पाककृती स्पर्धा ३- सफरचंदाची चटकदार चटणी - कविन

Submitted by कविन on 3 September, 2025 - 01:44

ऐका गणराया! तुमच्या समोर अर्पिलेल्या सफरचंदांची कहाणी
भक्तांनी तुमच्या पुढ्यात सफरचंद अर्पावीत आणि त्या डोंगर रुपी सफरचंदाचे काय करावे या चिंतेत असलेल्या यजमानांना या व्रताची वाट दावावी यापरते पुण्य ते दुसरे कुठले? तर यजमानांसाठी हा एक भाग इथे अर्पण
एका (माझ)गावात एक न-सुग्रण बाई रहात होती तिच्याकडे जमा झालेल्या सफरचंद रुपी डोंगराकडे बघताना तिला ती खराब व्हायची भिती वाटली.
जमलेल्या सफरचंदरुपी डोंगरातून
काही आपण खाल्ली
काही आल्यागेल्यात वाटून दिली
तरी काही उरली
त्याचे काय करावे चिंतेत असताना बाप्पानेच तिला गुगलकडे धाडले.
गुगलने - ॲपल पाय, ॲपल व्हिनेगरची रेसिपी दाखवली. न-सुग्रण बाईने त्या वाटेला जाऊ नये हे ठरवले. आणि साध्या सोप्या गोष्टी हुडकायला लागली.
स्मुदी, सॅलड आणि जॅम यांनी तिला भुरळ घातली पण पाच दिवसात खाल्लेल्या गोडाचा काटा बघून
स्मुदी आणि सॅलडला राखीव ठेवून जॅमवर तिने फुल्ली मारली.
सॅलड तर काय कधीही करता येईल, स्मुदी कुठे आता डिनरच्या वेळी असे म्हणत घरात असलेल्या पदार्थांचा स्टॉक चेक करुन न-सुग्रण बाईने तिच्या, 'ठरवायच एक करायचं आपल्याच मनाचं' या स्वभावाला अनुसरून बाप्पाला नमन करुन गुगलला चटणीची रेसिपी विचारली. गुगलने दिलेल्या रेसिपींमधून सोपी सुटसुटीत आणि साहित्य घरात सहज सापडेल अशी रेसिपी पक्की केली आणि सफरचंद खराब न होता संपवली. न-सुग्रण आणि तिच्या घरचेही ही चटणी खाऊन तृप्त झाले. बाप्पाही प्रसन्न होऊन,"माबोकर्स उदंड प्रतिसाद देतील आणि भरघोस मतांनी या रेसिपीला विजयी करतील" असा आशीर्वाद देते झाले.
त्यांच्या आशीर्वादने पावन झालेली ही कृती इथे देत आहे. उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका. चटणी करुन खा आणि खाऊ घाला. 'ट्टॉक' उद्गार काढत इथे प्रतिसाद द्यायला (आणि नंतर मतही द्यायला Wink ) विसरु नका.

WhatsApp Image 2025-09-03 at 10.37.37 AM.jpegसाहित्य फोटोत दिसत आहेच. तरी कोणीतरी खोडसाळपणा करुन विचारेल याचा अंदाज बांधून लिहूनही काढत आहे -
मुख्य कॅरेक्टर - २ सफरचंद बारीक फोडी करुन
सहाय्यक भुमिकेत - अर्धा कांदा (optional)
फोडणी साहित्य - तेल, मोहरी, जिरे, मेथी, बडीशेप, अगदी छोटा तुकडा दालचिनी, लवंग, हळद, हिंग
मसाले - धणे जिरे पुड, दालचिनी पावडर, काळी मिरी ओबड धोबड कुटून , किसलेले आले, मिठ, लिंबू रस, लाल तिखट, गूळ
हे प्रमाण मात्र वर फोटोत दिसत आहे तसेच अर्धा पाव चमचा/एक चमचा घ्यावे आणि नंतर वाटल्यास चवीनुसार ॲडजस्ट करावे.

कृती:
एक पॅन घ्यावा
त्यात फोडणी साठी तेल घालावे
तेल तापले की मोहरी जिऱ्याची आहुती द्यावी - ते तडतडेल की मेथी, बडीशेप, दालचिनीचा अगदी छोटा तुकडा, लवंग, हिंग हळद असे एक एक साहित्य हवतात अर्पण करावे. त्यावर चिरलेला कांदा घालून झाकण ठेवून त्याचा अहं मोडून त्याला नरम करावा
एकीकडे दोन सफरचंद चिरुन घ्यावीत व अहंकार लोप पावायला त्याच पॅन मधे परतावी. त्यात गूळ आणि लिंबूरस वगळून उरलेले सगळे मसाला सदरात नमुद केलेले जिन्नस घालून परतावे. कांद्याचा अहंकार मोडल्याने तो सफरचंदाला यथोचित मार्गदर्शन करेलच असे वाटले तरी अगदी पाव वाटी कोमट पाणी घालावे. सफरचंद ताजे आणि रसाळ असेल तर पाणी न घालताही त्याचा अहं लोप पावेल. पुर्ण अहं मोडला नाही तरी चालेल.
तर आता सफरचंद, कांदा आणि मसाले असे एकरुप एकतान झाले की त्यात लिंबू रस आणि गूळ घालावा व अगदी दोन तीन मिनिटात गॅस बंद करावा.
पाणी घातले असेल तर मात्र ते जरा आटू द्यावे आणि अंगासरशी रस आला की मग गॅस बंद करावा आणि स्पायसी टॅन्गी सफरचंद चटणी झाल्याचे घरात डिक्लेअर करावे आणि बाप्पाचा आशीर्वाद समजून पानातली डावी बाजू या चटणीने सजवावी.

WhatsApp Image 2025-09-03 at 10.18.07 AM.jpeg

अशा रितीने दोन सफरचंद सत्कारणी लावावी आणि माबोच्या गणपती पुढे ठेवावी. तो देखील मोदक पेढे - गोड खाऊन कंटाळला असेल, त्यालाही चव बदल आवडेल आणि त्याच्या पुढ्यात भक्तांनी लावलेल्या सफरचंदाच्या राशीचा असा उद्धार बघून तो, ही चटणी चाखून 'ट्टॉक' असा उद्गार काढेल ते ऐकून तृप्त व्हावे ).

'सफरचंदाची चटकदार चटणी' खाऊन जसा त्या एका (माझ)गावच्या न-सुग्रण बाईला देव प्रसन्न झाला तस तो तुम्हा आम्हा सगळ्यांना होवो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण
इदं न मम म्हणत भात/पोळी/ठेपले कशाही बरोबर हे पानात वाढून घ्यावे आणि गट्टम करावे
फ्रीज मधे आठवडाभर टिकते म्हणे पण दोनच सफरचंदांचे केलेत तर किती काळ टिकते बघण्यासाठी उरतच नाही.

* variations
कांदा वगळता तरी हरकत नाही
सहाय्यक म्हणून लसूण चिरुन घातलात तरी चालेल
सफरचंद फोडी न करता किसून घेतले तरी चालेल
मिठ - साधे/पिंक सॉल्ट/ पादेलोण यापैकी कोणतेही घ्यावे किंवा कॉंबिनेशन वापरावे
लिंबा ऐवजी आमचूर चालेल
व्हिनेगर देखील घालू शकता शेवटी
जिरावन मसालाही आहुतीत चालून जातो
गरम मसाल्याचे जिन्नस फोडणीत असल्याने ते घरात नसल्यास अगदी थोडा गरम मसालाच वापरुन बघावा, सफरचंदाची काही हरकत नाही.
काही स्किप करावे वाटले तरी चालतय पण चव बघून गोष्टी ॲडजस्ट कराव्यात. शेवटी तिखट आंबट गोड अशी मिश्र चव जिभेवर यायला हवी आणि खाऊन टॉक्क उद्गार आपोआप बाहेर पडायला हवा बाकी चालतय इकडे तिकडे झाले तरी.

सरते शेवटी:- करुन बघा, खाऊन बघा, इथे प्रतिसादात कळवा .

बाप्पाची कृपादृष्टी सगळ्यांवर अशीच राहो ही प्रार्थना.

इदं न मम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक फोडींची व एक किसलेली असल्याने टेक्स्चर पूर्ण वेगवेगळं दिसतेय.>> हो अगदी

सगळ्यांना धन्यवाद. करुन बघितलीत की सांगा आवडते का

स्वातीने केलेला छुंदा टेंप्टींग आहे. करुन बघेन मी पण

यातल्या बडीसोप, दालचिनी, लवंग, धणे, मीरे या पदार्थांनी छान चव येईल नक्की.>> हो बॅलन्स होते तिखट आंबट गोड

सर्वच छान दिसतंय......
पण खोडसाळपणा करुन विचारतो की हिरवी आंबट सफरचंद मिळत असताना लिंबूरस पिळून पिकलेल्या गोड सफरचंदांची चटणी कशाला? किंवा दोन्ही मिळूनही करता येईल ना?
- एक डोंबिवलीकर.

पण खोडसाळपणा करुन विचारतो की हिरवी आंबट सफरचंद मिळत असताना लिंबूरस पिळून पिकलेल्या गोड सफरचंदांची चटणी कशाला? किंवा दोन्ही मिळूनही करता येईल ना?
- एक डोंबिवलीकर.>>> Lol गणपतीत लाल जास्वंद वहायचं तर लोकं लाल सफरचंद घेऊन आली. वाटून दिली प्रसाद म्हणून तरी उरली ती अशी सांपवली Lol

Pages