
आठवणींची सुगंधी कुपी... बकुळी
रंग , रूप, आकार ह्या पैकी काही ही देवाकडून मिळालेलं नसताना ही आपल्या सुगंधाने लहान , थोर, रसिक, कवी , लेखक सगळयांनाच आवडणारी बकुळ अर्थात माझी ही आवडती आहेच.
बकुळीचं झाड खूप म्हणजे खूपच मोठं आणि ऊंच होतं. कायम हिरवंगार दिसत. उंचीमुळे ह्याची फुलं हातानी काढणं शक्य नाही म्हणून वाऱ्याच्या हलक्या झुळुकीने ही ती आपसूकच खाली पाडण्याची सोय केलीय देवाने की काय कोण जाणे. छोटंसं, मध्ये एक आरपार छिद्र असणारं, तपकिरी रंगाचं, सुगंधाची खाण असणारं हे फुल त्याच्या फुल आरपार ओवून करता येणाऱ्या माळेसाठी कोकणात प्रसिद्ध आहे आणि ती माळ केळीच्या सोपात केली असेल तर सोनेपे सुहागा.. ह्या माळ ओवण्या वरूनच ह्या फुलाला कोकणात " ओवळ " असं म्हणतात आणि माळेला खास
कोकणी शब्द आहे "वळेसर ". लहानपणी ह्या माळा केसात घालायची कोण हौस ! आणि सुकल्यावर इतर वळेसरांसारख हे वळेसर फेकून न देता आम्ही पुस्तकात किंवा कपड्याच्या घडीत ठेवून द्यायचो. बकुळीचा वास फुलं सुकली तरी कमी होत नाही. उलट वाढतोच.
माझं बालपण लहान गावात गेलं आहे. माझ्या मैत्रिणीच्या घराजवळच एक मोठं बकुळीच झाड होतं . एक दिवस फुलं वेचायला आम्ही गेलो आणि इतका सोसाट्याचा वारा सुटला की तो मोठा वृक्ष ही गदागदा हलायला लागला. फुलं अक्षरशः टपटप गळत होती. ते वारं आमच्या मनातही भिनलं होतं. आम्ही ही वेडया झालो होतो. अंगावर होणारा फुलांचा वर्षाव झेलताना मन ही पिसासारखं हलकं होत होतं.
गोल गोल फिरत फ्रॉकमध्ये आम्ही दोघी फ़ुलं गोळा करत होतो. फ्राक भरून फुलं पाच सात मिनिटातच गोळा झाली. तो सोसाट्याचा वारा,गदागदा हलणारी बकुळ,उडणारा पालापाचोळा, गळणारी असंख्य फुलं, आमचे उडणारे केस आणि जमिनीला स्पर्श न होता झाडावरुन फ्रॉक मध्ये पडणारी ती फुलं, हे सगळं चित्र इतकी वर्ष झाली तरी सगळ्या तापशीलांसह अजूनही मनाला सुखावते. अजून ही ही बकुळीची आठवण तिच्या सूक्ष्म सुगंधासह कायमच मनात आहे.
बकुळीच्या झाडाला बोरासारखी पण आकाराने थोडी लांबट गोल अशी पिवळ्या नारिंगी रंगाची फळं लागतात. आताच्या मुलांना नवल वाटेल पण चिंचेचा पाला, आंब्याची कोवळी पालवी, उंबराची फळ, आंब्याच्या कोयीताला गर तसेच बकुळीची फळं ही खूप आवडती होती आमची. बकुळीची फळं खाल्ली की कधी कधी घश्यात खूप तोठरा बसत असे. पण असल्या लहान सहान गोष्टीना कुठे जुमानत होतो आम्ही ! 
बकुळीच झाड खूप उंच असल्याने हाताने काढता येत नाहीत. खाली पडलेलीच वेचावी लागतात. .पण त्र्यम्बकेश्वरा च्या मंदिराच्या आवारात एक बकुळीचं झाड आहे , अगदी हाताने काढता फुलं काढता येतील इतक्याच उंचीच. मी जनरली सार्वजनिक ठिकाणी फुलं तोडत नाही पण त्याक्षणी मोह आवरला नाही. डेखासकट एक फुल तोडलं, एक पान ही काढलं आणि त्या पानावर फुल टोचून फोटो ही काढला. फोटो खाली देतेय. इतकं मस्त वाटलं होतं तेव्हा.
देवाच्या दारी जरी हे झाड खूप ठिकाणी असलं तरी भुता खेतांच ही हे आवडतं झाड आहे अशी समजूत आहे. नाडण ला आमच्या शेताच्या वाटेवर एक अफाट मोठं बकुळीच झाड आहे. संध्याकाळी शेताच्या दुसऱ्या टोकाकडून सूर्यकिरणांच्या प्रकाशात चमकून उठणार हे झाड खूप म्हणजे खूप सुंदर दिसत. आजूबाजूला खरं तर खूप झाडं आहेत पण लक्ष वेधून घेतं ते हेच झाड. असं जरी असलं तरी तिन्ही सांजेला , भर दुपारी किंवा अमावस्या पौर्णिमेला ह्या झाडाखाली रेंगाळू नका असा सल्ला आम्हाला मिळतोच मिळतो. वर्षातून एक दिवस भर दुपारी गुरुजीं सहित घरातला यजमान नैवेद्य आणि पूजा सामान घेऊन झाडाची साग्र संगीत पूजा करतो . झाडावरच्या मूळ पुरुषाला आमचं रक्षण करण्याचं गाऱ्हाणं घालतो.
आणखी एक आठवणीत असलेले बकुळ झाड हे भूता खेता पासुन अतिशय लांब आहे. किंबहुना एखाद्या भूताच्या मनात त्या झाडावर जायचा साधा विचार ही आला तरी त्याची काही धडगत नाही. हे बकुळ झाड गोंदवले येथे मंदिर परिसरात महाराजांच्या समाधि मंदिराच्या समोरच आहे त्यामुळे महाराज त्या झाडावर लक्ष ठेऊन आहेत. त्या झाडाभोवती हल्ली छान कट्टा बांधला आहे. मी त्या कट्टय़ावर बसून मनात राम नामाचा जप करत महाराजांचा कृपा प्रसाद समजून वेचलेल्या फुलांचा दरवळ कधीच कमी होत नाही.
हेमा वेलणकर
वाह आभा.
वाह आभा.
आभा, सामो >>> बकुळीचे अत्तर
आभा, सामो >>> बकुळीचे अत्तर कसे मिळेल? ऑनलाईन ऑर्डर करावे लागेल का?
लंपन पोस्ट सुंदर…..
लेख सुगंधी, सुगंधी प्रतिसाद
लेख सुगंधी, सुगंधी प्रतिसाद !
खोटे वाटेल पण अगदी परवाच हा लेख आलाय त्याच दिवशी पळताना गुलमोहर पथावर एक बकुळीचे झाड आहे असे लक्षात आलेले. लहानच आहे तसे ते. बहुतेक पहिल्यांदाच फुले आली असावी. पळताना थांबून त्याचे फुले वेचली गेलीच.
तिकडे एक वॉचमन आहे तो नव्हता जाग्यावर त्याच्या टेबलावर ठेवून आलो. रिकाम्या हाताला देखील सुवास येत होता काही काळ.
बकुळीची एक बरेच मोठे झाड बालगंधर्व रंगमंदीराच्या आवारात देखील आहे. टिळक तलावापाशी पण एक झाड फुलत असते. कॅम्पात एका गल्लीत देखील एक नवीनच फुलायला लागलेले झाड आहे.
बकुळीचे झाड लहानपणापासून बघीतलेले असले तरी त्याचे केशरी रंगाचे फळ अगदी इतक्यात एखाद वर्षामागे पाहण्यात आणि खाण्यात आले.
बकुळीची अजून एक आठवण म्हणजे मी कैलास मान सरोवर यात्रेला जाताना मनात ठरवलेले की तिकडे देऊळ वगैरे नसले तरी पुण्यातून सोबत बकुळफुले घेऊन जाईन सुकली तरी सुवास राहतो म्हणून तर नेमके पुण्यातून निघताना फुले न्यायचे विसरलो. दिल्लीत चार दिवस गुजराथ समाज सदनात मुक्काम असतो, तिकडे जवळच एक बकुळीचे झाड दिसले फुलेही मिळाली मग मी ती बरोबर घेऊन गेलो होतो. कैलास पर्वतापाशी वाहीली होती.
माझे मन अगं मी 'बकुळ अत्तर'
माझे मन अगं मी 'बकुळ अत्तर' म्हणुन गुगल केले तर सापडले ई-बे वर आहे
बकुळीची अजून एक आठवण म्हणजे
बकुळीची अजून एक आठवण म्हणजे मी कैलास मान सरोवर यात्रेला जाताना मनात ठरवलेले की तिकडे देऊळ वगैरे नसले तरी पुण्यातून सोबत बकुळफुले घेऊन जाईन सुकली तरी सुवास राहतो म्हणून तर नेमके पुण्यातून निघताना फुले न्यायचे विसरलो. दिल्लीत चार दिवस गुजराथ समाज सदनात मुक्काम असतो, तिकडे जवळच एक बकुळीचे झाड दिसले फुलेही मिळाली मग मी ती बरोबर घेऊन गेलो होतो. कैलास पर्वतापाशी वाहीली होती. >> वा!
>>>>>तिकडे जवळच एक बकुळीचे
>>>>>तिकडे जवळच एक बकुळीचे झाड दिसले फुलेही मिळाली मग मी ती बरोबर घेऊन गेलो होतो. कैलास पर्वतापाशी वाहीली होती.
खूपच सुंदर आठवण आहे हर्पेन.
हर्पेन कित्ती समाधानाची गोष्ट
हर्पेन कित्ती समाधानाची गोष्ट, जे ठरवलं होतंत ते दुसरीकडून का होईना झालं.
हर्पेन कित्ती समाधानाची गोष्ट
हर्पेन कित्ती समाधानाची गोष्ट, जे ठरवलं होतंत ते दुसरीकडून का होईना झालं.
>>>
१००+
हर्पेन तुमच्या कैलास मानस यात्रेसंबंधी लिहा.
फुलेही मिळ ाली , कैलास
…फुलेही मिळाली , कैलास पर्वतापाशी वाहिली…
❤
मला लहानपणापासुन ह्या फुलांचा
मला लहानपणापासुन ह्या फुलांचा वास फार आवडत नाही >>> आता मला प्रतिसाद द्यायचा धीर झाला. बकुळ आणि सप्तपर्णी हे दोन्ही वास पाच मिनीटापर्यंत ठीक वाटतात पण त्यानंतर मात्र डोकं दुखायला लागतं.
वास नसला आवडत तरी त्या फुलांचा चांदणीसारखा आकार मला प्रचंड आवडतो. पिटुकल्या परीघात किती कंगोरे बसवले असतात निसर्गाने. वास नसला आवडत तरी बघत रहायचा मोह टाळणे कठीण होते.
असंच पिटुकलं पण प्रचंड सुगंधी आणि वळेसरात वापरलं जाणारं फुल - सुरंगी.
@हर्पेन, मस्त आठवण. खूप समाधान मिळाले असेल फुले वाहताना.
सुरंगीचा विषय निघाला आणि
सुरंगीचा विषय निघाला आणि ऋतुराज आला नाही अजून चक्क?
बकुळीचा वास बऱ्याच जणांना
बकुळीचा वास बऱ्याच जणांना नाही आवडत, डोकं दुखायला लागतं हे बरोबर आहे, ऐकलंय बऱ्याच जणांकडून.
मला सुरंगीचा वास उग्र वाटतो,
मला सुरंगीचा वास उग्र वाटतो, बकुळ आवडते.
सुरंगीचा विषय निघाला आणि
सुरंगीचा विषय निघाला आणि ऋतुराज आला नाही अजून चक्क? >>>>>>> आलो आलो...
बकुळी इतकीच सुरंगी आवडती. फक्त हिची ओळख उशिरा झाली. पण एकदा ओळख झाल्यावर मग तिला भेटायला दर वर्षी येऊर ला जाणे होते. मादक सुगंध. फुललेली सुरंगी बघणं म्हणजे एक नयनरम्य अनुभव. तो सुगंधाचा घमघमाट दुरूनही जाणवतो. सुरंगीचे वळेसर हेच खरे वळेसर.
नुकतीच रविवारी बातमी वाचली की सुरंगी वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी वन विभाग सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात ठिकाणी सुरंगीची लागवड करणार आहे.
त्या बातमीतच पहिल्यांदा वाचलेली बाकीबाब याची सुरंगी वरील कवितेच्या ओळी...
सुरंगीच्या सुवासाने डंख विसरला नाग
रात ओथंबली तरी का जाईना तुझा राग
बास करतो नाहीतर बकुळी धागा रुसायचा.
धन्यवाद मंड्ळी.
धन्यवाद मंड्ळी.
माधव, बकुळ सुकली तर होतीच पण सामानात चेंबली पण गेली होती.
तिकडे देऊळ असे नाहीच त्यामुळे फुले अर्पण करताना ठरवले ते हातून घडल्याचे समाधान मिळाले आणि त्याच बरोबर खुजेपणाची आणि "तेरा तुझको अर्पण " ही जाणीव प्रकर्षाने झाली.
माझे मन - आपल्या मायबोलीवर अनया, पराग आणि केदार ह्या तिघांनी इतकं छान लिहून ठेवलंय की त्यानंतर मी अजून काय लिहिणार असे वाटून त्यावेळी लिहिले गेले नाही. आता आठवणी धूसर झाल्यात.
हळूहळू काजळताना सांज ही
हळूहळू काजळताना सांज ही सुरंगी
तुझे श्वास दाटुनी येती असे अं तरंगी
या उदास आभाळाची शपथ तुला आहे
मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे
दिल्या-घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
मलाही सुरंगी आवडते.
हर्पेन, किती सुंदर आठवण!
हर्पेन, कैलास मान सरोवराची
हर्पेन, कैलास मान सरोवराची आठवण खास आहे. इच्छीत साध्य होणार असलं की खरच होतं,
src="/files/u69897/438092171
फार फार वर्षांच्या विरहा नंतर अलगद समोर आलेल हे बकुळ फूल. किती हरखून गेले होते मी हे आठवून मज्जा वाटते आहे! ब्रिस्बेन मधे हे झाड आहे असा सुगावा लागल्यानंतर खूप शोध घेतला पण नाही भेटलं, शेवटी उडुपी ट्रिप मधे भेट झाली! हा लेख आणि सगळ्यांच्या आठवणी वाचून मस्त वाटल. कधीही बकुळीचा विषय निघाला की आई तिच्या लहानपणी शनिवारवाडा आणि बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारातील बकुळ वृक्ष आणि त्या मुली कशा आधी मनसोक्त गजरे माळायच्या आणि मग सुकलेले गजरे कोणी वैद्य औषधांसाठी विकत घ्यायचे , ही आठवण सांगते.
सुरंगी फारच आवडते. या वर्षी
सुरंगी फारच आवडते. या वर्षी ठरवून मार्च मध्ये जांभळी नाक्यांवर फेऱ्या मारून सुरंगीचे गजरे मिळवलेच.
सप्तपर्णी chya वासाबद्दल सहमत. आधी छान वाटतो पण थोड्याच वेळात त्याचा उग्रपणा जाणवायला लागतो.
बकुळीचे गजरे आणून घातले तरी तो सुगंध एवढा उग्र नाही वाटला कधी.
शनिवारवाड्यात बकुळीचं झाड आहे
शनिवारवाड्यात बकुळीचं झाड आहे. तिथे गेल्यावर प्रत्येक वेळी तिथली फुलं मी वेचते. तसंच चिंचवडच्या मोरया गोसावींच्या वाड्यातही बकुळीचं झाड बघून लगेच फुलं वेचली होती.^^....... शनिवारवाड्यात बकुळीची फुले मिळाली होती.मात्र मोरया गोसावी मंदिरात बकुळ पाहिले नाही.
Sसगळे प्रतिसाद सुंदर ...
सगळे प्रतिसाद सुंदर ... प्रतिसादांमुळे बकुळीचा वळेसर अधिकच लांब आणि जास्त सुगंधी होतोय. धन्यवाद सर्वांना .
आईला अशीच देवांशी गप्पा मारायची जरा सवय आहे. ती म्हणायची, "घे, तुला आवडतं हे मला तुझ्याच देवळात समजलंय ना, आता मी पण तुला इथे रोज हव्वे तेवढे गजरे करून देते! करून घे हो तुझी हौस काय ती माझ्याकडून!" असं म्हणत ती पुजेच्या ताटलीत तो हार मांडून ठेवायची. बाबा तो हार हलक्या हाताने घालायचे देवीच्या फोटोला. >> प्रद्न्या, किती गोड...
आभा परदेशात आपली फुलं बघितली की डायरेक्ट मायदेशात पोचायला होत असेल ना...
बकुळीचं अत्तर कोणी ऑर्डर केलं तर इथे लिहा कसं आहे ते.. बकुळीच्या वासाच्या अत्तराची कल्पना नाही करू शकत आहे.
लंपन ऋतुराज सुरेख पोस्ट्स...
आणि हार्पेन किती योगायोग.. असं काही घडलं की देवाचा आशीर्वादच वाटतो मला तो... काय वाटलं असेल तुम्हाला बकुळीची फुलं मिळाली तेव्हा... त्याच बरोबर खुजेपणाची आणि "तेरा तुझको अर्पण " ही जाणीव प्रकर्षाने झाली. >> किती सुंदर लिहिलं आहे हार्पेन. निसर्गात विशेषतः पर्वतावर किंवा समुद्रकिनारी गेलं की आपलं खुजेपण फारच जाणवत मला. हार्पेन यांची चद्दर ट्रेक मालिका खूप आवडते मला. वाचलं की भारावून जायला होत.
rmd, माझ्या आठवणीत तरी ती फळ गोड लागायची नाहीत कधी, उलट घशात फारच ताठरा बसायचा पण तरी आम्ही खूप आवडीने खात होतो . आता मिळालं तर बघायला पाहिजे खाऊन कारण चव ही विसरायला झाली आहे. असो.
माधव ,ऋतुराज , प्रद्न्या सुरंगीच्या पोस्ट सुंदर आहेत. मला खूप आवडते सुरंगी. खाली पडलेले पिवळे केसर जास्त आवडतात बघायला. ... आमच्या गिरगावात असायचे हे वळेसर विकायला. ठाण्यात कधी दिसत नाहीत.
पल्लवी, देवकी छान आठवणी...
माझ्याच बिल्डिंग मधल्या
माझ्याच बिल्डिंग मधल्या बकुळीच्या फुलांचे सर... उद्या देवांना वाहीन. आम्ही मायलेकींनी वेचून आणली. मग चिंटुकल्या माळा आम्हाला दोघींना वास घ्यायला केल्या, त्या जरा जास्तच सुकलेल्या फुलांच्या आहेत. खरंतर सगळीच फुलं थोडी बावली होती, पण त्यातल्या त्यात चांगली देवासाठी घेतली. आणि हो, हायब्रिड नाहीत, सुरेख वास येत होता. फुलांची वाटी देवासमोर ठेवली तर स्वयंपाकघर दरवळलं!
यमन ऐकत, तंद्री लागली आणि लेक पण हौसेनं फुलं निवडून देत होती. आज खरंच आईचा वारसा लेकीकडे सर्वार्थाने आला ❣️
रिळाचा दोरा वापरलाय, तो त्या
रिळाचा दोरा वापरलाय, तो त्या फुलांपुढे सामान्य दिसतोय पण तिकडे लक्ष नका देऊ. आज माझ्यासाठी आनंदोत्सव आहे खरंच!! किती काय काय आठवत फुलं ओवली आत्ता! थँक्स हेमाताई!
किती सुंदर हार ओवलाय.
किती सुंदर हार ओवलाय.
किती सुरेख वर्णन प्रज्ञा.
किती सुरेख वर्णन प्रज्ञा. मस्त सर.
प्रज्ञा किती छान लिहिलं आहेस.
प्रज्ञा किती छान लिहिलं आहेस. फोटो मुळे धागा परिपूर्ण झाला. बकुळीचे " सर "हा शब्द बरेच दिवसांनी वाचला ...मन बालपणात गेलं लगेच. रिळाचा दोरा तू लिहिलंस म्हणून पाहिला नाहीतर लक्ष नव्हतं गेलं. ते छोटे सर तर लहान मुलाच्या बिंदल्या च वाटतायत.
रच्याकने, सर शब्दावरून आठवलं. माझ्या बारश्याला तेव्हा नवीन डिझाईन म्हणून चेन न करता मला बकुळी हार केला होता, तो अजून ही आहे माझ्याकडे, मी घालते कधी कधी लग्ना कार्यात.
यमन ऐकत, तंद्री लागली आणि लेक पण हौसेनं फुलं निवडून देत होती. आज खरंच आईचा वारसा लेकीकडे सर्वार्थाने आला ❣️ >> देवाला वाहताना किती कृतार्थ वाटेल तुला ...
बिंदल्या म्हणजेच बाळाच्या
बिंदल्या म्हणजेच बाळाच्या हातात घालायचे वाळे असावे.
Pages