'ख्वान नियामत'मधील 'व्हेजिटेबल' करी

Submitted by चिनूक्स on 20 August, 2025 - 12:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मटण - एक शेर
तूप - अर्धा शेर
दही - अर्धा शेर
मीठ - एक छटाक
आलं - एक छटाक
कोथिंबीर - एक छटाक
कांदे - चार छटाक
लसूण - दोन छटाक
काळी मिरी - एक द्राम
हळद - दोन द्राम
केशर - चार मासे
1000618698.jpg

क्रमवार पाककृती: 

१. मटण व्यवस्थित धुऊन घ्या.
२. त्यात मीठ, दही, कोथिंबीर, आल्याचं पाणी असं घालून मिसळा.
३. तूप गरम करा.
४. त्यात कांदे घालून तांबूस होईपर्यंत परता.
५. उत्तमप्रकारे पूड केलेली हळद त्यात घाला.
६. त्यात मटण घाला.
७. मटण परतताना त्यात हळूहळू लसूण घातलेलं पाणी ओतत रहा.
८. मटण मऊ झालं की त्यात हव्या त्या भाज्या घाला.
९. पुन्हा थोडं पाणी घालून शिजवा.
१०. मटण आणि भाज्या शिजल्या की हवं असल्यास त्यावर लिंबू पिळा.
११. नंतर केशर घाला.
१२. आता चुलीवरून भांडं खाली घ्या. पदार्थ तयार आहे.

मूळ कृतीत काळीमिरी कधी घालायची, हे दिलेलं नाही. मी ती चिकन मुरवताना कुटून घातली.

*

आल्याचं पाणी करण्यासाठी एकतर आलं पाण्यात उकळून घ्यावं, किंवा वाटलेलं आलं पाण्यात घालून भिजत ठेवावंवंदहापंधरा मिनिटांनी गाळून पाणी वापरावं.
लसणाचं पाणी करण्यासाठी लसूण मऊ वाटून पाण्यात घालावा आणि पाणी गाळून घ्यावं.

अधिक टिपा: 

१, ख्वान नियामत’ या नावाचं एक पाकपुस्तक / हस्तलिखित अस्तित्वात आहे. याचा इंग्रजी अर्थ - Table of riches. मीर कासिम अली खान हा १७६० ते १७६३ या काळात बंगालचा नवाब होता. ब्रिटिशांना प्लासीच्या युद्धात मदत करणार्‍या मीर जाफरचा हा जावई. ब्रिटिशांची मीर जाफरशी सलगी होती. पुढे त्यांचा बेबनाव झाला, मीर जाफर डचांशी संधान बांधू लागला. ब्रिटिशांनी त्याच्या जागी त्याच्या जावयाला, म्हणजे मीर कासिमला गादीवर बसवलं. पण त्याचंही ब्रिटिशांशी बिनसलं. बक्सारच्या युद्धात ब्रिटिशांकडून तो हरला. ब्रिटिश सत्ता स्थापन होण्याची ही सुरुवात होती.

या मीर कासीमच्या मुदपाकखान्यातल्या पाककृती ’ख्वान नियामत’मध्ये आहेत. म्हणजे ते साधारण १७६० ते १७६३ या काळात लिहिलं गेलं. मूळ हस्तलिखित फारसीत आहे. त्याचं पहिलं इंग्रजी भाषांतर १८३९ साली कलकत्त्यात प्रकाशित झालं.

इंग्रजी पुस्तकाचं नाव - THE KHWAN NIAMUT; or, Nawab's Domestic Cookery: Being a selection of the best approved recipes, of the most flavoured and savoury dishes, from the kitchen of Nawab Qasim Ali Khan, Bahadur Quum Jung - असं आहे. भारतात राहणार्‍या युरोपीयांना हिंदुस्तानी स्वयंपाकाची ओळख व्हावी, या हेतूनं पुस्तकाचं भाषांतर केल्याचा उल्लेख प्रस्तावनेत आहे. पुस्तकात भाषांतरकाराचं नाव नाही.

पुस्तकाच्या सुरुवातीस तत्कालीन मोजमापं आहे. पहिला पदार्थ अखनी पुलाव आहे. त्यानंतर साधा पुलाव, दोन प्रकारच्या खिचडी बिर्यान, कबाब कताई, कबाब परसंद, साधे कबाब, भाजलेले मासे, खगिना, बदामाच्या मिठाया, गाजर - लाल भोपळा यांच्या गोड गोळ्या, लिंबाचं - आंब्याचं लोणचं, काश्मिरी चटणी, बाकरखानी, शीरमल, नान, पुरी, आंब्याचा मोरब्बा, गुलगुला, पर्शियन कॉफी, माशाचा स्ट्यू, बॉइल्ड ईल, हॉट क्रॅब, व्हेनिसन - बीफ - पोर्क यांचे अनेक पदार्थ आहेत.

२. पुस्तकात नाव Vegetable Curry दिलं असलं, तरी ती मुख्यत्वे मटणाची करी आहे.

३. शक्यतो कृतीचं पालन करायची इच्छा होती. पण अर्धा शेर तुपातला पदार्थ खाणं मला अशक्य आहे. शिवाय दिलेल्या प्रमाणात केशर घालण्याइतका मी श्रीमंत नाही.

मी मटणाऐवजी घरी ४५० ग्रॅम चिकन ब्रेस्ट होती, ती वापरली. त्या प्रमाणात साहित्य घेतलं. तो तक्ता सोबत जोडला आहे. मीठ, तूप आणि केशर मात्र बरंच कमी घातलं.

४. मांस आणि भाज्या एकत्र शिजवण्याच्या कृती बाराव्या शतकातल्या मानसोल्लासापासून पुढे असंख्य पाकपुस्तकांमध्ये सापडतात. नवव्या शतकांपासूनच्या अरबी - फारसी पाकपुस्तकांतही त्या आहेत.

निमतनामा, ऐन - इ - अकबरी, नुस्खा - इ - शाहजहानी, अल्वान - इ - न्यामत यांत व दक्षिण भारतातल्या अठराव्या शतकानंतरच्या तमिळ पाकपुस्तकांत कोहळा, पडवळ, दुधी आणि लाल भोपळा अश्या भाज्या मांसाबरोबर शिजवल्या आहेत. मी बटाटा आणि फूलकोबी वापरली. ४५० ग्रॅम चिकनसाठी दोन मध्यम बटाटे आणि फ़ूलकोबीचे दोन मोठे तुरे घेतले.

५. उत्तर अणि पूर्व भारतातल्या मुसलमानी घराण्यांतल्या सोळाव्या शतकापासूनच्या पाकपुस्तकांमध्ये मसाल्यांचा बेतशीर वापर आढळतो. प्रत्येक प्रकारच्या पदार्थात ठरावीक तेच मसाल्याचे जिन्नस आहेत. कोठार भरलं आहे म्हणून उगीच हाताला येतील ते मसाले वापरण्याची वाईट सवय त्या काळी स्वयंपाक्यांना नव्हती. मसाल्याच्या तयार पुडी करण्याची तेव्हा पद्धत नव्हती. गरम मसाला हा जिन्नस एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून दिसतो. हल्लीचे शेफ, होमकूक वगैरे खडे मसाले घालून वर परत गरम मसाला घालतात. राजामहाराजांनी आपली श्रीमंती दाखवण्यासाठी वाट्टेल तितके मसाले वापरले नाहीत. आपण त्यांचा हा गुण आत्मसात करावा, असं मला वाटतं.

६. दिलेल्या प्रमाणापेक्षा निम्मं मीठ घेऊनही ते कणभर जास्त वाटलं. दुपारी केलेली करी रात्री खाताना पदार्थ उत्तम मुरला होता. त्यामुळे मीठ आणि लसूण जरा कमी चालले असते, असं वाटलं.

माहितीचा स्रोत: 
ख्वान नियामत हे अठराव्या शतकातलं पाकपुस्तक
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रावणात जिथे तिथे शाकाहार बघून वैतागले असताना मायबोलीवर चिनुक्स यांचा नवा धागा आलेला आशेने बघावा आणि....तिथेही व्हेजिटेबल करी..
माझा दुरूनच पास _/\_

ऋन्मेष,

पाककृती वाचल्यास शाकाहारी की मांसाहारी ते कळेल.

हल्लीचे शेफ, होमकूक वगैरे खडे मसाले घालून वर परत गरम मसाला घालतात. >>>+१
बिर्याणीत मसाल्यांचा खूप वापर होतो. व्हेज बिर्याणीत ते खूप जाणवते. मसाल्यांच्या अती वापरामुळे पदार्थाची मूळ चव मारली जाते असं माझं मत.

एखादी शाकाहारी पाककृती दे की म्हणजे करून तरी बघता येईल.

फोटो?
आहे आहे! फोटो पाकृ आधी आल्याने पटकन लक्षात आला नाही.

करी हा बहुतेक by default non-veg पदार्थ असावा. त्यात जराश्या भाज्या घातल्याने त्याला vegetable curry म्हटले असावे..... जसं पायनॅपल शिरा.

शाकाहारी पदार्थ समजून वाचायला घेतलं होतं Lol

आल्याचं पाणी, लसणाचं पाणी सांगितले आहे- पेस्ट करून किंवा किसून आले लसूण नाही!
तूप + केशर + मिरी आणि आले लसणाचे पाणी - एकूण फायनल फ्लेवर / चवीची कल्पना फारशी करता येत नाहीये, पण नक्कीच इन्टरेस्टिंग आहे पद्धत.

१ शेर = ०.९३३ किग्रॅ
१ तोळा = ११.६६ ग्रॅम
१ छटाक = ६० ग्रॅम
१ मासा = ०.९८ ग्रॅम
१ द्राम = १.७८ ग्रॅम

मस्त! ‘ग्रॅम’ला ‘द्राम’ म्हणत वाटतं.

>>> १ द्राम = १.७८ ग्रॅम
ही पोस्ट नंतर वाचली., धन्यवाद.
वर कन्व्हर्जन टेबलमध्ये ते प्रमाण एकास एक लिहिलंय.

चार ग्रॅम केशर??!!!
याला सॅफ्रॉन करी म्हणायला हवं. Proud

चिनूक्स ऊप्स सॉरी..

वाचली आता पाककृती, आणि हे सुद्धा Happy

<<<< पुस्तकात नाव Vegetable Curry दिलं असलं, तरी ती मुख्यत्वे मटणाची करी आहे.>>>

मटणासोबत भाज्या मी आजवर मुस्लिम मित्रांकडेच खाल्लेल्या जास्त आवडल्या आहेत हे चटकन डोक्यात आले. जी काही पद्धत असेल भाज्यात मटणाची चव उतरलेली आढळते. बाकी मला पाककृतीतील फार काही कळत नाही. पण चिकनपेक्षा तुम्ही मटणच वापरले असते तर आणखी भारी लागले असते असा अंदाज. आणि मटणात जास्तीचे तूप सुद्धा छान लागते. ईदचे पोसलेले चरबीयुक्त बकरे सुद्धा बहुधा यामुळेच आणखी छान लागतात. जसे आपल्याकडे सत्यनारायणाचा प्रसाद भारी लागतो तसेच ते सुद्धा भारी लागते. माझगाव मध्ये बालपण गेल्याने आणि तिथले आताचे शेजारी सुद्धा मुस्लिम असल्याने त्यांच्या सणाचे ताट येते.

<वर कन्व्हर्जन टेबलमध्ये ते प्रमाण एकास एक लिहिलंय.>

४५० ग्रॅम चिकनच्या हिशेबात कन्व्हर्ट केलं आहे.

मस्त आहे पाकृ. फोटो अगदी तोंपासु आलाय. मी मटण वापरुनच करेन. आले व लसुण पाणी किती कप घातले?

पुस्तक कुठे मिळाले?

केशर श्रीनगरला रु ३०० ला १ ग्रॅम घेतले. त्यातल्या काड्यांची संख्या पाहता ते मी २ वर्षे आरामात पुरवेन Happy २ ग्रॅम केशर खुप जास्त होणार, तितके घातले तर बाकीचे वास दडपुन जातील व
पदार्थाला खुपच जास्त केशरी वास येईल. २ काड्या बस होतील हेमावैम.

साधना,
आल्याचं पाणी अर्धा कप घेतलं.
लसणाचं पाणी रस्सा किती हवा, त्यावर ठरेल.

ख्वान इ नियामत या नावाची किमान चार वेगवेगळी हस्तलिखितं अस्तित्वात आहेत. त्यातलं एक एकोणिसाव्या शतकात गुलाम महबूब हैद्राबादी या शाही आचार्‍यानं लिहिलं. मीर मेहबूब आली हा सहावा निझाम होता. त्याच्या राजवाड्यातल्या पदार्थांच्या कृती या हस्तलिखितात आहेत. त्यात अठरा प्रकारचे पुलाव, सोळा प्रकारच्या खिचड्या, अठ्ठेचाळीस प्रकारचे दोप्याझे, एकवीस कोरमे, पंचेचाळीस कबाब, एकोणतीस नान, पंचवीस चटण्या आणि तेहतीस लोणची आहेत.

सयाजीराव गायकवाडांनी अनेक पाकपुस्तकांचे अनुवाद करवून घेतले. त्यात हेही आहे.

मी वर कृतीत उल्लेख केलेल्या पुस्तकाची एक प्रत प्रसिद्ध लेखक - संपादक श्री. दिलीप पाडगावकर यांच्याकडे होती. ऑस्ट्रेलियातल्या गुलमोहर रिसर्च या संस्थेचे जॉइस वेस्ट्रिप यांच्या संग्रहात मध्ययुगीन भारतात लिहिली गेलेली अनेक पाक-हस्तलिखितं आहेत / होती. पाडगावकरांचा खाद्यसंस्कृतीतला व्यासंग लक्षात घेऊन त्यांनी १८३९ सालच्या पुस्तकाची प्रत त्यांना भेट म्हणून पाठवली.

पाडगावकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी, लतिका पाडगावकर, यांनी त्यांच्या संग्रहातली अनेक पुस्तकं मला दिली. त्यात हेही पुस्तक आहे.

१९९२ साली आयोवा स्टेट युनिव्हर्सिटीनं मूळ फारसी हस्तलिखिताचा वेगळा अनुवाद प्रकाशित केला. तो मी बघितला नाहीये. माझ्या समजुतीनुसार ही दोन्ही भाषांतरं बाजारात उपलब्ध नाहीत.

*

केशर मी दहाबरा काड्या घातलं.

मिसळा. मिसळून ठेवा नाही.

पाककृतीचा इंग्रजी अनुवाद -

Having washed the Mutton and applied to it Salt, Duhee, Coriander and a mixture of Ginger-water, heat the Ghee on fire, and let in the Onions duly sliced, which fry until it becomes brown, and convey in it the Turmeric well gound; then throw in the Mutton (previously prepared) and keep frying (adding by degrees a mixture of the Garlick-water) until the Meat is properly softened, when the Vegetables (of whatever kind you like) are to be put in, and let the whole be cooked with addition of little water. - Lastly, on the dish being ready, put in a little Lemon Juice, or any other acid, followed up by the Saffron. Then bring it down, and it is fir for use.

भाज्या आणि केशर वगळून , मटणाऐवजी चिकन वापरून करण्यात येइल . आलं आणि लसणाच पाणी एकदम एन्टरेस्टीन्ग वाटतय
पाव किलो तूप जीवावर येतय Happy . मी कडाह करतानाही तूपाचा हात आ़खडता घेते .

ओके. भाजी घालायच्या आधी परतायला किती वेळ लागतो आणि नंतर शिजायला किती वेळलागतो? तासभर तरी जात असेल एकुण?

नाही. मटण शिजायला एवढा वेळ लागत नाही. भाज्या कोणत्या यावर वेळ किती हे ठरेल. बटाटा, फ्लॉवर लवकर शिजतात. शिवाय थोडे टचटचीत राहिलेले चालतात.

Pages