
मित्रहो,
या उपक्रमासाठी लिहिताना मनात खूप चलबिचल झाली. आपल्या आयुष्यातील आपल्याला अभिमानाचा वाटणारा क्षण आपण स्वतःच शब्दांकित करताना त्यात संकोच होणार आणि आत्मस्तुतीचा दोषही येणारच. तरीसुद्धा हा सगळा विचार करूनच संयोजकांनी हा विषय ठेवला असणार !
म्हणून तो दोष पत्करून चार शब्द लिहितो. प्रत्येकाच्या आयुष्याप्रमाणे असे काही मोजके प्रसंग माझ्याही आयुष्यात आलेले आहेत. त्यातला योग्य तो इथे निवडताना एक विचार केला. व्यक्तिगत, कौटुंबिक किंवा व्यावसायिक जीवनातील प्रसंग लिहिण्याऐवजी जर आपल्या सर्वांशी संबंधित असलेल्या आपल्या लाडक्या संस्थळासंदर्भातच घडलेला एक प्रसंग या उपक्रमात लिहिला तर ते समुचित ठरावे. म्हणून इथल्या एका जुन्या घटनेची ही पुनर्भेट आहे.
मग करतो सुरुवात त्या कथनाला . . .
30 जून 2023चा तो दिवस. सकाळी अकराची वेळ. रिमझिम पाऊस पडून गेलेला आणि एकंदरीत कुंद असे वातावरण. कामातून जरा फुरसत मिळाली म्हणून निवांतपणे पाय पसरून बसलो होतो आणि सहजच चाळा म्हणून मोबाईल हाती घेतला. पाहतो तर तिथे इ-मेल आल्याची पूर्वसूचना दिसत होती. मग इनबॉक्स उघडली. सकाळी १०.५९वाजता आलेली तिथे दिसणारी इ-मेल मायबोलीच्या संपर्कातून आलेली आणि त्याच्या अग्रभागी ठळक अक्षरात लिहिलेले होते :

क्षणभर चक्रवून गेलो. पटकन लक्षातच येईना की मी कोणाला काय व कधी मदत केलेली आहे, की त्याचे त्याने एवढे दशलक्ष आभार मानावेत ?
मग अत्यंत उतावीळपणे खालच्या चौकटीतील ई-मेल वाचू लागलो. इ-मेल एका मायबोलीकर असलेल्या रुणाची. त्याने त्यावर्षीच्या २४जून रोजी त्याच्यावर गुदरलेल्या तब्येतीच्या प्रसंगाचे ओघवते वर्णन केलेले, आणि पुढे रुग्णालयात आलेला अनुभव, तपासणीत झालेली दिरंगाई, त्यानंतरचे योग्य उपचार असे करत करत इ-मेलच्या शेवटाकडे आलो आणि तिथला भावस्पर्शी मजकूर असा होता :
वरचे सगळे पत्र वाचता वाचताच माझ्या डोळ्यातून किती आनंदाश्रू गळले असतील याची गणती नाही ! आनंद, भावनातिरेक, काहीसा थरकाप या अवस्थेत अक्षरशः सुन्न झालो होतो. एव्हाना आपल्या वाचकांच्या कदाचित लक्षात आलेच असेल की ही इ-मेल शशांक पुरंदरे या आपल्या मायबोलीकर मित्राची होती.
या घटनेचा अर्थातच मनापासून आनंद वाटला. परंतु इथे अभिमान वगैरे शब्द न वापरता मी म्हणेन की, आपण या संस्थळावर करत असलेल्या आरोग्यविषयक लेखनाचे चीज झाले असे मात्र मनापासून वाटले. किंबहुना तो क्षण कृतार्थतेचा होता. एखाद्या लेखकाला याहून अधिक काय हवे असते?
इथल्या एखाद्या लेखनाचा स्वतःला झालेला उपयोग संबंधित लेखकाला तसेच सार्वजनिकरित्या इथे सर्वांना कळविण्यात शशांक पुरंदरे यांच्या मनाचा मोठेपणा आहे हे निःसंशय. त्यासंबंधीचे आत्मकथन त्यांनी यापूर्वीच केलेले असल्याने त्याची सविस्तर पुनरुक्ती टाळतो.
असो. या निमित्ताने पुन्हा एकदा शशांक पुरंदरे यांना दीर्घायुष्य चिंतितो आणि शुभेच्छा देतो. त्याचबरोबर हवे ते आणि हवे तेवढे लिहिण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या मायबोली संस्थापकांनाही मनापासून धन्यवाद !
आणि हो . . .
यंदाच्या गणेशोत्सव उपक्रमांच्या सर्व संयोजकांनाही धन्यवाद तसेच आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
**************************************************************************************************************
मायबोलीशी संबंधित आहे
मायबोलीशी संबंधित आहे म्हटल्यावर तोच लेख आठवला. खरंच कृतार्थतेचा, अभिमानाचाही क्षण!
डॉक्टरसाहेब
डॉक्टरसाहेब
खरंच अभिमानास्पद !
अभिनंदन डॉ. साहेब.
अभिनंदन डॉ. साहेब.
कृतार्थता आणि एक मानवी जीव वाचवल्याचा आनंद असा दुग्धशर्करा योग आहे हा.
आत्मस्तुतीचा दोषही येणारच.
हा कालबाह्य विचार झाला. आपण विनय राखून आत्मप्रौढीचा दर्प न आणता लिहिलेले आहे. यात तुमचा कोणताही स्वार्थ नाही हे ध्यानात घ्या. एके काळी हा विचार कालानुरूप होता असेल. पण हे प्रकाशित करणे याचे दोन फायदे आहेत.
१. हे वैद्यकीय ज्ञान इतरांना मिळेल.
२. हे अनेकांना प्रेरणादायक, स्फूर्तीदायक होऊं शकते.
हे ध्यानात घ्या. जीवनमूल्ये जरी चिरस्थायी असली तरी जुने जाउद्या .... या उक्तीप्रमाणे कालानुरूप बदल जनहितार्थ केले तर ते चांगलेच आहे.
सर्वांचे आभार!
सर्वांचे आभार!
* प्रकाशित करणे याचे दोन फायदे आहेत.
>>> हे विवेचन आवडले व पटले.
अभिमान वाटावा असाच क्षण.>>+१
अभिमान वाटावा असाच क्षण.>>+१
वाचून फार छान वाटले. अभिनंदन
वाचून फार छान वाटले. अभिनंदन डॉक्टर, आणि शशांक पुरंदर्यांची पोचपावतीही आवडली.
आपल्या आयुष्यातील आपल्याला अभिमानाचा वाटणारा क्षण आपण स्वतःच शब्दांकित करताना त्यात संकोच होणार आणि आत्मस्तुतीचा दोषही येणारच >>> याला आत्मस्तुती म्हणू नका. तुमच्या लेखांमधून इतर लोकही जर आपल्या तब्येतीची काळजी घेणार असतील तर अशी आत्मस्तुती पुन्हा पुन्हा वाचायला आवडेल! तुमच्या लेखांमधून व सल्ल्यांमधून इतर अनेकांना वेळेवर उपचार करून घेण्याची प्रेरणा मिळो व आम्हाला अजून अशी "आत्मस्तुती" वाचायला मिळो!
ह्याबद्दल कल्पना होतीच.
ह्याबद्दल कल्पना होतीच. खरोखरच हृद्य आणि कृतार्थ वाटावे असा प्रसंग आहे हा.
शशांक यांचा प्रतिसादही आला. दोघांचेही अभिनंदन.
फारएण्ड+१
आपुलकीने प्रतिसाद दिलेल्या
आपुलकीने प्रतिसाद दिलेल्या आपणा सर्वांचा आभारी आहे. इथले अनेक अभ्यासू प्रतिसाद माझ्यासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरले आहेत.आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे भावी आरोग्य लेखनास नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
सर्वांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो !
डॉक्टर, तुम्हीच खरं तर
डॉक्टर, तुम्ही स्वतःच खरं तर माबोकरांसाठी एक अभिमानास्पद व्यक्ती आहात. तुमचं लेखन नेहमी संतुलित आणि माहितीपूर्ण, वैविध्यपूर्ण असतं.
छान क्षण नोंदवला आहे.
खरोखर अभिमानाचा क्षण.
खरोखर अभिमानाचा क्षण.
असेच कृतार्थ क्षण वारंवार अनुभवण्यास येवोत ! > +१
Submitted by कुमार१ on 27
Submitted by कुमार१ on 27 August, 2025 - 12:10>>> 🧡
Pages