद आठवणींचे इथे संकलन करतो. त्यापैकी काहींचा त्रोटक उल्लेख आठवणींच्या या धाग्यावर विस्कळीत स्वरूपात पूर्वी केलेला आहे. आता त्या घटना विस्ताराने घेतल्यात आणि काही घटनांच्या संदर्भात मजेदार किश्शांचाही या लेखात समावेश केला आहे. तर अन्य काही घटना पूर्णपणे नव्याने घेतल्यात.

१९७५ हे वर्ष अनेक बाबतीत महत्त्वाचे ठरले होते. राजकारण, कला व क्रीडा, शिक्षणव्यवस्था, मानवी चुकीने झालेल्या दुर्घटना तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर काही राष्ट्रप्रमुखांच्या हत्या आणि काही देश स्वतंत्र होण्यासंबंधीच्या घटनांचा त्यात उल्लेख करता येईल. त्या अनेक घटनांची जंत्री करण्याऐवजी त्यातील काही निवडक घटनांवर प्रकाशझोत टाकतो. त्यात वाचकांनाही प्रतिसादातून भर घालता येईल.

कला-संस्कृती मंच
1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या महत्त्वाच्या, जनमनावर ठसा उमटवणाऱ्या आणि कालौघात आख्यायिका बनलेल्या तीन चित्रपटांची दखल घेऊ - मराठी, हिंदी व इंग्लिश या भाषांतील प्रत्येकी एक चित्रपट.

‘सामना’
राजकीय भ्रष्टाचार आणि सामाजिक शोषणाचे धाडसी चित्रीकरण करणारा हा मराठी चित्रपट.
रामदास फुटाणे निर्मित या चित्रपटाच्या पन्नाशी निमित्ताने ‘सामना 50’ हा विशेष कार्यक्रम पुण्यात साजरा झाला. तेव्हा झालेल्या फुटाणे यांच्या मुलाखतीतून बऱ्याच रोचक गोष्टी समजल्या. हा चित्रपट तयार करताना सर्वप्रथम त्यांनी लेखक म्हणून विजय तेंडुलकरांची निवड केली. तेंडुलकरांचे स्वतंत्रपणे केलेले हे पहिले पटकथालेखन. ते करताना त्यांनी श्रीराम लागू आणि निळू फुले यांना समोर ठेवले. दिग्दर्शक जब्बार पटेल तेव्हा चित्रपटात नवखे होते. परंतु फुटाणे यांना पटेल यांच्या कौशल्याबद्दल खात्री होती. सामनातील काही संवाद अजरामर झालेले आहेत.

हा चित्रपट प्रथम बर्लिन चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. पुढे भारतात त्याला तीन राष्ट्रीय आणि अन्य अनेक पुरस्कार मिळाले. या लेखनासाठी तेंडुलकरांनीअनेक साखर कारखान्यांना भेटी दिल्या होत्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शालिनीताई पाटील यांनी त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
Samna_film_poster.jpg

सामनासंबंधी माझी एक व्यक्तिगत आठवण. 1975च्या दरम्यान मी काही कारणास्तव चित्रपट बघणे सोडून दिले होते. ‘सामना’ चांगला चालल्यानंतर हळूहळू थेटरातून गेला आणि साधारण दीड वर्षाने आमच्या कॉलेजच्या स्नेहसंमेलनात दाखवला जाणार होता. तेव्हा माझ्या एका मित्राने मला खोलीवर येऊन सांगितले की तुझे चित्रपट न बघण्याचे ‘व्रत’ सामना पुरते तरी तू मोड आणि निदान आपल्या कॉलेजात तरी तो बघच !” त्याचे मी ऐकले आणि सामना बघण्याचा आनंद घेतला. चित्रपटातले दोन कलावंत डॉ. लागू आणि डॉ. जब्बार पटेल हे आमच्याच कॉलेजचे माजी विद्यार्थी असल्याने आमच्याकडे तर या चित्रपटाचे विशेष अप्रूप होते.
. .
शोले
तेव्हाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15/8/1975 रोजी शोले हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि चांगलाच आपटला होता !
कालांतराने मात्र त्याने अनेक विक्रमांचा इतिहास घडवला. रमेश सिप्पीनी त्यांच्या वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी दिग्दर्शित केलेल्या शोलेने अक्षरशः ‘छप्पर फाडके‘ असे अभूतपूर्व यश मिळवले. शोलेने फक्त त्याच्या निर्मात्यानाच नव्हे तर चित्रप्रदर्शनासंबंधीच्या इतर अनेक मंडळीनाही (किरकोळ विक्रेत्यांसह) मालामाल करून सोडले !

नंतर काही वर्षांनी शोलेबद्दल बोलताना अभिनेते ए के हनगल म्हणाले होते की या चित्रपटाचे खेळ कधी संपतच नाहीत. त्याचा शेवटचा खेळ कधी होईल हे आपण सांगू शकणार नाही !
आज पन्नास वर्षानंतरही त्यांचे उद्गार खरे मानावे लागतील कारण लवकरच शोले नव्या रंगरंगोटीसह चित्रपटगृहात येणार आहे . . .

‘Jaws’
यंदाच्या 20 जून रोजी Steven Spielberg यांच्या जॉज या चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण झाली. एका शार्क माशाने पाच माणसांवर हल्ला केल्याच्या सत्यघटनेवर आधारित कादंबरी Peter Benchley यांनी लिहिलेली होती. तिच्यावर आधारित हा चित्रपट आहे.

त्याचे दिग्दर्शक म्हणून स्टीव्हन स्पिलबर्ग या अवघ्या 26 वर्षांच्या तरुणाची निवड झाली.
स्पिलबर्ग यांच्यावर हिचकॉकचा चांगल्यापैकी प्रभाव होता आणि त्याचे प्रतिबिंब जॉजमध्ये पडलेले दिसते. चित्रपटात वैशिष्ट्यपूर्ण संगीताचा वापर केलेला आहे. पाश्चात्त्य संगीतातील E आणि F या दोन साध्या नोट्सचा वापर करून संपूर्ण चित्रपटभर मानसिक ताण आणि आत्यंतिक भीतीचे वातावरण उभे केलेले आहे.
jaws.jpeg

मी हा चित्रपट तेव्हाच्या ‘70 mm’ चित्रपटगृहात पाहिला होता आणि चित्रपटाच्या 81व्या मिनिटाला जेव्हा पडद्यावर शार्क समुद्रातून डोके वर काढतो तेव्हा संपूर्ण प्रेक्षागृह जोरात दचकलेले अजूनही आठवते. परदेशात एका 17 वर्षीय तरुणीला हा चित्रपट पाहिल्यानंतर cinematic neurosis हा मनोविकार जडला. तिला त्याचे झटके येत तेव्हा ती "Sharks! Sharks!" असे किंचाळायची आणि तिला फिट्स देखील यायच्या. या अभूतपूर्व केसचा ‘न्यू इंग्लंड जरनल ऑफ मेडिसिन’ या विज्ञानपत्रिकेत समावेश झालेला आहे. चित्रपट तिकीटबारीवर प्रचंड यशस्वी झाल्यामुळे स्पिलबर्ग यांचे नाव सर्वतोमुखी झाले.

क्रीडाजगत
भारतीयांना प्रिय असलेल्या क्रिकेट संदर्भातील एक महत्त्वाची घटना म्हणजे, इंग्लंडमध्ये प्रथमच पहिल्या जागतिक क्रिकेट चषक स्पर्धेचे आयोजन केले गेले. त्यामध्ये आठ देशांनी भाग घेतला. त्या प्रत्येकी एक दिवसीय सामन्यात प्रत्येक संघाला खेळण्यासाठी 60 षटके दिलेली होती. स्पर्धेतला पहिला सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान होऊन त्यात भारताचा पराजय झाला. अंतिम सामना वेस्टइंडीजने जिंकून क्रिकेटचा पहिलावहिला विश्वचषक पटकावला.
6375784.jpg
. .
राष्ट्रीय राजकारण
भारतात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू केली होती , जी सुमारे २१ महिने चालली. आणीबाणी लागू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी अनेक छापील वृत्तपत्रांमधून अग्रलेखाची जागा मजकूर नसलेल्या कोऱ्या चौकटीने सोडून देण्यात आली होती. या काळात अनेक राजकीय विरोधकांना अटक करण्यात आली आणि नागरिकांची मूलभूत स्वातंत्र्ये रद्द करण्यात आली होती. हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील क्लेशदायक काळ होता. हा विषय बहुचर्चित असल्याने त्यावर अधिक लिहीत नाही.

भारतीय राज्यव्यवस्थेसंबंधी 16 मे 1975 रोजीची महत्वाची घटना म्हणजे सिक्कीम हे भारताचे 22 वे राज्य म्हणून अस्तित्वात आले. भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर तिथली आधीची चोग्याल ही धार्मिक राजसत्ता संपुष्टात आली.

जागतिक दहशतवाद व हिंसाचार
त्या वर्षी आपल्या स्वातंत्र्यदिनीच आपल्या शेजारी देशात घडलेली घटना तर भयानकच. ती म्हणजे, बांगलादेशचे संस्थापक अध्यक्ष शेख मुजिबूर रहमान यांची काही कुटुंबियांसह झालेली हत्या. त्या दिवशी ते त्यांच्या खाजगी निवासस्थानातच राहत होते. लष्करातील काही अधिकारी बंड करून त्यांच्या घरात घुसले आणि जिन्यातच त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
तेव्हा त्याच्या सविस्तर बातम्या वाचलेल्या आठवतात. जेव्हा खुन्याने त्यांच्यावर बंदूक रोखली तेव्हा ते त्याला म्हणाले होते,
"अरे मी तुम्हाला हा देश मिळवून दिला आणि तू हे काय करतो आहेस?"

त्यावर त्याने फक्त बंदुकीच्या फैरी झाडल्या होत्या.
रेहमान यांच्या दोन कन्या त्या वेळी जर्मनीत असल्यामुळे बचावल्या.

तेव्हाची मार्च महिन्यातील अन्य हिंसक घटना म्हणजे सौदी अरेबियाचे राजे फैसल यांची त्यांच्याच पुतण्याने केलेली हत्या. फैसल हे प्रागतिक विचारांचे होते परंतु या सत्तापालटानंतर सौदी अरेबिया सनातनी शक्तींच्या ताब्यात गेला.

आंतरराष्ट्रीय युद्ध व शांतता
या आघाडीवर व्हिएतनाम युद्धसमाप्तीची पन्नाशी महत्वपूर्ण.
उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाम यांच्यात झालेल्या आणि वीस वर्षे चाललेल्या या जगप्रसिद्ध युद्धाची समाप्ती 30 एप्रिल 1975ला झाली. माझ्या शालेय जीवनात त्यासंबंधीच्या बातम्या सातत्याने वाचायला व ऐकायला मिळत.
Vietnam.jpg

वरील युद्धात उत्तर व्हिएतनामला रशिया व चीनचा पाठिंबा होता तर दक्षिण व्हिएतनामला अमेरिका आणि तिच्या समविचारी साथीदारांचा.हे युद्ध कोणी “जिंकले” याबद्दल संदिग्धता असून दुमत आढळते. युद्धात अमेरिकेची मानहानी झाली. व्हिएतनाम मोठे नुकसान सोसूनही सावरला.
https://www.britannica.com/question/Who-won-the-Vietnam-War
या दीर्घकालीन युद्धासंदर्भात सत्यजित रे यांच्या १९७०मधल्या प्रतिद्वंदी या चित्रपटातील एक प्रसंग अतिशय बोलका व प्रभावी आहे.
त्या चित्रपटात धृतीमान चटर्जीनी नायकाची भूमिका केली आहे. तो नायक नोकरीच्या एका मुलाखतीसाठी जातो तिथे त्याला विचारतात, “मागच्या दशकातली सर्वात महत्त्वाची आणि वाखाणण्यासारखी घटना कोणती?”
त्यावर नायक म्हणतो व्हिएतनाम युद्ध.

पुढील प्रश्नोत्तरे अशी होतात :
“मानव चंद्रावर उतरला यापेक्षा ती घटना महत्त्वाची वाटते?”
“होय” तो म्हणतो. अवकाश तंत्रज्ञान-प्रगती बघता चंद्रावर जाणे हे अपेक्षित होते. या उलट वरील युद्धामध्ये व्हिएतनामी लोकांचे अतुलनीय धैर्य दिसून आले. तंत्रज्ञानातील प्रगतीपेक्षा मला प्रचंड अशा मानवी धाडसाचे अधिक कौतुक वाटते”.


स्वातंत्र्य आणि देशनिर्मिती

त्या वर्षी जगभरात एकूण 7 देश पारतंत्र्यातून मुक्त होऊन स्वतंत्र झाले. त्यामध्ये अंगोला, सुरीनाम, मोझांबिक, पपूआ न्यू गिनी, Cape Verde, Comoros आणि São Tomé and Príncipe या देशांचा समावेश आहे.

वर्षविशेष
संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केले होते आणि ते साजरे करताना 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून प्रथमच जाहीर केला.

भीषण अपघाती दुर्घटना
बिहारमधील चासनाला येथील खाणीत झालेला भीषण अपघात हा भारतातील खाणींच्या इतिहासातील हा एक भयंकर अपघात होता. त्यात 375 कामगारांचा मृत्यू झाला. तेव्हा ही घटना वृत्तपत्रातून बऱ्यापैकी वाचल्याचे आठवते. ती खाण IISCO या स्टील उद्योगाची होती.
त्या घटनेवरील खटला 37 वर्ष न्यायालयात चालला आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा खाणीच्या संचालकांना दोषी ठरवण्यात आले होते परंतु त्यापैकी दोघांचा त्यापूर्वीच मृत्यू झालेला होता.
पुढे या दुर्घटनेचा विषय काही कलाकृतींनी हाताळलेला आहे. अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांचा काला पत्थर हा चित्रपट आणि अनिल बर्वे यांचे ‘11 कोटी गॅलन पाणी’ हे मराठी पुस्तक ही याची काही उदाहरणे. हे पुस्तक मी वाचलेले असून त्यातील काही प्रसंग हृदयद्रावक आहेत.

शैक्षणिक बदल
1974 पर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता अकरावीच्या अखेरीस होत असे. 1975पासून ही शैक्षणिक पद्धत बदलून इयत्ता दहावीची परीक्षा ही शालांत करण्यात आली. इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्षांना कनिष्ठ महाविद्यालय असे नाव दिले गेले. त्यामुळे सामान्य पदवीधर होण्याचा आकृतीबंध दहा + दोन + तीन असा झाला, जो आजपर्यन्त चालू आहे. 1975 च्या वार्षिक परीक्षेच्या महिन्यात जुनी अकरावी आणि नवीन दहावी असे दुप्पट विद्यार्थी शालांत परीक्षेला बसले.

या दोन शिक्षणप्रवाहांचा परिणाम पुढील किमान दशकभर जाणवत राहीला. दोन्ही प्रवाहातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातील प्रवेश ते पदव्युत्तर अभ्यासक्रम संपेपर्यंतच्या वर्षांत अनेक शिक्षणसंस्थांना ताण सहन करावा लागला. तसेच विज्ञान शाखेतील काही विद्यार्थ्यांना अपुऱ्या संधीमुळे अपेक्षित व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश न मिळाल्याने त्यांच्या कारकीर्दीलाही वेगळे वळण लागले.
. .
असा हा पन्नाशीच्या निवडक आठवणींचा देश-विदेशातील फेरफटका ! लेखात उल्लेख न केलेल्या अन्य काही घटनांसंबंधित जर कोणाच्या काही विशेष आठवणी असतील तर त्या प्रतिसादांतून जरूर लिहाव्यात.
****************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय छान आढावा आहे हा कुमार सर.
पुन्हा पुन्हा वाचावा, संदर्भ म्हणून जपून ठेवावा अस्सा आहे. याची मालिकाच व्हावी. __/\__

आमच्या सारख्यांचं जन्माआधीच्या घटनांबाबत काय होतं माहितीय का ? जालावरच्या माहितीच्या स्फोटामुळे आता आपल्याला जन्माच्या (आणि नकळत्या वयातल्या ) घटनांची पूर्ण माहिती झालीये (विशेषत: विसाव्या शतकातल्या) आणि आता त्यावर बिनधास्त व्यक्त व्हायला काहीच हरकत नाही असं वाटतं. पण जेव्हां ज्यांनी आपल्यापेक्षा जास्त पावसाळे पाहीलेत त्यांचं प्रतिपादन पाहण्यात येतं तेव्हां आपली माहिती किती तोकडी आहे हे समजतं. या दृष्टीने हे खूप महत्वाचं आहे. Happy

खूप छान आढावा आहे. ‘Jaws’ भारीच.
लेखातल्या काही घटना माहिती आहेत. पण 1975पासून ही शैक्षणिक पद्धत बदलूनची पहिल्यांदाच समजली.

<अपेक्षित व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश न मिळाल्याने >
पण त्या जागा दोन बॅचेस आल्यामुळे दुप्पट केल्या नाहीत का ?

* त्या जागा दोन बॅचेस आल्यामुळे दुप्पट केल्या नाहीत का ?
>>> नाही ना. एमबीबीएस प्रवेशाला काय झाले ते सांगतो.

नवी बारावी आणि जुने इंटर एकदम उत्तीर्ण होऊन तिकडे आल्याने महाराष्ट्रातील शासकीय मेडिकल कॉलेजच्या जागा तात्पुरत्या त्या काळासाठी वाढवण्यात आल्या. माझ्या पुण्यातील कॉलेजच्या मूळ जागा २००. पण त्या वर्षी फक्त शंभर जागा जादा वाढवल्या आणि या 100 जागांचा प्रवेश मूळ प्रवेशानंतर सहा महिन्यांनी झाला. त्यामुळे त्या शंभर मुलांना सतत ‘अनियमित बॅच’ असे म्हटले गेले.

(ही अनियमित बॅच सतत आमच्या सहा महिने पुढे राहिल्यामुळे आम्हालाही रुग्णालय प्रशिक्षणादरम्यान काही गैरसोयी सहन करावा लागल्या ते आठवते).

अभियांत्रिकीचे तपशील मला माहित नाहीत.

सुंदर लेख. Jaws ला तब्बल ५० वर्षं झाली याची जाणीव तुमचा लेख वाचल्यावर झाली.

तुमच्या चित्रपट संन्यासबद्दल कधीतरी वाचायला आवडेल, अर्थात तुमची हरकत नसेल तर.

सर्वांना धन्यवाद !

* चित्रपट संन्यासबद्दल
>>>> त्या निर्णयामागे काही कौटुंबिक परिस्थितीतून आलेला अपराधीभाव मनात होता. आपल्या जवळचं कोणी जर हलाखीच्या परिस्थितीत जगत असेल तर मग आपण करमणूक खर्च करावा का नाही असं काहीसं त्या वयात वाटून गेलं होतं. त्या वयात विचारांवर भावनेचे वर्चस्व बऱ्यापैकी असतं. तो संन्यास तसा दोन अडीच वर्षच टिकला.

तसंही त्या काळात वर्षाकाठी तिकीट काढूनचे दोन चित्रपट आणि कॉलेज संमेलनातले दोन, इतकंच काय ते चित्रपट पाहणं होतं.
एखाद्या गोष्टीवर जर आपण असा पूर्ण निर्बंध घातला तर आपल्या मित्रपरिवारात त्याचीच ‘जाहिरात’ होऊ लागते हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग तो निर्णय बदलला.
(कमी बघा, स्वस्तात मॅटिनीला बघा, हे पर्याय होतेच).

छान आढावा आहे.
सामना आणि शोले एकाच वर्षी आले होते हे माहिती नव्हतं. सामना लहानपणी बघितलाय. आता परत एकदा बघायला हवा. Jaws बद्दल ऐकून आहे. तोही बघितला पाहिजे. शोले असंख्य वेळा बघितला आहे.
शेख मुजिबूर रहमान यांची कुटुंबीयांसहित झालेली हत्या अंगावर काटा आणणारी आहे. मी या घटनेबद्दल इंदिरा गांधींच्या (पुपुल जयकर लिखित) चरित्रात पहिल्यांदा वाचलं होतं. मुजिबूर यांचा दहा वर्षांचा नातूही यात मारला गेला होता Sad
अकरावी ते दहावी शालान्त हा बदलही याच वर्षीचा हेही माहिती नव्हतं. असा काही मोठा बदल झाला की त्यामुळे काही वर्षं थोडाफार गोंधळ होणं स्वाभाविकच आहे. पण विद्यार्थ्यांचं नुकसान कमीत कमी होईल असे उपाय करायला हवेत.
द पोस्ट हा चित्रपट (स्पीलबर्ग, टॉम हँक्स, मेरिल स्ट्रीप) थेट व्हिएतनाम युद्धासंबंधित नाही, पण त्याच्याशी निगडित एका महत्त्वाच्या विषयावर आहे. अशा दीर्घकालीन युद्धाचे अमेरिकन समाजावर कशा प्रकारचे परिणाम झाले हे इतर काही कलाकृतींमधूनही समजतंच, पण मुळात ते युद्ध लढत राहणं हे अपरिहार्य नसतानाही ते वर्षानुवर्षे लढलं गेलं.
11 कोटी गॅलन पाणी हेही एकदा वाचायचं आहे.

आज ९/११ दुर्घटनेला २४ वर्षं झाली. मायबोलीवरचा सरासरी वयोगट बघता ती घटना अर्थातच आपल्या सर्वांच्याच आठवणीत स्पष्टपणे कोरली गेली असणार. आपल्या आठवणी या linear नसतात. आपल्या वयाचा आठवणींवरचा परिणाम बदलता असतो. म्हणजे ९/११ ही घटना मला आज खूप जुनी वाटत नाही. पण २०११ मध्ये मला '९३ चे मुंबई बॉम्बस्फोट किंवा '९१ ची राजीव गांधींची हत्या या घटना खूप जुन्या काळात घडल्यासारख्या वाटायच्या, जरी तेव्हा त्या वीसेक वर्षेच जुन्या होत्या.

धन्यवाद !
* द पोस्ट हा चित्रपट (स्पीलबर्ग,
>>>> चांगली माहिती दिलीत.
युट्युबवर डोकावलो परंतु तिथे फक्त त्याचा छोटासा जाहिरातपट आहे.
निदान तो पाहीन Happy

>>>>>>आपल्या आठवणी या linear नसतात. आपल्या वयाचा आठवणींवरचा परिणाम बदलता असतो.
फॉल्स मेमरीज सुद्धा असतात.

* आर्यभट्ट>>>
अरे वा ! किती छान आठवण आहे. माझ्या संग्रहात आर्यभट्टचे चित्र असलेली एक नोट मिळाली :
2 rupees.jpg

. .
पुढे 1983मध्ये इन्सॅट ही मोठी यंत्रणा आली.

छान आढावा लेख

Jaws इतका जुना आहे ह्याचा अंदाज नव्हता
वावे ने लिहिलेले आठवणी लिनीयर नसतात हे निरीक्षण इंटेरेस्टिंग आहे
उदाहरण दिलेले पुरेपूर पटले आहे

झकासराव
धन्यवाद !
संपर्कातून ई-मेल केली आहे ती पहावी.

१९७५ मधली कंप्यूटर संबंधी एक आठवण म्हणजे बिल गेट्सने "Micro-Soft" हा शब्द त्यांच्या पार्टनरला लिहीलेल्या पत्रात पहिल्यांदा वापरला. नंतर एक वर्षाने त्याचा ट्रेड मार्क झाला.

छान आढावा.
जॉ सिनेमाबद्दल आणि बदललेल्या शैक्षणिक धोरणाबद्दल माहिती नव्हते . बाकीच नेटवर वाचून थोडे माहीत होते.

आता पुढच्या पिढीला २०२० साली कोविडची साथ आलेली , सगळ कस बंद होत हा इतिहास वाटेल . माझ्या पिढीला प्लेगची साथीबद्दल वाटायच तस

* १. "Micro-Soft"
>> छान ! महत्त्वाची आठवण. ते microcomputer software चे लघुरूप होते. नंतर तो शब्द Microsoft असा सलग वापरला गेला.
. .
२. २०२० साली कोविडची साथ आलेली, सगळ कस बंद होत
>>> +१ . संसर्गजन्य रोगांच्या बाबतीत सांगायचे तर 1975मध्ये भारतात (नैसर्गिक व नवा) देवीचा शेवटचा रुग्ण आढळला. मग पुढे दोन वर्षांनी एकही नवा रुग्ण न आढळल्याने 1977मध्ये भारत देवीमुक्त घोषित केला गेला.