
एक अतिशय बिनमहत्त्वाचा माणूस असतो. Akaky Akakievich Bashmachkin त्याचं नाव. हे नाव रशियन भाषेत सुद्धा महत्त्वाचे नाही. 'अकाकी' जणू एकाकीच. अकाकी जेव्हा त्याच्या आईच्या पोटी आला, सचोटीने वागणारी, पापभिरू बाईच ती. हा जेव्हा तिच्या पोटी आला तीन वेगवेगळ्या गॉडपेरेंट्सनी सुद्धा तिला धड नावं सुचविली नाहीत. मग तिने देवाचा धावा केला म्हणजे चर्चमधे विचारले तर तेथे तर त्याहीपेक्षा विचित्र नावं सुचविली गेली. जणू अकाकी देवासाठी सुद्धा बिनमहत्त्वाचा. शेवटी या नावांपेक्षा तिच्या बाळाला त्याच्या बाबाचे नाव देऊन मोकळी झाली. अकाकीचे नाव सुद्धा संपूर्णपणे त्याचे नाही.
हा असा अकाकी आयुष्यभर गरीब व अदृष्यच राहिला. गोगोलना त्याला पर्सनॅलिटी न देता कथेचा नायक केले आहे. मुन्शी प्रेमचंदच्या कथांशी मिळतीजुळती दुःखद कथा आहे असे वाटतावाटता ती अंताकडे अद्भूत व अमानवीय होऊन जाते.
अकाकी- अतिशय सामान्य काहीशा ओबडधोबड रूपाचा, बुटका- मध्यमवयीन माणूस आहे. सेंट पिटर्सबर्ग या रशियातील शहरात एका सरकारी विभागात कारकून आहे. ह्या विभागाचं नाव गुप्त ठेवण्याची दहा कारणं सांगितलीत गोगोलने. ब्यूरोक्रॅटिक #ल&ट सगळीकडे सारखीच..!
तो किती वर्षांपासून तेथे काम करतो, तो तेथे कसा आला हे कुणालाही माहिती नाही. त्याला सरकारी दस्तावेजांच्या नकला करून देणं जमतं, तो हे आणि एवढंच करतो. तो कनिष्ठ कारकून असल्याने वरिष्ठांसाठी तसा अस्तित्वातच नाही. त्यामुळे कुणीही त्याची दखल घेत नाही. त्यालाही याची पर्वा नाही. तो त्या नकला करण्यात पारंगत आहे आणि तो त्या मन लावून करत असतो. एकेक अक्षर जसेच्या तसे उतरवण्यात त्याला कोण आनंद होतो. त्याचा जन्मच जणू प्रति बनविण्यासाठी झाला आहे. कार्यालयीन वेळेतच नव्हे तर घरीही तो हे काम आनंदाने घेऊन येत असतो. जेवणाची शुद्ध नसते, चवीची फिकीर नसते. कुटुंब नसते ना मित्रपरिवार. ना त्याला कुणी बोलवत नसते, ना त्याच्या घरी कुणी येत असते. संध्याकाळी तेलाचा दिवा लावून त्या प्रकाशात तो झोपायची वेळ होईपर्यंत लेखन करत असतो, दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी लगबगीने कार्यालय गाठून पुन्हा हेच...!
त्याची सचोटी बघून कुणीतरी दयाळू अधिकारी त्याला यापेक्षा वरचं काम दिले पण अकाकीला क्लेशच झाले त्याने. मग पुन्हा पूर्वपदावर कमी दर्जाच्या कामावर तो जणू आमरण नियुक्त होऊन गेला. इतका अस्तित्वहीन नायक. रूक्ष, निस्तेज, कसल्याही छटा नसलेला निरुद्देश व निरस जीवन जगत राहणारा अकाकी.
आपण तरी अकाकीची दखल कशी घ्यावी, घ्यावी की न घ्यावी हे गोगोलने आपल्यावरच सोडून दिलेय. अकाकीचे सहकारी सुद्धा त्याच्यावर अरेरावी करतात, त्याच्या कोटावर हसतात. स्वतःला बुद्धिमान समजून त्याचे 'बुलींग' करतात. पण कामात व्यत्यय येईपर्यंत तो त्यांना 'मला काम करू द्या' अशी आर्जवंही करत नाही. कुणालाच त्याचा आदर वाटत नाही, कुणालाच त्याच्याबद्दल स्नेह वाटत नाही. बोलताना त्याला शब्दांची जुळवाजुळव करता येत नाही, बरेचदा त्याची वाचा खुंटलेली असती. एवढं असूनही तो दुःखी नाही, तो 'आपल्याच' नादात आहे. मसूदा लेखनात तो पूर्णपणे समाधानी आहे. कुणालाही तो दिसत नसूनही तो त्याच्या नेहमीच्या जागेवर तेच ते काम करत कृष्णविवरातले वाटावे असे जीवन वर्षानुवर्षे जगत आहे.
अशा अकाकीचा कडाक्याच्या हिवाळ्यात वर्षानुवर्षे वापरून विरून जवळजवळ सच्छिद्र झालेला एक ओव्हरकोट आहे. त्या ओव्हरकोटातून वारं आत शिरून या रशियाच्या हाडं ठिसूळ करणाऱ्या थंडीत त्याला पाठीवर - मणक्यातून झिणझिण्या आल्यासारख्या होत आहेत. घरापासून कार्यालयापर्यंत तो पळत गेला तरी तो गारठून जातोय. कोटाचा भाग जेथेजेथे विरून गेला तेथे कोटाच्या कॉलरीचेच ठिगळ जोडत राहिल्याने कॉलर अशी उरलीच नाही. त्यामुळे अकाकीची बुटकी मानही सेंट पिटर्सबर्गच्या आठवडी बाजारात फिरते विक्रेते खेळण्यातल्या मान डुगडुगणाऱ्या मांजरी विकतात तशी हलते.
जुन्या कोटाच्या डागडुजीसाठी, जेथे संपूर्ण आयुष्य काढलेय तेथे दोनचार हिवाळे अजून निघाले तर काढण्यासाठी - अकाकी पेट्रोव्हिच नावाच्या गावातील कनिष्ठ दर्जाच्या मद्यपी शिंप्याकडे जातो. येथे गोगोलने पेट्रोव्हिचच्या पात्राबद्दल आधी तो वेठबिगारी शेतमजूर होता व देवाच्या नावाखाली दारू हे तीर्थ समजून पिणाऱ्यांपैकी होता असे म्हटलेय. तो प्यायलेला असला की कमी पैशात शिवून द्यायलाही तयार व्हायचा पण अकाकी कमनशिबी असल्याने तो त्या दिवशी नेमका पूर्ण शुद्धीत होता. त्याने कोटाकडे बघून डागडुजीसाठी तुच्छतेने नकार दिला. नव्या कोटाचे दीडशे रूबल व रेशमाच्या शिलाईसाठी अजून पन्नास. दोनशे रूबल..! आयुष्यात कधीही एवढी मोठी रक्कम अकाकीने पाहिलेली नाही. त्याचा प्रचंड हिरमोड झाला. तो नंतर पेट्रोव्हिचला चढलेली असतानाही विचारून आला पण त्याचं उत्तर तेच होतं.
शेवटी कोटासाठी त्याने चाळीस रूबल या मासिक पगारातून थोडी थोडी रक्कम बाजूला काढून ठेवायला सुरुवात केली. त्यासाठी घरमालकीणीच्य घरातील दिव्याच्या उजेडात प्रती करायला लागला, संध्याकाळचा चहा पिणं सोडला, बूट झिजून नवा खर्च होऊ नये म्हणून हळूहळू चालायला लागला. नंतर संध्याकाळचं जेवण सोडून दिले. दर शनिवारी पेट्रोव्हिचला भेटून कोटाबद्दल बोलायला जात असतो, नंतर दोघं मिळून कपडा बघायला जात असतात.
कोटाची स्वप्नं रंगवताना त्याच्यासारख्या अदृष्य- ध्येयहीन माणसाला अचानक ध्येय मिळतं. या उद्दिष्टाने व्यक्तीमत्त्वाला एक निश्चित आकार येतो. उपासमार होऊनही तो आनंदात असतो. कोटाचे पैसे जमले की हे करू, ते करू. ख्रिसमसचा बोनसही कोटासाठी ठेवू असे मनसुबे रंगवत असतो. अकस्मात जणू हे इंगित वरिष्ठांना कळाल्यागत त्याला बोनसची रक्कम नेहमीपेक्षा थोडी जास्त मिळते. अपेक्षेपेक्षा वीस रूबल जास्त. अकाकीला आकाश ठेंगणे होते. जवळजवळ सहा महिन्यांचा ध्यास. मुलभूत गरजच पण दैन्यावस्थेत गरजपूर्ती सुध्दा ध्यास होऊन जाते. जीवघेण्या थंडी पासून रक्षणासाठी केलेली तपःश्चर्या!
सगळी रक्कम घेऊन तो पेट्रोव्हिचकडे जातो. ते दोघे सेंट पिटर्सबर्गच्या बाजारातून चांगल्या प्रतीचे टिकाऊ उबदार कापड, कॉलरीसाठी जाड रेशीम, शिवणासाठी रेशमी दोरा, बटण अशी खरेदी करायला मोठ्या उत्साहाने जातात. दहा पंधरा दिवसांत कोट शिवूनही होतो. खुद्द पेट्रोव्हिच तो तयार कोट एका मोठ्या पंचात झाकून सकाळीसकाळी अकाकीच्या घरी येतो. पिटर्सबर्गच्या इतर डागडुजी करणाऱ्या शिंप्यांपुढे पेट्रोव्हिच पूर्णपणे नवीन कोट शिवून दिल्याने स्वतः वर खूष, किंचित दुराभिमानाने सुखावलेलाही असतो. अकाकी कोट घालून बघतो, तर तो अगदी मापात - हातापायांना बेताचा व सुरेख झालेला असतो.
अकाकीला हर्षवायूच व्हायचे बाकी असते. सहा महिन्यांची उपासमार सुद्धा त्याला आठवेनाशी होते. सेंट पिटर्सबर्गच्या थंडीचा कडाका वाढायला लागलेला असताना अगदी योग्य वेळी हा कोट तयार झालेला असतो. शिलाईची पूर्ण रक्कम चुकती करून कोट हातात घेतो. पेट्रोव्हिचच्या मते त्याने हे दहा -बारा रूबलमधे शिवून देण्याचे कारण त्यांच्यात निर्माण झालेला जिव्हाळा होय, नाहीतर अख्ख्या सेंट पिटर्सबर्गमधे कुणी एवढ्या कमी शिलाईत इतका नेटका कोट शिवून दिलाच नसता मुळी..!
अनायसे कार्यालयात जायची वेळ झालेलीच असल्याने अकाकी नवीन कोटच मिरवत घालून जाण्याचे ठरवतो. पेट्रोव्हिच सुद्धा स्वतःवरच खूष होत त्याला न्याहाळत काही अंतर त्याच्या मागोमाग जातो.
आज प्रथमच कार्यालयातील सहकारी त्याची वास्तपुस्त करतात. कोटाची सुद्धा स्तुती करतात. कोटामुळे आतला माणूस दृश्य होतो. ह्या सगळ्याची सवय नसल्याने अकाकीला ओशाळल्यागत होते, चारचौघात जाण्याची सवय नसल्याने अवघडल्यासारखे होते. त्यापैकी एकजण नव्या कोटासाठी पार्टी हवी असेही म्हणतो, ते ऐकून कोटापायी नुकताच इतका खर्च झाल्याने दिङ्मूढ होऊन जातो. पण त्याची ह्या द्विधेतून सुटका करण्यासाठी दुसरा वरिष्ठ अधिकारी त्याच्या घरी रात्रीच्या जेवणाचे निमंत्रण देतो. अकाकीला हायसे वाटते.
त्या संध्याकाळी अकाकी सूप पिऊन निमंत्रणाची वेळ होईपर्यंत कोटाकडे हरखून बघत बसतो. वरिष्ठ अधिकाऱ्याचे घर तसे अकाकीच्या घरापासून शहराच्या दुसऱ्या टोकाला - आलिशान टुमदार घरांच्या वस्तीत. मधे काही ठिकाणी रस्त्यावरील दिव्यांचा पुरेसा उजेडही नाही. चालतचालत तो तेथे पोचतो, तोवर मद्यपान सुरूही झालेले असते. अकाकी कोट काढून अनेक भारीभारीचे, रेशमाचे, फरचे वेगवेगळे कोट आधीच टांगलेल्या ठिकाणी आपला कोटही टांगून ठेवतो. कधीच कुठलेही आमंत्रित न होण्याने चोरट्यासारखा चुळबुळत राहतो. शेवटी थोडेसे खाऊन यजमानांचा निरोप घेतो.
अंधार व थंडी दोन्ही वाढलेले असते. काही गल्लीबोळांत जणू दिव्यातले तेल कधीही संपून गडद काळोख होईल असे वाटत असते, तेवढ्यात अचानकच दोन धंटिगण अकाकीवर दांडगाई करून त्याचा कोट हिसकावून घेऊन पळून जातात. दूर एक शिपाई ह्या सगळ्याला पाहून न पाहिल्यासारखे करतो. अकाकीला दुसऱ्या दिवशी ठाण्यात येऊन रितसर तक्रार नोंंदवायला सांगून त्याच्यावरच दरडावतो. कडाक्याच्या थंडीत अतिशय जड अंतःकरण घेऊन तो घरी परततो, रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही.
घरमालकीणीच्या मते तिच्या स्वयंपाकीणीच्या ओळखीचा यांच्याही वरचा सुप्रिटेंडंट आहे, चर्चमधे जाणारा व धार्मिक म्हणजे तो नक्कीच कणवाळू असायला हवा. धार्मिक व्यक्ती चांगली असेलच असे नाही. पण समाजातील वेगवेगळ्या स्तरावरील लोकांच्या आस्थेच्या आणि मिळेल ते रिसोर्सेस शोधण्याच्या कंडनिशनिंगला व्यक्तिरेखांच्या रूपात गोगोलने दाखवून दिले आहे. प्रत्यक्षात तो माणूस अत्यंत अहंकारी व अकाकीसारख्या नाव व चेहरा नसलेल्यांना अतिशय उर्मटपणाची वागणूक देऊन वर वरिष्ठ असण्याचा अभिनिवेष मिरवणाऱ्यांपैकी असतो. तो अकाकीला दिवसभर तिष्ठत ठेवतो, उपाशीतापाशी.
त्याच्या उलट दरडावण्याने मुखदुर्बळ अकाकी निश्चेष्ट होऊन पडतो. शुद्धीवर आल्यावर कसाबसा घरी येतो, पण या सगळ्या मानसिक धक्क्याने व पराकोटीच्या क्लेशाने ज्वर चढून त्यातच त्याचे प्राण जातात. खरंतर येथेच गोष्ट संपायला हवी, आपल्याला निराशेच्या गर्तेत ढकलून गोगोल काही तेथेही थांबला नाहीच...!
काही दिवसांतच पिटर्सबर्गच्या अंधाऱ्या पुलापाशी एक भूत - अकाकीच्या वर्णनाशी मिळतेजुळते प्रेतच वाटावे असे - त्याने सुंदर पत्नी व गोंडस मुलं असूनही नेमाने आपल्या कॅरेनिना नावाच्या अंगवस्त्राला भेटायला जाणाऱ्या त्याच सुप्रिटेंडन्टला दरडवण्याची- कोट हिसकावून घेण्याची बातमी पेपरात छापून येते. ह्या धक्क्याने तो बेमुर्वतखोर अधिकारी जरा सुधारला म्हणे. नंतर असे अनेक 'भटकणारे' अकाकी - जे या वर्णनाशी मिळतेजुळते देखील नाहीत ते सुद्धा रात्रीबेरात्री कुठेकुठे कोण्या वरिष्ठाला घाबरवून सोडायला लागले. नोकरशाहीत किंचित सुधारणा व्हायला सुरुवात झाली.
अशी कित्येक अदृश्य माणसं आपल्याही अवतीभवती असतील. म्हणजे आपल्या सामाजिक- आर्थिक स्तरात येत नाहीत म्हणून अदृश्य. आपण तसे वागवतो म्हणून अदृश्य. आपण त्यांना आपल्यासारखेच सुखदुःख, अपेक्षा, गरजा, स्वप्नं असतील असे समजत नाही म्हणून अदृश्य. आपण त्यांना माणूसच समजत नाही म्हणून अदृश्य...!
रशियन ब्युरोक्रॅसीवरील सटायर म्हणावे अशा प्रकारचीच १८४२ साली प्रकाशित झालेली कथा पण कुठेही- सद्यकाळातही चालून जाईल अशी काहीशी स्थलातीत व कालातीतही आहे.
संदर्भ-
१. 'मी वाचलेले पुस्तक-३' या धाग्यावर 'द ओव्हरकोट' कथा वाचण्याचे सुचविल्याबद्दल केशवकूल यांचे आभार.
२. ही कथा मी स्टोरीटेलवर इंग्रजीतून वाचली. कथेचा मनातच अनुवाद करून त्यावर परिचय लिहिण्याची ही पहिलीच वेळ असेल. काहीतरी वेगळं लिहिण्याचा प्रयत्न करायला हवा असे वाटण्यातून नवीन लेखच लिहिला. ही कथा गूगल केल्यास ऑडिओबुकच्या स्वरूपात यूट्यूबवर दिसतेय पण मी त्यापैकी एकही ऐकली नाहीये.
३. विकीस्रोत-
https://en.m.wikipedia.org/wiki/The_Overcoat
मुख्यचित्र विकीपिडियाहून साभार.
मी 'शिकागो' अगदी नवीन असताना
मी 'शिकागो' अगदी नवीन असताना एकदा पाहिला आहे. त्यात ऊर्मिलाचे 'छम्मा छम्मा' वेगळ्याच रिमिक्स व्हर्जन मधे साजरे केले आहे म्हणूनही तो चर्चेत होता. पण हा मिस्टर सेलोफेन तीळमात्र आठवला नाही, लिंक पाहिली. मला रिने झेल्वेगर आणि निकोल किडमनचे 'लार्जर दॅन लाईफ' ब्रॉडवे गाणी आणि नृत्यं थोडी लक्षात आहेत. रिने झेल्वेगरचे नंतरचे फाटके स्टॉकिंग्जही लक्षात आहेत.
मला मुन्शी प्रेमचंदची 'कफन' ही अतिशय हृदयद्रावक कथा मात्र पुन्हापुन्हा आठवत होती. भूत झाले म्हणून बरे नाहीतर मी कोटाला 'रशियन कफन' म्हटलं असतं.
अदृश्य माणसाची गोष्ट
अदृश्य माणसाची गोष्ट डोळ्यासमोर अगदी दृश्यमान केलीस.
सुंदर लिहिले आहेस..
लेखनाचा वेगळा प्रयत्न चांगला जमला आहे..!
छान ओळख करून दिली आहेस.
छान ओळख करून दिली आहेस.
कथासागर पुन्हा आठवलंच.
("कथासागर! दुनिया के महान कथाकारों की चुनी हुई बेहतरीन कहानियां| हर एक कहानी जिंदगी के सुख-दुख का आइना है..." हा ऑडिओ सुरुवातीला वाजायचा.)
(स्वातीने लिहिलेले मुद्दे मलाही जाणवले - काळ-उड्या)
दमदार परिचय.
दमदार परिचय.
......
कोणत्याही गटगला, वविला न जाता इथे माबोकर_लेखक भेटतात.
काळ - उड्या -- मला स्वतःचं
काळ - उड्या -- मला स्वतःचं लेखन एकदा प्रकाशित करून झाले की नंतर वाचताना धुकं येतं. चूक/ बरोबर काहीच सापडत नाही. स्वातीने सुचवले होते तेव्हाही लक्षात आले होते की ते फक्त त्या परिच्छेदापुरते नाही पण मला सापडलेच नाही. पुन्हा एकदा नीट वाचून सुधारता आले तर बघते.
छान ओळख करून दिली आहेस.
छान ओळख करून दिली आहेस.
कथेचा शेवट फारच आवडला. मनुष्य योनीत असताना त्रास सहन करून भूत योनीत गेल्यावर अकाकीला हिंमत येते ही ब्लॅक कॉमेडी झाली. कथा त्यामुळेच मनोरंजक आहे.
थोड्या काळ-उड्या दुरुस्त
थोड्या काळ-उड्या दुरुस्त केल्या आहेत.
अभिप्रायाबद्दल सर्वांना धन्यवाद !
फार छान लिहीले आहे. मराठीकरण
फार छान लिहीले आहे. मराठीकरण फार सुंदर झाले आहे. मी रशियन कथांचे अनुवाद थोडेफार वाचले आहेत. त्यातील "अनुवादितपणा" कधीही लपत नाही. बहुतांश खटकतोही. तो इथे खटकण्याइतका जाणवत नाही. रशियन वातावरणातील एखादी कथा पहिल्यांदा थेट मराठीत लिहीली तर वाटेल तशीच वाटली मला ही.
यातील अकाकीचे वर्णन वाचून अनेक व्यक्तिरेखा डोळ्यासमोर येतात. युवीने म्हंटल्याप्रमाणे फ्रेण्ड्समधला जेसन अलेक्झांडरचा कॅमिओ आठवतो पण तो याच्या एकदम उलट आहे. आपण मेलो तरी कोणाला फरक पडणार नाही, इतकेच नव्हे तर आपण आत्महत्या करणार आहोत हे भर ऑफिसमधे ओरडून सांगितले तरी कोणाला फरक पडत नाही याचे त्याला दु:ख आहे (त्याचा निराश चेहरा, मधमवयीन लुक, टेबलवरचा इन्स्टंट नूडलचा कप हे मात्र सिमिलर चित्र दाखवतात). याउलट या कथेतील अकाकी तशा अवस्थेत खुष दिसतो. मला आठवलेल्या दोन व्यक्तिरेखा - ऑक्सीटोसिन बद्दल मधे आलेल्या सिरीजमधली - डोपसिक किंवा पेनकिलर नक्की कोणती लक्षात नाही - त्यातील एफबीआय की एफडीए मधला एक इन्वेस्टिगेटर, जो वर्षानुवर्षे कागदपत्रे वाचून त्यातून काही ऑड दिसते का याचा शोध घेण्यात व त्याकरता त्याच्या ऑफिसमधे एकटा तल्लीन होत असतो आणि त्यातच त्याला वर्क सॅटिस्फॅक्शन मिळत असते. ती एक व्यक्तिरेखा व दुसरी "ऑफिस स्पेस" मधल्या "मिल्टन"ची. पण मिल्टनही थोडा या वरच्या जेसन अलेक्झांडरच्या व्यक्तिरेखेच्या वळणावर जाणारा आहे. पुलंच्या कोणत्यातरी लेखात ऑफिसमधल्या कामाशिवाय दुसरे काहीच व्यक्तिमत्त्व नसलेल्या लोकांचा उल्लेख आहे - त्यांना "सुट्टीच्या दिवशी काय करायचे समजत नाही" - अशी अनेक उदाहरणे आठवली.
या कथेतील काहीही महत्त्वाकांक्षा नसलेली व्यक्ती अगदी कोट घेण्यासारख्या नेहमीच्या गोष्टीने सुद्धा किती बदलू शकते हे फार इंटरेस्टिंग वाटले.
मस्त लिहीले आहेस! बाय द वे तो "एका सरकारी विभागात" असेल तर नाव गुप्त ठेवले आहे ना? मग ते गुप्त ठेवण्याची कारणे असतील - "न गुप्त" ठेवण्याची नाही
मग ते गुप्त ठेवण्याची कारणे
मग ते गुप्त ठेवण्याची कारणे असतील - "न गुप्त" ठेवण्याची नाही >>>>
How observant...! बदल केला. एवेतेवी एडिट क्वीनच झाले आहे, त्यात अजून एक. 
पोस्ट खूप आवडली. मला जेसन अलेक्झांडरचा कॅमिओ तपशीलात आठवत नव्हता. मी सगळे सिझन नाही पाहिलेत फ्रेंड्सचे. लिंक साठी आभार. मस्त आहे तो सीन. डार्क कॉमेडी. Is this because you are out of toner? Chandler?
ते ऑफिस मधे जाऊन रचलेले सगळे जमून आले आहे. त्याचा साईनफेल्ड मधल्या जॉर्ज कॉस्टॅन्झाही जबरदस्त होता, ह्या वैतागात साधर्म्य आहे.
अकाकी lonerwolf म्हणता येईल अशी व्यक्तिरेखा आहे. ह्या वरच्या रिलेटेबल आहेत. त्यात पेनकिलर/ डोपसिक मधील इन्व्हेस्टिगेटर सर्वात जवळ जाणारी व्यक्तिरेखा आहे पण तो नुसताच स्वभावानेच एकलकोंडा नाही तर परिस्थितीनेही दैन्यावस्थेत आहे. सोशल लॅडरवरही सर्वात खाली, त्यामुळे त्याच्या शब्दांना/ त्रासाला किंमतच नाही.
अतिशय सुंदर ओळख करून दिली
अतिशय सुंदर ओळख करून दिली आहेस.
Pages