तुला जपणार आहे

Submitted by rmd on 25 June, 2025 - 10:26

वाड्यावर खूपच आग्रह झाल्यामुळे या मालिकेसाठी शेप्रेट धागा काढत आहे Proud

राजश्रीच्या सगळ्या पिक्चरांचा काला करून त्यातल्या हाताला लागतील त्या गोष्टी उचलून बनवलेली ही मालिका वाटते आहे. सुरूवातीलाच एक लहान मुलाच्या आवाजात बोलणारा हरी नावाचा इरिटेटिंग पोपट आहे. हा सग्ग्ळं सग्ग्ळं बोलतो. तळी नावाच्या गावाची ओळख करून देतो. तळी मधे तळीराम आहेत की नाही ते कळलं नाही अजून. पण तळी मधे एक देवीआई आहे. या गावांमधे साधी देवी नसतेच का? देवीआईच कशी असते कंपल्सरी?

कोणी मीरा म्हणून मुलगी दाखवली आहे. ती म्हणे कशामुळे तरी गावच्या देवीचं तोंड बघत नसते पण तिची सेवा मात्र करत असते. म्हणजे डोळे बांधून गाभार्‍यात जाऊन वस्तू देणे वगैरे गोष्टी करत असते. तिची बहीण हयात नाहीये असा एक उल्लेख आलाय. ती कशी मेली आहे ते समजलं नाहीये. पण त्याचा दोष मीरा 'देवीआई' ला देत असते.

दुसरीकडे एक 'रामपुरे' नावाचं घराणं दाखवलं आहे. दोन भाऊ, त्यांच्या दोन बायका, एक आगाऊ टीनेजर मुलगी असा सरंजाम दिसला. भिंतीवरी ( कालनिर्णय नव्हते. हे ममव घर नव्हे. ) मोठ्या भावाच्या सुनेचा अर्धी भिंत झाकणारा फोटो. मोठी जाऊ धूपपात्र घेऊन घरभर फिरवत येते ( मधेच भन्साळी पण आठवला असावा ) मग या सुनेच्या फोटोसमोर तिच्या चांगुलपणाचं गुणगान होतं. बरीच बडबड झाल्यावर समजतं की मोठ्या भावाच्या मोठ्या मुलाची ही बायको आहे - अंबिका, कशाने तरी मेली आहे आणि तिच्या मृत्युला एक वर्ष होत आलं आहे. मोठ्या मुलाला एक मुलगी आहे आणि बापलेक अजूनही दु:खात आहेत. तरीही घरच्यांना आता त्याचं पुन्हा लग्न लावून द्यायचं आहे.

कट टू मोठा मुलगा - अथर्व. याचं मराठी फार कष्टाने उच्चारलेलं आहे. त्याची कसलीशी फॅक्टरी/कंपनी आहे. अर्थातच! राजश्री फॉर्म्युला असल्यामुळे फॅक्टरी वगैरे हवीच. त्याचं नाव प्रेम नाही हे आपलं नशीब. तो दु:खी दिसण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यासोबत असलेले कोणी केशवकाका त्याला दुसरं लग्न करायचा आगंतुक सल्ला देतात.

फॅक्टरीमधे काम करणार्‍या एका बाईला तिथला सुपरवाइजर ती बाळाला फीड करत असताना पाहतो आणि बाळ हिसकावून घ्यायला लागतो. मुळात ती तिथे बाळ घेऊन कशी आलेली असते? आणि हा बाळ हिसकावून काय करणार असतो? एंटर अथर्व - तो सुपरवाइजरला फडाफडा मुस्काटात मारतो आणि बाईची माफी मागतो. वर फीडींगसाठी रूम बनवण्याचे आदेश देतो.

सुपरवाइजरला हाकलून दिल्यावर अथर्व त्या बाईच्या बाळाला उचलून वगैरे घेतो. सगळ्या उपस्थित कामगारांच्या चेहर्‍यावर कौतुकाचे भाव. मागून एक माणूस मान वाकडी करून तिरका चालत येतो. हा अथर्वचा भाऊ - अजित. यालाच ती फीडिंग रूम तयार करायला सांगितलेलं असतं म्हणे. पण आता अथर्व ते काम केशवकाकांना देतो. हे ऐकून अजितची मान अजून वाकडी होते आणि तो केशवकाकांना म्हणतो की अंबिका इथली चीफ सुपरवाइजिंग ऑफिसर (!) होती पण आता ती नाहीये. या कंपनीत माझा वाटा पण आहे आणि ती सीएसओ ची जागा मला हवी आहे.

पुन्हा आपण ममव नसलेल्या रामपुरेंकडे येतो. मंजिरी उर्फ मोठी जाऊ सगळ्यांना थालिपीठं वाढतेय. प्रत्येकी एक. वर घरच्या लोण्याचा गोळा. यू कॅन टेक म आऊट ऑफ मव बट यू कॅन नॉट टेक मव आऊट ऑफ म. Proud पुन्हा एकदा अथर्व आणि त्याची मुलगी वेदा कसे बिचारे झाले आहेत आणि अथर्वचं लग्न यावर चर्चा. धाकटी जाऊ कोण्या मायाची शिफारस करते. आता माया नावाची बाई आपल्याला दाखवतात. ती एकाच वेळी लोभी, हावरट आणि वेडसर दिसते. तिने एका चित्रकाराकडून तिचं अथर्वसोबत असल्याचे पेंटिंग करून घेतलेलं असतं. ते बघून ती एकदम चिडते आणि चित्रकाराच्या हातात त्याचंच एक शस्त्र खुपसते. का तर म्हणे त्याने चित्रात तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही दाखवलेलं. अरे मग ते दाखव असं सांगायचं की सरळ! पण तसं नाही.

ही माया कोणाची कोण ते कळलं नाही. ती अनाथ आहे इतकं कळलं. तिला ती अंबिकाच घरात घेऊन आलेली असते म्हणे. असो. आता उद्याच्या वर्षश्राद्धाची तयारी चालू आहे. अंबिकाच्या फोटोला सोनचाफ्याचा हार आहे. माया रामपुरे मॅन्शन मधे येते. मग अथर्व येतो. मग वेदा येते. तिच्यासोबत टफीचा दूरचा भाऊ शोभेल असा एक गोल्डन रिट्रीव्हर येतो. वेदा कोणाशीच काही बोलत नाही. आईच्या गाण्यांच्या कॅसेट्स ऐकत राहते. शाळेत पण वॉकमन घेऊन जाते. त्यात फक्त एकच गाणं असतं - तुला जपणार आहे...! माया संधी मिळेल तेव्हा आणि संधी मिळेल तिथे अथर्वला चिकटून घेते. बाहेरून माळी असावा असा दिसणारा माणूस येतो. त्याच्याकडे पाहून माया चपापते. तिला कुठलंतरी आगीत जळणारं घर आठवतं. माळी तिला 'I know what you did last summer' वालं लूक देतो आणि त्याचवेळी अंबिकाच्या आवडीचं म्हणून सोनचाफ्याचं फूल अथर्वला देतो. बहुतेक गावातल्या सगळ्या सोनचाफ्याच्या फुलांचे वाटे यांच्या घरीच येत असावेत.

आता स्टोरी पुन्हा मीराकडे येते. हिच्याशी तो सुरूवातीचा इरिटेटिंग पोपट बोलतो आहे. तो पाहून मला 'मैं प्रेम की दिवानी हूँ' आठवला. त्या सुडो-टफीचं सीजीआयकरण का नाही केलं बरं? मीरा विवाहमधल्या अमृताच्या सीन मधे. काकाच्या घरी वाढणारी. काकू जिचा उठताबसता छळ करते अशी. काकाला विवाहमधल्यासारखीच एक मुलगी. ही बरीच छोटी आहे तरीपण काकूला तिचं लवकरच लग्न करायचंय. पण त्या आधी मीराला उजवून टाकायचंय. काकूच्या अंगात सीमा बिस्वास संचारते. मीराचे बाबा हयात आहेत. पण वेडे झालेत. स्मशानात राहतात. अपशकुनी पण असतात म्हणे असं गावकरी म्हणत असतात. मीरा बाबांसाठी भाकरी घेऊन जाते.

रामपुरी, सॉरी, रामपुर्‍यांच्या घरी माया उत्साहात. श्राद्धासाठी सगळी तयारी करते आहे. सोनचाफ्याचा हार ऑर्डर केलाय. धाकट्या जावेला मायात म्हणे अंबिका दिसते. असं म्हटल्यावर अंबिकाच्या फोटोचा हार हालायला लागतो. माया पुन्हा पुन्हा गदगदल्याची अ‍ॅक्टिंग करत अंबिकाचे गोडवे गात राहते. अथर्व कंटाळलेला आणि कन्फ्युज्ड चेहरा करून बघत राहतो. घरचे गहिवरतात. अंबिकाच्या पुढचा दिवा विझतो. मधेच ओम शांती ओम लागला की काय? अथर्वची आई दिवा लावायला जाते अंबिकाची फ्रेम वरून खाली येते आणि टेबलावर टेकते. तिथून बाजूला न होता आई फ्रेम कशी पडतेय ते पहात राहते. अथर्व मधे येतो आणि फ्रेम त्याच्या खांद्यावरून घसरत खाली पडते. तरीही मोठ्ठा स्फोट झाल्यासारख्या काचा छतापर्यंत उडतात.

पुढे काय? अंबिका कशी मेलेली असते? का तिला कोणी मारलेलं असतं? मीराचा काय संबंध? हे कळण्यासाठी देखते रहिये 'तुला जपणार आहे' झी मराठी वर Proud
मी ही मालिका यूट्यूबवर पाहाते आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती वर टांगलेली म्हातारी आहे, ती चिरतारुण्य मिळवायचा प्रयत्न करतेय, दात गेलेत, नखं वाढली आहेत आणि ती मंजिरी नावाची बाई तिला या कामात मदत करतेय, दोन जणींचे बळी घेतलेत त्यासाठी, आई मुलीचे आणि आता छोट्या नातीचा घ्यायचाय.

अरे ते मार्जरी (ग्रीक: मोत्यांसारखी) नव्हे तर मार्जारी (संस्कृत: मांजरासारखी) आहे Lol
तिच्या पोकळ बढाया बघता तिला उंचावर यासाठी बसवले असावे जेणेकरून तिचा उंटावरुन शेळ्या हाकण्याचा उद्योग अखंड चालू राहावा आणि ती शहाणी सिद्ध व्हावी.
मायाला मीराची बहीण दाखवण्याचे प्रयत्न चाललेले असताना ड्रॉप केली होती. धागा वर आलेला पाहून परत कॅच अप केली. पण मीराला अंबिका तिची बहिण आहे हे महासत्य या महाबुधवारी कळवलं ते वगळता सगळं जैसे थेच आहे Proud आता त्यांना एक नवीन आयटम सापडला आहे. महामायेला अंबिका खोलीत आहे की नाही ते कळायला लागल्यापासून अंबिकाच्या प्रेझेन्समध्ये चांगलं वागण्याचं नाटक करायचं आणि उरलेला वेळ कटकारस्थाने करायची. या दुटप्पी वागण्याने माया इतकी गोंधळते की ज्याचं नाव ते.

काल मायाला कडूलिंब घातलेलं श्रीखंड खायला घालून तिची कशी फजिती झाली यावर एपिसोड काढला. आता शिवनाथला मारायचं ठरलंय तर माया/महामाया दुकलीने शिवनाथकडे पूर्ण दुर्लक्ष करून कसलीही सुपरपॉवर नसलेल्या मीरावर लक्ष केंद्रित केलंय. तिला उद्या कसल्याशा मंतरलेल्या का विषारी द्रवाने भिजवलेले गुलाबाचे फूल हुंगायला देणार आहेत. असेच लूकिंग लंडन टॉकिंग टोकियो प्लॅनिंग करत राहिल्या तर मार्जारी स्वत:च ते फूल हुंगून एखाद्या कवडीत स्वत:ला कोंडून घेईल. Happy

Lol

हो मी आधी मार्जारीच म्हणायचे पण हल्ली मंजिरी मार्जरी म्हणतेय असं ऐकू येतंय मला म्हणून तसं लिहिलं.

रविवारी स्पेशल एपिसोड होता, मी बघितला नाही, एक तास कोण बघत बसणार .

बहिणीला अंबिका दिसते तर मुलीला का नाही दिसत, काय माहिती.

नवीन प्रोमो बघितला youtube वर, मीरा मायाला बाहेर काढते, माझी बहिण अंबिका आहे असं सांगते.

Rofl यावेळेस माया/महामायाचा प्लॅन अरबी कथांहूनही सुरस आणि चमत्कारिक आहे.

ते प्रिव्ह्यूमधलं लिक्विड म्हणे असं केमिकल आहे ज्याने नाकाची संवेदना तात्पुरती निकामी होते. मीराला ते केमिकल हुंगवल्यावर त्यांनी स्वयंपाकघरात गॅस लीक केला. आता मीराला गॅसचा वास येणार नाही, ती अनवधानाने गॅस पेटवायला जाईल आणि बूम!
माया महामायेला प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न विचारते - मॅडम तुम्हाला हे केमिकल कुठे मिळालं?
महामाया मायाला लेखकाच्या मनातले उत्तर देते - तुला काय करायचंय?

आता एवढा द्राविडी प्राणायाम का तर मीराशिवाय घरात फक्त भूतांबिका आहे. तिला बाकी सगळं कळेल पण ती भूत असल्यामुळे तिला गॅस लीकचा वास येणार नाही आणि ती प्लॅनच्या आड येणार नाही Biggrin आणि खर्‍या अडसराने (देवीआई) ऑलरेडी अथर्वला घरी परत पाठवण्याची सोय ऑलरेडी केली आहे (प्लॅन फसणार, मॅडम तुम्ही लूजर इ. इ. लूप रिपीट)

मुळात शिवनाथ तांत्रिक सोडून जे भूत "आता उरले फक्त थर्ड व्हील पुरती" लेव्हलचे आहे त्याचा इतका विचार या दोघी करत आहेत हे पाहून रमोला सिकंद/तृप्ती विरानी/अपर्णा बसू/जानकी किर्लोस्कर अशा यशस्वी व्हॅम्प्स कपाळ बडवून घेत असतील.

गेले काही एपिसोड्समध्ये भूतांबिकेने मीराला अथर्वसोबत मोकळेपणाने वागण्याचा केलेला आग्रह पाहून तर प्रेक्षक "अजि म्या हे काय पाहिले" अवस्थेत प्रवेश करते होतील. हे म्हणजे रेणुका शहाणेच्या भूताने माधुरीला "तसा चांगला आहे गं मोहनीश बहल. तू एकदा त्याला कातिल स्माईल देऊन तर बघ" म्हणण्यासारखे आहे.

Lol

ती भुतांबिका तेवढेच उद्योग करते, त्या मिराच्या अवतीभवती. दुसरं अवध्यान व्यवध्यान, चौफेर नजर काहीच नाही, बाटलीत बंद होऊनही सुधारली नाहीये. भूत कसं हवं, ह्याचे धडे घ्यायची गरज आहे तिला, उच्च उच्च भूत आत्मे यांच्याकडून. इतकं बावळट भूत बघितल्याचं आठवत नाहीये.

ती देवीच जपत असते यांना.

माया, महामाया कायम तोंडावर आपटतात पण महामायाचा कॉन्फिडन्स किती तो.

मी दहा मिनिटं उशिरा लावला एपिसोड झी मराठीवर. आधीचे माहिती नाही काय ते, उरलेल्या वेळेत आज न पेटणारा गॅस लायटर आणि न पेटणारी काडेपेटी हिरो हिरॉईन होते (खूप फुटेज होतं या दोघांना). महागौरी मातेची कृपा.

पायस आणि अन्जूताई, धमाल लिहिताहात. काल वाचून गेले होते. Lol माझी लिंक तुटली होती पण पुन्हा पाहेन आता.

महामाया - यावेळेस असा काही सापळा रचला आहे की मीरा एका बूममध्ये ओम फट स्वाहा. काय तो प्लॅन, काय ते केमिकल, आणि काय तो फुसफुसत गळणारा एलपीजी. सगळं कसं ओके मधी आहे.
माया - काऽऽहीऽऽहीऽऽ ओके मधी नाही आहे मॅडम. तुम्हाला स्वत:ला गॅसने भरलेल्या किचनमध्ये पाच मिनिटं थांबता येत नव्हतं. ती मीरा शब्दश: सेन्सलेस म्हणून किचनमध्ये गेली आणि तरी ना बेशुद्ध पडली ना डोळे चुरचुरले. आणि आपलं काय ठरलेलं की मीरा किचनच्या दिशेने निघाली की मी फोन करुन कळवेन आणि तुम्ही काढता पाय घ्याल. मग रिंग वाजली ती पुरेशी आहे ना? कॉल घेऊन हॅलो हॅलो काय करत बसला होतात? एवढं करुन महागौरीमातेने पाठवलंच ना अथर्वला? मॅडम तुम्ही एक नंबरच्या लूजर आहात.
महामाया - तोंऽऽड बंऽऽद ठेऽऽव तुऽऽझं. मार्जारी, मार्जारी हे सगळं काय चाललं आहे? यावेळेस दैवी शक्तीने हस्तक्षेप केला की त्या शिवनाथने काही लुडबूड केली?
मार्जारी - मंऽऽजिरीऽऽ. आधी मला सांग की "ज्या घरात स्फोट होणार आहे, त्याच घरात थांबून स्फोटाचा आवाज कसा येतो हे बघूया" हे तुला कोणत्या शक्तीने सुचवलं?

न पेटणारा गॅस लायटर आणि न पेटणारी काडेपेटी हिरो हिरॉईन होते >> Lol

कहर एपिसोड होता. आधी काही नाही, वेदा नूडल्स मागते म्हणून मीरा किचनमध्ये जाते आणि या दोघी कधी स्फोट होतोय म्हणून त्याच घरात दबा धरुन बसतात.
अंबिकाने नूडल्स ना "फाट फूड" म्हणणे. वेदाने नूडल्सची फर्माईश केल्यावर मीराने घरगुती नूडल्स करुन देते म्हणून शेवया करायला घेणे Proud घाईघाईने घर गाठायला निघालेल्या अथर्वने गाडी थांबवून रस्त्यावर फटाके उडवणार्‍या मुलांचे प्रबोधन करणे आणि महागाईच्या जमान्यात गरीब मुलांसमोर "हे काय, एवढेच फटाके तुमच्याकडे?" अशी मुक्ताफळे उधळणे. हे काही छोटे छोटे जेम्स.

आता जर मीराला स्फोटात उडवायचे आहे तर लायटर (चालू आहे हे तपासून) तिला सहज सापडेल असा ओट्यावर काढून ठेवेल एखादी व्हॅम्प तर ते गेलं कुणीकडे. फुकाचा नुसता "अजून ब्लास्ट कसा झाला नाही" थयथयाट. आणि वेदा नक्की कितव्या इयत्तेत आहे? ती आज विकास अ‍ॅपलचं बालवाडीचं पुस्तक वाचताना दिसली आहे.

अस्मिता कर लवकर कॅचअप. तुझ्याही पोस्ट्स येऊ देत Happy

पायस मस्तच.

मी तर मागेच कधीतरी झी च्या fb पेजमध्ये जाऊन लिहिलं, तुला जपणार आहे पोस्टरवर त्या देवी आजीचा फोटो ठेवा, तिलाच सतत येऊन जपावं लागतं ह्या बहिणींना.

कालचा एपिसोड का बघितला, वैताग.

मठ्ठ बहिणी, ते केमिकल टाकलेले गुलाबाचं फुल ताब्यात घेऊन lab ला पाठवायचं की, मग मायाला बडवायला जायचं, proof देऊन सर्वांसमोर बडवायचे. महामाया ते फुल गायब करेल.

स्थळ: अ‍ॅक्मे कंपनीचे ऑफिस

"सर, एक प्रॉब्लेम आहे."
"काय?"
"सर श्रीयुत वायली कायोटे यांनी आपले प्रॉडक्ट्स घ्यायला नकार दिला आहे. म्हणे आता त्यांना वाढीव दर परवडत नाहीत."
"बरं."
"बरं? अहो पण सर ते आपलं सगळ्यात मोठं गिर्‍हाईक होतं. आपण काहीही प्लॅन्स विकत होतो त्यांना."
"असेल. पण आता आपलं नंबर वन गिर्‍हाईक ऑफशोअर आहे."
"कोण सर?"
"सौ. मंजिरी रामपुरे. नुकतेच त्यांना अत्यंत सोफिस्टिकेटेड प्लॅनच्या नावाखाली एक फुग्यांचे पाकिट विकलं आहे. हे बघ इन्व्हॉईस."
(डोळे मोठे करुन) "लोकल मार्केटमध्ये स्वस्तात मिळणारी गोष्ट हिने एवढ्या महाग किंमतीला घेतली?"
"आणि सर्वात बेस्ट म्हणजे आपण सुचवलेला प्लॅन फसला तरी त्या खापर कोणा मायावर फोडतात. इथून पुढे आपली प्रायोरिटी कस्टमर हीच!"

यावेळेसचा प्लॅन महामायाला डॉक्टर डुफेन्श्मर्झनी डिझाईन करुन दिला आहे. आधी मायाकरवी फुगे मागवले. हे फुगे खाकी पाऊचमधून आणलेले दाखवूया असे सुचले यावरुन रायटिंग टीमचा आचरटपणा जोखावा. महामाया म्हणते हं आता फुगव. (मॅडम हे काय बोलताय तुम्ही? फुगव)x2
तिने फुगा फुगवला. मग तिच्याच समोर महामायेने फुगवलेल्या फुग्यातील हवा सोडली. मग तिला सांगितलं की उगाचच काहीतरी संशयास्पद वाग. तिचं रेग्युलर वागणंच इतकं संशयास्पद आहे की ठरवून संशयास्पद कसं वागायचं या विचारानेच ती बावचळून गेली आहे. हे सगळं का तर अंबिका हे बघून मायाचा पाठलाग करेल आणि घराबाहेर जाईल.

आता हुशार व्हॅम्प अशावेळी घराभोवती मार्जारीच्या मदतीने काहीतरी कवच घालेल जे सुष्ट शक्तींना प्रवेश करायला प्रतिबंध करेल तर ते गेलं कोणीकडे. महामायाने तो फुगा पाण्याने भरला आणि गॅसवरच्या व्हेंटमध्ये लपवला. मग दादासाहेबांच्या आडून अथर्व-मीराला चकल्या करायला तयार केलं. आता हे दोघं चकल्या तळणार. त्या उष्णतेने व्हेंटमधला फुगा फुटणार. पाणी कढईतल्या तापलेल्या तेलात सांडणार, तेल या दोघांच्या अंगावर उडणार आणि हे दोघे भाजून निघणार. बरं घाई किती. गेल्यावेळेस लायटर सापडला नाही पटकन म्हणून यावेळेस "खाली कढई गॅसपर चढा दी" आणि म्हणे चकल्या तळा. मीरालाही हसू आवरत नव्हतं - पीठ भिजवू ना आधी का बोलाची चकली तळू?
लोकांचे भ्रमाचे भोपळे फुटतात. हा प्लॅन फसल्यावर आपण महामायेचा फुगा फुटला असे म्हणू शकू.

बाकी नेहमीच्या गंमती जंमती चालूच आहेत. अथर्व-मीरामध्ये नसलेला रोमान्स पुन्हा सुरु करुन द्यायचा आहे. मग टफी कुत्र्याची मदत घ्यायची सोडून इतर सर्व कॉम्प्लिकेटेड योजना आखल्या जात आहेत. लाईटच्या माळा लावायला गेले आणि दोघांनी त्या माळांचा गुंताडा करुन ठेवला. माया त्यांच्या रोमान्सला इलेक्ट्रिक रोमान्स करायला गेली तर भूतांबिकेने फॉर अ चेंज शक्तिप्रदर्शन करत शॉक तिच्यावरच उलटवला. यांचं बजेटही बहुतेक कमी केलंय कारण आता बर्‍याचदा अंबिका विदाऊट बर्निंग व्हीएफएक्स (ती भूत भासावी म्हणून दिलेला इफेक्ट) वावरते.

या लोकांनी आता प्लॅनिंग थोडं सीरियसली घेण्याची गरज आहे कारण आता चिरतारुण्याच्या मार्केटमध्ये यांना कंपिटिटर आली आहे - https://www.instagram.com/reel/DP5ph-1DF7v/

Lol

सध्या परत मी बघत नाहीये.

ते गुलाबाचे फुल लॅब मध्ये देऊन चेक करून घेतलं का, या मठ्ठ बहिणींना हे असलं सुचत नाही. ती देवी आजी आल्याशिवाय काही नाही.

अनेक महिन्यांनी मी चक्क दोन दिवस दोन पूर्ण एपिसोडस बघितले. मध्ये मीराच्या बाबांना बोलाऊन मंजिरी एक डाव खेळते, प्रोमो बघून एपिसोड बघितला होता. आत्मा उर्फ भूत मठ्ठ ते मठ्ठच आहे. बाबांवर खोटा आळ घेऊन मारतात तेव्हा ते भूत बाबा चुकीचे आहेत, आईच बरोबर करत बसते. परत बघायचे डेरींग नव्हतं.

असंच दोन मिनिटं यूट्यूबवर बघून दोन एपिसोडस बघितले. आत्मा उर्फ भुताचा मठ्ठपणा अति खालच्या लेवलला गेलेला आहे. तो नर्मदाचा मुलगा मायाशी लग्न करून येतो, मायात सूक्ष्म रूपाने मीराचे बाबा आहेत, त्यांना कैद केलेलं असतं मंजिरीने आणि देवीने सोडवून मीराला मदत करायला जा सांगितलेलं असतं. माया एका टाईपची अॅक्टिंग करते, आता तर तिला फार काही करायचे नाहीये, फक्त डोळे मोठे करत इथे तिथे बघायचे आहे.

आत्मा उर्फ भूत तिच्यात बाबा शिरलेत ओळखू शकत नाही (आता ह्या भुताला रिटायरड करा, उगाच पेमेंट द्यावे लागत असेल) उलट ती मीराला सांगते बघ आई चांगल्या आहेत, मायाच सर्व करतेय. मंजिरी उर्फ चेटकीणही शिवानंदला ओळखत नाही.

इतकं मठ्ठ भूत आयुष्यात बघितलं नाही.

Pages