वाड्यावर खूपच आग्रह झाल्यामुळे या मालिकेसाठी शेप्रेट धागा काढत आहे 
राजश्रीच्या सगळ्या पिक्चरांचा काला करून त्यातल्या हाताला लागतील त्या गोष्टी उचलून बनवलेली ही मालिका वाटते आहे. सुरूवातीलाच एक लहान मुलाच्या आवाजात बोलणारा हरी नावाचा इरिटेटिंग पोपट आहे. हा सग्ग्ळं सग्ग्ळं बोलतो. तळी नावाच्या गावाची ओळख करून देतो. तळी मधे तळीराम आहेत की नाही ते कळलं नाही अजून. पण तळी मधे एक देवीआई आहे. या गावांमधे साधी देवी नसतेच का? देवीआईच कशी असते कंपल्सरी?
कोणी मीरा म्हणून मुलगी दाखवली आहे. ती म्हणे कशामुळे तरी गावच्या देवीचं तोंड बघत नसते पण तिची सेवा मात्र करत असते. म्हणजे डोळे बांधून गाभार्यात जाऊन वस्तू देणे वगैरे गोष्टी करत असते. तिची बहीण हयात नाहीये असा एक उल्लेख आलाय. ती कशी मेली आहे ते समजलं नाहीये. पण त्याचा दोष मीरा 'देवीआई' ला देत असते.
दुसरीकडे एक 'रामपुरे' नावाचं घराणं दाखवलं आहे. दोन भाऊ, त्यांच्या दोन बायका, एक आगाऊ टीनेजर मुलगी असा सरंजाम दिसला. भिंतीवरी ( कालनिर्णय नव्हते. हे ममव घर नव्हे. ) मोठ्या भावाच्या सुनेचा अर्धी भिंत झाकणारा फोटो. मोठी जाऊ धूपपात्र घेऊन घरभर फिरवत येते ( मधेच भन्साळी पण आठवला असावा ) मग या सुनेच्या फोटोसमोर तिच्या चांगुलपणाचं गुणगान होतं. बरीच बडबड झाल्यावर समजतं की मोठ्या भावाच्या मोठ्या मुलाची ही बायको आहे - अंबिका, कशाने तरी मेली आहे आणि तिच्या मृत्युला एक वर्ष होत आलं आहे. मोठ्या मुलाला एक मुलगी आहे आणि बापलेक अजूनही दु:खात आहेत. तरीही घरच्यांना आता त्याचं पुन्हा लग्न लावून द्यायचं आहे.
कट टू मोठा मुलगा - अथर्व. याचं मराठी फार कष्टाने उच्चारलेलं आहे. त्याची कसलीशी फॅक्टरी/कंपनी आहे. अर्थातच! राजश्री फॉर्म्युला असल्यामुळे फॅक्टरी वगैरे हवीच. त्याचं नाव प्रेम नाही हे आपलं नशीब. तो दु:खी दिसण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यासोबत असलेले कोणी केशवकाका त्याला दुसरं लग्न करायचा आगंतुक सल्ला देतात.
फॅक्टरीमधे काम करणार्या एका बाईला तिथला सुपरवाइजर ती बाळाला फीड करत असताना पाहतो आणि बाळ हिसकावून घ्यायला लागतो. मुळात ती तिथे बाळ घेऊन कशी आलेली असते? आणि हा बाळ हिसकावून काय करणार असतो? एंटर अथर्व - तो सुपरवाइजरला फडाफडा मुस्काटात मारतो आणि बाईची माफी मागतो. वर फीडींगसाठी रूम बनवण्याचे आदेश देतो.
सुपरवाइजरला हाकलून दिल्यावर अथर्व त्या बाईच्या बाळाला उचलून वगैरे घेतो. सगळ्या उपस्थित कामगारांच्या चेहर्यावर कौतुकाचे भाव. मागून एक माणूस मान वाकडी करून तिरका चालत येतो. हा अथर्वचा भाऊ - अजित. यालाच ती फीडिंग रूम तयार करायला सांगितलेलं असतं म्हणे. पण आता अथर्व ते काम केशवकाकांना देतो. हे ऐकून अजितची मान अजून वाकडी होते आणि तो केशवकाकांना म्हणतो की अंबिका इथली चीफ सुपरवाइजिंग ऑफिसर (!) होती पण आता ती नाहीये. या कंपनीत माझा वाटा पण आहे आणि ती सीएसओ ची जागा मला हवी आहे.
पुन्हा आपण ममव नसलेल्या रामपुरेंकडे येतो. मंजिरी उर्फ मोठी जाऊ सगळ्यांना थालिपीठं वाढतेय. प्रत्येकी एक. वर घरच्या लोण्याचा गोळा. यू कॅन टेक म आऊट ऑफ मव बट यू कॅन नॉट टेक मव आऊट ऑफ म.
पुन्हा एकदा अथर्व आणि त्याची मुलगी वेदा कसे बिचारे झाले आहेत आणि अथर्वचं लग्न यावर चर्चा. धाकटी जाऊ कोण्या मायाची शिफारस करते. आता माया नावाची बाई आपल्याला दाखवतात. ती एकाच वेळी लोभी, हावरट आणि वेडसर दिसते. तिने एका चित्रकाराकडून तिचं अथर्वसोबत असल्याचे पेंटिंग करून घेतलेलं असतं. ते बघून ती एकदम चिडते आणि चित्रकाराच्या हातात त्याचंच एक शस्त्र खुपसते. का तर म्हणे त्याने चित्रात तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही दाखवलेलं. अरे मग ते दाखव असं सांगायचं की सरळ! पण तसं नाही.
ही माया कोणाची कोण ते कळलं नाही. ती अनाथ आहे इतकं कळलं. तिला ती अंबिकाच घरात घेऊन आलेली असते म्हणे. असो. आता उद्याच्या वर्षश्राद्धाची तयारी चालू आहे. अंबिकाच्या फोटोला सोनचाफ्याचा हार आहे. माया रामपुरे मॅन्शन मधे येते. मग अथर्व येतो. मग वेदा येते. तिच्यासोबत टफीचा दूरचा भाऊ शोभेल असा एक गोल्डन रिट्रीव्हर येतो. वेदा कोणाशीच काही बोलत नाही. आईच्या गाण्यांच्या कॅसेट्स ऐकत राहते. शाळेत पण वॉकमन घेऊन जाते. त्यात फक्त एकच गाणं असतं - तुला जपणार आहे...! माया संधी मिळेल तेव्हा आणि संधी मिळेल तिथे अथर्वला चिकटून घेते. बाहेरून माळी असावा असा दिसणारा माणूस येतो. त्याच्याकडे पाहून माया चपापते. तिला कुठलंतरी आगीत जळणारं घर आठवतं. माळी तिला 'I know what you did last summer' वालं लूक देतो आणि त्याचवेळी अंबिकाच्या आवडीचं म्हणून सोनचाफ्याचं फूल अथर्वला देतो. बहुतेक गावातल्या सगळ्या सोनचाफ्याच्या फुलांचे वाटे यांच्या घरीच येत असावेत.
आता स्टोरी पुन्हा मीराकडे येते. हिच्याशी तो सुरूवातीचा इरिटेटिंग पोपट बोलतो आहे. तो पाहून मला 'मैं प्रेम की दिवानी हूँ' आठवला. त्या सुडो-टफीचं सीजीआयकरण का नाही केलं बरं? मीरा विवाहमधल्या अमृताच्या सीन मधे. काकाच्या घरी वाढणारी. काकू जिचा उठताबसता छळ करते अशी. काकाला विवाहमधल्यासारखीच एक मुलगी. ही बरीच छोटी आहे तरीपण काकूला तिचं लवकरच लग्न करायचंय. पण त्या आधी मीराला उजवून टाकायचंय. काकूच्या अंगात सीमा बिस्वास संचारते. मीराचे बाबा हयात आहेत. पण वेडे झालेत. स्मशानात राहतात. अपशकुनी पण असतात म्हणे असं गावकरी म्हणत असतात. मीरा बाबांसाठी भाकरी घेऊन जाते.
रामपुरी, सॉरी, रामपुर्यांच्या घरी माया उत्साहात. श्राद्धासाठी सगळी तयारी करते आहे. सोनचाफ्याचा हार ऑर्डर केलाय. धाकट्या जावेला मायात म्हणे अंबिका दिसते. असं म्हटल्यावर अंबिकाच्या फोटोचा हार हालायला लागतो. माया पुन्हा पुन्हा गदगदल्याची अॅक्टिंग करत अंबिकाचे गोडवे गात राहते. अथर्व कंटाळलेला आणि कन्फ्युज्ड चेहरा करून बघत राहतो. घरचे गहिवरतात. अंबिकाच्या पुढचा दिवा विझतो. मधेच ओम शांती ओम लागला की काय? अथर्वची आई दिवा लावायला जाते अंबिकाची फ्रेम वरून खाली येते आणि टेबलावर टेकते. तिथून बाजूला न होता आई फ्रेम कशी पडतेय ते पहात राहते. अथर्व मधे येतो आणि फ्रेम त्याच्या खांद्यावरून घसरत खाली पडते. तरीही मोठ्ठा स्फोट झाल्यासारख्या काचा छतापर्यंत उडतात.
पुढे काय? अंबिका कशी मेलेली असते? का तिला कोणी मारलेलं असतं? मीराचा काय संबंध? हे कळण्यासाठी देखते रहिये 'तुला जपणार आहे' झी मराठी वर 
मी ही मालिका यूट्यूबवर पाहाते आहे.
हे काहीच बघितलं नव्हतं मी,
हे काहीच बघितलं नव्हतं मी, पुढे कधीतरी अंबिकाचं श्राद्ध असतं तेव्हा माया वेदाला ढकलते पाण्यात, ती आई भूत तिला पाण्यातून काढू शकत नाही, मीरा वाचवते. तो शॉट बघितला होता, मग मला youtube म्हणाले हाही शॉट बघ, मग मी बघू लागले मग कन्नड शॉट बघ हाच असं सजेस्ट केलं, तो ही बघितला
कन्नड मध्ये तिथल्या मायाच्या सांगण्यावरून नोकर ढकलून देतो वेदाला पाण्यात.
आता अथर्वच्या बाबांवर मंजिरीच्या विद्येचा उपयोग होत नाही, त्या जोखडातून मीराचे बाबा मुक्त करतात त्यांना.
लेटेस्ट एपिसोड मध्ये मंजिरी मायाला धू धू धुते, स्वतःचं डोकं चालवले म्हणून. हे काहीच भूत बघत नाही.
खतरनाक मालिका आणि परीक्षण!
खतरनाक मालिका आणि परीक्षण! मलाही पहावीशी वाटायला लागली.
(पाहतेच!)
या सिरीजमधे सर्वांचे कॉस्च्युम "शाल-बेस्ड" आहेत. देवळातील पुजारी असो, घरातील ज्येष्ठ व्यक्ती असो किंवा इतर कोणी. सर्वांच्या अंगावर उत्तरीय/उपरणे किंवा तत्सम काहीतरी आहे.
'This too शाल pass.' या धीरदायक विधानाचे ते प्रतीक असावे.
<<<<<<<
इतक्या आगी आणि इतकी जळकी घरं कुठून येत असतात? म्हातारीचा पदर मागे लपून कोणी धरून ठेवलेला असतो? जानने के लिए देखते रहिए...
<<<<<<
रमड, या सगळ्यावरून मला जुन्या माबोवरची 'कौन अपने कौन पराये' नवसीरियल STY आणि त्यातला काला साया आठवला.
कुलवधू' मालिकेत त्या बहिणी
कुलवधू' मालिकेत त्या बहिणी घरासमोरच्या तळ्याला 'तळोबा' म्हणत असतात आणि त्याच्याशी बोलत असतात तसा काही प्रकार इथे आहे की काय? >>
काश ऐसा होता. पर तळोबा जैसा कोई नही 
मग ही काय त्यांच्याच अंगणात जाळपोळ करतेय? >> त्याहून कहर म्हणजे ती तो फोटो लॉनच्या गवतावर ठेवून ही जाळपोळ करते आहे. बाय चान्स भसकन अख्खं लॉन पेटलं तर अंबिकाप्रमाणेच हिचीही भूतयोनीत गच्छंती व्हायची!
बाय द वे, रामपुरेंच्या घरातल्या नोकरांपैकी (नॉट माळीबुवा) एकजण डोनाल्ड डकचा ऑफिशिअल हिंदी व्हॉईस अॅक्टर आहे - https://www.instagram.com/amirtadwalkar/
'This too शाल pass.' या
'This too शाल pass.' या धीरदायक विधानाचे ते प्रतीक असावे. >>>
बाय द वे, सिरीजच्या नावातले "जपणार" मधला ज हा "स्वतःला जप" मधल आहे की "जप करणार" मधला? मी पहिला एपिसोड म्यूटवर पाहिला त्यामुळे अजून माहीत नाही.
मीरा म्हणते की अंबिका तू माझ्यापासून अथर्वला हिरावून घेतलं म्हणून मी तुला जिवंत जाळलं >>> रमड, इथे "माया" पाहिजे का? या सिरीजबद्दल माझ्या डोक्यात "मीरा=गुड, माया=बॅड" असे समीकरण आहे.
हो माया.
हो माया. ती जाळते आंबिकाला. मंजिरीचं प्यादे आहे माया पण जेव्हा मंजिरीला न सांगता स्वतःच्या डोक्याने वागते तेव्हा मंजिरी धू धू धुते तिला.
या सिरीजमधे सर्वांचे
या सिरीजमधे सर्वांचे कॉस्च्युम "शाल-बेस्ड" आहेत >>>
ले लक्षात नव्हतं आलं.
बॉलीवूड नन्स डिसअॅप्रूवल ने मान हलवतील
शाखा-हेलिकॉप्टर" लॉजिक
फॅक्टरीही "एण्ट्री" मारते
>>>
त्यानंतरचे संवाद सुरू होत असताना फॅक्टरीतील सर्व कामगारवर्ग काम सोडून प्रेक्षकाची भूमिका बजावत आहेत. या रेटने यांचे उत्पादन काय होत असेल बघायला पाहिजे >>> मला तर आत्ता कसली फॅक्टरी आहे ते ही आठवत नाहीये. मागे जाऊन पहायला हवं
पण उत्पादन वगैरे असल्या क्षुल्लक गोष्टी महत्त्वाच्या नसाव्यात, मालकाकडे कौतुकाने बघणं महत्त्वाचं 
'This too शाल pass >>>
श्र, तू बघायला घेतलीस तर फारच भारी होईल.
रमड, इथे "माया" पाहिजे का? >>> हो हो. माया च पहिजे तिथे. चुकून मीरा झालंय आणि आता बदलता येत नाहीये
खूप म वाले लोक आहेत यात. मीरा, मंजिरी, माया, मार्जारी वगैरे. कन्फ्यूजन होतंय 
पण उत्पादन वगैरे असल्या
पण उत्पादन वगैरे असल्या क्षुल्लक गोष्टी महत्त्वाच्या नसाव्यात, मालकाकडे कौतुकाने बघणं महत्त्वाचं >>>
हे फार परफेक्ट आहे. बहुतांश सीन्स शेवटी उपस्थितांनी मालकाकडे, मालकिणीकडे कौतुकाने बघणे याकरताच रचलेले असतात.
वरती रमडने लिहीलेच आहे तसे ती फीडिंग करणारी बाई एरव्ही त्या बाळाला कोठे ठेवते? फॅक्टरी शॉप मधे ७-८ तास ठेवून देता येईल अशी बाळ-सेफ ठिकाणे कोणती असतात? फॅक्टरीत फीडिंग रूम बनवायचे ऑलरेडी ठरलेले असताना सुपरवायजरला त्याचा पत्ता नाही. आणि फीडिंगची गरज असताना फॅक्टरीमधेच असलेली एखादी रूम तात्पुरती वापरा वगैरे नाही. थेट नवीन बांधकाम. या असल्या डिटेल्समधे पडायचे नाही. मालक तेथे येउन काहीतरी कौतुक करण्यासारखे करतो हे दाखवायचे आहे, इतकाच मतलब.
श्र, तू बघायला घेतलीस तर फारच
श्र, तू बघायला घेतलीस तर फारच भारी होईल.
<<<<<<<<
मी काही वर्षांपूर्वी 'दिव्या दृष्टी' पाहत होते. त्यात दिव्या हे दृष्टीचे विशेषण नसून दिव्या आणि दृष्टी नावाच्या त्या दोन बहिणी होत्या. संगीता घोष व्हिलन चुडेल होती, जिचे नाव पिशाचिनी होते. तिच्या असिस्टंट्स तिला लाडाने शाचिनी म्हणत असत.
आता ही गुहेत तरंगणारी म्हातारी काय आहे ते बघते.
वरती रमडने लिहीलेच आहे तसे ती
वरती रमडने लिहीलेच आहे तसे ती फीडिंग करणारी बाई एरव्ही त्या बाळाला कोठे ठेवते?
<<<<<< maternity लीव्ह संपवून त्याच दिवशी जॉईन झाली असेल.
#अचाटकथानकालालॉजिकचाटेकू
हो असू शकेल. शाचिनीचा काही
तरंगणारी म्हातारी म्हंटल्यावर ते कापसाच्या की कोणत्या झाडापासून भिरभिर्यासारखे हवेत उडणारे फुलासारखे काहीतरी निघते- त्याला आम्ही म्हातारी म्हणायचो - ते आठवले.
मला यातला तो पुजार्याचा रोल करणारा आता सगळीकडे दिसू लागला आहे. बहुधा लौकरच फेबुवर पीपल यू मे नो मधेही दिसेल. काल पहिला दृष्यम परत पाहिला, त्यातला बस कंडक्टर तोच आहे- अजय देवगण बसमधे त्याला एटीएम मधे पैसे आणायाला जातो असे सांगतो तो सीन. मी वरती "साधी माणसं" मधे तो आहे हे चुकून लिहीले. त्यात तो नाही पण दुसर्या एका सिरीज मधे तो आहे. नाव आत्ता शोधले तर सापडले नाही. पण बहुतेक "लक्ष्मीच्या पावलांनी".
धमाल चालली आहे. अजून बरंच
भुताला पॉवरफुल करून मध्यवर्ती
भुताला पॉवरफुल करून मध्यवर्ती रोल देऊन अचाट साहस करायला लावलं तर मला आवडेल ही सिरीयल, असं लिंबू टिम्बु भूत बोअर करतं.
लिंबू टिम्बु भूत बोअर करतं >>
लिंबू टिम्बु भूत बोअर करतं >>> लोल!
मराठी शिरेलीत शोधू नका. मराठीला प्रेमळ भुतांची जाज्वल्य परंपरा आहे. आठवा बाळा गाऊ कशी अंगाई मधलं आशा काळेचं भूत 
पॉवरफुल भुतं पहायची तर रामसेपट पहा
ही मालिका मजोरंजनार्थ पहायची केवळ. केवढा मसाला भरला आहे त्यात. अर्थ वगैरे शोधायचा नाही. लॉजिक तर नाहीच.
शाचिनी >>>
सौदामिनीचं दामिनी करतात ते लॉजिक का काय?
शाचिनी लॉजिक >> संगीता घोषचा
शाचिनी लॉजिक >> कारण पिशाचिनीतला पी सायलेंट आहे
संगीता घोषचा पर्सनल इंट्रो डायलॉग आहे "पी सायलेंट, बाकी सब व्हायलेंट"
जेव्हा मंजिरीला न सांगता स्वतःच्या डोक्याने वागते तेव्हा मंजिरी धू धू धुते तिला. >>
हो हे सगळे सीन फार भारी आहेत.
पी सायलेंट, बाकी सब व्हायलेंट
पी सायलेंट, बाकी सब व्हायलेंट >>>
हे कहर आहे!
धमाल सुरू आहे इथे
धमाल सुरू आहे इथे
झी वाल्यांचा फेसबुक पेज वर कमकुवत भुताला नावं ठेऊन आले, मनाला समाधान.
कमकुवत भुताला नावं ठेऊन आले,
कमकुवत भुताला नावं ठेऊन आले, मनाला समाधान. >>>>
पी सायलेंट, बाकी सब व्हायलेंट
पी सायलेंट, बाकी सब व्हायलेंट >>>
कारण पिशाचिनीतला पी सायलेंट आहे >>> वॉव! वुडहाउस नंतर हेच!
इथे लिहायचं म्हणून चक्क आख्खा
इथे लिहायचं म्हणून चक्क आख्खा एपिसोड आजही बघितला, मीराच्या मंगळसूत्राच्या उलट वाट्या सुलट करण्याचा विधी यावर साधक बाधक चर्चा झाली. मीराला सुपरवुमन ठरवण्यासाठी एक पाऊल पुढे एपिसोड सरकला, मंजिरीने तिला 151 मोदक करून महागौरीमातेला नैवेद्य दाखवण्याची अट घातली आणि त्यात बाधा आणायला साळकाया माळकाया पूर्ण तयारीनिशी उतरल्या आहेत, पुढचं उद्या.
151 मोदक दोन तासांत तशी मराठी सिरीयलजगतात नगण्य वाटणारी अट आहे, पूर्वी मी गोठ सिरीयलमध्ये नायिकेला एकटीला शंभर माणसांचा स्वयंपाक करायला लावलेला, ते याची देही याची डोळा बघितलं आहे.
151 मोदक दोन तासांत तशी मराठी
151 मोदक दोन तासांत तशी मराठी सिरीयलजगतात नगण्य वाटणारी अट आहे, >>>>>आनंदीने गणपती बनवले होते .
कोण आनंदी, कुठली सिरीयल.
कोण आनंदी, कुठली सिरीयल.
नवा गडी नवे राज्य
नवा गडी नवे राज्य
महागौरीमाता काय असतं? बाकी
महागौरीमाता काय असतं? बाकी या सीरियलमध्ये कवडी, तसबिरी, मार्जारी, मंजिरी, माया, मीरा, तरंगणारी म्हातारी इतका घोळ आहे की हे वर्णन वाचून पत्ताच लागत नाहीये की कोण कुणाच्या विरोधात, बाजूने आणि का आहे. फ्लोचार्ट काढावा लागणार.
आणि एका मुलीला मारण्यासाठी एवढा का घोळ घालताहेत? त्या डेडली आत्याला विचारायचं ना. तिच्याकडे अफलातून आयडिया असायच्या.
आठवा बाळा गाऊ कशी अंगाई मधलं आशा काळेचं भूत
ते कसलं प्रेमळ भूत! जिवंत असताना बयेने सगळ्यांच्या तोंडाला फेस आणला होता आणि शेवटी बाळाला पाजून निघून गेली. आता बाळाचं काय? आधीच त्याला वाढवणार तिरसट सतीश दुभाषी. त्यात आपली आई भूत बनून आपल्याला भेटायला आली हे ऐकेल तेव्हा PTSD चा सामना कसा करणार ते?
देवी महागौरीमाता. महालक्ष्मी
देवी महागौरीमाता. महालक्ष्मी, महाकाली यासारखं असावं नाव.
अजनबी ती सिरीयल बघितली नव्हती, शॉट्स बघितले होते, संपली समजल्यावर शेवटचा भाग बघितला होता.
मला यातला तो पुजार्याचा रोल
मला यातला तो पुजार्याचा रोल करणारा आता सगळीकडे दिसू लागला आहे ,बहुधा लौकरच फेबुवर पीपल यू मे नो मधेही दिसेल.>>कहर
आज लिंबू टींबू भुताने माया
आज लिंबू टींबू भुताने माया आणि नर्मदाच्या नवऱ्याने कुस्करलेले मोदक, एका क्षणात चांगले केले. त्यामुळे मीराचा उदो उदो होईल.
एपिसोड ३
एपिसोड ३
तळ्याला प्रश्न विचारायला गेलेली मीरा विचारते मला माझी ताई कधी भेटेल? त्या तळ्यात म्हणे १५० वर्षांचं एक कासव आहे ते उत्तर देणार आहे. आता मीराने कासवाच्या स्पीडचा काही विचार करावा की नाही? पण नाही! प्रश्न विचारून झाल्यावर अर्धं मिनीट थांबून लगेच वैतागून निघून जाते. ती गेल्यावर छान सप्तरंगी पाठीचं, पाठीवर स्वस्तिक असलेलं, बॅग्राऊंडला शंखध्वनी वाजवत सीजीआय कासव वर येतं. पुढे? पुढे काही नाही दाखवलेलं. सीन कट होतो
बाकी एपिसोड उगाच मीराच्या काकूने केलेला छळ दाखवला आहे. मीराची काकू कुठल्याश्या रंगराव महाराजांची भक्त असते. त्यांचं दर्शन या एपिसोडमधे घडतं. स्वामी ओल्या कुंकवात पाय बुडवून कापडावर ( कॅनव्हास वर?) ठेवतात. लगेच त्यांच्या बरोबर असलेलं कोणीतरी त्या कापडाला २५००० रुपयांचा टॅग लावतात.
स्वामी म्हणतात - कभी कभी नव्हे, नेहमीच लगता है अपुनहीच भगवान है. स्वतःचा ग्रेटनेस पुरेसा सांगून झाल्यावर स्वामींची नजर प्रेक्षकांत बसलेल्या एका तरूणीकडे जाते. स्वामी इजे पर्व्हर्ट. नेमक्या त्याच तरूणीच्या अंगात येतंय अशी तिचे बाबा तक्रार करतात. स्वामी हावर्या नजरेने तिच्याकडे पहात तबकात ठेवलेला रंग तिच्या गालाला लावतात. अच्छा! म्हणून रंगराव नाव की काय? हा स्वामी प्रकार महाराज पिक्चरवरून घेतलाय का? आता त्या तरूणीचं म्हणे चरणपूजेसाठी सिलेक्शन झालेलं आहे. ती स्वामींकडे असेपर्यंत तिच्या घरच्यांना स्वामी बक्कळ पैसा देतात. हे ऐकून मीराच्या काकूच्या तोंडाला पाणी सुटतं.
इकडे अंबिकाच्या फोटोला खोट्या सोनचाफ्याचा हार आहे. अंबिकाच्या श्राद्धासाठी सगळे घाटावर बसले आहेत. मायाने मात्र वेदाला मारायचा घाट घातला आहेत. आत्तापर्यंत फक्त व्हिलन बायाच मान वाकडी करून दुष्ट असल्याचा पुरावा देत असल्याचं पाहिलंय. या मालिकेत मात्र पुरूषांनी पण ही कला अवगत करून घेतली आहे. त्याप्रमाणे माया आणि रामपुरातले दोन नोकर माना वाकड्या करून खाणाखुणा करतात आणि वेदाला रस्त्यावर पाठवतात. रस्त्यावर वेदाला उडवायला एक ट्रक धावतो आहे. गावी मीराच्या बाबांच्या डोक्यावर विजा चमकायला लागतात. घाटावरून थेट सीआयडी मालिकेत हजारो वेळा दाखवलेल्या पुलावर वेदा येते. समोर भरधाव ट्रक. मीराचे बाबा स्वतःभोवती काठीने रिंगण काढायला लागतात. प्लीज कोणीतरी ही रिंगणं डिकोड करा. अहो बाबा, तो ट्रक तुमच्याकडे नाही येत आहे. बाबा देवीआईचा धावा करतात. वेदा चक्कर येऊन पडते. त्यापेक्षा पळणं सोपं गेलं असतं ना? इकडे रामपुरी माळीबुवा खड्डा खणतायत त्यातून ठिणगी येते. ठिणगीची आग आणि पर्यायाने धुराचा ढग होतो. मग माळीबुवा पण चक्कर येऊन पडतात. ट्रक स्लोमो मधे चाललाच आहे अजून. ढग ट्रकसमोर येतो. ढगातून २०-३० फुटी अंबिका लाल डोळ्यांसहित येते आणि जुरासिक पार्कच्या डायनोसारखी ट्रकच्या काचेतून आत पाहते.
या मालिकेचा ट्रिविया लिहायला पाहिजे एपिसोडबरहुकुम. आजच्या एपि मधे वापरलेले पिक्चर असा
देवीआईचा धावा केल्यावर भूत कसं बाहेर येऊ शकतं? डायनो अंबिका पुढे काय करते? कासव फुकट फेरी पडल्याबद्दल मीराला फटकावतं का? स्वामी पुढे कसले रंग उधळतात? देखते रहिए ...
मला यातला तो पुजार्याचा रोल
मला यातला तो पुजार्याचा रोल करणारा आता सगळीकडे दिसू लागला आहे ,बहुधा लौकरच फेबुवर पीपल यू मे नो मधेही दिसेल.
याला हसायचं राहिलं होतं!
>>>
लिंबू टींबू भुताने माया आणि नर्मदाच्या नवऱ्याने कुस्करलेले मोदक, एका क्षणात चांगले केले >>> अरेरे! काय हा भुताचा अपव्यय
शेवटी पाहिले तीन एपिसोड. वन
शेवटी पाहिले एकदाचे, इथली धमाल बघून मागच्या जन्मीचे भोग वाटू लागले होते. वन स्टॉप शॉप फॉर ऑल द स्टुपिडीटी आहे. दीडशे वर्षांपूर्वीचे ख्रिसमस लाईटस पाठीवर बांधलेलं कासव, वेडा मसनजोगी, आका नायिका, दुष्ट काकू, लंपट- हलकट बाबा, भूत, उडणारी म्हातारी, चेटकीण सासू, स्लीबा, घातपात घडविण्याच्या दृष्टीने एक चुलत सासू, मधून मधून डोळे पांढरे करणारी माणसं, बोलणारा पोपट, गोल्डन रिट्रिव्हर. एक दोघे सोडून सगळेच नीच आहेत ह्या "भरल्या" घरात. मला वाटते मीरा भुतांबिकेची बहिण असावी, हमभुतकेहैकौन आहे.
तो कुत्रा भुतांबिकेला हत्ती सारखे समोरचे पाय उचलून अभिवादन करतो. आमच्या कोकोनटला असं काही येत नाही. रंगराज महाराज आहेत ते रंगेल महाराज. मी पाच एपिसोड बिंज वॉच करून खालची पातळी गाठली आहे. अथर्व तोंड उघडत नाही पूर्ण, रामदास पाध्येच्या अर्धवटरावासारखा बोलतो. रमड, यु आर राईट अबाऊट एव्हरीथिंग.
नकली सोनचाफा देवीच्या गळ्यात व भुतांबिकेच्या फोटोच्या गळ्यातही आहे. पास्ताचे पेन्ने ओवल्यासारखे दिसते.
आता त्या बारकीच्या अंगावर झुंबर पाडणार आहेत. एका दृष्टिहीन बाईला केळ्याच्या सालीवरून पडता पडता मीरा वाचवते, ती बाई बहुतेक देवी आई आहे ऐसी शंका मुझको आरी. पोपटाला तर आय आय टी त ॲडमिशन मिळेल, इतका चुरूचुरू बोलतो. माणसं मात्र प्राण्यांपेक्षा मंद आहेत.
वरचं झुंबर डोक्यापासून फूटभर उंचीवर आलं तरी आवाज जाणवला नाही. झुंबर खाली वर, खाली वर - भूत देवीला याचना करतेय. भुतांबिका आत जायचे प्रयत्न करताना बाऊन्स बॅक होत होती. पण देवीला - बाईला मीराने माझ्या भुतांबिका ताईच्या मनासारखे होऊ दे म्हटले आणि भुतांबिका अलार्म डिकोड करून/ सिस्टीम हॅक करत आत आली. वर व्हिलनला उलटा शॉक बसला. भुताची पावर वाढली, देवीने अपग्रेड केले. आता ती टेलिपोर्ट करतेय स्वतः ला. झुंबर पाडणाऱ्याला वरच्या पंख्याने खाली वर करत कुटल्यासारखे केले.
हे लाईव्ह लिहितेय.
भुतांबिका नाव भारीच
भुतांबिका नाव भारीच
कुठपर्यंत बघितली.
Actually मी आधीपासून बघितली नाहीये त्यामुळे ते कासव मला माहितीच नाहीये, रमडने डिटेल्स दिले म्हणून समजलं.
स्वामी म्हणजे तो गायक नट बावडेकर का, हो तो वाईट असतो, तो शॉट बघितलेला, त्याच्या तावडीतून भूत बहीण सोडवते मिराला.
आता इथे लिहायचं म्हणून मी तीन दिवस जवळजवळ आख्खे एपिसोडस सहन केलेत, थोडे पुढे ढकलून केलेत सहन.
Pages