रहें ना रहें हम महका करेंगे... एका गीताचे अनेक प्रतिध्वनी!

Submitted by मार्गी on 4 August, 2025 - 23:52

नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना "ठण्डी हवाएँ लहरा के आए.. " (गायिका लता, चित्रपट नौजवान वर्ष १९५१) गाणं माहिती असेल आणि आवडत असेल. "रहें ना रहें हम, महका करेंगे..." (गायिका लता, चित्रपट ममता, वर्ष १९६६) हेसुद्धा अनेकांचं आवडतं गाणं असेल. त्याशिवाय "सागर किनारे दिल ये पुकारे" (गायिका लता- किशोर, चित्रपट सागर, वर्ष १९८५) हे गाणं तर माहिती असेलच. तसंच "हमें और जीने की चाहत ना होती" (गायिका लता- किशोर, चित्रपट अगर तुम ना होते, वर्ष १९८३) हे माहिती असेलच.

पण तुम्हांला हे माहिती नसेल की, ह्या चारही गीतांची चाल एकमेकांशी विलक्षण जुळते! १९५१ चं "ठण्डी हवाएँ लहरा के आए" ह्या अल्लड प्रेमगीताला संगीत सचिन देव बर्मनांचं होतं. त्यांची चाल संगीतकार रोशन ह्यांना इतकी आवडली की त्यांनी १९६६ च्या "रहें ना रहें हम महका करेंगे" ह्या अर्थपूर्ण गाण्यामध्ये वापरली! पण गंमत म्हणजे १९६६ च्याही आधी त्यांनी १९५४ मध्येच ती चाल एस. डींची अनुमती घेऊन चांदनी चौक चित्रपटात "तेरा दिल कहाँ है" (आशा भोसले) वापरली होती. "तेरा दिल कहाँ है" हे गीत ऐकताना अगदी "रहें ना रहें हम महका करेंगे" ऐकल्याचा भास होतो! पुढे मग आर. डी. बर्मननीही ही चाल- त्या गाण्यातला मीटर किंवा छंद वापरून "हमें और जीने की चाहत ना होती" आणि "सागर किनारे" ही गाणी दिली! त्याही शिवाय त्याच छंदातील गाणी तमिळ व मल्याळमध्येही रचली गेली! इतरही काही विशेष प्रसिद्ध नसलेली ७०- ८० च्या दशकातली हिंदी गाणी त्याच सुरावटीवर आधारित आहेत. अशी एकूण किमान १० गाणी त्याच छंदातली किंवा सुरावटीतली आहेत. लक्ष देऊन ती ऐकली तर त्यातलं साम्य लगेच कळतं! अगदी १९९३ मध्ये लतानेच गायलेलं व राम- लक्ष्मण ह्यांचं संगीत असलेलं "कहा था जो तुमने" हेही गाणं तशाच चालीचं आहे!

"ठण्डी हवाएँ" गाण्यावर आधारित गाण्यांची ही गंमत मला माझे मित्र भूषण मंडपमाळवींनी सांगितली. खुद्द आर डी बर्मननी एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला होता. आणि "ठण्डी हवाएँ" हे गाणंसुद्धा १९३८ च्या “C’est la vie” गाण्यापासून प्रेरणा घेऊन बनवलेलं होतं असं म्हंटलं जातं. पण असं जरी असलं तरी त्या चालीला पुढे वाढवून साकार रूप देणं ही त्या त्या संगीतकाराची कमालच आहे. त्यांचं सूत्र समान असलं तरी प्रतिबिंबं ही स्वतंत्र अभिव्यक्तीही आहेत.

काही गाण्यांमध्ये अशी क्षमता असते की, ते आपल्याला स्वत:शी जोडून देतात. आपल्यामध्ये खोलवर असलेले भाव व्यक्त करतात. असं म्हणतात की, संगीत हे मन आणि ध्यान ह्यांच्यामधला टप्पा आहे. कधी कधी ते आपल्याला मनाच्या पलीकडचा अनुभव देऊन जातं. काही गाणी तर आपले विचारसुद्धा थांबवतात आणि आपल्याला अवाक् करतात. आपल्याला खिळवून ठेवतात. मन शांत करतात व खूप खोलवरची प्रसन्नताही देतात. रहे ना रहे हम हे गाणं असंच! अतिशय विलक्षण अर्थ भरलेला आहे! एक प्रकारे व्यक्ती, अभिव्यक्ती व त्यांच्या प्रतिबिंबांची स्पष्ट सूचना आहे.

रहें ना रहें हम, महका करेंगे
बनके कली, बनके सबा बाग़-ए-वफ़ा में
रहें ना रहें हम

मौसम कोई हो, इस चमन में
रंग बनके रहेंगे हम फ़िज़ा में
चाहत की ख़ुशबू यूँ ही ज़ुल्फ़ों से
उड़ेगी ख़िज़ाँ हो या बहारें

यूँ ही झूमते
यूँ ही झूमते और खिलते रहेंगे
बनके कली, बनके सबा बाग़-ए-वफ़ा में
रहें ना रहें हम, महका करेंगे
बनके कली, बनके सबा बाग़-ए-वफ़ा में

खोए हम ऐसे, क्या है मिलना
क्या बिछड़ना, नहीं है याद हमको
कूचे में दिल के जब से आए
सिर्फ़ दिल की ज़मीं है याद हमको

इसी सरज़मीं पे हम तो रहेंगे
बनके कली, बनके सबा बाग़-ए-वफ़ा में
रहें ना रहें हम

-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक: 4 ऑगस्ट 2025.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा ! मायबोलीवर सुरेख डॉक्युमेण्टेशन केलेत.
माझ्या एका कथेत या गीतावरून आलेल्या अकरा गाण्यांबद्दल लिहीले होते.

फार सुंदर लिहिले आहे. माझे आवडते गाणे ते, " रहे ना रहे हम ... "

मला यावरुन आठवले, 'यही है तमन्ना, तेरे दर के सामने' या गाण्याची चाल ही तशीच वाटते.
,,,माझ्या एका कथेत या गीतावरून आलेल्या अकरा गाण्यांबद्दल लिहीले होते.<<< लिंक द्या ना प्लिज! Happy

सुरेख गाणं आहे.
गीतांच्या चाली सारख्या असण्याची अनेक उदाहरणं आहेत.

बरसात मधलं 'मै जिंदगीमे हरदम रोताही रहा हू' आणि मां मधलं 'बरसात मे जब आयेगा सावन का महिना'
संगदिल मधलं 'ये हवा ये रात ये चांदनी' आणि आखरी दाव मधलं 'तुझे क्या सुनाऊ मै दिलरुबा'
बॉयफ्रेंड मधलं ' धीरे चल धीरे चल ए भीगी हवा" आणि मि. इण्डिया मधील 'काटे नही कटते ये दिन या रात'
मि.एक्स इन बॉम्बे मधलं 'खूबसूरत हसीना' आणि बाजीगर मधलं 'ए मेरे हमसफर'

अजूनही असतील. आठवेल तसं टाकीन. तम्मा तम्मा आणि जुमा चुम्मा तर सर्वांना माहिती असेलच Happy

सर्वांना धन्यवाद! Happy

@ रानभुली जी, लिंक शेअर करा ना.

ही गाणी काहीशी सारखी असली तरी कॉपी अजिबात नाहीत. समान सूत्र असलेली पण स्वतंत्र आहेत.

मी आर्या, विपूत दिली आहे लिंक.
मार्गी, मायबोलीच्या कव्हरपेज वर जी कथा आहे त्यातच आहे. ( रहस्यमय रेल्वे स्टेस्शन)