नामदेवराव कदमांचं कबुतराचं कटलेट आणि पुरण भरलेलं कबुतर

Submitted by चिनूक्स on 14 August, 2025 - 09:49

नामदेवराव रामचंद्रराव कदम बडोद्याला सयाजीराव महाराजांच्या किचनीत सुपरिंटेंडण्ट होते. पाकविद्या शिकायला महाराजांनी त्यांना युरोपात पाठवलं होतं. परत आल्यावर त्यांनी पाककलेवर अनेक पुस्तकं लिहिली. युरोपीय स्वयंपाक सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिला. मेन्यू या शब्दासाठी भोजनदर्पण हा शब्द सर्वप्रथम त्यांनीच योजला आणि वापरला.

पाश्चिमात्य पाकविज्ञान हे त्यांनी लिहिलेलं एक महत्त्वाचं पुस्तक आहे. तीन भागांत हे पुस्तक आहे. पहिल्यात युरोपीय पाककलेतील विविध भेद, क्रिया (ब्रॉयलिंग, रोस्टिंग, ग्रिलिंग, ब्रेझिंग इत्यादी), खाण्यास योग्य पशुपक्ष्यांचं मांस आणि ते शिजवण्यापूर्वीची व्यवस्था, प्राण्यांचे विविध कट्स, ऑइलमन्स स्टोअर म्हणजे काय, तिथे कोणते पदार्थ मिळतात, पाव - रोटी - केक - पेस्ट्री - जेली - आखणी - सॉस यांच्या कृती पहिल्या भागात आहेत. दुसर्‍यात सूप, मासे, ऑंत्रे, आंचीने शेकलेले म्हणजे रोस्ट केलेले पदार्थ, करी, अंडी, भाज्या, पुडिंग या कृती आहेत. पदार्थ वाढायचे कसे आणि कशांत, त्यांचा क्रम काय असावा, मेन्यू किंवा बिल ऑफ फेअर म्हणजे काय, त्यासाठी त्यांनी वापरलेल्या भोजनदर्पण या शब्दाचा अर्थ, नमुन्याची काही भोजनदर्पणं हे तिसर्‍या भागात आहे.

या पुस्तकात कबुतराचे कटलेट हा पदार्थ आहे. त्याची कृती पुढीलप्रमाणे -

प्रत्येक कबुतराचे छातीचे दोन दोन तुकडे घेऊन त्यास सुरीनें थोडंथोडे कु्टून व नीट नेटके कापून साधारण कटलेटच्या आकाराचे बनवावे. आणि मग त्यांना भिजविण्याचे मिश्रणांत (मारिनाडमध्यें) भिजत घालावें. आणि तास दोन तास नंतर बाहेर काढून निथळू द्यावें. मग अंडी व रोटीचा चुरा लावून तळून काढावें. नंतर ताटांत त्यांस नीट मांडून भोंवती दाट टोमेटो सॉस ओतावें आणि वाढावयास न्यावें.

*
कृतीत मारिनाडचा उल्लेख आहे. त्याबद्दल कदम लिहितात-

कित्येक पदार्थ बनविताना मांस किंवा मासे शिजण्यास टाकण्यापूर्वी ते थोडावेळ ज्या मसाल्याचे मिश्रणांत भिजत घालितात, त्यास मारिनाड म्हणतात. कित्येकजण या मसाल्याचे मिश्रणांत क्ल्यारेट वगैरे दारूही टाकितात. चालचलाऊ मारिनाड तयार करून उपयोगांत घेतात, त्यास कच्चा मारिनाड ह्मणतात. आणि थोड्या जिनसानिशी शिजवून ठेवितात, त्यांस पक्का मारिनाड असें म्हणतात. पक्का मारिनाड एकदां पुष्कळसां तयार करून बाटलीत भरून ठेविल्यास, वाटेल तेव्हां लागेल तितका आयता उपयोगांत घेता येतो. या दोन्ही मारिनाडचे मसाल्याचे जिन्नस ठरींव आहेत असें नाहीं. आवड व रुचि या मानानें लोक कमी जास्ती जिन्नस घेऊन एकत्र करितात. आणि उपयोगांत आणितात. कच्च्या मारिनाड मध्यें तेल व शिरका या रकमा विशेषेंकरून जास्त असतात. माशाकरितां वेगळा व इतर आंसाकरितां वेगळा मारिनाड कित्येकजण तयार करितात.

कच्चा मारिनाड आयतेवेळीं तयार करून घ्यावा लागतो. मारिनाड नेहमी पात्राच्या तळास माखण्यापेक्षां कास्त नसावा, म्हणजे जो जिन्नस भिजत घालावयाचा त्याची एकच बाजू मारिनाडांत भिजत राहील इतका तो असावा. एक बाजू भिजली कीं, मग दुसरी बाजू उलटून मारिनाडांत टाकावी. मारिनाडमध्यें भिजत असलेलं मांस शिजविण्यास टाकण्यापूर्वी, मारिनाड मधून काढून एक दोन मिनिटें आधर उचकून धरावें म्हणजे मारिनाडचे ठिपके खाली टपकून जातील आणि नंतर तें मांस शिजविण्यास टाकावे.

कच्चा किंवा कामचलाऊ व सर्वतोपयोगीं मारिनाड करण्यास साहित्य - चहाचा चमचाभर राईची भुकटी. तीन मासे लवंगाची भुकटी. सहा मासे वेलदोड्याची भुकटी. चार मोठे चाचेभर शिरका. एक मासा जायफळाची भुकटी. अर्धा शेर सांकटलेला कांदा. चहाचा चमचाभर सांकटलेली पार्सली. एक तोळा सांकटलेलें आलें. दोन सांकटलेल्या हिरव्या मिरच्या. दीडपावशेर सालाड तेल. एक मोठा चमचाभर उर्स्टरसॉस. सहा मासे मिर्‍यांची भुकटी. लसुणाच्या सहा सांकटलेल्या पाकळ्या. एक मध्यम चमचाभर मश्रुम केचप अथवा एक मोठा चमचाभर सांकटलेले मश्रुम.

कृति - सर्व जिनसा एकत्र करून चांगल्या खलाव्या व उपयोगांत घ्याव्या. माशांसाठी हा मारिनाड करावयाचा असल्यास यांत चहाचा चमचाभर अन्चोव्हीसॉस (अर्क) मिळवित जावें.

पक्का मारिनाड करण्यासाठी साहित्य - अर्धाशेर कांदे. अर्धाशेर गाजरें. दोन तमालपत्र. लसुणाच्या चार पाकळ्या. पार्सलीची जुडी. पुदिन्याची एक काडी. आठ तोळे लोणी. अडीच शेर पाणी. अडीचशेर शिरका. एक तोळा मीठ. सहा मासे आखीं मिर्‍यें.

कृति - कांदे व गाजरें यांच्या मोठमोठ्या फोडी कराव्या. तसेंच पार्सली आणि पुदिन्याचीं पानें तोडून घ्यावीं. व ह्या सर्व रकमां लोण्यांत चांगल्या परताव्या. नंतर त्यावर शिरका, पाणी, मिर्‍यें व मीठ घालून पंधरा मिनिटें सारखें उकळून निवाल्यावर हा मारिनाड शिशांत भरून बुच मारून ठेवावा आणि लागेल तेव्हां वाटेल तितका घेऊन वापरावा व बाकीच्यास बुच मारून ठेवावें.

कदमांनी पुस्तकात माशांसाठी आणि ’बकर्‍याचें मांस हरणाच्या मांसासारखे लागण्यासाठीं’ मारिनाडच्या वेगळ्या कृती दिल्या आहेत.

कबुतराच्या कटलेटांच्या कृतीत रोटीच्या चुर्‍या उल्लेख आहे. त्याची कृती अशी -

शिळ्या रोटीचे तुकडे सर्व वाळवून अथवा तव्यावर शेकून खलबत्त्यांत घालून बारीक कुटावे व मग तारेच्या चाळणीतून हा चुरा चाळून घ्यावा. हा चुरा मुदबखांत नेहमी तयार असावा. कारण तळण वगैरे हरकामी याची फार जरूर लागते. याकरितां तो एकदाच पुष्कळसा करून ठेवावा.

दोन प्रकारच्या रोट्या यासाठी वापरता येतात. मैद्याची डबलरोटी किंवा कणकेची रोटी. दोन्हींची कृती कदमांनी दिली आहे.

*

कदमांनी पुस्तकात कागदाचें वाट्यांत शिजवलेलें कबूतर या पदार्थाचीही कृती दिली आहे-

कबूतर मधोमध उभे फाडून त्यांतील हाडे सर्व काढावी. नंतर त्यास पाटावर मांडून सुरीनें हालके हातानें कुटावें. व शिजविलेले काळिज, लसूण, कांदा, पार्सली, मश्रूम व थोडें लोणी आणि मीठ मिर्‍यांची व मिरचीची भुकटीं, यांचे मिश्रण करून बारीक वाटावें. आणि हे मिश्रण सदर कबुतराचे तुकड्यास दाट माखावें. नंतर त्यावर रोटीचा चुरा थोडथोडा शिवरून हे तुकडे लोणी लावलेल्या कागदांत गुंडाळावें. लोणी लावलेल्या पत्र्यावर त्यांस ठेवून भट्टीत घालून नरम शिजवून घ्यावे. आयतेवेळी कागद काढून टाकून तुकडे ताटांत नीट मांडावे व त्यांस थोडी ग्लेझ म्हणजे चकाकी चोपडून लागलीस वाढावयास न्यावे.

*
टर्की, कोंबडी, बदक इत्यादी पक्षी पुरण भरून शिजवण्याची कृती कदमांनी दिल्या आहेत.

कबूतर वगैरे पक्ष्यांकरितां पुरण -

साहित्य - रोटीचा पावशेर चुरा. चहाची चमचाभर सांकटलेली पार्सली. एक लिंबाची सांकटलेली त्वचा. मीठ मिर्‍यें व जायफळाची थोडी भुकटी. दोन मासे मिरच्यांची भुकटी. एक अंडे, ज्या पक्ष्यांत बाकर भरावयाचा त्याची काळिजी (काळीज).

कृति - लोणी, दाट कच्च्या सोईप्रमाणें पातळ होई पावेतों लाकडीं चमच्यानें घोटावें. व काळिजी बारीक सांकटून साहित्यांतील इतर रकमासह लोण्यांत मिळवावी आणि हे मिश्रण पक्ष्यांत भरावे.

*

कदमांनी हे पुस्तक १९०५ साली लिहिलं.

या पुस्तकाचा मसुदा इतिहासकार गो. स. सरदेसाई यांनी तपासला होता.
*
हे पदार्थ करून बघायचे असल्यास तुमच्या बाल्कनीत आलेली अथवा कबुतरखान्यातली कबुतरं मारू नका. भारतातल्या मोठ्या शहरांत हल्ली कबुतरांचं मांस ऑनलाइन मिळतं. त्याला squab असं म्हणतात. मांसासाठी खास पाळलेली कबुतरं असतात, त्यांचं हे मांस असतं. आपल्याकडे हल्ली इमारतींमध्ये आढळणारी कबुतरंही खाल्ली जातात, पण त्यांचं आंस वातड असतं, शिवाय जंतुसंसर्गाचा मोठा धोका असतो. Squab म्हणून विकत मिळतं, ती wood pigeons असतात किंवा utility pigeons या सर्वसामान्य नावांनी ओळखली जातात.

कदमांच्या पुस्तकांत उल्लेखलेली कबुतरं Blue किंवा Green pigeons असावीत. Harold Littledale हे बडोद्याच्या कॉलेजात इंग्रजी शिकवत. त्यांचा पक्षीशास्त्राचा उत्तम अभ्यास होता आणि ते स्वत: शिकारही करत. त्यांच्या नोंदींत या दोन जातींचा उल्लेख आहे. एकोणिसाव्या शतकात खाण्यासाठी पुण्याहून मुंबईला Grey pigeons पाठवली जात. Constance E Gordon यांच्या पाकपुस्तकात या जातीचा उल्लेख आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा… मस्त पाकृ.. तोळा-मासा म्हणजे ग्रॅममध्ये किती याचा पत्ता लावायला हवा Happy

राजे लोक शेफला शिकण्यास युरोपात पाठवत हे वाचुन गंमत वाटली. विदेशी पाहुण्यांसाठी तेव्हा भारतीय सैपाकासोबत युरोपिय सैपाकही येणारे सैपाकी पदरी बाळगणे आवश्यक असावे.

कबुतरे खातात हे माहित नव्हते असे लिहिणार होते तेवढ्यात आठवले, होला ह्या कबुतर जातीच्या पक्ष्याची शिकार खाण्यासाठी केली जात असे.

कबुतरखान्यातली कबुतरे खायच्याही लायकीची नाहीत म्हणजे कमाल आहे. Happy

इन्टरेस्टिंग आहे हे! Happy

>>> हे पदार्थ करून बघायचे असल्यास तुमच्या बाल्कनीत आलेली अथवा कबुतरखान्यातली कबुतरं मारू नका
Lol

'तोळा/मासा'पैकी तोळा माहीत आहे, मासा म्हणजे किती ते गूगलच करावं लागेल.
'सांकटलेलं' म्हणजे मिन्स्ड का? पण लिंबाच्या झेस्टलाही तोच शब्द वापरलेला दिसतो आहे.
आणि उर्स्टरसॉस म्हणजे वूस्टर्शर सॉस का?
>>> हा चुरा मुदबखांत नेहमी तयार असावा
म्हणजे मुदपाकखाना?

***

>>> चार मोठे चाचेभर शिरका
चमचेभर?
>>> पण त्यांचं आंस वातड असतं
मांस?
(चिनूक्सच्या चुका काढताना एक्स्ट्रा उकळ्या फुटतात - खोटं का बोला! Proud )

आर १२ कमी असूनही व्हेज असल्याने वाचायला थोड्डं अवघड आहे. पण माहिती म्हणून या प्रयत्नांचे कौतुक.

राजे लोक काय खात असतील याबद्दल खूप कुतूहल आहे.
मध्यंतरी एका शाहीराने सांगितलेलं कि छत्रपती शिवाजी महाराज मोहीमेवर असताना सैन्यासोबत चटणी भाकरच खायचे. पण एका पुस्तकात पाहुण्यांसाठी केलेल्या निरनिराळ्या पदार्थांची माहिती आहे.
एका ब्रिटीश अधिकार्‍याने पण संस्थानिकांकडच्या मुदपाकखान्याचे वर्णन केले आहे. हरणाची शिकार हा त्यांचा सर्वोच्च टाईमपास असायचा.
मुघलांच्या खाद्य संस्कृतीबद्दल पण अशी माहिती असेल तर द्याल का चिनूक्स ?

कबूतर मधोमध उभे फाडून त्यांतील हाडे सर्व काढावी. नंतर त्यास पाटावर मांडून सुरीनें हालके हातानें कुटावें...
>>>>>

अशी वाक्ये वाचताना इतकी क्रूर वाटली की मी क्षणभर विसरलो की मी स्वतः सुद्धा मांसाहारी आहे आणि श्रावण सुद्धा पाळत नाही.
छान लिखाण. आवडले.

मुंबईत कबोतरखान्यावरून फार मोठा वाद चालू आहे.
आणि इथे लोकं कबूतर मिटक्या मारत कसे खावे याची चर्चा करत आहेत Happy

मुघलांच्या खाद्य संस्कृतीबद्दल पण अशी माहिती असेल तर द्याल का चिनूक्स ?
>>.

ते पापुआ न्यु गिनीमधल्या आदीम जमातींच्या खाद्यसंस्कृतींबद्दलही माहिती देऊ शकतील. मुघल किस झाड की पत्ती! Light 1

ओल्या नारळाच्या ५१ सेंटेनलीज पाककृती हे त्यांचे पुस्तक प्रकाशित होणार आहे लवकरच.

ज़बरदस्त.

…तोळा, मासे मोजून “रकमा” एकत्र कराव्या. … वर्णन पाककृतीचे न वाटता सोनार पेढीचे वाटते.

मारिनाड करणे आणि सांकटलेला कांदा परतणे वगैरे नोंदीही धमाल आहेत.

.. बाल्कनीत आलेली अथवा कबुतरखान्यातली कबुतरं मारू नका ….. हा शिरपेच आहे 😂

पापुआ न्यु गिनीमधल्या आदीम जमातींच्या खाद्यसंस्कृतींबद्दल >> आवडेल वाचायला. Happy
टवणे सरांचं पण वाचन दांडगं आहे.

बाल्कनीत आलेली अथवा कबुतरखान्यातली कबुतरं मारू नका.. Lol
अशा जुन्या पाककृती वाचायला मजा येते.

आम्ही खूप रानातली पारवळं खाल्ली आहेत. व्हल्ली तर परवळांपेक्षा जास्त चवदार लागतात. विशेषत: पांढऱ्या पोटाची गुबगुबीत. परंतु ठिपकेदार रेग्युलर सुद्धा मस्तच लागतात.

व्हल्ली (होले): पिसे काढून ज्वारीचे पातळ कणिक फासून आधी चुलीत पूर्ण भाजून काढायचे. म्हणजे सगळी बारीक पिसं जळून जातात आणि मांसाला एक अतिशय मस्त चव येते.

थोडेसे दगडफूल जास्त घालून, रेग्युलर घट्ट मसाल्याचा पातळ रस्सा : दोन भाकऱ्या जास्त जाणार.

पारवळं मात्र जर व्हल्ली मिळाली नाहीत तरच खाल्ली जात. तीही जितकी रानवट तेवढी चांगली. विहिरीतली पारवळं कटाक्षाने टाळले जात.

स्वाती,

१ मासा = ०.९७२ ग्रॅम
सांकटलेले म्हणजे अगदी बारीक चिरलेले. मिन्स्डसुद्धा म्हणू शकतो.
<उर्स्टरसॉस म्हणजे वूस्टर्शर सॉस का?> - होय.
<म्हणजे मुदपाकखाना> - होय. खरं म्हणजे मुदबख हा शब्द काहीवेळा पब्लिक किचन या अर्थी वापरला जातो. तिथलं अन्न फारसं वरच्या दर्जाचं नसतं. पण इथे तो राजवाड्यातलं स्वयंपाकघर या अर्थी वापरला आहे. मुदबख / मुदबखी म्हणजे आचारी. पण मुदबख्या म्हणजे मुखदुर्बळ, कमी बोलणारा. आचार्‍यानं कमी बोलावं, असा दंडक होता.
चमचेभर आणि मांस हे बरोबर.

मस्तच रेसिपी चिनूक्स. जेम्स बेअर्डच्या रेसिपीज ची आठवण झाली.

१९०५ साली बडोद्यात पार्सली वापरत असत ! राजे महाराजांचे आयुष्य किती वेगळ्याच लेव्हलच असावे !!
काही जुन्या पुस्तकात जिन्नस , जिनसा असे उल्लेख वाचलेत घटकपदार्थांसाठी. रकमा नवीनच आहे माझ्यासाठी.

लोणी, दाट कच्च्या सोईप्रमाणें पातळ होई पावेतों लाकडीं चमच्यानें घोटावें. >> कोकणीत ताज्या खोबर्‍याला सोय म्हणतात. इथे कदाचित दाट सायी प्रमाणे म्हणायचे असेल. नाहीतर मग काहीतरी वेगळा अर्थ असावा.

मस्त लेख.

“चिनूक्सच्या चुका काढताना एक्स्ट्रा उकळ्या फुटतात” - एका ‘पाककृतीतल्या’ चुका काढताना ‘उकळ्या फुटतात’ हे सहज जमलं कि जमवलं? Wink Happy

एक मायबोलीकर इजिप्तला गेले असताना त्यांनी कबुतराच्या काही खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतल्याचे लिहिले होते.

अवांतरः कबुतरं कोण खाणार? Wink सध्या विशिष्ट जमात उसळून येइल. दादरमध्ये जावतन्सुद्धा नाही. गलिच्छ वाटतं तो रस्ता.

क्वेल पक्षी मस्त लागतो. कबुतराची चव तशीच असेल का?( दोन्ही पक्षी आहेत म्हणून सहज शंका).

आमच्या कडे सुद्धा लाकडी आयताकृती सांकटा आहे मटण. चिकनच्या बारील फोडी करायला. कोणी आजकाल वापरत नाहका//?

Absolute Barbeque या खाद्यगृहात कबूतर, ऑक्टोपस, बदक, ससा, क्वेल यांचं मांस मिळत असे. आता मिळतं का माहीत नाही.

कबुतराची चव तशीच असेल का?( दोन्ही पक्षी आहेत म्हणून सहज शंका).
>>>>>

चिकन बिर्याणी आणि कव्वा बिर्याणी सेम कशी असेल Happy

क्वेल ची अंडी मिळतात इथे. पण नाही घेतली ब्वॉ.
आणि एक बलुत का काय मिळतं. त्यात अर्धवट वाढ झालेले पिल्लू असते. बाप रे! अंड फोडून तव्यावर टाकले आणि अचानक ते दिसलेले. कसंतरीच झालं. सर्व अंडी केरात गेली.

मला एका मित्राने सांगितले बदकाची अंडी खा, कोंबडीची कसली खातेस?
मी १२ अंडीचा पॅक आणला माझा ओमेगा ३ वाढवायला Proud
एक अंडे उकडले आणि खायला तोंडाजवळ नेले आणि मेले…
त्यानंतर मी कोंबडीचे अंडे उकडलेले कित्येक महिने सुद्ध खाल्ले नाही. नवर्‍याला मोजलेली किंमत आणि ओमेगा ३ फायदे सांगून संपवायला लावली बदकाची अंडी. भयाण वास असतो सल्फरचा.

हे पदार्थ करून बघायचे असल्यास तुमच्या बाल्कनीत आलेली अथवा कबुतरखान्यातली कबुतरं मारू नका
<<
नै पण मी काय म्हणतो?
फुकट मे क्या महेंगा है? अनायासे दाणे घालून मारवाड्यांनी चांगली पोसलेली कबुतरे खायला काय हरकत? Wink

20-२१ वर्षापूर्वी कुंडीत कबुतरांनी अंडी घातली होती.त्यावेळच्या माझ्या कामवालीने ती घरी नेली दम्याला चांगली म्हणून.
ee झाले होते . म विचार केला कोंबडीचे अंडे चालते तर कबुतराचे का चालू नये?

परत आल्यावर त्यांनी पाककलेवर अनेक पुस्तकं लिहिली
>>
यातलं एक पुण्याला घरी आहे बहुतेक
त्यातल्या पाककृती या सात - आठ ओळींपेक्षा मोठ्या नाहीत.
जेली उर्फ थलथलं ची रेसिपी ही आहे त्यात

मांसाहार करत नाही पण खुपच नवी माहिती,नवे शब्द कळाले. हे वर्णन ऐकून कृष्णाच्या एका पार्टीचे वर्णन महाभारतात वाचले होते त्याची आठवण झाली. त्यात भरलेले पक्षी काडी टोचून ठेवले होते असे वर्णन आहे.

आमच्या पिचिं मधील कॉलनीत एक असमी गृहस्थ राहतो. सहज बोलतांना एकदा तो म्हणाला होता की पिजन करी त्यांची एक डेलिकसी आहे. आणि त्यात आपले पारवेच वापरतात. म्हणून मी महाजालावर असमी डेलिकसी शोधल्या. तर एक रेसिपी हाती लागली. मी शाकाहारी असल्यामुळे बनवून पाहिली नाही. खाली दुवा देत आहे.

https://www.youtube.com/watch?v=01Kl8OrBfuI