पाककृती स्पर्धा ३ - ग्रीन स्मुदी आणि चटकदार फृट टोकरी - कविन

Submitted by कविन on 3 September, 2025 - 12:21

चटणी करता मला व्रताची कहाणी ऐकावी आणि सांगावी लागली. आज म्हंटल "बाप्पा तू कुठे मुर्तीत असतोस? तू कुठे नैवेद्य खातोस?, सगळ तर आम्हीच असे नंतर संपवा संपवी करत असतो. " तो फक्त हसून म्हणाला, "प्रत्येकात मी असतो हेच ना आत्ता खरडून आलीस तिथे देवमाणसावर लिहीताना" म्हंटल बॉस पॉईंट है, इस बात पे. अब ये बताना आज मै क्या बनाके मेरे अंदर बसे तुम्हे खिलाऊ?

तो म्हणे गोडाने कंटाळलोय फार, कर असच काही हलक फुलक पण तरी पोटभरीचं आणि अगदी बॉर्डरलाईन स्पायसी टॅन्गी सॉल्टी आणि फिकुट गोडूस.

बाप्पाची अज्ञा झाली म्हणून कविन कामाला लागली.

घरात शिल्लक फळे होती प्रत्येकी १ सफरचंद, केळं आणि डाळींब आणि जोडीला होती २ संत्री
घरच्याच कुंडीतली तुळस, कढीलिंब आणि पुदीना त्यांचा वापर होण्याची वाट बघत उत्सुकच दिसले
फ्रीज मधे कोथिंबीर आणि दोन विड्याची पानेही शिल्लल होती मला संपवा म्हणत
बाकी बॉर्डरलाईन स्पायसी टॅंगी हवे बाप्पाला तर म्हंटल मिरी, दालचिनी पावडर, जिरे, आलं आणि लिंबू वापरु. फिकट गोडूस तसे फळांनी होईल म्हणा पण जोडीला २ खजूर आणि उलुशी बडीशेप घालू.
हे झाले बाप्पाच्या मनासारखे पण मला वाटले आपण सब्जा आणि चिया सिड्स पाण्यात भिजवून ठेवून वापरल्या तर वॅल्यु ॲडीशन होईल आणि बाप्पालाही आवडेल.
झालं सगळा तामझाम झाला.
आधी बाप्पासाठी स्मुदी केली. त्यासाठी सफरचंद आणि केळं चिरुन घेतले. चिया सीड्स आणि सब्जा ऑलरेडी पाणी पिऊन फुगून बसला होता. विड्याची पाने जाड शीरा काढून चिरली. पुदीना तुळस कढीलिंब न चिरता फक्त धुवून घेतला. कोथिंबीर चिरून घेतली. ही जरा जास्त चिरुन ठेवली कारण त्यातलीच त्या चटकदार फृट टोकरीत ढकलायची होती.

मग जरा प्रमाण मॅनेज केले. फळांच्या निम्मेच बाकी सगळे ग्रीन येतील तेव्हढेच घेतले आणि extra कोथिंबीर पुदीना फृट टोकरीसाठी बाजूला काढली.

मिक्सरच्या भांड्यात चिरलेली फळं, पुदीना तुळस कढीलिंब विड्याची पाने आणि कोथिंबीर घालून घुर्र केले. मग त्यात बिया काढलेले २ खजूर, मिठ, जिरे बडीशेप, दालचिनी पावडर,आलं आणि लिंबू रस घालून थोडे थोडे पाणी घालत घुर्र करत एकजीव केले. न गाळता ग्लासमधे ओतले. त्यात सब्जा आणि चिया सीड्स घातल्या. वर थोडे डाळिंबाचे दाणे घातले त्यामुळे फळांचा सहभाग ५०% हून ५२% ते ५३% वर गेला. मी गार पाणीच घालून ब्लेंड केल्याने वरतून बर्फ घालावा नाही लागला पण चालेल घातला तरी.

आता स्मुदीचा एक फोटो घेऊन ठेवली फ्रिजात आणि फृट टोकरीच्या कामाला लागले. सफरचंद, संत्री चिरुन मिक्स केली. डाळिंब सोलून एक चमचाभर दाणे स्मुदीवर सजवायला ठेवून बाकीचे टोकरीत मिक्स केले. चटकदार करायला मिठ, लिंबूरस, चाट मसाला, चिली फ्लेस आणि पुदीना कोथिंबीर घालून टॉस केले.

झाले आजचे उदरभरण माझे. आज दुपारी जरा हेवी झाले होते जेवण त्यामुळे डिनर लाईट करायचे ठरवले होते. बाप्पाने फोटो छान नाही आले तरी चव चांगली आहे म्हंटले त्यामुळे माझे पोट तिथेच भरले. बाप्पाला हवी होती तशीच चव जमल्यामुळे बाप्पा तृप्त आणि मी पण खुश.

तुम्ही करुन बघा आणि आवडते का सांगा ही स्मुदी आणि टोकरी
स्मुदी मधे पालकचे एखादे पान पण घातलेत तरी उत्तम.

InShot_20250903_214424912.jpgIMG_20250903_214609.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मूदीची चव पाणीपुरी च्या पाण्यासारखी किंवा जवळपास लागली का....तशी असेल तर हिट है.
फ्रुट टोकरी चाट मस्त.फोटो अजून चांगला आला असता डार्क बॅकग्राऊंड ला.

धन्यवाद सिमरन

लले, भरपूर बिझिनेस दिला इथल्या फेमस कुल्फीवाल्याला आणि झोमॅटोलाही. कटलरी देऊ नका लिहीलेलं वाचलं नाही त्यांनी म्हणून संपत्ती जमा झाली अशी Lol (हल्ली वाचणारे दुर्मिळ झालेत हे तू पण म्हणत असतेसच ना Wink )

मस्त कल्पना आहे. विड्याची पाने न घालता करून बघता येईल. विड्याची पाने घालून उगीचच तिखट होईल असे वाटले.

टोकरी दिसायला झकास आहे.

विड्याची पाने घालून उगीचच तिखट होईल असे वाटले.>> नाही होत तिखट. हलके स्पाईसी टेस्ट येते.

सिमरन, पापु पाणी नाही लागत या प्रमाणात केले तर पण आयडीया मस्त आहे. यात जलजीरा ॲड केले आणि पाणी वाढवले तर जवळ जाईल चव पापु पाण्याच्या

कविनताई किती ती कल्पकता दाखवायची, कौतुकाचे शब्द अपुरे पडतील इतकी, जियो.

जेवायला येते एकदा, इथे असतीस तर पटकन आले असते.

कविनताई>>> मी अंजूताई म्हणायला हवय का आता? Wink तुझ्या धाकट्या भावाला दादा म्हणते मी म्हणजे मी तुझी ताई नक्कीच नाही Proud

जेवायला येते एकदा, इथे असतीस तर पटकन आले असते.>> खरच ये. मी डोंबिवलीत येतच असते अधून मधून, तुला कळवते तेव्हा.

अग ते मजेत ग, इनोव्हेटिव्ह रेसिपीज करण्यात तू माझी ताई या अर्थी ग, दादा माणूस, बाप माणूस म्हणतात तसं ग.

एरवी स्मुदी आवडत नाही, पण ही आवडेल किंचित तिखट - आंबट असल्याने. वेगळी आहे ही पाकृ नेहेमीपेक्षा.
फ्रूट चाट / फ्रूट टोकरी आवडतेच नेहेमी.