एका अदृश्य माणसाची गोष्ट - द ओव्हरकोट - निकोलाय गोगोल

Submitted by अस्मिता. on 21 June, 2025 - 17:23

एक अतिशय बिनमहत्त्वाचा माणूस असतो.‌ Akaky Akakievich Bashmachkin त्याचं नाव. हे नाव रशियन भाषेत सुद्धा महत्त्वाचे नाही. 'अकाकी' जणू एकाकीच. अकाकी जेव्हा त्याच्या आईच्या पोटी आला, सचोटीने वागणारी, पापभिरू बाईच ती. हा जेव्हा तिच्या पोटी आला तीन वेगवेगळ्या गॉडपेरेंट्सनी सुद्धा तिला धड नावं सुचविली नाहीत. मग तिने देवाचा धावा केला म्हणजे चर्चमधे विचारले तर तेथे तर त्याहीपेक्षा विचित्र नावं सुचविली गेली. जणू अकाकी देवासाठी सुद्धा बिनमहत्त्वाचा. शेवटी या नावांपेक्षा तिच्या बाळाला त्याच्या बाबाचे नाव देऊन मोकळी झाली. अकाकीचे नाव सुद्धा संपूर्णपणे त्याचे नाही.

हा असा अकाकी आयुष्यभर गरीब व अदृष्यच राहिला. गोगोलना त्याला पर्सनॅलिटी न देता कथेचा नायक केले आहे. मुन्शी प्रेमचंदच्या कथांशी मिळतीजुळती दुःखद कथा आहे असे वाटतावाटता ती अंताकडे अद्भूत व अमानवीय होऊन जाते.

अकाकी- अतिशय सामान्य काहीशा ओबडधोबड रूपाचा, बुटका- मध्यमवयीन माणूस आहे. सेंट पिटर्सबर्ग या रशियातील शहरात एका सरकारी विभागात कारकून आहे. ह्या विभागाचं नाव गुप्त ठेवण्याची दहा कारणं सांगितलीत गोगोलने. ब्यूरोक्रॅटिक #ल&ट सगळीकडे सारखीच..! 

तो किती वर्षांपासून तेथे काम करतो, तो तेथे कसा आला हे कुणालाही माहिती नाही. त्याला सरकारी दस्तावेजांच्या नकला करून देणं जमतं, तो हे आणि एवढंच करतो. तो कनिष्ठ कारकून असल्याने वरिष्ठांसाठी तसा अस्तित्वातच नाही. त्यामुळे कुणीही त्याची दखल घेत नाही. त्यालाही याची पर्वा नाही. तो त्या नकला करण्यात पारंगत आहे आणि तो त्या मन लावून करत असतो. एकेक अक्षर जसेच्या तसे उतरवण्यात त्याला कोण आनंद होतो. त्याचा जन्मच जणू प्रति बनविण्यासाठी झाला आहे. कार्यालयीन वेळेतच नव्हे तर घरीही तो हे काम आनंदाने घेऊन येत असतो. जेवणाची शुद्ध नसते, चवीची फिकीर नसते. कुटुंब नसते ना मित्रपरिवार. ना त्याला कुणी बोलवत नसते, ना त्याच्या घरी कुणी येत असते. संध्याकाळी तेलाचा दिवा लावून त्या प्रकाशात तो झोपायची वेळ होईपर्यंत लेखन करत असतो, दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी लगबगीने कार्यालय गाठून पुन्हा हेच...!

त्याची सचोटी बघून कुणीतरी दयाळू अधिकारी त्याला यापेक्षा वरचं काम दिले पण अकाकीला क्लेशच झाले त्याने. मग पुन्हा पूर्वपदावर कमी दर्जाच्या कामावर तो जणू आमरण नियुक्त होऊन गेला. इतका अस्तित्वहीन नायक. रूक्ष, निस्तेज, कसल्याही छटा नसलेला निरुद्देश व निरस जीवन जगत राहणारा अकाकी.

आपण तरी अकाकीची दखल कशी घ्यावी, घ्यावी की न घ्यावी हे गोगोलने आपल्यावरच सोडून दिलेय. अकाकीचे सहकारी सुद्धा त्याच्यावर अरेरावी करतात, त्याच्या कोटावर हसतात. स्वतःला बुद्धिमान समजून त्याचे 'बुलींग' करतात. पण कामात व्यत्यय येईपर्यंत तो त्यांना 'मला काम करू द्या' अशी आर्जवंही करत नाही. कुणालाच त्याचा आदर वाटत नाही, कुणालाच त्याच्याबद्दल स्नेह वाटत नाही. बोलताना त्याला शब्दांची जुळवाजुळव करता येत नाही, बरेचदा त्याची वाचा खुंटलेली असती. एवढं असूनही तो दुःखी नाही, तो 'आपल्याच' नादात आहे. मसूदा लेखनात तो पूर्णपणे समाधानी आहे. कुणालाही तो दिसत नसूनही तो त्याच्या नेहमीच्या जागेवर तेच ते काम करत कृष्णविवरातले वाटावे असे जीवन वर्षानुवर्षे जगत आहे.

अशा अकाकीचा कडाक्याच्या हिवाळ्यात वर्षानुवर्षे वापरून विरून जवळजवळ सच्छिद्र झालेला एक ओव्हरकोट आहे. त्या ओव्हरकोटातून वारं आत शिरून या रशियाच्या हाडं ठिसूळ करणाऱ्या थंडीत त्याला पाठीवर - मणक्यातून झिणझिण्या आल्यासारख्या होत आहेत. घरापासून कार्यालयापर्यंत तो पळत गेला तरी तो गारठून जातोय. कोटाचा भाग जेथेजेथे विरून गेला तेथे कोटाच्या कॉलरीचेच ठिगळ जोडत राहिल्याने कॉलर अशी उरलीच नाही. त्यामुळे अकाकीची बुटकी मानही सेंट पिटर्सबर्गच्या आठवडी बाजारात फिरते विक्रेते खेळण्यातल्या मान डुगडुगणाऱ्या मांजरी विकतात तशी हलते.

जुन्या कोटाच्या डागडुजीसाठी, जेथे संपूर्ण आयुष्य काढलेय तेथे दोनचार हिवाळे अजून निघाले तर काढण्यासाठी - अकाकी पेट्रोव्हिच नावाच्या गावातील कनिष्ठ दर्जाच्या मद्यपी शिंप्याकडे जातो. येथे गोगोलने पेट्रोव्हिचच्या पात्राबद्दल आधी तो वेठबिगारी शेतमजूर होता व देवाच्या नावाखाली दारू हे तीर्थ समजून पिणाऱ्यांपैकी होता असे म्हटलेय. तो प्यायलेला असला की कमी पैशात शिवून द्यायलाही तयार व्हायचा पण अकाकी कमनशिबी असल्याने तो त्या दिवशी नेमका पूर्ण शुद्धीत होता. त्याने कोटाकडे बघून डागडुजीसाठी तुच्छतेने नकार दिला. नव्या कोटाचे दीडशे रूबल व रेशमाच्या शिलाईसाठी अजून पन्नास. दोनशे रूबल..! आयुष्यात कधीही एवढी मोठी रक्कम अकाकीने पाहिलेली नाही. त्याचा प्रचंड हिरमोड झाला. तो नंतर पेट्रोव्हिचला चढलेली असतानाही विचारून आला पण त्याचं उत्तर तेच होतं.

शेवटी कोटासाठी त्याने चाळीस रूबल या मासिक पगारातून थोडी थोडी रक्कम बाजूला काढून ठेवायला सुरुवात केली. त्यासाठी घरमालकीणीच्य घरातील दिव्याच्या उजेडात प्रती करायला लागला, संध्याकाळचा चहा पिणं सोडला, बूट झिजून नवा खर्च होऊ नये म्हणून हळूहळू चालायला लागला. नंतर संध्याकाळचं जेवण सोडून दिले. दर शनिवारी पेट्रोव्हिचला भेटून कोटाबद्दल बोलायला जात असतो, नंतर दोघं मिळून कपडा बघायला जात असतात.

कोटाची स्वप्नं रंगवताना त्याच्यासारख्या अदृष्य- ध्येयहीन माणसाला अचानक ध्येय मिळतं. या उद्दिष्टाने व्यक्तीमत्त्वाला एक निश्चित आकार येतो. उपासमार होऊनही तो आनंदात असतो. कोटाचे पैसे जमले की हे करू, ते करू. ख्रिसमसचा बोनसही कोटासाठी ठेवू असे मनसुबे रंगवत असतो. अकस्मात जणू हे इंगित वरिष्ठांना कळाल्यागत त्याला बोनसची रक्कम नेहमीपेक्षा थोडी जास्त मिळते. अपेक्षेपेक्षा वीस रूबल जास्त. अकाकीला आकाश ठेंगणे होते. जवळजवळ सहा महिन्यांचा ध्यास. मुलभूत गरजच पण दैन्यावस्थेत गरजपूर्ती सुध्दा ध्यास होऊन जाते. जीवघेण्या थंडी पासून रक्षणासाठी केलेली तपःश्चर्या!

सगळी रक्कम घेऊन तो पेट्रोव्हिचकडे जातो. ते दोघे सेंट पिटर्सबर्गच्या बाजारातून चांगल्या प्रतीचे टिकाऊ उबदार कापड, कॉलरीसाठी जाड रेशीम, शिवणासाठी रेशमी दोरा, बटण अशी खरेदी करायला मोठ्या उत्साहाने जातात. दहा पंधरा दिवसांत कोट शिवूनही होतो. खुद्द पेट्रोव्हिच तो तयार कोट एका मोठ्या पंचात झाकून सकाळीसकाळी अकाकीच्या घरी येतो. पिटर्सबर्गच्या इतर डागडुजी करणाऱ्या शिंप्यांपुढे पेट्रोव्हिच पूर्णपणे नवीन कोट शिवून दिल्याने स्वतः वर खूष, किंचित दुराभिमानाने सुखावलेलाही असतो. अकाकी कोट घालून बघतो, तर तो अगदी मापात - हातापायांना बेताचा व सुरेख झालेला असतो.

अकाकीला हर्षवायूच व्हायचे बाकी असते. सहा महिन्यांची उपासमार सुद्धा त्याला आठवेनाशी होते. सेंट पिटर्सबर्गच्या थंडीचा कडाका वाढायला लागलेला असताना अगदी योग्य वेळी हा कोट तयार झालेला असतो. शिलाईची पूर्ण रक्कम चुकती करून कोट हातात घेतो. पेट्रोव्हिचच्या मते त्याने हे दहा -बारा रूबलमधे शिवून देण्याचे कारण त्यांच्यात निर्माण झालेला जिव्हाळा होय, नाहीतर अख्ख्या सेंट पिटर्सबर्गमधे कुणी एवढ्या कमी शिलाईत इतका नेटका कोट शिवून दिलाच नसता मुळी..!

अनायसे कार्यालयात जायची वेळ झालेलीच असल्याने अकाकी नवीन कोटच मिरवत घालून जाण्याचे ठरवतो. पेट्रोव्हिच सुद्धा स्वतःवरच खूष होत त्याला न्याहाळत काही अंतर त्याच्या मागोमाग जातो.

आज प्रथमच कार्यालयातील सहकारी त्याची वास्तपुस्त करतात. कोटाची सुद्धा स्तुती करतात. कोटामुळे आतला माणूस दृश्य होतो. ह्या सगळ्याची सवय नसल्याने अकाकीला ओशाळल्यागत होते, चारचौघात जाण्याची सवय नसल्याने अवघडल्यासारखे होते. त्यापैकी एकजण नव्या कोटासाठी पार्टी हवी असेही म्हणतो, ते ऐकून कोटापायी नुकताच इतका खर्च झाल्याने दिङ्मूढ होऊन जातो. पण त्याची ह्या द्विधेतून सुटका करण्यासाठी दुसरा वरिष्ठ अधिकारी त्याच्या घरी रात्रीच्या जेवणाचे निमंत्रण देतो. अकाकीला हायसे वाटते.

त्या संध्याकाळी अकाकी सूप पिऊन निमंत्रणाची वेळ होईपर्यंत कोटाकडे हरखून बघत बसतो. वरिष्ठ अधिकाऱ्याचे घर तसे अकाकीच्या घरापासून शहराच्या दुसऱ्या टोकाला - आलिशान टुमदार घरांच्या वस्तीत. मधे काही ठिकाणी रस्त्यावरील दिव्यांचा पुरेसा उजेडही नाही. चालतचालत तो तेथे पोचतो, तोवर मद्यपान सुरूही झालेले असते. अकाकी कोट काढून अनेक भारीभारीचे, रेशमाचे, फरचे वेगवेगळे कोट आधीच टांगलेल्या ठिकाणी आपला कोटही टांगून ठेवतो. कधीच कुठलेही आमंत्रित न होण्याने चोरट्यासारखा चुळबुळत राहतो. शेवटी थोडेसे खाऊन यजमानांचा निरोप घेतो.

अंधार व थंडी दोन्ही वाढलेले असते. काही गल्लीबोळांत जणू दिव्यातले तेल कधीही संपून गडद काळोख होईल असे वाटत असते, तेवढ्यात अचानकच दोन धंटिगण अकाकीवर दांडगाई करून त्याचा कोट हिसकावून घेऊन पळून जातात. दूर एक शिपाई ह्या सगळ्याला पाहून न पाहिल्यासारखे करतो. अकाकीला दुसऱ्या दिवशी ठाण्यात येऊन रितसर तक्रार नोंंदवायला सांगून त्याच्यावरच दरडावतो. कडाक्याच्या थंडीत अतिशय जड अंतःकरण घेऊन तो घरी परततो, रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही.

घरमालकीणीच्या मते तिच्या स्वयंपाकीणीच्या ओळखीचा यांच्याही वरचा सुप्रिटेंडंट आहे, चर्चमधे जाणारा व धार्मिक म्हणजे तो नक्कीच कणवाळू असायला हवा. धार्मिक व्यक्ती चांगली असेलच असे नाही. पण समाजातील वेगवेगळ्या स्तरावरील लोकांच्या आस्थेच्या आणि मिळेल ते रिसोर्सेस शोधण्याच्या कंडनिशनिंगला व्यक्तिरेखांच्या रूपात गोगोलने दाखवून दिले आहे. प्रत्यक्षात तो माणूस अत्यंत अहंकारी व अकाकीसारख्या नाव व चेहरा नसलेल्यांना अतिशय उर्मटपणाची वागणूक देऊन वर वरिष्ठ असण्याचा अभिनिवेष मिरवणाऱ्यांपैकी असतो. तो अकाकीला दिवसभर तिष्ठत ठेवतो, उपाशीतापाशी.

त्याच्या उलट दरडावण्याने मुखदुर्बळ अकाकी निश्चेष्ट होऊन पडतो. शुद्धीवर आल्यावर कसाबसा घरी येतो, पण या सगळ्या मानसिक धक्क्याने व पराकोटीच्या क्लेशाने ज्वर चढून त्यातच त्याचे प्राण जातात. खरंतर येथेच गोष्ट संपायला हवी, आपल्याला निराशेच्या गर्तेत ढकलून गोगोल काही तेथेही थांबला नाहीच...!

काही दिवसांतच पिटर्सबर्गच्या अंधाऱ्या पुलापाशी एक भूत - अकाकीच्या वर्णनाशी मिळतेजुळते प्रेतच वाटावे असे - त्याने सुंदर पत्नी व गोंडस मुलं असूनही नेमाने आपल्या कॅरेनिना नावाच्या अंगवस्त्राला भेटायला जाणाऱ्या त्याच सुप्रिटेंडन्टला दरडवण्याची- कोट हिसकावून घेण्याची बातमी पेपरात छापून येते. ह्या धक्क्याने तो बेमुर्वतखोर अधिकारी जरा सुधारला म्हणे. नंतर असे अनेक 'भटकणारे' अकाकी - जे या वर्णनाशी मिळतेजुळते देखील नाहीत ते सुद्धा रात्रीबेरात्री कुठेकुठे कोण्या वरिष्ठाला घाबरवून सोडायला लागले. नोकरशाहीत किंचित सुधारणा व्हायला सुरुवात झाली.

अशी कित्येक अदृश्य माणसं आपल्याही अवतीभवती असतील. म्हणजे आपल्या सामाजिक- आर्थिक स्तरात येत नाहीत म्हणून अदृश्य. आपण तसे वागवतो म्हणून अदृश्य. आपण त्यांना आपल्यासारखेच सुखदुःख, अपेक्षा, गरजा, स्वप्नं असतील असे समजत नाही म्हणून अदृश्य. आपण त्यांना माणूसच समजत नाही म्हणून अदृश्य...!

रशियन ब्युरोक्रॅसीवरील सटायर म्हणावे अशा प्रकारचीच १८४२ साली प्रकाशित झालेली कथा पण कुठेही- सद्यकाळातही चालून जाईल अशी काहीशी स्थलातीत व कालातीतही आहे.

-©अस्मिता.

संदर्भ-
१. 'मी वाचलेले पुस्तक-३' या धाग्यावर 'द ओव्हरकोट' कथा वाचण्याचे सुचविल्याबद्दल केशवकूल यांचे आभार.

२. ही कथा मी स्टोरीटेलवर इंग्रजीतून वाचली. कथेचा मनातच अनुवाद करून त्यावर परिचय लिहिण्याची ही पहिलीच वेळ असेल. काहीतरी वेगळं लिहिण्याचा प्रयत्न करायला हवा असे वाटण्यातून नवीन लेखच लिहिला. ही कथा गूगल केल्यास ऑडिओबुकच्या स्वरूपात यूट्यूबवर दिसतेय पण मी त्यापैकी एकही ऐकली नाहीये.

३. विकीस्रोत-
https://en.m.wikipedia.org/wiki/The_Overcoat
मुख्यचित्र विकीपिडियाहून साभार.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ओळख.
सोप्या अर्थावाही इंग्रजी विरहित मराठीत लिहिलं आहेत ते ही आवडलं.
शेवटी सुपारिटेंडंट आणि कोट परत वाचून वर्तुळ पूर्ण करायचं आहे का काय वाटलं. ते फार महत्त्वाचं नाहीच.

सुंदर ओळख करून दिलीय.
१८४२ सालची कथा !!!

आजही संदर्भ लागू होतात. वैश्विक कथा आहे.

काहीतरी वेगळं लिहिण्याचा प्रयत्न करायला हवा असे वाटण्यातून नवीन लेखच लिहिला.
व्वा. जमलय.
कथेचे अनेक पैलू उलगडून दाखवले आहेत. आत्ता मूळ कथा हा लेख समोर ठेवून पुन्हा एकदा वाचेन. अनेक आभार .
अजून गृहपाठ पाहिजे असेल तर "Cat in the Rain" ही अर्नेस्ट हेमिंग्वे ची कथा रसग्रहणासाठी घ्या. पहा आवडते आहे का.

द ओव्हरकोट च्या कथावस्तुशी मिळताजुळता "THE LAST LAUGH" हा १९२४मध्ये आलेला जर्मन मूक चित्रपट. माझ्या मते अत्यंत बघणीय आहे. एखाद्याचे आयुष्य त्याच्या uniform शी इतके निगडीत असावे? पिक्चर पहा म्हणजे समजेल. यू ट्यूब वर बघायला मिळेल.

लेख नेहमीप्रमाणेच उत्तम..

काही जणांच्या आयुष्य कण भर सुख टाकायला नियती का विसरते, असे वाटणारी व्यक्तिरेखा... खूप वाईट वाटणे हे गोगोल या सिद्ध हस्त लेखणीची खूण..

Art should comfort the disturbed and disturb the comfortable !

या उक्तीप्रमाणे ही कथा खरोखरच अस्वस्थ करून सोडणारी आहे. ह्या कथेत येणारे लेखकाचे नॅरेशन मला एक अभिनव गोष्ट वाटली. नुसतीच कथा चालू नाहीये तर लेखक वाचकांशी मधूनमधून बोलतही आहे, गप्पा मारल्यासारखे. पण म्हणून कथेचं गांभीर्य तसूभरही कमी होत नाही. गोगोल सगळे बघून काहीसा अलिप्त झाल्यासारखा वाचकाला सगळ्याच व्यक्तिरेखांविषयी काय हवं ते मत बनवू देण्याचं स्वातंत्र्य देतो. किंबहुना बहुतांश लेखक इतके निर्भयच वाटत नाहीत, ते आपल्या व्यक्तिरेखांना वाचकांच्या मनात त्यांना हवं तसंच उतरवण्याबाबत आग्रही वाटतात. ह्याला प्रचंड निर्भय व्हावं लागतं. कारण लेखकाने त्याच्या व्यक्तिरेखांमधे गुंतणं नैसर्गिक असतं.

उदा. तो सुप्रिटेंडन्टबद्दलही मिस्ट्रेसपेक्षाही सुंदर व तरूण पत्नी व जीव लावणारी दोन मुले असतानाही हा नियमितपणे तिच्याकडे जातो. How astonishing, but let's not judge anyone here..! अशा अर्थाचे उद्गार काढतो. गोगोल ह्या सगळ्याकडेच एका निर्विकारपणे पाहतोय व लिहितोय असं वाचताना वाटत होतं.

कथासागर नावाच्या जुन्या दूरदर्शन वरील मालिकेत श्याम बेनेगलांनी 'द ओव्हरकोट' ही कथा 'नयी शेरवानी' या नावाने दिग्दर्शित केलेली आता सापडली. अजून पाहिली नाही.

गोगोल वरून झुंपा लाहिरीचं 'द नेमसेक' आठवलं. आणि अर्थातच त्यावरची मीरा नायरने केलेली फिल्म. आपला गोड छान इरफान खान.

'ओवरकोट'चं नाव फक्त ऐकलं होतं. बेनेगलांची कथा/शॉर्टफिल्मही बघितली. क्या बात है!
थॅक्स अस्मिता.

कथासागर नावाच्या जुन्या दूरदर्शन वरील मालिकेत श्याम बेनेगलांनी 'द ओव्हरकोट' ही कथा 'नयी शेरवानी' या नावाने दिग्दर्शित केलेली आता सापडली. अजून पाहिली नाही.>>>>

येस.. मलाही हीच आठवलेली.

अनुवादाचा प्रयत्न चांगला जमलाय. अधेमधे थोडा कृत्रिमपणा जाणवला पण सरावाने तो निघुन जाईल.

छान लिहिलंय

अकाकी विषयी इतकं वाईट वाटलं !

का कोण जाणे, पण कथा (वरील अनुवाद) वाचताना अकाकीच्या भूमिकेत अचानल पन्कज कपूर डोळ्यासमोर आला.

अस्मिता. , खुप छान प्रयत्न केलात आणि तो पोचलाही Happy

कथासागर नावाच्या जुन्या दूरदर्शन वरील मालिकेत श्याम बेनेगलांनी 'द ओव्हरकोट' ही कथा 'नयी शेरवानी' या नावाने दिग्दर्शित केलेली आता सापडली. अजून पाहिली नाही.>> हां बरोबर.. कालपासून आठवत होते. कथा वाचल्यावर ही पाहिलेय कुठेतरी गोष्ट, पण नेमकी कुठे आठवेना.

अस्मिता, तुझे सगळेच लिखाण वाचायला नेहमीच आवडते. हे रसग्रहणही छानच लिहिले आहेस. तुझा व्यासंग आणि हरहुन्नरीपणाचे कौतुक !

कथासागर मला माहित नव्हते/ आठवतही नव्हते. मी वा पु धाग्यावर अनया आणि ललिता प्रीतीने मी चेकॉव्हच्या "पैज" (वरच्या संदर्भातील लिंक मधे आहे) कथेवर परिचय लिहिला होता, तेव्हा त्याचा उल्लेख केला होता. पण मला काहीच क्लिक झाले नाही कारण ती मालिका १९८६ च्या काळातील आहे. या कथेबद्दल विकिपीडियावर वाचताना 'द नेमसेक' व 'कथासागर' दोन्हींचाही उल्लेख सापडला. 'द नेमसेक' मधे इरफान आपल्या आवडत्या लेखकावरून मुलाचे नाव गोगोल ठेवतो, जे मुलाला आवडत नसते. हे एवढं 'द नेमसेक' अगदीच थोडा पाहिला होता व राहून गेला होता तेव्हा पाहिले होते.

धन्यवाद सर्वांना. Happy

पंकज कपूरला तशा पिचलेल्या, मुखदुर्बळ माणसाच्या भूमिका चांगल्या जमतात खरं..! Happy

अस्मिता, लिंकबद्दल धन्यवाद.
दूरदर्शनवर ही मालिका दुसर्‍यांदा आलेली तेव्हां पाहिली होती. पण शेवटी भूत दिसतं एव्हढंच आठवत होतं.
या लिंकमुळं कुणाची कथा आहे ते ही समजलं आणि कथाही.
बेनेगल यांनी सुंदर भारतियीकरण केलं आहे. थंडी पडणारा प्रदेश काश्मीर असल्याने पात्र काश्मिरी दाखवली आहेत.
पण हा धागा वाचताना जितकं त्या कथेशी एकरूप होता आलं तेव्हढं माध्यम बदलल्यवर जाणवलं नाही.
ओम पुरीचा परफॉर्मन्स यादगार आहे यातला.

रशियन लेखकांच्या कथा चटकन मनाला भिडतात. मंटोच्या कथाही अशाच.

चांगला लिहिला आहेस गोषवारा आणि त्यावरचं तुझं चिंतन. "'अकाकी' जणू एकाकीच"सारख्या तुझ्या मनाने लावलेल्या फोनेटिक कनेक्शन्सचीही मजा वाटली. Happy
आता इंग्रजी भाषांतर आणि बेनेगलांचा एपिसोड दोन्ही बघते.

(अवांतर: काही ठिकाणी काळाची गडबड झाली आहे लेखात - एकदम वर्तमानकाळातून भूतकाळात आणि परत अशा उड्या मारल्या आहेस, तेवढ्या टाळता येतील का? Happy
उदा. अकाकी पेट्रोव्हिच नावाच्या गावातील कनिष्ठ दर्जाच्या मद्यपी शिंप्याकडे जातो. येथे गोगोलने पेट्रोव्हिचच्या पात्राबद्दल आधी तो वेठबिगारी शेतमजूर होता व देवाच्या नावाखाली दारू हे तीर्थ समजून पिणाऱ्यांपैकी होता असे म्हटलेय. तो प्यायलेला असला की कमी पैशात शिवून द्यायलाही तयार व्हायचा पण अकाकी कमनशिबी असल्याने तो त्या दिवशी पूर्ण शुद्धीत होता. )

बाई आल्या लाल पेन घेऊन, सुधारते हं. अजूनही सांग सापडल्या तर. दिङ्मूढसाठी सुद्धा धन्यवाद. Happy

सॉरी, ते लाल पेन म्हणजे जित्याची खोड आहे. Lol
टाळायचा प्रयत्न करते, पण चांगला लेख असेल तर त्याचं शक्य तितकं निर्दोष दस्तावेजीकरण व्हावं असं वाटतं. Happy

Happy Happy माझ्यासाठी तरी अजिबात टाळू नकोस, मलाही माझं लेखन निर्दोषच व्हायला हवं असतं. माझंही तेच मत आहे. उलट तुझ्या लाल पेनसाठी माझ्या इतके 'फ्रेन्डली' गिऱ्हाईक नसेल माबोवर, cherish me. Lol

कथासागर आणि त्या पद्धतीच्या मालिका त्या दरम्यान दूरदर्शनवर होत्या. निरनिराळ्या भारतीय भाषांमधील कथा एका (फार तर दोन) भागात दाखवत असंत. तेव्हा माझं‌ वाचन मराठी पुस्तकांपुरतं मर्यादित होतं. दूरदर्शनमुळे इतर भाषांमधील साहित्यातील काही कण बघायला मिळाले. बंगाली साहित्यातील प्रथम प्रतिश्रुती, गणदेवता, चरित्रहीन वगैरे कादंबऱ्यांवर आधारित मालिका बघून भारावून गेले होते.
हे लिहीताना 'जाने कहाँ गये वो दिन' असं वाटलं.

अकाकी सारखी किती माणसं असतील. ज्यांच्या जगण्यामरण्याची कोणालाच पडलेली नाही. स्वत: अकाकी ला तरी कुठे काय महत्वाकांक्षा, स्वप्नं!
आहे ते ठीक आहे यातच किती माणसं अशीच राहत असतील. एकेकाचं नशीब!
छान लिहिलं आहेस. आवडलं! साधं सोपं!

मला दुरदर्शन काळातल्या अशा अनुवादित कथांचं सादरीकरणच आठवलं. अँतॉन चेकॉव्ह की कहानीयां वगैरे!
जास्त ड्रामा नाही, ढाणढाण म्युजिक नाही, गुढ अंधारा काळ, पात्रांच्या माफक हालचाली, संवाद!

आता इंग्रजी भाषांतर आणि बेनेगलांचा एपिसोड दोन्ही बघते..>>>?? आता इंग्रजी भाषांतर म्हणजे काय??
ओहो समजल. रशियन मधून इंग्रजी भाषांतर!

छान ओळख करून दिलीय.

अकाकीचं वर्णन आणि त्याला ऑफिस मधे मिळणारी वागणूक वाचून फ्रेंडस मधे फिबी ज्या सेल्समन ( साईनफेल्ड मधला जॉर्ज )ला कॉल करते तो आठवला.

Pages