✪ ऋषभ पंतची कोलांट उडी (कार्टव्हील)
✪ आधीच्या बॉलला काहीही होवो, पुढचा बॉल नवा
✪ Uncluttered mind, हसरा चेहरा आणि जिद्द
✪ प्रत्येक क्षणी वर्तमानात असणं "ध्यानाचं" प्रात्यक्षिक
✪ शेकडो वेळेस उड्या मारण्याची क्षमता
✪ संयम, सातत्य, संकल्प शिकवणारा खेळ
✪ रंग हो अकेले तो इन्द्रधनुष बनता ही नही!
✪ ठरवलेल्या प्रकारे तासन् तास खेळण्याचं कौशल्य
✪ मैदानावरचं मैदानावर सोडून देण्याची कला!
नुकताच झालेला भारत- इंग्लंड कसोटी सामना! शेवटच्या तासापर्यंत रंगत कायम असलेला व अटी- तटीचा झालेला हा सामना! भारताने सोडलेले कित्येक झेल, एक बुमराह वगळता "गुमराह" असलेले बाकी भारतीय गोलंदाज, उत्तम स्थितीतून बघता बघता संपलेली भारतीय फलंदाजी ह्यासाठी अनेकांना हा सामना लक्षात राहील! त्याबरोबर इंग्लंडची जिद्द, त्यांची "बॅझबॉल" प्रवृत्ती व चौथ्या डावातही ३७१ धावांचं लक्ष्य न डगमगता जोषात पूर्ण करण्याबरोबर लक्षात राहील! अधिकृत सामनावीर जरी बेन डकेट असेल तरी अनेकांसाठी हा सामना शतकवीर केएल राहुल, शुभमन गिलचं कर्णधारपद किंवा बुमराहसाठी नाही तर ऋषभ पंतसाठीच लक्षात राहील! त्याची दोन शतकं, त्याची अद्भुत खेळी, जागतिक योग दिवशी त्याने केलेलं प्रात्यक्षिक, दोन्ही डावांमध्ये मिळून शेकडो वेळा त्याने स्टंपच्या मागे मारलेल्या उड्या आणि स्टंप माईकवरची त्याची शाब्दिक बॅटिंग!
एका सामन्यात चुकीचा फटका मारून बाद झाल्यावर ऋषभ पंतसाठी सुनील गावस्करांनी "स्टुपिड, स्टुपिड, स्टुपिड!" असे शब्द वापरले होते! पण पहिल्या डावात शतक केल्यावर "सुपर, सुपर सुपर" असं तेही म्हणाले! आणि दुसर्या डावातल्या शतकाने तर त्याने सगळ्यांनाच अवाक् केलं! पहिल्या डावात २१ जून रोजी शतक केल्यावरची त्याची कोलांटी उडी तर त्याला "योग दिनाचा खरा राजदूत" बनवून गेली! आणि दुसरं शतकही तितकंच असाधारण. त्यातही एका वेळी तो ५९ बॉल ३१ धावा असा स्वभावाविरुद्ध खेळत होता. संयम, प्रतीक्षा, धैर्य काय असतं हे दाखवत होता. आणि त्याचं विकेटकीपिंग!
(हा लेख इथे इंग्रजीत वाचता येईल. ब्लॉगवर सायकलिंग, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग ह्याबद्दलचे माझे लेख उपलब्ध.)
सामान्यपणे आपल्याला क्रिकेट म्हंटलं की फक्त चौके- छक्के किंवा फलंदाजी आठवते! पण क्रिकेटमध्ये इतरही गोष्टी असतात! विकेटकीपिंग हे असंच थँकलेस काम! आणि प्रत्येक चेंडूच्या वेळी त्याचा संबंध येतो! इंग्लंडने दोन्ही डाव मिळून साधारण १८० ओव्हर्स फलंदाजी केली! म्हणजे ११०० चेंडू. प्रत्येक चेंडूला मागे ऋषभ पंत तयार होता, चेंडू पकडत होता, शेकडो वेळेस उड्या मारत होता! सातत्याने सगळ्यांना चीअर अप करत होता!
ह्या मॅचमध्ये केएल राहुलनेही स्वत:चा मोठा ठसा उमटवला. राहुल द्रविडच्या शैलीतली क्लासिकल फलंदाजी त्याने केली. ऑफ स्टंपबाहेरचा बॉल सोडून देण्याची त्याची कला तर अद्भुत होती! शिस्त कशी असावी, संयम काय असावा, संकल्प किती पक्का असावा हे त्याने दाखवून दिलं. आणि अर्थातच हे ऋषभ पंतकडेही आहे आणि म्हणूनच त्याचे विदेशात इतके शतक आहेत. त्याला बघताना सेहवागची सारखी आठवण येते! मागच्या बॉलला कितीही बीट झाला असेल, अंगावर बॉल बसला असेल किंवा दिवसातली शेवटची ओव्हर असेल, सेहवाग आणि ऋषभ पंत व त्यांचं uncluttered mind! ते त्यांना जो वाटतो तसाच फटका खेळणार! सेहवाग पाकिस्तानविरुद्ध मुलतानमध्ये २९५ वर खेळत असताना सचिनने त्याला सांगितलं होतं की, आता जरा शांतपणे खेळूया. तो हो म्हणाला, पण मग सकलेन मुश्ताकला सिक्स मारूनच त्याने त्रिशतक पूर्ण केलं! जेव्हा भारताला ५० ओव्हर्समध्ये मोठं टारगेट होतं, गांगुली व सेहवाग बॅटिंगला येत होते. गांगुली सेहवागला सांगत होता की, आपल्याला शांतपणे खेळायचं आहे, सिरियस टारगेट आहे! आणि इकडे वीरू "चला जाता हूँ किसी की धून" मध्ये गुणगुणत जात होता! खेळतानाही गाणं म्हणायचा!
सेहवाग व पंत! प्रक्रिया नका बघू, परिणाम बघा असंच म्हणत असावेत! खेळताना पंत किती वेळा खाली पडला ह्यापेक्षा जास्त वेळा चेंडू सीमेपलीकडे पडला! इंग्लंडचे फास्ट बॉलर्स आणि अंपायर्सही चकित होऊन कौतुक करत राहिले! मागच्या चेंडूवर काहीही होवो, पुढचा चेंडू- पुढचा क्षण नवीन आहे. मागच्या क्षणाचं "बॅगेज" मी नेणार नाही आणि तो चेंडू जसा वाटेल, तसा खेळेन हे पंतचं ब्रीद! मला वाटतं त्याचं हातांवर चालणं किंवा कार्टव्हील "योगाचं" प्रात्यक्षिक आहे तर त्याचं प्रत्येक क्षणी वर्तमानात असणं "ध्यानाचं" प्रात्यक्षिक आहे! आणि पंत किंवा सेहवाग कितीही धावा करून जेव्हा आउट होतात तेव्हा दोन क्षण दु:खी होतात. पण मैदानाबाहेर आल्यावर दु:खाचा जराही मागमूस नसतो! मैदानावरचं मैदानातच सोडून येतात.
पण अखेर सामना एक खेळाडू जिंकू शकत नाही. रंग हो अकेले तो इन्द्रधनुष बनता ही नही! सगळ्यांची साथ लागते. कोणी सेहवागसारखा असेल तर कोणी द्रविड लागतो, कोणी व्हीव्हीएस लागतो. एक बुमराह आणि बाकी गुमराह असून चालत नाही. कोणी रवींद्र जडेजासारखा दिवसभर एकाच टप्प्यावर चेंडू टाकू शकणारा लागतो. सगळ्यांनी जोर लावावा लागतो! फिल्डिंग करताना कॅच सोडतच जाणारी टीम "यशस्वी" होऊ शकत नाही! अशा अनेक गोष्टी ह्या कसोटी क्रिकेटमध्ये शिकायला मिळतात. त्या अर्थाने कसोटी क्रिकेट हे जीवनासारखं आहे. शॉर्ट कट आणि शॉर्ट बर्स्ट इथे टिकत नाही. दीर्घ प्रयत्न, सातत्य, संकल्प, संयम, धैर्य सगळ्या गुणांचा कस लागतो! हायलाईटसमध्ये जरी फक्त बाउंड्रीज किंवा विकेटस दिसत असल्या तरी ही लढाई प्रत्येक चेंडूची असते- प्रत्येक क्षणाची असते. चेंडू सोडण्याची व मैदानावरचं मैदानावर सोडण्याचीही कला असते. क्रिकेट बघताना इतकं नक्कीच शिकण्यासारखं आहे!
(वाचल्याबद्दल धन्यवाद. लेख जवळच्यांसोबत अवश्य शेअर करावा. -निरंजन वेलणकर 09422108376. आकाश दर्शन, ध्यान, फन- लर्न व फिटनेस सत्र. लेख लिहीण्याचा दिनांक: 26 जून 2025)
जियो! माझा रुमाल !
जियो!
माझा रुमाल !
*रंग हो अकेले तो इन्द्रधनुष
*रंग हो अकेले तो इन्द्रधनुष बनता ही नही! * - +१ !
प्रत्येक संघात असा एक तरी खेळाडू असावा, असं मलाही वाटतं.