पाककृती स्पर्धा क्रमांक १ - वरणभात सजावट - मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 26 August, 2025 - 00:50
वरण भात

वरण भात
भारतीयांच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा समावेश आवर्जुन केला जातो. विविध डाळींपासून गोड आणि तिखट असे अनेक नैमित्तिक पदार्थ केले गेले तरी डाळीपासून सांबार, रसम, डाळ तडका, डाळ फ्राय ( बाहेर जेवायला गेलं की तरुण मुलं ह्या दोन्ही पैकी काय घेऊ या ह्यावर चर्चा करतात, मला दोन्ही मधला फरक अजून ही कळला नाहीये. असो. ) साधं वरण, आमटी असं काहीतरी घरोघरी रोज केलं जातं. आणि भात किंवा भाकरी, पोळी, रोटी बरोबर ते आवडीने खाल्लं ही जातं. दुधी भोपळा, श्रावण घेवडा, कोबी तसेच पालेभाज्यांमध्ये ही मुगडाळ किंवा चणाडाळ घालून त्याची चव आणि पौष्टिकता दोन्ही ही वाढवलं जातं.

परंतु वरण भात तूप लिंबू ही फक्त महाराष्ट्राचीच खासियत आहे असं मला वाटत. गरम गरम भात त्यावर तेल, तिखट, मसाला, आलं, लसूण, नारळ, कोथिंबीर ह्या पैकी काही ही न घालता फक्त हळद , हिंग आणि मीठ घालून शिजवलेल्या तूर मूग किंवा मसूर डाळीचं घट्टसर वरण ज्याला साधं किंवा गोडं वरण ही म्हणतात आणि त्या वरणावर घातलेलं तूप आणि चवीनुसार पिळलेलं लिंबू हा अनेक मराठी लोकांचा आवडीचा पदार्थ आहे. एवढा चवदार, पौष्टिक, आणि पचायला हलका आहार न आवडणारा विरळाच. त्याबरोबर पापड, कुरडई, तळलेली सांडगी मिरची किंवा एखादं चटकदार लोणचं असेल तर सोनपे सुहागा. करायला सोपी ,कमी साहित्य लागणारी , लहान मुलं, वयस्कर आणि आजारी माणसं अश्या सर्वांना आवडणारी, खाल्ल्यावर मानसिक समाधान देणारी अशी ही एक युनिक डिश आहे. गरम वरण भात खाऊन जे समाधान मिळत, जीवाला , पोटाला जे शांत वाटत त्याच शब्दात वर्णन करता येणं कठीण आहे.

उपासाच्या दिवशी संध्याकाळी वरण भाताच्या कुकरच्या शिट्टी बरोबर वरण भाताचा जो वास घरभर पसरतो तो इतका नाकात जातो की कधी एकदा तो वरण भात पोटात जातोय असं होतं. तसेच आठ दहा दिवस ट्रिपवर असताना बाहेरचं खाऊन कंटाळलेल्या मनाला आस लागते ती फक्त घरच्या गरम गरम वरण भाताची. सणाच्या दिवशी अनेक पदार्थांचे वास घरात दरवळत असतात पण त्या सर्वात भाव खाऊन जातो तो वरण भाताचाच वास. सणाच्या दिवशी केलेला वरण भात दोन लेव्हल वरच्या चवीचा लागतो असं माझं प्रामाणिक मत आहे.

कोकणात ( काही ही लिहिताना कोकणाचा संदर्भ हवाच त्याशिवाय पूर्णत्व नाही लिखाणाला Happy ) आमच्याकडे पूर्वी वरण भाताचं फार अप्रूप वाटे. कारण तो फक्त सणासुदीला किंवा काही स्पेशल असेल तरच केला जाई. रोज एवढं घट्टसर वरण सर्वांसाठी करणे तेव्हा परवडणारे नव्हते आणि पंचक्रोशीत भाजी मार्केटच नसल्याने परसात असलेली तोंडली, पडवळ, वांगी, शिराळी ह्या पैकी काहीतरी घालून टु इन वन आमटी कम भाजीच बनवली जाई बरेच वेळा. अर्थात हे मी पन्नास साठ वर्षापूर्वीच सांगते आहे. आता कोकण ही खूप बदलले आहे. तसेच कोकणात आमच्याकडे वरण आणि पुरण दोन्हीसाठी "करणे "असं न म्हणता “घालणे” हा शब्दप्रयोग जास्त प्रचलित आहे. . तेव्हा कुकर नसल्याने चुलीवर पातेल्यात वरण शिजत घालत असत म्हणून वापरात असावा “घालणे” हा शब्द. असो.

साहित्य :
१) तांदूळ एक वाटी ( जिरेसाळ ,आंबेमोहोर किंवा रोजचा कोलम वगैरे कोणताही. मी बासमती घेत नाही कधी कारण फडफडीत वरण भात एवढा आवडत नाही. )
डाळ अर्धी वाटी तूर ,मूग ,मसूर कोणतीही आवडीनुसार, मी तिन्ही मिक्स घेतल्या आहेत.
मीठ, तूप, हिंग, हळद चवीनुसार
कृती
वरणभाताची कृती काय लिहायची आहे खरं तर पण संयोजकांनी तशी अटच ठेवल्याने ती लिहिणे क्रमप्राप्त आहे . असो. डाळ तांदूळ दोन्ही नीट धुवून त्यात नेहमी घालतो तसं पाणी घालायचं. डाळीतच हिंग मीठ हळद घालायची. आणि कूकरच्या शिट्ट्या करायच्या नेहमी करतो तशा. झाकण पडलं की गरमा गरम वरण भात तयार.

अधिक टिपा
१) कोणी कोणी वरणात किंचित गुळ घालून सारख करून पुन्हा एक उकळी आणतात . आपल्या आवडीप्रमाणे करावे
२) हे गरम गरम वरण तूप लिंबू घालून पोळी बरोबर ही तेवढंच छान लागत.
३) डाळ शिजवताना चुकून पाणी जास्त झाले तर ते पाणी काढून घेऊन त्यात तूप लिंबू मीठ घालून प्यावे . एकदम मस्त लागत. लहान मुलांना अगदी सुरवातीला असे डाळीचे पाणी मुद्दाम देतात.
४) वरण भाताची सजावट हा खर तर अन्याय आहे कारण वरणभाताची सजावट करत बसलो तर तो गार होणार आणि त्याची खरी मजा तो पहिल्या वाफेचा खाण्यातच आहे. त्यामुळे बाकीच सगळं वाढून घ्यायचं, शेवटी कुकर उघडून भाताची मूद वाढून घ्यायची त्यावर वरण आणि तूप वाढायचं आणि लगेच जेवायला सुरवात करायची.
५)पण तरी स्पर्धाच सजावटीची असल्याने केली आहे थोडी सजावट. बघा ओळखतंय का ते काय आहे ते, नाहीतर मी सांगीनच. ओळखण्यासाठी शुभेच्छा तुम्हाला.

20250822_124354~2.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमाल आहे !

साधा वरण-भात किती विविध प्रकारे सादर करता येतो.

सगळ्यांच्या सर्जनशीलतेचा हेवा आणि कौतुक वाटते.

ममो, वरण भात सजावट नेहमीप्रमाणेच कल्पक आणि सुंदर ! तुम्ही खूप निगुतीनी सगळं करता त्याची झलक इथे पण दिसतेय.

चामुंडराय, अल्पना, शुगोल धन्यवाद.

साधा वरण-भात किती विविध प्रकारे सादर करता येतो. कमाल वाटली मला ही किती वेगवेगळ्या कल्पक आणि सुंदर प्रवेशिका आल्या आहेत साध्या वरण भाताच्या. माबो करांची कमाल आहे. म्हणूनच आवडते मायबोली.

संयोजक आणि मतदाते मनःपूर्वक धन्यवाद... मजा आली वरण भाताची सजावट करायला. वेळ छान गेला विचार करण्यात, सजावट करण्यात वगैरे.. प्रशस्तीपत्रक छान झालं आहे.
Srd धन्यवाद.

Pages