आठवणींची सुगंधी कुपी... बकुळी

Submitted by मनीमोहोर on 4 June, 2025 - 13:30

आठवणींची सुगंधी कुपी... बकुळी

रंग , रूप, आकार ह्या पैकी काही ही देवाकडून मिळालेलं नसताना ही आपल्या सुगंधाने लहान , थोर, रसिक, कवी , लेखक सगळयांनाच आवडणारी बकुळ अर्थात माझी ही आवडती आहेच.

बकुळीचं झाड खूप म्हणजे खूपच मोठं आणि ऊंच होतं. कायम हिरवंगार दिसत. उंचीमुळे ह्याची फुलं हातानी काढणं शक्य नाही म्हणून वाऱ्याच्या हलक्या झुळुकीने ही ती आपसूकच खाली पाडण्याची सोय केलीय देवाने की काय कोण जाणे. छोटंसं, मध्ये एक आरपार छिद्र असणारं, तपकिरी रंगाचं, सुगंधाची खाण असणारं हे फुल त्याच्या फुल आरपार ओवून करता येणाऱ्या माळेसाठी कोकणात प्रसिद्ध आहे आणि ती माळ केळीच्या सोपात केली असेल तर सोनेपे सुहागा.. ह्या माळ ओवण्या वरूनच ह्या फुलाला कोकणात " ओवळ " असं म्हणतात आणि माळेला खास
कोकणी शब्द आहे "वळेसर ". लहानपणी ह्या माळा केसात घालायची कोण हौस ! आणि सुकल्यावर इतर वळेसरांसारख हे वळेसर फेकून न देता आम्ही पुस्तकात किंवा कपड्याच्या घडीत ठेवून द्यायचो. बकुळीचा वास फुलं सुकली तरी कमी होत नाही. उलट वाढतोच.

माझं बालपण लहान गावात गेलं आहे. माझ्या मैत्रिणीच्या घराजवळच एक मोठं बकुळीच झाड होतं . एक दिवस फुलं वेचायला आम्ही गेलो आणि इतका सोसाट्याचा वारा सुटला की तो मोठा वृक्ष ही गदागदा हलायला लागला. फुलं अक्षरशः टपटप गळत होती. ते वारं आमच्या मनातही भिनलं होतं. आम्ही ही वेडया झालो होतो. अंगावर होणारा फुलांचा वर्षाव झेलताना मन ही पिसासारखं हलकं होत होतं.

गोल गोल फिरत फ्रॉकमध्ये आम्ही दोघी फ़ुलं गोळा करत होतो. फ्राक भरून फुलं पाच सात मिनिटातच गोळा झाली. तो सोसाट्याचा वारा,गदागदा हलणारी बकुळ,उडणारा पालापाचोळा, गळणारी असंख्य फुलं, आमचे उडणारे केस आणि जमिनीला स्पर्श न होता झाडावरुन फ्रॉक मध्ये पडणारी ती फुलं, हे सगळं चित्र इतकी वर्ष झाली तरी सगळ्या तापशीलांसह अजूनही मनाला सुखावते. अजून ही ही बकुळीची आठवण तिच्या सूक्ष्म सुगंधासह कायमच मनात आहे.

बकुळीच्या झाडाला बोरासारखी पण आकाराने थोडी लांबट गोल अशी पिवळ्या नारिंगी रंगाची फळं लागतात. आताच्या मुलांना नवल वाटेल पण चिंचेचा पाला, आंब्याची कोवळी पालवी, उंबराची फळ, आंब्याच्या कोयीताला गर तसेच बकुळीची फळं ही खूप आवडती होती आमची. बकुळीची फळं खाल्ली की कधी कधी घश्यात खूप तोठरा बसत असे. पण असल्या लहान सहान गोष्टीना कुठे जुमानत होतो आम्ही ! Happy

बकुळीच झाड खूप उंच असल्याने हाताने काढता येत नाहीत. खाली पडलेलीच वेचावी लागतात. .पण त्र्यम्बकेश्वरा च्या मंदिराच्या आवारात एक बकुळीचं झाड आहे , अगदी हाताने काढता फुलं काढता येतील इतक्याच उंचीच. मी जनरली सार्वजनिक ठिकाणी फुलं तोडत नाही पण त्याक्षणी मोह आवरला नाही. डेखासकट एक फुल तोडलं, एक पान ही काढलं आणि त्या पानावर फुल टोचून फोटो ही काढला. फोटो खाली देतेय. इतकं मस्त वाटलं होतं तेव्हा.
We 3 20250604_143807.jpg

देवाच्या दारी जरी हे झाड खूप ठिकाणी असलं तरी भुता खेतांच ही हे आवडतं झाड आहे अशी समजूत आहे. नाडण ला आमच्या शेताच्या वाटेवर एक अफाट मोठं बकुळीच झाड आहे. संध्याकाळी शेताच्या दुसऱ्या टोकाकडून सूर्यकिरणांच्या प्रकाशात चमकून उठणार हे झाड खूप म्हणजे खूप सुंदर दिसत. आजूबाजूला खरं तर खूप झाडं आहेत पण लक्ष वेधून घेतं ते हेच झाड. असं जरी असलं तरी तिन्ही सांजेला , भर दुपारी किंवा अमावस्या पौर्णिमेला ह्या झाडाखाली रेंगाळू नका असा सल्ला आम्हाला मिळतोच मिळतो. वर्षातून एक दिवस भर दुपारी गुरुजीं सहित घरातला यजमान नैवेद्य आणि पूजा सामान घेऊन झाडाची साग्र संगीत पूजा करतो . झाडावरच्या मूळ पुरुषाला आमचं रक्षण करण्याचं गाऱ्हाणं घालतो.

आणखी एक आठवणीत असलेले बकुळ झाड हे भूता खेता पासुन अतिशय लांब आहे. किंबहुना एखाद्या भूताच्या मनात त्या झाडावर जायचा साधा विचार ही आला तरी त्याची काही धडगत नाही. हे बकुळ झाड गोंदवले येथे मंदिर परिसरात महाराजांच्या समाधि मंदिराच्या समोरच आहे त्यामुळे महाराज त्या झाडावर लक्ष ठेऊन आहेत. त्या झाडाभोवती हल्ली छान कट्टा बांधला आहे. मी त्या कट्टय़ावर बसून मनात राम नामाचा जप करत महाराजांचा कृपा प्रसाद समजून वेचलेल्या फुलांचा दरवळ कधीच कमी होत नाही.

हेमा वेलणकर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>आमच्या शेजारच्या चाळीत होतं झाड, बहीण तोडून खायची.
Happy माझ्या मॉन्टेसरीत होते. बाईंचा डोळा चुकवुन त्या झाडाखालीच असायचे.

^^शनिवारवाड्यात बकुळीचं झाड आहे. तिथे गेल्यावर प्रत्येक वेळी तिथली फुलं मी वेचते. तसंच चिंचवडच्या मोरया गोसावींच्या वाड्यातही बकुळीचं झाड बघून लगेच फुलं वेचली होती.^^
सेम पिंच वावे..मी पण दिसेल तिथून ही फुले वेचून आणते.

मनीमोहो र , अजून एक छान, सुगंधी लेख तुमच्या बटव्यातून . तुमचे सगळेच लेख एक सकारात्मक आणि हवे हवे वाटणारे गोडी घेऊन येतात. तुमचे व्यक्तिमत्व पण तसेच असेल असे जाणवते, सगळ्यांना समजून घेणारे, कोणाला त्रास होऊ न देणारे. तुम्ही कधी कोणाला ओरडून पण बोलत नसाल ना ?

छान लिहिले आहे. आवडले. बकुळीच्या फुलांचे वाळेसर दादरला पाहिले आहेत . भरगच्च अंबाडा तसेच मानेपर्यंत असलेले केस अश्या रेंजवर छान दिसतात.

सुंदर लेख. लहानपणी आमच्या मराठी शाळेजवळ ३-४ बकुळीची झाडं होती. त्यामुळे बहर आला की खूप फुलं जमवून आणायचो आम्ही. मग त्यांचे समान वाटे करायचो आणि गजरे बनवून केसांत मिरवायचो. गजरा पूर्ण सुकला तरीही छान सुगंध दरवळत रहायचा. यापैकी एका झाडाची फळं छान गोड असायची, बाकी थोडी तुरट, अगोड. पिवळी जर्द किंवा केशरी रंगाची. काही थोडी टपोरी जांभळा एवढी तर काही लहान. आता २०-२५ वर्षे झाली ती फळं बघितल्याला. सगळ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.

वा हेमा, लगेच लिहिलेस पण. मस्त लिहिलेस.

सामो,ओवायला सोपी म्हणुन ओवळी हे किती छान सुचले तुला. असेच नाव पडले असणार.

अंजु, तुतीचे झाड आता माझ्या दारात आहे. माझ्यापेक्षा वानरच जास्त खातात तुत्या. Happy

मी २५-३० फुटी बकुळ बृक्ष पाहिलेत. सज्जनगडावर २५-३० वृक्ष एकत्र पाहिले होते, जणू बकुळीचे जंगलच. जास्तीही असतील. बेलापुरगावात देवळाशेजारी एक होता.

इथे आंबोलीत ओवळीची मोरी आहे. म्हणजे रस्त्याखालुन पाणी जाण्यासाठी जी मोरी बांधलेली आहे त्यातिथे एक बकुळीचा विशाल वृक्ष आहे. आई सांगायची की तिच्या लहानपणी तिथे झाडांची इतकी गच्च दाटी होती की दुपारीही अंधार असायचा आणि सायंकाळी सातनंतर ओवळीच्या मोरीवरुन यायचे म्हणजे जीवावरचे संकट वाटायचे लोकांना. एखादा देवचार नाहीतर गेला बाजार छोटे भुत तरी ओवळीवर नक्की असणार याची खात्री होती. Happy

आता तिथे थेट ओवळीच्या खालीच एक फेमस टपरी आहे, सकाळी सात ते सायंकाळी सात तिथे कोणी न कोणी पुरी भाजी खात बसलेले असते. त्याला लागुनच पेट्रोल पंप आहे जो २४ तास उघडा असतो. ओवळीवर राहणार्‍या देवचाराची सध्याची पिढी भुताचा परंपरागत धंदा सोडुन कुठेतरी खोल जंगलात दिवाभीताचे आयुष्य कंठत दिवस ढकलत असणार. Happy

आता बाजारात या प्रकारच्या झाडाण्ची रोपे मिळायची शक्यता जवळपास शुन्य आहे. मार्केटात आता हायब्रिड बकुळ भरलेत जे फुले इतके देतात की पाने दिसत नाहीत पण सुवास जवळजवळ शुन्य.

काही वर्षांपुर्वी चेंबुरला गेले होते. तेथे सहा सात फुटी बकुळ दिसली. सुवास शुन्य. मी लांबुन पाहिले आणि कसले झाड म्हणुन जवळ जाऊन बघते तर फुलांनी भरलेले झाड पण वासच नाही. फुलेही झाडाला चिकटुन, खाली सडा नव्हता. धक्काच बसला बघुन. हायब्रिड बकुळीची ती पहिली भेट. नंतर भेटतच राहिला.

आमच्या ऑफिसच्या एका लेनवर दुतर्फा बकुळ होता. तोच तो पाच सहा फुटी, हाताने फुले तोडता येतील असा. मुद्दाम घेतला तर थोडा सुगंध असेलही. पण अख्खी लेन भरुन झाडे असल्यावर सुगंध दरवळायला हवा होता, त्याचा पुर्ण अभाव होता. झाडाखाली फुले पडली होती पण कॅलिक्स सहीत, अर्धवट मिटलेली. जुन्या झाडांखाली पुर्ण फुललेली, मोठ्या बटणाएवढी फुले मिळत. ती नाही दिसली. आंबोलीच्या ओवळीखाली मात्र आजही मिळतात.

या झाडांना फळे लागतात पण ऑफिसातल्या झाडांवर मला ती कायम हिरवीच दिसली. जुन्या झाडांची फळे पिकुन भगवी होतात आणि आत भगवा गर असतो. खुप सुंदर लागतो हा गर.

सज्जनगडावरुन मी बिया आणलेल्या पण रुजवायचे राहुन गेले. तुम्हा कोणाला बिया मिळाल्या तर नक्की रुजवा. हा बिया लावुन आलेला बकुळ नक्कीच जुन्या बकुळाची फुले व सुगण्ध देईल.

नर्सरीतील रोपे जर तो जुना सुगंध व फुले देत असतील
तर आनंदच आहे पण अजुन मी तरी अशी रोपे पाहिली नाहीत.

वाडीत आणि कोकणाच्या रस्त्यांवर म्हातार्‍या हातात लांब वळेसार घेऊन उभ्या असतात, केळीच्या सोप्यात ओवलेली ओवळी. Happy

^^मार्केटात आता हायब्रिड बकुळ भरलेत जे फुले इतके देतात की पाने दिसत नाहीत पण सुवास जवळजवळ शुन्य.^^
अगदी खरे आहे. वास आजिबात नाही त्यांना.
आता तुझी पोस्ट वाचून बिया मिळतात का ते पाहते.

खरचं साधना ताई हायब्रिड बकुळीला सुगंध अगदीच कमी असतो. आमच्या विरार मध्ये सुध्दा पालिकेने फुटपाथ कडेला बरीच बकुळीची झाड लावली आहेत आणि चार सहा फुटी झाडांना फुलं ही भरपूर असतात पण पूर्ण फुललेल्या झाडा जवळून गेलं तरी सुगंधाने कळते ना की इथे बकुळी आहे, ते काही जाणवत नाही. जाताना खाली एखाद फुल दिसलं की कळतं इथे आहे झाड. फुलं पण नसतात झाडाखाली जास्त जसा गावी सडा पडलेला असतो बकुळी च्या फुलांचा. असली तरी कॅलिक्स सहीत गळालेली असतात फुलं.

आमच्या गावी घराजवळ एक बकुळीच मोठं झाड आहे गावी गेलं की सकाळ संध्याकाळ फुलं गोळा करायला जायचो आम्ही. आणि ज्या दिवशी जाणार असू तेव्हा घरी येतोय म्हणून फोन केलेला असला की माझी आज्जी माझ्यासाठी गोळा करून ठेवायची फुलं. अगदी नव्वदित सुद्धा. कित्ती सांगितलं की जाऊ नकोस एकटी कुठे धडपडशिल तरी माझ्या साठी फुलं आणयचीच आजी. गेल्या गेल्या माझ्या समोर फुलं. मग मी लगेच गजरा करायला बसायची. आज खूप आठवण आली आज्जीची.

सर्वांना धन्यवाद.
स्वाती, शरदिनी डहाणूकर यांचा लेख ऐकला, लिंक साठी thanku.. ... गद्य काव्यच वाटलं ऐकताना. फारच तरल नाजूक, सुंदर लेख.
त्यांच्या वृक्षगान ची पारायणं केली आहेत एके काळी.

सामो पूर्ण गाणं इथे लिहिलंस धन्यवाद.

ऋतुराज, मस्त माहिती.. ही अजिबातच माहित नव्हतं. मजा आली वाचताना.
आदु अंजू सामो, मी चिन्मयी, रचना मस्त आठवणी. धनुडी नक्की लिही वेळ मिळाला की.

तुमचे व्यक्तिमत्व पण तसेच असेल असे जाणवते, सगळ्यांना समजून घेणारे, कोणाला त्रास होऊ न देणारे. तुम्ही कधी कोणाला ओरडून पण बोलत नसाल ना ? >> धनवंती काय बोलू ? एकदा मी नसताना घरच्या भेट म्हणजे कळेल खरं काय ते Rofl
जाई, झकासराव धन्यवाद प्रतिसादासाठी.
साधना, खूप छान लिहिल आहेस. ही हायब्रीड फुलं मी मात्र अजून पाहिली नाहीयेत. पण हल्ली सगळी झाडं अशीच असतात. सोनचाफा, मधुमालती, अनंत वगैरे वगैरे...
सस्मित च्या फुलांमधल्या मुंग्यांवरून काल लिहायचं राहिलं. आम्ही लहानपणी गुलमोहराची पांढरी पाकळी, गुलाबाच्या पाकळ्या, बकुळीची फुलं. झेंडू मधला खालचा भाग ज्याला (आम्ही झेंडूच खोबरं म्हणायचो ), जंगली बदाम फोडून ( तो तर जंगली n वाटता खरा बदामच वाटायचा ) अश्या सगळ्या गोष्टी आवडीने खायचो. बकुळीच्या फुलांमधली मुंगी कधीतरी जिभेला डसलेली ही आठवतेय. Happy

माझं सगळं लहानपण बकुळीचे गजरे घालून साजरं झालं! शाळेतल्या आवडत्या बाईंना देणं, आवडत्या मैत्रिणींना देणं हे तर रोजचं होतं. छान पाऊस झाला की, किंवा पुरेशी थंडी पडली की बहर येई. रात्री जेवणं झाली की आई झाडाखाली जाऊन वेचून आणत असे परडीभर फुलं, मग आम्ही केळीचे सोपे घेऊन गजरे करायचो.
आमची कुलस्वामिनी गोव्याची, तिथे देवळात आईने तिथल्या माम्यांना बकुळीचे गजरे विकताना बघितलं आणि समजलं की देवीला आवर्जून घालतात. मग काय, आई घरी आल्यावर देवीच्या फोटोला घालायचा म्हणून मुद्दाम एक तिपदरी/ चौपदरी हार करायला लागली! केळीचा सोपा असल्यामुळे कालचा गजरा किंवा हार सोडवून फुलं मोकळी केली की तोच सोपा पुन्हा वापरायचा. देवीचा अर्थात आधी करून घ्यायचा म्हणजे आमच्या वेणीला वापरलेला देव्हार्‍यात नको वापरायला.

(आईला अशीच देवांशी गप्पा मारायची जरा सवय आहे. ती म्हणायची, "घे, तुला आवडतं हे मला तुझ्याच देवळात समजलंय ना, आता मी पण तुला इथे रोज हव्वे तेवढे गजरे करून देते! करून घे हो तुझी हौस काय ती माझ्याकडून!" असं म्हणत ती पुजेच्या ताटलीत तो हार मांडून ठेवायची. बाबा तो हार हलक्या हाताने घालायचे देवीच्या फोटोला. देव्हार्‍याचा छान फोटो आहे, पण अल्बममधे आहे. सापडला तर नक्की पोस्ट करीन)

माझ्या बिल्डिंगमधे बकुळ आहे हे मला समजलं नि मी वेडीच व्हायची बाकी होते. पण साधना म्हणतेय तसं ते हायब्रिड असावं कारण वास अगदीच नसल्यात जमा आहे. पण बहरही नसतो फार. आणि तसं अजून फार मोठंही नाही झाड. कोण जाणे कधी बहरेल!

>>>>>सामो,ओवायला सोपी म्हणुन ओवळी हे किती छान सुचले तुला. असेच नाव पडले असणार.
अगं साधना, जागु यांना जाते ते क्रेडिट.
>>>>>>>>सामो पूर्ण गाणं इथे लिहिलंस धन्यवाद.
होय ममो.
>>>>>>आमची कुलस्वामिनी गोव्याची, तिथे देवळात आईने तिथल्या माम्यांना बकुळीचे गजरे विकताना बघितलं आणि समजलं की देवीला आवर्जून घालतात. मग काय, आई घरी आल्यावर देवीच्या फोटोला घालायचा म्हणून मुद्दाम एक तिपदरी/ चौपदरी हार करायला लागली!
वाह!! काय सुंदर ग.

ममोताई नेहेमीप्रमाणे छान लेख. तुमचे लिखाण बरेचदा भूतकाळात, बालपणात घेऊन जाते. बकुळ फुलांचा वास खूपच आवडतो. कालिदासाच्या रघुवंशातला आठव्या सर्गातला एक श्लोक आठवला. दशरथ राजाची आई इंदुमती आणि वडील अज उद्यानात विहार करत असतात आणि स्वर्गातून एक फुलांची माळा इंदुमतीच्या अंगावर पडते आणि त्या आघातामुळे ती मरण पावते. अज राजा शोक करू लागतो, त्या विलापाचे त्याच्या तोंडी एक दहा बारा श्लोक आहेत. हा कथाभाग अजविलाप म्हणून रघुवंशात येतो. तो श्लोक असा -
तव निःश्वसितानुकारिभिर्बकुलैरर्धचिताम् समम् मया|
असमाप्य विलासमेखलाम् किमिदम् किन्नरकण्ठि सुप्यते ll
भावार्थ - अज म्हणतो तुझ्या श्वासासारखाच सुगंध असणाऱ्या (तुझ्या श्वासाच्या सुगंधाचे अनुकरण करणाऱ्या) बकुळ फुलांची माळ आपण बनवत होतो आणि ती अशी अर्धवट बनलेली असताना हे गोड गळ्याच्या राणी तू मला अशी सोडून का जात आहेस? हे बहुदा मागे एका बकुळ चर्चेत वाड्यावर मी सांगितले होते.
त्यातच पुढे अजून एक श्लोक येतो जो बहुदा साहित्यिक वापरतात जो की असा -
गृहिणी सचिवः सखी मिथः प्रियशिष्या ललिते कलाविधौ|
करुणाविमुखेन मृत्युना हरता त्वाम् वद किम् न मे हृतम्॥
भावार्थ - तू माझ्यासाठी माझी बायको, सचिव, मैत्रीण , नानाविध कलांचे शिक्षण घेणारी प्रियशिष्या इ इ होतीस. तू गेल्यामुळे बघ (फक्त बायकोच नाही तर) मी काय काय हरवून बसलो आहे? ह्या अवांतर श्लोका बद्दल माफी Happy
वावे, चिंचवडचा देऊळवाड्यातला बकुळ तुम्हाला माहीत आहे, हे वाचून खूपच भारी वाटले. असंख्य आठवणी आहेत देऊळवाड्याच्या. काय सडा पडायचा ह्या फुलांचा तिथे.

लंपन सहीच.
अजविलाप... भारी आहे ते वर्णन.

ऋतुसंहारातील वर्षा ऋतूतील सर्गातील एक श्लोक:

बकुल कुसुममाला मालती माळुनीया
विकसित नवपुष्पें यूथिकांच्या कळ्या या
करित नवकदंबे कर्णभूषा वधूंची
प्रियपतिसम वर्षा भागवी हौस त्यांची II
- वि वा भिडे

ऋतू मूळ श्लोक असा -

शिरसि बकुलमालां मालतीभिः समेतां
कुसुमितनवपुष्पैर्यूथिकाकुङ्मलैश्च ।
विकचनवकदम्बैः कर्णपूरं वधूनां
रचयति जलदौघः कान्तवत् काल एषः l l

माझे वडील या बकुळं नावाच्या फळांबद्दल बरंच काय काय सांगतात. खूप गोड असतात म्हणे. मी कधी खाल्ली नाहीत. पण आयुष्यात एकदा तरी खाऊन पहायची आहेत.

लंपन, प्र९, साधना आणि ऋतु : छान पोस्टी.

सिंगापुरात देखील माझ्या घराजवळ बकुळ फुलांची खुप झाडे आहेत. अगदी सडा नसतो पडलेला पण खुप फुलं असतात. एकदा आई आली होती तेंव्हा तिच्यासाठी वेचुन आणली होती फुलं खुश झाली होती. बाकी मला लहानपणापासुन ह्या फुलांचा वास फार आवडत नाही. (डो मा)
सामो - सांगलीला एक हृषीकेश जोशी म्हणून आहेत. त्यांच्याकडुन मी आत्ता काही अत्तर मागवले आहेत. त्यात बकुळ आहे. अजुन वापरले नाहीये पण त्यांच्याकडचे इतर काही प्रॉडक्टस वापरले आहेत. ते छान असतात. (ही जाहिरात नाहीये).

Pages