पाककृती स्पर्धा क्रमांक १ - वरणभात सजावट - मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 26 August, 2025 - 00:50
वरण भात

वरण भात
भारतीयांच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा समावेश आवर्जुन केला जातो. विविध डाळींपासून गोड आणि तिखट असे अनेक नैमित्तिक पदार्थ केले गेले तरी डाळीपासून सांबार, रसम, डाळ तडका, डाळ फ्राय ( बाहेर जेवायला गेलं की तरुण मुलं ह्या दोन्ही पैकी काय घेऊ या ह्यावर चर्चा करतात, मला दोन्ही मधला फरक अजून ही कळला नाहीये. असो. ) साधं वरण, आमटी असं काहीतरी घरोघरी रोज केलं जातं. आणि भात किंवा भाकरी, पोळी, रोटी बरोबर ते आवडीने खाल्लं ही जातं. दुधी भोपळा, श्रावण घेवडा, कोबी तसेच पालेभाज्यांमध्ये ही मुगडाळ किंवा चणाडाळ घालून त्याची चव आणि पौष्टिकता दोन्ही ही वाढवलं जातं.

परंतु वरण भात तूप लिंबू ही फक्त महाराष्ट्राचीच खासियत आहे असं मला वाटत. गरम गरम भात त्यावर तेल, तिखट, मसाला, आलं, लसूण, नारळ, कोथिंबीर ह्या पैकी काही ही न घालता फक्त हळद , हिंग आणि मीठ घालून शिजवलेल्या तूर मूग किंवा मसूर डाळीचं घट्टसर वरण ज्याला साधं किंवा गोडं वरण ही म्हणतात आणि त्या वरणावर घातलेलं तूप आणि चवीनुसार पिळलेलं लिंबू हा अनेक मराठी लोकांचा आवडीचा पदार्थ आहे. एवढा चवदार, पौष्टिक, आणि पचायला हलका आहार न आवडणारा विरळाच. त्याबरोबर पापड, कुरडई, तळलेली सांडगी मिरची किंवा एखादं चटकदार लोणचं असेल तर सोनपे सुहागा. करायला सोपी ,कमी साहित्य लागणारी , लहान मुलं, वयस्कर आणि आजारी माणसं अश्या सर्वांना आवडणारी, खाल्ल्यावर मानसिक समाधान देणारी अशी ही एक युनिक डिश आहे. गरम वरण भात खाऊन जे समाधान मिळत, जीवाला , पोटाला जे शांत वाटत त्याच शब्दात वर्णन करता येणं कठीण आहे.

उपासाच्या दिवशी संध्याकाळी वरण भाताच्या कुकरच्या शिट्टी बरोबर वरण भाताचा जो वास घरभर पसरतो तो इतका नाकात जातो की कधी एकदा तो वरण भात पोटात जातोय असं होतं. तसेच आठ दहा दिवस ट्रिपवर असताना बाहेरचं खाऊन कंटाळलेल्या मनाला आस लागते ती फक्त घरच्या गरम गरम वरण भाताची. सणाच्या दिवशी अनेक पदार्थांचे वास घरात दरवळत असतात पण त्या सर्वात भाव खाऊन जातो तो वरण भाताचाच वास. सणाच्या दिवशी केलेला वरण भात दोन लेव्हल वरच्या चवीचा लागतो असं माझं प्रामाणिक मत आहे.

कोकणात ( काही ही लिहिताना कोकणाचा संदर्भ हवाच त्याशिवाय पूर्णत्व नाही लिखाणाला Happy ) आमच्याकडे पूर्वी वरण भाताचं फार अप्रूप वाटे. कारण तो फक्त सणासुदीला किंवा काही स्पेशल असेल तरच केला जाई. रोज एवढं घट्टसर वरण सर्वांसाठी करणे तेव्हा परवडणारे नव्हते आणि पंचक्रोशीत भाजी मार्केटच नसल्याने परसात असलेली तोंडली, पडवळ, वांगी, शिराळी ह्या पैकी काहीतरी घालून टु इन वन आमटी कम भाजीच बनवली जाई बरेच वेळा. अर्थात हे मी पन्नास साठ वर्षापूर्वीच सांगते आहे. आता कोकण ही खूप बदलले आहे. तसेच कोकणात आमच्याकडे वरण आणि पुरण दोन्हीसाठी "करणे "असं न म्हणता “घालणे” हा शब्दप्रयोग जास्त प्रचलित आहे. . तेव्हा कुकर नसल्याने चुलीवर पातेल्यात वरण शिजत घालत असत म्हणून वापरात असावा “घालणे” हा शब्द. असो.

साहित्य :
१) तांदूळ एक वाटी ( जिरेसाळ ,आंबेमोहोर किंवा रोजचा कोलम वगैरे कोणताही. मी बासमती घेत नाही कधी कारण फडफडीत वरण भात एवढा आवडत नाही. )
डाळ अर्धी वाटी तूर ,मूग ,मसूर कोणतीही आवडीनुसार, मी तिन्ही मिक्स घेतल्या आहेत.
मीठ, तूप, हिंग, हळद चवीनुसार
कृती
वरणभाताची कृती काय लिहायची आहे खरं तर पण संयोजकांनी तशी अटच ठेवल्याने ती लिहिणे क्रमप्राप्त आहे . असो. डाळ तांदूळ दोन्ही नीट धुवून त्यात नेहमी घालतो तसं पाणी घालायचं. डाळीतच हिंग मीठ हळद घालायची. आणि कूकरच्या शिट्ट्या करायच्या नेहमी करतो तशा. झाकण पडलं की गरमा गरम वरण भात तयार.

अधिक टिपा
१) कोणी कोणी वरणात किंचित गुळ घालून सारख करून पुन्हा एक उकळी आणतात . आपल्या आवडीप्रमाणे करावे
२) हे गरम गरम वरण तूप लिंबू घालून पोळी बरोबर ही तेवढंच छान लागत.
३) डाळ शिजवताना चुकून पाणी जास्त झाले तर ते पाणी काढून घेऊन त्यात तूप लिंबू मीठ घालून प्यावे . एकदम मस्त लागत. लहान मुलांना अगदी सुरवातीला असे डाळीचे पाणी मुद्दाम देतात.
४) वरण भाताची सजावट हा खर तर अन्याय आहे कारण वरणभाताची सजावट करत बसलो तर तो गार होणार आणि त्याची खरी मजा तो पहिल्या वाफेचा खाण्यातच आहे. त्यामुळे बाकीच सगळं वाढून घ्यायचं, शेवटी कुकर उघडून भाताची मूद वाढून घ्यायची त्यावर वरण आणि तूप वाढायचं आणि लगेच जेवायला सुरवात करायची.
५)पण तरी स्पर्धाच सजावटीची असल्याने केली आहे थोडी सजावट. बघा ओळखतंय का ते काय आहे ते, नाहीतर मी सांगीनच. ओळखण्यासाठी शुभेच्छा तुम्हाला.

20250822_124354~2.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सजावट एक नंबर च ज्याची स्पर्धा आहे.
आणि लेख सुद्धा उत्तम

<<<कारण तो फक्त सणासुदीला किंवा काही स्पेशल असेल तरच केला जाई. >>> अगदी आमच्याकडे गोडे वरण म्हणतात. त्याला मी लहानपणापासून सणासुदीचा आणि नैवेद्याचा पदार्थ म्हणूनच ओळखत आलोय Happy इतर दिवशी आंबट वरण किंवा तिखट डाळ

वरणभाताची आणखी काय नाविन्यपूर्ण सजावट करायची असा विचार संयोजकांची अट वाचून आला होता पण तुम्ही इतकी सुंदर आणि हटके प्रेझेंट करुन बार फारच उंच सेट केला आहेत. मस्तच दिसतोय.

छानच सजावट
आणि प्रमाण बघता भात कमी आणि वरण जास्त
डाएट कॉन्शस लोकांना सुयोग्य एकदम

वरणभाताची आणखी काय नाविन्यपूर्ण सजावट करायची असा विचार संयोजकांची अट वाचून आला होता पण तुम्ही इतकी सुंदर आणि हटके प्रेझेंट करुन बार फारच उंच सेट केला आहेत.
पहिलीच सजावट एव्हढी कल्पक आता पुढच्यांना जास्त डोकं लावावे लागणार आहे.
>>> १००++

तो मायबोलीचा 'म' भारीच...

>>>एकदम मस्त लागत. लहान मुलांना अगदी सुरवातीला असे डाळीचे पाणी मुद्दाम देतात.
होय Happy
सुरेख सजावट झालीये.

केया, मी नताशा, ऋन्मेष, दक्षिणा, जाई , शर्मिला, मामी , सामी. मंजू, निल्सन , सायो, झकासराव, माझे मन, सामो, धनवंती सर्वांना धन्यवाद...
वरण भाताची सजावट काय करणार असं मला ही वाटत होतं, सध्या वरण भातावरून जो गदारोळ उठलाय सोमी वर त्यावरून हा विषय दिलाय,बाकी त्यात काही नाही असा विचार करून मी तो सोडून ही दिला होता. पण मन विचार करणं थांबवत नाही. भाताचा गोल खळगा करून त्यात वरण वाढणे म्हणजे आपल्या मुदीच्या बरोबर उलटं एवढी एकच सजावट सुचली होती.
पण त्या दिवशी देवासमोर रांगोळी काढताना रांगोळी ऐवजी भात वापरून आपण मायबोली असं लिहू शकतो असा विचार डोक्यात आला. पण त्यात वरण कुठे बसवणार आणि आपल्या ताटात ती अक्षरं फिट कशी करणार म्हणून ते बाद झालं पण त्यातूनच ही लोगोची कल्पना सुचली.
लोगो पाहिला असला तरी असा करायचा असेल तर नीट अभ्यास करायला हवा म्हणून लोगो डाऊन लोड करून आधी त्याचा नुसताच अभ्यास केला. मग घेतला भात आणि केली सजावट असं नाही झालं. . ताटात तो बाहेरचा चौकोन आणि आतलं डिझाईन दोन्ही नीट कस बसवता येईल ह्यासाठी आधी तांदूळ घेऊन प्रॅक्टिस केली. त्यावर हात बसवला आणि मगच फायनल फोटोसाठी तयारी केली. वरण वाढताना अगदी पोहे खायचा चमचा वापरला वरण गॅप मध्ये नीट वाढता यावं म्हणून. असो.
झकासराव, वरण आणि भाताचं प्रमाण नॉर्मल च आहे. भाताला उंची असल्याने तो साहजिकच जास्त लागला आहे. वरण फक्त गॅप मध्येच असल्याने कमी लागलं.
फोटो काढून झाल्यावर एकत्र कालवून मायक्रो मध्ये गरम केला , तूप लिंबू घातलं आणि खाल्ला मीच... छानच लागला.

प्लेटींग जबरदस्त झालं आहे हेमाताई.

जुनी माणसे सांगायची "नुसता वरण-भात" नाही वाढायचा. लोणच्याने ती अटही पूर्ण केली आहे.

आयड्येची कल्पना फारच आवडली. पहिल्याच बॉलला सिक्सर!
ओह्ह! त्या कॉन्ट्रोवर्सीवरुन वरण भाताला ग्लॅमरस बनवायला ही स्पर्धा ठेवली आहे होय! Lol

>>> वरणभाताची आणखी काय नाविन्यपूर्ण सजावट करायची असा विचार संयोजकांची अट वाचून आला होता पण तुम्ही इतकी सुंदर आणि हटके प्रेझेंट करुन बार फारच उंच सेट केला आहेत. मस्तच दिसतोय.
अगदी!!! +१००

Pages