दक्षिण मुंबईतील एक रम्य पहाट !
श्रावण पाळत नसलो तरी गटारी पाळत असल्याने ती साजरी करायला माहेरी गेलो होतो. शनिवारी रात्रीच कार्यक्रम सुरू झाल्याने रात्रभर जागरण झाले होते. मुले उशीराच झोपली, पण मी पहाटेपर्यंत जागाच होतो. डोळ्यावर झोप नाही त्यामुळे कधी एकदा उजाडते आणि मी पावसाळ्यातील थंडगार वातावरणाचा फायदा उचलत पहाटेचे दवबिंदू टिपायला घराबाहेर पडतो असे झाले होते. दर दोन मिनिटांनी किती उजाडले आहे याचा अंदाज घ्यायला खिडकीबाहेर डोकावणे चालू होते.
साधारण पावणेसहा वाजता असे उजाडू लागले आणि....
हा पहिला फोटो टिपला.
१)
कपाटातले कपडे अंगावर चढेस्तोवर अचानक ढग भरून आले आणि....
सहा वाजता निघताना हा दुसरा फोटो टिपला.
२)
हलका फुलका बुंदाबांदी पाऊस सुरू झाला होता पण छत्री घ्यायचे टाळले. कुठलीही गैरसोय नको होती. रिकाम्या हाताने जगात आलेलो तर रिकामेच फिरायला आवडते. तसेही मुले सोबत असली की काठी न घोंगडं नेऊ द्या की रे म्हणत रुमाल, पाणी, सुका खाऊ, छत्री, खेळणी जवळपास अर्धा संसार बॅगेत कोंबून न्यावा लागतो. पण तेच एकटे असले की मुकद्दर का सिकंदर बनत बेदकारपणे फिरता येते.
जो परिसर आपण सकाळ-दुपार-संध्याकाळ बघतो आणि औषधांच्या तीन डोस प्रमाणे तिन्ही प्रहर एकसारखाच भासतो, तो पहाटे उजाडताना वेगळेच रुप धारण करतो. मानवांनी या वसुंधरेची वाट लावली आहे अन्यथा ती फार सुंदर असती याची प्रचिती घ्यायला भल्या पहाटे उठावे आणि मनुष्यप्राण्यांची वर्दळ नसतानाचे जग अनुभवावे.
जिथे साधे रस्ता क्रॉस करताना सरासरी साडेसात मिनिटे थांबणे होते, जिथे आजवर कित्येक अपघात झाले आहेत, लहान मुलांना एकटे पाठवणे दूरच पण सोबत असतानाही जिथे त्यांचा हात सोडायला भीती वाटते, त्या आमच्या माझगाव नाक्यावर रस्त्याच्या मधोमध चालायचा आनंद मी घेत होतो. भिजलेले रस्ते आणि थिजलेल्या ईमारतींचा देखील एक फोटो टिपायला हवा होता असे फार उशीरा लक्षात आले.
पण उशीरा का असेना फोटो टिपायला हवेत हे लक्षात आले... तसे लगोलग डोंगराकडे वर जाणार्या रस्त्यावर एक टिपला तो असा...
भिंतींवर जे काही शेवाळ जमले होते त्यातही हिरवळ दिसू लागली होती ईतका प्रसन्न मूड तयार झाला होता.
३)
डोंगराच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचताच आधी उजवीकडे जाणार्या रस्त्यावर नजर टाकली. दूर दूर पर्यंत फक्त चिटपाखरूच दिसत होते. पण तुम्ही जास्त झूम करू नका अन्यथा उगाच एखादा मनुष्यप्राणी नजरेस पडायचा.
४)
मग डावीकडे नजर टाकली. ईथे बिनधास्त झूम करू शकता. या रस्त्याने तसेही कोणी फार जात नाही.
५)
डोंगरमाथ्यावर पोहोचेपर्यंत पावसाने विश्रांती घेतली होती, सुर्य ढगाआडून किंचित डोकावू लागला होता. पाऊस थांबून अचानक आभाळ उघडते तेव्हाचे वातावरण मला फार आवडते. पुढचे दिड-दोन तास मी हेच उघडझाप वातावरण अनुभवणार होतो. कुठे काळे ढग, तर कुठे करडे ढग, कुठे पांढर्या कापसाचा पुंजका, तर कुठे निळेशार आकाश, टॉर्च बंद चालू करावे तसे ये-जा करणारी सुर्याची कोवळी किरणे... तुमच्याकडे कितीही शब्दसंपदा असू दे पण याचे वर्णन करायला केवळ एक शब्द पुरतो आणि ऊरतो, तो म्हणजे जादुई वातावरण!
एक दिर्घ श्वास घेत मी दुर्मिळ अशी शुद्ध आणि ताजी हवा फुप्फुसात भरून घेतली आणि फोटो टिपायच्या कामाला लागलो.
कधी नव्हे ते एक डोळा मुलांवर आणि एक मोबाईलवर असे न करता पूर्ण फोकस करून आवडीच्या अँगलने फोटो टिपता आले. नेहमीच्याच डोंगराला वेगळ्या नजरेने बघता आले
६)
७)
८)
आयुष्यात याआधी कधी पाना-फुला-फळांचे फोटो काढल्याचे आठवत नाही. कारण बॅडमिंटन फक्त मुलींचा खेळ, पाणीपुरी फक्त मुलींचे खाद्य आणि फुलांचे जवळून फोटो काढणे हे फक्त मुलींचे छंद अश्या पुरुषी विचारात लहानाचा मोठा झालो होतो.
पण आज मात्र झाडाझुडुपात घुसून फोटो टिपू लागलो.
९)
१०)
११)
१२)
१३)
वाटेवर पसरलेल्या फुलांच्या सड्यालाही नाही सोडले.
१४)
रस्ते अजूनही निर्मनुष्य होते. कधी नव्हे ते झोपाळे देखील रिकामे होते.
हा सारा पाऊसाचा प्रताप होता. नेहमीची मॉर्निंग वॉकची मंडळी आपापल्या घरी पांघरूण ओढून झोपली होती. अणि मी मात्र सो गया ये जहा, खो गया वो जहा म्हणत, आवारा बनून डोंगराच्या ईस डगर उस डगर फिरत होतो.
१५)
१६)
१७)
मध्येच पावसाची एक जोरदार सर आली. आसपास कुठे आडोसा न दिसल्याने मी जवळच एका गार्डनच्या गेटवर उमललेल्या फुलांच्या कमानीलाच छत्री समजून त्या खाली उभा राहिलो.
हातातला मोबाईल आणि डोक्यातला किडा काही स्वस्थ बसू देत नव्हता. तिथूनही काही फोटोचा अँगल मिळतोय का हे शोधले आणि हा फोटो टिपला.
या फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे हा चक्क माझ्या लेकीला आवडला. याआधी कधी तिने मी काढलेल्या फोटोंचे कौतुक केल्याचे आठवत नाही. कारण कधी केलेच नाही.
१८)
थोडा पावसाचा जोर वाढला तसे डोक्यावरची फुलांची कमान अपुरी पडू लागली आणि मी धावत जाऊन एक तंबू गाठला.
तिथून काही सावज टिपता येते का म्हणून नजर फिरवली तर हे सापडले.
१९)
२०)
पाऊस थांबला तसे त्या लोकेशनला जाऊन शूट केले.
२१)
२२)
२३)
अरे हो, हा एक विशेष फोटो आहे.
मी वरच्या लोकेशनवर जात असताना समोरून एक तीन पायाचे कुत्रे चालत आले आणि या खालच्या फोटोतील खांबावर आपला कार्यक्रम उरकणारच होते ते त्याची नजर माझ्यावर पडली आणि स्वारी चक्क लाजली. आपला विचार बदलून चार पायांवर चालू पडली. त्या बदल्यात या डाऊन टू अर्थ खांबाने कृतज्ञता म्हणून मला स्वत:चा एक फोटो काढू दिला.
२४)
तिथून पुढे गेल्यावर हा भूलभुलैय्या लागला. मी त्याला शिताफीने चकमा देऊन निसटलो. आत अभिमन्यू सारखा अडकलो असतो तर सोडवायला ना पांडव होते ना कौरव.
२५)
अरे हो, हे भीष्म पितामह तेवढे होते. पण ते स्वत:च पावसापाण्यात बिनाछत्रीचे फसले होते.
आधी वाईट वाटले त्यांची ही अवस्था बघून. पण मग हातावरच्या पक्ष्यावर नजर पडली तेव्हा पाऊस त्यांच्यासाठी स्वच्छतेचे वरदानच ठरत असावा याची खात्री पटली. निसर्ग सर्वांचीच काळजी घेतो याची प्रचिती आली.
२६)
जेव्हा पावसाने जोर पकडला होता तेव्हा मी एका दगडी तंबूत आसरा घेतला होता. गार्डनमध्ये मुलांना घेऊन येणारे बरेच पालक त्यांना खेळायला सोडून ईथे येऊन बसतात. मला मात्र हे कधीच अलाऊड नव्हते. त्यामुळे ईथे निवांत बसायची अशी बरीच दिवसांची सुप्त ईच्छा होती. आज ती सुद्धा पुर्ण झाली. त्या टेंटचा बाहेरून फोटो पुन्हा कधीतरी, पण मी तिथे बसल्याबसल्या हा अँगल शोधला.
२७)
पाऊस आला की आडोसा शोधणे आणि गेला की फोटो टिपणे, पुर्णवेळ हेच चालू होते.
जेव्हा निघालो तेव्हा वातावरण हळूहळू पलटू लागले होते. पावसाचा जोर ओसरला होता. उजाडू लागले होते. आणि हो, डोंगरावरच्या भूतलावर मनुष्यप्राणी देखील अवतरले होते.
२८)
----------------------------------
----------------------------------
पण चित्रपट ईथेच संपत नाही.
डोंगर उतरून खाली आलो तेव्हा शहराला देखील जाग येऊ लागली होती. चार टाळकी रस्त्यावर दिसत होती. पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून माझे फोटो टिपायचे काम चालू ठेवले.
हि डोंगराच्या पायथ्याशी असलेली एक टुमदार वास्तू त्या क्षणाला अगदी पोर्तुगीजकालीन वाटल्याने फोटो काढला.
२९)
आणि पुढच्याच वळणावर नजरेस पडली ती भारतातील तिसर्या क्रमांकाची ऊंच ईमारत.
हो, गूगल करून नेमके सांगायचे तर,
Piramal Aranya Arav
282.2 metres (926 ft)
83 Floors
३०)
जिथून हा फोटो काढला ती जागा म्हणजे महाराणा प्रताप चौक!
जे आपण चालू घडामोडी आणि राजकारण धाग्यावर जीएसटी कराबाबत तावातावाने चर्चा करतो त्याचे कार्यक्षेत्र म्हणजेच जीएसटी भवन, पुर्वाश्रमीचे सेल टॅक्स ऑफिस ईथेच वसले आहे.
त्याचा मुद्दाम असा फोटो टिपायचा राहिला कारण पुढे जाऊन मी यावर मायबोलीवर धागा काढेन आणि लोकांच्या सामान्यज्ञानात भर टाकेन याची तेव्हा बिलकुल कल्पना नव्हती.
तरीही ज्यांच्या नावे हा चौक आहे त्या महाराणा प्रताप यांचा फोटो न चुकता काढला. अगदी रस्त्याच्या मधोमध उभे राहून समोरून दिसेल असा काढला.
३१)
आणि हा आमचा नॉस्टेल्जिक करून जाणारा माझगाव नाका ... तिन्ही फोटो बदाम बदाम बदाम!
यातली एक ईमारत आमची आहे. पुर्ण नाही. फक्त अर्धाएक मजला आमचा आहे. पण ती कोणती ईमारत आणि कोणता मजला हे स्वतःच्या गोपनीयतेचा आदर करून गुलदस्त्यातच ठेवतो.
३२)
३३)
३४)
----------------------------------
----------------------------------
पण गंमत ईथेही संपत नाही.
पोहे, उपमा, वडा सांबार, ब्रेड पकोडा आणि सकाळची गरमागरम भट्टीतून निघालेली खारी असा भरमसाठ व्हरायटी असलेला नाश्ता घेऊन मी घरी पोहोचलो आणि आकाशात वीज पुन्हा कडाडली, ढग पुन्हा गडगडले, आणि यावेळी मात्र मुसळधार पाऊस सुरू झाला.
आधी पोटोबा म्हणत नाश्ता उरकला आणि चहाचा वाफाळता कप घेऊन हातावर पावसाचे तुषार झेलायला खिडकीत जाऊन बसलो.
३५)
३६)
धन्यवाद,
- ऋन्मेऽऽष
हो नीलिमा.. अगदी उजाडताना
हो नीलिमा.. अगदी उजाडताना होते. त्यात रविवार आणि पाऊस यामुळे जी मध्येच सुसाट गाडी यायची भीती वाटते तसेही वातावरण नव्हते. अन्यथा रात्री सामसूम असले तरी मी जास्त काळजी घेतो आणि मुलांनाही सांगतो. आमचे बरेचदा रात्री अपरात्री फिरणे होते. पण गाफील राहत नाही. कारण रात्री रस्ता रिकामा बघून सुसाट गाडी चालवणारे असतात. त्यात प्यायलेले असण्याची भिती..
दिवसाचे म्हणाल तर लहानपणी देखील आमचा रस्ता कधी शांत नव्हता.
कधी भारत बंद महाराष्ट्र बंद असेल तेव्हा आम्ही रस्त्यावर क्रिकेट खेळायचो.. वेगळीच मजा यायची ते याचमुळे. कारण त्या दिवशी रस्ता वेगळाच भासायचा
प्रसन्न फोटो आले आहेत.
प्रसन्न फोटो आले आहेत.
हाच का तो डोंगर जो तू जाळला होतास ?
हो.. आणि ते खरे आहे
धन्यवाद.. हो.. आणि ते खरे आहे
मागे डोंगरावरच्या एका धाग्यात त्या सुका पालापाचोळा असलेल्या डोंगर उताराचे फोटो सुद्धा टाकले होते.
सुंदर हिरवाई. छान फोटो
सुंदर हिरवाई. छान फोटो
३९६ बस महाराणा प्रताप चौक ला
३९६ बस महाराणा प्रताप चौक ला जायची नेहमी कुतूहल असायचे कि कुठे असेल ? कसे असेल ? आज फोटोत का असेना पहायला मिळाले. थँक्स ऋन्मेष . इतर फोटो एकदम झकास . ती इंडियातील तिसरी मोठी बिल्डिंग बघून मी इतर पहिल्या दुसऱ्या आणि अजून बाकीच्या कोणत्या या विकी मध्ये पाहिल्या त्यातील ३३ नंबर वाली तर मी रोज बघते . आणि तिच्या मागे आता तिच्यापेक्षा मोठी बिल्डिंग बनलीय .
स्पार्कल अजनबी धन्यवाद !
स्पार्कल अजनबी धन्यवाद !
आधी कल्पना असती तर महाराणा प्रताप चौक बस स्टॉपचा देखील फोटो काढला असता
लास्टस्टॉप असला तरी उघड्यावरच छोटासाच आहे तो.
@ Tallest building in India
14 calcutta
25 Hyderabad
या दोन वगळता टॉप 50 मध्ये सर्व मुंबई आहेत
@ तिसऱ्या क्रमांकाची बिल्डिंग – वर जो २६ क्रमांकाचा फोटो ज्यात आजोबांचा पुतळा आहे त्यात सुद्धा दिसत आहे. दोघे समोरासमोर उभे आहेत
३३ नंबर.. तिघात टाय आहे.
छान फोटो
छान फोटो
आणि कॉमेंटरी देखील
खारी आणि नाश्त्याचा फोटोही हवा होता
धन्यवाद झकासराव,
धन्यवाद झकासराव,
नाश्ता नेहमीचाच असतो म्हणून फोटो मुद्दाम टिपला जात नाही. आणि आईवडिलांकडे असल्याने आणल्या आणल्या त्यांना आधी सर्व्ह करायला बघतो. मुले काय खातील आणि काय नाही याची काही खात्री नसल्याने अश्या व्हरायटी आणाव्या लागतात.
खारी मात्र माझगावला छानच मिळते. तशी इथे नवी मुंबईत नाही. म्हणून मी नेहमी मुंबईहून ती घेऊन जातो.
माझ्या ऑफिसच्या अवतीभोवती
माझ्या ऑफिसच्या अवतीभोवती एवढ्या मोठाल्या बिल्डींग्स आहेत कि बस रे बस . ऑफिसच्या कँटिनमधून बघितलं तर समोरील बिल्डींग्स पावसाळ्यात अर्ध्या ढगातच दिसतात . आकाश केवढं बदललं आहे उत्तर मुंबईच .
आमच्याकडे आमची बिल्डिंग झाली
आमच्याकडे आमची बिल्डिंग झाली तेव्हा आमच्या परिसरात फार उंच बिल्डिंग नव्हत्या. दूरवर ताडदेवचे ट्वीन टॉवर दिसायचे. तेव्हा ते ढगात दिसायचे. आता मध्ये इतक्या बिल्डिंग होत आहेत की तेच थोडेफार दिसतात.
२०१० ते २०१९ ते भारतातील टॉलेस्ट टॉवर होते. सध्या १९ व्या क्रमांकावर आहेत
पहिल्या दुसऱ्या फोटोत असतील. नंतर मार्क करून पाठवतो.
तसेच जुने फोटो आहेत का शोधायला हवे. तुलना करता येईल
396 महाराणा प्रताप चौक म्हणजे
396 महाराणा प्रताप चौक म्हणजे मुलुंड चेकनाका (पश्चिम). हा नाही.
व्वा काय छान फोटो आहे. लिडिंग
व्वा काय छान फोटो आहे. लिडिंग लाईन, फ्रेम, १/३ सगळं आहे.
396 महाराणा प्रताप चौक म्हणजे
396 महाराणा प्रताप चौक म्हणजे मुलुंड चेकनाका (पश्चिम)
>>>>
तरी मी कन्फ्युज झालेलोच. हा बस नंबर लहानपणी ओळखीचा नव्हता. शोधणार सुद्धा होतो, पण ऑफिस एरियात मोबाईल नेटवर्क त्रास देत असल्याने गूगल करता आले नाही.
बोकलत,
बोकलत,
<<<< लिडिंग लाईन, फ्रेम, १/३ सगळं आहे.>>>>
काय असते हे, आणि कुठल्या फोटोबाबत म्हणत आहात..
(No subject)
मोबाईल घेऊन अजून एक सकाळ मुलांशिवाय बाहेर पडलो. पण गार्डन बदलले
.
.
. .
.
.
. .
.
.
झाडीत घुसून काढलेले फोटो छान.
झाडीत घुसून काढलेले फोटो छान.
माझगाव नाक्याचे फोटो पण आवडले. विशेषत: ३३. अनेक चित्रकार पावसातल्या रस्त्यांची चित्रं काढतात त्यावेळी असेच फोटो संदर्भासाठी बघत असावेत असं वाटलं.
धन्यवाद ललिता प्रीति..
धन्यवाद ललिता प्रीति..
आणि हो, पावसाळ्यात भिजलेल्या रस्त्यांचे जलरंगातील शेडिंग खास असते.. अश्या फोटोंचे संदर्भ वापरले जात असावे.
सुंदर फोटो आणि वर्णन!
सुंदर फोटो आणि वर्णन!
सुंदर फोटो. शेवटचे २ बघताना
सुंदर फोटो. शेवटचे २ बघताना शक्तिमान मालिकेचा एक भाग आठवला त्यात गीता विश्वास असे खिडकीबाहेर हात काढते आणि acid rain मुळे तिला हाताला फोड येतात. कायच्या काय लिंक लागली डोक्यात! असो.
396 महाराणा प्रताप चौक म्हणजे
396 महाराणा प्रताप चौक म्हणजे मुलुंड चेकनाका (पश्चिम). हा नाही.
नवीन Submitted by अमितव >>>>>>>>>> thanks
वा ! नवीन फोटो ही छान.
वा ! नवीन फोटो ही छान.
माझगावला नाही पण या बागेत तरी जायला हवे असे वाटते आहे
मागेपण फोटो टाकले होतेस तेंव्हा असेच जाऊन यावे एकदा तरी निसर्ग उद्यानात वाटलेले.
धन्यवाद शर्मिला, हपा आणि निकु
धन्यवाद शर्मिला, हपा आणि निकु
@ निकु, हो.. हे आताचे वरचे प्रतिसादातले फोटो निसर्गउद्यानचे आहेत.
सहीच, नेत्रसुखद फोटो.
सहीच, नेत्रसुखद फोटो.
अशा परिसरात tower मध्ये घर, नशीबवान.
सुंदर फोटो. डोळे निवले
सुंदर फोटो.
डोळे निवले
Pages