दक्षिण मुंबईतील एक रम्य पहाट !
श्रावण पाळत नसलो तरी गटारी पाळत असल्याने ती साजरी करायला माहेरी गेलो होतो. शनिवारी रात्रीच कार्यक्रम सुरू झाल्याने रात्रभर जागरण झाले होते. मुले उशीराच झोपली, पण मी पहाटेपर्यंत जागाच होतो. डोळ्यावर झोप नाही त्यामुळे कधी एकदा उजाडते आणि मी पावसाळ्यातील थंडगार वातावरणाचा फायदा उचलत पहाटेचे दवबिंदू टिपायला घराबाहेर पडतो असे झाले होते. दर दोन मिनिटांनी किती उजाडले आहे याचा अंदाज घ्यायला खिडकीबाहेर डोकावणे चालू होते.
साधारण पावणेसहा वाजता असे उजाडू लागले आणि....
हा पहिला फोटो टिपला.
१)
कपाटातले कपडे अंगावर चढेस्तोवर अचानक ढग भरून आले आणि....
सहा वाजता निघताना हा दुसरा फोटो टिपला.
२)
हलका फुलका बुंदाबांदी पाऊस सुरू झाला होता पण छत्री घ्यायचे टाळले. कुठलीही गैरसोय नको होती. रिकाम्या हाताने जगात आलेलो तर रिकामेच फिरायला आवडते. तसेही मुले सोबत असली की काठी न घोंगडं नेऊ द्या की रे म्हणत रुमाल, पाणी, सुका खाऊ, छत्री, खेळणी जवळपास अर्धा संसार बॅगेत कोंबून न्यावा लागतो. पण तेच एकटे असले की मुकद्दर का सिकंदर बनत बेदकारपणे फिरता येते.
जो परिसर आपण सकाळ-दुपार-संध्याकाळ बघतो आणि औषधांच्या तीन डोस प्रमाणे तिन्ही प्रहर एकसारखाच भासतो, तो पहाटे उजाडताना वेगळेच रुप धारण करतो. मानवांनी या वसुंधरेची वाट लावली आहे अन्यथा ती फार सुंदर असती याची प्रचिती घ्यायला भल्या पहाटे उठावे आणि मनुष्यप्राण्यांची वर्दळ नसतानाचे जग अनुभवावे.
जिथे साधे रस्ता क्रॉस करताना सरासरी साडेसात मिनिटे थांबणे होते, जिथे आजवर कित्येक अपघात झाले आहेत, लहान मुलांना एकटे पाठवणे दूरच पण सोबत असतानाही जिथे त्यांचा हात सोडायला भीती वाटते, त्या आमच्या माझगाव नाक्यावर रस्त्याच्या मधोमध चालायचा आनंद मी घेत होतो. भिजलेले रस्ते आणि थिजलेल्या ईमारतींचा देखील एक फोटो टिपायला हवा होता असे फार उशीरा लक्षात आले.
पण उशीरा का असेना फोटो टिपायला हवेत हे लक्षात आले... तसे लगोलग डोंगराकडे वर जाणार्या रस्त्यावर एक टिपला तो असा...
भिंतींवर जे काही शेवाळ जमले होते त्यातही हिरवळ दिसू लागली होती ईतका प्रसन्न मूड तयार झाला होता.
३)
डोंगराच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचताच आधी उजवीकडे जाणार्या रस्त्यावर नजर टाकली. दूर दूर पर्यंत फक्त चिटपाखरूच दिसत होते. पण तुम्ही जास्त झूम करू नका अन्यथा उगाच एखादा मनुष्यप्राणी नजरेस पडायचा.
४)
मग डावीकडे नजर टाकली. ईथे बिनधास्त झूम करू शकता. या रस्त्याने तसेही कोणी फार जात नाही.
५)
डोंगरमाथ्यावर पोहोचेपर्यंत पावसाने विश्रांती घेतली होती, सुर्य ढगाआडून किंचित डोकावू लागला होता. पाऊस थांबून अचानक आभाळ उघडते तेव्हाचे वातावरण मला फार आवडते. पुढचे दिड-दोन तास मी हेच उघडझाप वातावरण अनुभवणार होतो. कुठे काळे ढग, तर कुठे करडे ढग, कुठे पांढर्या कापसाचा पुंजका, तर कुठे निळेशार आकाश, टॉर्च बंद चालू करावे तसे ये-जा करणारी सुर्याची कोवळी किरणे... तुमच्याकडे कितीही शब्दसंपदा असू दे पण याचे वर्णन करायला केवळ एक शब्द पुरतो आणि ऊरतो, तो म्हणजे जादुई वातावरण!
एक दिर्घ श्वास घेत मी दुर्मिळ अशी शुद्ध आणि ताजी हवा फुप्फुसात भरून घेतली आणि फोटो टिपायच्या कामाला लागलो.
कधी नव्हे ते एक डोळा मुलांवर आणि एक मोबाईलवर असे न करता पूर्ण फोकस करून आवडीच्या अँगलने फोटो टिपता आले. नेहमीच्याच डोंगराला वेगळ्या नजरेने बघता आले
६)
७)
८)
आयुष्यात याआधी कधी पाना-फुला-फळांचे फोटो काढल्याचे आठवत नाही. कारण बॅडमिंटन फक्त मुलींचा खेळ, पाणीपुरी फक्त मुलींचे खाद्य आणि फुलांचे जवळून फोटो काढणे हे फक्त मुलींचे छंद अश्या पुरुषी विचारात लहानाचा मोठा झालो होतो.
पण आज मात्र झाडाझुडुपात घुसून फोटो टिपू लागलो.
९)
१०)
११)
१२)
१३)
वाटेवर पसरलेल्या फुलांच्या सड्यालाही नाही सोडले.
१४)
रस्ते अजूनही निर्मनुष्य होते. कधी नव्हे ते झोपाळे देखील रिकामे होते.
हा सारा पाऊसाचा प्रताप होता. नेहमीची मॉर्निंग वॉकची मंडळी आपापल्या घरी पांघरूण ओढून झोपली होती. अणि मी मात्र सो गया ये जहा, खो गया वो जहा म्हणत, आवारा बनून डोंगराच्या ईस डगर उस डगर फिरत होतो.
१५)
१६)
१७)
मध्येच पावसाची एक जोरदार सर आली. आसपास कुठे आडोसा न दिसल्याने मी जवळच एका गार्डनच्या गेटवर उमललेल्या फुलांच्या कमानीलाच छत्री समजून त्या खाली उभा राहिलो.
हातातला मोबाईल आणि डोक्यातला किडा काही स्वस्थ बसू देत नव्हता. तिथूनही काही फोटोचा अँगल मिळतोय का हे शोधले आणि हा फोटो टिपला.
या फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे हा चक्क माझ्या लेकीला आवडला. याआधी कधी तिने मी काढलेल्या फोटोंचे कौतुक केल्याचे आठवत नाही. कारण कधी केलेच नाही.
१८)
थोडा पावसाचा जोर वाढला तसे डोक्यावरची फुलांची कमान अपुरी पडू लागली आणि मी धावत जाऊन एक तंबू गाठला.
तिथून काही सावज टिपता येते का म्हणून नजर फिरवली तर हे सापडले.
१९)
२०)
पाऊस थांबला तसे त्या लोकेशनला जाऊन शूट केले.
२१)
२२)
२३)
अरे हो, हा एक विशेष फोटो आहे.
मी वरच्या लोकेशनवर जात असताना समोरून एक तीन पायाचे कुत्रे चालत आले आणि या खालच्या फोटोतील खांबावर आपला कार्यक्रम उरकणारच होते ते त्याची नजर माझ्यावर पडली आणि स्वारी चक्क लाजली. आपला विचार बदलून चार पायांवर चालू पडली. त्या बदल्यात या डाऊन टू अर्थ खांबाने कृतज्ञता म्हणून मला स्वत:चा एक फोटो काढू दिला.
२४)
तिथून पुढे गेल्यावर हा भूलभुलैय्या लागला. मी त्याला शिताफीने चकमा देऊन निसटलो. आत अभिमन्यू सारखा अडकलो असतो तर सोडवायला ना पांडव होते ना कौरव.
२५)
अरे हो, हे भीष्म पितामह तेवढे होते. पण ते स्वत:च पावसापाण्यात बिनाछत्रीचे फसले होते.
आधी वाईट वाटले त्यांची ही अवस्था बघून. पण मग हातावरच्या पक्ष्यावर नजर पडली तेव्हा पाऊस त्यांच्यासाठी स्वच्छतेचे वरदानच ठरत असावा याची खात्री पटली. निसर्ग सर्वांचीच काळजी घेतो याची प्रचिती आली.
२६)
जेव्हा पावसाने जोर पकडला होता तेव्हा मी एका दगडी तंबूत आसरा घेतला होता. गार्डनमध्ये मुलांना घेऊन येणारे बरेच पालक त्यांना खेळायला सोडून ईथे येऊन बसतात. मला मात्र हे कधीच अलाऊड नव्हते. त्यामुळे ईथे निवांत बसायची अशी बरीच दिवसांची सुप्त ईच्छा होती. आज ती सुद्धा पुर्ण झाली. त्या टेंटचा बाहेरून फोटो पुन्हा कधीतरी, पण मी तिथे बसल्याबसल्या हा अँगल शोधला.
२७)
पाऊस आला की आडोसा शोधणे आणि गेला की फोटो टिपणे, पुर्णवेळ हेच चालू होते.
जेव्हा निघालो तेव्हा वातावरण हळूहळू पलटू लागले होते. पावसाचा जोर ओसरला होता. उजाडू लागले होते. आणि हो, डोंगरावरच्या भूतलावर मनुष्यप्राणी देखील अवतरले होते.
२८)
----------------------------------
----------------------------------
पण चित्रपट ईथेच संपत नाही.
डोंगर उतरून खाली आलो तेव्हा शहराला देखील जाग येऊ लागली होती. चार टाळकी रस्त्यावर दिसत होती. पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून माझे फोटो टिपायचे काम चालू ठेवले.
हि डोंगराच्या पायथ्याशी असलेली एक टुमदार वास्तू त्या क्षणाला अगदी पोर्तुगीजकालीन वाटल्याने फोटो काढला.
२९)
आणि पुढच्याच वळणावर नजरेस पडली ती भारतातील तिसर्या क्रमांकाची ऊंच ईमारत.
हो, गूगल करून नेमके सांगायचे तर,
Piramal Aranya Arav
282.2 metres (926 ft)
83 Floors
३०)
जिथून हा फोटो काढला ती जागा म्हणजे महाराणा प्रताप चौक!
जे आपण चालू घडामोडी आणि राजकारण धाग्यावर जीएसटी कराबाबत तावातावाने चर्चा करतो त्याचे कार्यक्षेत्र म्हणजेच जीएसटी भवन, पुर्वाश्रमीचे सेल टॅक्स ऑफिस ईथेच वसले आहे.
त्याचा मुद्दाम असा फोटो टिपायचा राहिला कारण पुढे जाऊन मी यावर मायबोलीवर धागा काढेन आणि लोकांच्या सामान्यज्ञानात भर टाकेन याची तेव्हा बिलकुल कल्पना नव्हती.
तरीही ज्यांच्या नावे हा चौक आहे त्या महाराणा प्रताप यांचा फोटो न चुकता काढला. अगदी रस्त्याच्या मधोमध उभे राहून समोरून दिसेल असा काढला.
३१)
आणि हा आमचा नॉस्टेल्जिक करून जाणारा माझगाव नाका ... तिन्ही फोटो बदाम बदाम बदाम!
यातली एक ईमारत आमची आहे. पुर्ण नाही. फक्त अर्धाएक मजला आमचा आहे. पण ती कोणती ईमारत आणि कोणता मजला हे स्वतःच्या गोपनीयतेचा आदर करून गुलदस्त्यातच ठेवतो.
३२)
३३)
३४)
----------------------------------
----------------------------------
पण गंमत ईथेही संपत नाही.
पोहे, उपमा, वडा सांबार, ब्रेड पकोडा आणि सकाळची गरमागरम भट्टीतून निघालेली खारी असा भरमसाठ व्हरायटी असलेला नाश्ता घेऊन मी घरी पोहोचलो आणि आकाशात वीज पुन्हा कडाडली, ढग पुन्हा गडगडले, आणि यावेळी मात्र मुसळधार पाऊस सुरू झाला.
आधी पोटोबा म्हणत नाश्ता उरकला आणि चहाचा वाफाळता कप घेऊन हातावर पावसाचे तुषार झेलायला खिडकीत जाऊन बसलो.
३५)
३६)
धन्यवाद,
- ऋन्मेऽऽष
व्वा मस्त फोटो आहेत.
व्वा मस्त फोटो आहेत.
हिरवेकंच पावसाळी फोटो. भारीच.
हे जोसेफ बाप्टिस्टा गार्डन आहे का? खूप आधी गेलो होतो.
तिथे रावण ताडाचे काही वृक्ष आहेत.
पण बाकी त्यात ते सात आश्चर्य वैगरे आता केली आहेत का?
सगळे फोटो छान आलेत आणि सोबतचे
सगळे फोटो छान आलेत आणि सोबतचे वर्णनसुद्धा. आम्हाला तुमच्या डोळ्यांतून आणि कॅमेरातून हा परिसर पाहायला मिळाला. धन्यवाद.
जर फोटो गूगल फोटोज मध्ये टाकून अल्बम तयार करून शेअर केला तर अजून चांगल्या प्रकारे पाहता येतील.
मस्त फोटो आहेत. हिरवेगार !
मस्त फोटो आहेत. हिरवेगार !
छान सफर घडवलीत सकाळच्या
छान सफर घडवलीत सकाळच्या माझगावची ! धन्यवाद.
( माझगावच्या हसनाबागेत - आगाखान मशीद - मी गेलो आहे. पूर्वीचा मुंबईचा फास्ट गोलंदाज इस्माईल तिथलाच. तिथे त्याची टेनिस बॉलची गोलंदाजी खेळताना माझी तारांबळ उडालेली अजूनही स्पष्ट आठवते.
)
डाऊन टू अर्थ खांब
डाऊन टू अर्थ खांब 😀
मुंबईची स्कायलाईन झपाट्याने बदलत आहे याची जाणीव करून देणारे फोटो.
सर
सर
मस्त. नयन रम्य. तबियत गार गार .
फोटो मस्त आलेत!
फोटो मस्त आलेत!
धन्यवाद सर्वांचे
धन्यवाद सर्वांचे
ऋतुराज... हो,
जोसेफ बाप्टिस्टा गार्डन..
गेले काही वर्षात सुशोभीकरण झाले आहे. त्यात ती सात आश्चर्ये आली. पण बाकी आराखडा माझ्या लहानपणापासून असाच. त्यात बदल नाही. झाडांमधील इतके कळत नाही त्यामुळे रावण ताडाबाबत कल्पना पण हल्ली निसर्गाची थोडी गोडी वाटू लागली आहे तर बघतो गूगल करून काय प्रकार आहे आणि तिथे कुठे तो आहे का ते..
वा भाऊ मस्तच, आमच्या
वा भाऊ मस्तच, आमच्या बिल्डिंगपासून पुढे शे दोनशे पावले दोनचार बिल्डिंग पुढे आहे हसनाबाग - आगाखान मशीद.. मोठे मैदान आहे. पण आम्ही तिथे क्रिकेट खेळायचो नाही. आमची मैदाने दुसरी होती. तिथे खेळायला परवानगी नव्हती की आणखी काही हिंदू मुस्लिम कारण होते कल्पना नाही. कारण दंगली झालेल्या तेव्हा ते आणि समोरची अंजीरवाडी यांच्यात तुंबळ युद्ध झाले होते. त्यामुळे तिथे आत जाणे सुद्धा क्वचित व्हायचे.
अनिंद्य येस,
अनिंद्य येस,
तशी मध्यवर्ती भागातील स्कायलाइन झपाट्याने केव्हाच बदलली आहे. पण आमच्या भागात माझगाव डॉक जवळ असल्याने एकेकाळी उंच बिल्डिंगला परवानगी नव्हती. पण आता गेले पाच सहा वर्षात सुटलेत जणू..
नाक्यावरचे फोटो याच कौतुकात काढले आहेत. कारण मुंबईत उंच इमारतींचे कौतुक नाही पण आमच्या भागात हे नव्हते..
बाकी तुमचे वाचन बारीक असते. बरेच लेखाखालील प्रतिसादात तुम्ही त्यातला एखादा शब्दप्रयोग अचूक टिपलेला आढळतो
माबो वाचक,
माबो वाचक,
जर फोटो गूगल फोटोज मध्ये टाकून अल्बम तयार करून...
>>>>
अच्छा हे बघायला हवे कसे करतात. कारण इथे फोटो साईज इतकी कमी झाली की मोबाईलवर बघायला ठीक पण लॅपटॉपवर बघताना फोटो क्लॅरिटी कमी झालेली आढळली.
वा! सुंदर फोटो आणि वर्णन!
वा! सुंदर फोटो आणि वर्णन! मस्त वाटले अगदी फ्रेश फ्रेश!
वाह!! नॉस्टॅल्जिक झाले.
वाह!! नॉस्टॅल्जिक झाले. मुंबईचा पाऊस, मुंबईच सम्राज्ञी.


>>>>>>>याची प्रचिती घ्यायला भल्या पहाटे उठावे
शीख लोकांची अमृत वेला. आपला ब्रह्ममुहूर्त.
>>>>>>> पण तुम्ही जास्त झूम करू नका अन्यथा उगाच एखादा मनुष्यप्राणी नजरेस पडायचा.
-------------------
अमेरिकेतील सिमेट्रीज इतक्या सुंदर, शांत असतात. अक्षरक्षः जाऊन निवांत बसावेसे वाटते. रात्री, सोलर लाईटसची रोषणाई लागते आणि थडगी इतकी सुंदर दिसू लागतात. सिमेट्रीजच्या प्रवेशद्वारांवरती डेथ एंजल्स असतात. पण मी अश्या इच्छा फार करत नाही कारण इच्छा लवकरच पूर्ण होतात, हा अनुभव आहे. नकोच ते.
पण हे विस्टफुल, दु:खी पुतळे फार आवडतात.
धन्यवाद निकु आणि सामो
धन्यवाद निकु आणि सामो
<<< सिमेट्रीजच्या प्रवेशद्वारांवरती डेथ एंजल्स असतात. पण मी अश्या इच्छा फार करत नाही
>>>
हा काय सीन आहे?
अश्या प्रकारचे स्टॅचुज ऋन्मेष
अश्या प्रकारचे सुंदर पुतळे ऋन्मेष. -
.
.
.
पहिली सुंदरच आहे.. अर्थात
पहिली सुंदरच आहे.. अर्थात डेथ असली तरी एंजलच
मस्त आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो.
आज आम्ही पण नेमके इथे भल्या पहाटे उठून सूर्योदय बघायला गेलो होतो
मस्त आले आहेत फोटो. हिरवे गार
मस्त आले आहेत फोटो. हिरवे गार. एकदा जाऊन बघायला पाहिजे हा परिसर.
धन्यवाद अमितव निर्मल
धन्यवाद अमितव निर्मल
निर्मल, तुम्ही कुठे राहता कल्पना नाही पण डॉकयार्ड रोड स्टेशनला लागूनच आहे हे. कधी तिथून जाताना गंमत म्हणून उतरला तरी पटकन बघून याल.. किंवा सेंट्रल वरचे Sandhurst रोड / भायखळा हे सुद्धा टॅक्सी केल्यास जवळ आहेत.
सुरेख फोटो ऋन्मेष. माझगाव
सुरेख फोटो ऋन्मेष. माझगाव परीसरात कधी जाणं झालं नाही पण तू या बागेचे फोटो टाकतोस ते पाहून इच्छा होते जायची.
@सामो डेथ एंजल्स संकल्पना माहिती नव्हती. पुतळे छान आहेत.
माझेमन,
माझेमन,
हे असे फोटोंमुळे मी बरेच जणांना बरेच ठिकाणी जाण्यास भाग पाडले आहे किंवा उत्सुक केले आहे. अश्यावेळी मलाच उगाच त्यांच्या अपेक्षा वाढवल्याचे टेंशन येते
सुंदर फोटो आहेत ऋ, लेखनही
छान वर्णन आणि फोटोही सुंदर..!
छान वर्णन आणि फोटोही सुंदर..! .
माझगाव म्हटलं की, मला माझगाव डॉक आठवते. आमचे बरेच नातेवाईक होते कामाला तिथे...!
माझगाव सेल्स टॅक्स ऑफिस ला येण्याची माझी इच्छा अपूर्ण राहिली. ऑफिसातला सहकारी तिथे कामानिमित्त नेहमी जायचा. त्यामुळे ते ऑफीस परिचयाचे होते. तसंच बेलापूर हि .. पॅनकार्ड नविन आले तेव्हा बेलापूरला जायला लागायचे पेपर सबमिशनला .. असं आठवते.
धन्यवाद अस्मिता, रुपाली
धन्यवाद अस्मिता, रुपाली
आणि हो, माझगाव म्हटले की बरेच जणांना माझगाव डॉकच आठवते. पण निदान ते तरी आहे हे चांगले अन्यथा माझगाव नावाचे रेल्वे स्टेशन नसल्याने लोकांना भायखळ्याच्या जवळ अशी ओळख करून द्यावी लागते
सुंदर गारेगार, हिरवाईने डोळे
सुंदर गारेगार, हिरवाईने डोळे निवले.
फोटोंचा अँगल विशेष आवडला.
सुंदर. फारच सुंदर. मी
सुंदर. फारच सुंदर. मी विक्रीकर भवनमध्ये चौथ्या मजल्यावर जवळजवळ अडीच वर्षे सर्वात खालच्या पोस्टवर म्हणजे कनिष्ठ लिपिक या पदावर अडीच वर्षे कामाला होतो. प्रकाशचित्रे पाहून तेव्हांच्या आठवणी ताज्या झाल्या. नंतर त्या परिसरात कधीच जाणे झाले नाही.
आता परिसरात लक्षणीय पण चांगले बदल झालेले दिसतात. दगडी इमारत तशीच आहे हे पाहून बरे वाटले.
तिथल्या रेलवे स्थानकाचे नाव डॉकयार्ड रोड आहे.
आर्या धन्यवाद.. कोणीतरी
आर्या धन्यवाद.. कोणीतरी फोटोंचा अँगल बद्दल छान म्हटले मलाही गारेगार वाटले
सुधीरजी भारी.. तुम्ही बरेच वर्षापूर्वी इथे असावात असे तुमच्या पोस्टवरून वाटले.
आता आपले डॉकयार्ड स्टेशन सुद्धा बदलले आहे. वर जाण्यासाठी सरकता जिना एस्कलेटर आहे सध्या
मस्तच रे ऋन्मेष
मस्तच रे ऋन्मेष
तुम्ही आज धागा पाहिला नसता
तुम्ही आज धागा पाहिला नसता तर मेसेज टाकणारच होतो तुम्हाला
ऋन्मेष फोटो सुरेख काढलेत!
ऋन्मेष फोटो सुरेख काढलेत!
या भागात कधी फारसे जाणे झाले नाही. पण तु रस्त्याच्या मधोमध चालत होतास तेही दक्षिण मुंबईत याचे आश्चर्य वाटले. पार्ल्यात आम्ही लहानपणी रस्त्याच्या मधोमध चाललोत पण आत ते शक्य नाही.
Pages